दोसतार- ३७

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
17 Feb 2020 - 4:28 am

मग असे कर ही पुस्तके घरी घेवून जा. त्या रजिस्टर मधे नोंद कर आणि घेऊन जा.
रजिस्टर मधे नोंदवून ते किशोर चे दोन अंक दप्तरातून घरी आणले.
उद्याची तयारी करायची आहे पण काय करायचे तेच कळत नाहिय्ये.
"आज "आणि "उद्या" मधे फक्त दहा तासांची एक रात्र आहे.

मागील दुवा :http://misalpav.com/node/46090

घरी येताना एकटाच आलो. एल्प्या त्याच्या उद्याच्या वर्गाची तयारी करायची म्हणून घाटे सरांकडे गेला असणार . टम्प्याला कसली तयारी करायची होती काय माहीत पण तो पण लवकर गेला होता.

काय रे विनू ,उशीर झाला यायला. दुर्गा आज्जी आली होती दुपारी. थांबली होती तुझ्यासाठी.
अग हो उद्या शाळेत शिक्षक दिन आहे.
त्याचं काय.
आम्ही उद्या तास घेणार आहोत शिक्षक होऊन. शिकवणार आहोत.
"तुम्ही शिकवणारआणि शिक्षक काय करणार वर्गात विद्यार्थी होणार का? "
तु पण ना आई शिक्षक कसे विद्यार्थी होतील. आम्ही खालच्या इयत्तेतील मुलांना शिकवणार आहोत.
अरे वा छान. दुपारी दुर्गा आज्जी हेच म्हणत होती.
काय! खालच्या इयत्तेतील मुलांना शिकवायचे म्हणून!. पण तीला कसे कळाले हे. आमचं तर एकदम सिक्रेट होते
अरे ते नाही. ती म्हणत होती तीला भजन शिकायचे आहे. आणि ती भजने ती तीच्या मंडळात शिकवणार. आपण दुसर्‍याला शिकवताना आपली छान प्रॅक्टीस होते.
दुर्गा आज्जी म्हणजे पाटणच्या आज्जीची मावस की कसलीशी बहीण. पाटणच्या आज्जी पेक्षाही कापूस दिसायची. तीचे पांढरे शुभ्र केस , आणि साईसारखे मऊसूत सुरकुतलेले हात. पांढरं लुगडं , कोणत्याही गोष्टीवर जोरात हसणार. हसताना आपला हात ओढून टाळी देणार. तीची दिलेली टाळी म्हणजे कानात गुपचूप काहितरी सांगितल्यागत, ज्याला टाळी दिली त्यालाच कळणार ,दुसर्‍याला ऐकूपण येणार नाही. टाळी दिली की तीचा कापसासारखा हात , प्रसादाला बत्तासे साखरफुटाणे ठेवल्यागत पटकन काढून घेणार. दुर्गा आज्जी आईची एकदम दोस्त मावशी. ती आली की आई एकदम खुशीत येणार. मग आज्जीसाठी दहीपोहे करणार. घरी दहीपोहे दिसले की दुर्गा आज्जी येणार आहे किंवा येवून गेली असणार हे नक्की.
तीचे नाव टाळी आज्जी ठेवायला हवे होते. तसे एकदा पाटणच्या आज्जीला विचारलेपण होते. हे सिक्रेट ठेवायचे की नाही पण पाटणच्या आज्जी ने ते दुर्गा आज्जीला साम्गितले आणि त्यावर दोघीही एकमेकीना टाळ्या देत खुसुखुसू हसत बसल्या. दुर्गा आज्जीला टाळी दिली नाही की काय होते हे एकदा पहायचेय म्हणून तीच्या समोर मुद्दामच हात पाठीमागे बांधुन उभा राहिलो. दुर्गा आज्जीने हात सापडला नाही म्हणून माझी हनुवटी धरून गालावर ती कापशी टाळी दिली.
आज्जी आज अचानक आली? तशी ती नेहमीच अचानक येते. इकडून जात होते म्हंटलं तू आहेस का पहावं असे म्हणत येते.
विनू हे बघ आज्जीने खाऊ आणलाय तुझासाठी. आत्ता खाऊ नकोस नाहीतर जेवण जाणार नाही.
"हो. " एका अक्षरात उत्तर देता येते.हे बरंय. ह्या वेळेला दुर्गा आज्जीने आणलेल्या खाऊ पेक्षाही उद्या काय हेच डोक्यात.
जेवतानाही तेच होते. वाचनालयातून आणलेले किशोर चे अंक दप्तरातून बाहेर काढले. चित्रे पहात त्यातल्या गोष्टी वाचत बसलो. प्रत्येक गोष्टीची सुरवात आटपाट नगर होते.असे का म्हणत असतील. गावात आठ दिशांना जाणारे पाण्याचे पाट असतील म्हणून असेल का. आठही दिशांना उतार असलेले ते गाव म्हणजे एक टेकडीच असेल.
