✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

गुंजग्रामीचे दिवस

य
यकु यांनी
Tue, 11/23/2010 - 09:19  ·  लेख
लेख
महाराष्ट्रातील खेड्यापाड्यांतील बामणांच्या पोरांचे बालपण जसे जात तसेच माझेही गेले. पण कदाचित इतर पोरांना जी मौज पाहायला भेटली नसेल ती आम्हाला दर गुरूवारी पाहायला मिळायची. आमच्या गावाच्या डगरीखालून वाहणार्‍या गंगेच्या (खरं म्हणजे ही गोदावरी, पण तिला सगळे गंगाच म्हणतात) तीरावरच गुंज क्षेत्र नावाचे दत्तसंस्थान असलेले एक गाव होते. अजूनही आहे. पण आता तिथं ती मौज मात्र राहिली नाही. आमच्या घराण्यात पन्नास पाऊणशे वर्षांपूर्वी दत्तोपासना सुरू झालेली आणि सकाळी-सकाळी प्रत्येकाचा पाठ, घंटा, पंचपदी वगैरेंची नुसती गडबड. चांगला चौसोपी किल्ल्यासारखा वाडा. वर माडी. माडीवर मोठ्या दाराशेजारून निघणार्‍या पायर्‍या. दोन्हीकडच्या पायर्‍यांवर बसलेली एक-एक महाभयानक गावठी कुत्री. घरात या ना त्या कारणाने होणारी गड्यांची वर्दळ - त्यात मग चांदपाशा मामू, आमजा, गफूरभाई, सरदार, निजाम, प्रकाशकाका, सावकारमामा, गुलाब भाऊ, भांडेवाली शरीफा किंवा ल्याखत - तिच्या जोहरा आणि सायरा या मुली, जावेद, वाहेद ही मुलं! एवढे सगळे लोक घरात, रानात लागायचेच कारण दीड-दोनशे एक्कर रान - त्यातली औतं आणि बारदाना - गावाच्या एका कडेला असलेला आमचा भलामोठा गायवाडा, त्यात अधेमधे खोदलेली पेवं, एका कोपर्‍यात ओळीने लावलेल्या कडब्याच्या वळह्या, गायबैल, वासरं, आंडील गोरे - लिहायला बसलो तर एक फर्मास कादंबरी सहज हातावेगळी होईल. पण तो धंदा वय वाढल्यावर करू. आता फक्त गुंजाच्या दिवसांबद्दल. तर पाठ म्हणजे पंचपदीत जी ठराविक कवनं केलेली असतात ती दररोज एकवीस वेळा स्नान झाल्याझाल्या म्हणायची, पंचपदी करायची. मग रात्री निवांत जेवणं वगैरे झाल्यावर घंटा ! म्हणजे पुढचा तासभर सगळ्यांचा नुसता हातवार्‍यांवर कारभार! ज्याचा घंटा चालु आहे त्याचे बोलणे नाहीच. म्हणजे तासभर नुसता दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा असा मनातल्या मनात जप करायचा. हे मी स्वत: करीत नव्हतो आणि ते वयही नव्हते कारण ही कामं ज्यानं गुरूमंत्र घेतला आहे त्यालाच फक्त मस्ट! इतरांना त्यातून सूट. काही आगाऊ काट्टी जमेस धरून, घरातील सगळ्यांनीच गुरूमंत्र घेतलेला. आठवडाभर हा सकाळ-संध्याकाळचा नेटवर्क कार्यक्रम आणि गुरूवारी गुंजाच्या मंदिरातील पंचपदीला उपस्थिती मस्ट म्हणजे मस्टच! घरातील किमान एकाचीतरी. बरेच जण जायचे. बुधवारी रात्रीच चांदपाशा मामू आणि कंपनी गुरूवारचं टिपण घेत असताना - म्हणजे गुरूवारी शेतात करायच्या कामाची प्लॅनिंग काका किंवा तात्याकडून ऐकून घेत असताना सर्वात शेवटी त्याला प्रश्न जायचा - "उद्या गुरूवार आहे बरं! कोण येतंय उद्या मग गाडीवर?" "जाता क्या? " पायरीखाली रूमालाची घडी करून टेकून बसलेल्या सरदारकडं बघून चांदपाशा त्याला विचारायचा. "त्रॉक्क.. वो बईल मेरे अकेलेकू नई संभलते !!" सरदार आलेल्या आफतीतून अंग काढून घ्यायचा. हा चांदपाशा म्हणजे आमचा मुनीम. गडी, त्यांचे काम, बैल-बारदाना, औतं, रोजानं लावलेल्या बाया, शेतातली लहानसहान देणीघेणी, चंदी, घरचा किराणा भरणे वगरे कामांची पॉवर ऑफ अ‍ॅटॉर्नी याच्याकडं. सरदार हे चांदपाशाचेच सर्वात लहान शेंडेफळ. सरदारनं नुकतंच साल धरलेलं. चांदपाशा त्याला हलकी कामं द्यायचा. म्हणजे गुरूवारी नुसतंच गाडी जुपून मालक-पोराटोरांसोबत गुंजाला जायचं, तिथं गेलं की गाडी सोडायची, जेवून घ्यायचं आणि कुठंतरी सावलीला पडायचं. आम्ही मंदिरात. हा इकडं. शुक्रवारी सकाळी गाडी जुपून पुन्हा परत. पण बैल मारके असल्यानं सरदारला ते सोपं कामही नको वाटायचं. मग