बरेच दिवसांनी अंड्याचे कॉलेजला जाणे झाले जे तो कधीच मागे सोडून आला होता. होस्टेलला चक्कर मारली पण शुकशुकाट वाटला. बरेच वर्षांनी एखाद्या ओळखीच्या जागी जावे आणि तिथे कोणी आपल्या ओळखीचे दिसू नये की मग एकतर तेथील गजबजाट तरी अंगावर येतो किंवा शुकशुकाट तरी वैताग आणतो. तिथून बाहेर पडलो आणि कॉलेजच्या मुख्य इमारतीकडे वळलो. रात्रीचे साडेदहा वाजले होते. सिनेमा बघून परतत होतो. सोबतीला कॉलेजमधीलच मित्र होते. सारे एकाच कॉलेजचे माजी विद्यार्थी, म्हणून रात्री घरी परतण्याऐवजी कॉलेजलाच मुक्काम टाकून मैहफिल जमवायचा बेत आखला. कॉलेजच्या मुख्य इमारतीचा एक मजला रात्रभर जागत असतो हे सवयीने माहीत होते. दोन वर्षे अभ्यासाच्या नावावर तिथेच झोपण्यात गेली आमची.. अच्छा चला, पत्ते कुटण्यात गेली हे देखील कबूल करतो. तर ते बाकडे आजही ओळखीच वाटले. त्यावरच आडवेतिडवे पसरून गप्पा कुटायला सुरुवात केली. कारण यावेळी पत्ते बरोबर नव्हते ना. गरजही नव्हती म्हणा.
कॉलेजच्या आठवणी कॉलेजच्या मित्रांबरोबर कॉलेजमधील आपल्या नेहमीच्या अड्ड्यावर, ज्यांनी हा अनुभव घेतला तेच काय ते जाणोत की आमची रात्र कशी रंगली असावी. मध्येच एक सिक्युरीटी मामा डोकाऊन गेले. कोणी ओळखीचे भेटो न भेटो हे ओळखीचे असणे फार गरजेचे होते. शैलूने हात दाखवला आणि काम झाले. पहाटेपर्यंतची रात्र अशीच जागून काढायचा विचार होता. पण सर्वांच्याच डोळ्यांवर आलेल्या झापडीने अंदाज चुकवला. कॉलेजात असताना असे कधी व्हायचे नाही. कदाचित बदललेली जीवनशैली कारणीभूत असावी. सध्या सर्वांची लाईफ फुल्ल ऑफ वर्किंग स्ट्रेस झाल्याने सुट्टीचे दिवस म्हणजे झोपा काढायचे हे ठरलेलेच असते. चलता है, मला मात्र त्या लाकडी बाकड्यांवर कधीच झोप आली नव्हती म्हणून मी माझ्या फेव्हरेट व्हरांड्यात पसरलो. डोक्याखाली एखादे पुस्तक नाहीतर अंगातलेच काढून त्याची छानशी घडी करून बनवलेली उशी. म्हणजे उशीची उशी झाली अन अंगदेखील फुल्ल एअर कंडीशन. ते ही काय कमी म्हणून वर चमचमणारे तारे. सकाळी उठायचे म्हणून सवयीने अलार्म लावायला मोबाईल काढला अन स्वताशीच हसायला आले. त्याची तेव्हाही कधी गरज पडली नव्हती, तर आज उठायची अशी काय घाई होती. मुळात तेव्हा मोबाईल नावाचा प्रकारच बाळगायचो नाही. सकाळी त्या व्हरांड्यात जाग यायची ती पाखरांच्या मंजुळ किलबिलीनेच. वाटले आज इथून रेकॉर्डच करून जावे अन रोज अलार्म म्हणून मग तेच वापरावे. आईच्या लाडिक हाकेनंतर साखरझोपेतूनही प्रसन्नतेने डोळे उघडावेसे वाटावेत असा तो दुसरा आवाज.
