कोडी
काही माणसांचे मेंदू हे धक्का स्टार्ट असतात. विशेषत: कमी वेळात एखादी गोष्ट करायला सांगितली तर मेंदू मूळ क्षमता सुध्दा गमावून बसतो. माझ्या बाबतीत तसेच आहे. त्यामुळे एका तासात १०० प्रश्न, असल्या परीक्षा देण्याचा मी विचार देखील करू शकत नाही. ह्याच कारणामुळे व शिवाय मुळातच बथ्थड मेंदू असल्यामुळे मी कोडी या प्रकारांना फार घाबरतो. लहानपणी तर हा माझा कमकुवतपणा जगजाहीर झाल्यामुळे मित्रांनी व शिक्षकांनी मला ‘नको जिणे’ करून सोडले होते.
एकदा वर्गात मित्राने विचारले, ए बुधल्या, ‘रामाच्या दु कानांत उ, तम चिवडा’ म्हणजे काय ? मी उत्तरच दिले नाही. घरी येईपर्यंत विचार केला. घरी आल्याआल्या आईला विचारले. आईने लगेचच उत्तर सांगितले. नंतर बहिणी घरी आल्यावर त्यांना मी हेच विचारले. त्या तुच्छ्तेने हंसून म्हणल्या, आम्हाला तू काय बिगरीतल्या समजतोस ? दुसर्या दिवशी मित्राने विचारले, 'आलं का उत्तर ?' मी हो सांगून टाकले. लगेच त्याने दुसरे कोडे घातले. सांग बघू, 'दुकानांत डोकं' म्हणजे काय ?' हे कोडं आई व बहिणींनाही लगेच आलं नाही त्यामुळे मी खुष झालो. पण संध्याकाळी वडिलांना विचारताच पांच एक मिनिटात त्यांनी उत्तर सांगितले. दुसर्या दिवशी माझा मित्र म्हणाला , मला माहितीये, तू घरी विचारुनच उत्तरं सांगतोस.
अशीच फजिती वर्गात गुरुजी तोंडी हिशोब घालायचे तेंव्हा व्हायची. दोन मिनिटांत उत्तर पाटीवर लिहून पाटी पालथी घालायला सांगायचे. गणित कच्चेच असल्यामुळे मला दोन काय दहा मिनिटे सुध्दा पुरली नसती. मग पाट्या तपासताना, डोक्यावर टपली व ठोंब्या, गधड्या, दगड्या अशी विशेषणे ऐकताना वाईट वाटायचे, पण इलाज नव्हता.
पुढे 'रामरंग पांडूकलर डु डाय डु', 'नकादुचेण्यापकासके', 'एवढासा गडु, त्याला पाहून रडु', 'आकाशातून पडली घार, तिला मारली ठार, रक्त पितो घटाघटा, मांस खातो मटामटा' असली अनेक राक्षसी कोडी अंगावर चालून आली. पण एव्हाना मी अशा बाऊन्सर्सचा सामना करायला शिकलो होतो.
मोठं झाल्यावर हे असले हल्ले जरा कमी झाले होते. पण काही आयआयटीयन्स मेव्हणे लाभले. ते इतकी कठीण कोडी घालायला लागले की सुरवातीला 'चुपके चुपके' मधल्या अमिताभच्या 'करोला' या टेक्निकचा उपयोग करण्याचा केविलवाणा प्रयत्न करुन पाहिला. पण मेव्हणेकंपनी माझ्यापेक्षा अर्थातच वस्ताद निघाली. शेवटी मला चक्क पांढरे निशाण फडकवायला लागले. त्यामुळे त्यांनी माझा नाद सोडून दुसरी 'गिर्हाईके' बघायला सुरवात केली.
या कोड्यांमुळे एक फायदा मात्र झाला. खर्याखुर्या जीवनात जी अगम्य कोडी पडली ती सोडवता न आल्याचे फार वैषम्य नाही वाटले. आता माझी नातवंडे विचारतात, 'आजोबा एक कोडं घालू का ?' तेंव्हा जराही न घाबरता मी मोठ्ठा हो देतो. आजोबांना पण आपले कोडे सोडवता आले नाही याचा आनंद त्यांच्या चेहेर्यावरुन ओसंडत असतो, तो बघायलाच मला खूप आवडतो, अगदी तोंडावर पदर घेऊन आजी खुदुखुदु हंसत असली तरी!!!
प्रतिक्रिया
हा हा
लसावी, मसावी, दरसाल दर शेकडा
आभार
विभाजक आणि विभाज्य
गनिताची तोंडओळख व्याख्यानमाला
हा हा हा!
+१
हलक फुलक लिखाण एकदम आवडुन
आवडलं. मस्त लिहिलंय
>> आजोबांना पण आपले कोडे
खरं आहे...
उत्तर नारळ ?
छोटेखानी लेख आवडला
लेख मस्त तसेच शेवट्पण एक्दम
छान लेख. अगदी माझीच
ह्याला
मस्त खुसखुशीत लेख!
लेखाचा शेवट आवडला.
मी नाही एकटा!
आम्ही पण तुमच्यासारखेच....पण
+१
एक कोडे घालतो मेरा बाप
पति पत्नी
विक्रम और वेताळ
छान !!