सोलाण्याचं पिठलं

नूतन सावंत's picture
नूतन सावंत in पाककृती
24 Jan 2020 - 10:01 pm

#सोलाण्याचं_पिठलं
(#Fresh_green_chickpeas_curry)

पिठलं हा मराठी माणसाच्या आयुष्यातला जिव्हाळ्याचा पदार्थ आहे.आणि गृहिणींच्या तर प्रेमाचा विषय आहे.कोणत्याही वेळी अभ्यागत आले की, गृहिणींचा आधार म्हणजे पिठलं-भातच.

पूर्वी नाटक कंपन्याच्या संगीत नाटकांचे प्रयोग रात्रौ उशिरा कदाचित पहाटेपर्यंत रंगत, अशावेळी बाहेरगावी होणाऱ्या प्रयोगानंतत कंपनीचा बल्लव पिठलं-भाताचा हातखंडा प्रयोग करत असे.

शिवाय कडू घास म्हणजे एखाद्याचं निधन झालं की त्याचे क्रियाकर्म आटपून घरी आल्यावरचं जेवण,जे शेजाऱ्यांकडून येतं तेही पिठल-भाताचंच असतं.यात दोन हेतू असावेत,असं मला वाटतं, एक म्हणजे शेजारचेही घरच्यांइतकेच दमलेले आणि व्यथित असतात. म्हणून शेजीबाई पिठलं-भात करून घेऊन येते.आणि दुसरे म्हणजे गेलेल्या व्यक्तीच्या दुःखाने व्यथित झालेल्या घरच्यांना जेवायची इच्छाच नसते,तेव्हा पिठल्याच्या खमंग वासाने का होईना दोन घास खाऊन मंडळी आराम करू शकतील, हा दुसरा हेतू असावा.

माझ्या आईच्या हातचं पिठलं तर,मी, अजूनपर्यंत चाखलेल्या पिठल्यातलं उत्कृष्ट चवीचं पिठलं नंबर एकचं असे.आमच्याकडे अचानक नातेवाईक, मित्रपरिवरची ये-जाही बरीच असायची. त्यामुळे आम्ही बऱ्याच वेळी पिठलं-भात हा चविष्ट बेत जेवत असू. गरमागरम वाफाळता भात आणि त्यावर उकळतं पिठलं. सोबत कैरीचं लोणचं.अहाहा!ब्रह्मानंदी टाळी म्हणजे काय ते म्हणजे हेच असावं.आजपर्यंत तरी
आईची खास पिठल्याची कृती मी कोणाकडेही आणि कोणत्याही पुस्तकात किंवा गुगलवर किंवा यू ट्युबवरही पाहिलेली नाही. तिच्या कृतीत ती , जिरे, मोहरी, हिंग, हळदीच्या फोडणीवर लसूण, हिरव्या मिरच्या आणि कांद्यावर बेसन तेल सुटेपर्यंत परतून घेत असे आणि मग पाणी ओतून गुठळ्या होऊ न देता ढवळत असे, उकळी आली की, मिठासोबत एखाद दुसरं आमसूल आणि मूठभर ओलं खोबरं आणि हाताशी असलीच तर मूठभर चिरलेली कोथिंबीर घालून शेवटची उकळी घेत असे.

माझं लग्न झाल्यावर कधी माहेरी रहायला आल्यावर कितीतरी वेळा मी पिठल्याची फर्माईश करत असे आणि आई अर्थातच ती पुरी करतच असे,शिवाय पिठलं-भाताचा जो घास ती भरवत असे त्याची कमकरता आता कायम जाणवत राहील.मी करते तस्संच पण त्या हाताची आणि घासाची चव हरवली ती हरवलीच.

दुसऱ्या नंबरवर आहे ते माझ्या इंदूमावशीच्या हातचं पीठ पेरून केलेलं पिठलं."थांब,आज पीठ पेरून पिठलं करूया"असं म्हणाली तेव्हा हा पिठल्याच्या प्रकार कळला.मला त्या तिच्या वाक्यापासून पिठलं करतानाची तिची आकृती आणि सर्व कृती एखाद्या चल्लचित्रपटासारखं डोक्यात कोरलं गेलं आहे.मावशीच्या
या कृतीत जिरे, मोहरी हिंग,हळदीच्या फोडणीवर लसूण, हिरव्या मिरच्या,आणि विशे म्हणजे अतिशय बारीक चिरलेला, 'तुकडा' कांदा (चौकोनी) घालून परतत असे.नंतर त्यात पाणी घालून त्याला उकळी फुटली,की,एक हाताने बेसन मुठीत घेऊन त्यात हळूहळू सोडत असे आणि दुसऱ्या हाताने घाटत असे. त्यामुळे गुठळ्या न होता पिठलं एकसंध होत असे,मग मीठ,कोथिंबीर घालून एक उकळी घेतली की पिठलं तयार.

या दोन पिठल्यांव्यतिरिक्त मी अजून एक पिठलं बनवते.ते म्हणजे सोलण्याचं पिठलं.याला पीठ परतत बसावं लागत नाही की बेसन घाटत बसावं लागत नाही.अगदी झटपट होणार हा चवदार पदार्थ,आयत्या वेळेच्या जेवणाची रंगत तितकीच वाढवणारा आहे.

