मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

जॉर्जची कहाणी - George - Be Who you Are

मीअपर्णा · · दिवाळी अंक
H
जॉर्जची कहाणी - George - Be Who you Are
"यंदाचं आपल्या स्कूल डिस्ट्रिक्टचं OBOB बहुतेक रद्द होईल..." जेनी, माझ्या मुलाच्या मित्राची आई शाळांना सुट्ट्या लागताना भेटली तेव्हा सांगत होती. "तुला त्या वादग्रस्त पुस्तकाबद्दल माहीत असेलच." "नाही अजून" मी पुटपुटले. हे एक मॉरमॉन कुटुंब असल्याने काय वादग्रस्त असू शकेल याचा मला साधारण अंदाज आलाच. OBOB म्हणजे Oregon Battle of Books ही तिसरीनंतरच्या मुलांमध्ये पुस्तकवाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून घेतली जाणारी एक स्पर्धा. गेली दोन वर्षं माझा मुलगा त्यात भाग घेतोय. आमची गाडी अजून रिजनललादेखील गेली नाही; पण त्याला आवड म्हणून त्यातली एक-दोन पुस्तकं वाचणं, थोडंफार volunteering करणं हे मीही करते. या वर्षी मात्र शाळा सुरू व्हायच्या आधीच हा वर म्हटला तो नन्नाचा पाढा ऐकायला येऊ लागला आणि कुठलं पुस्तक काय वगैरे मनात यायला लागलं. तरीही प्रत्यक्ष पुस्तक हातात यायला सप्टेंबर उजाडलाच. George पुस्तकाचं इतकं साधं कव्हर मी पाहिलं नाही. फोटोत दाखवल्याप्रमाणे पांढऱ्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या रंगात रंगवलेलं प्रत्येक अक्षर आणि 'o'मधून अर्धवट दिसणारा एक लहान चेहरा. नीट पाहिलं तर हे रंग LGBT सपोर्टवाला झेंडा असतो तेच रंग. मागच्या पानावर Be Who you Areच्या 'o'मध्येही तोच चेहरा. त्याखालचा अल्पपरिचय वाचला आणि त्याने चित्र बरंचसं स्पष्ट झालं, शिवाय जेनीची प्रतिक्रियादेखील आठवली. पुस्तक वाचायला हवं हेही तितकंच पक्कंही झालं. OBOB रद्द वगैरे न झाल्याने मुलाने आधीच पुस्तक वाचलंही होतं. त्याला ते खूप नॉर्मल वाटलं ही बाब मला फार महत्त्वाची वाटली.

