विश्वस्त

Primary tabs

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in दिवाळी अंक
25 Oct 2019 - 6:00 am


मिपा दिवाळी अंक  २०१९

अनुक्रमणिका
विश्वस्तविश्वस्त. श्रीकृष्णाच्या अस्तित्वाचा ठसा!

महाभारताचा काळ! आपल्या पुराणकथा की आपला इतिहास?

याच महाभारत काळातील माझं - किंबहुना अनेकांचं आवडतं व्यक्तिमत्त्व म्हणजे श्रीकृष्ण! तो अनादि-अनंत, तो सर्वत्र-समावेशक, कर्ता-करविता. तो निर्गुण-सगुण, निर्मोही. मात्र त्याचं अस्तित्व मोहमयी! देवत्व असूनही आपल्यातलाच एक असा! तो व्यावहारिक, हिशोबी, बेरकी आणि तो द्रष्टाही! म्हणूनच कदाचित स्वतःच्या मानव असण्याचा आणि मानवी मर्यादांचा त्याने कायम स्वीकार केला. त्याच श्रीकृष्णाच्या असीम दूरदृष्टीची कथा म्हणजे वसंत वसंत लिमये लिखित 'विश्वस्त'! श्रीकृष्णाच्या बालपणाचा काळ, तारुण्य, त्याचं प्रौढत्व, त्याची सुजाण बुद्धी याबद्दल आपण खूप वाचलं आहे. मात्र ‘विश्वस्त’च्या निमित्ताने आपल्याला कृष्ण नावाच्या मानवाचा वृद्धापकाळ समोर येतो. आपल्या वारसदारांचा होणारा र्‍हास याचि देही याचि डोळा पाहात असतानादेखील पुढच्या अनादि-अनंत काळातील आपल्या पिढ्यांसाठी त्या द्रष्ट्या पुरुषाने करून ठेवलेली तजवीज म्हणजे ‘विश्वस्त’!


c26d6f64095649329af6d96da7918602

ही कादंबरी अनेक दिवस डोळ्यासमोर ठेवली होती. पण वाचायचा मुहूर्त लागत नव्हता. ५२३ पानं असल्याने कसा वेळ मिळेल असं सारखं वाटत होतं. पण मिसळपाववरील दिवाळी अंकाचं आवाहन वाचलं आणि ठरवलं - 'विश्वस्त'चं रसग्रहण लिहायचं. मग लगेच पुस्तक हातात घेतलं आणि तीन दिवसात, किंबहुना तीन रात्रींत वाचून संपवलं. त्या तिन्ही रात्री मी एका वेगळ्याच जगात होते. तो श्रीकृष्णाचा काळ होता.... चाणक्याचा काळ होता.... आणि तरीही वर्तमानाचं पूर्ण भान होतं. श्रीकृष्ण आणि पर्यायाने महाभारत काळ म्हणजे आपल्या 'पौराणिक कथा' असं आजवर मी मानत आले. मात्र त्या विचारालाच या कादंबरीने धक्का दिला आहे. चाणक्य काळ आपण आपला इतिहास आहे असंच मानतो. त्यापूर्वीदेखील आपला इतिहास होताच नं? तो काय होता? याचा विचार करायला लावणारं पुस्तक म्हणजे 'विश्वस्त'! साध्या सरळ शब्दात विश्वस्त म्हणजे संचिताचा 'सांभाळ करणारा' आणि योग्य व्यक्तीस किंवा योग्य वेळेस पुढे सुपुर्द करणारा. हा सांभाळ करण्याचा काळ ज्या वेळी खूप मोठा होतो आणि योग्य व्यक्ती किंवा योग्य वेळ किंवा योग्य समाजव्यवस्था जोपर्यंत प्राप्त होत नाही, तोपर्यंत सांभाळ करता करताच त्याला वारसदारदेखील व्हावं लागतं, याची उकल करून सांगणारं पुस्तक म्हणजे 'विश्वस्त'!

लेखकाने स्पष्ट शब्दात म्हटलं आहे - कल्पित आणि सत्य यांच्यामधल्या पुसट, धूसर सीमारेषांवर आट्यापाट्या खेळणारी नाट्यपूर्ण, वेगवान घटनांच्या प्रवाहात वाचकाला खेचून नेणारी आणि खिळवूनही ठेवणारी कादंबरी... आणि तरीही ही एक कल्पित कथा नसून संपूर्ण सत्यकथन आहे असं आपल्याला प्रत्येक क्षणी वाटत राहतं. यातील अनेक प्रसंग आणि अनेक दाखले आपल्याला खिळवून ठेवतात. आजच्या अगदी पाच-सात वर्षांपूर्वीचे दाखले जसे यात आहेत, तसेच महाभारत काळातले आणि चाणक्य काळातलेदेखील दाखले आहेत.

