कॅलिफोर्नियातील ट्रेन प्रवास
मिपा दिवाळी अंक २०१९
अनुक्रमणिकाकॅलिफोर्नियातील ट्रेन प्रवास

बर्याच वर्षांनी यंदा परत एकदा कॅलिफोर्निया ट्रिपचा योग आला. लॉस एंजलिस, सॅन फ्रॅन्सिस्को अन आजूबाजूचा परिसर पाहायचे असे ठरले होते. सोबत दोन ज्येष्ठ नागरिक आणि लहान लेक. त्यामुळे बेतानेच पर्यटन करावे असे ठरवले होते. प्रथम लॉस एंजलिस येथे जाऊन प्रसिद्ध अशी हॉलिवूड साइन पाहिली. (हे पाहायचे उत्तम ठिकाण म्हणजे लेक हॉलिवूड पार्क). मग मोर्चा वळवला तो हॉलिवूड वॉक ऑफ फेम, डॉल्बी थिएटर इत्यादी पाहायला. येथे प्रसिद्ध कलाकारांचा नावाच्या चांदण्या, त्यांच्या हाताचे अन बुटांचे ठसे पाहिले. मग डॉल्बी थिएटर आतून पाहावे (गायडेड टूर) म्हणून त्या टूरची तिकिटे विकत घेतली. येथेच जगप्रसिद्ध असा ऑस्कर सोहळा पार पडतो. हा एक अविस्मरणीय अनुभव ठरला. हॉलिवूडपटांची आवड असल्यास आवर्जून या ठिकाणाची टूर घ्यावी.
दोन दिवस लॉस एंजलिसमध्ये घालवल्यावर तिसऱ्या दिवशी सकाळी लॉस एंजलिसच्या युनियन स्टेशनवर पोहोचलो. इथून सिअॅटलसाठी निघणार्या कोस्ट स्टारलाइट ट्रेनचे बुकिंग आम्ही केले होते.
स्टेशनवर पोहोचताच जाणवले की सामान वाहून न्यायला ट्रॉल्या नाहीत. अन आमचे सामान अंमळ जास्त होते. त्यामुळे सगळे सामान घेऊन आधी तिकीट खिडकीवर चेक इन करावे लागले. नेमके त्या दिवशी विमानतळासारखे बॅगेज चेक इन उपलब्ध नव्हते. मग परत सगळे सामान आणि आम्ही सगळे असे फलाटाच्या दिशेने निघालो. तर फलाटही बर्यापैकी लांब होता. फलाटावर पोहोचल्यावर मात्र टीसींनी सर्व सामान रेल्वेत ठेवायला मदत केली. ही ट्रेन डबल डेकर प्रकारची होती. सामान ठेवायची व्यवस्था खालच्या मजल्यावर होती. तसेच बाथरूम्सही खालच्या मजल्यावर होते. आमची आसन व्यवस्था वरच्या मजल्यावर होती. आम्ही वर जाऊन आसनस्थ झालो. रिक्लायनर सीट्स एकदम ऐसपैस होत्या व पायांना आराम वाटण्यासाठी फ्लॅपची व्यवस्था होती. बरोबर १० वाजता गाडीला सौम्य असा धक्का बसला आणि आम्ही मार्गस्थ झालो. लॉस एंजलिस मागे पडू लागले आणि मन भूतकाळात रमले. लहानपणापासून अनेकदा लहान-मोठे ट्रेनचे प्रवास केले आहेत. पॅसेंजर, मेल, एक्स्प्रेस, राजधानी एक्स्प्रेस इत्यादी. सर्वाधिक प्रवास केला आहे छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेसने. अनेकांची नावडती असली तरी ती माझी आवडती ट्रेन आहे. शेगाव स्टेशन आले की शेगावची प्रसिद्ध कचोरी खायला मिळणे हा त्यातला आनंददायक अनुभव असायचा. ट्रेनमध्ये येणारे विविध विक्रेते, जळगाव-भुसावळ भागांतले अप-डाउन करणारे प्रवासी, तिकिट तपासनिसाबरोबर चालणाऱ्या वाटाघाटी, नगर जिल्ह्यातल्या साखर कारखान्यांच्या शेजारून जाताना येणारे विशिष्ट गंध या गोष्टी स्मृतिपटलावर कायमच्या कोरल्या गेल्या आहेत. आम्हाला पोहोचायचे होते ते सॅन होजे येथे. ही ट्रेन तिथे पोहोचायची निर्धारित वेळ रात्री आठ वाजताची होती. त्यामुळे प्रवासात निवांत वेळ भरपूर होता. सुरुवातीचा अर्धा तास लेकीने सगळीकडे फिरून लांब पल्ल्याची ट्रेन कशी असते याचे तिचे कुतूहल शमवले. तेवढ्यात घोषणा झाली की जेवण्याच्या रिझर्वेशनसाठी लवकरच नोंदणी होणार. त्याप्रमाणे डायनिंग कारमधील कर्मचार्यांनी प्रवाशांजवळ येऊन नावनोंदणी केली. आता थोडे आरामात बसून बाहेरचे निरीक्षण करू लागलो. ट्रेनच्या खिडकीतून ट्रॅकशेजारच्या वस्त्यांमधल्या घरांचे दर्शन होत होते. बऱ्याच घरांची मागची अंगणे दिसत होती. त्यात छोटेखानी बागा, लहान मुलांची खेळणी, काही ठिकाणी स्विमिंग पूल्सही होते. काही अंगणांमध्ये लिंबांची अन संत्र्याची झाडेही दिसली. बाहेर आता शहराची वस्ती मागे पडून डोंगराळ प्रदेश सुरू झाला. लवकरच बरबँक एअरपोर्ट हे स्टेशन आले. तिथे जवळच विमानतळाची धावपट्टीही दिसली. इथे थोडा वेळ थांबून पुन्हा मार्गस्थ झालो. आता हिरव्यागार डोंगररांगांबरोबर मळे दिसू लागले. आता सिमी व्हॅली हे स्टेशन आले. इथे स्टेशनलगतच निरनिराळ्या रंगांचे आकर्षक गुलाब फुललेले दिसले.
