✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

.. C.P.M.

ग
गवि यांनी
Sat, 12/25/2010 - 07:57  ·  लेख
लेख

बाजूला स्वपत्नी (आणि रिमोट मिळाला तर स्वतःही. वोखटे का बोला..?) कट कट कट करुन चॅनेल बदलत असते. तिचा स्पीड ३० सीपीएम (चॅनेल्स पर मिनिट्) आहे. माझा २० आहे.

आता दोघांच्याही चॅनेल बदलण्यात सफाई तर खूप आलीय..पण स्पीडवर विशेष कष्ट घेणे आवश्यक आहे.

.........
लडकी है एक नाम रजनी है..
रजनी की एक ये कहानी है..

अशा काहीतरी ओळी निळ्यातून एकदम अचानक उगवतात आणि दूरदर्शनच्या शिर्वलांची आठवण होते.

तर, जेव्हा माझ्या घरी लहानपणी पहिल्यांदा टी.व्ही. आला आणि प्रतिष्ठापनेनंतर जेव्हा ऑन केला तेव्हा संध्याकाळचे साडेसात वाजले होते आणि "आमची माती, आमची माणसं" चालू होतं. आपल्या गावात टी.व्ही. प्रक्षेपण चालू झालं आणि घरीही टी.व्ही. आला याच्या अद्भुतरम्य आनंदात त्यानंतरचे प्रक्षेपण संपेपर्यंतचे सर्व प्रोग्र्याम नजर न ढळू देता पाहिले. रिमोटही नव्हता आणि दुसरा चॅनेलही नव्हता.

दुपारी चार वाजता ट्यँ अं यँ यँ यँ अशी सिग्नेचर ट्यून आक्रंदून सुरू झालेलं दुर्दर्शन रात्री अकराला संपायचं. मग नुसता कूं आवाज येत राहायचा.

सर्वसाधारणपणे आठवणारी नावं म्हणजे संताकूकडी, संतवाणी, ज्ञानदीप, साप्ताहिकी, आमची माती आमची माणसं, बातम्या, आणि आठ चाळीसला एकदम दिल्ली दूरदर्शनचं राष्ट्रीय प्रक्षेपण सुरु.

त्यात सिरीयल्स आठवड्यात एकच एपिसोड आणि एकूण तेरा एपिसोड अशा नियमात बसलेल्या. हक्के बक्के ही रवी वासवानीयुक्त सिरियल हिलॅरियस वाटणारी होती. एक अलीबाबा बेचारे, बाकी चालीस चोर..असं टायटल साँग होतं.

मिस्टर योगी ही शनिवारी रात्री असणारी मोहन गोखलेवाली मालिका. त्यात अमेरिकेतून एनाराय असलेला मिस्टर योगी भारतात मुली बघायला येतो.. आणि एकेका विवाहेच्छू पोरीचा नमुना एकेका शनिवारी दिसायचा.

हमलोग आणि बुनियाद या मालिकांनी मात्र लांबीचा नियम तोडला. शेवटच्या एपिसोडपर्यंत त्या "लेजंड"रूपाला पोचल्या होत्या.

बुनियाद मला वाटतं फाळणीशी रिलेटेड होती.

नंतर आठवतात वागळे की दुनिया, मालगुडी डेज.

या सीरियल्सनी एक वातावरणच तयार केलं. वागळेचे फेमस शब्द : "गुड नो.." त्याचं घर आणि पिचण्यातून, फसवणुकीतूनही आनंदात राहण्याचं स्पिरिट. आता वागळे परत टी.व्ही.वर येताहेत असं ऐकतो..(की ऑलरेडी आलेत?)

आणि मालगुडी डेज मधल्या "स्वामी" कथेतलं ते गाव मनातच वसल्यासारखं झालं. स्वामी आणि त्याचे मित्र हे गोट्याची आठवण करुन द्यायचे.

हम पंछी एक डाल के..गिरीश कर्नाडची होती..

चुनौती म्हणून कॉलेज लाईफवर आधारित सीरियलमधे राजू श्रेष्ठा या चांगल्या मुलाला ड्रगचं व्यसन लागतं. तेव्हा ड्र्ग्ज हा एक एकदम चालू सब्जेक्ट होता.

मन एक सीपी है..आशा मोती है..
हर पल जीवन का..एक चुनौती है..

असं त्या सीरियलचं खूप मेलडीयस रुमानी टायटल साँग होतं..

