दिवाळी अंक २०२५ - स्वानंदाचा शोध - लेख

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in दिवाळी अंक
20 Oct 2025 - 12:00 am

1

विशेष निवेदन -

१. मिपाकरांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.

२. दृकश्राव्य माध्यम जास्त परिणामकारक असते. या माध्यमातून वाचकांना अधिक माहिती मिळावी, म्हणून तू नळीवरील काही संदर्भ दिले आहेत. बघितलेच पाहिजेत असा अट्टाहास नाही.

३. प्रकाशचित्रे निकॉन डीएसएलआर डी ३४०० आणि निकॉन ४२ ॲटो झूमने टिपली आहेत.

४. पुनरावृत्तीचा दोष आढळल्यास क्षमस्व.

स्वानंद.. ही सर्वांचीच गरज असते. प्रत्येकाचा मार्ग वेगळा. मी पक्षिनिरीक्षणात आनंद शोधतो. मार्ग कुठलाही असो, तो सकारात्मक, समाजमान्य आणि आपल्याबरोबर इतरांनाही आनंद देणारा असावा. आनंदाची अनुभूती एकसारखीच असते.

वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे। पक्षी ही सुस्वरे आळविती।। ध्रु. ।।
येण सुखे रुचे एकांताचा वास। नाही गुणदोष अंगा येत ।। १ ।।
आकाश मंडप पृथिवी आसन। रमे तेथे मन क्रिडा करी ।। २ ।।
कथा, कमंडलू देह उपचारा, जाणवितो वारा अवसरु ।। ३ ।।
हरिकथा भोजन परवडी विस्तार। करोनि प्रकार सेवु रुची ।। ४ ।।
तुका म्हणे होय मनासी संवादु। आपलासी वाद आपणासी ।। ५ ।।
- संत तुकोबाराय

तासनतास जंगलात भटकणे हा माझ्या जिवाचा विसावा आहे. भटकंतीमध्ये वाचलेले, ऐकलेले पक्षी पाहिले,अनुभवले. 'पेरते व्हा पेरते व्हा' आवाज करणारा पावश्या, गर्द झाडीत लपून बसणारा, सहसा दृष्टीस न पडणारा कारुण्य कोकीळ, चातक, नर्तक, चक्रवाक टिपले. सुरवंटांचे सुंदर, नक्षीदार फूलपाखरात रूपांतर पाहिले. चतुर कीटकांच्या हवेतल्या प्रणयलीला पाहिल्या. शिकारी पाठलाग करताना आणि शिकार जिवाच्या आकांताने धूम ठोकताना बघितले. भट चंडोल, दक्षिणी चंडोल, दयाळ, कोकीळ यांचे गाणे, वटवट्यांचा, शिंप्यांचा चिवचिवाट तर सातभाईं, साळुंक्या, टिटव्यांचा कलकलाट ऐकला. अनुनय, प्रियाराधन, प्रजोत्पादन आणि कौटुंबिक लागेबांधेही बघितले. वर्षा ऋतूत हवाहवासा हिरवागार रंग, विविधरंगी रानफुले, बागडणारी सतरंगी फुलपाखरे, चतुर बघताना अक्षरशः: तंद्री लागली. ऋतु-काळापरत्वे रूप पालटणारा निसर्ग बघितला, अनुभवला. पक्षिनिरिक्षणात मानवी भावनांचा पसारा अनुभवास आला. षड्रिपूचे दर्शन झाले. पण निसर्गातले षड्रिपूंचे स्वरूप मानवजातीत दिसणाऱ्या षड्रिपूंपेक्षा वेगळे वाटले. उदाहरणार्थ काही निरीक्षणे.

काम
ब्राह्मणी मैना व सातभाई एकत्र दाणे टिपत असले, तरी सातभाई मैनेला 'आती क्या खंडाला' असे म्हणताना कधीच ऐकले नाही.

एक दिवस तळ्याकाठी उभा होतो. हळदीकुंकू बदक (Indian spot bill duck) श्री. आणी सौ. तळ्यात विहार करत होते. सौ. बदकीण श्री. बदक यांना झुलवत होती. तिचा तो नखरेलपणा भाव-भंगिमेतून स्पष्ट दिसत होता. इप्सित कार्य सिद्ध झाले. बदकीण लाजून पळाली. तिचा 'लाजून हासणे अन हासून ते पहाणे' असा तो आविर्भाव बघतच राहिलो. चित्रफीत बघितली तर वाचकांना अगदी असेच वाटेल.

माझी न मी राहिले,
तुजला नाथा सर्व वाहिले..
- इती शांताबाई

नकळत सारे घडले..
मनी सुगंध उधळित नाचे,
क्षण, मलाच माझे नकळे
- इती रमेश आणावकर

काही न झाल्याच्या आविर्भावात बदकमहाशय मात्र पाण्यात अंग झाडू लागले. (चित्रफीत संग्रही आहे. ऑन डिमांड मिळू शकेल.) डोंबारी, कुदळ्या, काळा अवाक, अमेरिकन किल डियर दांपत्य रतिक्रीडेत मग्न असताना बघितली आहेत. क्षणभर माझी अवस्था कविवर्य ग्रेस यांच्या कवितेसारखी झाली.

वृद्ध देखणा चेहरा माझा
बिगुल मुखातून बाजे
पराभवाच्या पर्वा मध्ये
जसे उजळती राजे...