आटपाट नगर होते किंवा कोणे एके काळी एका जंगलात एक राजा रहात होता. अशीही असते गोष्टीची सुरवात मग त्या गोष्टीतल्या राजाला दोन तरी राण्या असतात. एक आवडती आणि दुसरी नावडती. दोन्ही राण्या आवडत्याच का नसतात किंवा दोन्ही राण्या नावडत्या का नसतात असे प्रश्न कोणी या गोष्टी लिहीणाराना पडत नसावेत.किंवा जर एक राणी नावडती होती तर तीच्याशी राजाने लग्न तरी का केले. असाही प्रश्न त्याना विचारत नसावे कोणी.
उद्या आपण गोष्ट सांगायला लागलो आणि कोणी हे असले प्रश्न विचारले की बंदच पडेल गोष्ट. आणि ऑफ तास तिथेच संपेल.
पुस्तक वाचता वाचता तसाच झोपून गेलो हे कळालेच नाही.
झोपेत आम्ही सगळे शाळेत गेलोय. सगळे शिक्षक वर्गात बाकावर बसले आहेत. इनामदार सर उशीरा आलेत टंप्या त्यांना शाळेच्या गेटवरच कानाला धरून उठाबशा काढायला लावतोय . सुषम बाउन्स बॉल ची कविता शिकवतेय. शिकवताना गब्बर सिंग त्या तालावर बंदुकीत गोळ्या भरतोय.आणि सांबा कालीया सोबत रबरी चेंडूने आबादुबी खेळतोय.
एल्प्या काहितरी शिकवतोय. फळ्यावर काहितरी काढलंय ते एकदा पाटीपूजनाला ४ ४ आकड्याची सरस्वती काढतो तसे दिसतय. तर नंतर ताजमहाल चा घुमट दिसतोय.त्यात कसलेशी गणिते पण लिहिलेली आहेत. तास सुरू होऊन बराच वेळ झालाय. सम्पायलाच तयार नाहिय्ये. एल्प्याच काय पण मुलेही तेच तेच शिकून कंटाळली आहेत. मी तडक टंप्याकडे जातो. घंटेला वाजवणारा लोलक सोनसळे सरांनी चहासाठी आले कुटायला म्हणून काढून नेलाय. त्यामुळे टंप्याला तास संपल्याची घंटाच वाजवता येत नाहिय्ये.
मी टाळी देऊन घंटा वाजवतो. माझा हात दुर्गा आज्जीसारखा कापूस झालाय. माझ्या टाळीमुळे घंटा वाजायच्या ऐवजी भजन म्हणतेय.
संस्कृत वार्ता: श्रुयंताम, प्रवाचक बलवानंद सागर. इयम दिल्यां नगरे प्रधानमंत्रीणां........
अरे सात वाजले. बापरे आवरायला हवं. कालच्या किशोर मासिकातली बुध्या काकाची गोष्ट सांगू या. ती चांगली लक्ष्यात आहे. ती सांगून संपली की शब्द कोडे सांगुया. शब्द कोडे सोडवायला सगळ्याम्नाच आवडते. किंवा मग त्या वर्गातल्याच कुणालातरी गोष्ट सांगायला सांगुया.
चला आपली तयारी झाली. शाळेत आज तसेही दप्तर न्यायचे नाही. शिवाय हाप प्यांट ऐवजी शिक्षकांसारखी फुल्ल प्यांट घालून जायचं आहे. शिक्षक विद्यार्थी म्हणून येणार नाहिय्येत ते बरे आहे. नाही तर त्यांना खाकी चड्डी पांढरा शर्ट घालून आमच्यासारखे गणवेशात यावे लागले असते.
बरे आहे ऑफ तासाची तयारी केली आहे. आई जेवताना सारखी विचारत तयारी झाली आहे का तयारी झाली आहे का. तीला काय माहीत ऑफ तासाची तयारी काय असते ते.
वर्गात सगळे आज काहितरी वेगळेच दिसताहेत. योग्या , राजा, सुहास , मिलींद , सगळे एकदम दिवाळीला उटणे लावून आंघोळ करून आल्यासारखे आले आहेत. नवे कपडे घालुन वेगळेच दिसताहेत. जयश्री , संगीता , वैजू सगळ्या कसल्या वेगळ्याच दिसताहेत. आंजीने तीच्या नेहमीच्या लाल रेबीनी ऐवजी कसल्याशा मोठ्या प्लास्टीकच्या हिरव्या पिना वेणीला बांधल्यात. डोक्यात नाकतोडे बसल्यासारखे दिसतय
शुभांगी ने दुमडलेल्या वेण्या आणि त्यावर कसलासा गजरा घातलाय. तीचे डोळे चमकताहेत. पिवळ्या साडीत सगळ्यात ठळ्ळक दिसतेय. हसताना...…..

कथाविरंगुळा