भारतीयांची वैचारिक बैठक- भोगातून त्यागाकडे .....

नागनिका's picture
नागनिका in जनातलं, मनातलं
12 Feb 2026 - 11:47 am

काही दिवसांपासून एपिस्टन फाईल्स चर्चेत आहे आणि या संबधित असणारी छायाचित्रे व व्हिडिओने तर समाज माध्यमांवर एकच धुमाकूळ घातला आहे. यामध्ये नामांकित व्यक्ती असण्याची चर्चा आजूबाजूला होताना दिसत आहे. जेफ्री एपिस्टन नावाचा कोणी एक धनाढ्य व्यक्ती एका खाजगी बेटावर लहान मुलींची तस्करी करत होता. धनाचे प्रलोभन दाखवून अल्पवयीन मुलींचे या बेटावर लैंगिक शोषण केले जायचे. ३० लाख कागदपत्रे असलेल्या या फाईलमध्ये समाजातील मान्यवर व्यक्तीची नावे असली तरी ही मंडळी दोषी असल्याचे अजूनतरी सिद्ध झाले नाही. या कागदपत्रांमध्ये ‘cannibalism’ या शब्दाने खळबळ माजवली आहे. Cannibalism म्हणजे स्वजातीचे भक्षण करणे. या प्रकरणातील व्यक्ती नरमांस भक्षण करत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. हे भयानक कृत्य का केले गेले असेल हा प्रश्न राहून राहून सतत मनात येतो. असे करून यातील दोषी व्यक्तींना कोणते सुख मिळाले? खाणे, पिणे आणि शरीरसुख उपभोगणे हेच मानवी सुखाचे टोक आहे का?

अशा घटनांमुळे पाश्चात्यांच्या भोगवादाची परिसीमा लक्षात येते. आणि मनुष्याच्या शाश्वत सुखाची संकल्पना मांडणाऱ्या भारतवर्षामध्ये आपण जन्म घेतल्याचा अभिमान वाटतो ! पाश्चात्यांच्या दृष्टीने मनुष्याच्या अंतरिम सुखाची संकल्पना ही इंद्रियसुखावर येऊन थांबते. याउलट भारतीय तत्वचिंतनामध्ये सुख ही संकल्पना केवळ भौतिक किंवा इंद्रियजन्य आनंदापेक्षा आत्मानंदाचा विचार करते. यामध्ये सुखाचा विचार अधिक सूक्ष्म, खोल आणि शाश्वत पातळीवर केला गेला आहे. इंद्रिय सुखापेक्षा आत्मिक सुखावर भारतीय तत्वज्ञान भर देते. आत्मिक सुख म्हणजे आत्मस्वरूपाच्या अनुभूतीतून प्राप्त होणारे सुख. उपनिषदांमध्ये आत्मा हा नित्य, शुद्ध आणि आनंदस्वरूप मानला आहे. जेव्हा मनुष्य देह, मन आणि बुद्धी यांपलीकडे जाऊन आत्मस्वरूपाची ओळख करून घेतो, तेव्हा त्याला आत्मिक सुखाची अनुभूती येते.
‘कोहम्’ (मी कोण आहे?) पासून सुरु झालेला प्रवास ‘सोहम्’ (मी परमात्मा आहे) पाशी येऊन थांबतो. हा प्रवास बाह्य जगातून अंतर्जगाकडे नेणारा आहे. या प्रवासाच्या प्रत्येक टप्प्यावर सुखाची एकेक पातळी मनुष्य गाठत जातो. या सुखाची अनुभूती इंद्रियांनी अनुभवता येत नाही; ती अंतःकरणाच्या शुद्ध अवस्थेत प्रकट होते

भगवद्गीतेत श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात..
“सुखमात्यन्तिकं यत्तद् बुद्धिग्राह्यमतीन्द्रियम्।”
म्हणजे मनुष्याचे जे परमसुख आहे ते बुद्धीने जाणता येते, ते इंद्रियांपलीकडचे आहे. ज्ञानयोग, कर्मयोग आणि भक्तीयोगाचे सोपान चढून या सुखासनावर मनुष्य बसू शकतो.

कठोपनिषद सांगते —
“श्रेयश्च प्रेयश्च मनुष्यमेतः।”

(मनुष्यापुढे श्रेयस आणि प्रेयस असे दोन मार्ग असतात.)

प्रेयस म्हणजे इंद्रियसुख; श्रेयस म्हणजे आत्मिक कल्याण व आनंद. आत्मिक सुख हे श्रेयस मार्गाने मिळते. वेदांनुसार अज्ञान हे दुःखाचे मूळ आहे, आणि ज्ञान म्हणजे आत्मिक सुखाचा स्रोत. श्रेयस मार्ग खडतर असला तरी हा मार्ग माणसाला आत्मज्ञानी बनवतो. प्रेयसातच अडकून राहणारे अंतिमतः भोगवादीच बनतात.

ईशावास्य उपनिषद म्हणते
विद्यां चाविद्यां च यस्तद्वेदोभयं सह।
अविद्यया मृत्युं तीर्त्वा विद्ययाऽमृतमश्नुते॥

(जो विद्या व अविद्या दोन्ही जाणतो, तोच खऱ्या अर्थाने जीवनात यशस्वी होतो. अविद्येने तो मृत्यूवर विजय प्राप्त करतो तर विद्येने मोक्षपदास जातो.)

येथे अविद्या म्हणजे जीवन व्यवहारासाठी लागणारे भौतिक ज्ञान आणि विद्या म्हणजे आत्मस्वरूपाची जाणीव करून देणारे आत्मज्ञान. कसे जगायचे याचे उत्तर अविद्या देते. का जगायचे याचे उत्तर विद्या देते. याचा समतोल ज्याला राखता आला त्याला शारीर मर्यादा राहत नाहीत.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतीय संस्कृती भौतिक सुख नाकारत नाही, तर त्याला मर्यादा घालते. वेद देखील भौतिक सुखाला नाकारत नाहीत, पण ते अपूर्ण आणि क्षणभंगुर असल्याचे स्पष्ट करतात. धर्म, अर्थ, काम, मोक्षादि चार पुरुषार्थांची संकल्पना भोग नाकारत नाहीत तर धर्माच्या चौकटीत राहून मोक्ष पदापर्यंत पोहोचवतात.

भारतीय समाजमनावर आणि एकंदरीत येथील जीवनशैलीवर या तत्वज्ञानाचा मोठा प्रभाव आहे. आणि त्यामुळेच कोणतेही कुकर्म करताना भारतीय मन शंभर वेळा विचार करते . आजच्या धावपळीच्या, स्पर्धात्मक आणि तणावपूर्ण जीवनात भारतीय तत्वचिंतन अधिकच अर्थपूर्ण ठरते. पाश्चात्य भोगवादाच्या तुलनेत भारतीय त्यागवाद नक्कीच सरस ठरतो. म्हणूनच माणसातील माणूसपण विसरून त्याला परब्रह्मपदावर नेऊन ठेवणारे भारतीय तत्वज्ञान संपूर्ण विश्वास अनुकरणीय आहे! स्वामी दयानंद सरस्वतींनी ‘वेदांकडे चला’ असा संदेश दिला आहे. तो सर्वकाल सुसंगत आहे. आज स्वामीजींची २०२ वी जयंती आहे. त्यांना विनम्र अभिवादन !

जीवनमानप्रकटन

प्रतिक्रिया

सोत्रि's picture

12 Feb 2026 - 1:06 pm | सोत्रि

उत्तम आणि समयोचित (एपस्टीन प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर) लेख!

महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतीय संस्कृती भौतिक सुख नाकारत नाही, तर त्याला मर्यादा घालते. वेद देखील भौतिक सुखाला नाकारत नाहीत, पण ते अपूर्ण आणि क्षणभंगुर असल्याचे स्पष्ट करतात.

