जुना वाडा
एक जुना वाडा
भंगलेले तुळशी वृंदावन
विरलेली स्वप्नं
अन् उदास माझं मन
परसातल्या चाफ्याला
आता येत नाहीत फुलं
अंगणात कधीच
खेळत नाहीत मुलं
ओसरीवरचा चौफाळा
वाऱ्यासोबत रडणारा
दारातील पिंपळ
दिवसभर झडणारा
गंजलेले तावदान
कुजलेली खिडकी
धुळीने माखलेली
उतरंडीची मडकी
माळवदातील घरटं
चिमणीने सोडलंय
दारावरचं आडनाव
केंव्हाच मोडलंय