रजनी ही अन्यायाविरुद्ध लढणारी .. रविवारी दुपारी. ही बायकांत प्रसिद्ध.

रविवारी दुपारच्या सिरियल्समधे लहान मुलांसाठी "एक दो तीन चार" अशी एक चार उचापत्या पोरांची सिरियल होती. त्यात बहुधा ब्रुनो नावाचा कुत्राही होता.

नंतर जसपाल भट्टी नावाचं प्रकर्ण टी.व्ही.वर धुडगूस घालायला दाखल झालं. उल्टा पुल्टा या तीन मिनिटांच्या फिलर टाईपच्या कट्सनी सुरुवात होऊन बघता बघता "फ्लॉप शो" हा जबरी इरसाल नमुना उभा राहिला.

बब्बाब्बा बबाब्ब बब्बाब्ब बा..

झूम इन्..झूम आउट..

फेड इन..फेड आउट..

अशा शब्दांनी सुरु होणारं झाकडूमाकडू टायटल साँग. ती टायटलही जबरदस्त..

प्रॉडक्शन मॅनेजर ऐवजी प्रॉडक्शन डॅमेजर..

स्पेशल इफेक्ट्स ऐवजी स्पेशल डिफेक्ट्स..

डायरेक्शन ऐवजी मिसडायरेक्शन..

कॅमेरा ऐवजी कॅमेरा जर्क्स..

तिथेच हास्यफवारे सुरु व्हायचे. मग ठासून भरलेल्या उपरोधाचा तो धमाल प्रोग्रॅम...

त्याच्या शेवटी त्या एपिसोडच्या विषयाशी रिलेटेड एक अत्यंत विनोदी गाणं असायचं.

म्हणजे:

भाड्याची घरं मिळवणे, मालक्-भाडेकरु संबंध, घरं खाली करवण्याच्या सुपार्‍या यांवर असलेल्या एपिसोडमधे "जिस गली में तेरा घर न हो बालमा.." च्या चालीवर "जिस गली में मकान मालिक से झगडा न हो.."

टेलिफोन मिळणं अवघड असण्याचा काळ्..त्यात भरमसाठ चुकीची बिलं, क्रॉस कनेक्शन अशा एपिसोडनंतर "कहीं दूर जब दिन ढल जाये" च्या चालीवर. "कहीं फोन ये डेड हो जाये.. राँग नंबर भी बहुत घुमायें.."

जाली मेडिकल बिलच्या एपिसोडनंतर, "दिल का मामला है" च्या चालीवर "बिल का मामला है"

अशी कितीतरी...अजून आठवतात.

झालंस्तर..

ही मॅन्...अँड द मास्टर्स ऑफ द युनिव्हर्स..

(सर्व फोटो जालावरुन साभार..(आमच्याकडे कुठून असायचे..?) )

स्पायडरमॅन..

(ओह रॅबिट..) यू जस्ट वेट..

चमत्कारी टेलिफोन..(शर्ली मॅक और जॉनेथन..!!)

जंगली तूफान टायर पंक्चर..

झालस्तर शिक्षणात्मक..

एक चिडिया..अनेक चिडिया.. दाना चुगने आती चिडिया..

;a href="http://gnachiket.files.wordpress.com/2010/12/ekchidiya.jpg">

सूरज एक्..चंदा एक्..तारे अनेक..

.....

स्वतंत्रता की ज्योत..

पूरब से सूर्य उगा..चलो सिखाएं..कुछ कर दिखाएं..

मराठीत चाळ नावाची वाचाळ वस्ती, असे पाहुणे येती, पैलतीर, द्विधाता (खतरनाक्..विक्रम गोखले स्प्लिट पर्सनॅलिटी..), नो प्रॉब्लेम, स्वामी (जो सर्वांचे..रक्षण करतो..पोषण करतो..पालन करतो..), गोट्या (बीज अंकुरे अंकुरे..ओल्या मातीच्या कुशीत..) आणि काय काय..

जे काही होतं ते जनरली तेरा भागात संपायचं.. रिपीट व्हायचं नाही (त्यामुळे प्रथम दर्शनाला किंमत असायची..).. ते बघता बघता बदलण्याची सोय नव्हती. त्यामुळे जे दिसतंय ते पाहिलं जायचं..

..आणि बहुधा त्यामुळेच खूप छान वाटायचं..

................

बॅक टू वर्तमान..
..................

