अंधानुकरण
लेखनप्रकार
"अंधानुकरण"
काही वर्षांपूर्वी पाहिलेला एक व्हिडिओ आज पुन्हा बघायला मिळाला, हेच निमित्त. आंधळा माणूस इंग्रजीमध्ये क्रिकेट समालोचन करतो, एवढंच नव्हे तर गर्दीचा आवाज हुबेहूब काढतो. सरावलेला समालोचक असावा अशी शब्दफेकीची शैली. " हे कसं जमवलं? " असं विचारलं असता म्हणतो की रेडिओ व टिव्ही ऐकून ऐकूनच शिकलो, इंग्रजी येत नाही त्यामुळे चूका होण्याची शक्यता आहे. हे सांगताना थोडासा ओशाळल्यासारखा हसतो.
असंच एकदा एका सभेनंतर पांढरी काठी टेकवत टेकवत जाणाऱ्या व्यक्तीला पाहिले. त्याच्या अंगाखांद्यावरून सुटलेल्या सभेची गर्दी ओसांडत होती. न राहवल्याने त्यांच्याशी ओळख करून घेऊन त्यांना घरी सोडतो असं म्हणालो. सगळी पांगापांग झाल्यावर बाईक काढून त्यांना मागे घेऊन निघालो. वाटेत बोलत बोलता अनेकवेळा 'बघितले', 'पाहिले' असे उल्लेख येत होते, पुन्हा पुन्हा जीभ चावून घेत होतो. त्यांच्या घराच्या भागांत शिरल्यावर मला कळेना आता नक्की त्यांचे घर कोणते? तसं त्यांना विचारल्यावर म्हणाले," अजून थोडे पुढे जा, मग मी तुम्हाला दाखवतो." या वाक्याने वास्तविक मला ब्रह्माण्डच वगैरे दिसायला हवे होते. थोडं पुढे गेल्यावर त्यांनी सांगितले डावीकडे निळं गेट असेल तिथे गाडी थांबवा. उतरून माझ्यापुढे जाऊन पहिल्या मजल्यावर पोचले, मी नको नको म्हणत असताना त्यांच्या पत्नीला चहा करायला सांगितला. निघताना दारात निरोप घेताना " सर, माझ्यामुळे तुमचा बराच वेळ गेला, मुद्दामून वरती येऊन चहा घेतलात, बरं वाटलं, धन्यवाद." असं म्हणून हसले. तोपर्यंत माझे स्वरयंत्र फितूर झाले होते.
डोंबिवलीला रहात असताना आमच्या समोर एक सर रहायचे, ते चर्चगेटला एका कॉलेजमध्ये प्राध्यापक होते. सकाळी ८ ते ८:१०च्या दरम्यान घराला कुलूप लावून बाहेर पडायचे. नाक्यावर रिक्षापर्यंत सोडायला चाळीतले कोण ना कोणी जायचे. कधी कधी मीही जायचो. उजवा हातात घेता घेता "सर, चला आज तुम्हाला मी सोडतो." असं म्हणा अगर काहीही न बोलता अलगद हात हातात घेतला तरी "अरे वा! आज अभिजीत आहे जोडीला..." हे ठरलेलंच सोबत अगदी नुकत्याच उमललेल्या फुलासारखं दिलखुलास हसणं. रिक्षात ते बसले की "बाळा, थँक्स बरं का " त्या वयात तसं काहीच अंगावर यायचं नाही.
दापोलीत एकदा स्नेहज्योती शाळेतल्या अंध मुलांचा गायन सराव चालू होता. सहज डोकवायला म्हणून गेलो आणि त्या मुलांचे हसरे, ताजेतवाने चेहरे, लख्ख , टकटकीत डोळे, तयार हात व गळे बघून ऐकून माझी गोची व्हावी, हे कळेना. इकडे आमचे डोळे पाझरू लागले. मागच्या मागेच पळालो.
आमचा एक मित्र स्नेहज्योती शाळेत काही त्या मुलांकरता काही वस्तू, काही औषधे घेऊन गेला होता. तेव्हाचा त्याचा अनुभव. तो मुलांना म्हणाला," चला रे पोरांनो, तुम्हाला सगळ्यांना गाडीत बसवून फिरवून आणतो." त्यावर त्यातील एक मुलगी म्हणाली," काका, आम्हाला गाडी ढकलायला द्याल का?" त्यावर महाशय थोडे हसून " कशाला ढकलायताय गाडी, मस्तपैकी आत बसून फिरा की. खिडकीतून बाहेरचा गार वारा खा, झाडं बघा..." ती मुलगी हसत हसत त्याला थांबवत म्हणाली," अहो काका, आम्हाला आत काय आणि बाहेर काय, काय फरक पडतो राहिला प्रश्न बाहेर बघायचा आम्हाला कुठं काय दिसतंय. तेव्हा आम्हाला गाडीला हात लावून मागे पुढे करू द्या, तेवढी मजा बस्स झाली."
त्यांचा गाडीचा खेळ खेळून मुलं आनंदाने त्यांच्या शाळेत गेली आणि गाडीचा मालक थोडं पुढे जाऊन गाडी बाजूला लावून ओक्साबोक्शी रडला.
परिपूर्णता लाभलेले आयुष्य असं शापित, विस्कटलेले वाटणारे, कायम अपरिपूर्णतेच्या आश्रयाला आलेल्या अश्या वेगळ्याच वळणावरच्या आयुष्याला बघते तेव्हा त्याची अशी तारांबळ होत असावी. प्रत्येकाच्या भावनांचे नळ कमीजास्त वाहत असतीलही. तरीही तिथं थबकायला होतं, घुटमळायला होतं. बिनाउत्तरांचे निर्लज्ज प्रश्न सभोवती पिंगा घालू लागतात. कारणमीमांसा, कार्यकारणभाव, कर्मगती आणि काय काय अशी व्रात्य कार्टी हैराण करतात.