चांदपाशा गफूरभाईला थेट हुकूम सोडायचा - "गफूर, सुबू कू बाडे पे गाडी लाव जल्दी से - इसकू टंगालता मै बारबिगी में " सरदारकडं रागारागानं बघत चांदपाशा त्याला बारबिगी नावाच्या शेतात ताबडून घेण्याची धमकी द्यायचा आणि काका किंवा तात्याकडं हळूच बघुन घ्यायचा. सरदारला आमच्यासोबत पाठवण्याचा चांदपाशाचा आणखी एक छुपा हेतू म्हणजे - पोरगं जाता येताना मालकासोबत राहिल - बैलगाडी हाकताना चार जवळीकीच्या गोष्टी होतील. पुढं त्यालाच मुनीमकी करणं आहे. पण सरदारच्या टकुर्‍यात या गोष्टी शिरायच्या नाहीत. तो आपलं बैलांना भ्यायचा - आणि त्याच्या मालकांनाही. कारण हे बारबापे बैल (मी गायवाड्यात ऐकलेली ही त्याचीच शिवी) मध्येच शिवळावर पडायचे - एक बैल एका बाजूला ओढायचा दुसरा दुसर्‍या बाजूला! मध्येच गंगा ओलांडताना एखादा बैल जी पाण्यात फतकल मारून बसायचा की बास - दहा कोरडे ओढले तरी भरल्या गंगेतून जागचा उठायचा नाही. गंगेचं पाणी गाडीत शिरायचं आणि काका सरदारला शिव्या घालू लागायचे. अशावेळी गफर्‍याच (भाऊंनी नाहीतर तात्यांनी गफूरला बहाल केलेलं हे खास संबोधन) पाहिजे. तर दुसर्‍या दिवशी गफूर गाडी-बैल घेऊन वाड्यासमोर हजर व्हायचा. नुसत्या रिकाम्या बैलगाडीत खाली कडब्याच्या पेंड्या टाकलेल्या असायच्या. मग त्यावर गादी. गाडीला छत वगैरे फक्त घरातलं महिलामंडळ सोबत येणार असेल तरच - एरव्ही नाही. गफूरने मस्त गाडीची चाके जिथे जोडलेली असतात तिथल्या आखाला लांब तारेने वंगण चोपडून घेतलेले असायचे. तो काळ्याकुट्ट वंगणाचा मोठ्या पोकळ वेळू (बांबू) पासून बनवलेला नळा गाडीच्या साट्यालाच हमेशा अडकवून ठेवलेला असे. बाबुकाका, मी, राजूकाका, योगूकाका, झालंच तर गाडीत येण्यासाठी रडारड करून आमची नमी गाडीत चढायचे. मी आणि नमी आधी गफूरच्या शेजारची जागा धरायचो. कारण तिथून समोर बसून पाय खाली सोडता यायचे आणि गफूरकडून बैलगाडीचा कासराही हातात घ्यायला मिळायचा. बाकीचे सगळे बाजारस्त्यातल्या मारूतीच्या देवळापासून बसायचे. भोईवाड्याकडून खंडोबाकडे अशी अर्धी नगरप्रदक्षिणा घालत आमची गाडी सरईच्या ओढ्यात एकदाची शिरायची - गुंजाला निघाल्याचा खरा फील सरईच्या ओढ्यातून सुरू व्हायचा. कुठेतरी लुप्त की गुप्त झालेली शरयू नदी आमच्या गावच्या उशाशी उगम पावली असे समजले जात असे - तिचे गावठी नाव सरई! ती पुढे गोदावरीला जाऊन मिळते. तिच्या त्या भल्यामोठ्या ओढ्यातल्या चिखलातून चाकं फसवीत, कधी या बाजूला तर कधी त्या बाजूला कंबरेपर्यंत कलत गाडीबैल आणि आमची जत्रा पुढे सरकायची. ओढ्याच्या दोन्ही बाजूंना उंचच उंच बाभळी. त्यांना लटकलेली आग्या मोहोळं. चित्रविचित्र पक्ष्यांचे आवाज. मध्येच समोरून येणार्‍या दुसर्‍या बैलगाड्यांना आमची गाडी कुठंतरी काट्याकुपाट्यात घालून साईड देणे वगैरे प्रकारात गफूर निष्णात. होता होता इद्दुस्वामीचा मळा यायचा. इथं पाण्याचा एक मोठ्ठा पाईप आणि एक हौद रस्त्याच्या कडेला बांधलेला असे. इथं बैलगाडी थोडा दम खात असे. बैलांना पाणी दाखवले जाई. आम्ही सगळे खाली उतरून पाय मोकळे करीत. तेवढ्यात नमी नाहीतर मी ओरडे - "ओ काका, आपले काळ्या-लाल्यापण आलेच आपल्यासोबत!" काळ्या लाल्या या आमच्या कुत्र्यांना कुणीही न बोलावता ते गाडीमागं गुंजापर्यंत येत - दुसर्‍या दिवशी पुन्हा बैलगाडीसोबत परत. "दत्तदर्शनला जायाचं जायाचं जायाचं‌ऽऽऽ आनंद पोटात माझ्या माईनाऽऽ माईना" त्या कुत्र्यांकडं बघत योगू काका गाणं म्हणे. बाबूकाका योगूकाकाला छेडत- "योगानंद महाराज - कुठं ऐकलंत हे गाणं?" "अहो ती नाही का मी कॅसेट आणलीय नवीन - तिच्यात आहे" योगूकाका. "आंऽऽ योगूमालक हे गानं इतक्यांदा म्हन्तात की मलाबी पाट झालंय आता" गफूरही