इतके चॅनेल खटाखट बदलूनही (त्याच शंभर चॅनेल्सचं चक्र तीनदा फिरवून झाल्यावर..) "कुठेच काहीच छान नाहीये आज टी.व्ही. वर..हल्ली नसतंच..", अशा संपृक्त वैतागात आम्ही असताना हे सर्व अचानक स्मरून कधीकधी मी पत्नीला म्हणतो, "ए, आपण कोणतीही एक सिरियल अ‍ॅक्च्युअली 'बघूया'.. मग ती आवडेलही आपल्याला कदाचित खूप.."

बर्‍याचदा एक लफडा आमच्यात होतो आणि तो झालाय हे बर्‍याचदा मला कळत नाही. मी तिने लावलेली सीरियल मनापासून बघत असतो. मधेच माझं लक्ष भिंतीवरच्या पालीकडे जातं. पाल किड्याकडे रोखून बघत असते. मी या भिंतीवरच्या उपनाट्यात ओढला जातो. किडा पटकन उडून जाईल अशी मला भीती वाटते आणि मी सावरून बसतो.. तेवढ्यात पाल अत्यंत चपळाईने झडप घालून झप्कन किडा तोंडात पकडते.

तीन मिनिटांच्या या "उल्टा पुल्टा कट" नंतर मग मी पुन्हा मूळ सिरियलकडे वळतो..

"अरे..मागितलीच का शेवटी माफी तिच्या सासूने? वा..पण इतक्यात कसं झालं सासूसुनेचं प्याचअप?, आणि तिचा नवरा तर आत्ता पिऊन आला होता ना? मग एकदम सिल्क सूटमधे कसा? ", मी विचारतो..

"ही सिरियल वेगळी आहे", बायको सांगते.."सासूसुनेचं भांडण 'लाडो'त झालं होतं..आणि ज्यात नवरा पिऊन आला होता ती तिसरीच होती. काहीच सिक्वेन्स कसा नाही रे लागत तुला?"

"पिऊन आला होता ती कुठली?" मी प्रयत्न करतो.

"नाव नाही माहीत्. नेहमीची नाहीये..", ती माहिती देते.

"पण सासूसुनेचं भांडण या चालू सिर्यलमधेच झालेलं मी स्वतः पाहिलं..", मी आत्मविश्वास दाखवतो... निदान पत्नीपुढे तरी दाखवावा..

"असेल मग..मला पुढे बघू दे..", ती म्हणते..

म्हणजे तिलाही सिक्वेन्स लागलेला नाही याची खात्री होऊन मी सुखावतो आणि पुन्हा भिंतीकडे वळतो...

वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
11455 वाचन

💬 प्रतिसाद (34)

प्रतिक्रिया

मस्त लेख

गोगोल
Sat, 12/25/2010 - 08:02 नवीन
पुर्वीच्या काळच्या जाहीराती पण सही असायच्या http://www.youtube.com/watch?v=90UM-EGxQAE&feature=related http://www.youtube.com/watch?v=9u3Swfin7Hs&feature=related
  • Log in or register to post comments

नॉस्टॅल्जीक

शुचि
Sat, 12/25/2010 - 08:29 नवीन
वर्तमानातून भूतकाळात जायचं, लेखाचं तंत्र(टेक्निक) काही खासच जमलं आहे.
  • Log in or register to post comments

भण्णाट लेख. खरंच गवि तुम्ही

टारझन
Sat, 12/25/2010 - 08:59 नवीन
भण्णाट लेख. खरंच गवि तुम्ही छाण लिहीता. तुम्हाला माझ्यातर्फे असेच छान लेख लिहीण्यासाठी णेहमीच प्रोत्साहन असेल . एक्क चिडीया अनेक्क चिडिया आमची खुप फेव्हरिट आहे . - पा.दा.
  • Log in or register to post comments

नीव, हक्के-बक्के, बूनियाद, किस्सा शांती का, कीले का रहस्य

आत्मशून्य
Sat, 12/25/2010 - 09:06 नवीन
खेल खेलमे, फटीचर, करमचंद, जंगल बूक,सीगमा, चंद्रकांता कीति नावं घ्यायची , तूम्हाला ही नेमका शनीवारच सूचला काय हे टाकायला ? आता उगीचच हळहळ वाटेल की गेले ते दीवस जेंव्हा दर शनीवारी मी रवीवारची चातका प्रमाणे वाट बघत असे.... नाही म्हणायला तू-नळी मूळे बरेच काही पून्हा बघता येते ... पण... ते दीवस कसे परत येणार ?
  • Log in or register to post comments

मस्त रे.