पण का कोणास ठाऊक, नव्हता नशिबी तो आवाज यावेळी. सकाळी जाग आली ती अभ्यासाच्या निमित्ताने कॉलेजला लवकर येणार्या मुलांच्या गोंगाटानेच. घरी परतताना मित्रांमध्ये विषय निघाला आणि काय आश्चर्य, त्यांच्याही ते लक्षात आले होते. पक्ष्यांची किलबिल त्या दिवशी झालीच नाही म्हणे. किंबहुना हल्ली ती होतच नाही म्हणे. कॉलेजच्या परिसरातील झाडे किंचित कमी झाली होती हे खरे, मात्र हे कारण काही मनाला पटत नव्हते. कोण म्हणाले प्रदूषण वाढलेय, तर कोणी वाढत्या लोकसंख्येला आणि ट्राफिकला जबाबदार धरले. कोणी मोबाईल टॉवरमधून निघणार्या अदभुत लहरींवर खापर फोडले तर कोणी थेट ग्लोबल वार्मिंगलाच हात घातला. पाखरे हरवली होती एवढे मात्र नक्की, अन त्यांच्याबरोबर हरवला होता तो त्यांचा आवाज... बस इथेच अंड्याचे विचारचक्र सुरू झाले.. आधुनिक राहणीमान, सतत बदलणारी जीवनशैलीमुळे आणि झपाट्याने प्रगत होणार्या तंत्रज्ञानामुळे आज कित्येक आवाज आपल्यातून हरवले आहेत, कित्येक दुरावले आहेत. अश्याच काही विसर पडलेल्या आवाजांचा अंड्याच्या मनाने सहज आढावा घेण्यास सुरुवात केली.
भायखळ्याला माझी मावशी राहायची. या अंड्यावर लहानपणापासूनच फार जीव तिचा. दिवाळी अन उन्हाळी सुट्ट्या पडल्या कि माझा मुक्काम तिथेच. आईशिवाय अंड्या राहू शकेल असे पृथ्वीतलावरील एकमेव घर. ‘माय मरो अन मावशी जगो’ अशी अचरट म्हण बनवणार्याच्या बोलण्यातही काही तथ्य होते हे तिथे जाणवायचे. मामे-मावस-आत्येभावांची टोळी जमली की रात्री लवकर झोपणे काही व्हायचे नाही. मग मध्यरात्रीच्या निरव शांततेत दोन हमखास ऐकू येणारे आवाज टिपायचा खेळ सुरू व्हायचा. त्यातील पहिला आवाज म्हणजे जवळच असलेल्या राणीबागेतील वाघ-सिंहाची डरकाळी. तो नक्की वाघ डरकाळायचा, सिंह गर्जना करायचा की अस्वलाची गुर्रगुर्र असायची हे तेव्हा समजायचे नाही. पण निदान कुत्रे भुंकल्यासारखा आवाज नसल्याने आणि आवाज राणीबागेतूनच येत असल्याने आम्ही त्या आवाजाचे बिल नेहमी वाघसिंहांवरच फाडायचो. दुसरा आवाज म्हणजे बाहेरगावी जाणार्या ट्रेनचा आवाज. हा आवाज भायखळा स्टेशनवरून न येता थेट मुंबई सेंट्रल स्थानकाहून येतो असे मावशी सांगायची. खरेही असेल, तेव्हा मोठे सांगतील तेच प्रमाण मानायचे वय. पण जसे वयात आलो तसे मावशीच घर सुटले अन ते आवाजही. मध्यंतरी कित्येक वर्षांनी मावशीकडे जाणे झाले होते तेव्हा ना सिंह गरजला ना ट्रेनने भोंगा दिला. कदाचित राणीबागेत आता दोनचार घुबडं अन माकडं सोडून फारसे वन्यजीव उरले नसावेत, आणि वाढत्या लोकसंख्येच्या बरोबरीने वाढत्या ट्राफिकच्या कर्णकर्कश्य हॉर्नमुळे लांबवरून येणारे ट्रेनच्या भोंग्यांचे आवाज दबले जात असावेत. त्या रात्री गप्पांमध्ये त्या दोन्ही आवाजांची आठवण मात्र काढली गेली ज्यांच्याशी आम्हा भावंडांच्या बालपणीच्या आठवणी देखील निगडीत होत्या.
