चौकोनी वड्या
बायकोने मोठ्या हौसेने आटवलेला आमरस आणि नारळाच्या वड्या करायला घेतल्या होत्या. मिश्रण चौकोनी ट्रेमध्ये एकसमान पसरून कालथ्याने अगदी एकासारख्या एक छान चौकोनी वड्या कातल्या होत्या. "जरा बघ तर अशा झाल्या आहेत" असं विचारत तिने कौतुकाने एका छोट्या ताटलीत मला दोन वड्या दिल्या.
त्या वड्या पाहून मी बालपणात गेलो. साधारण पंचावन्न-साठ वर्षांपूर्वीचा काळ. पांढरपेशा नोकरदारांचा एक सुसंस्कृत मध्यमवर्ग होता. साधा सरळ मध्यमवर्ग. साज होता, पण माज नव्हता. खायला-प्यायला भरपूर होतं, पण भपका नव्हता. नुकताच संसार थाटलेले मध्यमवर्गीय वाडीत किंवा चाळीत वसले होते. काळाच्या गरजेनुसार एकत्र कुटुंबात जन्मलेली आणि वाढलेली मुलं लग्नानंतर स्वतंत्र बिऱ्हाड करून राहात होते. काही गृहिणी नोकरी करत होत्या, तर बऱ्याच पूर्णवेळ गृहिणी होत्या. तर या मध्यमवर्गीय गृहिणींकडे वड्या थापायला चौकोनी ट्रे नव्हते. वड्या थाळ्यांत थापल्या जायच्या. आई वड्या करत आहे हे लक्षात आल्यावर मुलं आसपास टुकत असायची. कधी एकदा आईच्या वड्या होतात आणि कधी आमच्या हातावर ठेवल्या जातात, याची आतुरतेने वाट पाहत मुलं बसायची. आता थाळा गोल आणि वड्या तर चौकोनी! मग सुग्रणी मधला चौरस आखून त्यात कलथ्याने एकसमान वड्या कातायच्या. त्या कातत असताना चौरसाबाहेर चार बाजूंना चार कमानी तयार व्हायच्या आणि त्या भागातसुद्धा वड्या कातल्या जायच्याच, पण त्या चौकोनी नसायच्या, तर एक बाजू सरळ, एक बाजू गोलसर अशा असायच्या आणि अर्थातच त्या तुकडे स्वरूपात असायच्या. पोराटोरांच्या हातावर परिघातले तुकडे दिले जायचे. पण मुलांना मस्त चौकोनी संपूर्ण वडी हवी असायची. मग आणखी एक तुकडा हातावर ठेवत आई समजूत घालत म्हणायची, "अरे, चव तीच आहे, फक्त तुकडे आहेत इतकंच. आपण तर घरातले, आपण तुकडे संपवू या, कुणी पाव्हणारावणा आला तर त्याला तुटक्या वड्या का द्यायच्या?" असं सांगत आई सुबक चौकोनी वड्या डब्यात भरून ठेवायची.
जीवनमान अगदी साधं होतं. जेवायला टेबल-खुर्च्या नसायच्या, रात्री आठच्या सुमारास कामावरून आलेले बाबा, अभ्यास संपवलेली मुलं आणि दिवसातील अखेरच्या पर्वात असलेली आई अशी पंगत गोलाकार बसायची. गप्पा मारत जेवणं व्हायची. सगळं आवरून आटपून गाद्या घातल्या जायच्या आणि दहाच्या सुमारास सगळी गुडुप व्हायची. राहणीमान साधं, साहजिकच वस्तू मर्यादित लागायच्या. चहाच्या कपबशीतल्या बशीत शिरा, पोहे खाल्ले जायचे, अगदी पाहुण्यांनासुद्धा बशीत दिलं जायचं आणि त्यात कुणाला काही वाटत नव्हतं. काचेच्या प्लेट, बोल वगैरे ( खरं तर बाउल) वगैरे फार थोड्या जणांकडे असायचे. मे महिन्यात आलेल्या पाहुण्यांना बशीत आंब्याच्या फोडी दिल्या जायच्या. हे अगदी जवळचे बरं का, फोडी छान चोखून अगदी सालापर्यंत निःसंकोचपणे खाणारे. लोकही मोकळेढाकळे होते. कुणाकडे चहाबरोबर बिस्किट दिलं, तर सररास ते चहात बुडवून खाल्लं जायचं.
कपडे मोजके असायचे. समारंभात घालायचे कपडे वेगळे जपून ठेवलेले असायचे. घरचा कर्ता कामावर जायला परीटघडीचे कपडे घालायचा, इतरांना गरज भासत नव्हती. अगदी एसएससी/ मॅट्रिक होईपर्यंत मुलं अर्ध्या विजारी घालायची. मुळात शाळेत गणवेश आणि आल्यावर खेळायला, हुंदडायला साधे कपडे याव्यतिरिक्त कपडे लागतच नसत.
मध्यमवर्गीय कुटुंबांचा एक ठरलेला कार्यक्रम म्हणजे महिन्यातून एकदा सिनेमा आणि हॉटेल. चित्रपटगृहं साधी आणि एसी असून नसल्यासारखी. आवडीनुसार सिनेमाऐवजी नाटक आणि मध्यंतरात बटाटावडा. ठाण्यात तेव्हा फक्त मो.ह. विद्यालय हे एकमेव खुलं नाट्यगृह होतं. प्रवास, सुट्टी आली की बाहेर फिरायला रिसॉर्टमध्ये जाणं ही संकल्पनाच नव्हती. मध्यमवर्गीय अजून पर्यटनासाठी बाहेर पडला नव्हता. परगावी जाणं म्हणजे एखाद्या नातेवाइकांकडे किंवा लग्नाला. आपण जातोय त्यांची जागा किती आहे आणि तिथे आपली गैरसोय किंवा आपण गेल्यामुळे त्यांची गैरसोय होईल, हा विचारही मनाला शिवला नव्हता. आत्ते-मामे-चुलत-मावस भावंडं एकत्र जमायची, दंगा करायची, असेल ते जेवायची आणि असेल त्या जागेत झोपायची.
मध्यमवर्गाचं अंदाजपत्रक फार सरळ आणि सोपं - वाण्याचं बिल, दूध, घरभाडं या तीन पावलांत संपायचं. दूध हा बहुधा जरा महाग किंवा श्रीमंती प्रकार वाटत असावा. त्या काळातील कथांमध्ये, चित्रपटांमध्ये जर घरावर आर्थिक संकट आलं, तर दूधवाल्याला दूध कमी टाकायला सांगितल्याचे उल्लेख होते. अर्थात ही मोठी कलमं सोडता किरकोळ खर्च, वर्षभरात जायला लागणाऱ्या लग्नं-मुंजीत करावे लागणारे आहेर, सणवार, कपडे इत्यादीची तरतूद असायची. मात्र संसार चातुर्याने चालवणाऱ्या कुशल गृहिणी जमेल तसे पैसे वाचवून ते पोथीत, डाळीच्या डब्यात वा जुन्या पर्समध्ये किंवा पेटीत ठेवायच्या आणि अडीअडचणीला हा निधी उपयोगी पडायचा. माझा जन्म झाला, तेव्हा आईने माझ्या बाबांना इस्पितळात जेवण आणायला सोपं पडावं, म्हणून फळीवरची विणलेली बास्केट आणायला सांगितली होती. बाबांनी ती बास्केट काढली आणि आनंदाने, उत्साहाने ते उलटपावली आईला भेटायला गेले, कारण बाबांना त्या बास्केटमध्ये दहाची एक नोट सापडली! तेव्हा दहा रुपयांत दुधाच्या पावडरचा डबा यायचा.
