तुंबाड - अंगावर शहारे आणणारा चित्रपट!
लेखनप्रकार
काल दुपारी 'तुंबाड' पाहिला. नीलायमला दुपारी साडे बाराचा खेळ होता. पावणे बारा वाजता चिरंजीव गाढ झोपी गेले. म्हणजे १-२ तास निवांत होतो. बायकोला सांगीतले आणि ताबडतोब नीलायमला पोहोचलो. दिवाळीमुळे आणि या चित्रपटाच्या कथेमुळे फारशी गर्दी नव्हती. बरोबर साडे-बारा वाजता चित्रपट सुरु झाला. १९१८ चा काळ. कोकणातले तुंबाड गाव. तुफान पाऊस कोसळतोय; संध्याकाळ की रात्र अशा कात्रीत दिवस सापडला आहे. आभाळ गच्च भरलेलं आहे. एका जुन्या वाड्याच्या चौकात एक गरीब, तरुण विधवा भर पावसात कुडकुडत उभी आहे. समोर वाड्याच्या पडवीत एका खुर्चीत वाड्याचा जख्ख म्हातारा मालक त्या तरुण विधवेकडे एकटक बघतो आहे. त्याच्या डोळ्यांमधली लालसा लख्ख दिसते आहे. दुसर्या प्रसंगात ती विधवा त्या म्हातार्याचे हस्तमैथून करून देत आहे. ती अगतिक विधवा त्या म्हातार्याला सोन्याच्या मुद्रा मागते. म्हातारा कण्हत तिची मागणी धुडकावून लावतो. एका टेकडीवर एक पडके झोपडीवजा घर आहे. पाऊस वेड्यासारखा कोसळतोच आहे. दोन लहान मुलं आईची वाट बघतायेत. तिच विधवा घाई-घाईने येते आणि पटकन जेवणाचे एक ताट वाढून एका भयानक अंधार्या खोलीत घाबरत घाबरत जाते. तिथे राहत असते त्या म्हातार्याची शापित आई. कित्येक वर्षे मुक्तीची वाट बघत असलेली ही म्हातारी भयंकर झालीये. अतिशय विद्रूप, किळसवाणी, आणि राक्षसासारखी! तिला साखळदंडांनी बांधून ठेवलं आहे. काही दिवसांनी त्या विधवेच्या दोन मुलांपैकी एक मुलगा झाडावरून खाली पडतो आणि त्याचं डोकं मोठ्या दगडावर आदळतं. त्याला वैद्यांकडे घेऊन गेल्यानंतर त्या भयानक अशा म्हातारीला खाऊ घालण्याची जबाबदारी दुसर्या मुलावर येते. भूकेने कासावीस आणि राक्षसी झालेल्या त्या म्हातारीला शांत करण्याचा एक उपाय असतो. एक अगदी नेमके वाक्य! तो मुलगा त्या वाक्यातला एक मुख्य शब्द विसरतो आणि ती म्हातारी त्याचाच घास गिळायला बघते. अगदी शेवटच्या क्षणी त्याला तो शब्द आठवतो आणि ती म्हातारी निद्राधीन होते. प्रचंड घाबरलेला मुलगा वाचतो. इकडे अपघात झालेला मुलगा मरतो. एका अशाच खिन्न दिवशी म्हातारा देखील मरतो. ती तरुण विधवा आपल्या मुलाला घेऊन पुण्याला जायचं ठरवते. तिच्या मुलाला मात्र वाड्यातल्या खजिन्याची आस असते. वाड्यातल्या म्हातार्याची लोभी औलाद म्हणून ती विधवा आपल्या मुलाची निर्भत्सना करते. त्याच्यावर भयंकर चिडते. त्याला खूप मारते आणि पुन्हा तुंबाडमध्ये पाय टाकणार नाही असं वचन त्याच्याकडून घेते. एका भयाण रात्री दोघे तुंबाड सोडून पुण्यात येतात. नियतीच्या मनात मात्र वेगळंच असतं. काय असतं हे खजिन्याचं रहस्य? त्या भयानक दिसणार्या म्हातार्या बाईचं काय होतं? तुंबाडमध्ये सतत मुसळधार पाऊस का पडत असतो?
