लडतर
सन्जोप राव
रामा साठीचा झाला, तरी अजून म्हातारा ताठ होता. आता साठीचा हे आपलं अंदाजाने. तसा जन्म कधीचा आणि किती वाजताचा, हे काही कुणाच्या लक्षात नव्हतं. खेडेगावात जन्माची तारीख कुठली आणि वार कुठला, हे कोण ध्यानात ठेवणार? अदमासपंचे कोण साधारण किती वयाचा हा हिशेब धरायचा, एवढंच. दोनपाच वर्षं इकडं तिकडं झाली तर झाली. ‘त्यो गांधीबाबा म्येला न्हवं का, त्या सालचा बगा नामा आमचा’, ‘कोन एश्वदा व्हय? म्हापुर आल्ता बगा, वाडी गावच्या गाव उटलं व्हतं न्हाई का ते, तवा एश्वदेच्या येळेला मालकीण दिवसात हुती आमची’, ‘दादू दुस्काळाच्या वरसात जनमलेला हाये आमचा. सुकडी खाऊनच त्याला आंगाव पाजिवल्येलं हाये आमच्या म्हातारीनं. म्हून त्यो असा रोड झाल्याला हाये.’ असले सगळे ठोकताळे. पण रामा काय आता तरणा राहिलेला नव्हता. त्याच्या डोईचे सगळे केस पिकले होते आणि त्याच्या मिशा तर पिकून पांढर्याखड झाल्या होत्या. त्याच्या हातापायावरच्या टचटचीत शिरांचा जागोजागी गठाळा झाला होता आणि त्याच्या चेहर्यावर आता सुरकुत्या पडल्या होत्या. तरीही म्हातारा घट होता. अजून मक्याच्या वैरणीचा बिंडा घेऊन तो बांधावरनं झापझाप चालायला लागला की त्याच्या पिंढर्यातले गोळे त्याच्या पावलासरशी वरखाली होत. मक्याची धाटं वजनाला भारी, पण रामा अजून जंग बिंडा सहजी उचलत असे. त्याची बायको धुरपदा पण तसलीच. अंगावर नातवंडं खेळली तरी धुरपदा अजून ढिली पडलेली नव्हती. तिच्या सुनांनी बाळंतपणांत अंग सोडलं होतं आणि त्या गोरटेल्या फोपशा अंगाच्या बायका गावाबाहेर असलेल्या शेताकडं येताना आणि परत जाताना दोन वेळा थांबत आणि फासफूस करून घाम पुसत. मळ्यात पोहोचल्यावर आधी डेर्यातलं पाणी घटाघटा पीत आणि ‘किती गं बया ऊन तावालंय’ असं म्हणत. धुरपदा डोक्यावरच्या चुंबळीवर ठेवलेली पाटी आणि दोन्ही हातात दुधाच्या दोन किटल्या घेऊन तरातरा चालत घराकडं निघाली की तिच्या सुना तर मागं कुठल्या कुठं राहात, पण तिची नातवंडं पण तिच्याबरोबर चालताना शरतीत पाळावी तशी पळत. असं असलं, तरी धुरपदाचं काम मोठं साजरं होतं. तिचं नऊवारी नेसणं अगदी चित्रातल्या बाईच्या नेसणासारखं दिसे आणि तिनं घराच्या अंगणात घातलेला सडा अगदी एकसारखा पडे. दोन्ही पायांवर बसून ती म्हशीची धार काढायला बसली की कासंडी भरेस्तोवर ती मानसुद्धा वर करत नसे. तिच्या सुना आणि माहेरपणाला आलेल्या लेकीसुद्धा दुपारची जेवणं झाली की डोक्याखाली हाताचं उसुसं घेऊन चांगल्या चार वाजेपर्यंत आडव्या होत, पण धुरपदा पाच मिनिटंपण लवंडत नसे. तिचं सारखं काही ना काही चाललेलं असे. तिचं बोलणंही अगदी कमी आणि खेड्यातल्या बायकांना शोभणार नाही एवढं मऊ होतं. लेकांचं, सुनांचं बोलणं-वागणं मनाला येवो, न येवो, धुरपदा काही बोलत नसे. रामाही तसाच.
रामाचा थोरला कारखान्यावर कामाला होता. धाकटा गावातल्याच पतसंस्थेत लागला होता. धाकट्याचं लग्न झाल्यापासून रामा आणि धुरपदा मुक्कामाला मळ्यात असत. सकाळी दोघंही चहापाणी, अंघोळी उरकून गावातल्या घराकडं येत. सकाळीच रामानं विहिरीवरची मोटार चालू केलेली असे. गावात यायच्या आधी धुरपदा विहिरीच्या पाण्यात आपलं लुगडं-चोळी आणि रामाचं धोतर आणि मुंडीछाट धुऊन वाळत घालत असे. साबण कमी वापरूनही तिचं धुणं एकदम पाक असे आणि आणि तिनं वाळत घातलेल्या लुगड्यावर, धोतरावर एकही सुरकुती नसे. न्याहारी करून, दुपारचं जेवण बांधून घेऊन परत दोघे मळ्याकडं येत. दिवसभर मळ्यात काम करून दिस बुडायला दोघेही गावातल्या घराकडे जात. रामा सोप्यात बसून नातवंडांशी खेळत असे, दुपट्यावर निजवलेलं एखादं तान्हं असलं, तर त्याच्या पोटावर फुर्र करत असे. रामाच्या मिशानं पोटाला हुळहुळ होऊन ते पोर हातपाय हवेत झाडून खिदळत असे. धुरपदाबाईला मात्र सवड मिळत नसे. सुनांनी तिच्यासाठी काही ना काहीतरी काम ठेवलेलंच असे. काही नाही तर धाकटी सून काटवट तिच्यासमोर ठेवून ‘पीठ दोडं इरं गेल्यावानी झालंया बगा आत्ती. भाकरीच हुईना’ असं म्हणत असे. धुरपदा काही न बोलता पीठ चांगलं मळून घेई आणि त्याच्या चांदासारख्या सुरेख भाकरी करी. शेवटच्या दोन भाकरी हातावरच्या. दीड रामाला आणि अर्धी तिला. सुना दमगीर होऊन पोरांना मांडीत घेऊन सोप्यातल्या टीव्हीसमोर बसलेल्या असत आणि धुरपदा रामाला आणि दोन्ही लेकांना जेवायला वाढी. सुनेच्या हातचं कालवण सपक झाल्यासारखं वाटलं, तर धुरपदा रामाच्या पानात तेलतिखट वाढी. कालवण जास्तच चरचरीत दिसलं, तर त्याच्या पानातल्या भातावर दुधाचा थेंब घाली. रामा वर मान करून बघतसुद्धा नसे. सगळा नं बोलता कारभार.