एक कथा म्हणून विश्वस्त कशी आहे हे प्रत्येक वाचकाचं वैयक्तिक मत असू शकतं. पण या कादंबरीची खासियत ही की ती आपल्याला विचारात पाडते. काय असेल आपला खरा इतिहास? असं म्हणतात की आपण जो वाचतो किंवा ऐकतो, तो जेत्याचा इतिहास असतो. मग असं तर नाही की आपण इंग्रजांनी सांगितलेल्या आणि लिहिलेल्या कथनाला आपला इतिहास मानतो? हिंदू हा धर्म नसून सिंधू, सरस्वती नद्यांच्या किनारी उगम पावलेली आणि पुढे संपूर्ण आर्यवर्तात पसरलेली ही एक सारस्वत संस्कृती आहे. म्हणूनच कदाचित इतर धर्म (की पंथ?) यांचे प्रेषित किंवा स्थापनकर्ते आपल्याला माहीत आहेत. मात्र हिंदू धर्म यांनी स्थापन केला असा संदर्भ कधी माझ्या वाचनात आला नाही. पूर्वी लिखित साहित्यापेक्षा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे मौखिक माध्यमातून ऐतिहासिक सत्य सांगितलं जायचं. दुर्दैवाने एखादी शृंखला ढळली तरी त्यामुळे आपल्या इतिहासाचं केवढं तरी नुकसान झालं असेल. ‘विश्वस्त’मध्ये आपल्या इतिहासाची आणि पुराणांची खूप रोचक सांगड घातलेली आहे.

या कादंबरीमध्ये अनेक ठिकाणांची ऐतिहासिक किंवा पौराणिक दाखले देत गुंफण केली आहे. मुंबई, नालासोपारा, दापोली ते अगदी द्वारका आणि सोमनाथ मंदिर असा आपला वारसा इतका सुंदर रितीने समोर येतो की एकदा हातात घेतलेली ही कादंबरी संपूर्ण वाचल्याशिवाय खाली ठेवावीशी वाटतच नाही. तर, 'विश्वस्त' ही एक वाचायलाच हवी अशी कादंबरी आहे; हे सांगणे नलगे!

P-20170521-103302

***

माझ्या मनात गेली अनेक वर्षं येत आहे की आपल्या मुंबईला एक वलयांकित इतिहास आहे. तो आपण समजून घेतला पाहिजे. या कादंबरीच्या निमित्ताने 'जरा हटके, जरा बचके' अशा या 'मुंबई मेरी जान'मधील ऐतिहासिक संदर्भ आणि खदाडीसाठीच्या काही जागा मला समजल्या, त्या आपल्यासमोर या लेखाच्या निमित्ताने मांडते आहे.

खादाडी :

१. लीलावती हॉस्पिटलसमोरील चिंचोळ्या गल्लीमधील 'जमवा आओजी' हे खास पार्शी हॉटेल. 'आकुरी' खास पार्शी पद्धतीची मसालेदार अंडाभुर्जी.

२. नागीनदास मास्टर रोड, फोर्ट येथील 'कॅफे मिलिटरी'. मटण कटलेट ग्रेव्ही आणि सली बोटी.

३. मेट्रोजवळील 'कयानी' इराणी रेस्टॉरंट

४. याझदानी बेकरी, फोर्ट. ब्रून मस्का पाव. आजही या बेकरीमध्ये लाकडावर आणि कोळशावर चालणारी पारंपरिक भट्टी आहे. जिंजर बिस्किट्स आणि अ‍ॅपल पायदेखील खास.

ऐतिहासिक मागोवा :

१. जीपीओ परिसरातील जमिनीखाली सापडलेलं भुयार (कामा हॉस्पिटल, मिडल ग्राउंड आणि ऑईस्टर रॉक ही मूळ मुंबई येते आणि मलबार हिल अशा दक्षिण मुंबईतील विविध भागात भुयारी मार्ग असू शकतात.)

२. आत्ताचं वेस्टर्न नेव्हल कमांडचं हेडक्वार्टर, फोर्ट भागात ज्या ठिकाणी आहे, त्याचं मूळचं नाव ‘कॅसा डी ओरटा’ ( Casa da Orta) म्हणजेच बाँबे कॅसल.

