श्रावणसरी

मायमराठी's picture
मायमराठी in जे न देखे रवी...
21 Aug 2019 - 11:45 am

।। श्रावणसरी ।।

भिजून गेल्या फांद्यांवरती, बसूनी सहजच गाती पक्षी,
अलगद जाई वाऱ्यावरती, सप्तसुरांची मोहक नक्षी ।

सुईसारख्या चोचींमधुनी, दशदिशांना निरोप जाती
साद घालती कोणा कळेना, दूरदूरची ओवून नाती ।

फुलांफुलांचे श्वास टिपुनी, दूरदूर हे वायू वाहती,
परागमोहित किटक येऊनी, मकरंदाची गाणी गाती ।

वसुंधरा ही नटुनीसजुनी, पशुपक्ष्यांना ठेवी भुलवुनी,
भेट घेण्या तिच्या नायका, सकलसृष्टीला जाई घेऊनी ।

त्यांस मिळाले निरोप नकळत, तरी अजुनी दर्शन नाही,
एका सरीचीच मिठी देऊनी, पुन्हा पुन्हा तो निघून जाई।

त्याच मिठीने शहारते ती, गर्भधारणी हरितमोहिनी,
क्षणाक्षणांची प्रसवशालिनी, स्वर्गसुंदरी ओजमानिनी ।

ऐश्वर्यवतीचे हास्य खुलुनी, बिंबित होई नभांत धरती,
धीर कसा मग त्यास असावा, बरसत येई प्रियेवरती।

चरांचरांच्या विश्रब्धाला, मानवातली संस्कृती दिसते,
घराघरांला लहानमोठ्या, सणासणांतूनी ऊर्जा मिळते।

ह्या सगळ्याचा अबोल कर्ता, शिलेदार तो कर्तृत्वाचा,
वसुंधरेचा ओजस भर्ता, श्रावण माळे हार सुखाचा ।

- अभिजीत

कविता

प्रतिक्रिया

गणेशा's picture

21 Aug 2019 - 12:58 pm | गणेशा

मस्त लिहिली आहे

जॉनविक्क's picture

21 Aug 2019 - 4:43 pm | जॉनविक्क

मिपाचे जुने जाणते लोक परतताना बघून खरॉखर तीव्र मंदी सुरू झाल्याची भावना तीव्र झाली आहे

बाजीगर's picture

23 Aug 2019 - 3:17 am | बाजीगर

क्या बात है अभिजीत राव....खूप सुंदर कविता.
बालकवींची आठवण झाली.
प्रासादिक,
गेय
नादमय,
चित्रदर्शी....

छा गये !
वाह वाह !!

प्राची अश्विनी's picture

23 Aug 2019 - 12:09 pm | प्राची अश्विनी

खूप छान!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

23 Aug 2019 - 9:55 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आवडली रचना.

-दिलीप बिरुटे

मायमराठी's picture

23 Aug 2019 - 11:10 pm | मायमराठी

प्रोत्साहनाबद्दल खूप खूप आभार .

ज्ञानोबाचे पैजार's picture

24 Aug 2019 - 11:01 am | ज्ञानोबाचे पैजार

छंदबध्द कविता आवडली.
बाकीबाब आठवले
पैजारबुवा,

मायमराठी's picture

26 Aug 2019 - 9:46 am | मायमराठी

पैजारबुवा!,
'बाकीबाब आठवले' आपले हे शब्द माझ्यासाठी कोणत्याही सत्काराहून कमी नाहीत. बोरकरांचे काव्य म्हणजे अमृत, वाचणारे अमर नाही झाले तरच नवल. नवख्या सभासदाच्या कोवळ्या प्रयत्नांना एवढ्या उच्च दर्जाच्या लायकीचे मानणाऱ्या आपल्या मोठेपणाला दंडवत.

साहित्य संपादक's picture

12 May 2020 - 9:39 pm | साहित्य संपादक

नमस्कार मायमराठी,
आपणास व्यनि केला आहे. याच कवितेसंदर्भात आहे. कृपया पहावा!

मोगरा's picture

13 May 2020 - 12:13 am | मोगरा

मस्त