मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

दिवा़ळी अंक २०२१ : कोर्टस्य प्रथम दिवसे

नीलकंठ देशमुख · · दिवाळी अंक
'पहिल्या'चे महत्त्व काही वेगळेच असते. खरे तर कुठलीही घटना, गोष्ट आपण अनुभवतो, त्या वेळी पहिलीच असते. तरीसुद्धा पहिले अमुक, पहिले तमुक अशा असंख्य 'पहिल्याचे'कौतुक असंख्यांना असते आणि बरेच जण त्या पहिल्याविषयी लिहीत असतात. कालिदासाने आषाढाच्या पहिल्या दिवसावर लिहिलेय! आता मी कोर्टातल्या पहिल्या दिवसावर! कोर्ट, जज्ज, वकील, पोलीस इ. केंद्रस्थानी असलेल्या सिनेमांवर 'पोसलेल्या' मला, वकील झालो की वकिलीच्या पहिल्याच दिवशी डायरेक्ट मर्डरची केस चालवायला मिळेल, आपण ती वकिली कौशल्याने जिंकू.. सोबत एखाद्या खूबसुरत हसीनाचे दिलही, अशी अलनाश्चरी स्वप्ने पडत. कदाचित त्यामुळेच मी ठरवले की होईन तर वकीलच! त्या काळी लॉला प्रवेश घेणे अवघड नव्हते. घेतला प्रवेश. मग यथावकाश, सावकाश, मजल दरमजल करत वकिलीच्या भोज्याला शिवलो. पंचवार्षिक योजना! १९७५ ते १९८०. नातेवाईक, शेजारपाजार्‍यांचे, "इतर काही जमलं नाही, झाला वकील! आता काय दिवे लावतो ते पाहू" अशा कुत्सित शेर्‍याकडे दुर्लक्ष करत पुढची तयारी सुरू केली. आतापर्यंत फक्त शिनेमातच पाहिलेल्या कोर्टाशी प्रत्यक्ष संबंध येणार, या कल्पनेनेच मोहरून की काय म्हणतात तसे गेलो होतो. वकिलीच्या पहिल्या दिवशी, आधीच खरेदी केलेले पांढरा शर्ट, पांढरी पॅट घालून, वर काळा कोट चढवून कोर्टात जायला निघालो. रिकामे जाणे बरे नाही, म्हणून हातात एक कातडी बॅग घेतली. कोर्टातल्या कामकाजाच्या नोट्स घ्याव्यात, उपयोग होतो, असे लॉला प्रवेश घेतला तेव्हा कोर्टातून सीनियर कारकून म्हणून रिटायर झालेल्या शेजारचे काकांनी सांगितल्याचे लक्षात होते. त्यांचे एक साहेब वकिलांना नेहमी असा सल्ला द्यायचे म्हणे! बॅगमध्ये वही, पेन टाकले. स्वतःकडे वाहन, अगदी सायकल पण नव्हती. पहिलाच दिवस होता. त्यामुळे जाण्यासाठी कोपर्‍यावर सायकल रिक्षा ठरवली. त्याने सावज बरोब्बर हेरलं. "कोर्ट चलने का क्या वकील साब?"- तो. वकीलसाब म्हणून कुणीतरी पहिल्यांदाच संबोधले होते. मनातल्या मनात, गुदगुल्या झाल्यावर वाटते तसे वाटले. "हां. कोर्ट ही जानेका है, कोट पहनके सिनेमा देखने थोडे जायेंगे?" मी विनोद केला. खूश होतो. "दो रुपया लगेगा." माझ्या विनोदाकडे दुर्लक्ष करत तो सरळ धंद्याचे बोलला. कोर्टापर्यंत जायला दीड रुपया ठीक होता. दोन जास्तच होते. पण पहिल्याच दिवशी घासाघीस करणे नको वाटले. "ठीक है, चलो, लेकिन दुसरेको नही लेना. हम अकेलेच होंगे."' बीडच्या हिंदीतून त्याचा प्रस्ताव मान्य करत, पण काही अटी शर्ती घालत रिक्षात बसलो. रस्त्याने जाताना आजूबाजूचे लोक आपल्याकडे पाहात आहेत, असे वाटत होते. संकोचणे आणि कॉलर टाईट होणे एकाच वेळेस! वाटेत एका गल्लीत रिक्षाची चेन घसरली. रिक्षावाला खाली उतरून ती लावायचा प्रयत्न करू लागला. रस्त्यावर दोनचार टारगट पोरं, बहुधा शाळा बुडवून गोट्या खेळत होती. "ऐ वकील बघ. नवा दिसतोय! रिक्षात चाललाय" असे म्हणत अकारण खिदळू लागली. माझे वकील असणे, नवीन असणे व रिक्षातून जाणे यात त्या कार्ट्यांना हसण्यासारखे काय वाटले, ते त्यांनाच ठाऊक. अकारण ओशाळलो. रिक्षातून उतरून जावे असे वाटले. "अरे हुवा के नही दुरुस्ती?" अधीर होऊन विचारले. उत्तर देण्याऐवजी तो सीटवर बसला व पायडल मारू लागला. कारट्यांच्या कॉमेंट चालूच होत्या. कोट उगीच घातला. उद्यापासून कोट बॅगेतच ठेवायचा, कोर्टात गेल्यावरच घालायचा, असे ठरवले. कोट अंगावर नसला की पायी जाता येईल. आज ठीक आहे, रोज रिक्षा कशाला? विचारात असतानाच रिक्षा थांबली. 