कवितेवरची कविता
लेखनविषय:
काव्यरस
काही कविता सुचलेल्या,
काही चक्क पाडलेल्या,
काही कविता छोट्या,
तर काही उगीच वाढलेल्या...
काही कविता भिजवणा-या
आषाढातल्या धारांसारख्या,
काही लागतात जीवाला,
वळवातल्या गारांसारख्या..
काही असतात सरळ सोप्प्या
होतात त्यांची गाणी,
हाती येत नाहीत काही;
अळवावरचं पाणी..
काही असतात साध्यासुध्या
स्पष्ट असतो अर्थ,
तर काही "ग्रेस"फुल्ल
नादी लागणं व्यर्थ...
काही असतात लाजाळू
त्यांची बनते वही,
काही इतक्या उतावीळ
'लाईकू'न घ्यायची घाई..
कशीही का असेना
कविता असते सई,
एकदा हात धरला की
साथ सोडत नाही..
वाचन
7043
प्रतिक्रिया
13