भारत-म्यानमार फाळणी

केदार भिडे's picture
केदार भिडे in जनातलं, मनातलं
14 Feb 2026 - 3:56 pm

वर्षाच्या सुरुवातीला दोनदा भारत आणि म्यानमार यांच्या स्वातंत्र्यपूर्व काळातील संदर्भ आले आणि मी सुद्धा नेमके सॅम डॅलरिम्पलचे Shattered Lands वाचायला घेतलेले होते. Eko या अतिशय सुंदर मलयाळम चित्रपटात त्यातील काही कथानक तत्कालीन बर्मा प्रांतात घडले आहे. तसेच Family Man Season ३ मध्ये मणिपूर येथे राहणाऱ्या काही तामिळ भाषिक लोकांचा उल्लेख आलेला आहे. भारत आणि पाकिस्तान यांची १९४७ साली झालेली फाळणी आणि त्यातून लाखो लोकांची झालेली वाताहत सर्वांना परिचयाची आहे. मात्र ब्रिटनचे भारतातील साम्राज्य आजच्या भारत-पाकिस्तानच्याही बाहेर पसरलेले होते आणि १९३७ त्याच्या पासून विविध फाळण्या होत आज कितीतरी देश अस्तित्वात आलेले आहेत. त्याचाच मागोवा सॅम डॅलरिम्पल यांच्या पुस्तकात आहे. आजचा नेपाळ, भूतान, म्यानमार, ओमान, येमेन, संयुक्त अरब अमिराती, कतार, बहारीन आणि अर्थातच बांगलादेश-पाकिस्तान हे या ना त्या प्रकारे दिल्लीतील साम्राज्याशी किंवा ब्रिटिश भारताशी जोडलेले होते. आजच्या येमेन मधील एडनचा कारभार अगदी बॉम्बे प्रेसिडेन्सी मधून चालत होता. हा सर्व प्रदेश एकाच साम्राज्याचा भाग असल्याने अर्थातच एवढ्या मोठ्या प्रदेशात लोकांची मुक्त ये जा चालू होती. डॉ नारळीकर यांनी त्यांच्या चरित्रात इंग्लंडला जहाजाने जात असताना एडन येथे एक मराठी अधिकारी भेटल्याचा उल्लेख केला आहे. अर्थात, नारळीकर यांची ही भेट १९४७ नंतरची मात्र या भागातील ब्रिटिश शासन १९४७ नंतरसुद्धा चालू राहिले.
म्यानमारमधील भारतीय
एकोणिसाव्या शतकाच्या मध्यावर आजचा म्यानमार तत्कालीन ब्रिटिश वसाहतवादी आक्रमणात सापडला आणि तेव्हापासून ब्रिटिश भारताचा एक प्रांत झाला. त्यामुळेच भारतीयांची मुक्त ये-जा सुरु झाली. भारतातील लोकांना म्यानमारमध्ये जाण्याची परिस्थिती निर्माण झाली ती म्यानमारमधील वाढत्या तांदूळ उत्पादनामुळे. अमेरिकेतील यादवी युद्धामुळे तिथून पुरवल्या जाणाऱ्या तांदुळावर परिणाम झाला. त्यामुळे तांदूळ उत्पादनासाठी नव्या प्रदेशाच्या शोधात ब्रिटिश होतेच. त्यातूनच म्यानमारमध्ये तांदूळ लागवडीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. त्यामुळे तेथील शेतात कामगार म्हणून जाण्यासाठी भारतीयांनी सुरुवात केली, त्यात बंगाल, बिहार, तामिळनाडू आणि आंध्र येथील लोकांचा मुख्य समावेश होता. त्याकाळी बंगाल-बिहार येथील लोकांना जमिनीमार्गे म्यानमार मध्ये जाणे शक्य होते आणि समुद्रमार्गे जायचे तर चेन्नई येथून रंगूनला जाता येई त्यामुळे वरील प्रदेशातील कामगारांची संख्या जास्ती राहिली. यातूनच तामिळनाडू मधील चेट्टीयार जातीतील लोकांनी आपला बँकिंग व्यवसाय थाटला. त्यातूनच इंडियन ओव्हरसिज बँक आणि इंडियन बँक यांची स्थापना झाली. १९३१ साली १.४ करोड लोकसंख्या असलेल्या म्यानमारमध्ये १० लाखाहून अधिक भारतीय वास्तव्यास होते. म्यानमारमध्ये त्यावेळी बोलल्या जाणाऱ्या भारतीय भाषांची आकडेवारी उपलब्ध आहे. त्यात बंगाली, तामिळ आणि तेलगू यांची संख्या अधिक असून १५ हजार पंजाबी बोलणाऱ्या लोकांचाही समावेश आहे. म्यानमारमधील तत्कालीन अर्थव्यवस्थेत अगदी मजुरांपासून वरिष्ठ पदांपर्यंत भारतीय लोक प्रस्थापित झालेले होते.
