पांढर्यावर 'काळे' संजोपराव हे पुस्तक प्रकाशित करत आहेत म्हणून अप्रकाशित. नीलकांत.
शिरवळकरांनी हातातल्या सिग्रेटीचा एक दमदार झुरका घेतला आणि हळूहळू धूर सोडत ते अवकाशाच्या पोकळीत बघत राहिले. आपले रोड पाय एकमेंकावर टाकून एखाद्या राजपुत्रासारखे ते ऐटीत बसून राहिले. एखादी नवीन कल्पना सुचत असली की त्यांचे डोळे असेच काचबाहुली होत असतात हे आतापर्यंत सर्वांच्या ध्यानात आले होते. आपण वापरायला काढलेला नवीन परफ्यूम कसा आहे हे त्यांना विचारायला आलेले वपु बाकी हिरमुसल्यासारखे झाले होते. त्यांनी मग शेजारी बसलेल्या दळवींकडे मोर्चा वळवला. दळवी आकंठ जेवण झाल्यावर माणसाच्या चेहर्यावर जी एक नैसर्गिक परिपूर्तीची भावना येते ती पांघरुन हातांना येणारा बोंबिलाचा वास हुंगत बसले होते. त्यांच्या चष्म्यातून त्यांचे घारे, कोकणस्थी बेडूकडोळे हळूहळू बारीक होताना दिसत होते. वपुंच्या परफ्यूमचा सुगंध दरवळला तसे दळवी एखाद्या सडक्या उंदराचा दर्प यावा तसे दचकले.
"काय दळव्यांनु, कसा काय वाटला माझा नवा परफ्यूम?" काळे म्हणजे सुहागरातीला माणसाने 'तयार' व्हावे तसे सजून आले होते.
" वसंता, माणसाला दुपारी झोपूपण देता येत नाही काय रे तुला? फुकट रे तू, फुकट. मायझयां, तिथे जिवंत असतांना काय कमी छळलंस म्हणून इथे पण सूड उगवायला आलास काय रे? " दळवी वस्स्कन ओरडले. वपुंचा चेहरा पडला. त्यांच्या विरळ केसांना लावलेला कलप थोडा फिकुटल्यासारखा झाला. वास्तविक "छान आहे हो, नवा परफ्यूम तुमचा...." हे वाक्य कुणाकडून येते याची ते वाट बघत होते . 'नाकात आहे, तोवर तो गंध असतो, छातीत गेला की तो श्वास होतो' हे उत्कट वाक्य त्यांना नुकतेच सुचले होते आणि ते कुणाला तरी ऐकवलेच पाहिजे या उत्कट भावनेने ते अस्वस्थ झाले होते. एकंदरीत आपले सगळे जे काही आहे, ते उत्कट आहे अशी त्यांची ठाम म्हणजे अगदी फारच ठाम खात्री होती. त्यांचे हक्काचे श्रोते शिरवळकर असे तुर्यावस्थेत गेले असल्याने त्यांना नाईलाजाने दळवींकडे वळावे लागले होते. एरवी ते स्वतः, शिरवळकर, कदम आणि पिंगे यांच्या बैठकीच्या बाहेर जाण्याची त्यांना गरज भासत नसे. पिंग्यांचे आणि त्यांचे तर काय 'एक हाथ से दो, एक हाथ से लो' असेच नाते होते. पण आज पिंगे सकाळपासूनच दिसत नसल्याने आणि कदम अगदी पहाटे पहाटे उठून आपली दुनळी बंदूक साफ करण्यात गुंतले असल्याने काळे नाईलाजाने शिरवळकरांकडे वळले होते. 'कदम, आता इथे तुमच्या बंदूकीचे काय काम हो? निशाण सांभाळण्यापेक्षा स्वतःची शान सांभाळाल तर काय जान जाईल?' हेही वपुंना सुचले होते. पण ते कदमांना सुनावण्याचे धाडस काही त्यांना झाले नव्हते. कदमांना एकूण ते जरा टरकूनच असत. एकतर माणूस कोल्हापूरचा. त्यातून वकील. बाकी त्यांचे डाकबंगले, मटणपार्ट्या, धबधब्याच्या काठावर परदेशी स्त्रीबरोबर रोमान्स करणारा त्यांचा तो पोलीशी नायक, त्यांचे ते कोर्टातले वाद-प्रतिवाद हे त्यांच्या ठाणे- मालाड- अंबरनाथ अनुभवांच्या पलीकडे न गेलेल्या नायक नायिकांना जरा जडच जात असे. आता दळवींकडूनही असा तेजोभंग झाल्यामुळे ते पुन्हा एकदा हिरमुसले. आपण जे हिरमुसले आहोत ते ऑफिसमधून सेंडॉफच्या दिवशी मिळालेली लाल गुलाबाची फुले दुसर्या दिवशी हिरमुसतात तसे, की शेणाने सारवून घेतलेल्या जमीनीवर सकाळी घातलेली रांगोळी संध्याकाळी हिरमुसते तसे यावर विचार करत ते मागे वळाले तोच त्यांना हातातले शुभ्र कागद एखाद्या बावट्यासारखे फडकावत धावत येणारे पिंगे दिसले. पिंग्यांची एकंदरीत 'एंट्री'ची हीच स्टाईल असे. 'लेखणीचं टोक सुकू न देणारा सारस्वताचा पुजारी' अशी स्वतःची ओळख करुन देणारे पिंगे 'कुठल्याही क्षणी सत्यसाईबाबांचे स्मरण करुन मी एकटाकी मजकूर लिहितो' असे दिवसातून पाचसात वेळा तरी म्हणत असत. वपुंना नाही म्हटलं तरी पिंग्यांच्या सह्वासात जरा कॉप्लेक्सच येत असे. त्यातून पिंग्यांचा इतिहास वपुंपेक्षा जबरा. वपुंनी फोर्टातल्या जुन्या आठवणी काढल्या की पिंगे लगेच आपण तिथे पुलंबरोबर मटणप्याटीस खायला कसे जायचो, ते सांगणार. वपुंनी सामान्यांचे म्हणून पिवळ्ये गंजिफ्राक आणि त्याची पर्वा न करता नवर्याच्या कुशीत शिरणारी वहिदा असले मध्यमवर्गीय आड्यन्सला अपील होणारे काहीतरी काढले की पिंगे शांतादुर्गेच्या एका नजरेने मनात सुखाचे आणि शांततेचे कसे डोह उमटले असला डबलबार काढणार. त्यामुळे 'आपलं मार्केट खातो हा साला..' असं कधीकधी वपुंच्या मनात येत असे, आणि साहित्यिकाला असला मनाचा कद्रूपणा शोभत नाही, मग जर आपल्या मनात असे कद्रू विचार येत असतील, तर आपण साहित्यिक आहोत की नाही, अशीही शंका त्यांच्या मनात येऊन जात असे. पण आता पिंगे तर पिंगे, पण कुणाकडून तरी आपल्या नव्या परफ्यूमवर टाळ्या घेतल्याच पाहिजेत या उत्कट भावनेने त्यांनी पिंग्यांकडे बघून हात हलवला. धापा टाकत आलेले पिंगे काही वेळ आपण लिहून आणलेल्या कागदांकडे अत्यंत कौतुकाने बघत राहिले. वपु तोवर खोलवर मोठमोठे श्वास घेऊन पिंग्यांना काहीतरी सुचवायचा प्रयत्न करत होते. पिंग्यांची धाप कमी झाली आणि त्यांनी एक मोठा श्वास घेतला. आता हे नक्की आपल्या परफ्यूमबद्दल बोलणार या खात्रीने वपुंचा चेहरा उजळला.
"ऐका वसंतराव." पिंगे म्हणाले.
"शुद्धबुद्धी श्रीचरण मला मंतरलेल्या अक्षता देतात, श्रीफळ देतात आणि तृप्त आशीर्वादही देतात. बळेच सांभाळून आणलेला सगळा बुद्धिवाद आणि सगळी पोकळ अहंता अशा वेळी नकळत गळून पडते. मन भरुन येते. हात आपोआप जुळतात आणि नियतेने प्रवर्तित केलेल्या योगायोगांच्या नित्यनूतन ऋतूचक्रापुढे तर त्याहूनही लीन व्हायला होते..."
"वाहव्वा! क्या बात है! ब्राव्हो!" वपु उसन्या अवसानाने म्हणाले. पिंग्यांच्या शेवटच्या वाक्याचा अर्थ काय याबाबत जरा त्यांच्या मनात गोंधळ होता, पण ते वाक्य टाळीखेचक आहे याबाबत बाकी त्यांना शंकाच नव्हती. "तिसर्याच्या सुक्यासारखं झणझणीत वाक्य आहे, रवी.." ते म्हणाले. सारस्वतांशी बोलताना मासळीबिसळीचा उल्लेख केलेला बरा, हेही त्यांना नुकतेच सुचले होते. एरवी तिसर्या ही काय भानगड आहे, याबाबत त्यांच्या मनात जरा गोंधळच होता. पिंगे बाकी सोलकढीत झुरळ तरंगताना दिसावा तसे दचकले. 'मासळीभात - सोलकढी- सारस्वतांचं परब्रह्म ' हा लेख लिहिण्यासाठी आपण सगळी कोकण किनारपट्टी पालथी घातली आणि गावांची आणि माशांची नावे जमवून जमवून अनुभवसिद्ध लेख लिहिला, पण अजून मासळीविषयक लेख म्हटला की लोक दळवींच्या 'दादरचे दिवस' चीच आठवण काढत मिटक्या मारतात याची पिंग्यांना पापलेटातल्या काट्यासारखी सल लागून होती. त्यांनी दचकून दळवींकडे पाहिलं, पण दळवींची छान ब्रह्मानंदी टाळी लागली होती.