मध्येच त्यांच्या बोलण्यात सहभागी होई. गफूर पुन्हा मग गाडी जुपून त्याच्या भाषेत बैलांशी संवाद साधू लागे - "व्वा रे बईल!!" असं म्हणून शेपटी पिरगाळी. मग पुन्हा एकदा सुरूमगावच्या ओढ्यात गाडी शिरे. तिथे थोडे गचके-आदळे खाऊन, त्या गावच्या मारूतीला वेढा घालून आमची बैलगाडी एकदाची गंगेत शिरे. गंगा ओलांडली की आलंच गुंज! तापलेल्या वाळूत बैलगाडीची चाकं शिरली की सर्रर्रर्रर्र आवाज होई आणि वाळू उडे. तेवढ्यात गंगेच्या वरच्या बाजूला दिसणार्‍या निशाणाच्या दिशेनं सगळ्यांचे हात जोडले जात. तिथे गुरूमहाराजांच्या समाधीचे मंदीर उन्हात चमकताना दिसे. बाबुकाका, राजूकाका गाडीच्या खाली उतरत. आणि गंगेच्या पाण्यात गाडी शिरली, की एक बैल त्याच्या नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणं पाण्यात फतकल मारून बसे! गफूर सरळ पाण्यात उतरून बैलाची शेपूट हातात घेऊन तिला कडकडून चावा घेई - तोपर्यंत कासरा योगूमालकांनी धरलेला असे. शेपूट चावले की दण्णकन बैल उठून चालायला लागे. मग पुन्हा गाडी सोडा. वडीलधारे लोक कृष्णा आत्याकडं जात. ही बाबुकाकांची बहिण. आमची आज्जीच. हे तिचंही गाव होतंच. गफूर शिवळा-जोती, कासरा आत्याच्या घरी ठेऊन बाहेर फिरायला निघून जाई. नमी, मी थेट मंदिरासमोरच्या वड-लिंबाच्या बनाकडे धूम ठोकत असू. कारण तिथे गुंज संस्थानचा खराखुरा, अगडबंब हत्ती बांधलेला असे. बारा वाजत आलेले असत आणि त्या हत्तीला झुल चढवून, घागरमाळांनी मढवून वर अंबारी ठेवण्याचे काम पाहायला खूप मजा येई. हाच हत्ती दत्ताची आरती चालू असताना थोड्यावेळानं उंचावर असलेल्या मंदीराच्या उंबर्‍याशी आणला जाई. उंचच उंच पायर्‍या. मंदिराचे टोलेजंग बांधकाम. संगमरवराचा भलामोठा सभामंडप आणि गुरूवारच्या आरतीला जमलेली भरगच्च गर्दी. एका कोपर्‍यात वाजणारा सनई-चौघडा. नमीची आणि माझी जागा सनई-चौघड्यावाल्या बाबांच्या शेजारी. कारण ती पण एक मजा असे. आरतीच्या गूढ, गंभीर ताला सुरात हत्तीच्यापण किंकाळ्या मिसळून जात. मग ती भलीमोठी आरती ठरलेल्या ठिकाणी ठेऊन दिली जाई आणि लोक रांगेने आरती घेत. ती रांग तशीच पुढे पाकशाळेकडे सरकत असे. अगडबंब देहाच्या ब्राम्हणांच्या पंगती लागत आणि तशाच उघड्याबंब, गलेलठ्ठ देहाचे, छाती-पोटावर भरघोस केस, जानवी वागवणारे सेवेकरी पत्रावळी वाढायला घेत. चविष्ट अन्न. मंदिराच्या विहीरीचे पाणी मात्र खारे असे. सदा सर्वदा योग तुझा घडावा, गुरूदेव दत्त दत्त दत, समर्थ सदगुरू योगानंद महाराज की जय, परमपूज्य चिंतामणी महाराज की जय! अस जयघोष झाली की चित्रावती घालून पंगत अन्नग्रहण सुरू करीत असे. मध्येच पंगतीच्या एका कोपर्‍यातून नुकतीच मुंज झालेल्या श्रीपाद नाहीतर अवधूतचा श्लोकाचा बारीक आवाज उठत असे - सोडी सावळी सानुताप सबळे ऽऽऽ सत्सेवी संतुष्टलाऽऽऽऽ साधी साधन साष्टांग निगुती ऽऽऽऽऽऽ योगे तपे कष्टलाऽऽऽऽऽ कर्मोपासक ज्ञानसूर्य गमतो वैराग्य द्विमर्धूनीऽऽऽऽऽऽ श्रीमद्सद्गुरू पादपद्मह्र्दयी ऽऽऽऽ सिध्दाग्र चिंतामणीऽऽऽ मग पुन्हा एकदा जयजयकार होई. एखादा तयारीचा ब्राम्हण खास ठेवणीतला श्लोक काढी - सासु कस्पट सासरा तृणजसाऽऽऽ भ्रतार दासापरिऽऽऽ ऐशी कन्या ज्या नरासी मिळतसे त्याने भजावा हरिऽऽऽ सर्वांना यथेच्छ अन्नदान करण्यासाठी वाढपी ब्राम्हणांची नुसतील धावपळ सुरू असे. श्लोकांच्या अशा जुगलबंदीत, हास्यविनोदात प्रसादग्रहण होई आणि लांब पाट काढलेल्या विहीरीवर हात वगैरे धुवून लोक सभामंडप, मंदिराचे आवार, खालचे झाडांचे बन इत्यादी ठिकाणी पांगत. नमी आणि माझं आणखी एक आकर्षण पाहायचं राहिलेलं असे - संस्थानची भलीमोठी, उंचच्या उंच अ‍ॅम्बासॅडर कार, तसलाच मोठठा ट्रॅक्टर. त्या कारला झटायचे