_/!\_

- ('कोहम्'चा प्रवासी) सोकाजी

हा अत्यंत चुकीचा दावा आहे.

बहुतेक भारतीयांना अलीकडे असे वाटत आहे की पाश्चात त्यांनी फक्त मटेरियल गोष्टींमध्ये आनंद शोधला आहे परंतु हे एका विवक्षित न्यूनगंडातून मांडले जाणारे अत्यंत उथळ असत्य.

युरोपात अनेक ठिकाणी जुन्या मॉनेस्टरीज आहेत जिथे ऐहिक सुखांचा पूर्ण त्याग करून लोक अध्यात्म साधना करतात. पाश्चा त्यांनी एक प्रश्न सोडवले का तर सोडवले आणि त्यातून त्यांना आज उत्तम जीवनशैली मिळालेली आहे. एखाद्या खेडेगावात राहणारे युरोपियन कुटुंब आणि भारतात अगदी मोठ्या शहरात देखील राहणारे भारतीय कुटुंब यांच्यामध्ये युरोपियन कुटुंब हे जास्त सुखी आणि समाधानी आहे.
शिवाय युरोपियन धर्मांमध्ये सुद्धा देखील ऐहिक सुखांची निर्भत्सनासच केलेली आहे.

ला ग्रांडे बेलेजझा हा सोरिंतीनोचा चित्रपट पहा. त्यामधली नन म्हणते की मी दारिद्र्याचे व्रत घेतले आहे. एक फार सुंदर प्रसंग या चित्रपटात आहे. एका धन दांडग्या माणसाच्या घरात ही नन मुक्कामाला थांबलेली असते मात्र सुख सुखासीन बेडवरती न झोपता ती तिच्या सवयीने खाली फरशीवरच झोपते. पहाटे बाहेर बाल्कनीत येते तेव्हा तिथे बाल्कनीत अनेक फ्लेमिंगो उतरलेले असतात. काल झालेल्या रात्री झालेल्या अत्यंत lavish डिनर मध्ये उरलेले अन्नपदार्थ हे फ्लेमिंगो खात असतात. आणि ही नन एक हळुवार फुंकर घालते आणि हे फ्लेमिंगो त्यांच्या पुढच्या प्रवासासाठी मार्गस्थ होतात.

ॲनी बेझंट त्यांनी भारतामध्ये थिऑसॉफिकल सोसायटीची स्थापना केली असे आम्ही शाळेत वाचले होते. यामध्ये भारतीय आणि पाश्चात्य दोन्ही धर्मांच्या शिकवणुकीचा तौलनिक अभ्यास करणारी माणसे असावेत.

पाश्चात्य तत्त्वज्ञ लोकांमध्ये तुम्ही म्हणता तशी मांडणी अजिबात दिसत नाही त्यामुळे तुमचे आकलन उथळ आहे एवढेच नमूद करू इच्छितो

सोत्रि's picture

12 Feb 2026 - 1:55 pm | सोत्रि

युरोपियन धर्मांमध्ये सुद्धा देखील ऐहिक सुखांची निर्भत्सनासच केलेली आहे.

जस्ट फॉर क्युरियोसिटी, कोणकोणते धर्म यात येतात की युरोपियन धर्म असा एक धर्म म्हणता आहात?

- (क्युरियस) सोकाजी

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture

12 Feb 2026 - 2:33 pm | हणमंतअण्णा शंकर...

जेव्हा आपण 'युरोपियन धर्म' म्हणतो, तेव्हा त्यात प्रामुख्याने ख्रिश्चन धर्माचे विविध पंथ (कॅथोलिक, ऑर्थोडॉक्स इ.) येतात, कारण तिथल्या मॉनेस्टरीज किंवा मठांची परंपरा याच धर्माशी घट्ट जोडलेली आहे. (सेंट बेनेडिक्ट यांनी स्थापन केलेले मठ. येथील भिक्षूगरिबी, ब्रह्मचर्य आणि आज्ञाधारकतेची शपथ घेतात, मी जिथे राहतो तिथून जवळच असा एक मोठा मठ आहे जिथे आजही अतिशय साधेपणाने जीवन घालवणारे लोक आहेत.) ऑर्थोडॉक्स यांच्यात उदाहरण ग्रीसमधील माउंट अ‍ॅथोस. सेंट फ्रान्सिस सारख्या लोकांनी तर होली पॉवर्टी सारखी तत्वे मांडून आयुष्यभर त्यांचा प्रसार केला. मात्र, ख्रिस्ती धर्माच्या आधीही युरोपमध्ये स्टोईक (Stoic) किंवा पायथागोरियन यांसारखे विचारप्रवाह होते, जे ऐहिक सुखांपेक्षा संयम आणि साधेपणाला जास्त महत्त्व देत असत. थोडक्यात सांगायचे तर, युरोपीय संस्कृतीत केवळ एका धर्माचा प्रभाव नसून, ख्रिस्ती परंपरा आणि प्राचीन ग्रीक-रोमन तत्त्वज्ञान या दोघांच्या मिश्रणातून ही 'त्याग आणि शिस्तीची' तत्त्वे आकाराला आली आहेत. त्यामुळे ती केवळ भोगवादाला प्राधान्य देतात हा दावा पटत नाही.

(धर्माचे ओरिजिन हा टेक्निकल मुद्दा इथे अपेक्षित नाही. नाहीतर ख्रिस्ती धर्म हा इस्रायली धर्म होईल. हेच बौद्ध धर्माच्य बाबतीत आहे. आज बौद्ध प्रामुख्याने पौर्वात्य देशांतला प्रबल धर्म आहे)

नागनिका's picture

12 Feb 2026 - 2:51 pm | नागनिका

एका सिनेमाच्या एखाद्या प्रसंगावरून तुम्ही युरोपिय धर्माची तळी उचलत आहात?

Annie Besant या भारतीय धर्मावरून प्रभावित होऊन त्यांनी फिलोसॉफीकल सोसायटीची स्थापना केली होती. त्याचे प्रेरणा स्थान मूळ देशाच्या संस्कृतीशी नवते.

Stoic पंथ वेद्निर्मिती नंतर सहस्रोवर्षानंतरचा आहे. तोपर्यंत वेदातील ज्ञान जवळ जवळ सर्व जगामध्ये पसरले होते.

असो.. वैयक्तिक टिप्पणी करून ' झिरो सिव्हिक सेन्स' ट्रेंड तुम्ही फारच गांभीर्याने घेतलेला दिसतोय.

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture

12 Feb 2026 - 3:11 pm | हणमंतअण्णा शंकर...

>> पाश्चात्यांच्या दृष्टीने मनुष्याच्या अंतरिम सुखाची संकल्पना ही इंद्रियसुखावर येऊन थांबते. <<

असे लिहिताना मात्र आपण एकदम ऑब्जेक्टिविटीची परिसीमाच गाठली आहे जणू. मी कुठल्यही धर्माची तळी वगैरे उचलत नाही.

वेदांमधे फक्त ज्ञान आहे हा एक खूप मोठा गैरसमज अनेक लोक करून घेतात. वेदांमधील साधारण ९०% ते ९५% भाग हा कर्मकांडाचा आहे ज्यात सगळ्या भौतिक सुखांच्या याचना आणि गरजांसाठी केलेले यज्ञयाग मंत्रे कथा आणि असेच भरताड आहे. येस. इंद्रियसुखे. ऐहिक सुखे. केवळ ठराविक भाग निवडून ९५ टक्के भाग मात्र सोयीस्कर दुर्ल़क्षित करून तुम्ही काय वेगळे करत आहात? साधारणतः उर्वरित भागात आधिभैतिक प्रश्नांचा वेध घेतला आहे. शिवाय त्यातही मुळात केवळ आणि केवळ एत्तदेशियांच्या इन्जिनियसपणातून हे ज्ञान डिस्कस झाले असा फारच गोड गैरसमज करून घेतलेला दिसतो. मुळात आर्य पुरुष इथे कुठून आले?