चिंतामणी
Sat, 12/25/2010 - 09:05 नवीन
ऐतीहासिक मालींकांचे स्मरण करून नॉस्टाल्जीक केलेस . त्यातील अजून एक लक्षात राहीलेली मालीका म्हणजे अमोल पालेकरांची "नकाब" मालीका. फक्त १३ भागांची जबरदस्त Impact करून गेलेली मालीका होती ती. वरील उल्लेख केलेल्या प्रत्येक मालीकेला विषय होता. कुठेही रेंगाळत नव्हत्या त्या मालीका. आजकालच्या मालीकांचा मुख्य विषय म्हणजे विवाहबाह्य संबंधाचे उदात्तीकरण. अत्यंत तिडीक येते त्याची.
  • Log in or register to post comments

ह्यातील बर्याच जुन्या मालिका

निनाद मुक्काम …
Sat, 12/25/2010 - 10:13 नवीन
ह्यातील बर्याच जुन्या मालिका अजून तू नळी किंवा इतर वेब साईट वर असतात .मी त्याच पाहत असतो .खुपदा रविवारी उशिरा जग यायची तेव्हा सकाळी स्वागताला मिकी डोनाल्ड असे डिस्नी परिवारातील सदस्य असायचे मग पोटली बाबाकी . मग रामायण व महाभारत चाणक्य अश्या सिरीयल ने काळ गाजवला .फास्टर फेणे किंवा एक दोन तीन चार अशी बाल मालिका लागायची .संध्याकाळी (शनिवारच्या विक्रम वेताळ /दादा दादिकी कि कहानिया कि कहानिया)महानगर मालिका /पेइंग गेस्ट (ह्याच्या पहिल्या भागात माधुरी दीक्षित व बेजामीन गिलानी होते .) रंगोली मधील गाणी परिवारासह पाहतांना त्याची सूत्रधार बहुदा वडिलांच्या पिढीची असायची .त्यामुळे आमच्याहून आधी ते एकाग्र होऊन हि मालिका पहायचे .दर गुरवारी लागणारी तलाश(हि रहस्य कथेची राणी होती ) मंगळवारची किलेल्का रहस्य त्याच्या टायटल मुळे आवडायची .अशीच एक रविवारची अद्भुत मालिका म्हणजे स्टोन बॉय. रूपक कथा ह्या सदरातील मित्तेके रंग हि साहित्यातील उच्च निर्मिती बाकी सुरवातीच्या डेली सोप बद्द्दल चर्चा झाली पण सुरवातीचे विनोदी म्हणजे ये जो हे जिंदगी म्हणजे बेस्ट .मुगेरी लाल कोण विसरेल ..आम जनतेची नुक्कड व त्याच टीमची मनोरंजन उच्च दर्जा राखून होती . बाकी त्या जायंत रोबर्ट कोण विसरेल (कमॉन जायंत रोबर्ट म्हणणारा तो मुलगा ) भाग्यश्रीची कच्ची धूप (असेच काहीतरी नाव ) बाकी फिल्मी हस्तीची गाठभेट घडवून आणणारी फुल खिले हे गुलशन गुलशन (सगलायची लाडकी तबस्सुम ) सगळ्यात पहिली रहस्य मालिका बारीस्तर विनोद ( बलराज सहानी चा मुलगा ) मग सुराग त्यानंतर मिले सूर मेरा तुम्हारा (माझ्या तुमच्या जुळता तारा मधुर सुरांच्या बरसती धारा ) राकेश बेदी ची गुनिराम (इस बंबई शहर मे ५००० रुपल्ली कमाके बातौगा ) पंकज कपूरची फातिचार व करमचंद त्यानंतर तेहेकीकात व व्योमकेश बक्षी निव्वळ अप्रतिम . विनोदी सिरीयल मध्ये देख भाई देख व जबान संभाल के (हि मालिका अनेक देशात त्या त्या प्रादेशिक लोकांनी इंग्रजी शिकायचे ह्या संकल्पनेवरून निर्माण झाल्या आपले देशी वर्जन जबान संभाल के मध्ये जसे विविध राज्यातील लोक इंग्रजी शिकतात तसे मूळ इंग्रजी मालिकेत लंडन मध्ये १९७० च्या दशकात विविध युरोपियन येतात इंग्लिश शिकायला .जबरदस्त मालिका पण हरामखोरांनी तू नळी वरून काढली .) फान्तेसी सदरात stra ट्रेक (मी हि मालिका पाहून किती तरी जणांना खांदा दाबून बेशुध्द करायचा प्रयत्न केला होता .) देशी अवतार सिग्मा व त्यानंतर कप्तान व्योम ( मिलिंद सोमण ) मग शक्तिमान (ह्यातील महामानवाची कल्पना आपल्या वेदात जशी शरीरातील चक्र जागृत करून सुपर पॉवर मानव बनण्यचे होते जे खूप रोचक होते .