त्या ट्रेनच्या भोंग्यासारखाच आठवणीतील एक आवाज गिरणीच्या भोंग्याचा. हा आवाज देखील फार जुना. सकाळी नऊ वाजता न चुकता कानावर पडणारा. आमचे घड्याळ किती पुढे आहे की मागे पडले आहे हे या भोंग्याच्या वाजण्यावरून ठरायचे. आईसाठी तर ती नऊची वेळ एक बेंचमार्क होती. तो भोंगा कानावर पडला की नऊ वाजले हे तिला समजायचे आणि तसे ती सकाळची तयारी शेड्युलनुसार चालू आहे की नाही हे ठरवायची. जर तयारी वेळेत नसेल तर, "अरे देवा नऊ वाजले. अजून कपडे धुवायचे बाकी आहेत. आज पाणी देखील मेले हळूहळू येतेय. ए चल आनंदा, तू चहा घे तोपर्यंत आपल्या हाताने, मला वेळ नाही आता..." हे तिचे ठरलेले पुटपुटने. तो भोंगा ही कुठे हवेत विरला देव जाणे. कोणत्या गिरणीचा वाजायचा ते ना आजवर मला कळले ना तेव्हा माझ्या आईला माहित होते. तरीही तो आमच्या दैनंदिनीचा एक भाग बनून होता.
असाच तेव्हा घराघरातून येणारा एक आवाज म्हणजे कूकरच्या शिट्ट्यांचा. सकाळची किंवा संध्याकाळची एक ठराविक वेळ झाली की थोड्याफार फरकाने वाडीतील प्रत्येक घरातून हा आवाज यायचा. सोबतीला असायचा तो एक मंदसा दरवळणारा वास. रविवारी हा वास तसा खासच असायचा आणि हे आवाजही त्या दिवशी आपली वेळ चुकवून किंचित उशीराच ऐकू यायचे. कपडे धुताना धोक्याने बडवताना होताना आवाजही याच कॅटेगरीतील, अन याच्या सोबतीलाही एक सुकत घातलेल्या कपड्यांचा वास असायचा. पण आज मात्र फ्लॅटच्या बंद दरवाजापाठी हे आवाज देखील अडकून राहिलेत.
हा संस्कृतीबदल केवळ चाळसंस्कृती अन फ्लॅटसंस्कृती पुरता मर्यादीत नसून सर्वच क्षेत्रात घुसला आहे. पैकी एक म्हणजे मंगलकार्ये. एकेकाळी लग्नसराईत हमखास ऐकू येणारा सनई चौघड्यांचा आवाजही लोप पावलाय. तेव्हा मात्र तेच तेच पॅंपॅपॅ काय सार्या लग्नात म्हणून अंड्या चिडायचाच, पण हल्ली काही लग्न समारंभ पाहता ते नुसते रिसेप्शन अन जेवणाच्या पार्टीपुरता असतात की काय असे वाटते तेव्हा त्या पारंपारीक सनई चौघड्याची कमतरता जाणवतेच.