सध्या शब्दात सांगायचं किंवा भांडाफोड करायची, तर जॉर्ज नावाचा एक मुलगा जनसामान्यांसाठी मुलगा असला तरी स्वतःला मुलगा न समजता मुलगी समजत असतो. किंबहुना आपण मुलगीच आहोत याची तिला खातरी असते. आपल्या कुटुंबीयांना आपलं मत पटवून देतानाची ही अशा मुलीची कथा. संपूर्ण कथेत जॉर्जचा उल्लेख 'ती (she)' म्हणूनच केला आहे, हे उल्लेखनीय आहे. जॉर्ज न्यू यॉर्क राज्यात आपली आई आणि मोठा भाऊ स्कॉट यांच्याबरोबर राहत असते. तिचा बाबा फियोना नावाच्या एका बाईशी लग्न करून पेन्सिल्व्हेनियामध्ये राहत असतो. पुस्तकाच्या सुरुवातीला जॉर्ज मुलींची चित्र असणारी लपवलेली मासिकं पाहताना तिचा भाऊ स्कॉट दारावर टकटक करतो, कारण त्याला जॉर्जच्या खोलीतली बाथरूम वापरायची असते. तिला दार उघडायला वेळ लागतो, कारण ती मासिकं पुन्हा लपवायची असतात. पण रूम वापरून झाल्यावर स्कॉटला ती गंमत माहीत झाल्याने तो "I won't tell Mom. I will let you get back to thinking about girls" म्हणून चिडवून जातो, तेव्हा जॉर्जला खरं तर मी दुसरं कुणीतरी असायला हवं ही इच्छा होते. या मासिकातल्या मुली म्हणजे तिच्या मैत्रिणी होत्या. तिला प्रकर्षाने आपण त्यांच्यासारखं मुलगी असायला हवं असायचं. कधीतरी ही मासिकं फेकली पाहिजेत हेही तिला माहीत होतं, पण ते तितकं सोपं नव्हतं. नेहमीप्रमाणे शाळा सुरू असते आणि ई.बी. व्हाइट यांचं 'शार्लट्स वेब' हे पुस्तक मिस उदेल चौथीच्या वर्गात वाचून घेतात. शेवटच्या भागात शार्लट ही कोळी जेव्हा मरते, तेव्हा जॉर्जला अश्रू आवरत नाहीत. याबाद्दल त्याच्या वर्गात असणारे रिक आणि जेफ त्याची टिंगलही करतात. नंतर जर्नलमध्ये याबद्दल मुलांना लिहायला लावताना बाई जवळ येऊन जॉर्जची चौकशी करतात. शाळेची एक प्रथा म्हणजे दर वर्षी वसंत ऋतूमध्ये पहिली ते चौथीची मुलं एकच पुस्तक वाचतात आणि चौथीचे दोन्ही वर्ग मिळून त्या पुस्तकाचं नाटुकलं खालच्या वर्गांसाठी सादर करतात. यंदा तो मान 'शार्लट्स वेब' या पुस्तकाला जातोय. पुढच्या आठवड्यात नाटकाची पात्रनिवड होणार म्हणून वीकांताला त्याची तयारी करण्यासाठी जॉर्ज आणि त्याची बेस्ट फ़्रेंड 'केली' तिच्या घरी भेटतात. त्याआधी तो केलीला आपलं रहस्य सांगण्याआधी नाटकाच्या विषयामुळे विल्बर (Wilbur, the dirty pig) ही पुरुष भूमिका करण्यापेक्षा शार्लटची स्त्री भूमिका करायची इच्छा प्रकट करतो. केलीचं वय पाहता तिला त्यात काही विशेष वाटत नाही. तू ये बिनधास्त, आपण तयारी करू आणि आपल्या बाई तुला तीच भूमिका देतील असा विश्वास ती जॉर्जवर दाखवते. प्रत्यक्षात जॉर्जला ती भूमिका मिळत नाहीच, शिवाय बाईंचा विश्वासघात केल्याचा ओरडा, रिक आणि जेफचे टोमणे हे सर्व होतं. बाई जॉर्जला विल्बर किंवा दुसरी कुठलीही पुरुष भूमिका द्यायला तयार असतात, पण जॉर्ज मागच्या पटात मदतनीस म्हणून राहतो. शार्लटची भूमिका केलीला जाते. केलीला वाटतं, जॉर्जला शार्लटची भूमिका मिळाली नाही म्हणून आता ती आपल्याशी बोलणार नाही. पण त्याच वेळी 'मी