त्याचे टायटल ट्रक खूप अर्थ पूर्ण होते . बाकीच्या सिरीयल येथे आधीच नमूद झाल्या आहेत . वेताळ म्हणून मुलांची मालिका चांगली होती जी फेन्तोम वर आधारित होती . बोडी लाईन मालिकेचा ( इंग्लंड व ऑसी क्रिकेट ) महत्वाचे शान सुध्धा दूरदर्शन वर पहिले होते . नंतरच्या काळात लोक शांती स्वाभिमान पहायचे तेव्हा आम्ही बोल्ड अंड ब्युटीफुल व सांता बार्बरा पाहायचो (मराठी मिडीयम चा असल्याने काहीच कळायचे नाही पण भाषेशिवाय हि नवी संस्कृती जाणून घेण्याचा माझा प्रयत्न असायचा .आम्ही पौगुंदाव्स्थेत का काय ते आलो आणि भारत सरकारने उदार होऊन परकीय वाहिन्या आमच्या डोंबिवलीच्या सोवळ्या वातावरणात आपले वेस्ट कल्चरचे प्रदूषण करायला आल्या .(काय तो काळ होता राव ) स्टार मुवीज वर १८ चे सिनेमे चक्क पोईजन आयावी ( आम्ही आणि समवयीन युरोपियन तरुण थिअरी मध्ये नातरी नक्की एका लेवल वर होतो अशी माझी ठाम समजूत आहे .बाकी त्यांना जगाच्या प्रयोग शाळेत प्रयोग करण्याची संधी लगेच मिळाली .असो ) त्याचे हिंदी वर्जन म्हणजे झी मालिका तारा ( नवनीत माझी लाडकी होती ) जयवंत दळवी ह्यांचा कादंबरी वरची हसरते (ज्यात नवीन अभिनेत्री हिमानी शिवपुरी तिच्या नवर्याला म्हणते जो आग तुम बुझा नाही सकते वो लागा ते क्यू हो ) दूरदर्शन ला च्या बाबा सेहेगालच्या नाकावर टिच्चून झी ची शफी इनामदार व स्वरूप संपत ची ची फिलिप्स टोप टेन.आमी माझी प्राणप्रिय झी होरार शो अर्थात रामसे ब्रदर ( खबरदार कोणी तेच का ते .... म्हणून त्यांची टिंगल केली तर भले त्यांचे पंखे कमी असतील पण समर्थन देण्याच्या बाबतीत ते रजनी समर्थकांना टक्कर देऊ शकतील .अरे त्याचे टायटल ट्रक काय चाबूक भयंक होते. त्यांचे दस्तक .खौफ / चांडालिका /विक्रांता/ दहशत ./आफत/ कर्ज / प्यास /तावीज / काब्रीस्तान / डायन/ व असे अनेक भाग मस्त असायचे .( ९० % भारतीय कथानक व जमेल त्या बजेट मध्ये त्यांनी भयकथांचे शिवधनुष्य पेलेले होते त्यांना हसण्यापुर्वी चोप्रा ते घाई ते मनमोहन देसाई एकाने तरी प्रयत्न केला का ?) सार कुटुंब रंगले होतो ह्या कार्यात .लोकांना घाबरवणे हा त्यांचा पेशा. तूल नळीवर ह्यातील बरेच शे भाग आले .पण हरामखोर लेकाचे अर्ध्याहून जास्त भाग उडवल्या गेले .सुदैवाने त्यांचे सिनेमे आहेत अजून .) बाकी बनेकी अपनी बात किंवा सुरवातीचे सोनीचे आहट व सी आय डी मस्त होतो .रमेश भाटकर चे .कमांडर अप्रतिम तर विनोदा मध्ये पंडित ह्यांची फिल्मी चक्कर बेस्टच व त्या नंतरची साराभाई तर मी सर्व भाग तू नळीवर किमान ३ वेळा पहिले आहेत .(अजूनही एका उदास व भकास सकाळची सुरवात हातात वाफाळत्या कॉफीचा मग आणि साराभाई चा एखादा भाग आणि चित्त फ्राफुल्लीत ) बाकी डी डी मेट्रोचे विनोदी दिल बुरा अंकल कोण विसरेल .? माझ्या उर्दूत मोलाची भर घालणारी अलिफ लैला (तलवार रे सुलेमानी जबरा ) हि मेन (आय हेव अ पॉवर) कोणी तरी म्हटलं आहे एक दिवस तूळ नळी टी वी ची जागा घेणार आहे .माझ्या बाबतीत खरे झाले आहे .
  • Log in or register to post comments