ज्याप्रमाणे अल्केमी या गोष्टींनी आयुर्वेदात रससिद्धांत वगैरे गोष्टी इन्ट्रोड्यूस झाल्या त्याच प्रमाणे वेद असोत किंवा पाश्चात्य तत्त्वज्ञान, ज्ञान हे कोलॅब करून आणि कल्पना एक्सेंज करून विकसित झालेले असते. बाकी आपण केवळ न्यूनगंडात्मक आणि मुख्य म्हणजे अज्ञानमूलक आत्मस्तुतीतच मग्न राहणार असाला तर जो जो वांछील तो ते लाहो.

विवेकपटाईत's picture

13 Feb 2026 - 10:15 am | विवेकपटाईत

उत्तम लेख. स्वामी दयानंद यांची संपूर्ण विचारधारा विज्ञान निष्ठ होती. वेदांची विकृत व्याख्या करणाऱ्यांवर त्यांनी चपराक लावली. देशांत शुद्धी आंदोलन सुरू केले. शिक्षण संस्था उघडल्या. आज आर्य समाजाच्या १५०००० शाळा आणि कॉलेजेस आहेत. शेकडो गुरुकुल ही आहेत. याशिवाय स्वामी दयानंद चे शिष्य स्वामी रामदेव यांनी तर नवीन शिक्षा बोर्ड स्थापित केला आहे. आजच्या घटकाला पाचशेच्या जवळ शाळा भारती शिक्षा बोर्ड शी संबंधित झालेल्या आहेत. पुढील पाच-सात वर्षात ही संख्या काही हजारांवर जाईल. .बाकी अण्णा तुम्ही ही इतरांप्रमाणे निश्चित न्यूनगंडाने पछाडलेले आहात. ऋग्वेद तुम्ही वाचलेला नाही. बाकी आयुर्वेद पूर्णतः विज्ञान निष्ठा आहे. आज आयुर्वेदातील अनेक औषधी आधुनिक विज्ञानाच्या कसोटीवर रिसर्च द्वारा प्रमाणेच झालेल्या आहेत. आजच्या घटकाला देशातील सर्वात मोठी प्रयोगशाळा जिथे सेल पासून ऍनिमल ट्रायल्स ची पूर्ण सुविधा आहे एका आयुर्वेदिक कंपनी जवळ आहे. असो. बाकी स्वामी दयानंद त्याकाळचे सर्वात मोठे प्रगतिशील आणि पुरोगामी व्यक्तित्व होते.

ख्रिस्ती परंपरा आणि प्राचीन ग्रीक-रोमन तत्त्वज्ञान या दोघांच्या मिश्रणातून

धन्यवाद! हीच क्युरीयासिटी होती.

'त्याग आणि शिस्तीची' तत्त्वे आकाराला आली आहेत. त्यामुळे ती केवळ भोगवादाला प्राधान्य देतात हा दावा पटत नाही.

ह्याबद्दल जरा वेगळं मत आहे माझं.

कॅपिटलिझम आणि त्यावर आधारित सध्याची अर्थव्यवस्था ही पाश्चिमात्य डेव्हलप्ड देशांनी जगावर लादलेली इकॉनॉमिकल चौकट आहे. ज्याच मूळ भोगवाद किंवा इंद्रियसुखांची लोलुपता हे आहे. जगात कोणी समाधानी असता कामा नये हा या अर्थव्यवस्थेचा मूलमंत्र आहे. जर सगळे समाधानी झाले, कन्टेन्डेड झाले, तर उत्पादन कसं चालू राहणार आणी वाढणार आणी मग प्रचंड नफा कसा मिळणार? म्हणून 'अधिकचा हव्यास' सतत असेल अशी इकॉनॉमिकल चौकट राबवली आहे. त्या आत्यंतिक नफ्यातून येणार्‍या अफाट आणि अमर्याद पैशामुळे, इंद्रियसुखांची परीसीमा गाठण्याचा हव्यास वाढत जातोय. एप्स्टीन हे उघड झालेलं फक्त एक प्रकरण. पण म्हणून हे फक्त पाश्चिमात्य देशांतच होतंय का? तर नाही, जिथे जिथे अफाट आणि अमर्याद पैसा आहे तिथे तिथे हे आहेच.

भारतीय तत्वज्ञानात, आस्तिक आणि नास्तिक या दोन्ही दर्शनशास्त्रांनी, सुखाचा विचार अधिक सूक्ष्म, खोल आणि इंद्रियातीत शाश्वत पातळीवर केला आहे. पाश्चिमात्य तत्वज्ञानात 'त्याग आणि शिस्तीची' तत्व (उदा. होली पॉवर्टी सारखी) आहेत त्यांच्यामागे भारतीय तत्वज्ञानाइतका सूक्ष्म, खोल आणि इंद्रियातीत शाश्वत पारमार्थिक विचार नाहीयेय. हेच पाश्चिमात्य डेव्हलप्ड देशांत व्यक्तिस्वातंत्र्याचा उदो उदो असण्याचं कारण आहे. सुदैवाने आपला भारतीय तत्वज्ञानाचा वारसा हा पाश्चिमात्य तत्वज्ञानापेक्षा परिपक्व आहे. मी ह्या लेखातल्या फक्त ह्या गाभ्याशी सहमत आहे.

भारतीय समाजमनावर आणि एकंदरीत येथील जीवनशैलीवर या तत्वज्ञानाचा मोठा प्रभाव आहे. आणि त्यामुळेच कोणतेही कुकर्म करताना भारतीय मन शंभर वेळा विचार करते.

हा तुमच्या आक्षेपाचा अजून एक बेस आहे की नाही ते माहिती नाही पण असेल तर मी त्याच्याशी सहमत आहे. भावनिक होऊन अशी आत्यंतिक मतं मांडली जातात हे मान्य असल्याने मी पहिल्यांदा लेख वाचला तेव्हा लेखातील काही काही मतं 'विथ पिंच ऑफ सॉल्ट' घेतली होती.

- (संतुलित) सोकाजी

Bhakti's picture

12 Feb 2026 - 2:05 pm | Bhakti

वेदांकडे चला स्वामी दयानंद सरस्वतींनी ‘वेदांकडे चला’ असा संदेश दिला आहे. तो सर्वकाल सुसंगत आहे. आज स्वामीजींची २०२ वी जयंती आहे. त्यांना विनम्र अभिवादन _/\_

एपिस्टन फाईलचे अनेक रील, त्याची माहिती एकामागून एक पाहिली.ते पाहताना अक्षरशः भडभडून ओकून द्यावं वाटल. जग हॆ सैतान प्रवृत्तीने भरलेलेच आहे. सत्ता, पैसा, व्यभिचार याने बरबटलेले आहे.तरीही या जगात आपल्याला जगायचं आहे.
मी पण त्या दिवशी "ज्ञानयोग" पुस्तक वाचले .तेव्हा कुठे शांत झाले ...
अशा वेळी मला वेदांत, अद्वैत यांचा खूप आधार होतो.विवेकानंद यांच्या भाषेतलं वेदान्त म्हणजे "व्यावहारिक सत्य"प्राचीन ज्ञानाने उलगडणे.जीवनाचे सर्वोच्च सत्य आणि अंतिम उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या साधकांसाठी ते एक व्यावहारिक मार्गदर्शक आहे.