क्रोध
कितीही बलशाली पक्षी असला, तरी तो उगाच दुसऱ्या छोट्या दुर्बळ पक्ष्यावर हल्ला करत नाही. दाणे टिपताना भांडण करत नाहीत. प्रत्येकाचे आपले वेगळे क्षेत्र, सर्व जण प्रादेशिक अखंडतेचे (territorial integrityचे) पालन करतात. नर्तक (Paradise Flycatcher) आणि चातक (Jacobin Cuckoo) या दोन्ही स्थलांतरित पक्ष्यांवर स्थानिक कावळ्यांनी हल्ला चढवलेला बघितला आहे.

मद
मी बलशाली आहे असा गर्वही नसतो. पोट भरलेले असले की शिकार व शिकारी दोघेही एकाच फांदीवर बसलेले दिसले.

लोभ
शेतात जोंधळ्याचे पीक भरपूर, राखणदार असो किंवा नसो, तरी पक्षी पोटापुरते आणि तेसुद्धा फक्त त्याच वेळेस पुरेल एवढेच खातात. संचय अजिबात करत नाहीत.

मोह
पक्षी एकच घरटे बांधतात. काही पक्षी त्याचा पुन्हा पुन्हा उपयोग करतात. सेकंड होम किंवा भाड्याने देण्यासाठी वेगळे घरटे बांधण्याची संकल्पना पक्ष्यांमध्ये दिसली नाही. पुत्रमोह, वंशाचा दिवा वगैरे काही नसते. पिल्ले सक्षम झाली की उडून जातात, ऋणानुबंध संपतो. मातृपितृऋण वगैरे नसते. माणसांचे तसे नाही. कवी बोरकर म्हणतात,

पिलास फुटुनी पंख तयांचे
घरटी झाली कुठे कुठे
आता आपुली कांचनसंध्या
मेघडंबरी सोनपुटें

मत्सर
जीववैविध्य, रंग, रूप, आकार, घरटी यामध्ये विविधता असूनही पक्षी एकमेकांशी तुलना कधीच करत नाहीत. स्वमग्न असतात. कावळ्याला काळ्या रंगाचे दु:ख नसते, तर बगळ्याला गोरेपणाचा गर्व नसतो. कावळा आणि बगळा यांची गोष्ट सर्वस्वी काल्पनिक, माणसाने रचलेली आहे. लहानपणीची कविता आठवते का?

कावळा म्हणे मी काळा
पांढराशुभ्र तो बगळा

वहावा तयाची करती
मजलागी धिक्कारती

मग विचार त्याने केला
पैशाचा साबू आणला

फासून सर्व शरीराला
दगडाने घाशीत बसला

घाशिले अंग बहुबळे
रक्तबंबाळ तो झाला
शेवटास बापुडा
मरून गेला....

या सर्व कवीच्या कल्पना. माळरानात म्हशीच्या पाठीवर कावळा, बगळा एकमेकाशेजारीच बसलेले पाहिले आहेत.

रोज सकाळी टेलिव्हिजनवर तासभर चिटकून रहाणारे, रामदेवबाबांना (? ? ?) न्याहळणारे वयस्क 'योगा', शरीरस्वास्थ्यासाठी किती अनिवार्य आहे यावर हिरिरीने मत मांडताना दिसतात. 'योगश्चित्तवृत्तिनिरोध'सारखे जडव्यागळ शब्द तोंडावर फेकून मारतात. अंतर्मुख होऊन विचार केला. मी तर असे काही करत नाही, काही चुकतेय का आपले?असो.

संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांवर गोनिदा यांचे "तुका आकाशात एव्हढा",चरित्रात्मक पुस्तक वाचले. त्या मधे तुकोबाराय भंडाऱ्या डोंगरात ध्यान लावून बसले असताना प्रथम अनुभव आला व त्यांच्या मुखातून "आनंदाचे डोही आनंद तरंग",हा अभंग प्रस्फुटित झाला.

सहज मनात विचार आला की स्वानंदच्या कसोटीवर, ध्यानयोग आणी छंद,(पक्षी निरीक्षण) यामधे साम्य आणी फरक असेल काय?
'ध्यान' अर्थात पतंजली योगसूत्रातली ही सातवी पायरी. आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी यामधील एक. योगसाधना करताना यम, नियम यासारख्या मूलभूत तत्त्वांचे पालन करणे आवश्यक असते. अर्थात पतंजली योगसूत्रे हा लेखाचा विषय नाही. तेवढा माझा अभ्यास, क्षमता आणि योग्यताही नाही. विषय विशेष पक्षिनिरीक्षण आहे.

गेली तीन वर्षे मी स्वानंदासाठी सातत्याने पक्षिदर्शनाचा छंद जोपासत आहे. अल्प अनुभवानुसार पक्षिनिरीक्षण म्हणजे तल्लीन करणारा अनुभव, स्वतःशी जोडण्यास मदत करतो. लिखित, अलिखित नियमाबरोबरच संयम, सातत्य, चिकाटी, एकाग्रता यासारखे गुण अवश्यक असतात. इतर छंद जोपासताना 'सुकाणू' छंद जोपासणारांच्या हातात असते. पक्षिदर्शन छंद जोपासताना निरीक्षक सर्वस्वी निसर्गावर अवलंबून असतो.

निरीक्षण करताना पक्षी दिसेल न दिसेल, गाणे गाईल न गाईल याची शाश्वती नसते. किंबहुना ऐकण्यासाठी वाट पाहावी लागते. कित्येक वेळा उद्दिष्ट साध्य होईलच असे नक्की नाही. परंतु थोड्या वेळासाठी का होईना, इतर सर्व गोष्टी विसरायला होतात. मनातील चलबिचल कमी होते. मनात शांतता, स्थिरता अनुभवास येते. घरटे, उड्डाण, शिकार, कोर्टशीप, पॅरेन्टिंग यासारखे दृश्य दिसल्यास काही काळ आनंदात जातो.