३. एलिफंटा केव्हज म्हणजेच घारापुरीची लेणी (सहाव्या शतकातील निर्मिती)
जवाहरद्वीप म्हणजेच 'बुचर आयलंड', 'मिडल ग्राउंड' आणि 'ऑईस्टर रॉक' बेटं मुंबईच्या इतिहासाची शान अजूनही जपतात.

४. तेराव्या शतकातील राजा भीमदेव याची राजधानी महिकावती म्हणजे आजचं माहीम.

५. फोर्ट भागात सहज फिरलं तरी विसाव्या शतकाच्या सुरुवातीस बांधलेल्या 'निओ गॉथिक' आणि 'आर्ट डेको' अशा शैलीत बांधलेल्या अनेक इमारती दिसतात.

६. वाळकेश्वर येथील बाणगंगा तलाव (जबरेश्वर मंदिराच्या कोपऱ्यावर उजवीकडील चिंचोळी गल्ली)

७. ओल्ड कोर्ट हाऊस ते आझाद मैदान, सेंट जॉर्जेस हॉस्पिटल ते कामा हॉस्पिटल, मिडल ग्राउंड ते जी.पी.ओ., मिडल ग्राउंड ते ऑईस्टर रॉक, सेंट जॉर्ज फोर्ट ते सेंट जॉर्जेस हॉस्पिटल
(कदाचित मुंबईच्या या ऐतिहासिक वास्तूंना जोडणारी भुयारं असू शकतील)

८. बाँबे कॅसलच्या ईशान्य टोकाकडे सेंट जॉर्ज फोर्ट (सेंट जॉर्ज हॉस्पिटल, पी. डिमेलो रोड) होता. तेथे दारूगोळ्याचं कोठार होतं. आता तिथे महाराष्ट्र राज्याच्या पुरातत्त्व खात्याचं ऑफिस आहे.


श्रेयनिर्देश : प्रकाशचित्रं श्री. वसंत वसंत लिमये ह्यांजकडून


पुस्तकाचे नाव: विश्वस्त
लेखक: वसंत वसंत लिमये
प्रकाशक: राजहंस प्रकाशन ( प्रथम प्रकाशन १ जानेवारी २०१७)
ISBN 8174349995 (ISBN13: 9788174349996)


20191016-122815

अनुक्रमणिका

प्रतिक्रिया

कादंबरीचा परिचय आवडला ज्योति.
मिळवून वाचेन.

ही कादंबरी अनेक दिवस डोळ्यासमोर ठेवली होती. पण वाचायचा मुहूर्त लागत नव्हता. ५२३ पानं असल्याने कसा वेळ मिळेल असं सारखं वाटत होतं.

बापरे ५२३ पानं ! नजीकच्या भविष्यकाळात तरी एवढी दीर्घ कादंबरी वाचणे हे इच्छा असूनही शक्य नाही 😀
असो, 'विश्वस्त'चं रसग्रहण आवडलं 👍

किल्लेदार's picture

29 Oct 2019 - 12:10 pm | किल्लेदार

वाचायला हवी ...

समीरसूर's picture

31 Oct 2019 - 2:51 pm | समीरसूर

ही कादंबरी मी साधारण सहा-आठ महिन्यांपूर्वी वाचली. कादंबरीचा आवाका खूप मोठा आहे. मराठीमध्ये असे प्रयोग फारच कमी झालेले आहेत. लिमयेंनी इंग्लंड, अमेरिका वगैरे देशांत जाऊन या कादंबरीसाठीचा रिसर्च केलेला आहे. कादंबरी शेवटपर्यंत खिळवून ठेवते हे खरे पण बर्‍याच ठिकाणी अनावश्यक तपशील दिलेला आहे असे वाटले. काही ठिकाणी ही कादंबरी रटाळ झाल्यासारखीदेखील वाटते. काही ठिकाणी भाषा थोडी कमअसल वाटते. हे काही दोष वगळता कादंबरी वाचनीय आहे यात शंकाच नाही. लेख सुंदर झालेला आहे!

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

31 Oct 2019 - 2:59 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

अगदी असचं म्हणायला आलो होतो.
हि कादंबरी मध्येच अत्यंत पकड घेते आणि मध्येच अघळपघळ झाल्यासारखी वाटते.
पण उत्सुकता कायम राहते आणि वाचणे थांबवता येत नाही.

जॉनविक्क's picture

31 Oct 2019 - 3:01 pm | जॉनविक्क

.

पद्मावति's picture

31 Oct 2019 - 3:04 pm | पद्मावति

छान परिचय ज्योति.

परीक्षण छान पण कादंबरी अत्यंत रटाळ आहे.

मित्रहो's picture

6 Nov 2019 - 7:20 pm | मित्रहो

पुस्तक परिचय आवडला