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture

12 Feb 2026 - 2:48 pm | हणमंतअण्णा शंकर...

एपस्टिनचा संशयास्पद मृत्यू झाल्यापासून एका वर्षाने म्हणजे साधारणः २०२० च्या आसपास पासून मी त्याच्या मागावर होतो. फॉर सो मेनी ऑदर रीजन्स. खूप मोठा रॅबिट होल आहे हा.

आता वरती आले आहे हे फक्त केवळ वरवरचे अर्धवट सत्य आहे असे मला वाटते. त्याच्या फाइलस (एकूण संख्या चाळीस लाख) मधल्या काही फाइल्सची सर्वच्या सर्व पानेच्या पाने रिडॅक्ट केलेली आहेत म्हणजे अक्षरश: एकही शब्द खुला नाही.

यावर कधीतरी विस्ताराने लिहिण्याचा विचार आहे मात्र वेळे अभावी ते कधी शक्य होईल कुणास ठाऊक.

नागनिका's picture

12 Feb 2026 - 4:51 pm | नागनिका

वाचायला आवडेल..

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture

12 Feb 2026 - 2:55 pm | हणमंतअण्णा शंकर...

तो गुन्हेगार होता हे कोर्टात सिद्ध झाले आहे त्यामुळे त्याच्या अनैतिक कृत्याचे मी कोणतेही समर्थन करत नाही.
मला फक्त इतकेच म्हणाय्चे होते की यात सर्व बाजूंचे लोक गुंतले आहेत त्यामुळे निष्पक्ष सत्य कधीही बाहेर येणार नाही.

सोत्रि's picture

12 Feb 2026 - 5:10 pm | सोत्रि

भक्तीतै, वेलकम बॅक!

वेदान्त म्हणजे "व्यावहारिक सत्य"प्राचीन ज्ञानाने उलगडणे, जीवनाचे सर्वोच्च सत्य आणि अंतिम उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या साधकांसाठी ते एक व्यावहारिक मार्गदर्शक आहे.

हा बाउन्सर डोक्यावरून गेला.

- (विचारात पडलेला) सोकाजी

बहुतेक धर्म हे ऐहीक भोगांना कमी प्रतीचे किंवा पाप मानतात. मात्र परलोकात गेल्यावर पुण्य मिळवले असेल तर हेच सारे भोग सुखसुविधा म्हणून मिळतील असे सांगतात.
हे असे का?

सोत्रि's picture

12 Feb 2026 - 5:19 pm | सोत्रि

धर्म हा कुठल्यारती एका विचारसरणीवर (Dogma) आधारलेल्या संप्रदायाचं किंवा पंथाचं (Cult) दुकान असतं. दुकान चालवायचं म्हणजे गिर्‍हाइकं आकर्षित करावी लागतात. परलोकात सारे भोग सुखसुविधा म्हणून मिळतील असं हे दाखवलेलं गाजर असतं, मार्केटींग गिमीक. :=))

बोला, तुम्हाला काय हवय, रंभा उर्वशी की ७२ हूर? 😜

- (अधार्मिक) सोकाजी

मूकवाचक's picture

13 Feb 2026 - 9:52 am | मूकवाचक

बहुतेक धर्म हे ऐहीक भोगांना कमी प्रतीचे किंवा पाप मानतात - आत्मिक आनंदाच्या तुलनेत कमी प्रतीचे मानत असतील, सरसकट पाप मानत नाहीत.

परलोकात गेल्यावर पुण्य मिळवले असेल तर हेच सारे भोग सुखसुविधा म्हणून मिळतील असे सांगतात. - अशा गोष्टींचा जेमेतेम बुद्धीमत्ता आणि सरासरीपेक्षा कमी विवेकबुद्धी असलेल्या लोकांवरच प्रभाव पडतो. उदा: अन्याय आणि शोषण करून, समाजाची घडी विस्कळीत होईल अशा पद्धतीने, ओरबाडून आज भोगले नाहीस, तर ते पुण्यकर्म ठरेल आणि परलोकात त्याचे बक्षिस मिळेल अशी लालूच दाखवणे. हे दुधारी शस्त्र आहे. एका बाजूने ते जेमतेम बुद्धीमत्तेच्या आणि विवेक नसलेल्या माणसाने अन्याय किंवा शोषण न करता संयमी रहावे अशा दृष्टीने कामी येऊ शकते, उलटपक्षी अशाच स्वरूपाची लालूच दाखवून त्याला पापकृत्ये करायला लावण्याच्या देखील कामी येऊ शकते.

Epstein फाईल्स मध्ये नसलेल्या गोष्टी किंवा बादरायणी संबंध लाऊन अचाट दावे सध्या नेटवर पसरले आहेत. आपण काळजी घ्यावी.
तुम्ही दिलेले उदाहरण घ्या. मेलमध्ये कॅनिबल हा शब्द आला म्हणजे एपस्टीन मानवी ऑर्गनचे बुफे भरून जेवायचा असा अर्थ होत नाही. त्या मेल्समध्ये casual मेल पण आहेत. उगाच शब्द त्यात आला म्हणजे काही गुन्हा घडला असे नाही.

बाकी लेख अत्यंत एकसुरी वाटला. ह्यात मांडण्यासारख्या अनेक दुसऱ्या बाजू आहेत. पश्चिमी कसे खराब आणि आपण कसे हुच्च ह्याच्या अगदी विरोधी मत मांडणारा लेख सुद्धा सहज पाडता येईल.

कंजूस's picture

12 Feb 2026 - 5:31 pm | कंजूस

इथे रेंगाळले अध्यात्म.

नागनिका's picture

14 Feb 2026 - 8:47 am | नागनिका

रेंगाळण्याच्या निमित्ताने का होईना त्याच्या पाउलखुणा तरी राहतील !

अकिलिज's picture

13 Feb 2026 - 7:23 pm | अकिलिज

चौकात लाल सिग्नल लावा. एक भारतात लावा. एक युरोपात लावा. फरक डोळ्यांनी बघा.
कोणतेही कुकर्म करताना भारतीय मन शंभर वेळा विचार कसे व्यवस्थित करते. ते बघा.
टोलच्या रांगात सगळे कसे व्यवस्थित लायनीत जातात. एकमेकांना कसे घूसू देतात. बघा मजा.
लहान मुलांना कानफटवणे हे ज्यांच्या अंगवळणी पडले आहे त्यांना पेशन्सने बोलणे कसे शिकवणार.
भारतवर्षाचा अभिमान जरूर वाटावा. पण जे चूक आहे ते मान्य तर करायला शिका.

अमरेंद्र बाहुबली's picture

13 Feb 2026 - 7:31 pm | अमरेंद्र बाहुबली

एकदा खचाखच भरलेल्या रेल्वेच्या डब्ब्यातून मी ट्रेकला जात होतो. जागा नसल्याने दोन सीटच्या गॅप मध्ये उभा होतो, एक कला अध्यात्म, धर्म, देव ह्याबद्दल दुसऱ्या काकाना सांगत होते, अतिशय मंत्रमुग्ध वातावरण होते, अर्ध्या एका तासाने त्या काकानी हातातली शेंगा खाऊन उरलेली टरफल्यांची पिशवी खिडीकी बाहेर टाकली.

स्वधर्म's picture

13 Feb 2026 - 11:21 pm | स्वधर्म

नागनिका जी,

आपले चिंतन वाचले. लहानपणी मला आणि बहुतांश लोकांना आपण म्हणता तसेच वाटत आले आहे. शरीराच्या पलिकडे असलेल्या स्व व अस्तित्वावर अत्यंत सखोल चिंतन भारतीय तत्वज्ञानात आहे, हे मान्य. पण जाण आल्यावर हळू हळू भारतीय संस्कृतीबाबतचा तथाकथीत अभिमान गळून पडला. इथे लिहिलेले विचार भाबडे आहेत की धूर्त आहेत असा प्रश्न पडला. त्यामुळे मनात आलेले काही प्रश्न आपल्यासमोर ठेवत आहे. त्याबद्दल आपल्याला काय वाटते ते वाचायला आवडेल.