नाही. कारण ती चिंतामणी महाराजांची कार असे. तिला हार, गंध वगैरे लावलेले असे. लोक कारलाही नमस्कार करीत. आम्हीही हात जोडून घेत असू; पण त्या कारजवळून लवकर हलत नसू. मग पुन्हा एकदा कृष्णा आत्याकडे एक चक्कर. तिथं गेलं की तपकीर नाकात घालत बसलेले उत्तमकाका आधी मला पकडत आणि दर आठवड्याला विचारलेले तेच प्रश्न पुन्हा एकदा विचारून उगाच भंडावून सोडत- "काय रे, कितवीला आहेस यंदा? किती टक्के पडले गेल्यावर्षी?" "सहावीला आहे. गेल्यावर्षी पासष्ट टक्के पडले." "आत्ता दुपारी तुच भोंगळ्यानं गंगात पोहत होता की नाही? मी पाहिलंय तुला. सांगू का बाबूकाकाला?" "मी कुठं पोहोत होतो हो? मी न नमी हत्ती पाहायला गेलो होतो" "अस्सं काय बेट्या - तु इथं आलास की नेहमी भोंगळ्यानं गंगात पोहोताना पाहातो मी.. खोटं बोलू नको" मी त्यांच्या तावडीतून सुटुन दुसरीकडे पळत असे. मग अशीच दुपारच्या चहाची वेळ. मोठ्यांच्या गप्पा उगाच कान देऊन ऐकणे, तिथल्या पोरासोरांच्या खोड्या काढणे. नमीचे ए पोरा तुझ्या नाकात दोरा वगैरे गाणे सुरू होत असे. आणि रात्री दहा वाजता पंचपदी! मंदिराच्या लाऊडस्पीकर मधून नोम-तोम-नोम-तोम-राम-राम-तुक्काराम-राम-राम-तुक्काराम-राम-राम-तुक्काराम ऐकू येऊ लागले की सर्वजण लगबगीनं मंदिराकडे पळत. पंचपदीची सुरूवात रंगावधूत महाराजांच्या गुजराती भाषेतल्या दत्तबावनीनं होत असे - जय योगीश्वर दत्तदयाळ, तुच एक जगमां प्रतिपाळ... अत्र्यनुसूया करि निमित्त, प्रगट्यो जगकारण निश्चित ब्रम्हा हरिहरनो अवतार, शरणागतनो तारणहार अंतर्यामी सदचित्सुख, बहार सद्गुरू द्विभूज सुमुख झोळी अन्नपूर्णा करमाह्य, शांती कमंडल कर सोहाय क्वायं चतुर्भुज षडभुजसार, अनंत बाहु तु निर्धार आव्यो शरणे बाळ अजाण, ऊठ दिगंबर चाल्या प्राण अशीच सुंदर सुंदर पदे पेटी, तबला आणि सुरेल आवाजात म्हटली जात, दत्तगुरूंची पालखी सजवलेली असे. काही-काही पदं ऐकताना-म्हणताना खूप भरून येई. खाली दिलेले पद दत्तगुरूंनी स्वत: त्या कविच्या स्वप्नात जाऊन रचून घेतले आहे असे बोलले जाते. एक नंबरचे कवित्व आणि वर पुन्हा त्या पट्टीच्या गायक ब्राम्हणाचा आवाज एवढा भावार्थ असे की अनेकांच्या डोळ्यांतून अश्रु टपकत- हा परमसनातन विश्वभरूनी उरलाऽऽऽ भरूनी उरला गुरू दत्तराज ऋषिकुळात अवतरला स्मित रम्यवदन काषाय वसन धारी पियुषयुक्त करी रत्नजडीत झारी निज भक्त कारणेऽऽऽऽ दंड त्रिशुळ धरिला बांधीला टोप मुरडून जटा मुकुटीऽऽऽऽ मुकुटी घातली गुरूने वनमाला कंठी ऽऽऽऽ कंठीऽऽऽ करिघृतडमरूतुनी उपजति ज्ञान कला मृगचर्म पांघरे माला कमंडलू हाती, कमंडलू हाती ऽऽऽ श्रुति श्वानरूप होऊनी पुढे पळती भूधेनू कली भये चाटीत चरणाला करिस्वजन उपाधि भस्मलेप अंगा ऽऽऽ झोळीत भरीत तज्जजन्ममरण पिंगा ऽऽ नारायण हृदयी रंग भरूनी गेलाऽऽऽ भरूनी गेलाऽऽऽ गुरू दत्तराज ऋषिकुळात अवतरला त्या संगमरवरी सभामंडपात टाकलेल्या लांबरूंद सतरंजीवर आम्हाला कधी डोळा लागत असे ते कळत नसे. पुढची सगळी पंचपदी, पदे तो हत्ती, ती अ‍ॅम्बासॅडर कार, तो मोठ्ठा घाट, त्या पंगती श्लोक यांच्या मनात भिरभिरणार्‍या प्रतिमा, आवाज, स्वप्ने यांच्या रूपानं मनासमोर गोलगोल फिरत आणि झोपेच्या गुडूप्प काळोखात नाहीशी होत. झोपेतच आरती घेणे, घरी येणे, पुन्हा झोपणे. दुसर्‍या दिवशी सकाळी आमची बैलगाडी गंगा ओलांडून गावाकडे परत निघाली की बाबुकाका सांगत - "अरे काय पप्या, झोपलास रात्री मध्येच पंचपदी चालु असताना, किती मजा आली बघ नंतर....." गुंजग्रामीचे ते दिवस फार मजेत जात. - यशवंत शुचिताईंच्या धाग्यावर टाकलेल्या अष्टकावरून ते दिवस आठवले आणि लिहून काढले.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
14377 वाचन