मला आवडायची ती दूरदर्शनवर

विजुभाऊ
Sat, 12/25/2010 - 10:49 नवीन
मला आवडायची ती दूरदर्शनवर येणारी फिल्म्स डीवीजन की भेंट वाल्या स्ट्रीप्स " एकता का वृक्ष" त्यातला तो झाड तोडणारा आणि झाड वाचवणारा यातला संवाद आणि त्यानन्तरचा त्यान्चा डान्स " मा...आ__ई आणि त्या आईच्या साडीच्या पदराचा भारताचा नकाशा व्हायचा
  • Log in or register to post comments

माझ्या मनातले बोललात

शहराजाद
Sat, 12/25/2010 - 14:03 नवीन
त्यानन्तरचा त्यान्चा डान्स
:) आम्च्यात एखाद्याला चिडवून ह्या ह्या हसताना तो 'टि टि टिडीट, टि टि टिडीट' डान्स करण्याची प्रथा होती. फिल्म्स डिवीजन की भेंट अजून काही: स्विम्मी, चयन, एक चिडीया, शॉर्टकट फटाफट . आणखी एक फिल्म होती , कचरा रस्त्यात टाकू नका, यावर. नाव आठवत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

हि पण एक मस्त होती.

परिकथेतील राजकुमार
Sat, 12/25/2010 - 14:20 नवीन
हि पण एक मस्त होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

मालिका

प्रदीप
Sat, 12/25/2010 - 11:02 नवीन
बी. बी. सी. च्या 'यस मिनीस्टर' आणि ' यस प्राईम मिनीस्टर' ह्या दोन अजरामर मालिका होत्या. त्यातील प्रमुख पात्रांची (सर हंफ्री व मिनीस्टर/प्राईम मिनीस्टर) कामे करणारे दोघेही कुशल नट आता दिवंगत झालेले आहेत. ह्य दोन्ही मालिका म्हणजे खास ब्रिट ह्यूमरचा उत्कृष्ट नमुना होत.
  • Log in or register to post comments

आजकाल प्रतिसादांच्या भितीने

परिकथेतील राजकुमार
Sat, 12/25/2010 - 11:03 नवीन
आजकाल प्रतिसादांच्या भितीने लेख वाचायला नको वाटायला लागले आहे. लेख कुठला आणि प्रतिसाद कुठला तेच कळत नाही. मग मी मनाला शिकवतो की बाबा रे, वर आहे तो लेख आणि खाली आहे तो प्रतिसाद ;) गवि नेहमिसारखेच सुंदर लेखन हो :) पण आमची बॉ तुमच्याकडे एक तक्रार आहे तुम्ही आमच्या लै लै आवडत्या जंगलबुक विषयी का नाही लिहिले ? Image removed. झालेच तर शक्तिमान Image removed. करमचंद Image removed. सुरभी Image removed. आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे आमच्या प्रशांत दामलेची 'उचापती' राहिलीच की. अजुन दोन भाग तरी यायलाच पाहिजेत ह्या लेखमालेचे.
  • Log in or register to post comments

छ्या! बरेच लोक जूण्या आठवनीत

अवलिया
Sat, 12/25/2010 - 11:20 नवीन
छ्या! बरेच लोक जूण्या आठवनीत काय रमतात ते कळत नाही. अरे बाबांनो जुने तेच सोने नसते आणि नवे काही टाकाऊ नसते.. सुधरा राव !! मोठे व्हा !
  • Log in or register to post comments

भूतकाळ आठवायचा असतो .तर

निनाद मुक्काम …
Sat, 12/25/2010 - 11:49 नवीन
भूतकाळ आठवायचा असतो .तर वर्तमान जगायचा तर भविष्यकाळाची कल्पना करायची असते , म्हणूनच भूतकाळ उगाळत बसलोय वर्तमानातील ताणतणाव / अपेक्षांचे ओझे भविष्याची चिंता ह्या सर्वांवर रामबाण उपाय एक झुरका किंवा एक प्याला क्वचित नाही . डोळे शांत मिटून निवांतपणे मनाला भूतकाळात ढकलायचे .बालवयात शैशव जपलेले मन ज्याला षडरिपू चा स्पर्श सुद्धा झाला नसतो .अश्या नितळ मनात असलेल्या गोड आठवणी खडीसाखरे सारख्या चोखाव्यात . असे माझे मत आहे ,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

मस्तच लिहीले आहेस रे.

चिंतामणी
Sat, 12/25/2010 - 14:26 नवीन
.बालवयात शैशव जपलेले मन ज्याला षडरिपू चा स्पर्श सुद्धा झाला नसतो .अश्या नितळ मनात असलेल्या गोड आठवणी खडीसाखरे सारख्या चोखाव्यात . मस्तच लिहीले आहेस रे निनाद. त्या गोडीचा आनंद लुटता आला पाहीजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी

बरोब्बर बोल्लेत अवलियाजी. नवे

गवि
Sat, 12/25/2010 - 13:29 नवीन
बरोब्बर बोल्लेत अवलियाजी. नवे ते जस्त,शिसे,कथील असे नोहेच. च्यानेल 30 per minute speed ने बदलणेमुळे नव्याची झाळाळी दिसायला येळ मेळेना ते सांगू गेलतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

एकदम नॉस्टॅल्जीक करणारा धागा

गणपा
Sat, 12/25/2010 - 12:25 नवीन
एकदम नॉस्टॅल्जीक करणारा धागा :(
  • Log in or register to post comments

अगदी

दिपक
Mon, 12/27/2010 - 12:54 नवीन
अगदी! :-( आठवणारे काही फेवरेट... जॉइण्ट रोबोट अलिफ लैला मोग्ली तहकीकात भिकाजी करोडपती सर्कस ७ च्या बातम्या रंगोली
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

बोमकेश बक्षी नावाची एक मालिका

स्वानन्द
Sat, 12/25/2010 - 12:26 नवीन
बोमकेश बक्षी नावाची एक मालिका लागायची, ती आमच्या विशेष आवडीची.
  • Log in or register to post comments

+१ बोमकेश बक्शी आणि फटीचर फार

नगरीनिरंजन
Sat, 12/25/2010 - 20:02 नवीन
+१ बोमकेश बक्शी आणि फटीचर फार आवडायच्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वानन्द

येस्स... व्योमकेश बक्षी आणि

यकु
Sat, 12/25/2010 - 20:09 नवीन
येस्स... व्योमकेश बक्षी आणि नंतर नंतर तहकीकात सुध्दा फार मस्त होती.. त्यातला सॅम डिसिल्व्हा फक्त आठवतो.. तो सिगरेट पिणारा (कल्लुमामाऽऽ या गाण्यात असलेला) त्याचं त्या मालिकेतलं नाव मात्र आठवत नाही..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

कुकु? असंच काहीतरी होतं

स्वानन्द
Sun, 12/26/2010 - 10:08 नवीन
कुकु? असंच काहीतरी होतं बहुतेक...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

तो सौरभ शुक्ला!!!

मस्त कलंदर
Sun, 12/26/2010 - 15:59 नवीन
तो सौरभ शुक्ला!!! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

त्याचं नाव "गोपी" होतं!

मी ऋचा
Mon, 12/27/2010 - 11:45 नवीन
त्याचं नाव "गोपी" होतं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

गोपि यु आर जस्ट

अब् क
Mon, 12/27/2010 - 13:27 नवीन
गोपि यु आर जस्ट गोपि!!!!!!!!!!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी ऋचा

अरे हो ... बरोबर... मला कुकु

स्वानन्द
Wed, 12/29/2010 - 12:23 नवीन
अरे हो ... बरोबर... मला कुकु का वाटलं काय माहीत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी ऋचा

वर न आलेले आणखी काही

शहराजाद
Sat, 12/25/2010 - 14:11 नवीन
निखळ विनोदी चिमणराव, सदाबहार गजरा. तसंच, आद्य धारावाहिक, रहस्यमालिकांची शिरोमणि ,कंटाळवाणी श्वेतांबरा. मी अलिकडेच बघितलेली, नासिरुद्दिन शाह्ने काम केलेली मिर्झा गालिब ही सुरेख मालिका . चंद्रशेखर गाडगीळ यांनी गायलेला 'कानाने बहिरा, मुका परी नाही ' हा अनुबोधपट पूर्वी बर्‍याचदा दाखवत असत. हल्ली दाखवतात काय?
  • Log in or register to post comments

बास करा की राव.

चिंतामणी
Sat, 12/25/2010 - 18:32 नवीन
निखळ विनोदी चिमणराव, सदाबहार गजरा, नासिरुद्दिन शाह्ने काम केलेली मिर्झा गालिब, बोमकेश बक्षी, सुरभी, करमचंद, शक्तिमान, जंगलबुक बास करा की राव. किती नॉस्टॅलजीक करणार एकाच भागात.परा म्हणतो तसे "अजुन दोन भाग तरी यायलाच पाहिजेत ह्या लेखमालेचे."
  • Log in or register to post comments

मला आठवताहेत ते हे !!

सुहास..
Sat, 12/25/2010 - 14:47 नवीन
१ ) महाभारत २ ) हम पांच ( झी टिव्ही ) ३ ) मालिका नाही पण शनीवारी का रवीवारी रात्री ११.३० मिनीटाने , नॅशनल अवार्ड मिळालेले चित्रपट पहायचो ..हिन्दीसकट सगळ्याच चित्रपटांकरिता ईग्रंजी सबटायटल्स येत असत .. त्याच सिरिजमधील ' अंकुर ' , आक्रोश , बाजार हे पाहुन अक्षरश हेलावुन गेलो होतो . मिथुन चा बंगाली ' मृगया' म्हणा वा पाथेर पांचाली म्हणा असाच बघायला मिळाला होता.
  • Log in or register to post comments

आणी १०० , कथासागर

उल्हास
Tue, 12/28/2010 - 19:52 नवीन
आयला एकदम बालपणात पोचलो
  • Log in or register to post comments

आति उल्हासात आता बालपणीचे

टारझन
Wed, 12/29/2010 - 12:24 नवीन
आति उल्हासात आता बालपणीचे कारणामे करु नका म्हणजे मिळवली :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उल्हास

छान आहे धागा रविवारी हा

मुलूखावेगळी
Sun, 12/26/2010 - 12:46 नवीन
छान आहे धागा रविवारी हा धागा वाचुन् लहानपणीचा रविवार आठ्वला :) रन्गोली साठी उठायचे आणि लॉरेल न हार्डी बघुन च ब्रश करायचे. नन्तर पोटली बाबा की पन मस्त होते. १ अ‍ॅड होती कानानी बहिरा मुका परी नाही अजुन १ ती मुलिचे हात पाय बान्धुन ठेवलेले होते " उघडा तिचे डोळे, हात, पाय"अशी काहीतरी अशा अ‍ॅड्स चे विडम्बन करुन टाइमपास करायचो.
  • Log in or register to post comments

लेख आवडला.. पण गविंच लिखाण

स्पा
Sun, 12/26/2010 - 18:41 नवीन
लेख आवडला.. पण गविंच लिखाण एकाच टाईपचं वाटाया लागलाय.. जुन्याच आठवणीमध्ये रमण वगेरे... मागच्या धाग्यात जुन्या जाहिराती, जुने मराठी चित्रपट , या धाग्यात आता जुन्या मालिका... सारखं जुनं ते सोनं वाचून थोडं बोर झालंय खरं... पण तुमच्या लिखाणाची इस्ताइल आवडली.. काहीतरी भन्नाट लिवा आता पुलेशु
  • Log in or register to post comments

वा! छानच लिहिले आहे पण एक करेक्शन आहे

खादाड अमिता
Wed, 12/29/2010 - 12:21 नवीन
वा! छानच लिहिले आहे पण एक करेक्शन आहे.. 'जंगली तुफान टायर पंक्चर' झी टि. व्ही. वर प्रदर्शित होत असे. दूर दर्शन वर नाही. माझी आजी आम्ही रविवारी आंघोळ न करता महाभारत बघायला बसलो तर खूप चिडायची. 'देवाचा आंघोळी पण न करता बघता.. काय हल्लीची मुलं म्हणून'!
  • Log in or register to post comments

स्टार ट्रेक, लॉरेल अँड हार्डी राहीले की.

चिंतामणी
Wed, 12/29/2010 - 15:04 नवीन
वरच्या यादीत दोन महत्वाच्या सिरीयल्स राहील्या. आद्य सायन्स फिक्षन म्हणता येइल ती मालीका "स्टार ट्रेक" आणि सर्वांवर अनेकवर्षे गारुड करणारे " लॉरेल अँड हार्डी ".
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा