मोत्झार्टचे शांतिस्तवन (रेक्विएम)
लेखनप्रकार
परवाच बॉल्टोमोर सिंफनी ऑर्केस्ट्रा आणि बॉल्टिमोर कोरल आर्ट्स सोसायटी यांनी एकत्र सादर केलेला कार्यक्रम ऐकायचा योग आला. त्यांनी मोत्झार्टचे रेक्विएम (मृतात्म्यासाठी शांतिस्तवन) सादर केले.
या संगीताबद्दलची दंतकथा काही लोकांनी हॉलिवुड-निर्मित "आमादेउस" चित्रपटात बघितली असेलच - तीत कल्पनारम्यता फार आणि तथ्य फार कमी आहे. त्या चित्रपटात मोत्झार्टचा द्वेषयुक्त भक्त त्या काळातला संगीतकार सालिएरी होता, आणि त्याने मोत्झार्टच्या बापाच्या भुताचे सोंग घेऊन भावनिक दडपणाखाली हे संगीत मोत्झार्टकडून लिहून घेतले, अशी काही कथा आहे.
सत्य हे की एका भंपक उमरावाने गुप्तपणे मोर्झार्टकडे या संगीतासाठी पैसे दिले होते. (गुप्तपणे का? तर हा उमराव संगीतकारांकडून संगीत विकत घेऊन आपणच ते रचले असा कांगावा करत असे.) पण अपशकुनी अंधविश्वासाने मोत्झार्टने स्वतःची कल्पना करून घेतली, की आपण आपल्याच मृत्यूनंतरसाठी हे मृतात्मा-शांती-संगीत लिहीत आहोत. त्या दडपणाखाली त्याच्याकडून हे स्तवन पुरते लिहिले गेले नाही. तो आजारी पडून मरण पावला, तेव्हा याच संगीताचा त्याने ध्यास घेतला होता.
पुढे त्यातील भागांचे वर्णन दिले आहे. लॅटिनमधील शब्द कॅथोलिक मृतात्म्यास-शांती-प्रार्थना-सत्रातले ठराविकच आहेत. त्याच-त्या शब्दांना संगीताच्या मार्फत सामर्थ्य देणे हे संगीतकाराचे वैशिष्ट्य होय.
१. त्यातील हा पहिला भागच त्याने संपूर्णपणे (म्हणजे चारही गायकांची आणि वाद्यवृंदाची सुरावट) रचलेला आहे. बाकी भागांचे (भाग ८ पर्यंत) अर्धवट रेखाटनच त्याने केले आहे - गायकांच्या चाली बसवल्या आहेत, पण वाद्यांच्या चालींबद्दल फक्त थोडीच कल्पना दिली आहे.
"त्यांना शांती दे, आणि कायमचा प्रकाश त्यांच्यावर पडो. (वगैरे.)" १.३५ च्या सुमारास क्षणभराच्या शांततेनंतर "आणि कायमचा प्रकाश..." असा धगधगीत सुरांत येतो... आणि २:००च्या सुमारास अगदी शांत होऊन त्यांच्यावर पडतो.
२. "देवा करुणा कर, ख्रिस्ता करुणा कर"
यात सुरुवात खर्जात (बेस) गाणारे पुरुष करतात, पण "आल्तो" गायिका (गमगरे-गमरेग-मपमग-मपगम-...) असे कापरे भरणारा "करुणा (एलेइसॉन)" शब्द म्हणायला लागतात, मग एक एक करून प्रत्येक गायक तो थरकाप गातो...
३. "त्या दैवी क्रोधाच्या दिवशी जग जळून खाक होईल, आणि न्यायाधीश कठोरपणे तपासेल तसा थरकाप उडेल..."
"दिएस इराए (दिवस क्रोधाचा) या पहिल्या शब्दांतच रौद्र रसाचा आविष्कार होतो.
४. "दिव्य बिगूल वाजेल आणि थडग्यांतील मृतांना उठवेल..."
(इथे अर्थातच सुरुवातीला ट्रंपेट वाजते. एक-एक करून गायक गाऊ लागतात.)
५. "महान राजा... जे वाचणार त्यांना मोफत वाचवतोस... मला वाचव..."
(हा "मोफत" प्रकार ख्रिस्ती [विशेषतः कॅथोलिक] धर्मशास्त्रातला आहे. मनुष्य इतका स्खलनशील आहे, की स्वर्गास स्वतःहून पात्र होईल इतके निष्कलंक पुण्य तो करूच शकत नाही. नरकयातनांतून जे वाचतात, स्वर्गात जातात, ते पुरेशी पुण्याई नसूनही "मोफत" देवाच्या करुणेमुळे जातात.) त्यात "मला वाचव" हे पिल्लू अगदी हळुवार संगीताने १:२० च्या सुमारास संगीतकार सोडतो...
६. "आठव रे, सौम्य येशू! तू आलास तो आमच्यासाठीच ना? मला सोडू नको..." देव (पिता) हा कठोर असणार म्हणून सौम्य येशूकडे आर्जवे सुरू झाली आहेत. संगीताचा रस मागच्या गाण्यातच रौद्राकडून आर्जवाकडे झुकला होता, तो आता पूर्णपणे आर्जवी होतो.
७. "वाईट लोकांना डांबल्यानंतर, सज्जनांबरोबर मला बोलाव..."
"वाईट लोकांना डांबल्यानंतर (कोन्फुतातिस मालेदिक्तिस)"च्या मोठ्या धिकारानंतर "सज्जनांबरोबर मला बोलाव (वोचे मेकुम बेनेदिक्तिस)" मधील बदललेला स्वर ऐका (०:२० च्या सुमारास)
८. "अश्रूभरला तो दिवस, राखेतून न्यायासनापुढे जाण्यासाठी दोषी मनुष्य उठतो..."