१. भारतीय संस्कृती प्राचीन आहे त्यामुळे ती जास्त प्रगत असायला हवी होती. तसे काही सध्या आढळून येते का? आपला समाज जगातील इतर समाजांच्या तुलनेत अधिक सुखी समाधानी आहे का? भारताचा आनंद निर्देशांक जगात तळाला का असावा?
२. भारतीय मनाची बैठक समरसतावादी आहे, समतावादी नाही. नेता अचानक गेल्यानंतर त्या पक्षातील सर्वात लायक माणसाला कधीच संधी मिळत नाही. नेत्यालाही ती विशिष्ट घराण्यातले असल्यामुळेच मिळाली होती. कितीही गैरप्रकार समोर आले तरी लोकांना त्याचे काहीच वाटत नाही. उलट लोक असेच होणार हे मानून पुढे गेले. ही कसली महान संस्कृती? सर्व नागरीक समान आहेत असे मानणारी लोकशाही भारतात का रूजू शकली नसावी?
३. आर्थिक विषमता व वर्गाधारीत शोषण सर्वच समाजात आढळून येते. अधिक क्षमता असलेले लोक आर्थिकदृष्ट्या प्रबळ समाज गट तयार करतातच. पण 'जात' ही फक्त आणि फक्त जन्माधारीत संकल्पना फक्त दक्षिण पूर्व आशियातच का आढळून येत असावी? आपल्याच रक्तामासाच्या बांधवांचे केवळ जातीआधारित शोषण जगात इतर कुठेही नाही. तसेच स्त्रियांना जरूर देवी बनवून देव्हार्‍यात बसवले गेले पण तिला समान मानले का नसावे, तिचे शोषण हजारो वर्षे का झाले असावे?
४. भारतीय संस्कृतीतले सगळेच संत बंडखोर होते. त्यांचा तत्कालीन समाजाने छळच केला व नंतर त्यांची पूजा केली. हे अगदी ज्ञानेश्वरांपासून र धों कर्वे, महात्मा फुले यांच्यापर्यंत हे असेच आहे. एवढे सांस्कृतीक संचित असलेल्या भारतीय समाजाला चांगले काय हे वेळीच का ओळखता आले नसावे?
४. चांगल्या संस्कृतीचा सर्वात मोठा मानक न्याय असावा. पण भारतीय समाजात नेहमीच न्याय का नसावा? अगदी मर्यादा पुरूषोत्तम राम हाही न्यायासाठी नाही तर वडीलांच्या इच्छेचा मान म्हणून वनवासाला गेला. न्याय महत्वाचा असता तर त्याने वडीलांच्या इच्छेपेक्षा त्यांना तत्कालीन न्याय्य काय हे सांगायला हवे होते. सीतेशी राम जसा वागला (अग्नीपरिक्षा), तसे आजच्या काळात कोणी वागले तर तो माणूस वंदनीय ठरेल काय? न्यायापेक्षा वडीलधारे, परंपरा काय म्हणते हेच इथे का महत्वाचे आहे? न्यायासाठी भांडणारे आयुष्य खर्च करतात, पुस्तके लिहितात. आपल्या समाजात न्याय मुळीच सहज नाही. म्हणून बहुसंख्य लोकांना सुखी समाधानी आयुष्य लाभते असे वाटत नाही. संघर्ष अटळ का?

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture

14 Feb 2026 - 3:25 am | हणमंतअण्णा शंकर...

जेन झी शी बोलल्यावर मला एक लक्षात आले की या मुलांना खूप फ्रस्ट्रेशन आहे. पण त्यांना त्यांचा राग कुठेच काढता येत नाही. या मुलांना जगात काय चाललं आहे हे सगळी कडे दिसत असते. प्रगत समाजांत आपल्या गर्लफ्रेंड/बॉयफ्रेंड बरोबर जगात अनेक जण सहज PDA करतात मात्र भारतीय मुलांना आपल्या प्रियकर प्रेयसी यांना स्पर्शही करता येत नाही.
या सगळ्या फ्रस्ट्रेशन मधून त्यांच्यात अनेक न्यूनगंड तयार होतात आणि ते आपली व्यवस्था ही एक 'संस्कृती' असून कशी 'त्यांच्याहून' भारी आहे वगैरे जस्टिफिकेशन देत राहतात. मग त्यांना भूतकाळातून हे आधिभौतिकाचे तुकडे काढून आपले श्रेष्ठत्व सिद्ध करत राहण्याचा एक विचित्र न्यूनगंडात्मक छंद लागतो. प्रत्यक्षात बिचाऱ्याची बत्तीशीपर्यंत जातीबाहेर सोडाच जाती अंतर्गत देखील लग्ने होत नाहीत. जेन झी मुलाना आजकाल एका कसल्या तरी सनातन धर्माचे वेड लागले आहे. प्रत्यक्षात तो धर्म काय आहे आणि तो कशाशी खायचा हे त्यांना कळत नाही. कारण पदोपदी रोजच्या जगण्यात आणि त्या उदात्त आधिभौतिक प्रिंसिप्लस मधे नेहमीच टोकाची विसंगती दिसत राहते. एका काळानंतर ते पूर्ण इम्यून आणि बधिरच होऊन जातात आणि त्या एकदम abstract आणि धूसर सनातन धर्माच्या प्रेमातच पडतात. मात्र त्या सनातन धर्माचे या आत्ताच्या जगातले ऐहिक मॅनिफिस्टेशन मात्र कसे वर येतात तर कॅफे मधे जाऊन हनुमान चालीसा म्हणणे. कुठं कालिदास वगैरची उदबत्ती लावताय दोस्तांनो?

अधिभौतिकाची आणि ज्ञानमार्गाची प्रचंड मोठी परंपरा असूनही आज सगळी कर्मकांडे प्रचंड म्हणजे प्रचंड प्रमाणात कंठाळी पद्धतीने सेलेब्रेट केले जातात. प्रत्येक देवस्थानाला अद्वैत लांबच राहिले, द्वैतही सोडा एकदम अंधश्रद्धेच्या आसपास जाणारी अनेक कर्मकांडेच मोठी करायचा छंद जडला आहे. एकेकाळी फक्त गणपती असणारा आज प्रत्येक गणपती नवसाला पावणारा गणपती आहे. यात कुठेही मला ज्ञानमार्गाचा मोठेपणा दिसत नाहीच तर बहुतेक समाजाला केवळ ट्रांसॅक्शनल कर्मकांडातच गुंतून पडायचे आहे असे स्पष्ट दिसते.

एकूण दिलको बेहलाने के लिए ये वेदांत अच्छा है असेच आहे बहुतेकांचे. ९९ टक्के लोक काही का करेनात, लिंचिंग वगैरे का करेनात आपण मात्र चार दोन सूक्ते काढून काहीतरी वैश्विक गफ्फा हाणत राहायच्या.

सोत्रि's picture

14 Feb 2026 - 7:17 am | सोत्रि

स्वधर्म,

तुमचा प्रश्न नागनिका यांना आहे आणि त्या/ते उत्तर देतीलंच. पण, मी माझं मत सांगण्यास तुमची हरकत नसावी हे गृहीत धरून माझं मत मांडण्याचा प्रयत्न करतो.

