(काल्पनिक कथा)
त्या दिवशी शनिवार होता. कॅनॉट प्लेस इथल्या सरकारी कार्यालयातून दुपारी अडीच वाजता काम पूर्ण करून बाहेर पडलो. मेट्रो स्टेशनकडे जाताना मला ती माझ्याच दिशेने चालत येताना दिसली. तिनेही मला पाहिले,
"विवेक" ती धावतच माझ्या जवळ आली. जणू तिला मला मिठी मारायची होती. पण जवळ येताच ती थबकली. आजही ती तशीच दिसत होती. सडपातळ, पंजाबी उजळ रंग, फक्त केस थोडे पांढरे झालेले होते. तिच्या चेहर्यावर आनंद आणि भीतीचे मिश्र भाव दिसत होते.
मी "तुझ्यात काहीच बदल नाही. अगदी तशीच दिसते आहेस, जशी ३५ वर्षांपूर्वी दिसत होतीस." ती हसत म्हणाली, "तूही अगदी तसाच आहे, फक्त केस पांढरे झाले आहेत."
मी हसत म्हणालो, "वय झाले आहे आता आपले. कॉफी हाउसला जाऊ या का? आपल्याला गप्पाही मारता येतील." नकळत मी तिचा हात आपल्या हातात घेतला आणि आम्ही कॉफी हाउसच्या दिशेने चालू लागलो.
१९८१, बहुतेक ऑगस्ट महिना असेल. मला राजेंद्र प्लेस इथल्या एका व्यापारी संघटनेत तात्पुरती नौकरी मिळाली होती. तीही याच परिसरात एका दुसर्या कंपनीत काम करत होती. माझ्याच वयाची होती. टिळक नगर येथे राहत होती. चार्टर बसमध्ये तिची ओळख झाली. ती बी.कॉम.च्या फायनलला होती. तिला अकाउंट्समध्ये समस्या होती. माझे अकाउंट्स उत्तम होते. रविवारी आणि वेळ मिळाल्यास अकाउंट्सच्या अभ्यासासाठी ती आमच्या घरी येऊ लागली. असेच एक दिवस अभ्यास झाल्यावर, मी तिला सोडायला जेल रोडला जात असताना, आमच्या भागातील काही टवाळखोर मुले माझ्याकडे विचित्र नजरेने पाहत गेले. मला चुकचुकल्यासारखे वाटले. मला जाणवले, माझा हात तिच्या खांद्यावर ठेवलेला आहे. मी हळूच हात हटविला आणि तिला म्हणालो, "चुकून हात खांद्यावर ठेवला, सॉरी." तिने माझा हात पुन्हा तिच्या खांद्यावर ठेवला आणि माझ्याकडे पाहत हसत म्हणाली, "मूर्ख आहेस तू, तुला काहीच कळत नाही."
ती माझ्या प्रेमात पडली होती. त्या काळी शनिवारी ऑफिसांमध्ये दुपारी एक वाजता सुट्टी होत होती. सुट्टी झाल्यावर तिच्यासोबत राजेंद्र प्लेसच्या रचना सिनेमा हॉलमध्ये दोन-तीन सिनेमे बघितले असतील. बॉलीवूड हीरो-हिरॉइनसारखे आम्हीही बुद्ध गार्डनमध्ये फिरलो.
पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. काही दिवसांपासून ती भेटली नव्हती. एक दिवस तिची ऑफिसमधली मैत्रीण लंच टाइमला तिचा निरोप घेऊन आली. ती म्हणाली, "विवेक, तिला भेटण्याचा प्रयत्न करू नकोस, आमच्या ऑफिसमध्येही येऊ नकोस." मी विचारले," काय झाले?" ती म्हणाली, "काही दिवसांपूर्वी तिच्या वडिलांनी, तिच्या मोठ्या भावाच्या मित्राशी तिला लग्नाबाबत विचारले. तिने नकार देत म्हटले, "त्याच्या दारुड्या मित्राशी मी लग्न करेन असा विचार तुमच्या मनात आला तरी कसा?" भाऊ भडकला, वडिलांना म्हणाला, "मी म्हणत होतो तिला नौकरी करू देऊ नका. बाहेर 'नैनमटका' करत असेल." भावाचे म्हणणे ऐकून तिलाही राग आला, "हो करते, काय करणार तू? तो तुझ्यासारखा दारुडा नाही. निर्व्यसनी आहे आणि चांगल्या ब्राह्मण परिवारातला आहे." त्या काळात दिल्लीत खालिस्तानी वारे वाहत होते. तिच्या बापाचा पारा चढला. कमरेवरचा बेल्ट काढून तिला मारणे सुरू केले. तिच्या बापाला तिच्याकडून तुझे नाव वदवून घ्यायचे होते. ती मार खात राहिली, पण तिने तोंडातून तुझे नाव घेतले नाही. शेवटी तिच्या आईने कसेबसे तिला वाचविले. तिच्या भावाने तर तुला मारण्याचा प्रण केला आहे." मी विचारले, "तुला हे सर्व कुणी संगितले?" त्या दुर्दैवी घटनेच्या दोन किंवा तीन दिवसांनी तिचा भाऊ ऑफिसला आला आणि म्हणाला, "तिचा अपघात झाला आहे. तिला भरपूर मार लागला आहे. बहुतेक ती आता ऑफिसला येऊ शकणार नाही." नंतर माझ्याजवळ येऊन म्हणाला, "तिचा एक बॉयफ्रेंड आहे, तिला त्याला भेटायचे आहे. मला तिचा निरोप त्याला द्यायचा आहे." त्याच्या चेहर्यावरचे भाव पाहून माझे सहावे इंद्रिय जागे झाले. मी त्याला म्हणाले, "माझी-तिची मैत्री फक्त ऑफिसची आहे. बाहेर ती काय करते मला माहीत नाही." तो पुटपुटला, "नका सांगू. कुठे जाईल तो!" आमच्या मॅनेजरलाही तिच्याबाबत काही वाईट घडले आहे, याची शंका आली. दुसर्या दिवशी दुपारच्या वेळी मॅनेजरसोबत मी तिच्या घरी गेले. घरी फक्त तिची आई होती. आमच्यासाठी चहा ठेवण्याआसाठी तिची आई स्वयंपाकघरात गेली, तेव्हा ती हळूच मला म्हणाली, "विवेकला सांग, सध्या काही महिने मला भेटण्याचा प्रयत्न करू नकोस. माझा भाऊ कॅनडाला जाण्याचा प्रयत्न करतो आहे. तो गेला की मी स्वत:होऊन विवेकला भेटेन."
नोव्हेंबर महिन्यात मला सरकारी नौकरी लागली. घरची आर्थिक परिस्थिति थोडी बदलली. जानेवारी ८३मध्ये आम्ही हरिनगर येथील एलआयजी फ्लॅटमध्ये शिफ्ट झालो. एक दिवस मी तिच्या ऑफिसमध्ये गेलो. तिची मैत्रीण म्हणाली, "ती काही पुन्हा ऑफिसला आली नाही. काही दिवसांपूर्वी मी तिच्या घरी गेले होते. तिचे घर बंद होते. मला एवढेच कळले की तिच्या वडिलांनी मुलाला कॅनडा पाठविण्यासाठी घर विकले आणि उरलेल्या पैशांनी एक फ्लॅट विकत घेतला आहे."
मी नि:स्तब्ध झालो. एवढ्या मोठ्या दिल्लीत मी तिला शोधणार कुठे? माझी प्रेमाची कथा इथेच अर्धवट संपली होती.