मुलगी असल्यासारखं मला वाटतं' हे आपलं गुपित जॉर्ज केलीला सांगतो. त्या वेळचा त्याचा केलीशी संवाद उल्लेखनीय आहे. या वयातली मुलं काय विचार करत असतील त्याचा लेखिकेने बरोबर विचार केला आहे. त्याच वेळी जॉर्जच्या आईला जॉर्जची ती मासिकं मिळतात आणि ती जॉर्जला सज्जड दम देऊन सगळी पुस्तकंआई घेऊन टाकते. आता तिच्या या आभासी मैत्रिणीही नाहीशा होतात. जॉर्ज दु:खी होते, पण आईला आपल्या मनातला गोंधळ सांगायची वेळ अजून आली नसते. मग ती जेव्हा एका प्रसंगावरून तो गोंधळ आईला सांगते, तेव्हा तीही केलीप्रमाणे ते चटकन स्वीकारते का? जॉर्जला आईला समजावण्यासाठी किंवा स्वतःसाठी शार्लटच्या भूमिकेचा वापर कसा होतो? यात शाळेतल्या बाई किंवा मुख्याध्यापिका यांची काय मतं असतात? या सर्व प्रश्नांची उत्तर शोधायची, तर 'जॉर्ज' हे पुस्तक मुळातून वाचायला हवं. या पुस्तकाची लेखिका ऍलेक्स जिनो हिचं हे पहिलंच पुस्तक आणि तेही २०१७ साली प्रसिद्ध झालेलं आहे. याला लहान मुलांच्या पसंतीचं लेखकाच्या पदार्पणाचं पारितोषिक मिळालं आहे. (Winner of the Children's Choice Book Award for Debut Author of the Year.) आणखीही काही पारितोषिकं त्याला आहेत. इतर पुस्तकात न पाहिलेली एक गोष्ट म्हणजे पुस्तक संपल्यावर लेखिकेची छोटेखानी मुलाखतही आहे. ती स्वतः genderqueer आहे. म्हणजे मुलगाही नाही आणि मुलगीही नाही. तिला हा शब्दही वयाच्या एकोणिसाव्या वर्षी कळला. तिने हे पुस्तक लिहिलं, जे ती लहान असताना वाचायला तिला आवडलं असतं. जॉर्जला 'मेलिसा' - जे तिचं आवडतं नाव आहे त्याने हाक मारा किंवा 'ती' असा उल्लेख करा, पण 'तो' नाही, असा तिचा आग्रह आहे. मेलिसा ही एक ट्रान्सजेंडर मुलगी आहे. ती मुलगी म्हणून मोठी होणार, तेच तिला तिचं शरीर यात अडकलं आहे (body is trapped or stuck in) वगैरे म्हणू नका, हे ती आवर्जून सांगते. आणखीही माहितीपूर्ण प्रश्नांची उत्तरं यात आहेत. हे पुस्तक ज्या जॉर्जबद्दल लिहिलेलं आहे, ती या दशकातील असल्यामुळे तिला अशा शरीराविषयी आणि इतर माहिती आंतरजालावर खुली आहे, हेही इथे लक्षात घेणं आवश्यक आहे. एक आई म्हणून मी हे पुस्तक वाचलं, कारण माझ्या मुलाच्या वयाच्या मुलामुलींनी जेंडर समजून घेताना समाजमनाचं भान ठेवायला हवं हे जे मला शब्दात शिकवता येणार नाही, ते अशी पुस्तकं समजावू शकतील का? मुलांना आतापासून या विषयातील किती माहिती कळायला हवी म्हणजे त्यांचं बालपण न हरवता त्यांना ही माहितीही राहील, हे मला हवं होतं. तिसरी ते पाचवीपर्यंतच्या मुलांनी वाचावं म्हणून OBOBच्या स्पर्धेसाठी हे पुस्तक लावलं आहे. मला वाचताना काही वावगं वाटलं नाही, उलट जॉर्जची मेलिसा होतानाची घालमेल कळली आणि तशीच तिच्या आईचीही. या स्पर्धेनिमित्ताने बरीच मुलं हे पुस्तकं वाचतील आणि आपली मतं बनवतील हे यशच आहे. वर उल्लेखलेली जेनी मात्र तिच्या धार्मिक भावनांच्या विरोधात असणारं हे पुस्तक तिच्या मुलाला वाचायला देणार नाही, हेही जाताजाता.
H
दिवाळी अंक वर्ष