वाणी सामानाची यादी देऊन महिन्यांचं वाणसामान मागवलं, तरी अधूनमधून काही ना काही लागायचं. पगार झाल्यावर सामानाचे पैसे एकरकमी चुकते केले जायचे. वाणी लोकांचे ग्राहकांशी चांगले संबंध होते. मी साधारण आठवी-नववीत असताना एकदा आमच्या वाण्याने मला पोस्टमन तेलाचा चार किलोचा एक डबा हवा असताना जबरदस्तीने दोन डबे दिले होते. म्हणाला, "बाबांना सांग, पैसे नंतर दिले तरी चालतील, पण आज घेऊन जा." ४७ रुपयांचा डबा एकदम ५७ होणार होता. वाणी लोकांची खातरी होती की मध्यमवर्गीय माणसं आपले पैसे कधीच बुडवणार नाहीत.
खायला चांगलं हवं, पण दोन पैसे वाचावेत म्हणून गहू, तांदूळ, डाळी, कडधान्यं हमखास मशीद बंदरवरून घाऊक बाजारातून आणले जायचे. धडपड्या आणि हौशी मध्यमवर्गीयांनी आपापसात ठरवून दहा-वीस कुटुंबं एकत्र यादी करायची आणि कुणीतरी दोन-तीन जण जाऊन खरेदी करायचे. सामान ट्रकने यायचं आणि एखाद्या घरात उतरवून मग तिथून वितरण व्हायचं. आपल्या घरात पसारा कशाला हा विचार नसायचा, वर सामान न्यायला आलेल्या मंडळींना चहापाणी केलं जायचं. बहुधा ग्राहक पंचायत, ग्राहक पेठ वगैरे सर्वसामान्य माणसाला रास्त भावात चांगलं धान्य मिळवून देण्यासाठी निर्माण झालेल्या संस्थांचा पाया अशा मध्यमवर्गीयांनीच घातला असावा. सणासुदीच्या स्वयंपाकात आणि कधीतरी मुलांच्या हातावर ठेवायला सुकामेवा हवाच आणि अर्थातच रूगनाथ देवजी, वाडीलाल चंपकलाल, विठ्ठलदास मेवावाला यांसारख्या नामांकित घाऊक व्यापाऱ्यांकडून तो एकत्रित आणला जायचा. आणायला गेलेली मंडळी मशीद बंदर स्थानकावर मूग भजी खायला विसरायची नाहीत.
मूग भजी म्हटल्यावर आठवण झाली ती महालक्ष्मीची. नवरात्रात महालक्ष्मीचं दर्शन हा मध्यमवर्गीयांचा ठरलेला कार्यक्रम. सकाळी लोकलची गर्दी सुरू व्हायच्या आत निघायचं, भायखळ्याला उतरून बस पकडायची आणि महालक्ष्मी मंदिरासमोर उतरून रांगेत उभं राहायचं. सकाळी लवकर गेलं तर दर्शन लवकर आणि मनासारखं व्हायचं. महालक्ष्मी मंदिराच्या परिसरात जत्रा भरायची. पूजा साहित्य, माळा, खोटे दागिने, कपडे, खाद्य पदार्थ असे ठेले लागलेले असायचे. पैकी गरम गरम कुरकुरीत मूग भज्यांच्या ठेल्यावर ती सुप्रसिद्ध भजी खायला गर्दी व्हायची.
मुंबई आणि उपनगरात राहणारे मध्यमवर्गीय एखाद्या रविवारी आपल्या नातेवाइकांना भेटण्यासाठी निघायचे. आधी सांगायची गरज नसायची. सरळ जाऊन ठेपायचं. यजमानांनासुद्धा पाहुणे पाहून आनंद व्हायचा, गप्पा रंगायच्या. जिथे जायचं, ते ठिकाण स्टेशनपासून जवळ असणं महत्त्वाचं, पार्किंगची चिंता करायला गाडी कुणाकडे होती? गाडीचं आकर्षण सर्वांनाच असतं आणि असायचं, पण आपल्याकडे गाडी नाही याची खंत नव्हती. गाडी ही फक्त डॉक्टर, वकील, व्यापारी किंवा उच्चपदस्थ यांच्याकडेच असणार, हा रुढ संकेत होता. मध्यमवर्गीय माणसाला गाडी परवडणारी नव्हती आणि गरजही नव्हती. गल्लीत अवघ्या चार-पाच गाड्या असायच्या. त्या काळात पैसेवाल्यांना गाडी आगाऊ रक्कम देऊन प्रतीक्षा करावी लागत असे. मुंबईपेक्षा ठाण्यात नंबर लवकर लागेल, म्हणून मुंबईत राहत असलेले धनिक आपल्या उपनगरात किंवा ठाण्यात राहणाऱ्या नातेवाइकांचा पत्ता देऊन गाडीची मागणी नोंदवायचे. जे गाडीचं, तेच फोनचं. नोंदवल्यापासून अनेक वर्षांनी नंबर लागायचा. मध्यमवर्गीयांना कोणाचे फोन येणार आणि ते कुणाला करणार? मात्र इमारतीत राहणाऱ्या फोनवाल्यांचा नंबर अडीअडचणीला लागला तर असावा, म्हणून नातेवाइकांना दिला जायचा.
मुलांच्या शाळा शक्यतो घराजवळच्या निवडल्या जायच्या. मुलं एकत्र जा-ये करायची. क्लासेस हा प्रकार तेव्हा पसरला नव्हता, आवश्यक तेव्हा शिकवणी लावली जायची. पण मध्यमवर्गीय मुलांना आपल्या आईवडिलांनी आपल्याला इथपर्यंत आणून सोडलं आहे आणि आपल्याला पुढे जायचं आहे, ही जाणीव होती आणि ते स्वप्नही होतं. आणि त्यासाठी पोरं झटू लागली होती. यांचं मध्यमवर्गीयांत वडिलांच्या पश्चात स्वतः अविवाहित राहून धाकट्या भावंडांची शिक्षणं पुरी करणारी मोठी भावंडं होती.
हळूहळू ब्लॉक हा शब्द कानावर यायला लागला. हो, ब्लॉकंच, फ्लॅट हा शब्द मध्यमवर्गीयांना माहीत नव्हता. कष्टाने, जिद्दीने चाळीत वा वाडीत राहणारे मध्यमवर्गीय सहनिवासात जाऊ लागले. हा प्रगतीचा पाया होता.
उपसंहार
मध्यमवर्गीयांची प्रगती सुरूच राहीली. मध्यमवर्गीय हळूहळू उच्च मध्यमवर्गीय किंवा उच्चवर्गीय झाले. खूप सुबत्ता आली. एकेकाळी शब्दकोशात नसलेल्या वस्तू घरात आल्या. मुलं, नातवंडं परदेशी गेली, इथे उच्चशिक्षित झाली, मोठ्या पदावर पोहोचली. आपल्या आईवडिलांनी आपल्याला खूप काही दिलं, आता आपण त्यांचं कौतुक केलं पाहिजे, म्हणून त्यांना महागडे कपडे, चपला-बूट, गृहोपयोगी साधनं देऊ लागले. मात्र मध्यमवर्गीय माणसाला ते खटकत होतं. निवृत्त जीवनाची भक्कम तरतूद करून ठेवलेले ऐपतदार मध्यमवर्गीय मात्र चैनीला रुळले नाहीत. "ऐपत असूनही महागडे कपडे वापरले नाहीत, आता भारी कपडे घालून कुठे जायचाय?" असं म्हणत राहिले. मात्र ते गबाळे कधीच राहिले नाहीत. कायम नीटनेटके, चांगले कपडे व मोजके दागिने अवश्य होते; फक्त त्यांना केवळ मोठ्या नावासाठी अवाच्या सव्वा पैसे मोजायचा मोह पडला नाही.
मुलांनी गाडीचा, ड्रायव्हरचा आग्रह केला, तरी ते म्हणत की "गाडी काय करायची, हवी तेव्हा रिक्षा मिळते, ओला-उबर आहेतच." ते कंजूस वा कद्रू नक्कीच नाहीत. पण ते आपली मूळं घट्ट धरून आहेत. आजही चौकोनी वडीला हात न लावता ते वडीच्या बाजूचे तुकडे आनंदाने खात आहेत; फरक इतकाच की आज चौकोनी वड्या पाहुण्यांऐवजी मुलाबाळांसाठी ठेवत आहेत.
प्रतिक्रिया
22 Oct 2025 - 12:55 am | श्वेता२४
लहानपणापासून अशाच वातावरणात वाढले आहे. त्यामुळे सर्व आठवणी जाग्या झाल्या...
24 Oct 2025 - 9:17 pm | सर्वसाक्षी
प्रतिसादासाठी आभार
22 Oct 2025 - 11:18 am | कर्नलतपस्वी
आपल्या लेखनातून आपले वय कळते. पन्नास साठच्या दशकात जन्मलेले,हातातोंडाशी गाठ असणारे पण समाधानी लोक.
त्या वड्या पाहून मी बालपणात गेलो.
हा मात्र चौकोनी वडी पाडणाऱ्या सुगरणीवर अन्याय आहे.
आपण तुकडे संपवू या,
आजही
चकलीचा डबा उघडताना तंबी दिली जाते. पहिल्यांदा तुकडे संपवा. गोल चकल्या वन्संना डब्यात द्यायच्या आहेत.
आई वड्या करत आहे हे लक्षात आल्यावर मुलं आसपास टुकत असायची.
सत्तरी उलटली तरीही हेच करतो फक्त स्वयंपाकघरातील चुलीपुढली आई भिंतीवर जाऊन बसली आहे आणी तीचीच परंपरा चालवणारी किचन मधे........ अजुनही बालपणात संपले नाही याचे सुख आहे.
बाकी स्मरणरंजन आवडले.
24 Oct 2025 - 9:19 pm | सर्वसाक्षी
सविस्तर प्रतिसादासाठी आभार. वय वाढले तरी काही समज दृढ असतात
24 Oct 2025 - 9:23 pm | सर्वसाक्षी
धन्यवाद. सविस्तर प्रतिसादासाठी आभार. वय वाढले तरी काही समज दृढ असतात
22 Oct 2025 - 4:45 pm | स्वधर्म
खूप आवडले. कधी कधी लहानपणीचे टंचाईचे दिवसच अधिक सुखाचे होते असं वाटतं. खरं तर तेव्हा समस्या जास्त होत्या, तरीही.
24 Oct 2025 - 9:20 pm | सर्वसाक्षी
समस्या म्हणाल तर अनेक समस्या या समस्या वाटतंच नव्हत्या. तो दैनंदिन जीवनातील एक भाग समजला जायचा
24 Oct 2025 - 9:22 pm | सर्वसाक्षी
समस्या म्हणाल तर अनेक समस्या या समस्या वाटतंच नव्हत्या. तो दैनंदिन जीवनातील एक भाग समजला जायचा
24 Oct 2025 - 9:24 pm | सर्वसाक्षी
समस्या या समस्या न वाटता जीवनाचा एक भाग म्हणून स्वीकारल्या जात होत्या
23 Oct 2025 - 2:27 pm | निमी
चौकोनी वड्या बालपणात घेऊन गेल्या.. चौकोनी वड्या नेहमीच रूबाबात असायच्या.. नंतरच्या काळात तितक्याच आवडीने गोलाकार वड्या खाणाऱ्या मुली आता गोड पदार्थच कमी खातात तेव्हा चौकोनी वड्यांनाच काय वाटत असेल असे वाटते.
24 Oct 2025 - 9:25 pm | सर्वसाक्षी
प्रतिसादासाठी आभार
25 Oct 2025 - 1:01 pm | सुप्रिया
खुप सुन्दर आणि चित्रदर्शि वर्णन केलंय त्या काळातलं. पटलं.
14 Nov 2025 - 5:47 pm | श्वेता व्यास
वर्णन आवडलं, हा मध्यमवर्ग आता हरवत चाललाय याची खंत आहे. ऐपत नसताना सगळीकडे कसली ना कसली मुक्त उधळपट्टी आणि स्पर्धा चालू आहे.