✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

हिंदू धर्म, वर्णव्यवस्था वगैरे वगैरे

अ
अप्पा जोगळेकर यांनी
गुरुवार, 07/15/2010 - 10:07  ·  लेख
लेख
प्रस्तावना - हजारो वर्षे उलटून गेली, हजारो संकटे येऊन गेली आणि असंख्य राजकीय, सामाजिक स्थित्यंतरेदेखील घडून गेली पण आमच्या हिंदू समाजाचे व्यवच्छेदक लक्षण जे की जातीव्यवस्था ते अजूनही अत्यंत चिवटपणे तग धरुन आहे. प्राप्त परिस्थितीत आमच्या आजच्या भारतीय राष्ट्रास अत्यंत हानिकारक ठरलेल्या आणि हिंदू समाजास न्यूनतः चार सहस्त्र जातींमध्ये विभागणार्‍या या व्यवस्थेच्या उगमाबद्दल, 'Origins of the caste system' या लेखामध्ये मी थोडासा ऊहापोह केला होता. यासंदर्भात आणखीन काही गोष्टी वाचनात आल्या म्हणून या लेखाचा पसारा मांडत आहे. शेषराव मोरे यांचा लेख आणि माझे काही तर्क - मोरे यांनी लिहिलेल्या ' हिंदू समाजाच्या सांस्कृतिक ऐक्याचे व राजकीय दास्याचे रहस्य' या लेखातील काही भागाचा सारांश खाली देत आहे. (ज्यांना मूळ लेख हवा असेल त्यांनी तसे कळवावे. माझ्याकडे इ-कॉपी आहे. ) ते लिहितात - "हिंदू समाज हे मोठे गूढ आहे. समोर अथांग सागर दिसतो नि हाताला मात्र पाणी लागते; तसेच या समाजाचे आहे. समोर प्रचंड हिंदू समाज दिसतो, पण त्याला हात लावला की फ्क्त 'जात' हाती लागते. पाण्याच्या अमर्याद साठ्याला जसे सागर म्हणतात तसेच अगणित जातींच्या समुदायाला हिंदू समाज म्हणतात. या जाती काय आहेत? त्यांचा हिंदू समाज कसा बनला? केव्हा बनला? याचे आम्हाला जे आकळले ते उत्तर पुढीलप्रमाणे आहे. जगातल्या इतर भागांप्रमाणेच भारतातसुद्धा मानवसमूह टोळ्याटोळ्यांनी राहात होते. बाहेरुन भारतात टोळ्याटोळ्यांनी येत होते. या प्रत्येक टोळीला स्वतःचे असे नाव होते, नीतीनियम होते, टोळीधर्म होते, प्रथा-परंपरा होत्या आणि स्वतःचे असे वेगळे देवसुद्धा होते. आपल्या टोळीतील नियम टोळीतील धुरीण ठरवत असत. टोळी हे एक प्रकारचे राष्ट्रच होते. इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा लोकांना स्वतःच्या टोळीचा अभिमान अधिक वाटत असे. याचेच पुढे जात्यभिमानात रुपांतर झाले. अर्थात या टोळ्यांच्या जाती होण्याआधी अनेक प्रक्रिया घडल्या. एका टोळीच्या अनेक कारणांनी अनेक उपटोळ्या बनत गेल्या. त्यातील काही कारणे अशी: एखाद्याने इतर टोळी सदस्याशी विवाह केला तर त्याची वेगळी टोळी बनत असे. टोळीनियम मोडल्यास तो सदस्य बहिष्कृत होऊन त्याची वेगळी टोळी बनत असे. स्थलांतर करुन काही सदस्य अन्यत्र गेल्यास त्याची वेगळी टोळी बनत असे. संघर्ष, सत्तेचे राजकारण किंवा सदस्यांनी वेगवेगळा व्यवसाय केल्यामुळेसुद्धा वेगवेगळ्या टोळ्या बनत असत. थोडक्यात, टोळीसंस्था ही जातिसंस्थेची मातृसंस्था होती. 'स्वतःचे काही वेगळे आणि सर्वांचे मिळून काही समान' असा समाज जगात इतर कुठेच निर्माण झाला नाही कारण तिथे सर्वांना एकाच सूत्रात बांधणारे, सामावून घेणारे, समान नीतिनियम आणि चालीरिती प्रदान करणारे किंबहुना जबरदस्तीने लादणारे ख्रिश्चन, मुसलमान यांसारखे धर्म निर्माण झाले. इस्लामने जुने सगळे अज्ञात काळातील समजून बाद ठरवले. 'काही जुने पाळा, काही नवे घ्या. काही दुसर्‍याचे पाळा, काही आपले घ्या' हा प्रकार इस्लामने बंद केला. आपले तेवढे सत्य, बाकी सगळेच अयोग्य व नष्ट करण्यास पात्र ठरवले. ( 'आजही मुसलमान स्वतःचे तेच खरे, इस्लामच खरा असेच मानतात. कोणी कितीही आपटली तरी सत्य कसे बदलणार? अर्थात हे माझे स्वतःचे मत आहे, मोरे यांनी लिहिलेले नाही याची नोंद घ्यावी. ) मूळचा टोळीस्वरुप मुस्लिम समाज आता विश्वमुस्लिम बंधुभाव मानू लागला. पण असे भारतात घडू शकले नाही. येथे टोळ्यांच्या संख्येएवढे धर्म होते. परिणामतः टोळीव्यवस्थेचे जातीव्यवस्थेत रुपांतर झाले. कडव्या धर्मसमाजात झाले नाही. " हे सगळेच्या सगळेच विवेचन पटण्यासारखे आहे, रुचण्यासारखे आहे. जे पटत नाही, रुचत नाही, तर्कदुष्ट वाटते त्याचादेखील सारांश पुढे देत आहे. ते का पटत नाही त्याचे कारणांसहित स्पष्टीकरण मी करेनच. पण त्यापूर्वी तो न पटणारा सारांश एकदा नजरेखालून जाणे आवश्यक आहे. तो पुढीलमाणे आहे - विस्कळीतपणे पसरलेल्या या टोळीस्वरुप समाजाला एकजीव करण्यासाठी तत्कालीन भारतीय धर्मधुरीणांनी ( यांनाच काहीजण ऋषीमुनी असेही म्हणतात असेही ते लिहितात. ) वेगवेगळे उपाय योजले. प्रत्येक टोळीचा स्वतंत्र देव होता. याचीच अतिशयोक्ती करुन पुढे म्हटले की हिंदूंचे ३३ कोटी देव आहेत. मुळात ईश्वर एकच आहे, आपण मानतो ते सगळे देव ही त्याचीच रुपे होत. म्हणून तुम्ही तुमचे स्वतंत्र टोळीदेवही माना आणि एकच ईश्वरही माना. आपल्या अनुयायांची एवढी सोय केल्यामुळे हिंदूंमध्ये धार्मिक सहिष्णुतेचा पाया घातला गेला. सांस्कृतिक ऐक्यासाठी योजलेला हा पहिला उपाय होता. वास्तवातील अनेक टोळ्यांचा वा जातींचा एक समाज बनावा म्हणून त्या धुरीणांनी चातुर्वर्ण्याचा सिद्धांत मांडला. सगळ्या जाती या एका मोठ्या समाजाचे अविभाज्य अंग आहेत हे ठसवण्यासाठी समाजपुरुषाची कल्पना पुढे आली. ब्राम्हण मुखातून, क्षत्रिय बाहूंपासून, वैश्य मांड्यांमधून आणि शूद्र पायांमधून उत्पन्न झाले हे सांगण्यामागे ते सगळे एकाच शरीराच्या अवयवांप्रमाणे आहेत असे दाखविणे हाच पुरुषसूक्ताचा उद्देश आहे. प्रत्येक टोळीचे चार वर्गांत वर्गीकरण केल्यामुळे एका टोळीतील ब्राम्हणाला दुसर्‍या टोळीतील ब्राम्हणाबद्दल एकात्म भाव निर्माण होणार होता. असाच प्रकार भाषेबाबतही करण्यात आला. भाषातज्ञ 'विश्वनाथ खैरे' यांनी हे सिद्ध केले आहे की तेंव्हाच्या प्रचलित भाषांपासून एक नवीन भाषा (संस्कृत) बनवण्यात आली आणि तीच सर्व भाषांची जननी आहे असा प्रचार करण्यात आला. 'अनेकांकडून एकाकडे' असे सूत्र येथेही अवलंबिण्यात आले. चौथा उपाय म्हणजे सर्वांकरिता श्रद्धास्थान म्हणून व्यक्तींची निवड व ग्रंथांची निर्मिती करण्यात आली. त्यांना सर्व भारतीयांचे श्रद्धास्थान बनविण्यात आले. याच गरजेतून रामायण- महाभारत, राम-कृष्ण, भागवतकथा तयार झाल्या. येथील लोकांना सांस्कृतिक दृष्ट्या एक करण्यासाठी म्हणून आमच्या पूर्वजांनी असे अनेक उपाय योजले. पण त्यांनी या देशातील लोकांना एका राजछत्राखाली आणले नाही. सर्वांची एक सामायिक व केंद्रीय राजशक्ती उभी केली नाही. बाहेरुन वेगवेगळ्या टोळ्या येत होत्या. त्यांच्याशी संघर्षही होत होते. पण त्या टोळ्यांचा आपल्यात समावेश करुन घेण्याची त्यांची पद्धती होती. 'जगा आणि जगू द्या' असे तत्त्वज्ञान त्यांना प्रिय होते. बाहेरुन आलेल्यांना आपण सहजपणे सामावून घेऊ असा त्यांना विश्वास होता. तुम्हीही जगा, आम्हीही जगू, सर्वजण एक समाज म्हणून राहू. ते दुराग्रही नव्हते, समन्वयवादी होते. वगैरे वगैरे वगैरे ........................... अंडरलाईन केलेला जो दुसरा परिच्छेद आहे त्यावर कोणतेही भाष्य करण्यापूर्वी काही गोष्टी स्पष्ट करतो. ज्याला 'Aryan migration theory' असे म्हणतात तो आर्य टोळ्यांच्या भारतावर झालेल्या आक्रमणाचा सिद्धांत अत्यंत त्रोटक स्वरुपात इतिहासाच्या क्रमिक पाठ्यपुस्तकांमधून शिकवला जातो. निदान मी शाळेत असताना तरी सातवी किंवा आठवीच्या पुस्तकातून ( नक्की कितवीच्या ते आठवत नाही ) म्हणजे सुमारे १२-१३ वर्षांपूर्वी तरी तो तसा शिकवला जात होता. माझे यासंदर्भातले जे काही तुटपुंजे अवांतर वाचन आहे तेदेखील त्याच दिशेने झालेले असल्यामुळे मी तीच 'theory' गॄहीत धरुन तर्क बांधण्याचा प्रयत्न करतो आहे. मी इतिहास संशोधक नसल्यामुळे या ''theory' चा खरेपणा मी तपासून पाहिलेला नाही. त्यामुळे किंवा इतर काही कारणांमुळे हे तर्क ऐतिहासिक पुराव्यांच्या कसोटीवर पूर्णपणे चुकीचेसुद्धा ठरु शकतील. ( पण अमुक एका पुस्तकात असे लिहिलेले आहे किंवा तमुक इतिहासकाराने असे म्हटले आहे हा काही ऐतिहासिक आधार किंवा पुरावा नव्हे हेदेखील लक्षात ठेवले पाहिजे. ) एवढे स्पष्टीकरण दिल्यानंतर 'शेषराव मोरे' यांच्यासारख्या प्रकांड पंडित आणि विद्वान माणसाने लिहिलेली काही विधाने पटण्यासारखी नाहीत असे म्हणण्याचा प्रमाद मी करु शकतो हे मी गॄहीत धरतो आहे. विस्कळीतपणे पसरलेल्या भारतीय समाजाला एकजीव करण्यासाठी धर्मधुरीण किंवा ऋषीमुनींनी विविध उपाय योजले हेच मुळात पटण्यासारखे नाही. आज भारत ही एक स्वतंत्र 'Entity' आहे म्हणून आपण सगळ्या भारतीयांमध्ये एकोपा हवा असे म्हणतो. 