मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आपण मराठी बोलतो ?

शेखर काळे · · काथ्याकूट
आपण महाराष्ट्रात मराठी बोलतो ? आपल्याला खरेच मराठीचा अभिमान वाटतो ? मी कबुल करतो की मी महाराष्ट्रात, भारतात राहत नाही, पण तरीही मनःपुर्वक मराठी बोलतो, वाचतो आणि मराठी बोलतांना, वाचतांना आणि लिहितांना इंग्रजी शब्द टाळतो. महाराष्ट्रात सुटीवर असतांना आपल्याला छान कार्यक्रम बघायला मिळतील या अपेक्षेने त्यादृष्टीने विचारणा केली असता, 'अरे आजकाल अ‍ॅडव्हान्समधे तिकिटे बाय केली नाहीस ना तर तुमच्यासारख्यांना तिथे क्राऊडमधे सफोकेट होईल', असे ऊत्तर मिळाले. सुटिच्या पहिल्याच दिवशी मिळालेला शेरा - 'अरे वा, अजुन तुमचे मराठी अगदी फ्लुएन्ट आहे हां'. अरे !? हा आमचा मित्र आमच्याच बाकावर बसून मराठी शिकला ना ? आणि तसे म्हणून दाखविल्यास, 'अरे, आता पब्लिक बरोबर चेंज व्हावे लागते !' हे त्यावर ऊत्तर. मराठी 'सा रे ग म' हा एक सर्वांच्या ओळखीचा, बर्‍याच जणांना आवडणारा दूरदर्शनवरील कार्यक्रम .. यात गाण्याचे कौतुक कसे करायचे तर - 'सुपर्ब, फँटास्टिक, माईंड ब्लोईंग' ???? अरे .. इतर मराठी संस्कॄतप्रचुर शब्द आता मेलेत का ? आम्ही मुलांना मुद्दाम मराठी शिकवून आणतो .. आणि त्यांचे कौतुक कसे होते तर 'इतके लहान असून काय फाड फाड इंग्रजी बोलतात' .. आणि 'जाऊ दे रे .. कशाला त्यांना मराठी बोलायला लावतोस .. इथे आम्हीच मराठी बोलत नाही'. मराठी पुस्तके विकत घ्यायला जाऊ म्हटले तर .. 'कशाला? आणि कुठे' .. त्याचेही बरोबर होते म्हणा. पुस्तकांच्या दुकानात गेल्यावर स्वतः मालकच पुस्तके विकण्याबाबत ऊत्साही नव्हता. त्याचा खप शालेय पुस्तके आणि मार्गदर्शिकांचा (म्हणजे गाईड्स हो .. हे मला अनुवादून सांगावे लागले). मग मराठी बोलायचे कुठे आणि वाचायचे कुठे ?

वाचन 8741 प्रतिक्रिया 45