मूलभूत फरक -
प्रथमदर्शनी लक्षात आलेला / येणारा मुलभूत फरक म्हणजे,

ध्यानयोगामध्ये अंतर्मन आणि आंतरिक जग केंद्रस्थानी असते, तर पक्षिनिरीक्षणामध्ये बाह्य जग आणि निसर्ग केंद्रस्थानी असतो.

ध्यानयोग ही स्थिर, शांत एका जागी बसून करण्याची एक क्रिया आहे, तर पक्षिनिरीक्षण एक सक्रिय आणि बाह्यक्रिया आहे.

ध्यानयोगाने आंतरिक शांती मिळते. पक्षिदर्शन मन:शांती, निसर्गाचे ज्ञान आणि अनुभव देते.

मूलभूत फरक तळागाळाशी जाऊन अभ्यासला असता, दोन्ही क्रियांमध्ये अनेक प्रकारे साम्य आहे, असे लक्षात आले.

उद्दिष्ट -
ध्यानाप्रमाणेच पक्षिनिरीक्षण हे विशिष्ट हेतूने केले जाते. आनंदप्राप्ती हाच मूलभूत उद्देश असतो.

मन काळोखाची गुंफा,मन तेजाचे राऊळ
- कविवर्य सुधीर मोघे

साधक ध्यानयोगाद्वारे मनात खोलवर जाऊन स्वानंदाची लक्ष्यप्राप्ती करण्याचा प्रयत्न करतो. पक्षिदर्शन जरी बाह्य क्रिया असली, तरी अंतत: उद्देश मानसिक, शारीरिक स्वास्थ्य व स्वानंदच असतो.

दोन्ही क्रियांमध्ये इच्छापूर्ती होईल अथवा होणार नाही, याचे अनुमान लावता येणे शक्य नाही. परंतु लक्ष्यप्राप्ती झाली नाही, तरी आनंद मिळतो हे नक्कीच आहे.

पक्षिनिरीक्षणात हा कालावधी तुलनात्मकदृष्ट्या छोटा व शाश्वत मूर्त परिणाम दाखवता येणारा असतो. ध्यानयोग हा सर्वस्वी श्रद्धा आणि विश्वासाची बाब, यामध्ये लागणारा कालावधी आणि मूर्त स्वरूपातील परिणाम दाखवणे शक्य नसते.

समय -
साधकास, निरीक्षकास नित्य, नैमित्तिक आणि अनिवार्य सांसारिक कर्मातून, कर्तव्यातून निश्चित वेळ काढावा लागतो. स्वानंद आणि कर्तव्य यामध्ये तारतम्य बाळगावे लागते.

संयम आणि सातत्य -
प्रयत्न आणि इच्छापूर्ती यांच्यामध्ये विषमता आणि अनिश्चितता असल्याने संयम आणि सातत्य हे प्रमुख मुद्दे लक्षात घ्यावे लागतात. जसे एका दिवसात एकाग्रता, ईश्वरप्राप्ती होत नाही, तसेच एका दिवसाच्या पक्षिनिरीक्षणाने सर्व काही अकलन होत नसते. त्यासाठी बराच कालावधी जावा लागतो. संयम आणि सातत्य असल्याशिवाय मार्गात प्रगती होत नाही.

निरीक्षणातील सातत्य पक्ष्यांबद्दलचे ज्ञान वाढवण्यास मदत करते. नित्याच्या ध्यानयोग क्रियेमुळे शारीरिक बैठकीची क्षमता वाढीस लागतात.

एकाग्रता व चिकाटी -
ध्यान करताना आसनस्थ होऊन चित्तवृत्ती एकाग्र कराव्या लागतात. मनातील विचारांची आंदोलने नियंत्रित करून स्वकेंद्रित एकतानता साधण्याचा प्रयत्न करावा लागतो. नियमित अभ्यासाने विषयाची समज, व्याप्ती लक्षात येते. सृष्टिकर्ता सर्वशक्तिमान आहे हा विश्वास दृढ होत जातो.

पक्षिनिरीक्षणासाठी एकाग्रता व चिकाटी हे गुण अवश्याक असतात. धनुर्धर अर्जुनाला लक्ष्य वेधताना फक्त पोपटाचा डोळाच दिसला, त्याप्रमाणे पक्षी कुठे दिसेल यावर निरीक्षक आपले लक्ष केंद्रित करतो. अनेकदा पक्ष्याचे गाणे, आवाज ऐकू येतो, पण तो दिसत नाही. त्या वेळी एकाच जागी उभे राहून निरीक्षण करण्यासाठी चिकाटी लागते.

पक्षी प्रजोत्पादन काळात घरटे बांधतात. अंडी देतात, उष्मायन प्रक्रियेत दिवस-रात्र घरट्यात एका जागेवर बसून रहातात. पुढे पिल्ले सक्षम होईपर्यंत संगोपन करतात. हे जाणून घेण्यास निरीक्षकाला अनेक वेळा न कंटाळता त्या जागेस भेट द्यावी लागते. निरीक्षक सार्‍या घटनांचे चिकाटीने निरीक्षण करतो. एक अनुभव वानगीदाखल -

नुकतेच - म्हणजे २६ जून २०२५ ते १० सप्टेंबर २०२५ या कालावधीत खडपाकोळी ( Dusky Crag Martin ) दांपत्याच्या वैवाहिक जीवनाचे निरीक्षण करण्याची संधी मिळाली. घरटे बांधण्यापासून ते पिल्ले सशक्त होऊन उडून जाईपर्यंतच्या प्रवासचे छायाचित्रण केले. थ्री जी.बी. मेमरी खर्च झाली. सरासरी तासभर रोज याप्रमाणे पंचेचाळीस तास एका जागी उभे राहून निरीक्षण केले. एकशे पासष्ट व्हीडिओ व जवळपास तेवढीच प्रकाशचित्रे काढली. सहा मिनिटांचा एक असे चित्रफितीचे तीन भाग तू नळीवर डकवले आहेत. खाली लिंक दिली आहे. (कृपया जाहिरात समजू नये.)