'महाराष्ट्र', 'हिंदू धर्म' या स्वतंत्र अस्तित्व असलेल्या 'Entities' गृहीत करुन त्याच चालीवर सगळ्या 'मराठी' माणसांमध्ये एकोपा हवा किंवा 'हिंदूंनो संघटित व्हा' अशा आरोळ्या देत असतो. त्या काळी 'हिंदू' असे नाव असलेला कोणताही विशिष्ट धर्म अस्तित्वात नव्हता असे स्वतः मोरे यांनी त्यांच्या याच लेखात लिहून ठेवले आहे. आजच्याप्रमाणे भारत असे नाव असलेला, स्वतंत्र सम्राट किंवा स्वतंत्र सरकार असलेला कोणताही देशसुद्धा त्यावेळेला अस्तित्वात नव्हता हेसुद्धा उघड आहे. ( त्यावेळेला म्हणजे इसवी सनापूर्वी २००० ते ३००० वर्षांपूर्वी. मोरे यांनी कुठेही इसवी सनाचा उल्लेख केलेला नाही. पण ज्याअर्थी त्यांनी पुरुषसूक्ताचा उल्लेख केला आहे त्यावरुन मी हा अंदाज बांधला आहे. जाणकारांनी अधिक प्रकाश टाकावा.) भौगोलिक सीमारेषा निश्चित नाहीत, एकच विशिष्ट तत्त्वज्ञान सांगणारा, लादणारा धर्म अस्तित्वात नाही अशा परिस्थितीत 'भारतीय समाज' एकजीव व्हावा असे धर्मधुरीणांना वाटण्याचे कोणतेही कारण दिसत नाही. ३३ कोटी देवांची संकल्पना आणि एकेश्वरवाद यांमधील सांधेजोड नक्कीच पटण्यासारखी आहे. पण त्यामागे भारतीयांचे 'सांस्कृतिक ऐक्य' व्हावे असा उदात्त हेतू असेल हे मात्र अजिबातच खरे वाटत वाटत नाही. हिंदू धर्मामध्ये अशा असंख्य संकल्पना अस्तित्वात आहेत. त्या सगळ्या प्रामुख्याने आध्यात्मिक संकल्पना आहेत आणि तेवढीच काय ती त्यांची मर्यादा आहे. ईश्वर अस्तित्वात नाही अशीही संकल्पना हिंदू धर्मास मान्य आहे. ईश्वराच्या अस्तित्वाचे ज्ञान आपणास नाही असे मानणारे अज्ञेयवादीही हिंदूंमध्ये आहेत. या संकल्पनांचा आणि 'सांस्कृतिक ऐक्याचा' काय संबंध आहे ? त्या संकल्पना आणखीन कोणत्या तिसर्‍याच ऐक्यासाठी आहेत ? अखिल भारतीय पातळीवर सांस्कृतिक ऐक्य व्हावे असा प्रयत्न झाला असता तर तसा एखादातरी प्रेषित किंवा धर्मगुरु ज्याने तसे प्रयत्न केले त्याचा उल्लेख आपल्या इतिहासामध्ये आला असता. जसा गौतम बुद्ध किंवा वर्धमान महावीर यांचा उल्लेख त्या त्या विचारांचे प्रेषित म्हणुन येतच असतो. मोरे यांनी ऐक्यवादी लोकांना ऋषीमुनी असे म्हणून एका फटक्यात गुंडाळून टाकलेले आहे. निदान नावानिशी उल्लेख दिले असते तर बरे झाले असते. या एकेश्वरवादाच्या संकल्पनेमुळे हिंदूंमध्ये धार्मिक सहिष्णुतेचा पाया घातला गेला असेदेखील त्यांनी म्हटले आहे. पण मग ही धार्मिक सहिष्णुता केवळ वरिष्ठवर्गीयांपुरतीच मर्यादित होती आणि अस्पृश्यांवर अन्याय करणारी होती याचे कारण काय असावे ? मुळामध्ये पुरुषसूक्ताचा उद्देश चांगला होता, समाजामध्ये एकात्मता निर्माण करण्याच्या दिशेने प्रयत्न करणारा होता, नंतर त्यामध्ये फेरफार झाले, बदल झाले, केले गेले, चुकीचा अर्थ लावला हे म्हणणे एकदा तपासून पाहिले. जर काही खरे असेलच तर ते हे की जे मुळात रचले गेले तेच बर्‍याच अंशी चुकीचे होते, अन्यायकारक होते, वरिष्ठ वर्गीयांचे वर्चस्व प्रस्थापित करणारे होते. आधी सगळे काही छान होते, उदात्त होते, आलबेल होते असे म्हणणे हा सगळा आपल्या श्रद्धाळूपणाचा, सनातनीपणाचा भाग आहे. वर्तमानामध्ये समर्थ, समृद्ध भारत घडवण्यात अपयश आलेलेच आहे. भविष्यात काही सकारात्मक घडेल अशी कोणतीही शक्यता दिसत नाही. म्हणून प्राचीन काळात जी कधी अस्तित्वातच बव्हती अशी एक 'Hypothetical perfect system' आपण गृहीत केली आहे. असे केल्याने फारतर आपल्या मनाचे समाधान होऊ शकेल. परंतु ऐतिहासिक सत्य काय आहे ते मात्र सापडू शकणार नाही. आपली विचार करण्याची दिशा चुकते कारण वर्णव्यवस्था ही एक आदर्श, कोणाचेही हक्क न मारणारी समाजव्यवस्था होती असे गृहीत धरतो. वस्तुस्थिती काहीशी अशी असली पाहिजे. आर्यांच्या ज्या टोळ्या भारतात स्थलांतर करुन आल्या ते आर्य लोक हे शेती करणारे लोक होते. आर्य या शब्दाचा अर्थच मुळी 'to till' म्हणजे शेती करणे असा आहे असे पंडित नेहरुंनी लिहून ठेवले आहे. ( 'Noble' किंवा उदात्त हा अर्थ त्याला नंतर चिकटला असेही ते म्हणतात. ) 'कृण्वन्तो विश्वमार्यम' अशी गर्जना करणार्‍या, युद्धकलेत निष्णात असणार्‍या, विजीगीषु आणि आक्रमक वृत्तीच्या ह्या लोकांना शेती करण्यासाठी जमीन हवी होती, उपभोग घेण्यासाठी स्त्रिया हव्या होत्या, दूध देणारी जनावरे हवी होती आणि प्रचंड संख्येने गुलाम हवे होते. त्या काळी म्हणजे ख्रिस्तपूर्व २००० च्या आगेमागे जेंव्हा यंत्रांचा शोध लागलेला नव्हता, खतांचा शोध लागलेला नव्हता आणि पीके