या दिवसात सोलाणे भरपूर मिळतात. मुंबईत सोलण्याच्या पेंडयांपेक्षा निवडलेले आणि निवडून सोललेले दाणे जास्त ठिकाणी मिळतात. फ्रिजमध्ये हवाबंद डब्यात ठेवले तर आठवडाभर टिकतातही.त्यामुळे या मोसमात बाजारात गेलं की, मी हे दाणे आवर्जून घेऊन येते.हे सोलाणे घाईच्या स्वयंपाकात असा काही मदतीचा हात देतात म्हणून सांगू. याशिवाय याच दिवसात मिळणारी आली लसूणपातही मी यात वापरते. वगळली तरी चालते पण मला लसूणपातीची चव आवडते.

मला आठवतं त्याप्रमाणे सौ.जयश्री कुबेर यांच्या झटपट पाकक्रिया या पुस्तकात ही पाककृती वाचली होती. आणि तेव्हपासून ती माझ्या स्वयंपाकघरात हिटलिस्टवर आहे. आता मात्र थोडासा बदल करून मी ही पाककृती करते,त्याने तिची रंगत अजून वाढते.

हे सोलाणे फ्रीजमध्ये असताना आयत्या वेळी येणाऱ्या पाहुण्यांसाठी एकदम खास प्रकार बनवता येतो आणि पाहुणेही याचा आस्वाद घेऊन खुश होतातच.

मग करून पाहणार ना तुम्हीपण, मग मी माझी पाककृती देते.

घ्या तर साहित्य जमवायला.

साहित्य(ingredients):-

१. एक वाटी सोलाणे(ek katori fresh green chana),

२. चार हिरव्या मिरच्या,(4 green chillies),

३. अर्धा इंच आले(half inch ginger)

४. अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथींबीर,(half katori finely chopped green coriender),

५. अर्धी वाटी बारीक चिरलेली लसूणपात(half katori finely chopped fresh green garlic leaves),

६. एक छोटा कांदा बारीक चिरून (finely chopped one small onion)

७. एक मध्यम टोमॅटो बारीक चिरून,
(finely chopped one medium tomato),

८. बारा लसूण पाकळ्या,(12 garlic cloves)

९. तीन पळ्या तेल(three tablespoons oil),

१०.फोडणीसाठी जिरे,मोहरी,हिंग,
मेथीदाणे(for tdka - cummin seeds + musterd seeds + asafetida + fenugreek seeds)

११. मीठ चवीनुसार(salt to teast).

कृती(preperations):-

१.अनुक्रमांक १ ते ५ मधील साहित्य दरीदरीत वाटून घ्या.(crush coarsely ingredients in sr.no 1 to 5)

२. अर्ध्या तेलात जिरे,मोहरी,हिंग,
मेथीदाणे यांची फोडणी करून त्यात कांदा मिनिटभर परता, टोमॅटो घालून परता.( Make tadka in half oil with cummin seeds + musterd seeds + asafetida + fenugreek seeds,add onion n saute for a minute.add tomato n saute)

३. वाटलेले सोलाणे घालून परता.(add crushed ingredients),

४. पाणी घालून पातळ करा आणि मीठ घालून,पाच मिनिटे उकळू द्या.(add required water n salt. boil it for five minutes.)

५. आच बंद करून उतरवा. उरलेल्या तेलात लसूण ठेचून लालसर करून पिठल्यावर ओता.(off the flaim. crush the garlic cloves n make tadka in remain oil.pour on it.)

६. गरमागरम वाफाळता भात, पोळी, पुरी, फुलके, भाकरी यांच्यासोबत आस्वाद घ्या.(have teast with steamed hot rice, chapati, poori, fulkas or indian bread.)
#नूतन_सावंत
#Nutan_Sawant

1

प्रतिक्रिया

पिठलं पार्टी करायला एकदा तरी फेरी मारावी म्हणतो.

नूतन सावंत's picture

25 Jan 2020 - 7:23 am | नूतन सावंत

ये,ये,नक्की करूया.

नावातकायआहे's picture

25 Jan 2020 - 12:43 pm | नावातकायआहे

तो. पा. सु. (WATER IN MOUTH)

जुइ's picture

26 Jan 2020 - 4:00 am | जुइ

सध्या इथे अधून मधून ताजे सोलाणे मिळतात. तेव्हां नक्कीच पिठल करेन.

श्वेता२४'s picture

27 Jan 2020 - 11:23 am | श्वेता२४

नक्की करुन बघणार. हा प्रकार नवीन आहे.

वेगळी पाककृती दिसते. रोचक.

आजी's picture

27 Jan 2020 - 5:43 pm | आजी

पाककृती आवडली.

चामुंडराय's picture

28 Jan 2020 - 7:43 am | चामुंडराय

.

मुक्त विहारि's picture

28 Jan 2020 - 10:21 pm | मुक्त विहारि

तोंपासु

सस्नेह's picture

29 Jan 2020 - 8:20 pm | सस्नेह

छानच वाटते.
मला फोटो दिसत नाहीयेत

विनटूविन's picture

30 Jan 2020 - 11:31 am | विनटूविन

फक्त मलाच दिसत नाहीत

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Feb 2020 - 10:08 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपण दिलेली पिठलं पाककृती आवडली.
फोटो दिसत नाहीत.

-दिलीप बिरुटे

मदनबाण's picture

2 Feb 2020 - 11:16 am | मदनबाण

फोटु ?

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Haan Main Galat... :- Love Aaj Kal