दिवाळी अंक २०२२ - संपादकीय
गणपतीबाप्पांना निरोप दिला की वेध लागतात दसरा-दिवाळीचे. बाजारातली वाढणारी उलाढाल ही दिवाळी कशी जाणार याचा अंदाज देऊ लागते. या काळात काय करायचे याचे नियोजन प्रत्येक घरात होऊ लागते आणि वातावरणात एक निराळा उत्साह संचारतो.
कोविडच्या संकटातून जग बाहेर यायला सुरुवात झाली आहे असे वाटणारे हे वर्ष एक नवी आशा घेऊन आलेले आहे. श्रीलंकेत पसरलेली अशांतता, युक्रेन युद्धाचा ज्वर, दोन वर्षांच्या खंडानंतर निघालेली पंढरपूरची वारी, दोन वर्षांनी पुन्हा शाळेत जायला लागलेले विद्यार्थी, सावरणारी अर्थव्यवस्था अशा संमिश्र बातम्या आणि भावना घेऊन आलेली ही दिवाळी.
या कोविड महामारीने आपल्याला बरेच काही शिकवले. थाळीवादनापासून सुरू झालेला प्रवास 'आत्मनिर्भरते'पर्यंत जाऊन पोहोचला. या काळात सर्वांचे काही ना काही प्रमाणात नुकसान झाले असले, तरीसुद्धा या काळात आपल्याला अनेक चांगल्या सवयी लागल्या होत्या किंवा त्या सक्तीने लावून घ्याव्या लागल्या होत्या. आता या उत्तर कोविड काळात त्या चांगल्या सवयी सुटू नयेत, याची प्रत्येकाने काळजी घ्यायची आहे. उदाहरणार्थ, स्वच्छतेविषयी आपण सारे जण त्या काळात विशेष जागरूक झालो होतो. अशीच लागलेली दुसरी सवय म्हणजे घरकाम. कोविड गेला असे वाटत असले, तरी या सवयी चालू ठेवायला काहीच हरकत नाही. या सवयींमुळे झाला तर फायदाच होणार आहे.
दिवाळीला एखादी नवी खरेदी, नवे कपडे, फराळाचे पदार्थ याबरोबरच आपल्या सर्वांना वेध लागतात ते मिपा दिवाळी अंकाचे.
कथा, कविता, प्रवासवर्णन, रसग्रहण, ललित लेखन अशा विविध रसांनी युक्त असा अंक आम्ही तुमच्यासमोर सादर करतो आहोत.
नीलकांत, प्रशांत, सुधांशुनूलकर, प्रा.डॉ.दिलीप बिरुटे, गवि, सस्नेह, टर्मीनेटर, तुषार काळभोर, जव्हेरगंज, पियुशा, चिनार या सर्वांनी घेतलेल्या अपार मेहनतीच्या जोरावर हा अंक तुमच्या हाती देताना आम्हाला अतिशय आनंद होतो आहे.
या वेळी तांत्रिक अडचणींमुळे आपले मिपा बरेच दिवस विश्रांतिअवस्थेत होते. त्याचा परिणाम दिवाळी अंकावरही झाला. अंक ठरलेल्या वेळेपेक्षा उशिरा प्रसिद्ध होतो आहे, याशिवाय या अंकात काही त्रुटीदेखील राहिल्या आहेत, याची संपादक मंडळाला कल्पना आहे. त्याकरता टीम दिवाळी अंकातर्फे मी सर्व वाचकांची क्षमा मागतो. पण मिपा अशा अनेक प्रसंगांतून तावून सुलाखून बाहेर पडले आहे. याही वेळी आपल्या सर्वांच्या सहकार्याने आणि आशीर्वादाने या अडचणींवर मात करून मिपा पुन्हा एकदा नव्या जोमाने आपल्या सेवेत रुजू होइल, याची ग्वाही देऊन हा अंक आपल्यासमोर सादर करतो.
ही दिवाळी आणि येणारे वर्ष आपणा सर्वांना सुखाचे, समाधानाचे, आनंदाचे, आरोग्यसंपन्न व भरभराटीचे जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. || शुभ दीपावली ||
ज्ञानोबाचे पैजार