💬 प्रतिसाद (45)

प्रतिक्रिया

काय अनुभव आहे .सुन्दर हो

स्पंदना
Tue, 11/23/2010 - 09:57 नवीन
काय अनुभव आहे . सुन्दर हो यशवंता गुणवंता. ( एकेरी हाके बद्दल माफी द्यावी, काय झाल यमकात बसल)
  • Log in or register to post comments

+१

स्पा
Tue, 11/23/2010 - 10:23 नवीन
असेच म्हणतो................
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

लहानपणीचे अनुभव रसाळपणे

नगरीनिरंजन
Tue, 11/23/2010 - 10:03 नवीन
लहानपणीचे अनुभव रसाळपणे लिहीले आहेत. आवडले.
  • Log in or register to post comments

दत्त

मिसळभोक्ता
Tue, 11/23/2010 - 10:20 नवीन
गुरुदेव दत्त !! दत्त हा देव मला फार आवडतो. ह्याची कारणे अनेक आहेत. पण काही महत्त्वाची अशी. त्याला तीन तोंडे आहेत. (काही जण म्हणतात, की त्याची तीन तोंडे ही तीन बापांमुळे आहेत, पण ते चुकीचे आहे.) त्याला खोबरे आवडते. (खोबरे छान असते) ब्रह्म्याला स्वतःला चार तोंडे आहेत. तरी दत्ताचे एक तोंड म्हणजे ब्रह्मा. म्हणजे खरे तर १:४ हे गुणोत्तर धरल्यास दत्ताला १२ तोंडे आहेत, आणि त्यामुळे रावणाच्या दहाला हरवून दत्त हा विजेता ठरतो. (कार्तिकेयाचा म्हणजे षडाननाचा बाप देखील त्याचे एक तोंड. म्हणजे तर संपलेच.) दत्त इज द विनर !!!!!
  • Log in or register to post comments

मिसळभोक्ता

Pain
गुरुवार, 11/25/2010 - 11:59 नवीन
ब्रह्मा, विष्णू आणि महेश मिळून दत्त हा अवतार झालेला आहे. त्यापैकी ब्रह्मा - ४, विष्णू -१ आणि महेश- १ अशी एकून सहा तोंडे होतात. ६<१०
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता

पुन्हा वाचून खूप समाधान वाटले

आळश्यांचा राजा
गुरुवार, 12/06/2012 - 23:42 नवीन
पुन्हा वाचून खूप समाधान वाटले. एवढे छान निर्माण करणारा माणूस ...जाऊ देत. महेशाला ५ तोंडे. ईशान, दक्षिणामूर्ती, वामदेव, कालाग्नि ही चार तोंडे शंकराच्या मूळ तोंडाला लागलेली. पहिली दोन उजव्या बाजूला, नंतरची दोन डाव्या बाजूला. अगदी उजवीकडचे आनंदाचा (ब्लिस) वर्षाव करणारे, तर अगदी डावीकडचे प्रलयकारी. दक्षिणामूर्ती हे कृपेचा वर्षाव करणारे गुरुचे रूप. वामदेव हे कठोर गुरुचे रूप.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Pain

ओरिजनल..