2

3

खडपाकोळी ( Dusky Crag Martin )

https://youtu.be/xf7W7TJmioQ?si=XJ_-7RaS7W09RYa6
भाग एक - खडपाकोळी घरटे एखाद्या स्थापत्य अभियंत्याप्रमाणे बांधते.

https://youtu.be/zOhcj0sU9aE?si=FhC6Wwm2fZJqFY2M
भाग दोन - प्रजनन, उष्मायन, उद्भावन कालावधी.

https://youtu.be/3v52mgu-NkE?si=W3KprSfGkifOOtcX
भाग तीन - पालकत्वाची जबाबदारी, पिल्लांचे सक्षमीकरण, स्वतंत्र जीवनकौशल्यांचे (Independent Life Skillsचे) प्रशिक्षण.

बाह्य साधनसामग्री -
पक्षिदर्शनासाठी बाह्य साधन, सामग्री अनिवार्य नसते. नैसर्गिक सौंदर्य, निरीक्षणाची प्रबल इच्छा आणि पर्याप्त वेळ एवढे पुरेसे असते. अनुभवी मार्गदर्शक बरोबर असेल तर उत्तमच. नियमित निरीक्षणाने पक्ष्यांबद्दलचे ज्ञान वाढते. कॅमेरा, दुर्बीण असल्यास अभिलेख (Records) तयार करण्यास मदत मिळते.

तद्वत ध्यानयोगासाठी बाह्य साधन, सामग्री अनिवार्य नसते. साधकाची इच्छा, विश्वास, शांत पवित्र वातावरण आणि पर्याप्त वेळ एवढे पुरेसे असते. गुरुकृपा लक्ष्यप्रप्ती सुकर करते.

तणाव व्यवस्थापन -
साधक ध्यानातून मनाची चलबिचल, गोंधळ थांबवण्याचा प्रयत्न करतो. काही काळापुरता शांत होतो. अभ्यासाने याचा कालावधी वाढत जातो. साधक साधनेद्वारे जीवनातील धावपळ विसरतो, चित्तवृत्ती प्रफुल्लित, तणावरहित अवस्थेमुळे मानसिक, शारीरिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो. साधकाची हळूहळू प्रगती होते. तणाव व्यवस्थापन उत्तरोत्तर अधिक परिणामकारक होत जाते.

पक्षिनिरीक्षणसुद्धा जीवनाच्या धकाधकीतून दूर नेते. निरीक्षक या काळात निसर्गात रमतो, एक प्रकारे स्वमग्न असतो. पक्षिदर्शन हे एकच लक्ष्य असते. मानसिक, शारीरिक ऊर्जा एकत्रित लक्ष्यकेंद्रित झाल्याने चिंता, तणाव, प्रापंचिक सुख-दु:ख थोड्या वेळापुरते विसरून जातो. ही तणावरहित अवस्था शारीरिक व मानसिक स्वास्थ्य सुधारण्यास मदत करते. निरीक्षण पूर्ण झाले की सांसारिक सुखदु:खाचे भान येते.

स्थळ, काळ आणि वेळ -
पक्षी कसे, कुठे, केव्हा बघावेत? निरीक्षण करताना कुठल्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात? हे अभ्यासाने निश्चित करता येते. स्थळ, काळ, वेळ बदलल्याने विविध प्रकारचे अनुभव येतात. एक महत्त्वाचे निरीक्षण - पक्षांमध्ये थोडी जरी असुरक्षिततेची भावना जागृत झाली, तर ते घरटे सोडून निघून जातात. निरीक्षण करताना या गोष्टीवर विशेष लक्ष द्यावे लागते. उदाहरणार्थ, पाणथळ जागी, माळरानी वेगळ्या वेगळ्या प्रकारचे पक्षिदर्शन होते. प्रजननकाळात येणारे अनुभव वेगळे, सूर्योदयाच्य, सूर्यास्ताच्या वेळी पक्ष्यांच्या गतिविधी भिन्न असतात.

ध्यान करण्यासाठी सकाळची वेळ, विशेषतः सूर्योदयापूर्वीची, मन ताजेतवाने व शांत असल्याने आदर्श मानली जाते. इतर वेळा, दुपार किंवा संध्याकाळदेखील फायदेशीर ठरू शकते. झोपण्याअगोदर दिवसभराचा ताण कमी करायचा असेल किंवा झोपेची गुणवत्ता सुधारायची असेल, तर ती वेळही चांगली ठरेल. हे सर्व साधकाच्या इच्छेवर अवलंबून असते. नदीकाठी, मंदिरात, निसर्गाच्या सान्निध्यात केलेले ध्यान चित्तवृत्ती प्रफुल्लित करतात.

अभ्यास -
विषय समजून घेण्यासाठी पक्षिमित्र सक्रिय निरीक्षणाव्यतिरिक्त इतर उपलब्ध स्रोतांतून माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतो. पक्ष्यांचे आकार, रंगरूप, आवाज, स्वभाव यांची माहिती मिळाल्याने सक्रिय निरीक्षण करताना फायदा होतो. इतरांना विषयाची ओळख करून देताना विश्वास बळावतो. पक्षिसंवर्धन, रक्षण करण्यास याची मदत मिळते. अनुभवी पक्षिमित्र, गुरू, मार्गदर्शक भेटल्यास सोन्याहून पिवळे!

