ज्योतिषांकडे जावे का? का जावे? … आमचेही काही प्रयोग
सांप्रतकाळी भारतवर्षात काय, किंवा विलायतेस काय, बरेच उच्चविद्याविभूषित जंटलमन आणि सुविद्य लेड्या ज्योतिषांची टर उडविताना दिसतात; कां की त्यांचे मते ज्योतिष हे एक थोतांड असून लबाड ज्योतिषी मडळींनी केवळ आपली तुंबडी भरण्यासाठी ते रचिलेले आहे, आणि ज्याअर्थी विश्वचूडामणि असलेल्या ‘आम्रविका’ खंडातील प्राख्यात ‘सायनस’या महासिकाची ज्योतिषविद्येस मान्यता नाही, त्याअर्थी हे थोतांड असल्याचे निर्विवादपणे सिद्धच होते, सबब समस्त लुच्च्ये ज्योतिषी हे खेटरे मारण्याच्या लायक होत.
बरे, एकीकडे हे चित्र, तर दुसरीकडे पहावे तो ज्योतिषांकडील गर्दीस खळ नाही, वृत्तमानपत्रादिकात याविषयीची सदरे, धोत्रे, बंड्या, चोळ्या, इत्यादि वर्षानुवर्षे सुखनैव चाललेली असतात, त्यांसही खळ म्हणून नाही; राशिचाक्रादि कार्यक्रम लोक दमड्या खर्चून चवीने बघतात, दूरदर्शनादिवरील गुबगुबीत, साजर्या - गोजर्या ज्योतिषांचे तर उखळ कायमचे पांढरे झाल्याचे दिसूनच येत असते, ज्योतिषाचीच जुळी भावंडे म्हणावीत, अश्या वास्तुशास्त्र, फ़ेंगशुई, नाडी इ. ची भलावण करणारेही बहुत लोक सांप्रत दिसून येतात.
सारांश, या दोन्ही प्रकारची माणसे एकसमयावच्छेदेकरून दृष्तोत्त्पत्तीस येत असल्याने मति गुंग होऊन बहुत मनुष्यांचे ठायी आपण ज्योतिषाकडे जावे किंवा कसे, असा संभ्रम निर्माण झालेला दिसून येत असतो.
आम्ही स्वत: ज्योतिषाच्या वाटेस कधीच गेलेलो नव्हतो, परंतु एके दिवशी योगायोगाने ‘लंबक विद्या’ हे पुस्तक आमच्या हाती पडले, आणि बघता बघता आम्ही स्वत:च लंबकाद्वारे भविष्यकथन करू लागलो. (या विषयी आम्ही आमच्या "एक 'वजनदार' धागा" या लेखात सविस्तरपणे सांगितले होते. जिज्ञासुंना ‘इथे’ टिचकी मारून तो लेख बघता येईल).
कालांतराने आम्ही लंबकाचे प्रयोग करणे कमी करत गेलो, त्या सुमारास एक दिवस आमच्या परिचयातील एक वयस्क जोडपे आपल्या तरूण मुलीस घेऊन आमचेकडे आले. सदर तरुणीची मलूल मुद्रा, हताश दृष्टी इत्यादिंवरून तिला काही असाध्य व्याधी जडली असावी, असे वाटत होते. इला काय झाले, अशी पृच्छा करता इचा प्रेमभंग जाहलेला असून त्यायोगे ती फार कष्टी जाहलेली आहे, सबब दिवसभर उदासवाणी बसून असत्ये, खातपीत काहीएक नाही, आम्ही सर्वांनी तिची फार समजूत घातली, तरी त्याचा काहीएक उपयोग नाही, दिवसेंदिवस इची प्रकृती खालावत चाललेली आहे, डागतरांचे औषधाचाही काहीएक परिणाम नाही, सबब ज्योतिषाच्या तोडग्याशिवाय काही तरणोपाय आम्हास आता दिसत नसल्याने तुमचेकडे आलो आहोत, असे उत्तर मिळाले.