गवि
Tue, 11/23/2010 - 10:55 नवीन
ओरिजनल..ओरिजनल..म्हणजे काय? तर ते हे यशवंताचे लिखाण.. नरसोबावाडीच्या दत्ताच्या गोड पेढ्याप्रमाणे.. ती मंडपातल्या सतरंजीवरची झोप.. क्या बात क्या बात क्या बात..
  • Log in or register to post comments

सुंदर लिखाण

प्रदीप
Tue, 11/23/2010 - 18:09 नवीन
अगदी चित्रदर्शी, अतिशय आवडले. असेच लिहीत चला.
  • Log in or register to post comments

सर्वांचे आभार - वाचक मात्रांचे विशेष आभार

यकु
Tue, 11/23/2010 - 19:52 नवीन
आमच्या सोबत गचके खात गुंजाला येणार्‍या सर्व वाचकांचे आभार. @ अपर्णाताई - हे गं काय? डायरेक माफी बिफी? पप्प्या म्हण मला. तेच माझं खरं नाव आहे. @ स्पा - धन्यवाद @ नगरीनिरंजनः धन्यवाद. @ नचिकेतजी - आपल्या दिलखुलास प्रतिक्रिया नेहमीच काहीतरी वेगळं लिहीण्याचा विचार जागता ठेवतात. @ चांगभलं - ती शिवी बर्‍याच दिवसानं वाचनात आली. आवडली. @ मिभो - धन्यवाद. @ प्रदीप - धन्यवाद.
  • Log in or register to post comments

मस्त रे यशवंता...

प्रभो
Tue, 11/23/2010 - 19:54 नवीन
मस्त रे यशवंता...
  • Log in or register to post comments

सुप्पर्ब!

धमाल मुलगा
Tue, 11/23/2010 - 20:04 नवीन
के व ळ अ प्र ति म लिहिलंय द्येवा! गावाकडच्या जुन्या आठवणी जागवल्या ह्या लेखानं. यशवंतबुवा, लेखणीत काय ताकद आहे तुमच्या! वाचणार्‍याला खिळवून ठेवण्याचं कसब आहे खरं! मस्तच जमलाय हा लेख. येऊ द्या आणखी.
  • Log in or register to post comments

अप्रतिम!!!

बिपिन कार्यकर्ते
Tue, 11/23/2010 - 20:23 नवीन
अप्रतिम!!!
  • Log in or register to post comments

पप्पू पास हो गया!

पैसा
Tue, 11/23/2010 - 20:23 नवीन
एकदम खिळवून टाकणारं लिहिलं आहेस. श्लोकांसकट सगळं सगळं... तिथे गुंजीला जाऊन आल्यासारखं वाटलं. तसंच फार पूर्वी पहाटे ४ वाजता उठून काकड आरत्याना गेल्याची आठवण आली. मस्त ऐसपैस लिहिलंयस!
  • Log in or register to post comments

छान च लिहीलय. श्लोक

शुचि
Tue, 11/23/2010 - 21:21 नवीन
छान च लिहीलय. श्लोक अत्युत्तम!
  • Log in or register to post comments

आहाहा !!

अर्धवटराव
Wed, 11/24/2010 - 01:38 नवीन
गुंजग्रामीची अगदी खरीखुरी सफर घडवलीत भाऊ... त्या ग्रामीण जीवनाच्या बाजासहीत आणि दत्तभक्तीच्या सात्वीक रसाने ओथंबलेली. गुरुमंदीराच्या कळसाला तुमचे काका नमस्कार करण्याचा प्रसंग वाचता वाचता मी देखील उत्स्फूर्तपणे हाथ जोडले... खूपच छान. थोडा आगाऊपणा/ शहाणपणा("अवांतर" म्हणवत नाहि ): इतकी छान दत्तभक्तीची परंपरा असताना तो भक्तीरस भोगायचा सोडुन कशाला उगाच मणक्यात जाळ आणि १००० किलो डोक्याच्या उद्योगाला लागलात ??? अर्धवटराव
  • Log in or register to post comments

इतकी छान दत्तभक्तीची परंपरा

आळश्यांचा राजा
Tue, 12/07/2010 - 22:45 नवीन
इतकी छान दत्तभक्तीची परंपरा असताना तो भक्तीरस भोगायचा सोडुन कशाला उगाच मणक्यात जाळ आणि १००० किलो डोक्याच्या उद्योगाला लागलात ?
हाच प्रश्न पडला! कुटं ते युजी भेटले राव... जाऊ देत. आमच्याच मणक्यात जाळ व्हायला लागायचा! सुरेख लिखाण!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

एकटाकी छान लिहिलं आहे.मलाही

रेवती
Wed, 11/24/2010 - 02:56 नवीन
एकटाकी छान लिहिलं आहे. मलाही नाशिकच्या काळ्यारामाला जायचो तेंव्हाचे असे काहीबाही आठवत राहिले. रामाचा रथ आला म्हणून आजी दर्शनाला पुढे गेली तर मंगळसुत्रच गेलं होतं. वाईला कृष्णामाईचा प्रसाद घ्यायला घाटावर जायचो तेही आठवलं. आमच्याकडे आजीआजोबांमुळे देवदेव भरपूर असायचा. सगळे कुळधर्म कुळाचार पाळले जायचे. रोजची परवचा अगदी आठव्या यत्तेत जाईपर्यंत सक्तीची होती. मला अजिबात आवडायचे नाही. आता माझ्या मुलाला ही सक्ती करू का नको असा प्रश्न पडतो. दत्तजयंतीचं जेवण हेही आवडीचं. म्हणजे जेवण कितीही सुग्रास असलं तरी जेवायला आवडायचं नाही पण पंगतीची मजा वेगळीच! यकुंचे लेखन बर्‍याचदा आवडते. छानच!
  • Log in or register to post comments