'न्यायमंदीर' असा फलक समोर होता. न्यायमंदीर मधील 'दी' र्‍हस्व आहे, दीर्घ नाही. जाऊ दे. आपल्याला काय करायचंय? दीर्घ तर दीर्घ. हे मनातल्या मनात. खाली उतरलो. तसे आधी कोर्ट पाहिले होते. पण आज वकील म्हणून पहिले पाऊल! आजूबाजूची मंडळी कौतुकाने पाहतील वाटले. पण कुणी ढुंकूनही पाहिले नाही. आवारात गर्दीच गर्दी होती. वकील होते. वकिलांची टेबले होती. काही वकिलांच्या टेबलांपाशी इतर लोकही होते. पटकेवाले, धोतरवाले, टोप्यावाले. बोडखे. तर्‍हेतर्‍हेचे. काही वकिलांशी बोलत होते. काही खुळ्यासारखे उभे होते. काही आपसात बोलत होते. काही टेबलांजवळ फक्त वकीलच होते. त्यापैकी काही जण शून्यात नजर लावून, तर काही प्रवेशद्वारावर नजर लावून बसलेले. काही वकील नुसतेच फिरत होते. काही टेबलांजवळ एकापेक्षा जास्त वकील आपापसात बोलत होते. काही टेबलांवर टाइपरायटर होते. समोर टाइपरायटर चालवणारे होते. ते टाइपरायटर चालू होते. काहींना वकील मजकूर सांगत होते, ते तो टाईप करत होते. काही टाईपवाले जवळचे कागद वाचून टाईप करत होते. दोन-तीन टेबलांवर विक्रीसाठी स्टॅम्प, बॉंडपेपर ठेवलेले होते. विकणार्‍यांसमोर विकत घेणारे होते. विकताना, घेणार्‍याचे नाव, गाव, पत्ता रजिस्टरमध्ये लिहून घेत होते. "रामभाऊ,एकोणीसशे सत्त्याहत्तरचा मार्चचा बॉडपेपर आहे का?" 'एकाने स्टॅम्प विक्रेत्याला हळूच विचारले. तो 'कोर्टबाज' आणि त्या रामभाऊचा 'खास माणूस' असावा. रामभाऊने त्याला डोळा मारून गर्दी कमी झाल्यावर ये अशी खूण केली. हाताने बोटे दाखवून काही इशाराही केला. डोके हालवून तो निघून गेला. तीन वर्षांपूर्वीचा स्टॅम्प पेपर कशाला हवा होता? जुने कोरे स्टॅम्प पेपर मागच्या तारखेतले दस्त तयार करायला लागतात, त्यामुळे त्यांना भलती डिमांड असते, असे कुणीतरी सांगितले होते, ते आठवले. एका झाडाखाली पोलिसांची मोठी गाडी उभी होती. जवळच हातकड्या घातलेले दहाबारा कैदी बसले होते. त्यांच्याभोवती लहान पोरे कडेवर घेतलेल्या, तर काही नुसत्या,बायका, आपापल्या माणसांना भेटायला आलेल्या! काही पुरुषही होते. आणलेले जेवणाचे डबे, तंबाखू, सिगारेट, बिड्या, आणखीही काहीबाही आपल्या माणसांना देण्यासाठी, त्यांच्याशी बोलण्यासाठी बंदोबस्तावरच्या पोलिसांना विनवत होते. पोलीस कावून गेले होते. कैद्यांवर, त्या पब्लिकवर डाफरत होते. अधूनमधून परवानगीही देत होते.तिथे एक दोन वकीलही होते. कोर्टाच्या आवारातच कोपर्‍यात कँटीन होते. तिथे काम करणारी पोरे, पोलीसगाडीजवळ जाऊन चहा, पोहे, भज्याच्या ऑर्डरी घेऊन जात होते. ऑर्डरी प्रमाणे पदार्थ पोहचवत होते. कँटीनमध्ये कुणी ओळखीचे दिसते का, पाहण्यासाठी तिथे डोकावलो. गर्दी होती. आत व बाहेर बाकांवर अनेक वकील, पक्षकार, त्यांच्यासोबतची माणसे नाष्टा-चहापाणी करत होती. कोर्टकामाची चर्चा, साक्ष काय द्यायची त्या सूचनांची देवघेव सुरू होती. 'इरुद्धी बाजूनी गोप्या येणारय साक्षीला. धंदाच है त्येचा. लयी बेणं हाय" एक पटकेवाला वकीलसाहेबांना सांगत होता. त्यांनी फक्त मान हलवली. "कोणी बी येऊ दे साक्षीला! वकीलसाहेब पार उलटा करून टाकत्येल.: सोबतच्या टोपीवाल्याने पटकेवाल्याला आश्वस्त केले. "आमच्या दाव्याच्या टाईमला काय झालंतं" असं म्हणून तो आपली हकीकत सांगू लागला. वकीलसाहेब काडीने दात कोरत आपले कवतीक ऐकू लागले. पटकेवाल्याचे चेहर्‍यावर वकीलसाहेबाविषयी आदर ओसांडून वाहू लागला. बाजूच्या टेबलांवर वकिलांचे आपापसात हास्यविनोद सुरू होते. काल कोर्टात काय गमती झाल्या, अमुक वकिलाला डिस्टीकजज साहेबांनी कसा झापला, वगैरे वगैरे.