घेउन निकस झालेली जमीन सकस कशी बनवावी हेदेखील ठाऊक नव्हते त्या काळात लोखंड आणि अग्नी यांच्या साहाय्याने जंगले नष्ट करणे आणि नवनवीन सुपीक जमिनींचा शोध घेणे हा उद्योग करणे त्यांना क्रमप्राप्तच होते. थोडा अंदाज यावा यासाठी 'Origins of the caste system' या लेखातील उतारा जसाच्या तसा येथे उतरवीत आहे. One of the references over the internet sheds some more light on another aspect of this discussion. It says that use of iron must have played a vital role in these regards. It says that such a connection was first established by famous Mr. D.D. Kosambi. Indo-aryans used to use iron tools in those days. They penetrated into India through north-western mountain passes & over a period of several hundreds of years they spreaded right up to the fertile and densely forested gangetic plains. Nomadic though initially they were, by the time they reached India they had learnt art of the agriculture. Fertile northern plains were waiting for getting farmed. They cut down the jungles using fire & iron axe & cultivated the land using iron ploughs ensuring them an assured food supply. This devastated forest dwellers whose resource base for living was hampered. The author says => Gadgil & Guha quote Iravati karve to the effect. “They (Brahmins) served as pioneers establishing their outposts in forests & initiating rituals which consumed large quantities of wood & animal fat. Thus, provoked native food gatherers termed demons or rakshasas would attempt to disrupt the holocaust & save their resource base in order to retain the control over their territory. Specialist warriors, Kshatriyas would then rush to the rescue of the Brahmins. ……….Dushyanta combs the forest with the help of hundreds of assistants, killing wild animals with complete abandon. It appears reasonable to conclude that the purpose of this slaughter was to destroy the resource base of hunting & gathering tribes who lived in the forest.” बाहेरुन भारतामध्ये सातत्याने टोळ्या येत राहिल्या हे तर खरेच आहे. आणि त्यांच्याशी संघर्ष होत होते हेही खरे आहे. पण या टोळ्यांना एकमेकांबद्दल सहानुभूती वाटण्याचे काही कारण नव्हते. आक्रमक आणि स्थानिक यांच्यातल्या सबंधांमध्ये 'जगा आणि जगू द्या' असे तत्त्वज्ञान कसे टिकाव धरेल ? जो वरचढ ठरला त्याने इतरांना गुलाम केले आणि स्वतःच्या पुढच्या पिढ्या मालक आणि गुलामांच्या पुढच्या पिढ्या गुलाम म्हणूनच जगतील याची सोय पाहिली. त्यासाठी सोयीस्कर असे तत्त्वज्ञान बनवले. कदाचित त्याच भावनेतून जो ज्या जातीत जन्माला आला तोच काय तो त्या जातीत राहू शकेल हे तत्त्व अस्तित्वात आले असेल. गुलामांचा, शोषितांचा हा समाज (म्हणजे जे खालच्या जातीतले मानले गेले ते लोक) आणि मालक ( म्हणजे जे स्वतःला उच्चवर्णीय समजत त्या जाती ) यांच्या अनेक पिढ्या गेल्या आणि काळाच्या ओघात या समाजाचे हिंदू धर्मात रुपांतर झाले. हे संक्रमण कसे झाले असेल ? काहीसे असे. हिंदू धर्म आणि हिंदू राष्ट्रवादाचा उदय - आज आपण जो हिंदुत्ववाद जागोजाग पाहतो त्याचा उदय इसवी सनाच्या आगेमागे दोन- चार शतकांमध्ये क्रमाक्रमाने झाला असण्याची शक्यता आहे. ख्रिस्तपूर्व दोन ते अडीच हजार वर्षांपूर्वी जेंव्हा आर्य टोळ्यांनी भारतावर आक्रमण केले तेंव्हा हा 'हिंदुत्ववाद' किंवा ज्यास 'हिंदू' धर्म म्हणतात तो अस्तित्वात नव्हता हे आधीही सांगून झाले आहे. आर्यांची वैदिक संस्कृती आणि स्थानिक रहिवाशांची द्रविड संस्कृती यांच्या संक्रमणातून या दोन हजार वर्षांमध्ये ज्यास 'हिंदुत्व' म्हणता येईल असा आराखडा तयार झाला असावा. सनपूर्व दुसर्‍या आणि तिसर्‍या शतकामध्ये अ‍ॅलेक्झांडर (ख्रिस्तपूर्व ३२६), सेल्युकस निकेटर (ख्रिस्तपूर्व ३१५), डेमेट्रियस (ख्रिस्तपूर्व २००) आणि मिनॅन्डर (ख्रिस्तपूर्व १८४) या ग्रीक आक्रमकांची आक्रमणे होऊन गेली. पण हे सगळे ज्याला 'highly cultured civilization' म्हणता