त्यांच्यातलं उणेपण खिजवतं, डिवचतं आपल्याला, ते त्यांचं हसणं सहन नाही होत. त्यांच्यातला आशावाद फार क्रूर वाटतो, अंधारात अचानक समोर येऊन दचकवणाऱ्या प्राण्यासारखा. त्यांच्याकडून आभार घेणं परवडंत नाही. खरंच खूप महाग असतात ते, कमीत कमी एखाददोन रात्री द्याव्या लागतात त्यासाठी.
बुद्धीचा, स्वत्त्वाचा सगळा दिमाख उतरतो. मन पावसात भिजून गार पडलेल्या, आईपासून तुटलेल्या , एका कुत्र्याच्या पिलासारखं चिपाड होऊन कोपऱ्यात बसतं. अभिमानाची पुटं टपाटप गळतात, गांगरतात की कोणत्या भिंतीला लागलो होतो? स्वार्थ संकटात येतो आणि कधीही न बघता येणाऱ्याकडे एकटक बघत बसतो. एकेक अस्त्र गळू लागतात, दांभिकतेच्या अर्गला तुटून पडतात. शिल्लक राहते नुसतेच अस्तित्व , दोनचार श्वासांत अडकवलेले, ग्रहगोलांच्या सोबत हिंदकळणारे, भरतीत ओले होत, ओहोटीत कोरडे पडत पडत त्याच क्षणभंगुर समुद्रकिनाऱ्यावर अमर्याद काळ सत्ता गाजवायचे मनसुबे रचणाऱ्या रिकाम्या शिंपल्यासारखे. आयुष्याचा सप्तरंगी डोळा स्पष्टपणे दाखवून देतो की फारसं काही नवीन दिसणार नाही. जे आहे ते जुनेच आहे, हे झाड, हे त्याचे खोड, ही त्याची पानं आणि असंच इतरही वैश्विक महितीवजा ज्ञान. हे काही स्वयंभू नव्हे, शास्त्रज्ञ प्रयोग करून चूकत चूकत, ठेचकाळत आंधळेपणी प्रयोग करत राहतात आणि आमच्यासारखी डोळस दुनिया वाट बघत बसते की कधी कधी एकदा ते यश पुस्तकात येईल आणि मग त्याचा अभ्यास करता येईल. डोळस माणसाला परिणाम दिसतो, पराभव जाणवतो हा त्याच्या दृष्टीचा फायदा (?). शिवाजी राजांनी काही तरुण मंडळी गोळा केली खरी, शपथ घेतली पुढे काय..? अंधारात उडी आणि मनगटावरचा विश्वास.
आठदहा काड्यांनी बांधलेल्या घराला उघड्या डोळ्यांनी लावलेल्या कुलुपावरसुद्धा आमचा विश्वास नसतो. चार वेळा खालती वरती खेचून बघणारे आम्हीच खरे डोळस. एरवी एक जीवच तेवढा गमवायला घेऊन सिंहगड जिंकायला गेलेला तानाजी त्याच्या घराला कोणते कुलूप लावत होता? तो आंधळाच म्हणायचा. मायेने माखलेले डोळे फक्त त्यांना जमेल तेवढेच दाखवत असावेत. त्याच्या पलीकडील दुनिया आकळायला त्यांच्यात जादू नाही. आपल्याला दिसतं ते त्यांना नाही आणि त्यांना दिसतं, जाणवतं ते आपल्याला कळत नाही. दोघेही आंधळेच. विश्वव्यापक अंधाराला जन्मापासून खेळवणारे, त्याच्या गर्तेत स्वत:ला खुशाल झोकून देणारे, नियतीला वाकुल्या दाखवत आशेची किरणांनी इतरांचे डोळे प्रकाशमान करणाऱ्या अंधांचे अनुकरण करावे, असा नवीन अर्थ 'अंधानुकरण' या शब्दाचा घेतला तर काही गैर होईल का?
-अभिजीत श्रीहरी जोगळेकर
वाचने
9915
वाचनखूण
प्रतिक्रिया
31
....
खूप छान लिहिलंय.
In reply to खूप छान लिहिलंय. by टर्मीनेटर
खूप खूप आभार
सध्याच्या रणधुमाळीत काहीतरी
In reply to सध्याच्या रणधुमाळीत काहीतरी by राजाभाउ
तंतोतंत सहमत
सुंदर लिहिले आहे. लिहीत रहा,
टॉप क्लास !
+1
उत्तम!
शिर्षक सोडलं तर सगळा लेख
छान
खूप छान लेखन.
सुरेख लिहिलंय.
खूप आवडले.
In reply to खूप आवडले. by राघव
उत्तम अश्या जुन्या धाग्यांची
In reply to खूप आवडले. by राघव
वाह वाह, हा लेख ही सुंदरच आहे
सुंदर. आवडले.
भिडणार लिखाण होत
सर्व मंडळींचे खूप खूप आभार.
खरंच खूप सुंदर
रडवलंत.
उत्कृष्ट लेखन. असेच लिहीत
फार सुंदर लिहिले आहे
फारच सुंदर ......
In reply to फारच सुंदर ...... by सुधीर कांदळकर
सुधीरजी, प्रोत्साहनाबद्दल खूप
सुंदर!
In reply to सुंदर! by लई भारी
नक्की प्रयत्न करेन..
_/\_
फार सुंदर, मनाला भिडनारे लेखन
खुप छान झालाय लेख. आवडला.
अत्यंत भावनाविवश करणारं लेखन, अभिजीत जी