म्हैस व्याली, रेडी झाली. गवळारू म्हैस, आता हिची वेतं संपायच्या आतच दुसरी घरची म्हैस झाली. रामा आणि धुरपदा आनंदून गेले. म्हशीला दूध भरपूर होतं. गल्लीभर चीक वाटून झाला. वड्या खाऊन पोरं तृप्त झाली. रेडीची अजून नाळ वाळायची होती. मळ्यात कोल्ह्या-कुत्र्यांची भीती फार. दोन महिन्यांपूर्वीच शेजारच्या वस्तीवरची नुकती जन्मलेली कालवड भटक्या कुत्र्यांनी फाडली होती. रामा आणि धुरपदा दाल्ला-बायको दोघं वस्तीला मळ्यातच होते, आता जरा लवकर यायला लागले. थंडीचे दिवस. अंधार लवकरच व्हायचा. पायाखालचं बघायला म्हणून एक बॅटरी होती. तिच्या उजेडात रामा आणि धुरपदा जेवणं करून जोडीनं परत येत होते. खेडेगावात नवरा-बायकोनं एकत्र जायची चाल नसते. रामासुद्धा पहिल्यांदाच बायकोच्या जवळून चालत होता. कडक थंडी होती. उजव्या हातातली बॅटरी रामानं डाव्या हातात घेतली आणि त्याच्या उजव्या हाताला डोक्यावरून गच्च पदर घेऊन चालणार्या धुरपदाच्या डाव्या हाताचा स्पर्श झाला. त्याला करंट लागल्यासारखं झालं. अंधारात धुरपदाचा चेहरा दिसत नव्हता, पण रामाच्या डोळ्यांसमोर तिचं खुदकन हसणं आलं. धुरपदा, तिच्या कपाळावरचं गोंदण, तिची शेंडा असलेली स्वच्छ गुलाबी जीभ आणि एका ओळीत असणारे तिचे पांढरेशुभ्र दात... मळा लांब होता. रामा आणि धुरपदा चालत होते. कळत- नकळत त्यांचे हात एकमेकांच्या हातांना लागत होते. धुरपदा गालातल्या गालात हसत होती. आभाळात चांद उगवला होता. हवेत गारवा होता आणि मळा अजून लांबच होता.
* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *
गुदस्ता पाऊस झाला, पण काही खरा झाला नाही आणि रामाचा आडसाली ऊस म्हणावा तसा भरला नाही. निवडणुका होत्या, त्यामुळं कारखानाही उशिरा चालू झाला. फड नोव्हेंबरमध्ये तुटून गेला आणि कारखान्यानं पाठवलेल्या मशीननं रामानं फडातला सगळा चगाळा बुकणा करून घेतला. आता खोडव्याच्या बगला फोडून घ्यायच्या म्हणजे सगळा चगाळा मातीआड होईल, आणि मग लागवड टाकून पाणी सोडलं की हिवाळा असूनदेखील खोडवं उठणार.. रामाच्या मनात येऊन गेलं. पण विहिरीचं पाणी कमी होत चाललं होतं आणि त्याचा एक घोर रामाच्या जिवाला लागला होता. आत्ताच ही तर्हा, खोडवं जायला अजून वर्षंभर. वर्षभर काय, जरा जास्तच म्हणा.. त्याच्या मनात आलं. आज मोटार फारच कमी पाणी मारायला लागली असं त्याला वाटलं, म्हणून सबमर्सिबल पंपाच्या फुटबॉल ला काय प्लास्टीकबिस्टीक अडकलंय का काय ते बघावं, म्हणून मोटार बंद करून तो विहिरीत उतरला. जुनी विहीर, एक बाजू सगळी ढासळली होती. दुसर्या बाजूच्या पायर्या अवघड झाल्या होत्या. पाय ठेवला की पाय घसरत होता. धोतर मांड्यांबरोबर खोचून घेऊन, बेतानं एका हातानं आधार घेत रामा विहिरीत उतरत होता. विहिरीत आत झाडं फार वाढली होती. आतमध्ये आडव्यातिडव्या पसरलेल्या फांद्यांवर पक्ष्यांनी घरटी केली होती. झाडाची पानं, झाडांवरून गळून पडलेली घरटी, लोकांनी विहिरीत टाकलेली फुलं, पत्री याचा थर पाण्यावर पसरला होता. मांजर किंवा असलं काहीतरी मरून विहिरीत पडलं असावं. कुजल्याची घाण सुटली होती. रामाच्या पायाखालून एक पिवळीधमक धामण सळसळत गेली.
पंपाला खरंच प्लॅस्टिक अडकलं होतं. पाण्यात बुडी घेऊन रामानं ते ओढून काढलं. विहिरीत दहा फूटसुद्धा पाणी नाही, हे बघून त्याच्या काळजाला चरका बसल्यासारखं झालं. फुटबॉल मोकळा झाला, मोटार पाणी जास्त मारायला लागली, पण तासाभरातच पाणी संपलं. एवढ्या पाण्यावर काही खोडवं जगत नाही, रामाच्या मनात येऊन गेलं. दोन एकरचा खोडव्याचा फड. त्याला लागून दोन एकर जमीन नुसतीच नांगरून पडली होती. पावसाळा संपून गेला, तरी त्या रानातली ढेकळंही फुटली नव्हती. ऊस जगवायचा म्हणून रामानं ती जमीन तशीच पड ठेवली होती, काही सोयाबीन वगैरे केलं नव्हतं. पुढं म्हातार्याचा पाऊस चांगला पडला, विहिरीला पाणी आलं, तर हरबरा लावू, त्याचा बेवड चांगला होईल आणि मग पुढच्या वर्षी आडसाली शायंशीझीरोबत्तीस असा त्याचा मनाशी ताळा चालला होता. पण कसलं काय आणि कशाचं काय. हा ऊसच जगतो का वाळून जातो कुणास ठाऊक..
रात्री जेवताना रामाचा रंजीला आलेला चेहरा बघून त्याच्या धाकट्यानं विचारलं, “काय जिवाला गोड वाटंना झालंय काय तात्या तुला?” रामाच्या भावाची पोरं त्याला तात्या म्हणत आणि त्यामुळं रामाची मुलंही त्याला तात्याच म्हणायला लागली होती. वळणंच तसं पडून गेलं होतं. बापाला एकेरी तर काय, खेड्यात सररास बोलावतातच.
“न्हाई रं. मी हाय घट, खरं हिरीचं पाणी एकदमच आत आलं गा.” रामा हातातला घास तसाच ठेवून म्हणाला. थोरल्याच्या पाठुंगळीवर त्याचा मुलगा होता आणि तो घोडाघोडा करत होता. त्याला काही ऐकू आलं नाही. “काय म्हणालास तात्या?” त्यानं विचारलं. “अगं ए, ह्याला जरा भाईर घे जरा.”
रामानं घास तोंडात घातला. सावकाश घास चावत तो म्हणाला, ”हिरीचं पाणी एकदमच कमी झालंय रं. औंदा पाऊसकाळ कमी, म्हणून सगळीकडंच दुस्काळ असणार सोडा. लोकांच्या हिरीला यवडबी पाणी न्हाई. पर आताला ही परिस्तिती म्हणल्यावर उन्हाळ्याला ऊस वाळून जाईल रं सगळा. वैरण म्हणालास तर वैरण हुणार न्हाई ऊसाची.”
“मग काय करावं म्हणतोस, तात्या?” धाकट्यानं भात कालवत विचारलं.
“करायचं म्हंजे..” रामा म्हणाला. “हिरीतला गाळ काडून घेतला पायजे. मग झरं काय मोकळं हुत्यात काय त्ये बगाय लागंल. आता नुस्ता गाळ काडून काम चालणार न्हाई. का म्हणशील तर चौ बाजूनं हीर पडायला लागल्या. सगळी ढेकळं, दगडं आतच. त्यातनं गावंदरी लागली. गावातल्या लोकांचं गौरी-गणपती सगळं हिरीतच. बरं, कुणाला नको म्हणणार? देवाचं काम. काय बोललो तर लोक तोंडात शेण घालतील. हीर बांधून घेतली पायजे गड्या.”
“बांदायची म्हंजे काय सोपं काम न्हाई, तात्या.” रामाचा थोरला मुलगा म्हणाला. “न्हाई म्हणालं तरी चार-पाच लाख रुपयं लागतील."
“हूं.. चार पाच म्हणं.” धाकटा म्हणाला “चार पाचानं काय कात हुतोया? आधी हीर पडाया झाल्या तेवढी पाडून घ्याला पायजे. मग तळातनं बांधून घ्यायला पायजे. साताठ लाख कुठं जात न्हाईत, तात्या.”
“होय” रामा म्हणाला. “आता यवडं करायचंच म्हटल्यावर चार पारी मारून घ्याव्या म्हणतो. चार उभ्या, चार आडव्या.”
“म्हजे धा लाखाची जुळणी करायला पायजे.” थोरला मुलगा पानावरनं उठत म्हणाला. “बगूया. कारखाना काय देतोया काय ते चौकशी करतो. तुझ्या पतसंस्थेतनं काय काढता येत्यात काय ते बग. क्राप लोन तर मिळंलंच. कायतर करूया जुळणी.”
आता आज जुळणी करू या म्हटलं आणि झाली बाबा उद्याच्याला जुळणी असं कुठं होतंय काय? कारखान्याचा सीझन चालू होता, चेअरमनसाहेबांची भेट लवकर होईना. पतसंस्थेला प्रकरण टाकलं होतं, पण त्यांची मंजुरीची मीटिंग व्हायला वेळ लागला. क्रॉपलोनसाठी सातबारा मिळायलाच कितीतरी दिवस लागले. शेवटी इकडचे थोडे, तिकडचे थोडे, थोडे पावणा देतो म्हणलाय, थोडे होते म्हातारीनं मागं टाकलेले असं काहीतरी करून जुळणी होत आली.
विहीर बांधणार्याची टोळी उंचगावला होती. तिथं निरोप पाठवल्यावर चार दिवसांनी त्यांची माणसं आली. विहिरीत उतरून त्यांनी मापं टाकली. इतकी उंची, इतकी रुंदी आणि कायकाय. चार दिवसांनंतर रामा गावातल्या चार लोकांना घेऊन तिथं गेला. कारभार्याबरोबर बोलणी, वाटाघाटी, घासाघीस झाली. एवढं कुठं असतंया काय पावणं, आमीबी इतकी वर्सं धंदा करतो की मालक, काय ते एक येव्हाराचं बोला की, आमचं काम बगून पैशे द्या शेठ, काय बोलणं का पसारा.. असं बरंच झालं आणि शेवटाला आठ लाखाला गाळ काढून विहीर बांधून द्यायचं ठरलं. पारीचे पैशे वेगळे. उभ्या पारी फुटाला शंभर रुपये. आडव्या पारी फुटाला दीडशे रुपये. आपण फक्त उचलून पैसे द्यायचे. बाकी काही भानगड नाही. पाणी उपसायचं, यारी बसवायची, विहिरीत रिंगा टाकायच्या, पारी मारायच्या हे सगळं खंडून दिलेलं होतं. संचकार दिला, रामराम, रामराम झालं आणि रामा समाधानानं गावाकडं परत आला. चार दिवसांनंतर सगळी टोळी रामाच्या मळ्यात आली. रामाच्या खोपीच्या खालच्या अंगाला त्यांनी आपली खोपाटं टाकली. तरणी पोरं, त्यांच्या कामाला टाण असणार्या बायका आणि ढीगभर लेकरं. कंत्राटदार कारभारी तर ढाण्या वाघासारखा होता. त्याचा सगळा संचच होता. विहिरीच्या काठावर त्याने रातोरात यारी बसवली. मोटार लावून आणि डिझेल इंजीन बसवून त्यानं विहीर मोकळी करून घेतली. अवघड पायर्यांवरनं पोरं चटाटा खाली उतरली. खोरी, पाट्या घेऊन टोळी विहिरीत उतरली. खाण खाण आवाज सुरू झाला. आत आलेल्या झाडांच्या फांद्यांवर कुर्हाडी पडल्या आणि फांद्यांवरच्या घरट्यांत असलेली पाखरं बाहेर उडाली. दगडांच्या बेचक्यांत उगवलेली पिंपळाची रोपं विहिरीत उतरलेल्या पोरांनी कचाकचा तोडली. माल हार्यांत भरून यारीच्या डब्यात ओतायला सुरुवात झाली. यारीचा आवाज, लोखंडी पाट्यांची खणखण, आरडाओरडा, हाळ्या, शिव्या आणि हसण्याचा आवाज यांनी रामाची विहीर भरून गेली. कामाला सूर लागला.
खेडेगावात काहीही काम नसलेले बरेच लोक असतात. कुणाच्या शेतात बडीम रचायची असो, कुणाची म्हैस भरवायची असो की कुणाच्या घरात साप निघालेला असो, बघता बघता पन्नास-शंभर लोक गोळा होतात. लोकांना काही काम असत नाही, मग सकाळी उठायचं, चहापाणी करायचं आणि भट्टीची कापडं घालून पेठेत, स्टँडवर नुसतं बिडी ओढत गप्पा मारत उभं राहायचं. बरं, उभं राहायचं ते राहायचं, पण सरळ राहातील की नाही, सोडा. एकानं काही सांगितलं की दुसर्यानं त्यात खोडी काढलीच म्हणा. रामाला सगळं गाव ओळखत होतं, त्याच्या विहीरीचं काम म्हटल्यावर घरचंच काम असल्यासारखे लोक गोळा झाले. खेड्यातल्या लोकांना किंमत विचारायला काही वाटत नाही. नसती चौकशी सुरू झाली.
“केवड्याला ठरवला?”
“आठ.” रामा सांगत असे.
“आठ लाख?”
“हूं.”
“म्हाग लागलं.”
“आस्सं?”
“तर गा. रामा. आमचा तेरदाळचा पावणा...” मग तो कुठला तेरदाळचा पाहुणा, त्याची विहीर कशी रामाच्या विहीरीपेक्षा चार वाव लांबच आहे, त्यानं उभ्या-आडव्या पारी मारूनही कसा सात लाखात सौदा पटवला याची खरी-खोटी चर्चा. रामाला अशा गोष्टींची सवय होती, नाही असं नाही, पण त्याचेही कान किटले. गाळ काढायला लोक आत उतरले तर वरनं एकाला चार लोक ओरडून सल्ले द्यायला लागले.
“हिकडचं आधी गोळा करून घ्या.”
“हाल मर्दा. असं करा, त्यो कोपरा आदी सुट्टा करून घ्या. व्हय त्यो, व्हय त्यो.”
“तिकडं नको. तिकडं डबरा पडंल. मग पानी सगळं तिकडंच जानार. ते तुज्या पायातला माल आदी गोळा करून घ्या.”
“खुळा हायेस काय आण्ण्या तू? डबरा तिकडं हुणार का हिकडं रे सुक्काळ्ळीच्या?”