येईल अशा संस्कृतीचे प्रतिनिधी होते. पण ह्यानंतर सनपूर्व पहिल्या शतकामध्ये आलेले शक, इसवी सनाच्या पहिल्या शतकामध्ये आलेले कुशाण आणि पाचव्या शतकात आलेले हूण या पशूंसारख्या माणसांची जी आक्रमणे झाली त्यांनी सगळा भारत, विशेषतः उत्तर भारत हादरुन गेला. ज्यांच्या पुरुषांप्रमाणे स्त्रिया आणि लहान मुलेसुद्धा घोड्यावर स्वार होत असत अशा या रानटी टोळ्या संख्येने प्रचंड असून त्यांना दिवस रात्रीची तमा नसे. वाटेत येतील ती ती नगरे, ग्रामे उध्वस्त करत, जाळपोळ करत संख्येने प्रचंड असलेल्या ह्या टोळधाडी शत्रूपक्षाचा पराभव झाल्यावर किंचाळत, आरडाओरडा करत, कवट्यांमधून रक्त पीत पीत ही मंडळी विजयोत्सव साजरे करीत. त्यांना विजयापेक्षा विध्वंसाचीच आवड अधिक होती असे सावरकरांनी लिहून ठेवले आहे. ( या आक्रमणांचा समग्र इतिहास ज्यांना वाचायचा असेल त्यांनी 'सहा सोनेरी पाने' हे पुस्तक अवश्य वाचावे. ) या आक्रमणांचा भारतीय मनांवर जबरदस्त परिणाम झाला असावा. आजपर्यंत त्यांनी आक्रमकांना थोपवलं होतं, ठार केलं होतं आणि शेकडो वर्षांच्या कालपटलावर अ‍ॅब्सॉर्ब सुद्धा केलं होतं. पण आता मात्र ते परकीयांबाबत खूपच आक्रमक झाले होते. किंबहुना प्रथा, परंपरा आणि ट्रेंड्ससकट सगळ्याच परकीय गोष्टींबाबत ते आक्रमक बनले होते. असे काहीतरी सिम्बॉलिक जे स्पष्टपणे भारतीयत्वाचे प्रतिनिधित्व करु शकेल आणि परकीयांविरुद्ध लढताना प्रेरणादायी ठरु शकेल अशी गोष्ट त्यावेळेपर्यंत पुरेशी विकसित झाली होती. त्यामुळे ज्यास 'हिंदुत्ववाद' किंवा 'ब्राम्हणवाद' म्हणता येईल असा एक प्रभावी राष्ट्रीय प्रवाह जो जुन्या स्मृती, श्रुती आणि वेद यांच्यातल्या ब्राम्हणी नियमांच्या आधारे पोसला गेला होता तो बदाबदा वाहू लागला. 'हिंदू' हा शब्द जो उघडपणे त्यावेळेच्या राष्ट्रीय धर्माचे प्रतिनिधित्व करत होता तो शब्द त्याला जोडल्या गेलेल्या इतिहास, परंपरा, तत्त्वज्ञान आणि संस्कॄती या घटकांमुळे खोलवर दडलेल्या प्रेरणांना आवाहन करु लागला. पण भारत किंवा आर्यावर्ताचे हिंदुस्थान होत असताना जुनी लवचिकता नष्ट होत चालली होती. टोकाचा राष्ट्रवाद एकटा आला नाही. येताना मनाचा संकुचितपणाही बरोबर घेउन आला. पण या संकुचितपणाचा फटका बसण्याआधी 'हिंदूंचे सुवर्णयुग' किंवा भारताचे सुवर्णयुग अवतरणार होते. या सगळ्या पार्श्वभूमीवर गुप्त साम्राज्याचा सूर्य उदयाला आला. वर्ष होते सन ३२०. (त्याविषयी पुन्हा केंव्हातरी) सरतेशेवटी - हिंदू धर्मातल्या वर्णव्यवस्थेवर जी टीका होत असते ती बर्‍याच अंशी रास्त असली तरीसुद्धा हेही लक्षात घेतले पाहिजे की वर्णव्यवस्थेपेक्षाही अधिक अन्यायकारक, रानटी प्रथा ख्रिश्चन आणि मुसलमानांच्या धर्मातही अस्तित्वात होत्या. त्यामुळे जेंव्हा कोणत्याही एका धर्माचे लोक स्वतःच्या जाज्वल्य, उज्ज्वल वगैरे इतिहासाचे, परंपरांचे दाखले देतात तेंव्हा त्यात बर्‍याच अंशी अभिनिवेशाचाच भाग अधिक असतो या गोष्टीची नोंद घेतली पाहिजे. ह्याचे कारण कदाचित हे आहे की धर्म ही इहलौकिक जीवनामध्ये जबरदस्त ढवळाढवळ करणारी गोष्ट आहे. त्यामुळे भूतकालीन वस्तुस्थितीकडे धार्मिक परंपरा, प्रथा यांच्या चष्म्यातून पाहिले जाते. त्याऐवजी धार्मिक परंपरा, प्रथा यांच्याकडे वस्तुस्थितीच्या चष्म्यातून पाहिले तर बरेच प्रश्न सुटू शकतील. (अशाच दृष्टिकोनातून विचार करत 'नरहर कुरुंदकर' यांनी वर्णव्यवस्था ही व्यवहारात अस्तित्वातच नव्हती फक्त पोथ्यांमध्येच अस्तित्वात होती असा दावा 'शिवरात्र' या पुस्तकात केला आहे.) विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या नव्नव्या वाटा धुंडाळून आपले आणि आपल्या भावी पिढ्यांचे आयुष्य अधिकाधिक प्रसरणशील आणि आधुनिक बनवणे हे प्रत्येक पिढीचे कार्य असते. त्याचप्रमाणे आपली पुरातन मूल्ये, संस्कॄती आणि इतिहास यांचा वस्तुनिष्ठपणे धांडोळा घेणे हेदेखील प्रत्येक पिढीचे कार्य असते. हे करत असताना वृथा अभिमानी वृत्ती किंवा न्यूनगंड या दोन्ही गोष्टी मारक ठरु शकतात. या दोन्ही गोष्टी दूर ठेवून वाचलेल्या माहितीचा स्वतंत्रपणे अर्थ लावण्याचा प्रयत्न मी माझ्या अल्पशा बुद्धीने केला आहे. त्याचा त्याच दृष्टीने विचार व्हावा.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6515 वाचन

💬 प्रतिसाद (17)

प्रतिक्रिया

हिन्दु धर्म

हरकाम्या
गुरुवार, 07/15/2010 - 12:14 नवीन
~X( हे एवढे पानभर लिहिण्याचे " कारण " काय हे कळले नाही.
  • Log in or register to post comments

(विषय दिलेला नाही)

Dipankar
गुरुवार, 07/15/2010 - 12:25 नवीन
#:S #:S
  • Log in or register to post comments

अप्पा विषय

Dhananjay Borgaonkar
गुरुवार, 07/15/2010 - 13:43 नवीन
अप्पा विषय चांगला आहे. सविस्तर प्रतिसाद नंतर देतो. धनंजय बोरगांवकर
  • Log in or register to post comments

लेख चांगला

शैलेन्द्र
गुरुवार, 07/15/2010 - 15:00 नवीन
लेख चांगला आहे.. पण काही गोष्टी गृहीत धरल्यात ज्या नसतिल तर हा लेख कोसळतो. जसे "आर्यांच्या आगमनाचे गृहीतक".. यावर अनेक वाद आहेत आणि मानववंशशास्त्रानुसार व त्यातील डी एन ए च्या अभ्यासानुसार हे गृहीतक टीकत नाही. दुसरे, तथाकथीत सुसंस्क्रुत आक्रमक भारतीय समाजात जसे मिसळले त्याहुनही आधिक भटक्या जाती, ज्यांना तुम्ही पशुंसारखी माणसे म्हणता त्या मिसळल्या(राजस्थानातील रजपुत हे त्याचे ऊदाहरण) . आर्यांबाबत तुम्ही "'कृण्वन्तो विश्वमार्यम' अशी गर्जना करणार्‍या, युद्धकलेत निष्णात असणार्‍या, विजीगीषु आणि आक्रमक वृत्तीच्या" असे वर्णन करता, परंतु शक/ कुशानांबद्दल " वाटेत येतील ती ती नगरे, ग्रामे उध्वस्त करत, जाळपोळ करत संख्येने प्रचंड असलेल्या ह्या टोळधाडी" असे म्हणता. खरंतरं कोणतीही संस्क्रुती जेंव्हा युध्दात (वारंवार) विजयी होते तेंव्हा जीत संस्कृतीपेक्षा सरस अस काहीतरी तिच्याकडे असते. संस्कृती म्हणजे फक्त कलाकुसर/प्रासाद/मंदिर नाही. उत्कृष्ट दर्जाची वाहने, शस्त्र, संचलन, शिस्त हेही समाजाचे महत्वाचे भाग आहेत आणी खरतर ज्या समजाने ते आत्मसात केले तोच काळाच्या ओघात टीकुन राहीला. वर्णव्यवस्थेबद्दल म्हणाल तर पुस्तकात लिहील्याप्रमाणे ती कधीच वापरली गेली नाही. समाजाने नेहमी सोयीनुसार ही व्यवस्था वापरली. उत्तर भारतात ती जितकी कडक होती तितकी इतरत्र नव्हती. वस्तारा चालवणारा जीवा महाला शिवरायांचा खाजगी अंगरक्षक होता, आणि शिवराय हे या बाबत अपवाद नव्हते. भारतीय समजात वर्णापेक्षा जात जास्त महत्वाची आहे, आणी जातीचे समाजातील स्थानही प्रदेशानुसार बदलते. या व्यवस्थेचा उगम कोठे/कसा झाला हे जस अज्ञात आहे तसच ही उतरंड कशी तयार झाली या बाबतही केवळ तर्क केला जावु शकतो.
  • Log in or register to post comments

जसे

अप्पा जोगळेकर
Fri, 07/16/2010 - 07:32 नवीन
जसे "आर्यांच्या आगमनाचे गृहीतक".. यावर अनेक वाद आहेत आणि मानववंशशास्त्रानुसार व त्यातील डी एन ए च्या अभ्यासानुसार हे गृहीतक टीकत नाही. या गृहीतकावर अनेक वाद आहेत हे ठाउक आहे. म्हणूनच मी लेखात तसा स्पष्ट उल्लेख केला आहे. ते गृहीतक कोसळले तर लेख कोसळेल हे बरोबर आहे. डीनए च्या अभ्यासानुसार आपले म्हणणे सिद्ध करण्यासाठी दोन्ही बाजूंच्या तज्ञांनी कंबर कसली आहे. ओरिजिन्स ऑफ द कास्ट सिस्टिम या लेखामध्ये मी आर्यन मायग्रेशन च्या बाजूने बोलणार्‍या तज्ञ मटांचा आधार‍ घेतला आहे. त्या लेखातला कास्ट जेनेटिक्स हा भाग पहा. खरंतर सगळंच कन्फ्यूजिंग आहे. हा दुवाही घ्या संदर्भासाठी. The genetics of caste भारतीय समजात वर्णापेक्षा जात जास्त महत्वाची आहे, आणी जातीचे समाजातील स्थानही प्रदेशानुसार बदलते. या व्यवस्थेचा उगम कोठे/कसा झाला हे जस अज्ञात आहे तसच ही उतरंड कशी तयार झाली या बाबतही केवळ तर्क केला जावु शकतो. +१ खरंतरं कोणतीही संस्क्रुती जेंव्हा युध्दात (वारंवार) विजयी होते तेंव्हा जीत संस्कृतीपेक्षा सरस अस काहीतरी तिच्याकडे असते. संस्कृती म्हणजे फक्त कलाकुसर/प्रासाद/मंदिर नाही. उत्कृष्ट दर्जाची वाहने, शस्त्र, संचलन, शिस्त हेही समाजाचे महत्वाचे भाग आहेत आणी खरतर ज्या समजाने ते आत्मसात केले तोच काळाच्या ओघात टीकुन राहीला. +१. म्हणूनच फक्त संख्येने अधिक असलेले हूण, शक, कुषाण शेवटी पराभून झाले असावेत तर आर्य विजयी. आर्यांचे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न मी करत नाहीये. तसा एक प्रवाह समाजात आहे हे मान्य पण मी त्यातला नाहीये. मला वाटतं सुसंस्कृत आक्रमकांना विजीगीषु म्हणतात तर असंस्कृतांना लुटारु. नुसते शब्दांचे खेळ. सगळे शेवटी लुटारुच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शैलेन्द्र

नाही नाही नाही....

मन
गुरुवार, 07/15/2010 - 15:40 नवीन
"..आर्यांच्या ज्या टोळ्या भारतात स्थलांतर करुन आल्या ते आर्य लोक हे शेती करणारे लोक होते. आर्य या शब्दाचा अर्थच मुळी 'to till' म्हणजे शेती करणे असा आहे असे पंडित नेहरुंनी लिहून ठेवले आहे. (" हे म्हंजे कै च्या कैच आहे. अहो "भटके" लोक स्थलांतर करतात. सतत फिरुन मग प्रदीर्घ कालावधीनंतर मग "नागर " संस्कृती वसते आणि स्थिर समाज वसतो. माझ्या इतिहासाच्या बुकांनी शिकिवल्याप्रमाणे आर्यांचा प्रमुख व्यवसाय "पशुपालन" हा होता.(काहिसं आजच्या बंजारा किंवा धन्गर समाजांच्या राहणीमानासारखं.) शेती ते अनार्यांकडुन शिकले(अस इतिहासाच्या पाठ्यक्रमात दिलय.) सतत गतिमान असणारा समाज शेतीप्रधान असू शकत नाही. हूण भारतात काही काळानं मिसळुन गेले. त्यांच्या वेगवान आणि तुफानी आक्रमण पद्धतीनं जवळ्जवळ सर्व (तत्कालीन ज्ञात) जगात ते पसरले. कुठुन तरी चीनच्या उत्तर भागातुन निघालेआधीह्या समाजानं बस्तान बसवलं मध्य आशियात.( किरगिझिस्तान्,तुर्कमेनिस्तान वगैरे वगैरे--strips च्या प्रदेशात). तिथुन त्यांचा एक मोठा गट पुर्वे कडे(तत्कालीन " हिंद" वर) चालुन गेला तर दुसरा पश्चिमेकडे युरोपात. आख्य्ख्या युरोपात ह्यांची भयानक दहशत बसली.(इसवी सनाचं ३रे शतक). "आटिला हूण" ह्या नेत्याच्या काळात तर ह्यांचं राज्य हंगेरी आणि आसपासच्या प्रदेशात इतकं पसरत गेलं की शेजारिल बलाढ्य रोमन सम्राट चिंतित झाले.आणि एका मोठ्ठ्या युधांनंतर रोमनांना दणका दिल्यावर हळुहळु युरोपिअन हुणांना उतरती कळा लागली. पण रोमनांना त्यांची दहशत होती ,हे नक्की. इकडे भारतात मात्र, तुलनेनं काही दशकातच त्यांची local समाजात सरमिसळ झाली.इतकी की त्यांच्या पैकी एकाचा राज्याभिषेक आपण अस्सल भारतीय "शक" म्हणुन साजरा करतो!! भारतीय शक्,कुषाण,हुण हे एतद्देशिय भारतीय बनत होते. त्यांच्यातील बलाढ्य सम्राट "विम कॅड्फिसस", पुत्र "कुजुल कॅड फिसस" हे कट्टार गणेशभक्त होते. शिवाय ह्यांच्या सततच्या हल्ल्यांनी बॅक्ट्रिया मधील ग्रीकांचं शासन खिळ्खिळं झाले.( जे भारतीय मुख्य भूभागावर राज्य करणार्‍या सम्राटांना फाय्द्यात पडलं.) पामीर पठार ओलांडुन भारतीय ( जवळ जवळ सर्वात मोठं साम्राज्य)राज्य उभारणारा सम्राट कुणी नंद्,मौर्य्,आर्य, मुघल ,राज्पुत्,मराठा किंवा शीख नव्हता.तो होता कनिष्क!(हा शक्,कुशाण ,हूण ह्यांच्या पैकी होता. नक्की कोण, ते आठवत नाहिये.)ह्याचा मंत्री/राज्वैद्य होता आद्य आयुर्वेदाचार्य "चरक" मी इतकच म्हण्तोय की मुळात या जामाती "खूंखार"(मराठी गंडलं तिच्यायला) असल्या तरी भारतात आल्यावर बर्‍याचश्या मिसळुन गेल्या आणि कित्येकांचं भारताच्या जडणघडणीत योगदानही आहे. अजुन खुप काही लिहायचय पण हलकट बॉस लिहु देत नाहिये. भूतकालीन युद्धापेक्षा वर्तमानातील deployment वर लक्ष दे अशी आर्जवं करतोय. म्हणुन तूर्तास इतकच. आपलाच, मनोबा
  • Log in or register to post comments

पामीर पठार

अप्पा जोगळेकर
Fri, 07/16/2010 - 09:18 नवीन
पामीर पठार ओलांडुन भारतीय ( जवळ जवळ सर्वात मोठं साम्राज्य)राज्य उभारणारा सम्राट कुणी नंद्,मौर्य्,आर्य, मुघल ,राज्पुत्,मराठा किंवा शीख नव्हता.तो होता कनिष्क!(हा शक्,कुशाण ,हूण ह्यांच्या पैकी होता. नक्की कोण, ते आठवत नाहिये.) कनिष्क हा युद्धखोर आणि पराक्रमी सम्राट 'कुशाण' होता. तो सन ७८ किंवा १२० मध्ये गादीवर बसला. त्याआधीचाविमा क्याड्फाईसेस हा कुशाणांचा भारतातला प्रथम सम्राट होय. कित्येकांचं भारताच्या जडणघडणीत योगदानही आहे. अंशतः सहमत. भारताच्या विध्वंसात इथे येउन कत्तली, जाळपोळी , अत्याचार करण्यातही त्यांचं मोठं योगदान आहे. पण त्या काळी जेंव्हा पुरेसे रिसोर्सेस (अन्न, पाणी यांसाठी) नव्हते तेंव्हा कदाचित लुटालूट करणं हेच नैतिक वागणं असेल. आपण सगळे भरल्या पोटी चर्चा करतो आहोत म्हणून आपल्याला त्या दृष्टिकोनातून विचार करता येत नाही. अहो "भटके" लोक स्थलांतर करतात. सतत फिरुन मग प्रदीर्घ कालावधीनंतर मग "नागर " संस्कृती वसते आणि स्थिर समाज वसतो. माझ्या इतिहासाच्या बुकांनी शिकिवल्याप्रमाणे आर्यांचा प्रमुख व्यवसाय "पशुपालन" हा होता.(काहिसं आजच्या बंजारा किंवा धन्गर समाजांच्या राहणीमानासारखं.) याबाबत पुन्हा एक्दा फेरविचार करुन पाहिला पाहिजे. तुम्ही म्हणताय ते लॉजिकल तर वाटतंच आहे. पण मी ज्या आधारे संबंधित विधान केलं आहे त्या डिस्कव्हरी ऑफ इंडिया मध्ये तरी असं स्पष्ट लिहिलेलं आहे. पण तिथे जे लिहिलं ते खरंच असेल असं गृहीत धरण्याची गरज नाही हे खरंच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन

हो...