त्यानंतर आमच्या जेवणाच्या वेळेची घोषणा झाली. आम्ही डायनिंग कारच्या दिशेने निघालो. वाटेत निरीक्षण करत आरामात बसायची सोय आहे. या बोगीत सभोवती छतापर्यंत मोठमोठ्या काचेच्या खिडक्या होत्या. इथे नंतर परत येण्याचे ठरवून डायनिंग कारमध्ये पोहोचलो. तेथील होस्टने आम्हाला आमच्या नियोजित टेबलवर स्थानापन्न केले. अॅमट्रॅकमधील डायनिंग कारमधे भोजन करणे हा एक अविस्मरणीय अनुभव ठरला. आम्ही आमच्या खाण्याची ऑर्डर देऊन आम्ही बाहेरची दृश्य बघू लागलो. रेल्वे आता प्रशांत महासागराच्या किनार्यावरून धावू लागली होती. महासागरावरून उडणारे सी गल पक्षी, सर्फर्स पाहण्यात वेळ छान जात होता.
तेवढ्यात जेवण पुढ्यात आले. ते खाण्यात, गप्पा मारण्यात आणि महासागर पाहण्यात व्यग्र झाल्यामुळे डायनिंग कारचे फारसे फोटो घ्यायचे राहून गेले. आम्ही जालावर इथे मिळणाऱ्या जेवणाचे जे अभिप्राय वाचले होते ते फारसे उत्साहवर्धक नव्हते. परंतु आम्हाला जेवण चवदार वाटले.
मंडळी, या डायनिंग कार हा एक सांस्कृतिक ठेवा आहेत. याचा खरा उद्देश प्रवाशांनी एकमेकांची ओळख करून जेवण घेत गप्पा माराव्यात यासाठी केला. आता मात्र नव्या बदलांच्या वादळात या डायनिंग कार हळूहळू बंद करण्यात येणार आहेत आणि त्याजागी तयार भोजनाची पाकिटे ठेवण्यात येणार आहेत, जी विमानप्रवासाप्रमाणे प्रवाशांनी स्वतःच्या सीटवर बसून खावीत ही अपेक्षा.
बरेचदा किनाऱ्यापासून जवळ प्रशांत महासागरामध्ये खनिज तेलविहिरी दिसल्या. एकदा जमिनीवरच्या तेलविहिरींचेही दर्शन झाले.
जेवण करून परत येऊन बसलो. या रेल्वेमध्ये अधूनमधून घोषणा होत त्या की अॅमट्रॅकवर आपले स्वागत आहे. प्रवाशांच्या सुविधेसाठी स्वच्छ बाथरूम्स आहेत! आता परत बाहेर बघत वेळ घालवू लागलो. हिरव्यागार डोंगरांच्या रांगा आणि डोंगरांच्या माथ्यावर उतरलेले ढग. सगळीकडे वसंत ऋतूने बहार आणली होती. डोंगरावर, रस्ताच्याकडेला फुले उमललेली होती. वाटत नव्हते की बरीच वर्ष कॅलिफोर्नियात दुष्काळ होता म्हणून. डोळे ती हिरवाई आणि फुले पाहून निवले. अधूनमधून इतर गाड्यांना आधी जाऊ देण्यासाठी आमची गाडी थांबत होती. असे करीत एकापेक्षा बरेच थांबे झाले. आम्हाला रात्री पोहोचायला उशीर होणार असे वाटू लागले. एक मात्र लक्षात आले की असे थांबे झाले तरी गाडी काही तिची विशिष्ट 'गती' सोडत नव्हती, जेणेकरून वाया गेलेला वेळ भरून निघेल. आमच्या निरीक्षणाप्रमाणे या ट्रेनचा वेग भारतीय ट्रेन्सच्या तुलनेत बराच कमी होता. कदाचित याच कारणाने ट्रेनमधल्या निम्म्याहून अधिक सीट्स रिकाम्या होत्या.
