मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मनः सामर्थ्य

सुबोध खरे · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
हि मी दहावी पास झाल्याच्या वेळेची गोष्ट आहे. माझा भाऊ बारावीत गेला होता आणि त्याचे कॉलेज चालू झाले होते त्यामुळे तो आणि आई आले नव्हते मी आणि आमचे वडील आमच्या गावी कोकणात गेलो होतो. परशुराम येथे आमचे वडिलोपार्जित घर आहे. मागच्या अंगणात फणसाचे झाड आहे त्या झाडाचे दोन फणस आणि गावात विकत घेतलेले शेकडा हापूस आंबे( तेंव्हा ६५ रुपये पक्का शेकडा म्हणजे शंभर (अधिक १२) म्हणजे ११२ आंबे असे एका पाटीत टाकून चिपळूण ठाणे एस टी च्या टपावर चढवले( परशुराम तिठ्ठायेथे ) आमच्या नेहेमीच्या शिरस्त्याप्रमाणे आम्ही मुंब्र्याला उतरलो.तेंव्हा नवी मुंबई चा रस्ता नव्हताच. मुंब्रा येथे उतरून लगेच क्रमांक दोन फलाटावर येणारी मुंबईकडे जाणारी गाडी आम्ही पकडत असू. म्हणजे ठाणे स्टेशन पर्यंत जाण्याला एस टी ला लागणारा वेळ वाचत असे आणि परत तेथे पूल चढण्याची कटकट हि वाचत असे.आणि कमीत कमी तिकीट मुलुंड ते मुंब्रा असेच होते. असो ते दोन फणस आणि आंबे मी मुंब्र्याला एस टी च्या टपावर चढून वडिलांकडे खाली दिले. आम्ही ते मुंब्रा स्टेशन वर आणले. तिकीट काढले आणि गाडीची वाट पाहू लागलो तेवढ्यात एक उद्घोषणा झाली कि क्रमांक दोन च्या फलाटा पासून दूर उभे राहा एक जलद गाडी जाणार आहे. कोणीही रेल्वे लाइन पार करण्याचा प्रयत्न करू नका. आम्ही आमची बोचकी जर मागे आणून उभी केली. आणि फलाटाच्या किनार्या पासून दूर उभे राहिलो. एवढ्या वेळात क्रमांक एक च्या फलाटावरून एक वयस्क स्थूल साडी नेसलेली (सिंधी किंवा मुसलमान) बाई (साठीच्या आसपास) रूळ पार करण्यास रुळात उतरली. केवळ पूल चढायला लागू नये म्हणून ती बाई फलाटावर बसली आणि रुळात उतरली आणि सावकाश एक क्रमांकाचा रूळ ओलांडून दोन क्रमांकाच्या रुळावर आली. मुंब्र्याचा रूळ बहिर्गोल आहे त्यामुळे कल्याणकडून येणारी धीमी गाडी आपल्याला उजवीकडे वळून येताना अगोदर दिसते आणि जलद गाडी असेल तर पारसिक बोगद्याकडे सरळ जाताना दिसते. मी आणि आमचे वडील आम्ही हि बाई आता काय करते आहे हे पाहत होतो तेवढ्यात टिटवाल्याकडून येणारी जलद गाडी दोन क्रमांकाच्या रुळावर जोरात येताना दिसली. त्याच्या मोटरमनने जोरात भोंगा वाजवायला सुरुवात केली.पण हि बाई मुर्खासारखी परत एक क्रमांकाच्या रुळाकडे जायच्या ऐवजी फलाट चढायचा प्रयत्न करू लागली. आमचे वडील म्हणाले कि हि मूर्ख बाई बहिरी आहे काय? येणारी गाडी सत्तर ते ऐंशी किमी वेगाने येत होती आणि ती फलाटाच्या एका टोकापर्यंत पोहोचली. आमच्या बरोबर समोर ती बाई फलाट चढायचा प्रयत्न करीत होती आणि उजवीकडून वेगाने जोरात भोंगा वाजवत गाडी येत होती. आता काही सेकंदात ती बाई गाडी खाली येणार आणि तिच्या चिंधड्या उडणार हे आम्ही पाहत होतो. माझे हृदय जोरात धडधडू लागले. यापूर्वी आयुष्यात मी असा मृत्यू समोर कधीच पाहिलेला नव्हता. आता फक्त काहीच क्षण बाकी होते. तेवढ्यात एक चमत्कार घडला. मी अत्यंत तिरीमिरीने पुढे झालो. त्या बाईच्या पुढे उभा राहिलो तिचे दोन्ही हात दंडाला धरून पकडले आणि इतक्या प्रचंड जोराने तिला मी वर खेचले कि मी आणि ती बाई फलाटाच्या या किनार्यापासून त्या किनार्यापर्यंत अक्षरशः फेकले गेलो. मी माझ्यापाठीवर पडलो आणि ती बाई माझ्या अंगावर पडली. अतिशय जोरात त्या स्त्रीला मी ढकलून उभा राहिलो. यावर ती स्त्री हे हे करीत ओशाळवाणे हसत म्हणाली." पहले भी एक बार ऐसे हुआ था. मला संतापच आला आणि त्या तिरीमिरीतच मी तिला मुस्कटात मारली आणि पुढे आलो. वडिलांनी माझ्याकडे कौतुकाने बघितले आणि विचारले तुला लागले का कुठे ? तोवर माझ्या डोक्यात असा काही विचार आलाच नव्ह्ता. अर्थात मला फारसे लागले नव्हतेच पण माझे सर्व अंग थरथर कापत होते. तोंडाला कोरड पडली होती पण त्या बाई बद्दल संताप मात्र अजून गेला नव्हता एवढ्यात पुढची गाडी येताना दिसली आम्ही घाईघाईने आमचे दोन फणस आणि आंब्याची पेटी गाडीत चढवली मिळालेल्या स्थानावर स्थानापन्न झालो. वडिलांनी मला पाणी दिले ते पिउन मी थोडासा शांत झालो आणि आता शांत पणे विचार करू लागलो. माझे वजन तेंव्हा सेहेचाळीस ते सत्तेचाळीस किलो होते.( दोन वर्षांनी मी ए एफ एम सी त प्रवेश घेतला तेंव्हा माझे वजन ४७ किलोच होते) त्या बाईचे साठ किलोच्या आसपास असेल तिला मी रुळातून तीन फुट वर उचलून फलाटावर खेचले आणि या प्रक्रियेला अक्षरशः दोन सेकंद उशीर झाला असता तरी आमच्या डोळ्यासमोर एक स्त्रीच्या चिंधड्या झालेल्या आम्हाला पाहाव्या लागल्या असत्या.आणि या भीती आणि संताप अशा मिश्र भावना कल्लोळात मी तिला इतक्या शक्तीने उचलले जे मला सावध किंवा व्यक्त अवस्थेत नक्कीच जमले नसते. मला त्यावेळी एकच जाणीव झाली कि माणसाचे सामर्थ्य हे त्याच्या केवळ स्नायुत नसून त्याच्या मेंदूत असते. याचा मला पुढच्या आयुष्यात खूप उपयोग झाला. मनोरुग्णांना काबूत ठेवण्यासाठी माणसे बोलावून शक्ती व्यय करण्यापेक्षा मी औषधांचा उपयोग केला. किंवा आवाज आणि नजर याचा उपयोग करून अवघड प्रसंगातून बाहेर पडलो.

वाचन 16877 प्रतिक्रिया 39