कारभारी हात जोडून सगळ्यांना सांगत होता, मालक, माझा धंदा हाये. न्हाई म्हणला तरी वर्साला पाचपन्नास हिरी मी करतो. चारशे हिरीतला गाळ काडलेला हाये माझ्या टोळीनं. आमाला आमच्या रीतीनं काम करू द्या. पण त्याचं कोण ऐकणार? बरं, रामालाही कुणाला बोलता येईना. सगळेच ओळखीचे, सगळेच गाववाले. शेवटी काही बोलायला पण नको आणि काही ऐकायला पण नको, म्हणून तो एक दिवस विहिरीकडं गेलाच नाही. दुसर्या दिवशी सकाळी तो घराकडनं न्याहारी करून आला तर यारीचा आवाज काही येईना झाला होता. असं का म्हणून तो विहिरीकडं आला, तर तिथं सगळं थंडगारच होतं. गडी सगळे आपल्या खोपटातच पसरले होते, पोरं कालवा करत होती, बायका भाकर्या बडवत होत्या आणि कारभारी एका दगडावर बसून बिडी ओढत होता. रामाला बघून त्यानं बिडी त्या बसत्या दगडावरच विझवली आणि हात जोडून तो पुढं आला.
“रामराम, मालक.”
“रामराम. कायकाय?”
“काय न्हाई. आमाला रजा द्या आता, मालक. आमचा शेर संपला हितला..”
“का गा आसं?”
“आवो काय तुमच्या गावातली लोकं. मानसं म्हनायची का गाडवं? आमाला काम सुधरू दीनाशी झाल्यात. एक म्हणतो असं कर, एक म्हणतो तसं कर. आता आमी काय तानी पोरं हाय व्हय? आमीबी कामं केल्याली हायती. आमालाबी म्हायती हाये काय करायचं, काय न्हाई ते.”
“खरं हाये, कारभारी.”
“येखाद-दुसरा बोलला असता, तर आमी गप बसलो आसतो, मालक. हितं सगळी दुनिया आमाला शिकवाय लागल्या, आमी काम करावं का हेन्ना तोंड देत बसावं सांगा बरं मालक. माजी पोरं म्हनाय लागल्यात की हेच्यापेक्षा दगडं फोडायच्या कामावर गेलो अस्तो तर चाललं असतं. काय करायचं सांगा.”
रामानं हात जोडले. “कारभारी, मी सांगतो सगळ्या लोकांस्नी. तुमी हातातलं काम सोडून जान्याची भाषा करुने. अवो, बागायती गाव हाये. लोकांना सकाळी स्टार्टर चालू करायचा आणि पाणी पाट फोडून भायेर गेलं की स्टार्टर बंद करायचा येवडंच काम हाये. तुमी नगा तेंच्याकडं ध्यान देऊ. माजी नड हाये कारभारी, रीण काडून मी काम करायला घ्येतल्येलं हाये. सांबाळून घ्या.”
आणि खरोखरच रामानं दुसर्या दिवशी विहिरीच्या काठावर बसून सूचना करणार्या लोकांसमोर हात जोडले. रामा इभ्रतदार माणूस होता. लोकांच्या सूचना थांबल्या नाहीत, तरी कमी झाल्या.
गावची जत्रा झाली. घरात गोडाधोडाचं जेवण झालं. धुरपदानं गव्हाची खीर केली होती. खीर आणि दूध. रामा पोटभर जेवून सोप्यात पान खात बसला होता. मुलं त्याला कायकाय सांगत होती. नातवंडं कालवा करत होती. रामाच्या जिवाला थंड वाटत होतं. आतल्या बाजूला बायका जेवायला बसल्या होत्या. एकदमच थोरल्या सुनेचं बोलणं ऐकू आलं, “का वं आत्ती?” रामाच्या थोरल्या सुनेचा आवाज जरा चढ होता.
रामा सहजपणे उठून दारात केला आणि त्यानं विचारलं,”काय झालं?”
“अवो, आत्ती खीर नको म्हनाल्यात बगा की. नुस्ता दूध भात दे म्हनाल्यात. शाक, हापळा काय नको म्हनं...”
खेड्यात मुला-सुनांच्या समोर नवरा-बायकोनं बोलण्याची पद्धत नसते. रामाला कुणाशी बोलावं हे सुचेना. शेवटी दाराबाहेर बघत तो आपल्या धाकट्या मुलाला म्हणाला, “काय झालं बग रं जरा.”
गाळ उपसायला लागला, तशी झर्यांची तोंडं मोकळी झाली. हिरीचं पाणी वाढायला लागलं. सकाळी-संध्याकाळी घंटाभर मोटार चालू करून इळभर इंजीन चालवायला लागलं. दोन दिवस झाले आणि रामाचं निम्मं खोडवं पाणी पिऊन झालं. टोळीचं काम जलदीचं होतं. सकाळी उजडायला तेच मोटार चालू करून पाणी उडवून कामाला लागत असत. मध्ये एक दिवस गेला आणि भल्या पहाटेच रामाच्या खोपीच्या बाहेर कारभार्याचा खाकरल्याचा आवाज आला. रामा जागाच होता. धुरपदाही अजून मुरगाळून झोपली होती. रामानं आतनंच विचारलं, “कोन कारभारी काय?”
“व्हय, मालक.”
रामा गडबडीनं बाहेर आला. कारभारी जाकीटाच्या खिशात हात घालून पायानं खडे उडवत होता.
“का हो कारभारी?”
“मोटार बंद हाय न्हवं का, मालक.”
“आं? ही काय भानगड?”
“काल रातच्याला फिजा काडून घ्यून गेलाय म्हनं वायरमन.”
“फिजा काडल्या? का बरं?”
“बील तटलंय म्हनत हुता त्यो.”
रामानं कपाळाला हात लावला. काडापुरे वायरमन बदलून आला होता आणि तो कायम फूल असायचा. कुणी त्याच्याकडे रोखीनं बील दिलं, तर तो ते खात्यात भरेलच याचा काही भरवसा नसे. कुणाचीही बिलं कुणाच्याही खात्यावर चढवणे, कुणाला कसल्याही नोटीसा काढणे आणि आता चालू केलेलं म्हणजे कुणालाही कल्पना न देता फ्यूज काढून नेणे. त्याला कुठं गाठायचं हा प्रश्नच होता, कारण तो फोन उचलत नसे. एमेसीबीचं ऑफिस गावाच्या बाहेर होतं आणि तेवढ्या लांब जाऊन तिथं कुणी भेटेल याचा भरवसा नसे. रामानं मनाशी थोडा विचार केला आणि तो कारभार्याला म्हणाला, “कारभारी, फिजा काय आजच्या आज बसतील असं वाटत न्हाई. आपुन आपली दुसर्या इंजनाची सोय केलेली बरी. तुमच्या वळखीत असतील की इंजनवाले. दोन इंजनं लावू या दोनचार दिवस. तवर मी बघतो वायरमनचं. कसं म्हंता?”
“इंजान हाये एक घोसरवाडला मालक, पर ते घ्यून यायचं म्हंजे लई कुटाणा हाये. ते इंजिन हाये बबन पाटलाच्या मळ्यात. गाडी पाठवाया पायजे इंजिन आणायला. गाडीची काय जुळणी होत्या का बगा, मालक.”