जेवणानंतरच्या प्रवासात प्रशांत महासागरासह ट्रॅकशेजारी गावे-वस्त्या दिसणे पूर्णपणे बंद झाले अन निर्मनुष्य तसेच काही वेळा वैराण प्रदेशही दिसला. या प्रदेशांत आमच्या फोन्सची रेंज पूर्णपणे गेली होती, त्यामुळे सतत ऑनलाइन असण्यापासून एक जरा विश्राम मिळाला.
त्यानंतर दुपारी खालच्या डेकवरच्या स्नॅक्सच्या दुकानातून कॉफी खरेदी करून निरीक्षण करायच्या बोगीत (ऑब्झर्वेशन कारमध्ये) जाऊन बसलो. इथे खूप छान वेळ गेला. मग परत आपल्या बोगीत आलो. आता बाहेरचे दृश्य बदलू लागले. हिरवेगार डोंगर मागे पडून थोडे वैराण माळराने लागू लागली. लांबपर्यंत पिवळे पडलेल्या डोंगरांखेरीज काहीच दिसत नव्हते. बराच काळ असा गेल्यानंतर मग काही तेलाच्या विहीर दिसल्या. पुढे मग एअरफोर्सचे स्टेशन लागले. इथे फक्त तिथे काम करणारे लोक आणि आमच्यासारखे रेल्वे प्रवासी येऊ शकत होते!तसेच आणखीन पुढे गेल्यावर 'SpaceX' कंपनी लागली.
संध्याकाळ होऊ लागली होती आणि परत काही फळबागांच्या रांगा दिसू लागल्या. काही बागांमध्ये पाणी देण्याचे काम चालू होते. संध्याकाळच्या जेवणाच्या वेळेच्या घोषणा होऊ लागल्या होत्या. लवकरच सूर्यास्त झाला. या वेळी आम्ही आमच्या जवळचे खाऊन जेवण करून घेतले. आमचे स्टेशन येण्याची वाट पाहू लागलो. स्टेशन यायला उशीर होणार हे माहीतच होते. उशीर होता होता नियोजित वेळेच्या तब्बल २ तास उशीर होऊन रात्री १० वाजता आम्ही सॅन होजेच्या फलाटावर उतरलो.
संपूर्ण ट्रेनमध्ये स्वच्छता वाखाणण्याजोगी होती. आमचे बरेच असलेले सामान चढवायला अन उतरवायला अॅमट्रॅकच्या कर्मचाऱ्यांनी मदत केली. इथले स्टेशनच बंद होते व स्टेशनच्या इमारतीला वळसा घालून आम्ही बाहेर पडलो.
इतर कुठल्याही प्रवासापेक्षा मला ट्रेनचा प्रवास अधिक भावतो. ट्रेनला स्वतंत्र मार्ग असतो, जो इतर वाहनांबरोबर वाटून घ्यावा लागत नाही. ट्रेनच्या आत सहजपणे पाय मोकळे करण्याचा पर्याय असतो. ट्रेन धावू लागली की तिच्या हलण्यात अन आवाजात एक प्रकारची लय असते. हिंदी चित्रपट संगीतातही या लयीचा वापर अनेकदा परिणामकारकपणे केला गेला आहे उदा. 'अपनी तो हर आह एक तुफान है' ते 'छैया छैया' इत्यादी. तसेच ट्रेनमध्ये भेटणाऱ्या सहप्रवाशांबरोबर गप्पा रंगण्याची शक्यताही असते. या प्रवासाच्या आनंददायक अनुभवामुळे यापुढेही असेच दीर्घ पल्ल्याचे ट्रेनचे प्रवास करण्याचा मनोदय आहे.

.png)
वाचने
17191
वाचनखूण
प्रतिक्रिया
21
रंगा ,,, मस्तच रे !
रंगा ,,, मस्तच रे !
डाइनिंग कार पाच ते आठ
अरे वा!
अनुभव कथन आवडले. फोटोही छान.
वाह!!!
छान फोटो
वाह, तुम्ही तुमच्याबरोबर
मस्त
सुरेख!
प्रवास झोकात झालाय.
अरे वा.
बांधेसूद लेखन आणि त्याला सुंदर फोटोंची जोड!
अरे वा!मस्त वर्णन
प्रवास वर्णन आवडले. ...
प्रवास वर्णन आवडले
मस्त वर्णन
लेख वाचता वाचता सुंदर
धन्यवाद
प्रवास वर्णन आणि फोटो दोन्ही
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Teri Meri Dori... ;) - Sonali Vajpayee | Tera Mera Pyarछान लेख आहे. वाचल्यावर मला