या पिढीत हरवल्यासारखा वाटणारा अजून एक आवाज म्हणजे मुलांचा कल्ला. एक जमाना होता जेव्हा सुट्ट्या पडल्या की क्रिकेट फूटबॉल अन पतंगबाजी, खोखो कबड्डी अन भोवरापाणी, सकाळी उठल्यापासून दिवस मावळेपर्यंत या मैदानी खेळांच्या नावावर वाडीभर नुसता कल्ला कल्ला अन कल्ला कान किटवायचा. आज मात्र मोबाईल विडीओगेम अन ईंटरनेट यांचाच बोलबाला. मुलांचा आवाज चिडीचूप अन या उपकरणांतून बाहेर पडणारे चित्रविचित्र बींप बींप पीब पीब चे आवाज. या आवाजावरून आठवले हल्लीच्या सिनेमांनी ध्वनीमुद्रणात अशी मजल मारली आहे की जुन्या सिनेमातील हाणामारीच्या प्रसंगांमध्ये येणारा ढिशुम ढिशुमचा आवाज आणि ठो करून सुटणारा बंदूकीचा बार देखील इतिहासजमा झालाय. त्या आवाजाने आम्हा बच्चे कंपनीला हिंदी सिनेमाशी एवढे एकरूप करून ठेवले होते की मारामारी म्हटले की आम्ही ढिशुम ढिशूम असेच बोलायचो.
कुल्फीवाल्याचा आवाजही हल्ली मिस करतो हा अंड्या.. कुल्फिय्ये SSS.... करत त्याने दिलेली बांग.. अन मग उगाच आईच्या आसपास घुटमळणे जे तिने माझे मन ओळखून दोन रुपये काढून द्यावेत.. अगदी यासारखीच आणखी एक बांग.. भांडीय्ये SSS.... ही ऐकल्यावर मात्र आजीच्या पदरामागे लपणे.. कारण ही भांडीवाली मस्ती करणार्या लहान मुलांना उचलून नेते अशी घातलेली भिती.. कुठे गेले हे सारे आवाज म्हणून शोधायचे म्हटल्यास आधी ते परत हवे आहेत का हा प्रश्न अंड्याला स्वत:च्या मनाला विचारावा लागला. अन याचे उत्तर त्यावाचून काही अडले नाही असेच मिळाले. काही गोष्टी आठवणी सजवायलाच चांगल्या वाटतात. पण एक आवाज मात्र या अंड्याला परत आणायला आवडेल, अन तो म्हणजे त्याचा स्वत:चा आवाज. मोठा होता होता तो देखील कुठेतरी दबला आहे. समाजाने प्रौढांसाठी बनवलेले शिष्टाचार पाळायच्या नादात या अंड्याने शेवटची दिलखुलास आरोळी केव्हा ठोकली होती हे आता तोच विसरला आहे. भारतीय संघ क्रिकेटचा सामना हरताना बघून टीव्ही समोर उभे राहून आपल्याच खेळाडूंना हलक्याश्या आवाजात घातलेली एक कचकचीत शिवी, तोच सामना जिंकल्यावर फटाक्यांनाही लाजवेल असा केलेला जल्लोष, तसाच काहीसा किंवा त्यापेक्षाही भारी असा जल्लोष जो शेजारच्या वाडीतील पतंग गुल केल्यावर व्हायचा, त्याच पतंग उडवायच्या गच्चीतून खालच्या हॉटेलवाल्या सदूशेठला दोन कटींग वरती पाठवायचा दिलेला आवाज, सबंध वाडीतील बत्ती गुल झाल्यावर उत्स्फुर्तपणे होणारा मुलांचा एकच कल्ला ज्यात अंड्याचाही एकेकाळी सिंहगर्जनेचा वाटा होता. हे सारे आवाज एकदा गवसले की मग कानांवर पडणारे इतर नवेजुने आवाज पुन्हा तसेच उपभोगता येतील, अन त्यापैकी कुठलाही हरवलेला आवाज चुटपुट लाऊन जाणार नाही याची अंड्याला खात्री आहे. तुम्हीही बघा तुमच्या आयुष्यातून स्वत:चा असा एखादा आवाज हरवला आहे का, अन असल्यास त्याला परत आणने शक्य आहे का..!