हे सर्व ऐकून आम्ही फार कष्टी होऊन स्वत:शीच ह्मणालो:
“अरेरे, काय या बापुडीचे प्रारब्ध, “वो हस के मिले हमसे, हम प्यार समझ बैठे” अशी सुरुवात होऊन आता इची अवस्था “ तंग आ चुके ही कश्म-कशे जिंदगीसे हम, ठुकरा न दे जहां को कहीं बेदिली से हम ” अशी झालेली आहे. “बहार आनेसे पहले, खिजां चली आयी” हेही तिच्या मुद्रेवरून दिसून येत आहे. इच्या “बेदर्दी बालमा” ने “बेमुरव्वत” पणे इजला “हाय अकेला छोड गये” असे करून तो स्वत: मात्र कुणाबरोबर तरी “ये राते, ये मौसम, नदी का किनारा, ये चंचल हवा” म्हणत खुशाल हिडत आहे. इची “तडप ये दिन-रातकी” अशी अवस्था बघून कुणीतरी आता इजला “राही तू मत रुक जाना… कभी तो मिलेगी तेरी मंजिल, कहीं दूर गगन की छाओंमे” अशी सांत्वना तातडीने देणे गरजेचे आहे, आणि ज्याअर्थी हे तुजकडे मोठ्या आशेने आलेले आहेत, त्याअर्थी हे काम आता त्वां सत्वर करावेस, याबद्दल किमपि संशय नाही”
आमच्या अंतर्मनाने असा निर्वाळा देताच आम्ही ताबडतोब आमच्या लंबकविद्या करण्याच्या जागी स्थानापन्न होऊन त्या मुलीस आमचे समोर, तर तिच्या माता-पित्यास दोन्ही बाजूला बसवून दृष्टी लंबकावर स्थिर ठेवण्यास सांगितले, आणि आम्ही त्या बापड्या मुलीस मदत करण्याचे आवाहन आमच्या लंबकास करून चित्त एकाग्र केले.
लंबकाकडून अनुकूलतेचा इशारा मिळतच आम्ही मोठ्याने “हिचा ज्याच्यावर जीव जडलेला आहे, तो तरूण या घडीस काय करीत आहे?” असे विचारले, यावर लंबकाकडून “सांप्रत तो दुसर्या स्त्रीसोबत रममाण झालेला आहे” असे उत्तर मिळाले, त्यावरून ती तरुणी हमसाहमशी रडू लागली. तिचे जरा सांत्वन करून मग आम्ही “बरे, तर मग तो तरूण स्वभावाने कसा आहे?” असे विचारता “तो चंचल स्वभावाचा असून नित्य नवीन स्त्रियांच्या शोधात फिरणारा लंपट पुरुष आहे” असे आले. मग “इचा त्याचेशी विवाहसंबंध घडून आल्यास तो सुखाचा ठरेल काय?” असे विचारता “किमपि नाही” असे उत्तर त्रिवार आले. “विवाह केल्यास आणखी काय घडेल?” अशी पृच्छा करता “सासरी फार छळ होऊन पुढे वैधव्य येईल” असे उत्तर मिळाले.
एवढे सर्व होईतो साधारणत: अर्धा कलाक उलटलेला होता, आणि त्या मुलीच्या चर्येवर अंमळ तरतरी येऊ लागलेली होती. पुढे “हिने आता काय करावे?” अशी पृच्छा लंबकाद्वारे केल्यावर “अभ्यासात लक्ष घालून शिक्षण पूर्ण करावे” असे उत्तर मिळाले, आणि "हिच्या विवाहाचे काय?" असे विचारता “शिक्षण पूर्ण झाल्यावर आई-वडीलांनी शोधलेला उत्तम पती लाभून सुखाचा संसार होईल” असे कळले.