यातील गायकांच्या सुरांतले पहिले आठ तालखंड मोत्झार्टने लिहिले आहेत - त्याने लिहिलेली ही आयुष्यातली अखेरची सुरावट - (०:५८ ला संपणारी) संगीतातले काहीही कळत नसून नाट्यमय सुरांमुळे माझ्या स्मृतीत कोरलेली. त्यातही ०:३० पासून थबकणारा ताल ऐका - "क्वाम्-रे-सुर्-गेत्-एक्स्-फा-वि-ल्ला" ="जे-व्हा-उठ्-तो-रा-खे-तू-नी" - त्या दोषी माणसाला उठायचे नाही, तरी टप्प्या-टप्प्याने त्याला उठणे भागच होते आहे...
मग ०:४४ पसून थबकणे नाही पण कोमल-शुद्ध-कोमल-शुद्ध प्रत्येक श्रुती वापरत तारस्वरातील गायिका त्याला बळेच खेचतात - "जुदीकांदुस-होमोरेउस" (तपासायच्या-दोषी-जणास). (स्वरमेळाच्या नियमानुसार तारस्वरातील गायिकांना सर्व कोमल-शुद्ध-तीव्र स्वर गाऊ देण्यासाठी बाकी गायक वेगळेच स्वर गाऊन आधार देतात - पण ते किचकट शास्त्रीय नियम सोडूया - म्हणजे मला तरी कुठे येतात, म्हणून सोडूया...) हेच मोत्झार्टचे लिहिलेले अखेरचे सुर.
स्तवनाचे पुढचे भाग ऐकायचे असल्यास येथे सापडतील.
http://www.youtube.com/view_play_list?p=678DF3A1B39FF735
आता आस्वादाबद्दल मला पडलेला एक प्रश्न :
या सगळ्या प्रकारातील धर्मशास्त्र किंवा अखेरचा-न्याय(कयामत)-शास्त्र माझ्या विश्वासाचे नाही. ज्यांचा त्यावर विश्वास असेल त्यांना संगीताचा आस्वाद कितीतरी वेगळा मिळत असेल नाही का? देवळातही भजन ऐकताना भक्तीभावात तल्लीन झालेल्या श्रोत्याला अधिक आनंद मिळत असेल ना? मग विचार केला, की हे मोत्झार्ट (किंवा उत्तम भजन-गायक) तरी कुठे एवढे पुण्यवान असतात. आपल्या उत्तमोत्तम गायकांना बाई-बाटलीचा परहेज नसतो, तसा मोत्झार्टलाही नव्हता. मग तसा स्खलनशील गायकही तल्लीन होऊन निर्गुणात निस्संग होण्याची भजने गाऊ शकतोच ना? मग त्या धर्मशास्त्रात विश्वास नसलेल्या मलासुद्धा श्रोता म्हणून समरस होता यावे... पण कोणास ठाऊक हे पटत नाही. कदाचित आपल्या बाई-बाटली स्खलनशीलतेने पश्चात्ताप-दग्ध होऊनच मोत्झार्ट त्या करुणा भाकणार्या शब्दांना तसे प्रामाणिक संगीत देऊ शकला असेल.
शेवटी वाटले - असेना का माझा आस्वाद त्या धार्मिक ख्रिस्ती माणसापेक्षा लंगडा! त्या अंत्यदिनाच्या (कयामतीच्या) भीतीमध्ये आणि करुणेमध्ये हा एक संगीतमय तासभर समरस होण्यासाठी त्याला बाकी दिवसभरही तसेच "आपण-पापी-आहोत-पश्चात्तापा"ची झळ सहन करावी लागते. तो आस्वाद नाही मिळाला मला, तरी दिवसभराची मनःशांती मिळते तो सौदा चांगलाच! (पण हा माझा दृष्टिकोन. दिवसभराची झळ सोसून ते संगीत सच्चा आर्तपणे ऐकण्याचा सौदा दुसर्या कोणाला त्यांच्या दृष्टीने अमोलिक वाटत असेल.)
वाचने
5487
वाचनखूण
प्रतिक्रिया
23
सुरेख
In reply to सुरेख by सहज
असेच बोल्तो !
अभिजात संगीत
सुरेख आस्वाद ..
आस्वाद
समजायला
In reply to समजायला by रामदास
असेच वाटते...
धन्याशेठ, स
लेखावरुन
छान लेख.
सर्वांना धन्यवाद
शांतिस्तवन आवडले
In reply to शांतिस्तवन आवडले by चित्रा
ऑर्फच्या संगीतची ओल्ड स्पाइस जाहिरात- आणखी एक दुवा
In reply to ऑर्फच्या संगीतची ओल्ड स्पाइस जाहिरात- आणखी एक दुवा by धनंजय
माहिती नव्हते
परत ऐकले...
या लेखाच्या निमित्ताने
मोझार्ट चे रेक्वियम
In reply to मोझार्ट चे रेक्वियम by चित्रगुप्त
माझ्याकडे डायरेक्टर्स कट
एकही दुवा उघडला जात नाही.
In reply to एकही दुवा उघडला जात नाही. by चित्रगुप्त
यूट्यूबवर सर्च मारा "Mozart
In reply to यूट्यूबवर सर्च मारा "Mozart by बॅटमॅन
धन्यवाद
आज अचानक गाठ पडे
In reply to आज अचानक गाठ पडे by चित्रगुप्त
जुने धागे