कॉफी पिताना तिने मला विचारले, "विवेक, तुझा संसार कसा काय सुरू आहे?" मी म्हणालो, "तुझा काही पत्ताच लागला नाही. पंचविशी उलटताच आईने पसंत केलेल्या मुलीशी लग्न केले. दोन अपत्ये आहेत. तुझे काय?" ती म्हणाली, "सहा महिन्यांनी भाऊ कॅनडाला गेला. त्याच आठवड्यात आई-बाबांचा अपघात झाला. त्यांच्या स्कूटरला एका ट्रकने धडक दिली होती. वडील कायमचे अंथरूण पकडून बसले. आईही वर्षभर अंथरुणावर होती. माझा पूर्ण दिवस त्यांच्या सेवेत निघून जायचा. स्वत:चा विचार करण्याचा वेळही नव्हता. वडिलांचे दुकान विकले व लाख रुपये फिक्समध्ये टाकले. त्या व्याजावर आणि भाऊ पैसे पाठवायचा त्यावरच कशीबशी गुजराण होऊ लागली. वर्षभरानंतर आई वॉकरच्या मदतीने चालू लागली होती. एक दिवस वेळ काढून तुझ्या घरी गेले. पण तुम्ही तिथून शिफ्ट झाला होता. माझी ऑफिसची मैत्रीणही नौकरी सोडून गेली होती. तुझा पत्ता कुणापाशी नव्हता. तू कुठे आहेस हे कळण्याचा मार्ग नव्हता. भावाने कॅनडात लग्न केले आणि पैसे पाठविणे बंद केले. आई-वडिलांच्या उपचारात बॅंकेतली जमा बचतही कमी होऊ लागली होती. मी घरी ट्यूशन घेणे सुरू केले आणि सरकारी नोकरीसाठी जोमाने तयारी सुरू केली. १९८६अखेर मला सरकारी नौकरी मिळाली. पुन्हा तुझी आठवण आली. एक दिवस तुझी माहिती मिळाली. तुझे लग्न झाले आहे, असे कळले. मी हताश आणि निराश झाले. बहुतेक माझ्या भाग्यात आईवडिलांची सेवा होती, म्हणून नियतीने आपल्या दोघांना दूर केले असावे." "आता कसे आहेत दोघे?" मी विचारले. ती म्हणाली, "वडील पुढे चार-पाच वर्षांनी गेले. माझे आजोबा पाकिस्तानातून एकटेच जिवंत आले होते. बाबाही एकुलते एक होते. एक भाऊ होता, तोही अंतिम संस्कारासाठी आला नाही. मीच वडिलांचा अंतिम संस्कार केला. आईने मला अनेकदा लग्नाबाबत विचारले. पण अपंग आईला सोडून मी कुठे जाणार? अखेर गेल्या वर्षी तीही वर गेली."
काही क्षण थांबून मी तिला विचारले, "तुझा पत्ता आणि फोन नंबर देतेस का? काही गरज पडली, तर.."
तिने माझा उजवा हात तिच्या हातात घेतला. तिच्या स्पर्शातील दाहकता मला जाणवली. ती म्हणाली, "विवेक, मी आयुष्यात एकाच पुरुषाला स्पर्श केला आहे. त्याला मिठी मारली आहे. जेव्हा रात्री मी बैचेन होते, जीव कासावीस होतो, तेव्हा तुझा स्पर्श आठवून मनाला सांत्वना देते. मला जगण्यासाठी तो प्रेमाचा एक स्पर्श पुरेसा आहे. माझा पत्ता मी देणार नाही. फोन नंबरही मागू नको. मी दिसले, तर दुसर्या वाटेने निघून जा. माझ्याजवळ येण्याचा प्रयत्न करू नकोस. माझ्या भावनांचा बंध फुटला, तर त्या ज्वालेत आपण दोघे भस्म होऊन जाऊ. माझ्याबरोबर तुझा संसारही उद्ध्वस्त होईल." बोलताना तिचा वाढता श्वासोच्छ्वास आणि आवाजातील कंप मला जाणवत होता. बोलता बोलता ती उठली, तिने पर्स हातात घेतली आणि झपाझप पावले टाकत विरुद्ध दिशेने बाहेर निघून गेली. एकदाही तिने मागे वळून पहिले नाही. मी अवाक होऊन तिला जाताना पाहत राहिलो. स्तब्ध आणि जडवत. माझ्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. तिच्या स्पर्शाचा दाह अजूनही जाणवत होता. ती आतल्या आत जळत होती, तरीही तिने स्वत:ला सावरले आणि माझा स्पर्श घेऊन पुन्हा माझ्या आयुष्यातून निघून गेली. त्यानंतर मला कित्येक रात्री झोप आली नाही. मनात अनेक प्रश्न उठत होते. मी तिला शोधण्याचा प्रयत्न का केला नाही? लग्न करायची घाई का केली? तिच्या शब्दांवर विश्वास ठेवून तिची वाट पाहू शकत नव्हतो का? पण गेलेल्या काळातील प्रश्नांची उत्तरे कधीच मिळत नाहीत. शेवटी आपण नियतीचे गुलामच.
तिला माझी माहिती मिळाली होती, तरी इतकी वर्षे तिने माझ्याशी बोलण्याचा किंवा मला भेटण्याचा विचारही केला नाही. तिला माझ्या सुखी संसाराला तिची नजर लागू द्यायची नव्हती. तीही गॅझेटेड ऑफिसर झालेली होती. तिचा पत्ता आणि फोन नंबर मिळविणे काही कठीण नव्हते. पण तिच्या शब्दांच्या बाहेर जाण्याचा विचार मी केला नाही. आता माझा स्पर्श हृदयात जपून ती उरलेले आयुष्य जगणार होती. तिने माझ्यावर खरे प्रेम केले होते.
पण मी.. या प्रश्नाचे उत्तर अनेकदा शोधूनही मला मिळाले नाही.
प्रतिक्रिया
21 Oct 2025 - 10:43 am | भागो
दोन ओंडक्यांची होते सागरात भेट
एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ
.
.
.
पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. दोष ना कुणाचा.
काका, खरच की आपली लावली आम्हाला शेंडी.
काहीही असो. कुठेना कुठे, कुणाच्या तरी जीवनात असे घडत असेल. त्याला तुम्ही शब्द रूप दिलेत. व्वा.
हटके मनभावन कथा,
टोपी काढून सलाम.
21 Oct 2025 - 9:14 pm | विवेकपटाईत
प्रतिसादासाठी धन्यवाद. ही ९० टक्के खरी कथा आहे.
22 Oct 2025 - 1:17 am | भागो
दिवाळी अंक २००५ - स्पर्श विरहिणीचा : कथा प्रेमाची - कथा
(काल्पनिक कथा)
सत्य आणि कल्पना ह्यांचे बेमालूम मिश्रण!
साहित्य संपादक २००५ चे २०२५ कराल का?
22 Oct 2025 - 2:47 pm | सोत्रि
१००+++
छान कथा!
- (नियतीचा गुलाम) सोकाजी
22 Oct 2025 - 3:55 pm | श्वेता२४
भावूक शेवट...
23 Oct 2025 - 11:06 am | कर्नलतपस्वी
बदली होत असल्याने दरवेळेस कुणीना कुणी तरी भेटले. मग एक बदलीच्या हुकूमाने भवसागरात भेटलेल्या ओंडक्यांची ताटातूट व नंतर उरल्या फक्त आठवणी. लेखामुळे भूत पुन्हा जीवंत झाले.
लेख आवडला.
फारसे मनावर घेऊ नये कारण याला जीवन ऐसे नाव.....
2 Nov 2025 - 12:08 am | गामा पैलवान
विवेकपटाईत,
पकड घेणारी कथा आहे. कुठलेसे बंध कुठेशी तरी कसल्याश्या तरी रीतीने व्यक्त ( manifest ) होतात....!
बाकी, हे वाक्य वाचून खूप हसलो :
मला पडलेले प्रश्न :
१. त्यावेळेस बॉलीवूड होतं का?
२. हिरोहिरवीण बागेत गाणी गातात. तुम्ही कोणतं गाणं गायलंत?
३. बुद्धाने बायको व संसार सोडला. तुम्ही त्याच्याच नावाच्या उद्यानात हिरोहिरवीणीसारखे फिरलात. बुद्धाला काय वाटलं असेल? हेचि फळ काय मम तपाला?
उत्तरांसाठी प्रश्न केलेले नाहीत. मला का हसू आलं ते सांगण्यासाठी हे प्रश्न लिहिलेले आहेत.
असो.
बायका प्रचंड त्यागी असतात. हे गंभीर निरीक्षण नोंदवून खाली बसतो.
आ.न.,
-गा.पै.
2 Nov 2025 - 12:26 pm | विवेकपटाईत
१९८० मध्ये बॉलीवूड होते. या शिवाय त्यावेळी बुद्ध गार्डन प्रेमी प्रेमिकांसाठी प्रसिद्ध होती. लागून सुरक्षित घनदाट जंगल आहे. आज तर मर्यादाच्या बाहेर तिथे प्रेम होते. शिवाय ऑफिसच्या रस्त्यात होते.
3 Nov 2025 - 7:46 am | बिपीन सुरेश सांगळे
कथा मस्त . आवडली
25 Nov 2025 - 7:01 pm | श्वेता व्यास
छान आहे कथा.