भारत-म्यानमार फाळणी
१९२८ साली भारतात आलेल्या सायमन आयोगासमोर म्यानमार भारतापासून वेगळा करावा का हा एक प्रश्न होता. सायमन आयोगाने भारतात केलेल्या प्रवासाचा नकाशा डॅलरिम्पल यांच्या पुस्तकात दिलेला आहे. भारतातील परिस्थिती जाणून घेण्यासाठी पश्चिमेला एडन पासून पूर्वेला रंगून, मंडाले पर्यंत त्यांनी प्रवास केला. त्यावेळी म्यानमारमध्ये फाळणीच्या मागणीलाही पाठींबा होता. वर सांगितल्याप्रमाणे विविध क्षेत्रात नोकऱ्या पटकावलेले भारतीय, चेट्टियारांसारखे बँकर, अन्य व्यापारी ही सुद्धा कारणे फाळणीच्या मागणीसाठी होती. १९२९ साली महात्मा गांधीजींनी रंगूनला भेट दिली. तिथल्या काँग्रेसचे संस्थापक प्राणजीवन मेहता हे गांधीजींचे जुने मित्र होते. तसेच तिथल्या गुजराती भाषिकांच्या एका सभेत गांधीजींनी म्यानमार आपल्या भारतवर्षाच्या प्रतिमेत तसाही येत नसल्याने त्याने वेगळे होणेच योग्य असल्याचे म्हटले (असं डॅलरिम्पल सांगतो). शेवटी १९३७ साली भारत-म्यानमार यांची फाळणी झाली. तत्पूर्वी अमेरिकेतील आणखी एक घटना म्यानमार मधील अर्थव्यवस्थेसाठी मारक ठरली. १९३० च्या दशकात आलेल्या महामंदीमुळे तांदुळाचे भाव कोसळले. याच वेळी संपूर्ण म्यानमारमध्ये ब्रिटिश शासनाविरोधी दंगली घडून आल्या. या दंगलींचा फटका तिथे वास्तव्यास असणाऱ्या भारतीय लोकांनाही बसला. वर उल्लेख केल्याप्रमाणे चेट्टीयार लोकांनी थाटलेल्या बँकिंगमुळे त्यांच्या आस्थापनांची नासधूस करण्यात आली आणि भारतीय कामगारांच्या वस्त्यांवरही हल्ले झाले. अशा परिस्थितीतून पुढे भारतीय लोकांनी हळूहळू म्यानमार सोडून आजच्या भारताची वाट धरायला सुरुवात केली. तिथल्या भारतीयांसाठी प्रत्यक्ष फाळणीपेक्षा मोठी घटना घडली ती म्हणजे दुसऱ्या महायुद्धाचा भाग म्हणून जपानचा म्यानमारवर हल्ला. जपानने १९४१ डिसेंबर मध्ये रंगूनवर हवाई हल्ले करण्यास सुरुवात केली. जपानने अजून काही महिन्यात संपूर्ण म्यानमार पादाक्रांत करून टाकला. युद्धामुळे सपाट झालेली अर्थव्यवस्था आणि ब्रिटिश शासनाचे संरक्षण नाहीसे झाल्यामुळे भारतीयांविरुद्ध वाढलेले हल्ले यामुळे भारतीयांनी मोठ्याप्रमाणात म्यानमार सोडला. सुमारे ५ लाख लोकांनी म्यानमार सोडला मात्र त्यातील जवळ जवळ अर्धे लोक वाटेतच मृत्युमुखी पडले. नेहमीच समुद्रमार्ग बंद झाल्यामुळे अनेकांना आजच्या भारत-म्यानमार सीमेकडे मिळेल त्या प्रकारे प्रसंगी पायी प्रवास करून घनदाट जंगले, नद्या पार करतभारतात प्रवेश करावा लागला. एवढे होऊनही कितीतरी भारतीय मलेशियात राहिले. दुसऱ्या महायुद्धाचा पुढचा अध्याय म्हणून म्यानमारमधून जपान्यांना पळवून लावण्यासाठी म्यानमारच्या भूमीला पुन्हा एकदा युद्ध पाहावे लागले. स्वतंत्र मलेशियात नंतर भारतीय लोक आणखीनच बाहेर फेकले गेले, राष्ट्रीयीकरण, चालनावरील नियंत्रणे अशा प्रकारांमुळे अनेकांना आपले व्यवसाय, संपत्ती सोडून भारताकडे यावे लागले.