"हा तलत शांतपणे सिग्रेटही ओढू देणार नाही, साला..." अचानक कुणीतरी ओरडले आणि वपु आणि पिंगे दोघेही दचकले. शिरवळकरांनी हातातली सिग्रेट चुरडून टाकली होती आणि तांबारलेल्या डोळ्यांनी ते इकडेतिकडे बघत होते. "तलत साला.... धड सिग्रेटही ओढून देणार नाही" ते पुन्हा म्हणाले.
"काय झालं काय, सुहासराव?" पिंग्यांनी सुसंस्कृतपणे विचारलं. वपुंसारखं धाडकन एकेरीवर येणं त्यांना जमतही नसे आणि आवडतही नसे. शिवाय एक सुसंस्कृत रसिक लेखक ही ओळख असणं हे एक 'निश मार्केट' आहे, हेही त्यांच्या चाणाक्ष नजरेतून सुटलं नव्हतं.
"दम भर के लिये मेरी, दुनिया में चले आओ, तरसी हुई आंखो़ं को, फिर शक्ल दिखा जाओ' शिरवळकर आता गायलाबियला लागले होते. "प्रश्न असा आहे वॅप्स..." शिरवळकरांचं हे संबोधन वपुंना मुळीच आवडत नसे. पण इलाज नव्हता. 'तडजोडीच्या डिपॉझिट स्लिप्स जोडल्याशिवाय यशाचे चेक्स एन्कॅश होत नाहीत' हे उत्कट वाक्यही त्यांना अलीकडेच सुचले होते.
"तर प्रश्न असा आहे वॅप्स, की माझा नायक कोर्टात हे गाणं कसं म्हणेल?"
"कोर्टात?"
"येस, कोर्टात. पब्लीक प्रॉसिक्यूटर आहे माझा नायक. पण हळुवार हृदयाचा. त्याच्या प्रेयसीला त्याच्या सख्ख्या मित्रानं पळवलं पण ती ओली जखम लपवून दुनियादारी बघत चेहर्यावर स्मितहास्याचा मुखवटा लावणारा. आता तिच्यावर आरोप आहे तिच्या नवर्याच्या खुनाचा. आणि हा पब्लीक प्रॉसिक्यूटर. मग काय करेल हा? कोर्टात गाणं म्हणायला परवानगी असते? काय कदम?"
'क्लिक' असा आवाज आला. कदमांनी बंदूक बंद केली. एक दीर्घ श्वास घेतला आणि ते बोलायला तोंड उघडणार, तेवढ्यात 'आयायाया..." असा आवाज आला. मंडळींनी मागे वळून बघीतलं. दळवी उठून उभे राहिले होते.
"जातो, बराच वेळ झाला. चहाची वेळ झाली जवळजवळ. मंडळी थांबली असतील, माझ्यासाठी" ते जिन्याकडे जात म्हणाले. वरच्या मजल्यावरुन "दळवी, अहो दळवी... चहाला येताय ना?" अशी दणकट हाक ऐकू आली. "आलो, आलो.. आण्णा, कर्नेलराव.. आलो" दळवी घाईघाईनं म्हणाले. सशासारखे दात असलेल्या कुणीतरी खोडकरपणाने चष्म्यातून खाली बघीतले. दळवी निघाले. जिन्यात त्यांच्यापुढे कुणीतरी एक जाडजूड माणूस दुसया दोघांच्या खांद्यावर हात ठेवून वर जात होता.
"खानोलकर काय हो ते? आणि दुसरे कोण? पानवलकर?" पिंग्यांनी वपुंना विचारले.
वपु काहीच बोलले नाहीत. परफ्यूमचे शल्य अद्याप त्यांचा मनाला टोचत होते. त्यांना नवीन काही सुचतही नव्हते.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
चरचरीत !
वेगळे
पहीले पु ल दुसरे जी ए
ह ह पु वा
सहमत
कदमांना एकूण ते जरा टरकूनच
अगायायाया ... लैच बेक्कार आहे
हॅहॅहॅहॅ............
>> वपुंनी सामान्यांचे म्हणून
:-)
अर्थात
:-)
मस्त वो..
डिपॉझिट स्लिपशिवाय चेक एन्कॅश्ड
खि: खि: खि:
मस्त
जिथेतिथे
आणि पांढरे गांधीवादी सुधा.
फर्मास
:-)
:)
हा रावांचा अपमान आहे. गेला
बरं बरं
गरिबांचे दवणे - नंदन!
गरीबांचा नंदन - सहज (देत
ह ह पु वा. मस्त. उत्तम
मस्त...
उत्कटता मस्तच जमुन आलीए. दळवी
मस्तं हो..
लै भारी!
बढिया...
हॅ हॅ हॅ!!
मजा
सहमत आहे
वा
मस्त!
छान
मस्त चुरचुरीत लेख...
मस्त वाटले वाचुन
आवडले.
संध्याकाळचा चहा
जबरा
मजा आली
एकदम खमंङ फोडणीचा लेख. आवडला.
बोंबला
मस्त रे संजोपा.. मौज आली!
हा हा हा....
तलत
क्या बात है
फ र मा स