सुरेख

गुंडोपंत
Wed, 11/24/2010 - 04:26 नवीन
सुरेख लेखन अनेक दिवसांनी काहीतरी छान वाचायला मिळाले. डोळ्यासमोर चित्रपट उभा करण्याची जादू आहे तुमच्या शब्दात. फार आवडले. "ओ काका, आपले काळ्या-लाल्यापण आलेच आपल्यासोबत!" किंवा "आत्ता दुपारी तुच भोंगळ्यानं गंगात पोहत होता की नाही? मी पाहिलंय तुला. सांगू का बाबूकाकाला?" हे संवाद अगदी समोर घडल्या सारखे आहेत. त्यातले भोंगळ्यानं आणि 'गंगात' म्हणणे वगैरे अगदी खास. हल्ली असा उल्लेख जवळपास गेलाच आहे. त्यात मला ते जास्तच आवडले कारण आमच्या नाशकातही गंगाच! "अरे काय पप्या, झोपलास रात्री मध्येच पंचपदी चालु असताना, किती मजा आली बघ नंतर....." असे तुमचे शब्द संवाद इतक्या सहजतेने येत जातात. तुमच्या बरोबर खरोखर गुंजग्रामीची सफर झाली. यशवंतराव असे जादूभरे लेखन अजून यायला हवे. तुमच्या शब्दात ताकद आहे. दत्तकृपेने तुमच्या हातून भरपूर लिखाण घडो हीच सदिच्छा!
  • Log in or register to post comments

तुमच्या

प्रदीप
Wed, 11/24/2010 - 10:57 नवीन
नाशकाच्या यशवंत पाठकांच्या लिखाणाची किंचीत आठवण झाली, बघा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गुंडोपंत

Original ! Period.

जयंत कुलकर्णी
Wed, 11/24/2010 - 09:27 नवीन
Original ! Period.
  • Log in or register to post comments

जबरदस्त ...

छोटा डॉन
Wed, 11/24/2010 - 10:20 नवीन
यशवंतबुवा, लेखणीत ताकद आहे राव तुमचा. छानच लिहले आहे, लेख एकदम आवडला. एखाद्या मात्तबर दिवाळी अंकात शोभुन जावा इतका उत्तम जमला आहे, बाकी वर गुंडोपंतानी लिहले आहेच बरेच काही. आपण असेच वारंवार लिहावे इतकेच म्हणतो. - छोटा डॉन
  • Log in or register to post comments

लहानपण

अडगळ
Wed, 11/24/2010 - 10:42 नवीन
लहानपण असं लख्ख आठवणार्‍यांचा प्रचंड हेवा वाटतो .आणि तितकाच आदर पण वाटतो. हे इतकं सारं लहानपणी शोषून घ्यायला मुळचंच फार संवेदनशील मन पाहिजे.ही शब्दांची वळणं , भाषेची मस्ती ही सगळी जाणतेपणीची कमाई. त्या बारक्या यशवंताला दंडवत.
  • Log in or register to post comments

सुरेख लिहिलं आहे. खूप आवडलं.

यशोधरा
Wed, 11/24/2010 - 11:21 नवीन
सुरेख लिहिलं आहे. खूप आवडलं. खूप दिवसांनी मिपावर हा तुमचा लेख आणि "काय ध्यान आहे" हा ३ भागातला लेख, हे चांगले काही वाचायला मिळाले. धन्यवाद.
  • Log in or register to post comments

खुपच छान.

जागु
Wed, 11/24/2010 - 12:09 नवीन
खुपच छान.
  • Log in or register to post comments

रसाळ

स्वाती दिनेश
Wed, 11/24/2010 - 12:26 नवीन
रसाळ आठवणींनी पाठकांचे 'अंगणातले आभाळ' आठवले पटकन, अजून लिहा. पुलेशु स्वाती
  • Log in or register to post comments

सर्वांचे खूपखूप मनापासून आभार

यकु
Wed, 11/24/2010 - 14:18 नवीन
@ प्रभो - धन्यवाद @ धमाल मुलगा - थैंक्यू राया @ बिका - धन्यवाद. @ पैसा - धन्यवाद. @ शुचिताई - धन्यवाद. @ अर्धवटराव - प्रॅक्टीकली काय खरं आणि काय खोटं हे बघायच्या खुमखुमीतून करून बघीतलं. पुढे भलता पसारा आहे त्यात ते कळ्लं. @ रेवती - धन्यवाद. तो चंद्रकांता सिरीयलमधला यक्कु क्रुरसिंह मला भारी आवडतो. @ गुंडोपंत - धन्यवाद. सविस्तर प्रतिक्रिया आवडली. @ प्रदीप - धन्यवाद. यशवंत पाठकांची शैली अगदी अकृत्रिम आहे. भावून जाते. शिवाय ते किर्तनकारही आहेत. त्यांचा "याने" या शब्दाचा वापर अजूनही लक्षात आहे. @ जयंतजी - धन्यवाद. @ छोटा डॉन - धन्यवाद. अरे तुम्ही लोकांनी एवढी चांगली थेट दाद वसूल करायची सोय करून दिलीय - दिवाळी अंक म्हणजे वगैरे भलत्या भानगडी असतात. @ अडगळ - भाषेची मस्ती, शब्दांची वळणं याबद्दल तुम्ही म्हटलात ते खरंय. आणि फार वर्षे नाही झाली हो या गोष्टीला - अगदी कालपर्वा म्हणजे बारा-पंधरा वर्षापूर्वीचं आहे. म्हणून आठवतं. @ यशोधरा - धन्यवाद. @ जागू - धन्यवाद. @ स्वाती दिनेश - धन्यवाद.
  • Log in or register to post comments