मन
Fri, 07/16/2010 - 11:18 नवीन
भारताच्या विध्वंसात इथे येउन कत्तली, जाळपोळी , अत्याचार करण्यातही त्यांचं मोठं योगदान आहे. पण त्या काळी जेंव्हा पुरेसे रिसोर्सेस (अन्न, पाणी यांसाठी) नव्हते तेंव्हा कदाचित लुटालूट करणं हेच नैतिक वागणं असेल. आपण सगळे भरल्या पोटी चर्चा करतो आहोत म्हणून आपल्याला त्या दृष्टिकोनातून विचार करता येत नाही. कबूल. अजून एक म्हंजे हे तथाकथित "आर्य" नावाचं पब्लिक मुळी बाहेरुन आलेलच नाही भारतात असं बर्‍याच ठिकाणी (काही English लेखकांकडुन आणि मुख्यतः रा स्व च्या गोटातील खाजगी गप्पात.) ते खरं असो वा नसो, तेच खरं आहे असं जगजाहिर करणं,मानणं आणि मानायला लावणं हे भारत देशाच्या आणि सर्व नागरिकांच्या हिताचं/सोयीचं/भल्याचं आहे असं मला वाटतं.असो, तो मुद्दा वेगळा. "डिस्कवरी ऑफ ईंडिया" no comments उपधागा वाढेल. शक-कुषाण्-हूण ह्यांच्या कडुन मुख्यत्वे India-mainland/main stream शिकली ती उपयुक्त वस्त्र रचना. मुख्य वस्त्रे धोतर्-लुंगी अशी असत पूर्वी.(कमीत कमी शिवणकाम असलेली, युद्धात वापरण्यास किंचित अवघड) ह्या जमाती मात्र दुटांगी वस्त्र वापरीत.(त्या काळातील "विजारी"/प्यांट च म्हणा) युद्धात म्हणे वेगवान हालचाल करताना ह्यामुळं फार सोयीचं होइ. टोळ्यांनी बेसुमार नासधूस केली हे खरच आहे. पण वर म्हटाल्याप्रमाणं ते चूक वाटातं ते "आजच्या चष्म्यातून ". आपलाच, मनोबा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर

>>>इतकी की

Dipankar
गुरुवार, 07/15/2010 - 16:33 नवीन
>>>इतकी की त्यांच्या पैकी एकाचा राज्याभिषेक आपण अस्सल भारतीय "शक" म्हणुन साजरा करतो!! http://en.wikipedia.org/wiki/Gautamiputra_Satakarni शालीवाहनाने शकांचा पराभव केला म्हणुन "शालीवाहन शक" म्हणुन साजरा करतो!! http://en.wikipedia.org/wiki/Vikrama_Samvat विक्रमादीत्याने शकांचा पराभव केला म्हणुन "विक्रम संवत" म्हणुन साजरा करतो!!
  • Log in or register to post comments

दिप्या,

अप्पा जोगळेकर
Fri, 07/16/2010 - 07:35 नवीन
दिप्या, शालिवाहन शक आणि विक्रम संवत बाबत असंख्य उपपत्ती आहेत. पहिल्याच्या चार आणि दुसर्‍याबाबतच्या तीन यांचा उल्लेख तर 'सहा सोनेरी पाने' मधेच वाचलाय. त्यात नसलेल्या आणखी कितीतरी उपपत्ती असतील. मागे एकदा नाक्यावर आपण मजबूत वाजंत्री वाजवली होती या विषयावरुन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Dipankar

उहापोह

तिमा
गुरुवार, 07/15/2010 - 17:54 नवीन
या सगळ्या विषयाचा उहापोह करुन काय साध्य होणार आहे ?जात्यंध, ऑनर किलिंगवाले, खाप, दलितांवर अत्याचार करणारे नरपशु यांच्या डोक्यात याने प्रकाश पडणार आहे का ? संपूर्ण भारतातील लोकांचे मेंदु इरेज करुन 'रिफॉरमॅट' केले तरच फरक पडेल. हर शख्सको अपना बनाके देख लिया मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
  • Log in or register to post comments

"रिफॉरमॅट"

शैलेन्द्र
गुरुवार, 07/15/2010 - 19:43 नवीन
"रिफॉरमॅट" करुन काय रिकामे ठेवणार का? आणी जे भराल त्याने लोचे होणार नाहीत याची काय खात्री...? जे आहे ते सतत बदलवत (सुधरवत?) राहणे आणी चांगल्याची अपेक्षा करणे हेच आपल्या हातात आहे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा

संपूर्ण

आवशीचो घोव्
Mon, 07/19/2010 - 15:29 नवीन
संपूर्ण भारतातील लोकांचे मेंदु इरेज करुन 'रिफॉरमॅट' केले तरच फरक पडेल. अवांतर : वा! विवेक ओबेरॉय या महान कलाकाराचा नितांत सुंदर अभिनय असलेला "प्रिन्स" हा चित्रपट आठवला. डोळे पाणावले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा

गर्रर्रर्

३_१४ विक्षिप्त अदिती
Mon, 07/19/2010 - 15:55 नवीन
गर्रर्रर्र ... काहीही आठवू नका हो ... मलाही तो पिक्चर बघायला लागला, दुसर्‍या रो मधून! मोठ्या हौसेने मीच पुढची सीट हवी म्हटलं होतं ... बसमधे! अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आवशीचो घोव्

पुस्तकाचे नाव

आवशीचो घोव्
Mon, 07/19/2010 - 12:10 नवीन
@ आप्पा जोगळेकर शेषराव मोरेंच्या पुस्तकाचे नाव कळेल का?
  • Log in or register to post comments

@ आवशीचो

अप्पा जोगळेकर
Tue, 07/20/2010 - 08:57 नवीन
@ आवशीचो घोव् 'सावरकर दर्शन' नावाचे एक पुस्तक आहे. त्यात स्वातंत्र्यवीरांचे अनेक लेख संग्रहित केलेले आहेत. त्या पुस्तकाची प्रस्तावना म्हणजे हा लेख आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आवशीचो घोव्

अत्याचार

अशोक पतिल
Wed, 07/21/2010 - 23:47 नवीन
या सगळ्या विषयाचा उहापोह करुन काय साध्य होणार आहे ?जात्यंध, ऑनर किलिंगवाले, खाप, दलितांवर अत्याचार करणारे नरपशु यांच्या डोक्यात याने प्रकाश पडणार आहे का ? अगदी सहमत ! सध्या मी माझ्या पाल्या साठी अभियात्रिकी प्रवेशा साठी कट आफ मार्क बघतोय, ओपन केटेगरी -१२५ तर राखीव केटेगरी -५५. हि नविन वर्णव्यवस्था वाट्त ?
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा