Skip to main content

गुरू आतला

लेखक रोहन जगताप यांनी शनिवार, 14/12/2024 12:47 या दिवशी प्रकाशित केले.
नसे भोवती छत्रछाया वडील गुरू आतला सावली ती वसे नसे सोबती पितृमाया वडील गुरू लाभला प्रेम पाठी तसे
उरी पोकळी पोरकी राहिलेली भरूनी जिवाला मनी पाविले नदी कोरडी आटली वाहिलेली भिजूनी किनारा तृषा भागिले
नसे पाहिले धैर्यशाली वडील गुरू राखला हात माथी असे नसे जाहले आप्तवाली वडील गुरू जागला साथ जन्मा जसे
मने कोवळी कोंडली घुस्मटून करी मोकळा बंध जे राहिले फुले पाकळी सांडली कुस्करून सुवासास वेचू गुरू वाहिले
लेखनविषय:

वाचने 4189
प्रतिक्रिया 15

प्रतिक्रिया

उत्तम गुरू मिळायला भाग्य लागते. कारण, काही गुरू हे "आपण गुरू आहात.." ह्याच लायकीचे असतात.

In reply to by मुक्त विहारि

अगदी बरोबर आहे. बाकी प्रत्येक माणसाच्या आत एक गुरू असतो. वरील कविता ही त्या गुरूला वाहिलेली आहे. ‘कळते पण वळत नाही’ असे आपण म्हणतो. त्यातले जे कळतेपण आहे, तोच आपल्यातील गुरू आहे. पण त्याकडे लक्ष न दिल्याने कळूनही वळत नाही.

In reply to by रोहन जगताप

माझे एक मार्गदर्शक होते.. त्यांनी एक गोष्ट सांगितली आणि आज देखील ती गोष्ट मी पाळतो. रात्री झोपण्यापूर्वी , स्वतः साठी १० मिनिटे काढायची आणि त्या १० मिनिटांत, आज दिवसभरात केलेल्या सर्व गोष्टी आठवायच्या. झोपेतील, अर्धजागृत अवस्थेत, मेंदु कुठल्या गोष्टी चुकीच्या केल्या आणि त्यावरची उपाय योजना शोधून काढतो आणि ही निरंतर चाललेली साधना आहे. काही उपाय लगेच मिळतात तर काहींना प्रत्यक्षांत यायला , बेंझीन काळ लागतो. (Benzene Time, हा माझ्या मार्गदर्शन करणाऱ्या गुरूंचा आवडता शब्द.) Benzene Time बद्दल माहिती हवी असेल तर, खालील लिंक बघा.. https://www.acs.org/molecule-of-the-week/archive/b/benzene.html#:~:text….

In reply to by रामचंद्र

मानवी आयुष्यात केवळ वडीलांचीच असे नव्हे, पण वडीलकीची अशी एक पोकळी असते. कोणीतरी आपल्याला सांभाळून घ्यावे, मार्गदर्शन करावे, दिशा दाखवावी अशी प्रत्येकाची कळत-नकळत इच्छा असते. परंतु अनेकदा ही पोकळी भरून येत नाही. अशावेळी माणसाच्या आतील गुरूच ही पोकळी भरून काढण्यास सक्षम असतो अशा अर्थाने वरील कविता लिहिलेली आहे. तरी कवितेच्या पहिल्या कडव्यात पुढील प्रमाणे बदल केल्यास कदाचित कविता आपल्याला परिपूर्ण वाटेल अशी आशा आहे.
नसे भोवती छत्रछाया वडील गुरू आतला सावली ती वसे नसे सोबती पितृमाया वडील गुरू लाभला माय पाठी तसे

त्यावर कवीचे स्पष्टीकरण कवितेचा आयाम बदलून पूर्णत्वास नेते. कविता आवडली.

सुंदर रचना ! गुरुचे महत्व कालातीत आहे ! म्हणुनच म्हटले आहे : गुरु ब्रह्मा, गुरु विष्णु, गुरु देवो महेश्वरा:, गुरु साक्षात परम ब्रह्मा, तस्मै श्री गुरुवे नम:। गुरू म्हणजे परम !