स्थलांतरित लोक
सॅम डॅलरिम्पल म्हणतो त्याप्रमाणे फाळणीचा हा अध्याय आज भारतीयांच्या स्मृतीत नाही. डॅलरिम्पलने वयाच्या १७ व्या वर्षी एडन येथे गेलेल्या धीरूभाई अंबानींची गोष्ट आपल्या पुस्तकात सांगितली आहे. नंतर तिथेही म्यानमारसारखा प्रकार झाल्याने अनेक भारतीयांना परत यावे लागले. संदर्भात दिलेल्या एका लेखात [४] आजच्या आफ्रिका खंडातील भारतीयांशी झालेल्या प्रकाराबद्दल लिहिलेले आहे. एकूणच नव्या आर्थिक संधींचा शोध घेत लोकांचा प्रवास असा चालूच राहिलेला आहे. आज यातील कोणतेही प्रदेश पूर्वीप्रमाणे आकर्षक राहिलेले नाहीत. त्यांची जागा आता पाश्चात्य जगातील विकसीत देशांनी घेतलेली आहे. मी ज्या गावात राहतो तिथेही अगदी गुजराती सोडून अन्य 6 राज्यातील लोक व्यवसायानिमीत्त वास्तव्यास असलेले मी पहिले आहेत. हा शेवटचा परिच्छेद लिहिण्याचे कारण म्हणजे मराठी सोशल मीडियामध्ये मला बऱ्याचदा अशा परप्रांतातून आलेल्या आणि यशस्वी झालेल्या लोकांबद्दल राग दिसून येतो. माझे वैयक्तिक मत असे आहे की ज्याने ज्याने आपले गाव सोडले तो यशस्वी होण्याची शक्यता अधिक. नाईलाज म्हणून किंवा मुद्दाम आपले राहते घर/गाव सोडायचे धाडस जे लोक दाखवतात त्या धाडशी वृत्तीमुळेच ते अन्य ठिकाणी यशस्वी होण्याची शक्यता वाढते. त्यातही काही अपप्रवृत्ती, लबाडी असू शकते आणि त्याकरता विरोध जरूर केला पाहिजे मात्र अशा परप्रांतातून (आपल्याच देशातील) सरसकट रोष बाळगणे आवश्यक नाही. तसेच मध्येच आपल्या गावातील जमिनी परप्रांतीयांना विकणार नाही असे ठराव करणाऱ्या गावांच्या बातम्याही येतात. हल्लीच एका नगरपरिषदेने न.प. हद्दीबाहेरील व्यापाऱ्यांना शहरात यायला बंदी घातल्याचे वाचले. न.प. हद्दीबाहेरील भागही महाराष्ट्रात आहे. असे ठराव कायदेशीर आहेत का आणि किती परिणामकारक आहेत याचा अंदाज नाही. तसेच काही पर्यावरणवादी कार्यकर्तेही अशा प्रकारच्या विरोधात उतरलेले दिसतात. अनधिकृत टपरी/दुकान मराठी माणसाचे असले तर मग असुदे परप्रांतीयांचे नको असा मर्यादित दृष्टिकोन कधी कधी पाहायला मिळतो. मात्र अशा प्रकारांतून मराठी भाषिकांचे हीत साधले जाईल याबद्दल शंका येते. अशा प्रकारातून येऊ घातलेल्या आर्थिक समृद्धीसमोर आपण आपली दारे बंद करून घेत आहोत असे वाटते.