वाचने 40759 वाचनखूण प्रतिक्रिया 34

तुषार काळभोर Tue, 11/06/2018 - 17:30
शाळकरी मुलांना अवांतर वाचन म्हणून समलैंगिकता विषयांचे पुस्तक वाचायला देणे, कौतुकास्पद. (अमेरिकेतसुद्धा काही अतिसंवेदनशील घटक असतीलच ना, आमच्या मुलांवर अशाने वाईट परिणाम होतील. या पुस्तकांवर बंदी घाला. वगैरे?)

In reply to by तुषार काळभोर

समाजाच्या बदलाचे दर्शन घडवणारा आणि त्यासंबंधीच्या एका पुस्तकाची ओळख करून देणारा लेख आवडला. शाळकरी मुलांना अवांतर वाचन म्हणून समलैंगिकता विषयांचे पुस्तक वाचायला देणे, कौतुकास्पद. पुस्तकातले उदाहरण समलैंगिकतेचे नसून ट्रान्ससेक्शुअ‍ॅलिटीचे (?मराठी शब्द) आहे. समलैंगिकता म्हणजे समान लिंगांच्या व्यक्तीमधील आकर्षण/संबंध. ट्रान्ससेक्शुअ‍ॅलिटीमध्ये शारिरीकदृष्ट्या एक लिंग (पुरुष/स्त्री) असलेल्या व्यक्तीच्या मनातल्या भावना दुसर्‍या लिंगाप्रमाणे (अनुक्रमे स्त्री/पुरुष) असतात. (मुलांचे नक्की वय काय याचा अंदाज लेखावरून येत नाही, तरी) या विषयावरचे पुस्तक शाळेच्या वयाच्या मुलांना वाचन-मननासाठी देणे, हे कौतुकास्पद आहे. अश्याने मुलांच्या मनातील अनेक गैरसमज आणि ग्रह मुळापासून दूर व्हायला नक्कीच मदत होईल. अमेरिकेतसुद्धा काही अतिसंवेदनशील घटक असतीलच ना, आमच्या मुलांवर अशाने वाईट परिणाम होतील. या पुस्तकांवर बंदी घाला. वगैरे? याबाबत पूर्ण सहमती. हा प्रकार वादग्रस्त झाला नाही याबद्दल आश्चर्य आहेच. (तसा लेखात मर्मन पंथाचा उल्लेख आला आहेच.)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

चित्रांना पब्लिक अ‍ॅक्सेस नसल्याने ते दिसत नाहीत. पब्लिक अ‍ॅक्सेस देऊन त्यांच्या नव्या लिंक्स टाकाव्या लागतील. लिंक्स लेखात टाकणे शक्य नसल्यास इथेच एका प्रतिसादात टाकल्यास, सासंम किंवा संम सदस्य चित्रे लेखात टाकू शकतील.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

मीअपर्णा Mon, 11/12/2018 - 06:02
नमस्कार डॉ. सुहार म्हात्रे. मी चित्रे इमेलने पाठवली होती. तरी ती का समाविष्ट झाली नाहीत माहित नाही. काही दिवसांनी हीच पोस्ट ब्लॉगवर टाकेन तेव्हा तिथेच पाहायचे आमंत्रण देते :) http://majhiyamana.blogspot.com/

In reply to by मीअपर्णा

अभ्या.. Wed, 12/05/2018 - 23:25
पूर्वी गणेशा नावाच्या आयडीला लेखातले फोटो दिसायचेच नाहीत. इतर सदस्यांना दिसले तर गणेशला मात्र दिसायचे नाहीत. तेंव्हापासून फोटो दिसत नसले की गणेशा झाला म्हणायची पध्दत आहे.

In reply to by अभ्या..

मीअपर्णा Tue, 12/11/2018 - 00:56
हा हा हा , अभ्या. आधी माझाही “गणेशा”च झाला होता. गेले काही दिवसांपासून फोटो दिसायला लागले. संपादकांचे (आणि तुमचे) आभार.

In reply to by अभ्या..

मीअपर्णा Tue, 12/11/2018 - 00:56
हा हा हा , अभ्या. आधी माझाही “गणेशा”च झाला होता. गेले काही दिवसांपासून फोटो दिसायला लागले. संपादकांचे (आणि तुमचे) आभार.

In reply to by मीअपर्णा

वर लिहिल्याप्रमाणे, चित्रांना पब्लिक अ‍ॅक्सेस नसल्याने ते दिसत नाहीत. पब्लिक अ‍ॅक्सेस देऊन त्यांच्या नव्या लिंक्स टाकाव्या लागतील. १. पब्लिक अ‍ॅक्सेस नसलेल्या लिंक्स वापरून चित्रे मिपा किंवा इतरत्रही दाखवता (डिस्प्ले करता) येत नाहीत. २. पब्लिक अ‍ॅक्सेस दिल्यावर लिंक्समध्ये बदल होतो. त्यामुळे, जुन्या लिंक्सच्या जागी नवीन लिंक्स टाकल्यावरच चित्रे दिसू लागतात.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

मीअपर्णा Mon, 11/12/2018 - 05:52
धन्यवाद पैलवान आणि डॉ. सुहास म्हात्रे. पुस्तकावर बंदी वगैरे घालावी लागेल इतके डिटेल्स नाही आहेत. फक्तच असं असू शकतं याबाबत आहे. पण ओबॉब मधून काढावं किंवा स्कूल डिस्ट्रिक्टने ओबॉबमधून बाहेर पडावं अशा अर्थाचं काही सुरु होतं. मग शांत झालं. पण मी लेखात उल्लेख केला आहे त्याप्रमाणे जेनी आणि तत्सम पालक हे पुस्तक वाचणे आणि मुलांना वाचू देणे करणार नाहीत. आपल्या अमूल्य प्रतिक्रियेबद्द्ल धन्यवाद.

In reply to by टर्मीनेटर

मीअपर्णा Mon, 11/12/2018 - 05:53
आभारी आहे, टर्मीनेटर. संपादकांना फोटो मेलने पाठवले होते. काय गडबड आहे माहित नाही. मी नंतर ब्लॉगवर टाकेन :)

अनिंद्य Sat, 11/10/2018 - 16:10
@ मीअपर्णा, वेगळ्या विषयावरचे लेखन आवडले. तिसरीच्या विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लावण्यासाठीची OBOB स्पर्धा हा कन्सेप्ट फार आवडला. त्यात George - Be Who you Are सारखे पुस्तक ठरवण्याचा धाडसी निर्णय - it calls for a lot of courage ! फोटो मात्र दिसले नाहीत.

In reply to by अनिंद्य

मीअपर्णा Mon, 11/12/2018 - 05:56
धन्यवाद अनिंद्य. अतिशय वादग्रस्त विषयावरचं पुस्तक स्पर्धेसाठी लावायचा निर्णय धाडसीच आहे. ही स्पर्धा मला फार आवडत नाही खरं म्हणजे. पुस्तकावरचे प्रश्न असतात म्हणजे मुलांनी घोकंपट्टी करावी का? पण एक आहे त्यानिमिताने काही नवे लेखक, नवे विषय मुलं सहजी वाचतात. मागच्या वेळी एक लेखक आवडला म्हणून मग वाचनालयात जाऊन त्यांची इतर पुस्तकंही मुलाने वाचली होती हे मला आवडलं. सो नो कंप्लेंट्स :)

मित्रहो Sun, 11/11/2018 - 20:36
अशा विषयांवरचे पुस्तक तिसरी चौथी तील मुलांना कौतुकास्पद आहे. या वयातील मुलांना खर्च हा विषय समजतो. थोडं उशीरा म्हणजे सहावी सातवी च्या मुलांना असते तर बरे झाले असते?

In reply to by मित्रहो

मीअपर्णा Mon, 11/12/2018 - 05:59
नमस्कार मित्रहो आणि आभार. तिसरी चौथीसाठी तसं पुढचं आहे पण पाचवीच्या मुलांना समजायला हरकत नाही. जितका व्हायोलन्स स्क्रीनवरुन मुलं पाहतात त्यापुढे हे पुस्तक परवडलं असं मला वाटतं :)

पिशी अबोली Sun, 11/25/2018 - 22:18
लेख आवडला. नुसता पुस्तकपरिचय न करवता स्पर्धेबद्दलच्या चर्चेच्या आणि मुलाच्या प्रतिक्रियेच्या अनुषंगाने त्याला contextualize करणं अजूनच आवडलं.

मीअपर्णा Sun, 12/02/2018 - 07:32
धन्यवाद पिशी अबोली. मुलामुळेच मी हे पुस्तक वाचलं. तो उल्लेख तसा अपरिहार्यच होता. :)

दिल्याबद्दल धन्यवाद. मुलांना ब र्‍याच गोष्टी तशाही जालावर किवा टि. व्ही. वर उपलब्ध असतातच. फक्त त्यांचे योग्य आकलन त्यांना होईलच असे नाही. तिथे पालकांची भुमिका महत्वाची ठरते.