लेखातून मी इंटरप्रीट केलेला गाभा असा आहे की:

कॅपीटलीस्ट पाश्चात्य देशांमधे भौतिक चंगळवादाचे प्रस्थ प्रचंड आहे; एपस्टीन प्रकरण त्यासाठी बॅकड्रॉप/वानगी म्हणून. अस्तित्वावर अत्यंत सखोल चिंतन जे भारतीय तत्वज्ञानात आहे ते पाश्चात्य तत्वज्ञानात तितकं मुलभूत आणि सखोल नाहीयेय. त्यामुळे भौतिक चंगळवादातून बाहेर का पडायचे किंवा त्यापलीकडे काही आहे हेच माहिती होत नसल्याने अधिकाअधिक भौतिक चंगळवाद हेच धेय्य बहुतांशी पाश्चात्य देशांमधे आहे. सुदैवाने, सखोल भारतीय तत्वज्ञानामुळे आपल्याला एक दिशा किंवा मार्ग उपलब्ध आहे अधिभौतिकाच्या पलीकडे घेऊन जाऊ शकतो.

तुम्ही 'भारतीय संस्कृती' हा मुद्दा सामाजिक अंगाने मांडताय, जो योग्य आहे आपल्यजागी, पण तो ह्या धाग्याचा विषय नाही, माझ्या आकलनानुसार.
(डिस्क्लेमरः आधिच्या प्रतिसादात म्हटलं तसं धाग्याच्या फक्त ह्या गाभ्याशी मी संपूर्णपणे सहमत आहे.)

- (मत मांडण्याचा अधिकार जपणारा) सोकाजी

नागनिका's picture

14 Feb 2026 - 9:09 am | नागनिका

स्वधर्मजी विस्तृत प्रतिसादाबद्दल आपले आभार !

संस्कृती जितकी प्राचीन तितकी प्रगत असे काही नसते.
पण संस्कृती जितकी flexible तितकी लवकर रुजते, विस्तारते आणि टिकते ही. ज्या संस्कृती एकाच एका गोष्टीला चिकटून असतात, काळाप्रमाणे बदलत नाहीत त्या लोप पावतात.( उदा. सुमेरिअन, रोमन इ.)
त्याचप्रमाणे न्यायाच्या संकल्पन बदलत जातात. पण व्याख्या तीच राहते. द्वापारात नियोग न्याय्य होता. पण सध्या नाही. तसेच त्रेतायुगात काही गोष्टी सामान्य होत्या, ज्याचे आज अप्रूप वाटते. द्वापारात राजपरिवारातील व्यक्ती ब्रह्मचारी असण्याचे प्रमाण नगण्यच होते. म्हणून भीष्माचे राजत्याग करून ब्रह्मचारी राहणे काहीतरी अद्भुत वाटले त्या लोकांना.

तुमच्या तिसर्या मुद्याशी मी सहमत आहे. ककारण तोच तर विरोधाभास आहे. जे ज्ञान , संस्कृती पूर्वजांनी दिली त्याचा विसर पडला व भौतिक चंगळवाद सोकावला. त्यामुळे किंबहुना अज्ञानामुळे अशी परिस्थिती आहे. ( वरील काही प्रतिसादात सिग्नल, टरफले अशी काही उदाहरणे दिली आहेत. त्यालाही हेच म्हणणे लागू होते. चांगले वागणे म्हणजे काय ते माहित असते, पण ते का वागायचे हे माहित नसल्याने अशी कृती होते. सगळ्याचे मूळ अज्ञान आहे.)

बाकी सोकाजींना धन्यवाद. त्यांनी लेखाचा गाभा योग्य सांगितला.

चंद्रसूर्यकुमार's picture

14 Feb 2026 - 10:00 am | चंद्रसूर्यकुमार

मला एक प्रश्न नेहमी पडतो. सध्याच्या काळातील पाश्चिमात्य तत्वज्ञ आपलेच तत्वज्ञान अधिक सोप्या पध्दतीने उलगडून सांगतात. वेन डायर, बॉब प्रॉक्टर, एकहार्ट टोली वगैरे बोलतात तेव्हा कुठेतरी जाणवते की निदान तेवढ्यापुरते तरी ते आपलेच तत्वज्ञान सांगत आहेत. नॉर्मन व्हिन्सेंट पील हे तर ख्रिस्ती धर्मगुरूच होते त्यामुळे त्यांच्या बोलण्यात बायबलचा उल्लेख येतो ते सोडून देऊ. त्याप्रमाणेच नेव्हिल गॉडर्ड यांच्या बोलण्यात आणि लिखाणातही जिससचा उल्लेख येतो ते सोडून देऊ. मात्र इतरांच्या बोलण्यात/लिहिण्यात जिसस किंवा ख्रिस्ती धर्माचा उल्लेख क्वचितच येतो. तसेच ते कुठेतरी आपलेच तत्वज्ञान सांगत आहेत पण अधिक सुलभ पद्धतीने असे जाणवते. उगीच कसलाही अभिमान नाही (ज्याला मी उपहासाने वेदकालीन जंगलात भटकणे म्हणतो), हे जग म्हणजे सगळी माया आहे, त्यात गुरफटून जाऊ नका आणि आपले चित्त प्रभूचरणी लीन ठेवा म्हणजे भवसागर तरून जाल वगैरे दिसायला भारदस्त दिसणारी पण त्यातून नक्की काय करायचे याचा कसलाही अर्थबोध न होणारी भाषा वापरत नाहीत. उलट काय करणे अपेक्षित आहे हे अधिक सोप्या पध्दतीने उलगडून सांगतात. हे असे का होत असावे?

दुसरे म्हणजे नॉर्मन व्हिन्सेंट पील किंवा नेव्हिल गॉडर्ड अगदी बायबलमधील भाषा बोलत जरी असले तरी ते जे काही बोलतात ते मला तरी नक्कीच पटते. बायबलमध्ये मला माहित नसलेल्या पण अनेकांना आक्षेप असलेल्या काही गोष्टी असतील त्याविषयी मला काहीच भाष्य करता येणार नाही कारण त्या गोष्टी माहित नाहीत. मात्र अगदी बायबलमध्ये जरी सकारात्मक विचारांविषयी काही उल्लेख असतील तर माझ्या 'सहिष्णू' हिंदू आणि भारतीय मनाला ते अजिबात खटकत नाही.

तस्मात वेदांमध्ये किंवा भारतीय तत्वज्ञानात चांगल्या गोष्टी आहेत हे मान्य केले तरी मात्र भारतीय तत्वज्ञानातच सगळे काही आहे आणि इतर ठिकाणी भुसा भरला आहे अशी परिस्थिती कदाचित नसावी. दुसरे म्हणजे भारतीय तत्वज्ञान महान आहे असा दावा करणार्‍यांपैकी किती जणांंनी त्याचा खरोखरच अभ्यास केलेला असतो हा प्रश्नही पडतो. आणि आपले तत्वज्ञान पाश्चिमात्य तत्वज्ञानापेक्षा श्रेष्ठ आहे हा दावा करायचा असेल तर दोन्हींचा तुलनात्मक अभ्यास करायला हवा. असे दावे करणार्‍या किती जणांनी तो खरोखरच केलेला असतो हा पण प्रश्न पडतो. ही एक जनरल गोष्ट लिहित आहे- इथल्या चर्चेतील कोणालाही उद्देशून ते नाही तेव्हा अकारण गैरसमज नसावा. भारतीय तत्वज्ञान म्हटले की आम्हीच काय ते श्रेष्ठ आणि इतरांना काही कळत नाही या गृहितकापासून सुरवात करून मग आपल्या गृहितकाला अनुसरून असलेली तेवढीच वाक्ये उचलणारे लोक वैयक्तिक चर्चेत बघितले आहेत. माझी जी काही थोड्याफार लोकांशी याविषयी चर्चा केली आहे त्या मर्यादीत सॅम्पल सेटवर आधारीत विधान आहे. ते सर्वांना लागू पडेल असा माझा अजिबात दावा नाही. असे लोक अर्थातच मिपावर नाहीत आणि त्यापैकी बरेच आता या जगातही नाहीत त्यामुळे त्यांना इथे चर्चेत बोलावता येणार नाही. पण अशा अ‍ॅप्रोचमधून वृथा अभिमान निर्माण होणे आणि आपलीच कॉलर ताठ करणे सोडून फार काही साध्य होते असे वाटत नाही.