माझ्या सोसायटीतील सदस्य याविषयी मदतीसाठी मला बोलावतात. 'अफ्रिकन लव्ह बर्ड, ऑस्ट्रेलियन कोकाटेल' यांच्यावर आलेल्या संकटाचे निवारण करण्यात मला यश मिळाले. यात मला खूप आनंद मिळाला. याबाबत मिपावर एक धागा आहे. वाचकांसाठी खाली लिंक दिली आहे.

https://www.misalpav.com/node/52483

सुरुवातीस साधकाची अशीच अवस्था असते. चित्तवृत्ती एकाग्र करण्याचा सातत्याने प्रयास करतो, पण होत नाहीत. अभ्यासाने एकचित्त होण्यास मदत होते. गुरू,मार्गदर्शक साधकाला धेय्यपूर्तीकडे वाटचाल करताना येणार्‍या अडचणींचे निवारण करतात.

अथ चित्त समाधातुं न शक्नोषि मयी स्थिरम्|
अभ्यासयोगेन ततो मामिच्छाप्तुं धनंजय||९||

- अध्याय बारा, भक्तियोग, श्लोक नववा.

जसा साधक परमात्म्याशी तादात्म्य,एकरूप होण्यासाठी ध्यानाभ्यास करतो, तसे पक्षिमित्र निरीक्षणातून निसर्गाशी तादात्म्य जोडण्याचा प्रयत्न करतो. पक्ष्यांचे गुंतागुंतीचे वर्तन, त्यांच्यी सामाजिक रचना आणि परस्पर संवाद, कुटुंबव्यवस्था याचे निरीक्षण करताना पक्षिमित्र निसर्गाशी एकरूप होतो. निसर्गातील प्रत्येक गोष्ट किती विचारपूर्वक, शास्त्रशुद्ध पद्धतीने निर्माण केली आहे, याची प्रचिती येते. जो कुणी याचा निर्माता असेल, तो किती श्रेष्ठ.. किंबहुना सर्वश्रेष्ठ आहे, याचा विचार आपोआप मनात येतो.

एक दिवस मी सुर्यपक्ष्याच्या घरट्याचे निरीक्षण करत होतो. घरट्यातील पिल्ले नवजात, त्यांना अजून पंख फुटले नव्हते. आईवडील संगोपन करताना दिसले. नर सूर्यपक्षी अन्न घेऊन आला, पिल्लांना खाऊ घातले व परत उडून जाताना त्याच्या चोचीमध्ये पाढंरीशुभ्र कागद/कापड्यासारखी छोटी वस्तू दिसली. तो ती घेऊन दूर उडून गेला. त्याबद्दल अधिक माहिती घेताना कळले की अन्न खाल्ल्यानंतर पिल्ले लगेच मलनिस्सारण करतात. घरटे खराब होऊ नये व पिल्लांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ नये, म्हणून निसर्गतःच विधात्याने डायपरसारखी व्यवस्था केलेली आहे, असे कळले. तो डायपर पक्षी दूर जाऊन फेकतो. यामुळे घरट्याची स्वच्छता, पर्यायाने पिल्लांचे आरोग्य चांगले राहाते. शिकारी पक्ष्यांना अधिवासाचा मागमूस लागत नाही व पिल्लांचे संरक्षण करण्यास मदत होते. शिकारी पक्षी डायपरच्या वासाने घरट्यावर हल्ला करतील, म्हणून दूर फेकून देण्याची बुद्धी पक्ष्यांना उपजतच असते. ही माहिती कळल्यानंतर निसर्गाचे सर्जन किती निर्दोष (परफेक्ट) आहे,पर्यायाने सृष्टिकर्ता किती सर्वंकष आहे, तो सर्व प्राणिमात्रांची किती काळजी करतो, याची प्रचिती आली.

ध्यानयोगाबद्दल फारसे माहित नाही, हा मार्ग कधी चोखाळला नसल्याने इथेच थांबतो.
पक्षिनिरीक्षणाचे आणखी काही महत्त्वाचे फायदे,अनुभव वाचकांसमोर न ठेवल्यास लेख पूर्ण होणार नाही. तसेच काही प्रकाशचित्रेसुद्धा डकवली पाहिजेत.

सजगता, प्रतिक्षिप्त क्रिया, निर्णयक्षमता -
पक्षिदर्शनामुळे सजगता (Alertness) आणि प्रतिक्षिप्त क्रिया (Reflex action) सशक्त होतात. पक्षिनिरीक्षण हा केवळ निसर्गाच्या जवळ जाण्याचा एक मार्ग नाही, तर मेंदूसाठी आणि शरीरासाठी एक उत्तम व्यायाम आहे.

पक्षी पाहिल्यावर तो कोणत्या प्रजातीचा आहे, हे ओळखण्यासाठी मेंदू अगोदर साठवलेल्या माहितीचा वेगाने वापर करतो. रंग,आकार बघून, आवाज ऐकून पक्षी क्षणात ओळखावा लागतो, अन्यथा तो उडून जाऊ शकतो. प्रतिक्षिप्त क्रिया अभ्यासाने वाढू लागते.

तत्काळ प्रतिसाद (Quick Response) -
पक्षी खूप चपळ असतात आणि एका क्षणात नजरेआड होऊ शकतात. त्यामुळे दिसलेल्या पक्ष्याला कॅमेऱ्यात टिपणे किंवा दुर्बिणीतून (Binocularsमधून) पाहणे यासाठी अत्यंत वेगाने निर्णय घ्यावा लागतो. सततच्या सरावामुळे प्रतिक्षिप्त क्रिया (Reflexes) तर सुधारतातच, परिणामी निर्णयक्षमता आणि सिच्युएशन रिऍक्शन (SRT) वेळही कमी होतो.

निरीक्षणकौशल्यात वाढ (Improved Observation Skills) -
पक्षिनिरीक्षणाबरोबरच सभोवतालच्या परिसराचे, वातावरणाचे अधिक बारकाईने निरीक्षण आपसूकच होते. झाडांचे प्रकार, फुले, त्यांचे औषधी-अनौषधी महत्त्व, ऋतूंनुसार होणारे बदल आणि इतर लहानसहान गोष्टीही लक्षात येऊ लागतात. या सवयीमुळे निरीक्षणकौशल्यात वाढ होते. त्याचा दैनंदिन जीवनात उपयोग होतो.

समन्वय (Coordination) -

डोळे आणि हातांचा समन्वय (Hand-Eye Coordination) पक्षी दिसणे, ऐकू येणे, पाहणे आणि त्याच वेळी कॅमेरा किंवा दुर्बीण स्थिर करणे आणि प्रकाशचित्र टिपणे यासाठी डोळे आणि हात यांच्यात उत्तम समन्वय असणे आवश्यक आहे. पक्षिनिरीक्षणाने हा समन्वय सुधारतो.

पक्षिनिरीक्षणातून मिळणारी माहिती प्रकाशचित्रांच्या साहाय्याने दृक-श्राव्य रूपात कायमस्वरूपी जमा केल्याने भविष्यात संदर्भ म्हणून उपयोग होतो. फोटोग्राफीचे कौशल्यही सुधारते. बरेच वेळा प्रकाशचित्रे स्वयंसिद्ध असतात.

मी चांगली, नवनवीन पक्ष्यांच्या चित्रफिती व प्रकाशचित्रे सोशल मीडियावर ढकलतो. तसेच अमेरिकेतील काॅर्नेल विद्यापीठाला निरीक्षण केलेल्या पक्ष्यांची फोटोसह यादी पाठवतो. जगभरातील अनेक हौशे गवशे नवशे यांनी पाठवलेली माहिती शिक्षण, संशोधन आणि ग्लोबल डेटाबेस तयार, सुधारणा करण्यास मदत होते. याचा ऐतिहासिक, भौगोलिक व शास्त्रीय दृष्टीकोनसुद्धा आहे. कुठले पक्षी कमी होत आहेत, स्वभावात काय बदल होत आहेत, स्थलांतरित पक्ष्यांना सहज स्थलांतर करता यावे यासाठी कधी, कसे, काय उपाय करावेत यासाठीसुद्धा उपयोग होतो. बहुतांश देशांत यावर विशेष कायदा आहे. वेळोवेळी आंतरजालावर माहिती व नागरिकांसाठी सूचना दिल्या जातात.

अनुभव -
निसर्गात फिरताना अर्जुनासारखे लक्ष केंद्रित करावे लागते. धनुर्विद्येची परीक्षा देताना जसा अर्जुनाला फक्त पोपटाचा डोळा दिसत होता, तसाच माझ्या मनात एकच विचार असतो की आज कुठला नवीन पक्षी, अनुभव येईल, याकडे लक्ष केंद्रित असते. सरावाने निरिक्षणकौशल्य वाढले, आजूबाजूस घडणाऱ्या पक्ष्यांच्या लहानसहान हालचाली सहज लक्षात येऊ लागल्या. मित्र, रस्त्यात भेटणारे वाटसरू बरेच वेळा मला विचारतात की "पक्षी कुठे बसला आहे, हे कसे कळते?" चेष्टेने मी म्हणतो, "माझ्या कानात येऊन ते फोटो काढा म्हणून विनंती करतात." सुंदर, मनमोहक निसर्ग, प्रफुल्लित चित्तवृत्ती आणि सराव याने ही गोष्ट सहज शक्य होते.

लम्हा ये सुहाना है
टाइम नहीं गवाना है
जीने का मज़ा ले साथिया|

तू खीच मेरी फोटो, तू खीच मेरी फोटो
तू खीच मेरी फोटो..

अमेरिकन गोल्डफिंच हा एक खूप छोटा पण खूप सुंदर पक्षी आहे. साधारण दहा-वीस ग्रॅम वजन, आकारमान सुमारे चार-पाच इंच. शिंपी (टेलरबर्ड)सारखा चंचल, चपळ. हळद्यासारखा (Indian Golden Oriole) पिवळाधम्मक, डोक्यावर काळा मुकुट. अमेरिकेत पक्षिनिरीक्षण करताना भ्रमणध्वनीवरून खोजी ॲपमध्ये नेहमी हजेरी लावायचा. आसपास आहे असे कळायचे, पण इतका छोटा की कुठे दिसायचा नाही.

हा पक्षी दिसावा अशी तीव्र इच्छा होती. एक दिवस नजर भिरभिरत होती. छोटे पिवळसर पान खाली पडल्याचा भास झाला. का कुणास ठाऊक,वाटले गोल्डफिंच असेल. कॅमेर्‍यातून झूम करून बघितले, तर गोल्डफिंचच होता. पटकन फोटो क्लिकले. ही सहाव्या इंद्रियांची करामत असावी असे वाटले. खाली दिलेल्या मूळ व एनलार्ज्ड फोटो बघून आकारमानाचा अंदाज येईल.

Was it a neural pathway that carried the impulse from the stimulus and to that produced the beautiful result?

साधकाचा अभ्यास जसजसा वाढत जातो, तसतसे त्यालाही असे अनुभव येत असतील.

इलिनॉय विद्यापीठाने केलेल्या संशोधनात असे आढळून आले आहे की निसर्गाशी संवाद साधल्याने एकाग्रता सुधारते आणि मानसिक थकवा कमी होतो. हा परिणाम 'अटेंशन रिस्टोरेशन थिअरी' म्हणून ओळखला जातो. पक्षिनिरीक्षण केल्याने त्याचा मानसिक आरोग्यावर थेट, सकारात्मक परिणाम होतो.

Attention Restoration Theory (ART) was developed by psychologists Rachel and Stephen Kaplan of the University of Michigan.

Attention Restoration Theory (ART) posits that spending time in nature can restore our ability to concentrate and recover from mental fatigue by engaging in "soft fascination."

अंतर्ज्ञानात वाढ (Intuition) -
सततच्या निरीक्षणाने आणि अनुभवाने, पक्षी आता पुढे काय करेल, विशिष्ट वातावरणात कोणते पक्षी दिसू शकतील याचा अंदाज येऊ लागतो.अनुभव आणि अवचेतन मनात साठवलेल्या माहितीतून तयार झालेली ही एक नैसर्गिक क्षमता आहे. यामध्येसुद्धा वृद्धी होते.

छोट्याशा हमिंगबर्डपासून ते महाकाय गरुडापर्यंतचे निरीक्षणाने प्रत्येक पक्षी वेगळा, सुंदर आणी अद्वितीय आहे हे लक्षात येते. निसर्गामधली विविधतेची आणि सौंदर्याची जाणीव मनावर सकारात्मक परिणाम, कृतज्ञतेची खोल भावना निर्माण करते. जीवन किती सुंदर, मौल्यवान आणि विस्मयकारक आहे याची जाणीव होते. पक्षिदर्शन हा केवळ छंद नसून तो एक निसर्गोपचार आहे, असेही म्हणू शकतो. हा छंद जोपासताना स्वहित जपते. याला सरकारी योजना DBT (डायरेक्ट बेनिफीट टू सेल्फ)सदृशच म्हणावे लागेल.

जीवन कठीण असते.आपल्या सर्वांनाच संघर्ष करावा लागतो. कधीकधी नैराश्याची भावना प्रकट, प्रबळ होऊ शकते. जेव्हा चिमुकले जीव जीवनसंघर्ष करताना दिसतात, तेव्हा स्वदु:ख शीतल वाटू लागते. नैराश्यातून बाहेर पडण्यास मदत होते.

बहिणाबाई म्हणतात,

पाखराची कारागिरी जरा देख रे मानसा!!
तिची उलूशीच चोच तेच दात तेच ओठ
तुला देले रे देवान, दोन हात दहा बोटं ???

शुभ्रकंठी, बुलबुल दाम्पत्यांच्या प्रजोत्पादनाचा दुखान्त बघितला. खडपाकोळी (Dusky Crag Martin), सूर्यपक्षी, कोतवाल, शिक्रा दांपत्यांची सक्सेस स्टोरी बघितली.थोडक्यात, पक्ष्यांना नैसर्गिक अधिवासात पाहण्याची साधी कृती मनातील चिंता दूर करू शकते, सकारात्मक समस्या निवारणाची प्रेरणा मिळते. आतापर्यंत बरेच वेळा पक्षिनिरीक्षण केले आहे. आलेले अनुभव आणि मिळालेली प्रेरणा, कौटुंबिक जीवन या विषयावर मिपावर लेख डकवले आहेत. वाचकांच्या सोयीसाठी खाली लिंक देत आहे.

https://www.misalpav.com/node/52570

https://www.misalpav.com/node/52569

एक विशेष अनुभव

4

एक दिवस नदीकिनारी फिरताना मला नदीपात्रात चारही बाजूंनी पाण्याने घेरलेला एक मोठा खडक आणि त्यावर बसलेले खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी दिसले. जणू नोहाची नौका Noah's Ark. आकाशात घारी, सर्पगरुड यासारखे शिकारी घिरट्या घालत होते. असे दृश्य पाहिल्यावर वाटले की पक्ष्याची गुप्त सभा भरली आहे आणि ते शिकारी पक्षयांपासून कसे सुरक्षित राहायचे यावर खलबत करत आहेत. आंग्लभाषेत एक जिलबी पाडली -

Right to live....

Once I stood on the riverbanks,
Where ducks floated serene in flanks.

The sky above river was blue and floaty,
The voice of the Kingfisher was slow, and throty.

All water birds were gathered in the conclave,
They're discussing how predators behave?

Fishes were also gathered around a floating stone,
Fearful of fishermen, as their lives not their own.

The subject of discussion was "how to safeguard and fight,"
The right to live in water, their first and basic right.

Having seen a big conglomeration of birds and fishes,
Predators hovered for tasty, delicious and sumptuous dishes.

Shadows of predators floated on the water's face,
The birds and fishes vanished, finding a safer place.

Underwater, they hid, escaping the predators' might,
A clever move, ensuring their survival in the morning light.

I enjoyed serene and beautiful nature,
As right of living is of God's creature.

Wise always stay away from strong and mighty,
Although everyone is a member of God's society.

असो, असे अनेक चागंले-वाईट अनुभव येतात, पण लेखनसीमा असते, तिचे पालन केलेच पाहिजे. मराठी संकेतस्थळावर आंग्लभाषेचा उपयोग केल्याबद्दल क्षमस्व.

प्रतिक्रिया

तुमचा स्वानंद आम्हासही आनंद देऊन जातो.

पक्षी निरीक्षण करणे हे अतिशय संयमाचे काम आहे. बऱ्याचदा खूप वेळ घालवूनही हाती काही पडेल असे नाही. त्यामुळे आपण वर म्हणले आहे ते प्रमाणे हे एखाद्या ध्याना पेक्षा कमी नाही . कारण एकाच गोष्टीवर बराच काळ आपण लक्ष केंद्रित करून असतो. षडरिपूंचा पक्षनिरीक्षणाशी घातलेला मेळ आवडला....

सुधीर कांदळकर's picture

27 Oct 2025 - 5:47 pm | सुधीर कांदळकर

मराठीबरोबर इंग्रजी कविता देखील. वा!
पक्षीनिरीक्षणाबरोबरचे चिंतन मस्त. धन्यवाद.

पक्षी निरीक्षण अतिशय आनंददायी असते.. मानवी भावना वर्तन आणि पक्षी वर्तन याची आपण घातलेली सांगड खूपच भारी.. मी शाळेत असताना पक्षी निरीक्षणाला जात होते आता सहज दिसतात तेवढेच पक्षी पाहिले जातात.. त्यासाठीची साधना कमी पडते आहे.
मी पक्षी तज्ञ नाही.. पण माझ्या ज्ञान/ अज्ञानाप्रमाणे नाचरा किंवा नाचण पक्षी म्हणजे फॅनटेल फ्लायकॅचर आणि पॅराडाईज फ्लायकॅचर म्हणजे स्वर्गीय मक्षाद !! कृपया माझे चूक असेल तरी मला दुरुस्त करावे..

क्षमस्व! पॅराडाईज फ्लायकॅचेर म्हणजे स्वर्गीय नर्तक.. आपण लिहिलेले बरोबर आहे.

https://youtu.be/WzUnRX-b76k?si=8lnlWNq3dwqDY91o

वरील लिंक उघडून बघीतली तर आपल्याला कळेल. छोटा चिमणी सारखा पक्षी. अतिशय सुंदर घरटे बांधतो. असेच एक घरटे व प्रजनन मी टिपले आहे.

पॅराडाईज फ्लायकॅचर, दुधराज, स्वर्गीय नर्तक हा अत्यंत सुंदर पक्षी, मध्यप्रदेश चा राज्य पक्षी आहे. मी पहिल्यांदाच श्रीशैल्यम च्या जंगलात बघीतला व या वर्षी तो पुण्यात आमच्या भागात बघायला मिळाला. नागपूर च्या आसपास सुद्धा दिसतो..

बया ,बहिणाबाई मुळे प्रसिद्ध झाली पण अनेक असे पक्षी आहेत ज्यांची घरटे बांधण्याची कला एखाद्या कुशल सिव्हिल इंजिनियर पेक्षा भारी असते.

प्रतिसाद बद्दल धन्यवाद.

कर्नलतपस्वी's picture

27 Oct 2025 - 8:10 pm | कर्नलतपस्वी

यांचे आभार.

पक्षीनिरीक्षण आणि योगसाधना यांची सांगड घालत लिहीलेला जबरदस्त लेख वाचून अवाक झालेलो आहे. साष्टांग दंडवत प्रभो.

माहितीबद्दल खूप खूप धन्यवाद..पॅराडाईज फ्लाय कॅचर मी कोल्हापूर जवळ पन्हाळा, सांगली जवळील काही दाट झाडीच्या भागात दिसतो.. माझ्या घरात पर्पल सनबर्डने घरटे केले होते.. मी सुद्धा तेव्हा खूप फोटो व्हिडिओ केले..तुमच्या पक्षांच्या या लेखामुळे मी त्यावेळी केलेले लिखाण पाठवण्याची उर्मी आली.

अनन्त्_यात्री's picture

28 Oct 2025 - 3:38 pm | अनन्त्_यात्री

मध्यंतरी नृसिंहवाडीला गेलो असताना कृष्णाकाठच्या एका हॉटेलात राहिलो होतो. हॉटेलरूमच्या खिडकी जवळच्या झाडावर ब्राह्मणी घारींचा थवा सूर्योदय ते सूर्यास्त मुक्कामाला होता. वारंवार नदीवर संथपणे घिरट्या घालणं, एकमेकांना शीळ घालून काहीतरी सांगणे, झाडावर थांबून तांबूस पंख पिसांची साफसफाई करणं हे त्यांचे विभ्रम बघण्यात वेळ छान गेला. सूर्यास्ताच्या आसपास अचानक सगळा थवा नदीपलिकडे दूरवर उडून गेला

गोरगावलेकर's picture

30 Oct 2025 - 2:50 pm | गोरगावलेकर

बऱ्याच वेळा अभयारण्य किंवा जंगलातून भटकंती झाली आहे पण पक्षी ज्ञान कमी पडते. खूप कमी पक्षी ओळखता येतात .

स्वधर्म's picture

30 Oct 2025 - 3:54 pm | स्वधर्म

तुमचा सखोल आणि रंगतदार लेख आवडला. सखोल यासाठी की तुंम्ही ध्यान व पक्षीनिरिक्षण यासारख्या अचाट विषयांची सांगड घातली आहे. रंगतदार यासाठी की लेखात जागोजागी तिन्ही भाषेतील कविता नेमक्या प्रकारे रसभंग न होता पेरल्या आहेत. तुंम्ही एक तासाचा दृकश्राव्य कार्यक्रम केला तर यायला खूप आवडेल.

तुंम्ही एक तासाचा दृकश्राव्य कार्यक्रम केला तर यायला खूप आवडेल.

खरंच , खुप छान कल्पना आहे.
@कर्नलकाका
आतापर्यंतचे तुमच्या वाचलेल्या लेखांमध्ये सर्वोत्तम लेख आहे.
अप्रतिम लिखाण आहे.