आता मुलगी चांगलीच सावरली होती आणि तिच्या मुद्रेवरील भाव पालटून ती समाधानी दिसत होती. बर्याच दिवसांनंतर ती प्रथमच पोटभर जेवली, आणि आणि आमचे वारंवार आभार मानून ती मंडळी स्वगृही परतली. आठवडाभरातच तिच्या वडिलांनी ती आता पुनश्च पहिल्यासारखी झाली असून नीट अभ्यासाला लागली असल्याचे कळवले. आम्हालाही ती पुन्हा “आज फिर जीने की तमन्ना है” या स्थितीत आल्याचे ऐकून बरे वाटले.
आणखी एक उदाहरण म्हणजे आमच्या परिचयातील (आता दिवंगत) पासष्ठ वर्षे वयाचे एक चित्रकार विधुर असून एकटेच मोठ्या घरात रहात असत. त्यांचा एकुलता एक मुलगा परदेशात स्थायिक झालेला होता. एक दिवस मला ते म्हणाले, की तुला अगदी खाजगी असे काही सांगायचे आहे, आणि तुझ्या लंबकविद्येद्वारे त्या बाबतीत भविष्य जाणून घ्यायचे आहे.
त्यांच्या संपर्कातील सुमारे पन्नाशीतील एका विवाहित स्त्रीवर त्यांचे मन जडले होते. त्या स्त्रीस तीन मुले असून ती पती व मुलांसोबत रहात असे. त्यांना असे वाटू लागले होते, की तीही त्यांच्यावर अनुरक्त असून यांनी पुढाकार घेतल्यास ती सहजच आपले घर सोडून यांच्याबरोबर येऊन राहील.… आम्हाला जरी हा सर्व त्यांच्या एकटेपणाचा, विधुरावस्थेचा आणि कल्पनाशीलतेचा परिणाम आहे, असे वाटले, तरी त्यांना मात्र पूर्ण खात्री वाटत होती, हिंम्मत मात्र होत नव्हती.
मी त्यांना विचारले, की सध्या तिचे तुमच्याबद्दलचे आकर्षण, (आणि त्यामुळे तिची तुम्हाला ‘हो’ म्हणण्याची शक्यता) किती टक्के असावे असे तुम्हाला वाटते? “ऐशी टक्के” ते म्हणाले. मग मी टक्केवारीचा चार्ट वापरून लंबकाद्वारे तिचे हे आकर्षण पुढील काही वर्षात कमी कमी होत होत पाच-सात वर्षात ते पूर्णपणे लयाला जाईल, असे त्यांना दाखवून दिले. परिणामी त्या गृहस्थांनी तो नाद सोडून दिला (आणि संभाव्य मानहानि आणि संकटापासून बचावले).
वाचकहो, निराशेच्या गर्तेत सापडलेली ती मुलगी आणि खोट्या आशेत दिवास्वप्ने बघणारे ते गृहस्थ यांना त्यांच्या त्या त्या स्थितीतून बाहेर काढण्यास या विद्येचा उपयोग आम्ही करू शकलो, हे काय कमी आहे? हे प्रयोग आम्ही कवडीही न घेता करायचो, शिवाय येणाराचे आदरातिथ्य करायचो, यात आमचा कोणता स्वार्थ होता? त्या दीड-दोन वर्षात आम्ही बरेच जणांना दिलासा देऊ शकलो, मदत करू शकलो. पुढे मात्र आम्ही असे प्रयोग करणे थांबवले, ते आजतागायत.
सारांश, ज्योतिषाच्या विविध पद्धतींचा निस्वार्थीपणे, समजून उमजून नीट उपयोग केला गेला, तर ती एक उपयोगी, हितकारक विद्या ठरू शकते, भले तीस ‘शास्त्र’ म्हणता येवो वा न येवो.
पत्रिका बघून सांगितलेले भविष्य तंतोतंत खरे ठरल्याचे अनुभवही आम्हाला आलेले आहेत, मात्र हे अनुभव धंदेवाईक ज्योतिषांकडून आलेले नसून निस्वार्थीपणाने लोकांच्या मदतीसाठी आपल्या विद्येचा उपयोग करणार्या, विनम्र व्यक्तींनी केलेल्या भविष्यकथनाविषयी आहेत. त्याविषयी पुढे कधितरी.
वाचने
17632
वाचनखूण
प्रतिक्रिया
51
चित्रगुप्त जी पापपुण्याचा
लंबकर्णी
छान...
In reply to छान... by दादा कोंडके
हा हा हा
लम्बक विद्या
हाहा!
भाषेवर अतिशय लोभ जडला असुन
In reply to भाषेवर अतिशय लोभ जडला असुन by स्पंदना
सांप्रत काळात
छान लेख. आवडला.
सारांश, ज्योतिषाच्या विविध
In reply to सारांश, ज्योतिषाच्या विविध by बाळ सप्रे
दोन्ही उदाहरणात जोतिषाचा काहीच संबंध नाही
समुपदेशक आणि ज्योतिष
In reply to समुपदेशक आणि ज्योतिष by चित्रगुप्त
आता त्या दोघांनाही सांगा जे
In reply to आता त्या दोघांनाही सांगा जे by बाळ सप्रे
समुपदेशक आणि ज्योतिषी
In reply to समुपदेशक आणि ज्योतिषी by चित्रगुप्त
आपला स्वतःचा जोतिषावर विश्वास
In reply to आपला स्वतःचा जोतिषावर विश्वास by बाळ सप्रे
लंबक आणि भविष्याचा वेध
In reply to लंबक आणि भविष्याचा वेध by चित्रगुप्त
शंभर टक्के सोडा ८०-९० येत
In reply to शंभर टक्के सोडा ८०-९० येत by बाळ सप्रे
आधीचा धागा
In reply to आधीचा धागा by चित्रगुप्त
भुमिका आवडली. पटण न पटण हा
छान
नाही नाही. त्या दोघांना
खरच हरहुन्नरी आहात ! लेखनाची
छान अॅप्रोच आहे तुमचा.
In reply to छान अॅप्रोच आहे तुमचा. by प्यारे१
मायनॉरिटी रिपोर्ट
@प्यारे१ ...छान अॅप्रोच आहे
In reply to @प्यारे१ ...छान अॅप्रोच आहे by चित्रगुप्त
दोन्ही!
पत्नीचे बोल ऐकायला लागले.... पण
In reply to पत्नीचे बोल ऐकायला लागले.... पण by शशिकांत ओक
किती ते गोड गोड बोलावं.
In reply to किती ते गोड गोड बोलावं. by धन्या
संकोच कशाला
च्यार घटिका बहुत हुशारी
...
काय आहे तरी काय?
बहुआयामी
अरेच्चा हे बरे आहे.
नवीन मिपाकरांसाठी पुन्हा एकदा.
व्वा! क्या बात है!!
अजुन
पुन्हा एकदा.
फारा दिवसांनी मिपावर लॉगिन
{मिसळपाव}राज-ज्योतिषी,कथाकार
पत्रिका बघून सांगितलेले
ज्योतीषविषयक काही अनुभव
मी दहा हजार दहावा
समाजा तील नियमांना?
आणि बघता बघता आम्ही स्वत:च
' थेरोनोस ' बदल सहमत
रोगाचे निदान करणारे तद्न्य
In reply to रोगाचे निदान करणारे तद्न्य by चौकस२१२
डॉ मोहन आगाशे
In reply to डॉ मोहन आगाशे by प्रकाश घाटपांडे
काय अजून माहिती पाहिजे ?
In reply to काय अजून माहिती पाहिजे ? by चौकस२१२
मोहन आगाशे यांच्या संशोधनाचा
https://www.mimhpune.org