" पालक " ही पालेभाजी घरातील सर्व सदस्यांनी खावी अशी इच्छा एकंदरीत सगळ्या "पालकांची " असते , सगळ्या पालकांची म्हणजे अगदी आजी - पणजी पासून सगळे आपापल्या मुलांना सांगताना आपण ऐकतो, कारण सगळ्यांना ही पालेभाजी आवडेलच असे नाही . आजकाल "पालक - पनीर " या हॉटेल मध्ये मिळणाऱ्या आणि त्यात पनीर आहे म्हणून खाणाऱ्यांचं प्रमाण थोडे बहुत अधिक आहे. असो आज एक नवीन रेसिपी लिहीत आहे जी पौष्टिक , झटपट नाही जरा वेळ लागतोच, खमंग, चटपटीत आहे .... शिवाय ज्यांना पालकाची चव विचित्र, मातकट इत्यादि वाटते त्यांना ती ठराविक चव लागणारच नाही पण पौष्टिकता भरपूर...
साहित्य -
-हिरवे मूग - १ वाटी
-हरभरा डाळ, तूरडाळ , उडीद डाळ- 2 मोठे चमचे प्रत्येकी
( या शिवाय ज्या हव्या त्या डाळी चालतील)
- १/२ वाटी तांदूळ
- लसूण पाकळ्या ३-४
- हिरव्या मिरच्या ( चवीनुसार)
- पालकाची १५-२० पाने
- जिरं
- हिंग
- हळद
- 2-3 उकडून घेतलेले बटाटे
- १/२ वाटी बारीक चिरलेली शिमला मिरची,
-१/२ वाटी किसलेले गाजर
- आमचूर पावडर
- चाट मसाला
- मीठ
- तूप अथवा बटर -२-३ चमचे
- लाल मिरची पावडर
- चीज (आवडत असल्यास)
कृती -
-हिरवे मूग, सर्व डाळी, तांदूळ ६-८ तास भिजवून घेणे
- नंतर मिक्सर मध्ये हिरवी मिरची, लसूण, जिरं , पालकाची पाने, भिजवलेले डाळींचे मिश्रण एकत्र वाटून घ्यावे.
- त्यात मीठ घालून डोश्याचे पीठ तयार होते.
- एका पॅन मध्ये तूप घ्यावे , त्यात जिरं, हिंग, हळद घालावे, त्यात किसलेले गाजर, बारिक चिरलेली शिमला मिरची घालून परतून घ्यावे .
- १वाफ येऊ द्यावी, त्यात उकडलेला बटाटा कुस्कुरऊन घालावा.
- या नंतर त्यात मीठ, आमचूर पावडर, चाट मसाला , लाल मिरची पावडर मिसळून छान वाफ आणावी.
- डोश्याच्या आत भरण्यासाठी मसाला तयार आहे.
-तव्यावर डोसा तयार करून घ्यावा , कडेने मोकळा करून घ्यावा .
- तयार मसाला त्यात मध्यभागी भरावा, वरून पाहिजे असल्यास चीज किसून भुरभुरावे, दोन्ही बाजूंनी डोसा बंद करून त्याचा रोल बनवावा.
-याला कोणत्याही चटणी सोबत, टोमॅटो सॉस सोबत खाऊ शकतो.
चीज घातल्याने ही रेसिपी मुलांना आवडते, त्यासोबत बाकीच्यांना चीज आवडत असेल तर घशात अडकणार तर नक्कीच नाही.
मिसळपाव
प्रतिक्रिया
या असल्या पाककृती
वाचायला, फोटो बघायला एकदम सोप्प्या!
बनवताना मात्र काहीतरी गफलत होते. डोसा तुटतो. भाजी तिखट होते, पालक करपतो.
-( हाटील चालू झाल्यावर वाफाळत्या सांबारात डोसा बुडवून खायची वाट बघणारा) पैलवान
लय भारी
लय भारी