असो.

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture

14 Feb 2026 - 12:20 pm | हणमंतअण्णा शंकर...

21व्या शतकातील सगळ्यात महत्त्वाचा तत्वज्ञ असे जर कोणी मला विचारले तर मी निस संशय मार्कूस गब्रिएल यांचे नाव घेईन.

आता आपण आपल्या भारतीय सखोल चिंतनाकडे वळूया. तत्त्वज्ञानामध्ये भारताकडे आता सांगण्यासारखं काय आहे? काहीच नाही. इथे दोन मुद्दे आहेत एक म्हणजे आजही तत्त्वज्ञान मांडता येते याचा भारतीयांना विसर पडला आहे. आणि दुसरा मुद्दा आमच्याकडे ऑलरेडी सगळेच आहे अशी आत्मस्तुती करण्याचा जडलेला रोग.

महाराष्ट्र पुरते बोलायचे तर गुलाबराव महाराज किंवा वाई मध्ये असलेली प्रज्ञशाळा अशा प्रकारचे प्रयत्न दिसतात. पूर्णवाद किंवा अविभक्त आत्मवाद या गोष्टी मागच्या शतकात मांडलेल्या दिसतात. मात्र त्या काही नोवेल गोष्टी नव्हत्या आणि त्यांना समकालीनत्व तर नव्हतेच नव्हते. पुन्हा या सगळ्या गोष्टी मेटा फिजिकल किंवा मेटामटा फिजिकल असल्याने वितंड घालायची आवड असणाऱ्या वादप्रवण भारतीयांना एवढेच जमले आहे. अमर्त्य सेन यांनी वादाळू भारतीयांवर एक पुस्तक लिहिले आहे परंतु त्यातून शालीतून जोडेच मारलेले आहेत अनेक लोकांना ते कौतुकपर पुस्तक वाटते.

मात्र साहित्य असो किंवा राजकारण जर्मन तत्वज्ञांनी संपूर्ण जग उलथापालथ केले. अलीकडे मी अनेक तत्त्वज्ञांचे लेक्चर्स असतो आणि मार्कूस यांची लेक्चरे सध्या माझी अत्यंत आवडती आहेत. त्यात त्यांनी मांडलेला जग अस्तित्वात नाही हा सिद्धांत किंवा नव नव वास्तववाद हे खूप महत्त्वाचे सिद्धांत असून त्याचा एकूण समाजावर किंवा वैज्ञानिक प्रगतीवर किंवा अतिवैज्ञानिक प्रगतीवर परिणाम होणार आहे. यातील जग अस्तित्वात नाही हा सिद्धांत आपल्या जग मिथ्या आहे या सिद्धांत यापेक्षा वेगळा आहे कृपया त्यांची गल्लत करून घेऊ नका. नाहीतर पुन्हा आत्मवस्तुतीचे एक रान तुम्हाला मोकळे झाल्यासारखे वाटेल. मात्र अशा दर्जाचे काम मला भारतातील कुठल्याही तत्त्वज्ञाने मग ते आध्यात्मिक क्षेत्रातून असो किंवा अकादमी क्षेत्रातून असो मांडल्याचे दिसत नाही.

मग समृद्ध ज्ञानमार्गी परंपरा असलेल्या भारतामध्ये एवढे स्टॅगनेशन का आले आहे? याचे कारण भारत सामाजिक प्रश्नांमध्ये एवढा गुरफटून गेलेला आहे की कोणताही पंथ जात पाहत वगैरे न पाहता जन्माला येणारी बुद्धिमत्ता ही आयुष्यभर त्याच गोष्टींशी झुंजण्यात खर्ची होते. आणि त्यातूनही काही उरलंच तर ते आत्मस्तुती किंवा भारतीय अध्यात्माने आणि धर्मांनी तत्त्वज्ञानाच्या बुरख्या आडून घालून दिलेली कर्मकांडे करण्यातच खर्च होतात.

चंद्र सूर्यकुमार यांचे म्हणणे मला पटते. यात पुन्हा भारतीयांना जडलेली व्हॅलीडेशनची सवय द्रुगोचरच होते.

चंद्रसूर्यकुमार's picture

14 Feb 2026 - 1:37 pm | चंद्रसूर्यकुमार

21व्या शतकातील सगळ्यात महत्त्वाचा तत्वज्ञ असे जर कोणी मला विचारले तर मी निस संशय मार्कूस गब्रिएल यांचे नाव घेईन.

धन्यवाद. मार्कस गॅब्रिएल यांच्याविषयी माहित नव्हते. त्यांचे पण व्हिडिओ बघतोच. मी आतापर्यंत अभारतीय तत्वज्ञांपैकी जास्त करून अमेरिकन तत्वज्ञ फॉलो करत आलो आहे (अपवाद फक्त एकहार्ट टोली- ते पण मुळचे जर्मनीचे). मार्कस गॅब्रिएल यांच्याच पिढीतील अमेरिकन गॅब्रिएल (गॅब्रिएला?) उर्फ गॅबी बर्नस्टीनची पुस्तके आणि व्हिडिओ पण आवडतात. बाकी वेन डायर, नॉर्मन व्हिन्सेंट पील, लुईज हे, नेव्हिल गॉडर्ड, इस्थर-जेरी हिक्स वगैरे माझे अगदी ऑल टाईम फेव्हरेट आहेत.

धन्यवाद.

चंद्रसूर्यकुमार's picture

14 Feb 2026 - 1:56 pm | चंद्रसूर्यकुमार

वर म्हटल्याप्रमाणे नॉर्मन व्हिन्सेन्ट पील, नेव्हिल गॉडर्ड यांची पुस्तके/व्हिडिओ मला आवडतात. त्यांनी सांगितलेल्या काही गोष्टी केवळ बायबलमधील आहेत आणि आपल्या कोणत्या स्त्रोतात नाहीत म्हणून पटल्या तरी ते नाकारणे मला तरी आवडत नाहीत.

उदाहरणार्थः
१. Isaiah 41:10 – “Fear thou not; for I am with thee…” याची मला फारशी गरज पडते असे नाही पण अक्कलकोट स्वामींचे 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे वचन किती वेगळे आहे?
२. Romans 12:2 – “Be ye transformed by the renewing of your mind…” विचार बदला- आयुष्य बदलेल हे केवळ बायबलमध्ये लिहिले आहे म्हणून नाकारायचे का?
३. Proverbs 23:7 – “For as he thinketh in his heart, so is he.”- जसा विचार कराल तसे बनाल हा कॉमन सेन्स नाही का? बायबलमध्ये लिहिले म्हणून तो कॉमन सेन्स नाकारायचा?
४. Matthew 21:22 – “And all things, whatsoever ye shall ask in prayer, believing, ye shall receive.”,
Mark 11:24 - “Therefore I say unto you, What things soever ye desire, when ye pray, believe that ye receive them, and ye shall have them.” अशाप्रकारचे आपल्याकडे कोणी आणि कुठे लिहिले आहे याची कल्पना नाही. तरीही हे तत्वतः पटते.
५. Matthew 21:21 - “…If ye have faith, and doubt not… if ye shall say unto this mountain, Be thou removed… it shall be done.”
Luke 17:6 - “If ye had faith as a grain of mustard seed, ye might say unto this sycamine tree, Be thou plucked up by the root… and it should obey you.” - आपल्याकडे मुकं करोति वाचालम... पेक्षा हे वेगळे आहे असे मला तरी वाटत नाही.