“कारभारी,” रामा म्हणाला, “अजून दिस उजाडला न्हाई. एवढ्या येरवाळी कुणाची गाडी मिळणार? मोगलाड्याच्या घरला जाऊन बगतो.”
“बगा, बगा मालक.” कारभारी गडबडीनं म्हणाला. “मी कुणाला तरी सांगलीला पाठवतो डिझेल आणायला.”
रामा खोपीत आला तर धुरपदा अजून अंथरुणातच होती. रामाला नवल वाटलं. एरवी या वेळी ती अंग धुवून देवपूजा करत असे. काळजीनं तो तिच्या जवळ गेला आणि म्हणाला, “धुरपदा, काय गं जिवाला बरं वाटत न्हाई काय?”
* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *
मोगलाड्याच्या घरात अजून कोण उठलेलं नव्हतं. इतक्या सकाळी दार कसं वाजवावं आणि काय करावं याचा विचार करत रामा मोगलाड्याच्या दारात घुटमळला. जरा वेळानं परत यावं म्हणून तो परत घराकडं निघणार, तेवढ्यात त्याला हातात डबडं घेऊन परत येणारा मोगलाड्याचा बाबासाब दिसला. रामाला एवढ्या सकाळी आपल्या दारासमोर बघून त्याला नवल वाटलं. डबडं दिवळीत ठेऊन त्यानं बाहेरच्या कर्दळीच्या बेटात तोंडातली मिश्री थुंकून टाकली, बारडीतल्या पाण्यानं हातापायतोंड धुतले आणि हातानं डोळ्यांवरचं पाणी निपटून टाकत तो म्हणाला, “काय गा रामा?”
रामानं त्याला सगळी कथा सांगितली आणि घोसरवाडला गाडी पाठवून इंजीन आणायला पाहिजे हे सांगितलं. बाबसाबनं सगळं ऐकून घेतलं आणि मग म्हणाला, “च्या घेतुस रामा?”
रामाचं डोकं फिरल्यासारखं झालं. “तुला मी काय सांगालोय, बाबसाब? हितं च्या आनि काफी करत बसू व्हय रे मर्दा? गाडीची कायतरी जुळणी करून दे मला, माज्या हिरीचं काम तटल्यालं हाये, माझा संच सगळा बसून हाये आनि तू च्या आनि पानी इचारायलायस व्हय?”
“आरं रामा, आसं का सकाळसकाळी तरबत्तर व्हायलायस? तुला गाडी कधी न्हाई म्हनीन काय मी? खरं गाडी नादुरुस्त हाये लका. पिष्टान रिंगा गेलेल्या हायती. जुगळे मेस्त्री काल आनतो म्हनालाता, खरं त्याचा कोनतर पावणा मेला म्हनं काल. मातीला गेल्ता त्यो काल रेठर्याला. आला आसंल रात्री. जाऊ या थांब जरा. च्या घे.”
रामाचं डोकं ताळ्यावर आलं. बाबासाब भला माणूस होता. त्याच्यावर बिघडून काय उपयोग? त्यानं चहा घेतला आणि बाबासाबला बरोबर घेऊन तो जुगळ्याच्या घराकडं निघाला. जुगळ्याचा आदिनाथ वयानं लहान होता, पण मिस्त्रीकामात तयार होता. त्याच्या गल्लीत ते दोघं वळाले आणि समोरनं गाडीवरनं येणारा आदिनाथ दिसला. संगट एक माणूस.
“मिस्त्री, रिंगा?” बाबासाबनं विचारलं.
“हे काय, तिकडंच निगालोय न्हवं का.” आदिनाथ म्हणाला. “आजच्याला तुमचं काम ठिवत न्हाई बगा.”
“आरं लगा, काल रिंगा आणतो म्हणालतास. गाडी माजी जाग्याव उभी हाय आठ दिवस झाले. आता तू आज निगालायस रिंगा आणायला. ह्या पाटलांचं काम थटलेलं हाये. आता तू रिंगा आणणार कावा, बशीवणार कवा आणि गाडी हुनार कवा?”
“आवो, बायकुचा चुलता मेला काल. सख्खा न्हवं, पर मायेचा माणूस. मी एकलाच जावाई त्याचा. मातीला जायाला नको व्हय?. यायला लई टाईम झाला. येताना वाटंत तेच्या आयला गाडी पंक्चर. काय एक विचारता? आता हे काय निगालोयच. झटक्यात घ्यून येतो रिंगा आणि बाराच्या आत गाडी देतो तुमच्या हातात.” गाडीला किक मारून आदिनाथ गेला.
“रामा, गाडी ताब्यात आली की मी सोता जातो घोसरवाडला.” परत येताना बाबासाब म्हणाला. “आजचा दिवस कळ काड तू. उद्या सकाळी दोनी इंजनं घुमवु या तुझी.”
“काय आता बाबासाब, काय हुईल ते हुईल बगू या.” रामा घराकडं वळला तर दारातच त्याचा थोरला लेक, त्याची बायको, तिच्या कडेवरचं तान्हं मूल आणि शेजारच्या घरातल्या दोन बायका उभ्या होत्या. “आला बगा रामा.” त्यांच्यातली एक बाई म्हणाली.
“काय झालं रं?” रामानं सटपटून विचारलं.
“आरं तात्या, काय तुझं.. कुठं जातो, काय जातो काय सांगून जायाचं का न्हाई?” रामाचा थोरला लेक खेकसल्यासारखा म्हणाला.
“आरं, काय झालं काय?”
“धुरपदा पडली.” शेजारची बाई म्हणाली.
“पडली? कुठं रं?”
“पडली म्हणजे, पडता पडता वाचली.” रामाचा लेक म्हणाला. “घराकडं आली. कसंतरी व्हालंय म्हणली. च्या घे म्हणलो तिला आकडी दुधाचा तर नको म्हणली. बसल्या जागेवरनं उठून उभारली आणि गार्रकन सगळं फिरल्यावानी झालं म्हणली. बरं तर बरं, मी हुतो जवळ. मी धरलो तिच्या दंडाला न्हाईतर पडलीच असती न्हाणीत.”
“हाये कुटं ती?”
“रिक्षात घालून दवाखान्यात न्हेल्यात तिला. आता तू थांब घरात, मी पण जातो तिकडंच.” रामाचा लेक म्हणाला. आपण दवाखान्यात जावं असं रामाला वाटत होतं, पण पुन्हा लेक काहीतरी बोलेल म्हणून तो गप्प राहिला.
“न्ह्यारी करता?” आत आल्यावर रामाच्या सुनेनं त्याला विचारलं.
“आता कशाची न्ह्यारी करतेस पोरी.” रामा उदास मनानं म्हणाला. “दूध दे एक कपभर.”
सकाळ गेली, दुपार झाली. दुपार झाली, लोकांचा भाकरी खाण्याचा टाईम होऊन गेला तरी रामाची पोरं आणि धुरपदा काही दवाखान्यातून परत आले नाहीत, का आदिनाथ सांगलीस्ंन आला नाही, का बाबासाबचा काही निरोप आला नाही. शेवटी भर दुपारी उपाशी पोटानंच रामा बाहेर पडला. आदिनाथनं गावाच्या पार दुसर्या टोकाला एक शेड भाड्यानं घेतलं होतं. तिथंच तो गाड्यांची दुरुस्ती करत असे. तरातरा चालत रामा त्या शेडपर्यंत आला, तर त्या शेडचं दार बंदच होतं. त्या दारावरचं कुलूप बघून रामाला काय करावं हे सुचेनाच झालं. शेडच्या शेजारीच एक पानाची टपरी होती. त्यातल्या पोराला त्यानं विचारलं,”मिस्त्री आलं न्हाईत व्हय रं?”
“काय माझं काय ध्यान गेलं न्हाई हं.” त्या टपरीतला तरणा मुलगा म्हणाला.
“आरं ह्या ग्यारेजचं दार बंद हाये, ते उघडलं व्हतं का न्हाई ह्याला ध्यान कशाला द्यायला लागतंय पोरा?” रामानं चिडून विचारलं.
“अवो काका, आमी आमच्या धंद्याकडं लक्ष द्यावं का दुसर्यांची दुकानं उघडल्यात की बंद हाईत हेच बघत बसावं?” त्या मुलानं उद्धटपणानं विचारलं.
काय लेका, दिवसाला चार आण्याचा धंदा तुझा, आणि तेगार किती इनसपेक्टरचा , रामाच्या मनाला आलं. पण कुठं वाद घालत बसता म्हणून तो माघारी फिरला. चालून चालून सगळा रस्ता संपला आणि गाडीवरनं येणारा आदिनाथ त्याला दिसला.
“येळ केला, मिस्त्री.” रामा दमगीर आवाजात म्हणाला.
“अवो, काय माझी तापद्रा इचारता..” आदिनाथ म्हणाला. “रिंगांचं शार्टेज हाये म्हनं. सांगलीला धा ठिकाणी इचारलो. कुठंबी न्हाईती. मग तसंच किक मारून शिरोली नाक्यापत्तर गेलो. तिथं एका ठिकाणी भेटल्या रिंगा. तेपण पाचशे रुपये चढ देऊन. सकाळपासून हिंडतुया. जेवण नाही का खाण नाही..”
आणि आमी काय पुरनपोळी खाऊन बसलुया व्हय रं? रामाच्या मनात आलं.
“बर आता झटका करायचा बरं का मिस्त्री.” रामा म्हणाला. “का म्हनशिला तर गाडी घ्यून घोसरवाडला जायाचं हाय बाबासाबला.”
“आता कायतर पोटात घालतो, तात्या. उपासपोटी काम हुनार न्हाई माझ्याच्यानं . पर गाडी एकदम रेडी करतो बगा घंट्या दोन घंट्यात.” आदिनाथ गेला.
झाली गोष्ट बाबासाबच्या कानावर घालावी, कारभार्याच्या कानावर घालावी म्हणून रामा तसाच मळ्याच्या दिशेनं निघाला. बाबासाबचं घर वाटेवरच. मळ्याचा रस्ता तोच आणि घोसरवाडचा रस्ता तोच. बाबासाबच्या घराचं दार उघडंच होतं.
“या रामा भाकरी खायला.” बाबासाब म्हणाला.
“काय भाकरी खातुस बाबासाब, अजून कशाचा कशाला मेळ न्हाई. आता रिंगा घ्यून आलाय मिस्त्री. आता हितनं फुडं त्यो रिंगा बसवणार, मग तू गाडी घ्यून घोसरवाडला जाणार, इंजान आणणार आणि मग त्ये बसवून कारभारी पाणी उडवणार.तवर माझी टोळी बसून र्हाईल की गा..”
“आता त्याला विलाज न्हाई, रामा. माझं हुतच आलंय बग. मी हातावर पानी घ्येतो की जातो मिस्त्रीच्या शेडकडं. घोसरवाडला कुणाच्या मळ्यात हाय इंजान?”
“कोन बबन पाटील म्हनं.”
“मी आणतो इंजान, रामा. तू नको काळजी करू. एकाला दोन माणसं घ्यून जातो संगाट. हिरीत असलं तर हिरीतनं काडून आणू इंजान तिच्या आयला..”
रामानं बाबासाबच्या समोरचा तांब्या उचलला आणि उभ्यानंच तो घटाघटा रिकामा केला. सकाळी एक कप चहा आणि मगाशी घेतलेलं कपभर दूध एवढंच पोटात गेलेलं. त्याला कलकलल्यासारखं होत होतं. आता निदान इंजनाचा मेळ होतोय ही बातमी कारभार्याच्या कानावर घालावी म्हणून रामा तसाच मळ्याकडं निघाला. ऊन तापायला लागलं होतं, रामाच्या मनात राहून राहून धुरपदेचा विचार येत होता. एवढी टाण बाई, कधी डोकं दुखलं म्हणूनसुद्धा बसली नाही. अचानकच...
“रामराम, मालक” अचानक कुणीतरी समोर आलं. कोण बघतोय तर वायरमन काडापुरे. लालभडक डोळे आणि तोंड उघडलं की समोरच्याला भडभडून येईल असा दारूचा वास.
“वायरमन, फिजा का काढलाय?”
“हां, फिजा का काढलाय. बील भरू नका आणि मग इचारा की फिजा का काढलाय म्हणून.”
“अवो, बील कधीच माझं तटल्यालं न्हाई. म्हयन्याच्या म्हयन्याला भरतूय मी.”
“अवो मग तुमचं कनेक्शन तोडायला आम्ही काय दारू पिऊन डूटी करतोय का काय?”
आता यावर काय बोलावं हे काही रामाला सुचेना. काडापुरे हत्ती झुलावा तसा झुलत होता.
“सर्कलला जाऊन चौकशी करा मालक. बील कोन भरलाय, कुणाच्या खात्यावर भरलाय ते बगा जावा. ही बघा तुमची बाकी.” रामाच्या हातात बील देऊन काडापुरे शेजारच्या बोळात शिरला. ह्या बोळात आण्णाप्पाचा गुत्ता होता. गरिबाच्या मुंड्या पिरगाळून खावा तुमी. सर्कल म्हणजे तालुक्याला. तिथं कुणाची दाद ना फिर्याद. सरकारी काम आणि सहा महिने थांब असला खाक्या. मुलाला तिकडं पाठवायचं म्हणजे त्यांचा एक दिवस खाडा होणार. आपण गेलो तर आपल्याला कुणी हिंगलणार पण नाही.
हातातला कागद तसाच घेऊन रामा मळ्यात आला. बघतो तर कारभारी आणि त्याची माणसं विहिरीतनं यारी, त्यांचं इंजीन हा सगळा सांगाडा बाहेर काढत होते. रामा हबकलाच. ही आणि काय नवीन भानगड?
“काय कारभारी, काय गडबड?”
“दानोळीचं एक काम करून येतो मालक. आर्जंट हाय. ते मालक आगाव पैशे द्यून गेल्यात. तुमचा हू दे मोटारचा, इंजनाचा जुळणा. आता न्हाई म्हटलं तरी एकाला चार दिस लागणार. तवर आमचा संच बसूनच र्हाणार की. तेवढं काम तरी होईल.”
“कारभारी, इंजान आणायला मी माणूस पाठवलेला हाये. मोटारचं काम मी उद्याच्या उद्या करतो. आजचा दिस काळ काढा. आसं आर्धीच हजामत केल्यावाणी करू नगा.” रामा काकुळतीला येऊन म्हणाला.
कारभारी काही बोलला नाही, पण त्यानं बांधाबांध काही थांबवली नाही.
* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *
दिस बुडायला कारभारी त्याची यारी, इंजीन, खोरी, कुदळी, पाट्या घेऊन निघून गेला. त्याच्या माणसांनी उभारलेली खोपाटं तशीच होती, पण त्यांतलं गबाळं कारभार्याच्या बायकांनी आवरलं होतं. ‘मालक तुमचं पैसं अंगावर हायती माझ्या. तुमची इंजनाची जुळणी हू द्या, मोटर चालू हू द्या मग मला सांगावा धाडा. शबुद दिलेला हाये मी, मालक. तुमचं काम करनार म्हंजे करनार.’ कारभारी सांगून गेला होता. आता असलं अर्धवट राहिल्यालं काम कुठनं पुरं व्हायला? रामाच्या मनात येऊन गेलं. राहिलं की राहिलंच ते. त्यानं विहिरीत डोकावून बघितलं. आता तोंडं मोकळी झालेल्या झर्यांतून पाणी येत असावं. विहिरीत पाणी जमा व्हायला लागलं होतं. त्यानं उसाकडं बघितलं. निम्मा उस गार होता, निम्मा सुकल्यासारखा दिसायला लागला होता.
दिवसभर वणवण. आंघोळ नाही की पाणी नाही. पोटात अन्नाचा कण नाही. त्याची वासनाच मेल्यासारखी झाली होती. पोटात, छातीत जाळ झाल्यासारखं वाटत होतं. खोपीत आला तर ओरडून ओरडून म्हशीचा आवाज फाटल्यासारखा झाला होता. तिची कास तटाटलेली होती आणि रेडकू पायांतली ताकद गेल्यासारखं खाली बसलं होतं. अरारा.. मुक्या जनावराला दिवसभर वैरण नाही की पाणी नाही. रामा, कुठं फेडशील ही पापं? त्यानं म्हशीसमोर पाण्याची बारडी ठेवली. काल तोडून आणलेल्या वैरणीतली कवळाभर वैरण टाकली, रेडीला मोकळी केली आणि तो धारेला बसला.
हातात दुधाची किटली घेऊन रामा पाय ओढत घराकडं निघाला. आता कधी मोटारचं बील नीट करून आणायचं, कधी दुसरं इंजीन आणून बसवायचं, कधी कारभारी येणार, कधी विहीरीचं काम सुरू होणार.. जमलेल्या खेळाचा विस्कोट झाला. काढलेली कर्जं, चढलेली व्याजं, वाळत चाललेला ऊस..इट्टला.. त्याला घराचा रस्ता दिसेनासा झाला.
“तात्या... रामातात्या ओ..” मागनं हाका ऐकू आल्या तसा रामा वळाला. दीपक होता, बाबासाबचा मुलगा.
“काय रे दिप्या?”
“बाबाचा फोन आलाता तात्या. गाडी घोसरवाडला चिकलात आडकल्या म्हणं.”
“चिकलात? ती आणि कशी रं?”
“अवो, त्या पाटलाच्या मळ्याचा रस्ता वड्यातनं जातोय. वड्याला पानी काही लई न्हाई, पण चिक्कूल ढीग हाये. तुमचं इंजिनाचं काम आर्जंट म्हणून बाबानं गाडी घातली तशीच वड्यात. चाकं सगळी बुडाली म्हणं चिकलात. गाडी फुडं बी जाईना आन मागं बी येईना. आता दुसरी मोठी गाडी लावून वडून काडायला पायजे म्हणत हुता बाबा.”
“आणि रं?”
“तुमाला निरोप द्यायला सांगितलाय, शिकलगाराची मोठी गाडी हाये. त्याला गाठ पडून ती गाडी आर्जंट लावून द्या असा निरोप हाये.”
“कोंचा शिकलगार? याशीन?”
“व्हय त्योच. नालगाव रस्त्याला घर हाय बगा, त्योच. जावा लवकर.”
नालगाव रस्त्यावर यासीन शिकलगारचं घर म्हणजे जायलाच तासभर लागणार. कधी जाणार, कधी सांगावा देणार, कधी गाडी जाणार, किती खर्चा..
“जाताय न्हवं?
“आं?”
“अवो तात्या, शिकलगाराच्या घरला जाताय न्हवं?”
त्याला काहीच होय नाही म्हणता रामा चालायला लागला. दिवसच बादगड लागला तिच्या आयला. सगळा फज्जा होऊन बसला.
घराजवळ आला तशी त्याला धुरपदाची आठवण आली. दिवसाच्या कालव्यात विसरूनच गेलो.. तिला काय झालंय, डॉक्टर काय म्हणला कुणाला माहीत. कधी पैचा दवा नाही लागला तिला, कदी काय झालं तर मुकाट कपभर आल्ल्याचा च्या न्हाईतर सुंठीचं चाटण करून घेतली आणि कामाला लागली. बाळांतपणं झाली एवडी, खरं पोरं तान्ही असल्याधरनं कामं करायला लागली माझी बाई.. आता काय होऊन बसलंय कुणास ठाऊक..
घरात शांतता होती. टीव्ही बंद होता. त्यानं चपला काढल्या. समोरच्या खोलीत त्याचे दोन्ही लेक आमने सामने बसले होते. खाली दुपट्यावर त्याचा नातू एकटाच वर बघत खेळत होता. बाकीची नातवंडं आत असावीत.
“कवा आला रं तुमी?”
“झाला इळभर.”
“बरं हाय काय म्हातारीला? काय म्हनला डॉक्टर?”
“काय म्हननार? आमचा पैसा खोटा, त्याला डॉक्टर काय म्हननार?”
आरं काय झालं काय?” त्यानं विचारलं.
“आता आमच्या तोंडातनं आपली आबरू काढून घे तात्या तू.” रामाचा थोरला लेक म्हणाला.
“म्हंजे?”
“म्हंजे आई गरवार हाये, तात्या. चवता म्हयना चालू हाय असं म्हनला डॉक्टर. आता काय करायचं आन काय बोलायचं सांग. तिला एक न्हाई ते न्हाई, पर तुला लाज असूने?”
रामाचा लेक बोलत होता. रामाच्या नजरेसमोर सगळं घर गरागरा फिरायला लागलं. कुणाचं तोंड चुकवावं आणि कुणाकडं बघावं हे त्याला कळंना. आतल्या खोलीत धुरपदा हंतरुणाच्या ढिगावर अंग टाकून रडत होती. घरातलं एखादं माणूस मरावं तशी ढसाढसा रडत होती. उकाडा होता, डासांची घुंई गुणगुण होती. रामाचा लेक तडातडा बोलत होता आणि आत धुरपदा रडत होती.
प्रतिक्रिया
20 Oct 2025 - 2:44 pm | श्वेता२४
तुमच्या कथेतील व्यक्तीरेखा उभी करताना त्याचे जे विस्तृत वर्णन करता ना , अगदी समोर उभा राहतो तो माणूस. तुमच्या लेखनाबाबत खूुप आदर आहे. ही कथाही आवडली.
