अर्थ अवर
वर्ल्ड वाईल्ड लाइफ फंड (WWF) व सिडने मॉर्नींग हेराल्ड यांच्या सौजन्याने मार्च २००७ मधे सिडनी ऑस्ट्रेलिया येथे क्लायमेट चेंज विषयावर जनजागृती अभियान निमित्ताने पहीला "अर्थ अवर" साजरा केला. सिडनी मधील २.२ दशलक्ष जनता यात सामील झाली. सामान्य जनतेबरोबर अनेक उद्योगधंदे, संस्था, विद्यापीठे देखील यात सहभागी झाले होते. एक तास दिवे बंद ठेवण्याची ही कल्पना होती. याला मिळालेला अभुतपूर्व प्रतिसाद पाहून २००८ मधे जगभर हा प्रयोग राबवला गेला.
मार्च महिन्याच्या शेवटच्या शनिवारी एक तास दिवे बंद. २००८ मधील अर्थ अवर कार्यक्रमात ३५ देशातील ४००हून आधीक शहरे सहभागी झाली होती. न्यूयॉर्क मधील प्रसिद्ध टाइम्स स्क्वेअर येथील कोका कोला बिलबोर्ड, गोल्डन गेट ब्रीज सॅन फ्रॅन्सीस्को, (नुकतीच मिपावर पाहीलेली ) स्पेस नीडल सीएटल, सिडनी ऑपरा हाउस, रोम मधील कलोसीयम, असे नेहमीच प्रकाशीत असणार्या स्थळातील दिवे विझवण्यात आले होते. २००८ मधील या मोहीमेत ५० दशलक्ष लोकांचा सहभाग होता. २००८ मधे याप्रकल्पात सहभागी गुगलने त्या दिवशी आपले वेबपेज काळ्या रंगात ठेवले होते.
या वर्षी अर्थ अवर २८ मार्च रोजी रात्री ८.३० ते ९.३० आहे. जवळजवळ ८० देश व हजारावर शहरे यात सामील होणार आहेत. दिल्ली व मुंबई शहरे ही यात सामील होणार आहेत. जवळजवळ १ अब्ज लोकांचा सहभाग अपेक्षीत आहे की त्याद्वारे डिसें २००९ मधे कोपनहेगन येथे होणार्या क्लायमेट चेंज वरील परिषदेत जगातील प्रमुख देशांच्या नेत्यांना ठोस उपाययोजनेसाठी एक जोरदार संदेश जावा.
२००८ मधे एक तास वीजवापर कमी झाल्याने होणारी वीजबचत व पर्यायाने कमी होणारे कार्बन डायॉक्साईड प्रदुषण याची पहाणी करण्यात आली. किमान १ टक्का ते ९ टक्के वीजबचत पर्यायाने ६ ते ४० टन कमी कार्बन एमीशन झाल्याचे दावे केले गेले. अर्थात एक तास वीजबंद हा काही ठोस उपाय नक्कीच नाही तर प्रतिकात्मक प्रयोग आहे. ह्या निमित्ताने याविषयावर जनजागृती तसेच प्रत्येकाने एक अल्पसा का होईना पुढाकार म्हणुन नक्कीच पाहीले पाहीजे. केवळ दोन तीन वर्षात या योजनेला मिळणारा प्रचंड प्रतिसाद पहाता जगातील बहुसंख्य जनता पर्यावरण या विषयी जागरुक आहे व संघटीत होत आहे. तसेच भविष्यात आपापल्या सरकारांवर दबाव आणू शकतील हा एक मोठा दिलासा आहे.
आपण ह्यावर्षी या योजनेत सामील होणार? भारतासाठी ह्या प्रकल्पाचे संकेतस्थळ आहे अर्थअवर.इन तसेच मुख्य संस्थळ आहे अर्थअवर.ऑर्ग
एक छोटी चित्रफीत येथे पाहू शकाल - युट्युब दुवा
संदर्भ - http://en.wikipedia.org/wiki/Earth_Hour
वाचन
24300
प्रतिक्रिया
71