Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by रणजित चितळे on Fri, 11/12/2010 - 14:23
आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा आमची आई रोज दुपारी आम्हाला रेल्वेलाईन जवळच्या गणपतीच्या देवळात घेऊन जायची. कधी तिथे किर्तन चाललेले असायचे ते ऐकायला बसायचो, कधी प्रवचन चाललेले असायचे त्याला जायचो. किर्तन दोन भागात असायचे पहील्या भागात भागवतातली एक कथा किंवा पुराणातली एखादी घटना भजनां बरोबर किर्तनकार सांगायचे. मजा यायची. दुस-या भागात सांगितलेल्या कथेचा मतीतार्थ सांगायचे. हा भाग जरा गंभीर असायचा व सुरवातीला कंटाळा यायचा वय वाढल्यावर आवडायला लागला. कथेचे सार दुस-याच भागात असते हे कळले. प्रवचनेचे विषय जरा गंभीर असायचे. कधी महाभारतातील सोळा महत्वाची पात्रं, तर कधी गीतेचा अकरावा अध्याय, कधी उपनिषदांवर चर्चा. कधी कधी तर शेवडे गुरुजी प्रवचन करणार असतील तर चक्क १९७१ च्या भारत पाक युद्धातील अभिमन्यु असापण विषय असायचा. पण येवढे मात्र खरे एकदा का जायला सुरवात झाली ह्या किर्तन, प्रवचनांना की आवड वाढते. नवं नव्या गोष्टी कानावरुन जातात. उपनिषदांतून केवढे प्रगाढ तत्वज्ञान आहे ते तेव्हा लहानपणी समजले नाही तरी त्याची कल्पना येते. पुढे त्याचा खुप फायदा होणार असतो. वयाच्या कोणच्या ना कोणच्या टप्प्यावर आपण सर्व जण त्यातले तत्वज्ञान स्विकारतो व त्या तत्वज्ञानाकडे आकृष्ट होतो. हा साक्षातकार केव्हा ना केव्हा प्रत्येक माणसाला होतो. लहानपणी ते तत्वज्ञान नुसते कानावरुन जरी गेले तरी आपल्या आंतरमनात खोल कोठेतरी आपल्या नकळत रुतुन बसते. जिवनाकडे बघण्याचा आपला दृष्टीकोण चांगला होतो. मन विशाल होते व आपले मन प्रसन्न व आनंदी रहावयास मदत मिळते. शाळेला सुट्टी लागायची तशी बाबासाहेब पुरंद-यांच्या शिवाजी महाराजांवरच्या भाषणांना आम्ही जायचो. पुढचे दोन तास प्रत्यक्ष शिवाजी महाराजांबरोबर काढायचो आणि नंतरचे काही दिवस त्याच धुंदीत जायचे. डोंबिवलीच्या नगरपालीकेचे पुस्तकालय चांगल्या पुस्तकांसाठी खुप प्रसीद्ध होते व ठेवले सुद्धा छान होते. सुट्टीत दुपारी सावरकरांचे काळेपाणी, १८५७ चे स्वातंत्र्य समर, सहा सोनेरी पाने. लोकमान्यांचे गीता रहस्य (त्या वेळेला जरी पुर्णपणे डोक्यावरुन गेले तरी आता कळते त्याचे महत्व) आर्टीक होम ऑफ वेदाज, ऑरायन. पुलंची सगळी पस्तके, वपुंची कथाकथने, रणजित देसाईंची पुस्तके इत्यदी कित्येक अनेक. किशोर मासिक, चांदोबा, गोट्या, चिंगी व चिमणराव, साने गुरुजींची शामची आई, गोनीदां ची पुस्तके व अजुन खुप खुप पुस्तके, आमच्या व बाकीच्या लहान मुलांच्या आवडीनिवडीवर वाचली जायची. संध्याकाळ झाली की कोणी मोठी उत्सुक ‘ग्राऊंड’ घ्यायचे. म्हणजे जवळच्या मैदानावर खेळ घ्यायचे. मुलं, मुली त्या ‘ग्राऊंड’ वर जायचे. व खेळ घ्यायचे. आम्ही म्हणायचो ‘ग्राऊंडला’ जातो. मोठी समजायची की अमका अमका नेहरु मैदान किंवा बागशाळा मैदानावर गेलाय. मला आठवताय संध्याकाळी लक्ष्मीनारायणाच्या मंदिरा समोर एक घर होते त्यात राहणारे आजोबा त्यांच्या घराच्या गच्चीवर, उत्सुक अशा शालेय मुला मुलींना सभाधीट पणा शिकवायचे. एखादा विषय समोर ठेवायचे व त्यावर बालायला लावायचे. बाकीची ऐकणारी मुले, बोलणारा कसा बोलतो व चुका कसे करतो ते बघायची. त्याची वेळ आली की मग तो बोलायचा व बाकीची ऐकायची. काही मुले संध्याकाळची संघाच्या शाखेत जायची, त्यांच्या शिबिरात जायची. मी पण एक दोनदा शिबिरांना गेलेलो आहे. बहुतेक मुलांना एखादा छंद असायचा. शाळेला लागलेल्या सुट्टीत मग मुलं आपापला छंद जोपासायची. त्यातुन मिळणारा विरंगुळा काही वेगळाच असतो. दिवसभराचा डोक्यावरला ताण काही क्षणातच निघुन जातो. हे सगळे होत असताना शाळा चालु असायची. शाळेतला अभ्यासक्रम जरी व्यापक असला तरी समर्पक कधीच होऊ शकत नाही. मुलाला एकदा शाळेत पाठवले, मग ती कोठलीही शाळा असो – शेजारची सरकारी शाळा घ्या किंवा अद्ययावत अंतरराष्ट्रीय विद्यालय असो, त्यात वेगवेगळ्या विषयांवरची माहिती जरुर मिळते, वेगवेगळे विषय शिकायला मिळतात, जशी शाळा असेल तसे वगवेगळ्या गोष्टी पहायला मिळतात एखाद दुसरा अनुभव पण गाठी लागतो. पण आपल्या विचारसरणीत बसणारे संस्कार होऊ शकत नाहीत. जिवन चांगल्या प्रकारे कसे जगायचे त्याचे पाढे मिळु शकत नाहीत. आपल्या लोकनेत्यांचे जिवन कसे घडले, त्यांचे विचार हे उमजु शकत नाहीत. आपल्या संस्कृतीचा इतिहास व आपली संस्कृती कशी तयार झाली हे समजु शकत नाही. आपले सामाजिक कर्तव्य काय आहे ह्याची कल्पना फार क्वचीतच येऊ शकते. एकुणच शाळा ही अ ब क ड शिकवणारी असते पण जिवनाचे कडबोळे सोडवण्यासाठी लागणारे धडे देणारी नसते. आपल्या डोक्यावरला आलेला ताण नैसर्गिकरीत्या कसा कमी करायचा ह्याचे शिक्षण नसते. मनाची प्रसन्नता कशी टिकवुन ठेवायची ह्याचे शिक्षण नसते. ह्या जगात तोच मनुष्य यशस्वी गणला जातो ज्याला प्रसन्नतेने व आनंदाने जगता आले आहे. (क्रमशः) http://bolghevda.blogspot.com
  • Log in or register to post comments
  • 3545 views
  • शाळे बाहेरच्या शाळा - शेवटचा भाग

Book traversal links for शाळे बाहेरच्या शाळा

  • शाळे बाहेरच्या शाळा - शेवटचा भाग ›

प्रतिक्रिया

Submitted by स्पंदना on Fri, 11/12/2010 - 14:34

Permalink

>>>>> लहानपणी ते तत्वज्ञान

>>>>> लहानपणी ते तत्वज्ञान नुसते कानावरुन जरी गेले तरी आपल्या आंतरमनात खोल कोठेतरी आपल्या नकळत रुतुन बसते. जिवनाकडे बघण्याचा आपला दृष्टीकोण चांगला होतो. मन विशाल होते व आपले मन प्रसन्न व आनंदी रहावयास मदत मिळते.>>>>> अगदी अगदी. काय हो? लब्बाड ? खेळायला जातो म्हणुन सभाधीट पणा चे क्लासेस मध्ये वेळ घालवायचा? शेवटचा पेरेग्राफ तर अतिशय सुन्दर प्रकारे लिहिलाय. अन असल लिखाण क्रमशः येणार म्हणजे तर सोने पे सुहागा!
  • Log in or register to post comments

Submitted by गणेशा on Fri, 11/12/2010 - 15:28

Permalink

अतिशय छान लिहिले आहे .. आवडले

अतिशय छान लिहिले आहे .. आवडले आणि पटले हि...
  • Log in or register to post comments

Submitted by चित्रा on Fri, 11/12/2010 - 17:55

Permalink

छान

लेखन आवडले. शाळेबाहेरची शाळा हे शीर्षकही अगदी पटण्यासारखे आहे. हल्लीही अशा शाळा असाव्यात, फक्त क्लासेसमधून बाहेर पडायला मुलांना वेळच नसावा. क्रमशः अजून येऊ दे.
  • Log in or register to post comments

Submitted by विलासराव on Fri, 11/12/2010 - 18:43

Permalink

रणजित चितळे

>>>>ह्या जगात तोच मनुष्य यशस्वी गणला जातो ज्याला प्रसन्नतेने व आनंदाने जगता आले आहे अगदी खरय.
  • Log in or register to post comments

Submitted by राजेश घासकडवी on Fri, 11/12/2010 - 22:07

Permalink

वाचतोय

शाळांमध्ये फक्त शैक्षणिक बुद्धिमत्तेवर भर दिला जातो हे पटतं. जगात जगण्यासाठी इतर अनेक गुण आवश्यक असतात - उत्साह, लोकांशी व स्वतःशीसुद्धा जमवून घेण्याची शक्ती आणि आत्मविश्वास. पुढच्या भागांत काय येणार याबाबत उत्सुक.
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Sat, 11/13/2010 - 00:29

Permalink

चितळेसाहेब

तुमची शाळेबाहेरची शाळा आवडली. पुढे काय असणार, म्हणून उत्सुकता लागून राहिली आहे..
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com