20 Oct 2025 - 3:45 pm | स्वधर्म
तरबत्तर, बारडी, बुकणा, दमगीर असले शब्द खूप दिवसांनी वाचायला मिळाले. आज्जीच्या पिढीतल्या सांगलीतल्या लोकांकडून ऐकले होते. अशा खास शब्दांमुळे खुमासदार झाली आहे कथा!
बाकी आपल्याकडे शंकर पाटील असोत की अगदी अलिकडचे आसाराम लोमटे असोत, ग्रामीण कथा म्हणजे वैफल्य (फ्रस्ट्रेशन) च्या कथा असेच समिकरण असते. नाहीतर मग बेरकी व्यक्तीमत्वांच्या, चावट किंवा फजितीच्या कथा. ही कथा अशीच पुढे जाईल असे वाटले होते पण तिचा शेवट अशा प्रकारे न होता एकदमच अनपेक्षित झाला. शेवट हा कथेचा आत्मा असतो तो एकदम सॉलीड जमलाय.
अधूनमधून लिहा, फक्त दिवाळी ते दिवाळी नको, ही प्रेमाची विनंती.
20 Oct 2025 - 6:11 pm | गवि
उत्कृष्ट. समोर बसून कोणीतरी गोष्ट सांगतंय असा भास झाला. अगदी आवाज ऐकू यावा तसा. व्यंकटेश माडगूळकर आठवले. धन्यवाद. असेच आणखी पुष्कळ वाचायला मिळो.
21 Oct 2025 - 8:28 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कथा आवडली. ग्रामीण भाषा, कथेचा ग्रामीण बाज, शब्द आणि चल चित्रपट पाहतोय अशी लेखन शैली. वाचकांनी वाचत जावं आणि शेवटाला काय वाढून ठेवलं असेल त्याची उत्कंठा लागून जाते. 'धुरपदाचं सौंदर्य, रामाची लगट आणि शरिराचं बोलणं' यावर लेखकाने जोर लावला नसता तर, कदाचित नवल वाटलं असतं. संजोपरावांच्या कथेतल्या ग्रामीण स्त्रिया कायमच आपलं सौंदर्याने भरभरुन आणि आखीव,रेखीव असतात या वर्णनात लेखक कमी पडत नाही. एकत्र कुटुंबातल्या गावगोष्टी अतिशय सुंदरपणे मांडल्या आहेत. विहिरीची गोष्ट जरा लांबत चालते पण कथेच्या शेवटासाठी धावपळ आवश्यक असावी, असे वाटले. आवडली कथा. नियमित लिहिते राहावे.
-दिलीप बिरुटे
21 Oct 2025 - 5:50 pm | निमी
ग्रामीण बाजाची कथा छान..काही वेगळे शब्द वाचायला मिळाले.
23 Oct 2025 - 4:57 am | सोत्रि
संजोपराव, सिर्फ नाम ही काफी है! एकदम झक्कास!
- (संजोपरावांचा पंखा) सोकाजी
23 Oct 2025 - 11:41 am | चोपदार
नेमके ग्रामीण शब्द, संवादांचा बाज,दैनंदिन जीवन व व्यक्तिचित्रण सगळेच 1 नंबर...
23 Oct 2025 - 11:51 am | कर्नलतपस्वी
कथेचा शेवट वाचताना अगदी आशीच अवस्था झाली बघा.
आमचे आजोबा मोठे प्रस्थ,त्यांचे कुळवाडी सकाळी ओसरीवर पान जमवत अशीच भाषा बोलायचे. गुदस्ता हा तर आजोबांचा फेव्हरिट शब्द होता.
कथा आवडली हे वेगळे सांगावयास नको.
30 Oct 2025 - 2:10 am | लोथार मथायस
सन्जोप राव तुम्ही सगळे प्रसंग अगदी डोळ्यासमोर उभे केले. ग्रामीण वातावरण निर्मिती अप्रतिम !!
11 Nov 2025 - 8:35 pm | सुखी
निव्वळ झाक लिवलय बगा
13 Nov 2025 - 12:36 am | सौन्दर्य
माझा जन्म आणि संपूर्ण आयुष्य शहरातच गेले त्यामुळे ह्या ग्रामीण शब्दांची ओळख कथा - कादंबऱ्यातुनच झाली. ह्या कथेतील अनेक शब्दांचे अचूक अर्थ कळले जरी नाहीत तरी संदर्भामुळे कोठेही समजायला अडचण आली नाही.
कथा इतकी सुंदर आणि ओघवत्या भाषेत लिहिली आहे की आपण सतत रामाबरोबर चालत आहोत व त्याचे जे काही कष्ट, चिंता, अस्वस्थता हे सर्व अगदी जवळून अनुभवल्यासारखे वाटले. गावातल्या लोकांचे स्वभाव, त्यांच्याकडे असलेला रिकामा वेळ, फुकाचे सल्ले हे अगदी ओळखीचे वाटले. बहुतेक लोकांकडे एव्हढा रिकामा वेळ असतो की गावात जेसीबी आला तर त्याला बघायला अर्धे गाव लोटते. भरपूर वेळ हाताशी असल्यामुळे घाई किंवा लगबग, कामाची निकड ही फक्त संबंधित व्यक्तीला असते बाकी सगळे त्याची मजाच बघत असतात.
साठीत पुन्हा मूल होणे ते देखील घरात नातवंडे खेळत असताना हे नाही म्हंटले तरी थोडेसे लाजिरवाणंच असतं, जे ह्या कथेत अतिशय समर्पकपणे मांडलंय. मात्र धुरपदी दोन मुलांची आई असताना तिला स्व:ताला, दिवस गेले हे कसे कळले नाही ? हे थोडेसे अकलनीय आहे. रामासाठी तो दिवस अतिशय त्रासात गेला हे मला स्वतालाही जाणवले.
कथा अतिशय सुंदर व मनापासून आवडली.
13 Nov 2025 - 12:40 am | सौन्दर्य
हे थोडेसे अनाकलनीय (अकलनीय) आहे. रामासाठी तो दिवस अतिशय त्रासात गेला हे मला स्वतालाही जाणवले.
24 Nov 2025 - 12:39 pm | सन्जोप राव
प्रतिसाद देणार्या सर्वांचे आभार.
कथा कोल्हापुरी भाषेत लिहिलेली असल्याने काही शब्द अपरिचित असणे शक्य आहे. इथे मंचावर किंवा व्य नि मध्ये विचारल्यास मी अर्थ सांगू शकेन.
पुन्हा दिवस जाणे हे धुरपदालाही अपेक्षित नसल्याने ते तिच्या लक्षात आले नसावे असे मला वाटते. किरकोळ त्रास झाला असला तरी तिने तो अंगावर काढला असावा. आपल्या दुखण्याची फार वाच्यता करण्याचा तिचा स्वभाव नाही. साठीत (रामा साठीचा, म्हणजे धुरपदा पन्नास-पंचवन्न वर्षाची असावी) दिवस जाणे दुर्मिळ असले तरी अशक्य नाही. निरोगी प्रकृती आणि कष्टांची सवय असलेले शरीर असले की इतर संस्थांप्रमाणेच प्रजननसंस्थाही बराच काळ सक्षम राहाते.
25 Nov 2025 - 5:52 pm | श्वेता व्यास
कथा आवडली