कँटीनमधल्या पोरांवर मालकाचे ओरडणे ,ऑर्डरी सांगणे, पोरांचे मोठ्या आवाजात कुठल्या टेबलाचे किती बील झाले ते सांगणे सुरू होते. असा संमिश्र कोलाहल ऐकून डोके गरगरायला लागले. कुणी ओळखीचे नव्हते. बाहेर आलो. शेजारी पानटपरीवर टपरीवाला कुणाला एकसोबीस तीनसो पान, तर कुणाला प्लॅस्टिकमध्ये तंबाखूचा मावा घोटून देत होता. नेहमीचे गिऱ्हाईक असणार! पान, मावा तोंडात भरून त्याचा आनंद घेणारे तृप्त होऊन आजूबाजूला पिचकार्‍या सोडत होते. एखादी पिचकारी आपल्या पांढटया प्यांटवर नक्षीकाम करील, या भीतीने पटकन बाजूला सरकलो. तेवढ्यात प्रवेशद्वाराजवळ थांबलेल्या रिक्षातून 'सभ्य गृहस्थ' या वर्गात मोडणारा, बुशकोट-पँट घातलेला एक जण उतरला. त्याने इकडे तिकडे पाहिले. कुणाला तरी शोधत असावा. वैतागलेला दिसला. पिचकारी चुकवण्याच्या प्रयत्नात मी त्याला धडकलोच होतो. 'डोळे फुटलेत का'असे भाव त्याच्या डोळ्यात दिसले. तो माझ्यावर डाफरणार, इतक्यात "ओ साहेब, एफेडीवीट करायचंय का? इकडे या." कुणीतरी कोर्टकामासाठी आलेला नवखा दिसतोय असे समजून वकिलाच्या टेबलाजवळ उभ्या इसमाने त्याला मदत देऊ केली.स.गृ. माझ्याऐवजी त्याच्यावर भडकला, पण न बोलता भराभरा पुढे चालू लागला. मागून पांढर्‍या कपड्यातला शिपाई पळत पळत आला. स.गृ.ने त्याच्याकडे जळजळीत कटाक्ष टाकला. त्याने स.गृ.च्या हातातील बॅग घेतली. गर्दीतून वाट काढत, स.गृ.ला एस्कॉर्ट करण्यासाठी तोंडाने 'शूक शूक' आवाज करू लागला. तो ऐकून लोक वाट देऊ लागले. "नाम्या, डोकं फिरलं का? माणसं कळत नाहीत? अरे, नवीन आलेलं कोर्ट आहे नं ते! त्यालाच एफेडीवीटचं विचारलंस! गनिमत त्यांनी पोलिसाला बोलवलं नाही! नाहीतर तुझ्याबरोबर माझीही खैर नव्हती. आता इथं थांबू नकोस. सरळ घरी जा. दोन चार दिवस इकडं तोंड दाखवू नकोस." टेबलावरच्या वकिलाने नाम्याला खडसावले. नाम्या ओशाळला."मला काय माहीत? कपाळावर थोडंच लिहिलेलं असतं." असं काहीतरी पुटपुटत पसार झाला. आता सगळा प्रकार लक्षात आला. ते स.गृ. जज्जसाहेब होते. परगावाहून डायरेक्ट कोर्टात आले असावेत. त्यांना घेण्यासाठी प्रवेशद्वारा उभा शिपाई नेमके ते यायच्या वेळी गायब झाला होता. तो न दिसल्याने हे वैतागून निघाले. ते दिसताच तो पळत आला, पण तेवढ्यात हा घोटाळा झाला होता. आल्यापासून कोर्टाच्या आवारातच जे काही दिसत होते, ते पाहून कारण नसताना 'सीदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति' अर्थात अंगांग ढिले, तोंडाला कोरड अशी स्थिती होऊ लागली. पण तसाच नेटाने पुढे कोर्टाच्या इमारतीत गेलो. इमारत एकमजली, पण भव्य होती. मध्यभागी असलेल्या कोर्ट हॉलमध्ये बरेच लोक दिसले. आत शिरलो. या हॉलमध्ये मात्र सिनेमाची आठवण यावी तसे थोडेफार वातावरण होते. उंच, भव्य डायस. भिंतीवर राष्ट्रपुरुषांचे फोटो. भिंतीलगत कपाटे. काहीत पुस्तके, काहीत फायली. डायसवर मधोमध एका मोठ्या खुर्चीवर जज्जसाहेब बसलेले. त्यांच्या बाजूच्या टेबलावर एक बाई टाइपरायटरवर टाइप करत होत्या. दुसर्‍या बाजूच्या टेबलजवळ एक चश्मिस्ट उभा राहून हातातली फाईल जज्जसाहेबांना दाखवत होता. त्यांनी मान हलवली. डायसच्या खालच्या बाजूस असलेल्या टेबलासमोर तीन चार वकील ओळीने बसलेले. पैकी एकाला जज्जसाहेबांनी किती साक्षीदार आले आहेत?असे विचारले. त्यांनी मागे उभ्या पोलीस जमादाराला जवळ बोलावून आपसात कानाफुसी केली व उभे राहून 'चार आले आहेत, पण दोन घ्यायचे आहेत' असे सांगितले. आरोपीचे वकील रिलॅक्स झाल्यासारखे आणि जज्जसाहेब नाराज झाल्यासारखे दिसले. मध्यभागातल्या खुर्च्यावर काही वकील बसले होते. काही खुर्च्या रिकाम्या होत्या. तिथे बसायची भीती वाटली. जज्जसाहेबांनी "ही केस चालवता का?" असे विचारले तर काय घ्या? लांब बसावं हेच बरे! दरवाजालगतच्या बाकड्यावर जाऊन बसलो. कामकाजाच्या नोट्स घेण्यासाठी बॅगमधून पेन-वही काढू लागलो. तितक्यात शिपाई जवळ आला व भिंतीकडे बोट दाखवले. 'आरोपी बसायची जागा'असे तिथे लिहिले होते. जज्जसाहेब माझ्याकडे चमत्कारिक रीतीने का पाहात होते, ते ध्यानात आले. चटका बसल्यागत उठलो व हॉलमधल्या शेवटच्या ओळीतल्या खुर्चीवर भीत भीत बसलो. शिपायाने बरोबर अशी मान हलवली. जीव भांड्यात पडला. काम सुरू झाले. 