(स्पष्टीकरणः ही सगळी वचने मला तोंडपाठ आहेत असे नक्कीच नाही. अशाप्रकारचे वर उल्लेख केलेल्या लेखकांच्या पुस्तकांमध्ये वाचले होते ते आठवले आणि मग नक्की वचन कोणते, ते बायबलमधील कोणत्या पुस्तकात आहे वगैरे चॅटजीपीटीला विचारले).

तेव्हा आपल्याकडे चांगल्या गोष्टी आहेत हे नक्कीच- त्यात अमान्य करण्यासारखे काहीच नाही. मात्र चांगल्या गोष्टी आपल्याकडे आहेत, आपल्याकडे चांगल्या गोष्टी आहेत आणि आपल्याकडे चांगल्या गोष्टी आहेत हा अ‍ॅटिट्यूड थोडा संक्षींप्रमाणे वाटतो.

असो.

सोत्रि's picture

14 Feb 2026 - 4:24 pm | सोत्रि

अशाप्रकारचे आपल्याकडे कोणी आणि कुठे लिहिले आहे याची कल्पना नाही.

चंसुकु तुम्ही वर कोट केलेली वचनं म्हणात असाल तर, भगवत गीता ही सगळी वचनं कव्हर करते.

मात्र चांगल्या गोष्टी आपल्याकडेच आहेत, आपल्याकडे चांगल्याच गोष्टी आहेत आणि आपल्याकडेच चांगल्या गोष्टी आहेत

असंं न म्हणता, त्यांच्याकडेही चांगल्या गोष्टी आहेत असं म्हणणं जास्त सयुक्तिक असेल, पण चांगल्याच आहेत असं म्हणता येत नाही. माझ्या दृष्टीने त्याची कारणमिमांसा देतो, जरा शब्दबंबाळ असेल पण भावना समजून घ्या अशी विनंती.

पाश्चिमात्य तत्वज्ञ प्रामुख्याने भौतिक पातळीवरच्या (इंद्रियजन्य) आयुष्याबद्दल (पर्सनल डेवलपमेंट) बोलतात. ज्यामुळे ते स्पष्टीकरण आपल्या रोजच्या जीवनाशी रिलेटेबल होऊन सोपे वाटते आणि समजते.
उदाहरणार्थ नॉर्मन व्हिन्सेंट पील यांच्या पुस्तकाची यादी बघितली तर हे स्पष्ट होतं.

  • The Power of Positive Thinking
  • True Joy of Positive Living: An Autobiography
  • You Can If You Think You Can
  • Positive Thinking Every Day: An Inspiration for Each Day of the Year
  • A Guide to Confident Living
  • Six Attitudes for Winners
  • Confidence
  • Reaching Your Potential

नेव्हिल गॉडर्ड यांच्या पुस्तकाची यादी बघितली तर हे स्पष्ट होतं

  • Your Faith is Your Fortune
  • The Power of Awareness
  • Feeling Is the Secret
  • The Power of Imagination: The Neville Goddard Treasury
  • Relax More, Try Less: The Easy Path to Abundance
  • The Wealth Mindset: Understanding the Mental Path to Wealth
  • Imagination Creates Reality

पण भारतीय आस्तिक आणि नास्तिक दर्शनशास्त्रे किंवा तत्वज्ञान, भौतिक पातळीवरच्या (इंद्रियजन्य) आयुष्याच्या पलीकडील सत्याचा उलगडा करून देण्याचा प्रयत्न करतात. ते जे उलगडून सांगतं ते इंद्रियातीत असल्याने निराकार आहे आणि त्याची अनुभूती एक्झॅक्ट शब्दांत पकडण कठीण आहे. त्यामुळे त्याला सगुण साकार रुपात समजावून सांगाण्याचा मार्ग शोधला आणि तिथेच सगळी गडबड झाली. ते सगळं तत्वज्ञान वेगवेगळया ‘स्कूल ऑफ थॉट्स’ मधे विभागलं जाऊन, त्या त्या स्कूल ऑफ थॉट्सच्या शाब्दिक अवडंबरामुळे शब्दबंबाळ होऊन नक्की काय करायचे याचा कसलाही अर्थबोध न होणाऱ्या भाषेत अडकून पडलं.

- (चर्चोत्सुक) सोकाजी

चंद्रसूर्यकुमार's picture

14 Feb 2026 - 5:13 pm | चंद्रसूर्यकुमार

पण भारतीय आस्तिक आणि नास्तिक दर्शनशास्त्रे किंवा तत्वज्ञान, भौतिक पातळीवरच्या (इंद्रियजन्य) आयुष्याच्या पलीकडील सत्याचा उलगडा करून देण्याचा प्रयत्न करतात. ते जे उलगडून सांगतं ते इंद्रियातीत असल्याने निराकार आहे आणि त्याची अनुभूती एक्झॅक्ट शब्दांत पकडण कठीण आहे. त्यामुळे त्याला सगुण साकार रुपात समजावून सांगाण्याचा मार्ग शोधला आणि तिथेच सगळी गडबड झाली. ते सगळं तत्वज्ञान वेगवेगळया ‘स्कूल ऑफ थॉट्स’ मधे विभागलं जाऊन, त्या त्या स्कूल ऑफ थॉट्सच्या शाब्दिक अवडंबरामुळे शब्दबंबाळ होऊन नक्की काय करायचे याचा कसलाही अर्थबोध न होणाऱ्या भाषेत अडकून पडलं.

अगदी सहज शक्य आहे. पाश्चिमात्य तत्वज्ञ इंद्रियातीत गोष्टी बोलत असले तरी त्याचा आपण कसा उपयोग करून घेऊ शकू- लॉ ऑफ अ‍ॅट्रॅक्शन वगैरे हे सांगतात. ते अधिक रिलेटेबल वाटत असावे.

शाब्दिक अवडंबरामुळे शब्दबंबाळ होऊन नक्की काय करायचे याचा कसलाही अर्थबोध न होणाऱ्या भाषेत अडकून पडलं.

माझी सुरवातही हे सगळे नक्की काय आहे हे समजून घ्यावे या उत्सुकतेतून झाली. पण भवसागर तरून जाणे, जग ही माया आहे वगैरे उल्लेख आल्यावर त्यातून कसलाही उलगडा झाला नाही आणि ते अजिबात रिलेटेबल वाटले नाही. या सगळ्या गोष्टींचा अनुभव घ्यायला पाहिजे- ते शब्दात व्यक्त करता येणार नाही हे अगदी १००% मान्य. पण मग अशी अनुभूती ज्यांना खरोखरच होत असेल ते लोक 'आमचेच काय ते सगळे चांगले आणि इतरांकडे भुसा भरला आहे' असा अ‍ॅटिट्यूड ठेवतील का? माझ्या मर्यादित सॅम्पल सेटमध्ये मी ज्यांच्याशी चर्चा केली आहे त्यांच्या आर्ग्युमेंटची सुरवातच भारतीय तत्वज्ञान श्रेष्ठ किंवा पाश्चिमात्यांच्या तत्वज्ञानापेक्षा श्रेष्ठ इथपासून झालेली बघितलेली आहे. असेलही. अजिबात नाकारत नाही. पण हे अनुमान तुलनात्मक अभ्यास केल्यानंतर काढता यायला हवे. अभ्यासाअंती जे अनुमान निघायला हवे तेच प्रिमाईस म्हणून वापरले तर कसे चालेल? माझे अशा बहुसंख्य लोकांशी पटत नाही ते त्या कारणाने.
असो.