मुंबई नावारूपास येण्यापूर्वी सुरत हे अतिशय महत्वाचे बंदर होते ज्यातून आंतरराष्ट्रीय व्यापार चालत असे. छत्रपती शिवाजी महाराजांनी दोनदा सुरतेवर हल्ला उगीच केला काय? अशा आंतरराष्ट्रीय व्यापाराशी संबंध आलेले गुजराती लोक पुढे मुंबईत आले नसतील काय आणि देशाच्या अन्य भागात गेले नसतील काय? मुळातच त्या वातावरणातून आल्यामुळे ते अन्य लोकांपेक्षा यशस्वी ठरले तर नवल ते काय. मारवाडी लोकांबद्दलही असे म्हणता येईल. आपली स्पर्धा (healthy competition) ही या अशा काही शतकांचा अनुभव असलेल्या लोकांशी आहे आणि केवळ राग बाळगून आपण त्यात यशस्वी होणार नाही. अर्थात त्या लोकांचाच काय तो फायदा होत आहे आणि आम्ही लुटले जात आहोत हा व्यापाराविषयी zero- sum दृष्टिकोनच मुळात खोटा आहे पण तो वेगळा विषय होईल. आज अमेरिकेत बोलल्या जाणाऱ्या भाषांच्या आकडेवारीवर पहिली तर असे दिसेल की गुजराती बोलणाऱ्या लोकांची संख्या तमिळ तेलगू बोलणाऱ्या लोकांपेक्षा अधिक आहे. मराठी बोलणाऱ्यांची संख्या इथेही तामिळ आणि तेलुगू बोलणाऱ्या लोकांपेक्षा कमीच आहे. म्हणजेच आज जे प्रदेश आर्थिक संधिसाठी खुणावत आहेत त्यातही आपल्या इथल्या लोकसंख्येच्या प्रमाणात आपण भाग घेतलेला नाही. अर्थात तसे असले तरी महाराष्ट्र देशातील एक संपन्न आणि प्रगत राज्य आहे हे नक्की. इथून पुढे आणखी प्रगती करायची असेल तर राग सोडून देणे आणि आत्मचिंतन करणे, बंदिस्तपणा नाकारणे, जगभर जाण्याची तयारी दाखवणे आवश्यक असल्याचे वाटते.
संदर्भ
[1] Shattered Land: Five Partitions and Making of Modern Asia, Sam Dalrymple
[2] Indian Migrants in Myanmar: Emerging Trends and Challenges, Medha Chaturvedi, India Centre for Migration, Ministry of Overseas Indian Affairs
[3] https://frontline.thehindu.com/books/nattukottai-chettiars-banking-histo...
[4] https://rshinde.substack.com/p/why-do-so-many-countries-harbor-anti
[5] Language Use in the United States: 2019, American Community Survey Reports, Sandy Dietrich and Erik Hernandez, 2022

मांडणीप्रकटन