- आनंद उर्फ अंड्या
--------------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------------
अंड्याचे फंडे १ - रायटर अंड्या - http://misalpav.com/node/24341
अंड्याचे फंडे २ - फर्स्ट क्लास - http://misalpav.com/node/24353
अंड्याचे फंडे ३ - छंद - http://misalpav.com/node/24356
अंड्याचे फंडे ४ - फेक आनंद - http://misalpav.com/node/24372
अंड्याचे फंडे ५ - शर्यत - http://misalpav.com/node/24449
अंड्याचे फंडे ६ - शॉपिंग मॉल - http://misalpav.com/node/24573
अंड्याचे फंडे ६ - खादाडी - http://misalpav.com/node/24739
--------------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------------
प्रतिक्रिया
26 May 2013 - 8:35 pm | पैसा
बाकी फंड्यांसारखाच हाही फंडा आवडला. पाखरांचे आणि लहान मुलांचे आवाज हरवलेत हे मात्र फारच वेदनादायी आहे.
26 May 2013 - 9:36 pm | कोमल
अतिशय सुंदर.. खरं सांगायचं तर मला तुमच्या सर्व लेखांत हा लेख खुपच आवडला.. मला सुद्धा असचं वाटतं की हे सगळेच आवाज हरवल्यात जमा आहेत.
माझ्या लहानपणी भल्या पहाटे पिंगळा (पक्षी नाही हं) दारी यायचा. हाती कंदील, ओठी अभंग अन् अंगावर घोंगडे घेतलेला पिंगळा अताशा दिसतच नाही. त्याच्या पहिल्या प्रहराच्या अभंगांचा आवाज हरवला आहे.
पिंगळ्या नंतर जरा उजाडलं की यायचा वासुदेव. टाळ चिपळ्या वाजवणारा, "वासुदेव आला हो वासुदेव आला" म्हणत स्वतः भोवतीच एखादी गिरकी घेणारा, पांढरा कुडता, धोतर आणि मोरपिसाची टोपी घालणारा वासुदेव खुप आशिर्वाद द्यायचा तेव्हा वेगळाच आनंद व्हायचा. त्याच्या टाळ-चिपळ्यांच्या आवाजाने तर कायमचीच सुट्टी घेतली असावी असं वाटतं :(
रात्र झाली की घराजवळच्या डोंगरावरून कोल्हेकुई ऐकू यायची (हो तेव्हा सातार्यात माणसांची वर्दळ नव्हती) आणि भीती वाटून पट्कन झोप पण यायची.
27 May 2013 - 6:02 am | स्पंदना
मलाही हा भाग अतिशय नॉस्टॅल्जीक वाटला.
लेखाची सुरवात अन शेवट दोनीही पकड घेतात मनाची.
27 May 2013 - 9:46 am | सुज्ञ माणुस
जबरदस्त लिहिलाय हा भाग … बराच उशिरा आला, (का वाट बघत होतो म्हणून उशीर वाटला ? माहित नाही :) )
फेक आनंद आणी हा … तुफान जमलाय :)
27 May 2013 - 11:56 am | साळसकर
खरे तर हा लेख अगदी लेटेस्ट नाहिये, मध्यंतरी लिहिलेला, बस थोडीशी छेडछाड करून याला अंड्याच्या फंड्यामध्ये घेतला. तुर्तास वैयक्तिक कामात व्यस्त असल्याने काही सुचायला मागत नाहिये.
आपण वाचता, आवडते त्याबद्दल धन्यवाद. :)
27 May 2013 - 11:53 am | बॅटमॅन
हा भाग जास्तच जब्री. विशेषतः
हे अतिशय खास!
27 May 2013 - 8:27 pm | ५० फक्त
भुतस्मरणरंजनात फारसा न रमणारा मी, पण तरीदेखील हे आवडलं.
27 May 2013 - 11:58 am | विसोबा खेचर
वा..! जियो...
27 May 2013 - 7:18 pm | प्यारे१
खूप मस्त.
27 May 2013 - 11:10 pm | मैत्र
आवडला हा भाग... मस्त आहे..
28 May 2013 - 9:26 pm | साळसकर
आभार सर्वांचे च !
28 May 2013 - 11:11 pm | मी-सौरभ
सकाळी उठल्यावर कानावर येणरा रेडीओचा आवाज पण मिस करतो मी आज काल....