जेमतेम दोन तासात 'तुंबाड'मध्ये मानवी स्वभावाचा, लोभीपणाचा, आणि लालसेचा जो अचाट खेळ दाखवला आहे तो डोकं सुन्न करणारा आहे. संपूर्ण चित्रपटाला एक अतिशय दुष्ट, नीच, किळसवाणी अशी किनार आहे. चित्रपटाच्या हॉरर एलिमेंटपेक्षा आपल्या हृदयाला टोचणारा दुष्टपणा अधिक भयावह आणि अस्वस्थ करून सोडणारा आहे. अर्थात, 'तुंबाड'मध्ये दाखवलेल्या अमंगल शक्तीदेखील तितक्याच भयावह आणि अंगावर काटा आणणार्या आहेत यात मुळीच शंका नाही. अगदी सुरुवातीपासून 'तुंबाड' मनाची पकड घेतो. आपल्या अंगावर काहीतरी गिळगिळीत सरपटते आहे असा भास कित्येकदा हा चित्रपट बघतांना येतो. प्रेक्षकांना प्रचंड घाबरवूनदेखील त्यांना जखडून ठेवण्याची किमया हा चित्रपट लीलया साधतो.
दिग्दर्शक राही अनिल बर्वे आहेत. मला 'थ्यँक्यू मिस्टर ग्लाड'चे लेखक अनिल बर्वे होते हे ठाऊक आहे. दिग्दर्शकाचं आणि त्यांचं काही नातं आहे का हे मला ठाऊक नाही. अजय-अतुल आणि बाफ्टा-विजेते जेस्पर कीड यांनी कमालीचे संगीत दिले आहे. मुख्य भूमिकेत सोहम शाह यांनी अभिनयात उत्तुंग बाजी मारली आहे. अनिता दातेदेखील अगदी चोख! बाकी सगळ्याच अभिनेत्यांनी लाजवाब कामे केली आहेत. लेखन सकस आणि मनाला भिडणारे आहे. कलादिग्दर्शन अप्रतिम आहे. १९१८ पासून १९४७ पर्यंतचा काळ सुरेख दाखवला आहे. पटकथा आणि दिग्दर्शन जबरदस्त आहे. संपूर्ण चित्रपटात एक प्रकारचा अमंगल मूड नेमका पकडला आहे. व्हिजुअली चित्रपट काळजाचा थरकाप उडवणारा आहे. नारायण धारप यांच्या कथांवर आधारलेल्या या हिंदी चित्रपटाला श्री ना पेंडसेंच्या 'तुंबाडचे खोत' या कादंबरीची देखील थोडी पार्श्वभूमी आहे.
हा चित्रपट लहान मुलांसाठी नाही. ज्यांना भुता-खेतांचे चित्रपट आवडत नाहीत त्यांच्यासाठीदेखील हा चित्रपट नाही. ज्यांना धक्कातंत्राने फुलवलेल्या हॉरर चित्रपटांचा शौक आहे त्यांच्यासाठी हा चित्रपट एक मोठाच धक्का ठरेल. ज्यांना हा जॉनर आवडतो त्यांच्यासाठी मात्र हा चित्रपट एक पर्वणीच आहे. मी हा चित्रपट मनापासून एंजॉय केला. एक अगदी वेगळा विषय अतिशय रंजक पद्धतीने सादर करण्यात हा चित्रपट कमालीचा यशस्वी झाला आहे.
दिवाळीच्या सुटीत एखादा रात्रीचा शो टाका, मझा आ जायेगा...
वाचने
12262
वाचनखूण
प्रतिक्रिया
25
छान परिक्षण
पाहीलाय ... आवडलाय... एकच
In reply to पाहीलाय ... आवडलाय... एकच by उगा काहितरीच
मजा आली असती पण...
राही हे
In reply to राही हे by हेमंतकुमार
ओके
हॉरर सिनेमे आवडत नसल्याने....
कथेचा पूर्वार्ध
मराठीत हवा होता हा चित्रपट
आताच पाहिला आणि बाहेर येवून तुमचा लेख वाचला
In reply to आताच पाहिला आणि बाहेर येवून तुमचा लेख वाचला by शुभां म.
धन्यवाद!
दिग्दर्शक अनिल बर्वेंचा मुलगा
In reply to दिग्दर्शक अनिल बर्वेंचा मुलगा by अनुप ढेरे
ग्लाड चे लेखक अनिल बर्वे
दुर्दैवाने भारताबाहेर हा
तुंबाड पाहिला एकदाचा. प्रचंड
In reply to तुंबाड पाहिला एकदाचा. प्रचंड by विनिता००२
अगदी अगदी
तीन-चार दिवसांपूर्वी पाहिला.
साॅलिडच आहे सिनेमा , परफेक्ट
अप्रतिम चित्रपट. गूढता, हॉरर
जबरी!
थेटरा मधे ६ आठवडे होता
सावकाराची पणजी जी शापामुळे
मस्तंय.
In reply to मस्तंय. by दादा कोंडके
ओपियम परमिट
In reply to ओपियम परमिट by शा वि कु
ओह आय सी
मला तरी फार बेकार, किळसवाणा ,