'स्टेट विरुद्ध पिल्या' आरोपींना बोलवा. कारकून शिपायाला म्हणाला. त्याने बाहेर जाऊन पुकारा केला. पोलीस तीन आरोपींना घेऊन आत आले. आधी मी बसलो होतो त्या बाकावर त्यांना बसवून स्वत: दोन्ही बाजूला बसले. बाहेर बायकापोरांचा कोलाहल सुरू होता. शिपायाने जाऊन दम दिला, मग तो बंद झाला. खटल्याचे काम सुरू झाले. सरकारी वकिलानी एका फाटक्या दिसणार्‍या इसमाला साक्षीदाराच्या पिंजऱ्यात घातले. माझ्या बाजूला बसलेल्या वकिलाने, साक्षीदार पंचनाम्यावरचा पंच आहे असे सांगितले. मी तसे वहीत लिहून घेतले. कारकुनाने पंचाला शपथ दिली. सराईत असावा. न अडखळता सोपस्कार पूर्ण करून साक्ष दिली. दोन चार वाक्यातच साक्ष संपली. आरोपीच्या वकिलाने काहीच विचारले नाही. नंतरचे साक्षीदार डॉक्टर होते. हेसुद्धा बाजूच्या वकिलाने सांगितले. तेही लिहून घेतले. डॉक्टर अगम्य इंग्रजीत बोलत होते. जज्जसाहेबांचा टायपिस्टवर तिच्या इंग्रजीवर विश्वास नसावा. प्रत्येक शब्दाचे स्पेलिंग सांगून, ते बरोबर टाईप झाले आहे याची खातरी करून घेत होते. काय चाललेय, काहीच कळत नव्हते. कंटाळा आणि झोप मात्र येत होती. माझ्या शेजारीसुद्धा तीच स्थिती असावी. बाजूच्या वकिलाच्या आणि दोनतीन डुलक्या झाल्या, तेव्हा साक्ष संपली आणि या खटल्याचे कामही! जज्जसाहेब आत निघून गेले. हॉल रिकामा झाला. वहीत 'साक्षीदार पंच,''साक्षीदार डॉक्टर 'एवढ्या नोंदी झाल्या होत्या. उठून बाहेर आलो . बाजूला दुसरे कोर्ट होते. कोर्टाचे बाहेर दोन वकीलांचा संवाद कानी पडला. ''साहेब बराच तापलेला दिसतोय. झापाझापी चालू आहे."-एक वकील. "भाजीत मीठ कमी पडलं असंल !"-दुसरा वकील. एकमेकाला टाळ्या आणि हाहाहा... कोर्टात डोकावून पाहिलं. बापरे! सकाळचे 'स.गृ.'च तिथे डायसवर होते. त्यांचा पारा चढायचे कारण भाजीतले मीठ नसून मी आणि एफेडीवीट होते. पण सांगायचे कुणाला अन कशाला? लगेच तिथून सटकलो. आतापर्यंतचे तीन साडेतीन तासात सिनेमासारखे कोर्ट दिसले नव्हते. जे दिसले, तो रुक्ष मामला होता. ओळखीचेही कुणी दिसले नाही. कंटाळून विमनस्क की काय तसा फिरत होतो. व्हरांड्याच्या टोकाला अंदाजे दहा बाय पंधराची खोली होती. डोकावून पाहिले. एक मोठ्या टेबलाजवळ चारपाच जण बसले होते. टेबलापल्याड एक काळा कोटवाला खाली मान घालून काही वाचत होता. टेबलाच्या अल्याड दोन काळे कोटवाले होते. टेबलाच्या दोन्ही बाजूला दोघे साध्या कपड्यातले! दारालगत एका बाकावर एक पटका, एक टोपी. बाकी दोन खुर्च्यावरील काळे कोटांमध्ये एक कॉलेजातला मित्र होता. वाळवंटात मृगजळच दिसले. वकिलांची खोली असावी. आत शिरलो आणि त्याला जोरात आवाज दिला. माझ्या हाकेने तिथले वातावरण गंभीर बनले. टेबलाच्या बाजूचे दोघे, समोरचे वकील, माझा मित्र, त्याच्या बाजूचा वकील सगळेच एकदम मला गप्प करायचा प्रयत्न करू लागले. टेबलापल्याडच्या कोटवाल्याने कागदातून लक्ष काढून बेल वाजवली, माझ्याकडे रागाने पाहात "इथे काय नाटक सिनेमा चाललंय काय?" विचारले. बेल ऐकून बाहेरून शिपाई धावत आला. मित्राने उठून माझा हात ओढला. "अरे, कोर्टाचे काम चालू आहे. गप्प बस" असे कानात सांगू लागला. नीट पाहि,ले तेव्हा त्या कोटावरचा गाऊन दिसला. हे कोर्ट होते व ते जज्ज साहेब! धक्काच बसला. आ वासून उभा राहिलो. त्यांचा पारा चढलेला होता. मोठ्याने बोलून मी कोर्ट कामात व्यत्यय आणला, 'कंटेप्ट ऑफ कोर्ट' केला असे त्यांचे मत झाले असावे. मित्राने बाजूच्या वकिलास मी वकील आहे, आज पहिल्यांदाच कोर्टात आलोय वगैरे सांगितले. वकिलांनी तेच जज्जसाहेबाना सांगितले. "म्हणून काय झाले? एवढी साधी गोष्ट कळत नाही?" ते घुश्शातच होते. "आणि बँड का लावला नाही?"'मला उद्देशून विचारले. "बँड?" कोर्टात वकील म्हणून पदार्पण करताना बँड लावावा असा कायदा आहे की काय? याविषयी मला तर कधीच कुणी सांगितले नव्हते. आता काय करायचे? अगदी साधा बँडवालेसुद्धा कमीत कमी तीन-चारशे रुपयाच्या खाली सुपारी घेत नाहीत. एका नवख्या, उत्पन्न नसलेल्या वकिलाने कुठून हा खर्च करायचा? हे चुकीचे आहे. असा काही नियम असला तर बदललायला हवा. मनात विचार चक्र फिरू लागले, पण गप्प उभा होतो. मित्र त्याच्या गळ्याकडे बोट दाखवून काही खाणाखुणा करत होता. पण माझे लक्ष नव्हते. "काय विचारतोय?" - जज्जसाहेब. "आज नाही लावला, पण पास झाल्यावर गावी बँड लावूनच शेरणी वाटली होती" कसेतरी धैर्य गोळा करून मी स्पष्टीकरण द्यायचा प्रयत्न केला. हे ऐकून जज्जसाहेबांचा नूर बदलला. ते खुदकन हसले. मग वकीलमंडळीही हसली. टोपी पटकेवाल्याला सगळी मंडळी का हसताहेत हे कळेना. ते एकमेकाकडे पाहू लागले. "अरे, मी या बँडविषयी बोलतोय." माझ्या भोळेपणाची दया येऊन जज्जसाहेबांनी आपल्या गळ्याभोवती लावलेल्या पांढर्‍या दुहेरी पट्ट्याकडे निर्देश केला. आता माझी ट्यूब पेटली. मी काळा कोट तर घातलेला, पण वकिलांच्या पोषाखात आवश्यक पांढरा बँड गळ्याभोवती बांधला नव्हता, त्याविषयी ते विचारत होते. बँड होता. पण कोटाच्या खिशात. लावायला विसरलो होतो. तो काढून दाखवला. जज्जसाहेबानी माझा नाद सोडला. "समजावुन सांगा त्यांना. तुमच्या मित्र आहेत नं?" जज्जसाहेबानी मित्रावर माझी जबाबदारी सोपवली. माझ्यावरचे लक्ष काढून त्यांनी समोरच्या कागदात लक्ष घातले. मित्राने मला बाहेर नेले, "कोर्ट आहे लक्षात आले नाही का? किती जोरात ओरडलास?'' "दहा बाय पंधराची खोली, ना डायस, ना साक्षीदाराचा पिंजरा, एका टेबलावर सगळे बसलेले असे कुठे कोर्ट असते का? सिनेमात तर...'' मी खुलासा करू लागलो. मला गप्प करत त्याने दारावरची पाटी दाखवली - '८वे सह दि.न्या.क.स्त.व ज्युमॅफक्ला.' 'दिन्याकस्त' म्हणजे दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व 'ज्युमॅफक्ला' म्हणजे ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास. "नवीन आहेत. अजून कोर्ट हॉल मिळाला नाही. ही तात्पुरती व्यवस्था केलीय. अजून खूप पाहायचंय तुला. चल, दुसर्‍या कोर्टात जाऊ." मित्र म्हणाला. "आता पुन्हा कोर्टात नको, आजच्यासाठी एवढा अनुभव पुरे," मी म्हणालो. ''ठीकयं, मग बारमध्ये जाऊ.'' - तो. "बार? तेही दुपारी? बरीच प्रगती केलीस की! तू जा एकटा. मी नाही. घरी कळले तर हाकलूनच देतील!" मी सरळ नकार दिला. "अरे, तो बार नाही, बार रूम, वकिलांची बसण्याची जागा!" माझ्या अज्ञानाची कीव करून त्याने खुलासा केला. निमूटपणे त्याच्या मागे बारमध्ये गेलो. बार रूम प्रशस्त होती. भिंतीलगत पसरलेल्या गाद्यांवर काही वकील आराम करत होते. काही झोपले होते. काही घोरत होते. काहींची गप्पाष्टके रंगली होती, हास्यविनोद चालले होते. घोरणार्‍या वकिलांमुळे झोप मोडते, म्हणून त्यांच्याकडून जास्त वर्गणी घ्यायला हवी, असे एकाने सुचवले. हशा पिकला. आम्हाला बसायला जागा नव्हती. मध्यभागी खुर्च्या टेबले होती. काही जण पेपर तर काहीं कायद्याची पुस्तके वाचत होते, तर कुणीकुणी फायली! क्यांटीनमधून चहा येत होता. चहापानही सुरू होते. भिंतीवर खुंट्यांना कोट लटकले होते. अधूनमधून वकिलांना शोधत पक्षकार येत होते, त्यांना पाहून ते ते वकील बाहेर जात होते. एका कोपर्‍यात वकिलांचे कोंडाळे बसले होते. पत्त्याचा डाव सुरू होता. चक्क रमी! माझा वीक पॉईंट! सिगारेट पाकिटाच्या मागच्या कोर्‍या भागावर एक जण मार्क लिहीत होता. सगळ्यात कमी मार्कवाला विजेता. आम्ही हॉस्टेलवर खेळत असू. आपली माणसे भेटल्यागत झाले. एका खेळाडूच्या शेजारी बसलो. त्यांचे नाव गोटे होते असे नंतर कळले. खेळणार्‍याच्या बाजूला गप्प बसून खेळ पाहाणारा 'खरा रमीवाला' असूच शकत नाही. खेळणारा चुकीचे खेळतोय, नको ते पत्ते घेतोय व टाकतोय, हाताशी आलेला डाव उधळतोय, आपण खेळतो तर केव्हाच रमी दाखवून इतरांचे फुलहॅड घेतले असते या ठाम समजुतीने, खेळणार्‍याच्या कानात 'जोकर तिथे लावा, तो गुलाम घ्या, राणी टाकू नका' वगैरे सल्ले देतो, तो हाडाचा रमीवाला! बारमध्ये नवखा होतो, तरी खरा रमीवाला होतो मी गोट्यांना सल्ले देऊ लागलो. त्यांनाही उपयोग होऊ लागला. मी रमीत रमलेला बघून मित्र निघून गेला. काही वेळाने गोट्यांचा एक पक्षकार, 'कोर्टात पुकार झाली आहे 'असे सांगत आला. नाइलाजाने पण गडबडीत ते उठले. माझ्या हाती स्वतःचे पत्ते दिले. नीट खेळा असे सांगून खुंटीवरचा एक कोट अंगावर अडकवून ते निघाले. "अरे, तो माझा कोट आहे." एक वकील खेळाडू ओरडले. पण ते ऐकायला गोटे वकील तिथे नव्हते. ते आधीच गेले होते. "कोर्टात माझी केस निघाली, तर काय घालू?" - खेळाडू वकील. "त्याचा कोट घाल!" दुसर्‍या खेळाडू वकिलाने सल्ला दिला. "काहीतरीच काय, ते केवढे, मी केवढा!" - खेळाडू वकील. "पुकारा होईल तेव्हा बघू, आता खेळात खोडा नको." असे दुसरे खेळाडू वकील म्हणाले. त्यांना या डावात चांगले पत्ते आले असावेत. पुन्हा खेळ सुरू झाला. सुदैवाने मला चांगले पत्ते येत गेले. सलग तीन-चार डाव जिंकले. इतरांनी जे जिंकले, त्यात फार कमी मार्क दिले. सगळे खेळाडू वकील माझ्या रमीकौशल्याने प्रभावित झालेले दिसले. अंदाजे पाऊण तासानंतर खेळ संपला. मार्क मोजणी सुरू झाली. तेव्हा गोटे वकील परतले. "काय झालं?" त्यांनी विचारले. आपण हरलो असणार याची त्यांना खातरी होती. "नवा भिडू,फार तयारीचा आहे हो !" माझे कौतुक करत, मार्क मोजणाराने गोटे जिंकल्याचे जाहीर केले. गोट्यांनी माझी पाठच थोपटली. आता बार रूम रिकामी झाली होती. फक्त खेळाडू वकील होते. त्यांचे हिशोब पूर्ण होऊन आर्थिक देवघेव झाली. त्यांच्या रितीप्रमाणे गोट्यांनी क्यांटीनमध्ये 'के एम टी' (खारा मिठाई टी)ची पार्टी दिली. मीही होतोच. माझ्या रमीकौशल्याची चर्चा सुरू झाली. नंतर माझी विचारपूसही झाली. ज्युनियरशिप कुणाकडे करू? असे मी विचारले. त्यावर सर्वांनी खल केला. एकाने एका वकिलाचे नाव घेतले की दुसरा ते खोडून काढी, आणि त्यांच्याकडे गेलो तर माझे नुकसान होइल हे सोदाहरण पटवून दिले जाई. अशा रितीने कोर्टात कार्यरत असलेल्या सर्व जेष्ठ वकिलांची नावे चर्चेअंती बाद केली गेली. ही चर्चा भलतीच गरमागरमीत झाली. खूप मतभेद झाले. चर्चेचा गोषवारा साधारण खालीलप्रमाणे होता - गोखले वकील सिव्हिलमध्ये किडा आहेत, पण तुसडा! चव्हाणाकडे क्रिमिनलचे खूप काम आहे, पण आधीच खूप ज्युनियर वकील आहेत. डोंगरेकडेपण चांगले काम आहे, पण रात्री आठनंतर जायची सोय नाही. गडी टाईट असतो. केंबळेकराचे वाचन दांडगे आहे, ल्यायब्ररी मोठी आहे. पण काम फारसे नाही. पुस्तके काय अंथरायची की पांघरायची? टिंगरे ज्युनियरकडून काम खूप करून घेतो, पण हातून पैसा सुटत नाही. जोशी म्हणजे बडे प्रस्थ, पण आता स्वतः काम करत नाही. पोरावर सोडलंय सगळं. आणि तो तर दिव्य आहे. शिंगणे हुशार आहे, पण स्वतःला फार शहाणा समजतो. वगैरे वगैरे.. शेवटी मी स्वतंत्रपणे प्रॅक्टिस करणे फायद्याचे आहे, असा निष्कर्ष निघाला. मी रमीत एक्स्पर्ट आहे, म्हणून रोज खेळायला यावे यावर मात्र सर्वांचे एकमत झाले. एव्हाना सहा वाजून गेले होते. बहुतेक वकील, पक्षकार निघून गेले होते. आवारात फारसे कुणी नव्हते. क्यांटीन, पानटपरी बंद होण्याच्या मार्गावर होते. मी निघायचा विचार करू लागलो. एका खेळाडू वकिलांनी रीक्षात लिफ्ट देऊ केली. अगदी घराजवळ सोडले. कोर्टातल्या पहिल्याच दिवसाची कमाई घेऊन घरी परतलो, रमीची सिंडिकेट जिंकून दिल्याबद्दल गोटे वकिलांनी दिलेले वीस रुपये! नीलकंठ देशमुख. (कै.द.मा. मिरासदार यांच्या स्मृतीस अर्पण)

वाचने 29430 वाचनखूण प्रतिक्रिया 76

सोत्रि Wed, 11/03/2021 - 06:15
झक्कास! फारच छान आणि खुसखुशीत. -(कोर्टाची पायरी न चढलेला) सोकाजी

तुषार काळभोर Wed, 11/03/2021 - 08:29
बँड वरून कायद्याचं बोला याची आठवण झाली. बाकी केशव कुंथलगिरिकरसुद्धा मराठवाड्याचे हा योगायोगच! सुदैवाने अजून कोर्टाची पायरी चढायची वेळ आली नसली तरी वाढलेली गर्दी सोडून इतर वातावरण तसेच असेल, असे वाटते.

Rajesh188 Wed, 11/03/2021 - 09:49
अगदी असेच वातावरण असते कोर्टात.मी एकदा साक्ष देण्यासाठी गेलो होतो तेव्हा अनुभवले. जज खूपच गंभीर चेहरा करून असतात त्या वातातावरान अजुन रुक्ष होते. दोन वेळा तरी मला सुनावले होते. जितके विचारले आहे तेवढेच सांगा.

सौंदाळा Wed, 11/03/2021 - 09:55
अगदी खुसखुशीत आणि तपशीलवार वर्णन. तुमची निरक्षण शक्ती खूपच चांगली आहे. कोर्टात दोन-तीनदा जाऊन हे सगळे बघून देखिल असे लिहायला जमले नसते.

श्रीरंग_जोशी Wed, 11/03/2021 - 09:59
माझे वडील न्यायालयातून निवृत्त झाले असल्याने लहानपणापासून तुम्ही वर्णिलेले वातावरण मी जवळून पाहिले आहे. चित्रपटात अगदी साधे खटले सुद्धा उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयाचे दालन असेल अशा दिमाखदार दालनात दाखवतात. प्रत्यक्षात जिल्ह्याच्या मुख्यालयातले सत्र न्यायालयही तेवढे दिमाखदार नसते. ८०च्या दशकातला निमशहरी भागातला निवांतपणा सुरेख रंगवला आहे.

मुक्त विहारि Wed, 11/03/2021 - 11:50
टाईमपास म्हणून, सीबीडी येथील कोर्टात जाऊन बसत होतो आणि ठाणे कोर्टात वायरिंगचे काम करत असतांना, वेळ पण चांगला जात होता फावल्या वेळात, फुकट आणि कुठल्याही प्रकारचे ध्वनी प्रदूषण न करता, व्यावहारिक ज्ञान मिळवायचे असेल तर, कोर्ट हे सर्वोत्तम . अर्थात, स्वतः साठी कोर्टात जायची वेळ आली तर, उलट परिस्थिति निर्माण होते

कपिलमुनी Wed, 11/03/2021 - 12:40
खुसखुशीत लेख! (वकीली शिकेपर्यंत विद्यार्थि बर्याच वेळा कोर्टात जातात , त्यामुळे इतका नवखेपणा पटला नाही.)

In reply to by कपिलमुनी

नीलकंठ देशमुख Sat, 11/06/2021 - 21:15
धन्यवाद. जो काळ यात आला आहे तेव्हा असा ' लीगल ईन्नोसंस ' होता....त्या काळात विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना कोर्टात जाणे बंधनकारक नव्हते.

कंजूस Wed, 11/03/2021 - 12:49
जरा अधुनमधून कायद्याची माहिती देत चला.

Rajesh188 Wed, 11/03/2021 - 14:06
तुम्ही न्यायाधीश झाल्यावर आलेला एकदा अनुभव नियमात बसत असेल तर शेअर करा. न्यायाधीश चे निर्णय ह्या वर लिखाण होत नाही .ते कायद्यात बसत नसेल. गूढ विश्व आहे ते सामान्य लोकांसाठी.

चित्रगुप्त Wed, 11/03/2021 - 14:54
कोर्ट-परिसरातील विविध गोष्टी, व्यक्ती, वल्ली यांचे विलक्षण चित्रदर्शी वर्णन खूप आवडले. कोर्टाच्या आतल्या बाजूला जाण्याचा प्रसंग कधी आलेला नसला तरी अ‍ॅफेडॅविट, स्ट्यांपपेपर, घराची रजिस्ट्री वगैरे निमित्ताने त्या परिसरात बरेचदा जाणे झाले आहे, परंतु त्याचे एवढे खुमासदार वर्णन मिपावर वाचायला मिळेल असे कधी वाटले नव्हते. अनेक आभार.

झकास वातावरण निर्मिती. खरोखरचा अनुभव असेल तर पहीला दिवस झाला, तसेच वकिलीत पुढे कसे कसे सेटल होत गेलात त्यावर लेखमाला होउ शकेल. एक गंमत सांगतो- होणारी बायको वकील असल्याने नवख्या दिवसात एकदा तिला ठाणे कोर्टात भेटायला गेलो होतो. तर म्हणे चल तुला तेलगी दाखविते. आज तेलगीची केस आहे. थोड्या वेळाने सर्कसमधील वाघाला बघायला जसे लोक उभे राहतात तशी जिन्यावर, कॉरीडोर मध्ये गर्दी. पुढेमागे पोलिस्,तेलगीचे वकील आणि मधुन हातात बेड्या घातलेली तेलगीची स्वारी. उज्वल निकम सरांची केस असेल( उदा. खैरलांजी खटला) तर जज्ज सुद्धा अटेंन्शन मध्ये असतात हे पाहिलेय. पुढे रोजच आज काय, सिंहगड रेव्ह पार्टीची केस, आज काय जर्मन बेकरी खटला,सिनेतारे/तारकांचे घटस्फोट हे ना ते. बातम्या चालुच असतात.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

नीलकंठ देशमुख Sat, 11/06/2021 - 21:59
धन्यवाद. छान वाटले प्रतिक्रिया वाचून. आरोपी वकील यांचे नको तेवढे उदात्तीकरण करण्यास मिडीया, व आपण,समाज म्हणून जबाबदार आहोत . मी ठाण्याला सत्र न्यायाधीश असताना एका खटल्यात माझ्यासमोर कल्याणचे एक अतिशय जेष्ठ वकील श्री. मोडक विशेष सरकारी वकील म्हणून आले होते. मी पाहिलेले ते सर्वोत्तम सरकारी वकील होते.

बोलघेवडा Wed, 11/03/2021 - 17:44
देशमुख सर, तुमची साधी सरळ निरागस लेखन शैली आवडली. बँड मुले तुमचा वाजलेला "बार" आवडला. लेख अगदि "बॅरिष्टरी" आणि कायद्याच्या चौकटीत बसणारा आहे. :)

फक्त मोबाईल वाढलाय कोर्टात वेळ घालवायला..... बाकी वकिलांचं जेवणखाण झोपणं सगळं बाररूममध्येच होत असतं....खुमासदार लिखाण ..... !

नीलकंठ देशमुख Sat, 11/06/2021 - 22:09
या लेखावर खूप प्रतिक्रिया आल्यात. आपले लिखाण वाचकांना आवडते हे कळल्यावर छान वाटते.हुरूप वाढतो. लगेच प्रतिसाद कळतो हे या माध्यमाचे विशेष. मिसळपाव परीवार व संपादकांना धन्यवाद. निवेदन प्रथम पुरुषी असल्याने हे आत्मकथन आहे असा समज होऊ शकतो. प्रत्यक्षात तसेनाही. वकील, सरकारी वकील व न्यायाधीश म्हणून काम करताना अनुभवलेले प्रसंग, ऐकलेले किस्से, आणि थोडाफार कल्पनाविलास यातून हा लेख साकार झाला आहे.

सरिता बांदेकर Sun, 11/07/2021 - 21:52
मैत्रीण कोर्टात टायपिस्ट होती त्यामुळे तिकडे जाणं व्हायचं. त्यामुळे सगळं डोळ्यासमोर उभं राहिलं. निरीक्शण एकदम मस्त

Bhakti Mon, 11/08/2021 - 13:30
एकदम सुंदर लिहिलंय. खरच पहिल ते पहिल,कोर्टातले अजून लेख तुमच्या लेखनशैलीत वाचायला छान वाटेल. लहानपणी शाळेला जायच्या रस्त्यावरच कोर्ट गल्ली होती,काळ्या कोटातले वकीलांची गर्दी पाहत निवांत जायचो तेव्हा आठवलं.