तुमची गुंजवारी

विलासराव
Wed, 11/24/2010 - 15:47 नवीन
आवडली बरकां. आता तिकडे दौरा आहेच तर जमल्यास उरकुन टाकु. पण तुम्ही बरोबर आलात तरच.
  • Log in or register to post comments

अप्रतिम लिखाण

नंदू
गुरुवार, 11/25/2010 - 10:01 नवीन
त्या संगमरवरी सभामंडपात टाकलेल्या लांबरूंद सतरंजीवर आम्हाला कधी डोळा लागत असे ते कळत नसे. पुढची सगळी पंचपदी, पदे तो हत्ती, ती अ‍ॅम्बासॅडर कार, तो मोठ्ठा घाट, त्या पंगती श्लोक यांच्या मनात भिरभिरणार्‍या प्रतिमा, आवाज, स्वप्ने यांच्या रूपानं मनासमोर गोलगोल फिरत आणि झोपेच्या गुडूप्प काळोखात नाहीशी होत.
व्वा सुंदर..लेख फारच आवडला हे वे सां न ल.
  • Log in or register to post comments

छान

धनंजय
Wed, 12/08/2010 - 03:56 नवीन
मस्त
  • Log in or register to post comments

खूप सुंदर लेखन ! निर्मळ आणि

मितान
Wed, 12/08/2010 - 11:33 नवीन
खूप सुंदर लेखन ! निर्मळ आणि खोल :)
  • Log in or register to post comments

कृपया हा धागा वाचनाला उपलब्ध

स्पा
Tue, 11/20/2012 - 12:17 नवीन
कृपया हा धागा वाचनाला उपलब्ध करून देता आला तर बर होईल
  • Log in or register to post comments

आता

गवि
Tue, 11/20/2012 - 12:52 नवीन
प्रतिसादसुद्धा दृश्य केले आहेत.
  • Log in or register to post comments

धन्यवाद गवि

स्पा
Tue, 11/20/2012 - 13:39 नवीन
धन्यवाद गवि
  • Log in or register to post comments

आभार गवि

सुजित पवार
Tue, 11/20/2012 - 14:26 नवीन
आभार गवि....
  • Log in or register to post comments

लिहायला बसलो तर एक फर्मास

प्रास
Tue, 11/20/2012 - 14:33 नवीन
लिहायला बसलो तर एक फर्मास कादंबरी सहज हातावेगळी होईल. पण तो धंदा वय वाढल्यावर करू.
यक्क्या.... :-(
  • Log in or register to post comments

+१

अत्रुप्त आत्मा
Tue, 11/20/2012 - 15:02 नवीन
+१ :-(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रास

+११

मैत्र
Fri, 12/07/2012 - 04:20 नवीन
हे तर आहेच.. पण गुंडोपंतांची ही वाक्यं वाचून काही सुचलंच नाही.. :(
यशवंतराव असे जादूभरे लेखन अजून यायला हवे. तुमच्या शब्दात ताकद आहे. दत्तकृपेने तुमच्या हातून भरपूर लिखाण घडो हीच सदिच्छा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

वाह... निव्वळ अप्रतिम !!

सुहास झेले
Tue, 11/20/2012 - 17:11 नवीन
वाह... निव्वळ अप्रतिम !! धन्यवाद गवि !!
  • Log in or register to post comments

छान

आजानुकर्ण
Tue, 11/20/2012 - 21:52 नवीन
अप्रतिम लेख
  • Log in or register to post comments

अल्बममधिल...

नाखु
Mon, 11/26/2012 - 14:09 नवीन
एक खास फोटो पहावा तसा मस्त आहे हा लेख. ग.वि. शतशः धन्यवाद.
  • Log in or register to post comments

जिवंत चित्रण वाचताना

दीपा माने
Wed, 12/05/2012 - 10:38 नवीन
जिवंत चित्रण वाचताना डोळ्यापुढे उभं केलंत. आणखीही आपले लेख वाचणार आहेच.
  • Log in or register to post comments

http://www.misalpav.com/node

प्यारे१
Fri, 12/07/2012 - 16:10 नवीन
http://www.misalpav.com/node/23203 हे वाचा. दुर्दैव!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दीपा माने

यकु, किती सुरेख लिहिलं होतस

यशोधरा
Fri, 12/07/2012 - 21:00 नवीन
यकु, किती सुरेख लिहिलं होतस रे.. आज पुन्हा वाचलं.
  • Log in or register to post comments

जे आयुष्य मी कधीच अनुभवले

निनाद मुक्काम …
Sat, 12/08/2012 - 20:29 नवीन
जे आयुष्य मी कधीच अनुभवले नाही ते आज ह्या लेखातून मी जगलो. क्षणभर मी पप्या झालो होतो. आता उरल्या आठवणी फक्त आठवणी
  • Log in or register to post comments

तू का सोडून गेलास?

समयांत
Wed, 12/19/2012 - 16:41 नवीन
कित्ती जीव भंडावून सोडलंस रे तू..?
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा