लहानपणी मी एक कोडं ऐकलं होतं, 'पोळी का जळली? घोडा का अडला? विड्याचं पान का सडलं? या तीनही प्रश्नांचं एकच उत्तर सांगा.' तसाच अनेक प्रश्नांचं एकच उत्तर देणारा अनुभव आज मला आला. 'मराठी माणूस धंद्यात मागे का पडतो? पुस्तकांचा खप कमी का होतो? पुणेरी दुकानदाराची प्रतिमा वाईट का आहे?' हे ते प्रश्न.
अनुभव अगदी ताजा आहे. काही तासांपूर्वीचा. अमेरिकेला परत जायचे वेध लागले की पुस्तकांच्या खरेदीसाठी काही फेऱ्या होतातच. आज वैजूमावशीबरोबर पुण्यात अप्पा बळवंत चौकात गेलो. पुस्तकांची भरपूर दुकानं, पण बहुतेक सगळी टेक्स्टबुकं, अमुक कसे करावे वगैरेची, ज्योतिष, पाककृतींसारखी गृहोपयोगी दुकानं. ललित पुस्तकं विकणारी थोडीच. 'आजकाल लोक पुस्तकं फार विकत घेत नाहीत. पैसा व शिक्षण वाढूनही इंटरनेट, टीव्ही अशा माध्यमांचं वर्चस्व वाढलेलं आहे' वगैरे आम्ही बोलत होतो. पूर्वी जिथे पुस्तकं विकत घेतलेली आहेत अशा, चांगला संग्रह असलेल्या दुकानात गेलो. आधीचे अनुभव अतिशय चांगले होते. पण आज जो काही इरसाल नमुना भेटला तो पाहून हातच टेकले.
एका बोळात ते दुकान आहे. बोळात शिरताना कोपऱ्यावरच मुत्रीच्या वासामुळे नाक दाबावं लागलं. दुकान तसं बाहेरून दिसायला नीटनेटकं, अगदी लहान नाही, पण फार मोठंही नाही. काही पुस्तकं दर्शनी मांडलेली. काउंटरच्या अलिकडे आपण उभं राहायचं, पलिकडून विक्रेता आपण सांगू ती पुस्तकं त्यांच्याकडे असतील तर देणार अशी एकंदरीत योजना. मी व वैजूमावशी गेलो तेव्हा एक वयस्क, गोरेसे गृहस्थ मागच्या टेबलामागे बसले होते. तो मालक किंवा निदान मॅनेजर असावा अशी आमची कल्पना झाली.
"मी एक आठदहा दिवसांपूर्वी आलो होतो आणि काही पुस्तकं मागवली होती. ते म्हणाले.." मी म्हणालो.
"नाही, मी नव्हतो तेव्हा" माझं वाक्यसुद्धा पुरं न होऊ देता तो माणूस म्हणाला
"हो, माहिती आहे. पण जे होते त्यांनी सांगितलं..."
"नाही मला काही माहीत नाही त्याविषयी" एकंदरीत महाशयांना वाक्य तोडून बोलण्याची सवय होती. किंवा त्यांना मला काय म्हणायचंय याविषयी आंतर्ज्ञान असावं.
"त्यांनी सांगितलं की पुस्तकं आली असतील तर फोन करेन. त्यांनी फोन केला नाही म्हणून..."
"मग आली नसतील पुस्तकं." कुठची पुस्तकं, ती नसतील तर इतर हवी आहेत का, वगैरे काही नाही. पण मलाच पुस्तकं घ्यायची होती.
"अहो ऐकून तर घ्या. मला ती पुस्तकं आली असतील तर सांगा. आणि माझ्याकडे दुसरी यादी पण आहे"
"कुठची होती पुस्तकं?"
"कोलटकरांची. अरुण कोलटकरांची जेजुरी, भिजकी.."
"कोलटकरांची काही नाहीत आमच्याकडे."
"बरं मग श्याम मनोहरांचं एक पुस्तक होतं."
"श्याम मनोहर?"
"हो. कथासंग्रह आहे किंवा लेखांचा संग्रह..."
"कथा की लेख माहीत नाही?"
"नाही."
"मग प्रकाशक कोण आहे"
"नाही हो, प्रकाशक माहीत नाही."
"प्रकाशक नाही माहीत? आमचा संबंध प्रकाशकांशी येतो. प्रकाशक सांगा मी ताबडतोब सांगतो."
"अहो पण आम्ही वाचक. आमचा संबंध लेखकांशी येतो. कोणीतरी सांगतं या लेखकाचं पुस्तक चांगलं आहे..."
"नाही बहुतेक. श्याम मनोहर नाहीत."
माझ्या आधीच्या मागणीतली काहीच पुस्तकं नाहीत हे म्हटल्यावर माझी छोटीशी यादी काढली.
"आनंद यादव. त्यांचं झोंबीच्या नंतरचं पुस्तक आहे का?"
"कुठलं?"
"नाव माहीत नाही. मला त्या सीरीजमधली पुढची पुस्तकं हवी आहेत."
"अशी नाही शोधता येणार. तुम्हाला प्रकाशक माहीत आहे का?"
"त्यांचं नटरंग आहे का?" त्यांनी प्रकाशक म्हटल्यावर मी यादीतल्या पुढच्या ओळीवर गेलो.
"नटरंग?"
"हो, तो सिनेमा आहे ना नटरंग, त्याची मूळ कादंबरी."
शेवटी तो माणूस उठला. मागच्या शोकेसमधनं एक पुस्तक काढलं.
"हे. घ्या. आनंद यादवांचंच आहे. पण हीच त्या सिनेमाची मूळ कादंबरी की काय माहीत नाही."
चला, यादीपैकी एक पुस्तक तर मिळालं. म्हणून मी खुष झालो.
"झोंबीच्या सीरीजमधली काही पुस्तकं नाहीतच का?" मी पुन्हा एकदा खडा टाकून बघितला.
"अहो असं सांगून कसं सापडणार?"
"तुमच्याकडे काही कॅटेलॉग वगैरे नाही का?"
"आमच्याकडे पस्तीस हजार पुस्तकं आहेत. इतकी व्हरायटी तुम्हाला कुठे मिळणार नाही. पण पस्तीस हजार पुस्तकांचा कॅटेलॉग करायचा झाला तर तो केवढा होईल माहिती आहे का? इतका जाडा होईल." दोन हातांमध्ये सहा इंचांचं बाड असल्यासारखं दाखवत म्हणाले.
"कॉंप्युटर वगैरे वापरता येत नाही का तुम्हाला?" त्या माणसाने एक विचित्र चेहेरा करून मान हलवत खांदे उडवले. काय ही पीडा आली आहे, घ्या आता तुम्ही मला माझा धंदा शिकवा, ही नवीन थेरं माझ्या पोरांकडून चालवून घेत नाही तर तुमचं कुठून ऐकू... असे बरेच विचार त्या चेहेऱ्यावरच्या भावांतून मानेवरनं ओघळून खांद्याबरोबर उडाले.
तितक्यात एक सेल्समन आला. मी त्याला शेवटचा उपाय म्हणून म्हटलं.
"आनंद यादवांची काही इतर पुस्तकं दाखवता का?"
त्याने शांतपणे त्याच शोकेसमधून आनंद यादवांचा एक कथासंग्रह व 'नांगरणी' काढून दिलं. पहिल्याच माणसाने ती काढून द्यायला काहीच हरकत नव्हती. 'नांगरणी' च्या अर्पणपत्रिकेच्या मागच्या बाजूला
'नांगरणी' च्या आधीचे 'झोंबी' व नंतरचे 'घरभिंती' व 'काचवेल' हे खंड प्रसिद्ध झाले आहेत.
असं लिहिलं होतं. मी आनंदाने त्यांना दाखवलं आणि म्हटलं
"बघा इथे लिहिलं आहे, नांगरणीच्या आधीचे झोंबी आणि नंतरचे..."
"अहो पण झोंबी तुमच्याकडे आहे ना..." इति मालक-मॅनेजर. त्यांनी 'टाक म्हटलं की पाणी टाकायचं...' वगैरे म्हणी ऐकल्या नसाव्यात.
"ते आहे, पण मी म्हणत होतो की इथे झोंबीच्या सीरीजमधल्या पुस्तकांची यादी दिली आहे."
"पण तुम्हाला झोंबी नको होतं." आता मात्र माझा स्वतःवरचा ताबा सुटला. वैतागून मी म्हटलं
"मी तुम्हाला इथे यादी आहे हे दाखवत होतो. आणि समजा माझ्याकडे झोंबी असूनही तुम्ही दाखवलं आणि मोह पडून मी अजून एक कॉपी घेतली तर तुम्हाला वाईट वाटलं असतं का? निदान पुढच्या पुस्तकांची यादी तरी दिसली असती ना?"
पुन्हा एक निश्वास आणि टेबलावरच्या कामात लक्ष. या धंद्यातच आहे म्हणून, नाहीतर या उद्धट माणसाला एकही पुस्तक विकलं नसतं, असे यावेळी विचार असावेत.
"चला ते काचपाणी आणि घरभिंती सुद्धा द्या." सेल्समनने मुकाट्याने ती पुस्तकं आणि यादवांचंच कलेचे कातडे ही आणून दिलं.
यादीतली पुस्तकं घेऊन झाल्यावर म्हटलं तुमच्याकडे काही चांगल्या कादंबऱ्या काव्यसंग्रह वगैरे असतील तर दाखवा. पुढचा अर्धा तास सेल्समन पुस्तकांचा गठ्ठा आणून देणार मी थोडंसं चाळून पुस्तक निवडायचं असं चाललं होतं. शेवटी पाच कादंबऱ्या, दहा काव्यसंग्रह घेतले. वैजूमावशीसाठी दोन आहारविषयक पुस्तकं घेतली. सेल्समन खूपच चांगला होता. इतकी पुस्तकं घेतो आहे म्हटल्यावर त्याने "तुम्हाला आत येऊन निवडायची असतील तर बघा" असंही म्हटलं. मी म्हटलं "नको, आता बास. आणखी मोह नको." तरी त्याने एक काव्यसंग्रह आणखी पुढे आणलाच.
असे सहासात इंची दोन गठ्ठे झाले. सेल्समनने सर्व पुस्तकांची नावं व त्यांच्या किमती वाचून दाखवल्या. मालक-मॅनेजर साहेबांनी ते लिहून काढले. बेरीज केली. २१५० ची टोटल झाली.
"काय, काही डिस्काउंट वगैरे.."
"हो, ते देऊनच टोटल केली आहे." मी बघितलं १०% डिस्काउंट दिलं होतं.
पैसे द्यायची वेळ आली तेव्हा मालक-मॅनेजर सेल्समनला म्हणाले,
"किती, २१९० झाले ना?"
"नाही, २१५० झाले." सेल्समनने माझ्याकडून रिसीट घेऊन, ती तपासून म्हटलं. मा-मॅ साहेबांनी गंडवण्याचा प्रयत्न अर्थातच केला नसावा, पण त्या आकड्याच्या बाबतीतही एक छोटासा घोळ करून घेतला.
"मग पिशवी देणार का?"
"नाही, आजकाल कॅरीबॅग देता येत नाही ना..." इति मालक-मॅनेजर
"मी तुम्हाला बांधून देतो." सेल्समन
"बरं, दोन गठ्ठे ठेवा. एक मोठा करू नका." मी म्हटलं. सेल्समन आतून कागद, दोऱ्या वगैरे आणायला गेला.
"पिशव्या देत नाही का आजकाल?"
"हो आजकाल हलक्या प्लास्टिकच्या पिशव्यांवर बंदी आणली आहेत ना. किमान पन्नास ग्रॅमची असायला लागते पिशवी."
"पण साडीवाले देतात ना."
"अहो त्यांचं वेगळं असतं. साडीच्या धंद्यात तीन-तीनशे टक्के फायदा असतो. आम्हाला कुठे पाच दहा टक्के मिळतात." साडीच्या धंद्यात इतकी कॉंपिटिशन असताना तीनशे टक्के फायदा मिळतो हे मला पचायला जड गेलं.
"काय सांगता - मी दादरच्या अमुक तमुक फेमस दुकानातून पुस्तकं घेतली तर त्यांनी मला पंधरा टक्के डिस्काउंट दिलं. तुम्ही दहाच टक्के दिलं. मग फायदा पाचच टक्के कसा असेल?"
"हॅहॅहॅ... अमुक तमुक वाल्यांची गोष्ट वेगळी आहे. "
"म्हणजे"
"आणि त्यांच्याकडे आमच्याइतकी व्हरायटी नसते." गोष्ट नक्की कशी वेगळी ही धंद्यातली इतकी अंदरकी बात आहे की ती तुम्हाला सांगण्यात रस नाही, किंवा इतका खर्च करायला वेळ नाही, असं त्याला म्हणायचं असावं. काही का असेना त्याने उत्तर टाळलं हे खरं. "आम्हीच त्यांना काही पुस्तकं पुरवतो. आमच्याकडे पस्तीस हजार टायटल्स आहेत." तसं असेल तर तुमच्याकडे फक्त दहा टक्के तर त्यांच्याकडे पंधरा टक्के डिस्काउंट हे उलटं गणित कसं, असा प्रश्न पडूनही मी विचारला नाही.
"अहो काहीतरी काय सांगता - तुमच्याकडे कोलटकरांची काही पुस्तकं नाहीत. मला अमुक तमुक कडे निदान चिरीमिरी आणि द्रोण तरी सापडलं."
"ते वेगळं. ती मुंबईची प्रॉडक्ट्स आहेत."
मला हा तर्क कळला नाही, पण काहीतरी गहन असेल म्हणून मी सोडून दिलं. एव्हाना सेल्समनचं पुस्तकं बांधणं चालू झालं होतं.
"काय हो, त्या साडीवाल्यांच्या पिशव्यांची किंमत काय असते."
"पाच, सहा, सात काही आठ रुपयेही असते." पन्नास, साठ, सत्तर, ऐशी रुपये म्हटल्यासारखं त्याने म्हटलं. दोन - अडीच हजाराचा माल खरेदी करणाऱ्यालाही सहा रुपयांच्या पिशव्या देणं परवडत नसेल तर काय करणार.
बाहेर पडताना मला खरोखरच एखाद्या दुकानात, जिथे मी पैसे खर्च करायला आलो आहे अशा ठिकाणी असा अनुभव आला हे खरंच वाटत नव्हतं. हसावं की रडावं कळत नव्हतं म्हणून मी हसायचं ठरवलं. पण त्यामागे एक ठार अविश्वास होता. या माणसाने माझं बोलणं नीट ऐकून घेतलं नाही. 'लेखक माहीत असून काय उपयोग, आम्हाला प्रकाशक माहीत, तेव्हा ते सांगा' असं म्हटलं. आपल्याकडे असलेल्या संग्रहाचा अभिमान दाखवला. पण माझी सोय होण्यासाठी नवीन तंत्रज्ञान सोडाच, जुनंही वापरलं नाही. पुस्तकांचा मला लोभ निर्माण होईल अशी परिस्थिती निर्माण केली नाही. माझ्या चुका काढल्या. मी वैतागलेलो दिसल्यावर माफी मागितली नाही. स्वतः चुकीची, निदान मला चुकीची वाटतील अशी विधानं केली. आधीच पुस्तकांना ग्राहक कमी, त्यात अशी वागणूक मिळाल्यावर आणखीन काय होणार? हा अर्थातच सामान्य अनुभव नाही, नसावा. इतर दुकानांतले व इथेही आधीचे अनुभव चांगले आहेत. पण त्यामुळे माझं आजचं डोकं फिरणं कसं थांबणार?
गेल्याच वर्षी माझा मेव्हणा, अप्पा बळवंत चौकात गेला होता. लहानपणी वाचलेला फास्टर फेणेचा संपूर्ण संच आणि नंदू नवाथेचे संच व इतर बरीच पुस्तकं त्याला घ्यायची होती. पाऊण तास गाडीतून फिरून त्याला पार्किंग सापडलं नाही. एरवी पुण्याविषयी अतिशय प्रेम असलेला तोसुद्धा वैतागून म्हणाला, "मी चार हजाराची पुस्तकं घेणार होतो आज. पन्नास रुपये देऊन गाडी पार्क करायची देखील तयारी होती माझी. पण हॅट, असला अनुभव आल्यावर मी इथे पाऊलसुद्धा ठेवणार नाही."
तर त्या तीन प्रश्नांचं माझ्यासाठी, आजच्यापुरतं उत्तर आहे 'ग्राहकाविषयीची अनास्था'.
प्रतिक्रिया
च्यालेंज स्विकारावं काय? (पण ते काका वास्सकन अंगावर आले तर काय राहिल अब्रु? )धम्या, अरे तू पुणेकर ना? मग तुला कसली भीती? मन सुद्द तुझं गोस्ट हाये प्रिथिवीमोलाची तू चल रं फुडं तुला रं गड्या भीती कशाची? 'परा' बी कुनाची?
हम्म ..
पुणेकरच ते ..
काय बोलणार ..
कोल्हापुरात एक अक्षर म्हणुन दुकान आहे ..
प्रचंड मोठे .. हवे तेवढा वेळ फिरा ,पुस्तके चाळा ,वाचा ..
कोणी बोलत नाही .
उलट तुम्हालाच मदत करतात ..
एखादे पुस्तक नसेल तर तिथल्या तिथे फोन लाऊन ऑर्डर देतात.. आणि पुस्तक आल्यावर तुम्हाला फोन करतात ..
शिवाय काही ग्राहकाभिमुक योजना व कार्यक्रम आहेतच ...
त्यामुळे मी तरी तेहुनच पुस्तके खरेदी करतो ...
विनायक पाचलग
वाँट टु टॉक
पॉप्युलर, इंटरनॅशनलमधेही आरामात पुस्तके चाळू/वाचू शकता. पॉप्युलरमधली विक्रेतेमंडळी तुमच्याशी साहित्यिक चर्चाही करतात.
(मला विशेष जाण नसल्याने मी करत नाही पण इतरांशी ते जी चर्चा करतात ती विनामोबदला ऐकता येते, मधेच मत दिले तरी चालते.)
अ.ब. चौक हे पुस्तके चाळण्याचे ठिकाण नव्हे. तिथे पुस्तके चाळत/वाचत बसल्यास काही दुकानदार कानाडोळा करतात परंतु अशा वागण्यामुळे इंजिनीअरींग, मेडीकल, सेवापरीक्षेची पुस्तके विकत घेण्यास आलेल्या शेकडो विद्यार्थ्यांचा वेळ वाया जातो आणि पर्यायाने समाजाचे नुकसान होते.
खेरीज गाड्या जास्तवेळ पार्किंगमधे राहिल्याने इतर लोकांना जागा शोधत वणवण फिरावे लागते.
>>इतरांशी ते जी चर्चा करतात ती विनामोबदला ऐकता येते, मधेच मत दिले तरी चालते >> सर्वचर्चासमभाव :D
हम्म .. पुणेकरच ते .. काय बोलणार ..किती वेळा आपण निदान पुण्यात पाय तरी ठेवला आहात ? पुस्तक खरेदी दुरच राहिली :) उगा काहीही बडबड करायची का ?
कोल्हापुरात एक अक्षर म्हणुन दुकान आहे ..हो तेवढे एकच दुकान आहे, मग ? बाकी कोल्हापुरात एका दुकानदाराने मला रेनॉल्डसच्या रिफिली पार्कर कंपनी बनवते म्हणुन सांगीतले होते. असो.. लेखकाने ह्या लेखात 'पुणेरी' हा शब्द काहीसा आकसाने वापरला आहे का ? खुद्द लेखक हे भारतभ्रमण केलेल असुन त्यांनी भारताच्या कानकोपर्यातुन पुस्तके खरेदी केली असुन, वाईट अनुभव मात्र फक्त त्यांना पुण्यातच आला अशा थाटातला हा लेख वाटतो. पार्किंग आणि पुस्तक खरेदी ह्याचा बादरायण संबंध देखील जोडता न आल्याने त्याबद्दल अधिक माहिती जाणुन घ्यायला आवडेल. एकतर आपल्याकडे कायमच पार्किंगची बोंब असते हे महिती असताना कुठेही जायच्या आहे तिथे व्यवस्थीत पार्किंगची सोय कुठे आहे ? नसल्यास जवळच्या एखादे ठिकाणी वाहनतळ आहे का ? ह्याची चौकशी करुन जाणे ह्यास सुज्ञपणा म्हणतात. (आधिक माहितीसाठी :- अप्पा बळवंत चौकाच्या जवळ गेल्या २ वर्षापासून मिनर्व्हा व मंडई अशी दुमजली व तीनमजली पार्किंगची सोय चालु आहे. अगदीच गरज पडल्यास शनिवार वाड्यपाशी देखील पार्किंग होऊ शकते) आपण दुकानात येउन दुकानदारावर उपकार केल्याचा आव आणली की पुणेरी दुकानदार तुम्हाला सेकंदात आकाशातुन जमिनीवर आणतोच आणतो. पुणेरी दुकानदार ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
आपण दुकानात येउन दुकानदारावर उपकार केल्याचा आव आणली की पुणेरी दुकानदार तुम्हाला सेकंदात आकाशातुन जमिनीवर आणतोच आणतो.
+१ . म्हणूनच जशास तसे वगैरेचा प्रतिसाद दिला आहे वर.
म्हणूनच पुष्करीणीताईंना चांगला अनुभव आला असावा.
पुण्याचे पेशवे
हल्ली आम्ही कधी कधीच विडंबने करतो. हल्ली आम्ही कधी कधीच विडंबने करतो.
पाऊण तास गाडीतून फिरून त्याला पार्किंग सापडलं नाही.कायदेशीर - नारायण पेठेत भानुविलासच्या मागच्या छोट्या मैदानात चारचाकी पार्किंग आहे, तिथून अ.ब.चौ. चालत दहा मिनीटात. *दोन वर्षापूर्वी तिथे पार्किंग होतं. ते पार्किंग बंद होउन नवीन इमारत झाली असल्यास आमची जबाबदारी नाही. बेकायदेशीर- मुंजाबाचा बोळ ओस पडला असतो, तिथेपण पार्क करता येईल, पोलिसांनी जॅमर लावला तरी शंभरएक रुपयात ऐकतात.
आजून एक जागा. महात्मा फुले मंडईच्या जवळ दोन multi level parking lots आहेत. गाडी लावा तासाचे ५ रु. गाडी लावा आणि निवांत अप्पा बळवंत चौकात जा. अर्धांगाला पुस्तक खरेदीत रस नसेल तरी काळजी नाही. वाटेत तुळशी बाग आहे.
गाडी लावताना, उंबर्या गणपती चौकातून नारायण पेठेकडे येऊन, पहिल्या उजव्या बोळात (मुंजाबाच्या बोळाच्या बरोबर समोर - म्हणजे बेडेकर मिसळीकडे डावीकडे न वळता, उजवीकडे)
हमाल वाडा म्हणायचे त्याला पूर्वी.
इथे मनपाचे पार्किंग आहे. गाडी मोठी असेल तर वळवायला जरा त्रास होतो. पण तरी ठीक आहे. पुणे मराठी ग्रंथालया शेजारून चालत बाहेर पडले तर अ. ब. चौक जास्त दूर नाही.
आणि या ठिकाणी गाडी लावायला आलाच तर लगे हाथ बेडेकर मधे मिसळ खाउन यावी. पोट भरलेले असेल तर चिडचिड कमी होते :)
- पांथस्थ
माझी (शिळी) अनुदिनी: रानातला प्रकाश...
मी काढलेली छायाचित्रे - फ्लिकर
पुण्यात शनिवार पेठ पोलिस चौकी समोर साधना ट्रस्ट चे साधना मिडिया सेंटर, फोन नं २४४५९६३५ येथे उत्तम ग्रंथ दालन आहे. वर्गवारी केलेले ग्रंथांच रॅक्स आहेत. उभे राहुन पाय दुखायला लागल्यावर बसायला स्टुल्स आहेत,स्टुलवर बसुन पुस्तके चाळता येतात. प्यायला पाण्याची सोय आहे, टॉयलेट आहे. चारचाकी पार्किंग साठी जवळच नदी किनारी कायदेशीर सोय आहे. तशी पाटी पण मिडिया सेंटरच्या दाराशी आहे. दुचाकी पार्किंग तिथेच कंपाउंड मधे सोय आहे. पुस्तक सुची आहे. संगणक आहे. त्यावर आपण पाहु शकतो पुस्तके. नसलेली पुस्तक आपणासाठी आणून ठेवली जातात व फोन केला जातो. साप्ताहिक सुटी बुधवारी असते.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
फक्त तिथुन आणलेल्या सीडी तुटक्या किन्वा खराब असतात. आणि ३०० ची पुस्तक घेतली तरी २ रुपयाचा गिफ्ट पेपर देण आम्हाला परवडत नाही अस ते पुणेरी स्पश्टवक्तेपणाने सान्गतात. बाकी पॉप्युलर, इन्टरनॅशल, क्रॉसवर्ड आणि पाथफाइन्डर हे चान्गलेच.
मी शक्यतो रसिक, पाथफाईंडर आणि पाटिल एंटरप्राईझ इथेच खरेदि करतो.
रसिक कडुन दर वर्षी पुस्तके घेतो त्यांमुळे २०% सुट देतो. पाटिल वाले २०-३०% सुट देतात. पाथफाईंडर वाला कधीकधी १०% सुट देतो (हे सगळे कॅश मधे - कार्ड असेल तर थोडि कमी सुट मिळते)
पुढच्या वेळी पाटिल कडे जाउन बघा - व्हिनस आणि हिंद लॉ च्या मधल्या बोळातुन आत जायचे. दुसर्या का तिसर्या मजल्यावर आहे. दुकान वातानुकुलीत आहे. निवांत पुस्तके बघता येतात.
- पांथस्थ
माझी (शिळी) अनुदिनी: रानातला प्रकाश...
मी काढलेली छायाचित्रे - फ्लिकर
रसिक कडुन दर वर्षी पुस्तके घेतो त्यांमुळे २०% सुट देतो.
असेच म्हणतो. रसिक साहित्यवाले नियमित पुस्तके घेणार्या किंवा तसा आव आणला तरीही कस्टमरला १५-२० टक्के डिस्काऊंट देतात. मी रसिकमधे नाहितर टिळक रस्त्यावर (सारसबागेच्या जवळ) अत्रे सभागृहात जेव्हा जेव्हा पुस्तकप्रदर्शन असते ( ते बर्याच वेळा असते) तेथून खरेदी करतो.
अर्थात हे मी पुण्यात असतो तेव्हाची गोष्ट...
इतर वेळी ऑनलाईन खरेदी :) ई-रसिक.कॉम, मेहतापब्लिशिंगहाऊस.कॉम या संकेतस्थळांवर.
अलिकडेच मीमराठी संकेतस्थळावर ई-खरेदी विभाग सुरु झाला आहे. त्यात ५० रु. डिल मधे मोठी महागडी पुस्तके थोडीशी वापरलेली पण सगळी पाने असलेली स्वस्तात मिळतात. आणि खरेदीचा अनुभव पण सुंदर आहे आणि संकेतस्थळाचे व्यवस्थापक योग्य तो डिस्काऊंटही देतात. त्यामुळे यापुढची ऑनलाईन खरेदी मीमराठीवरच :)
मी मराठीवरची ५०रु वाली योजना खासच. आवडेश. ऑनलाईन खरेदीसाठी चांगला पर्याय आहे मीमराठीचा.
पुण्याचे पेशवे
हल्ली आम्ही कधी कधीच विडंबने करतो. हल्ली आम्ही कधी कधीच विडंबने करतो.
मी हल्ली मीमराठीवरुनच खरेदी करतो. योग्य सवलत, पुस्तकाची सर्व पाने नीट आहेत याची आधीच खात्री करुन मगच राजे पुस्तक पाठवतो. मस्त सेवा आहे.
--अवलिया
च्यामारि इतके चांगले अनुभव, मीमराठी ची सेवा वापरुन बघायला हवी!
- पांथस्थ
माझी (शिळी) अनुदिनी: रानातला प्रकाश...
मी काढलेली छायाचित्रे - फ्लिकर
आणि हो, राजे पुण्यातुनच पुस्तकं विकतो आणि तो मराठीच आहे.
--अवलिया
पाटील एंटरप्राईझ कुठे आलं?
रसिक च्या समोरच्या बाजुला जी इमारत आहे तिथे २र्या का ३ र्या मजल्यावर आहे. हिंद लॉ आणि व्हिनस च्या मधे जो बोळ आहे तिथुन आत जायचे उजव्या हाताला अतिशय अरुंद असा जिना आहे, तिथुन वर जायचे.
पाटिल एंटरप्राईझ माझ्या मते दुकाने, वाचनालय ह्यांना पुरवठा करतात त्यामुळे ग्राहकांना हे दुकान विशेष ठाउक नाही. दुकान छोटे आहे पण गर्दी नसते आणि दुकानाची रचना अशी आहे की सगळ्या कप्प्यांमधली पुस्तके चाळता येतात.
- पांथस्थ
माझी (शिळी) अनुदिनी: रानातला प्रकाश...
मी काढलेली छायाचित्रे - फ्लिकर
राजेशजी,
तुमच्या दुकानाच्या वर्णानुसार तुमचा अनुभव "परेश एजन्सी" या दुकानातील असावा. थोडाफार असाच अनुभव मला ४/५ दिवसांपुर्वीच ह्याच दुकानात आला. मी शाळा, इफ टुमारो कम्स(अनुवादीत), महाराष्ट्र देशा, मुखवटा, अश्या एकूण ९६० रू. किमतीच्या पुस्तकांची खरेदी केली. तेच वयस्क, गोरेसे गृहस्थ तिथे होते. सेल्समन काही दिसला नाही. शेवटि बिलाच्या वेळी त्यांना सवलत विचारली ते म्हणाले १००० वर २०% व १०० वर १०% मी म्हणालो की ९६० तर बिल झालेच आहे. निदान १५% तरी द्या. तर मला अगदी मासलेवाईक उत्तर मिळाले की दुकानात तुम्ही साखरेची दाणा मागितलात की दुकानदार तुम्हाला आख्खाच दाणा देणार ना, तो अर्धा कसा काय करणार तसेच हे.
मी मात्र गरगरलो व त्यांना म्हणालो की तुमची पुस्तके तुम्हालाच लखलाभ व तिथून निघालो. हीच पुस्तके चौकातल्याच एका दुकानात मात्र २०% ने मिळाली व त्यातले 'इफ टुमारो कम्स' हे पुस्तक मात्र त्या दुकानात उपलब्ध नसल्याने दुकानदाराने ते परेश एजन्सीतूनच आणून दिले हे मात्र विशेष.
याच परेश एजन्सी मधील एका मित्राचा अनुभव असाच आहे. अमुक अमुक पुस्तक आहे का ? त्यांनी नाही म्हणुन सांगितले "कुठे मिळेल ?" कुठेच नाही. आमच्याकडे नाही म्हण्ल्यावर कुठेच मिळणार नाही तुम्ही दुसरीकडे उकिरडे फुंकायला जाउच नका?
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
च्यामायला, परेशवाल्याबद्दलच ल्याहायचं होतं तर सरळ नाव घेऊन ल्याहायचं. उगाच सगळ्या पुणेरी दुकानदारांची बदनामी कशाला? परेशवाला म्हातारा अंमळ वे***च आहे, सगळ्या पुण्याला ठाऊक आहे. आणि परेशचं नाव घेऊन लिहिलं असतंत तरी, जो माणूस दुकानात कांप्युटर वापरत नाही, तो काय इथे वाचून तुमच्यावर अब्रूनुकसानीचा दावा ठोकेल असं वाटलं की काय?
बा.द.वे - परेशचा अजून एक अणुभव
मी यत्ता आठवीत होतो. मी आणि माझा मित्र दिलिप प्रभावळकरांची एक एकांकिका घ्यायला अप्पा बळवंतमधे गेलो. मी दुसर्या एका दुकानात आणि मित्र परेशकडे गेला. माझा मित्र विंग्रजी शाळेत शिकणारा, तो विचारायला आत गेला म्हणाला 'एक अंकी नाटक हवंय दिलिप प्रभावळकरांचं'
'असं काही नसतं. दुसरीकडे बघा' इति परेशचा म्हातारा
मित्र बाहेर येऊन म्हणाला अरे ते इकडे नाहीये म्हणतात.
मग मी आत गेलो म्हटलं 'काका तुमच्या दुकानाचं नाव ऐकून आम्ही आलो, दिलिप प्रभावळकरांची ती एकांकिका नाहीये का?'
'तुझा मित्र एक अंकी नाटक द्या म्हणाला. अशा अर्धवट माहिती असलेल्या लोकांना पुस्तकं विकायला आम्हाला वेळ नाही....'
आम्ही गार पडलो हे.वे.सां.न.ल.
'तुझा मित्र एक अंकी नाटक द्या म्हणाला. अशा अर्धवट माहिती असलेल्या लोकांना पुस्तकं विकायला आम्हाला वेळ नाही....'
=))
=))
=))
=))
=))
=))
ज-ह-ब-ह-रा-हा-ट-ह.
पुण्याच्या गर्दीत स्कूटर चालवण्याची भीती वाटते आणि ही सगळी दुकानं चालत जाण्याच्या अंतराच्या बाहेर असल्यामुळे मी पुण्यात पुस्तकं विकत घेणं टाळते. ठाण्याच्या मॅजेस्टीकचा अनुभव चांगला आहे, पण गेल्याच वेळेस श्रावण मोडकांचं 'तिढा' मिळालं नाही आणि त्या लोकांनी तोंडाला अगदी पानं पुसली नाही तरी आस्थाही दाखवली नाही. त्यांनीही मला प्रकाशक कोण विचारलं पण येवढा माजोरीपणा नाही दाखवला.
तिथे सभासदत्व घेतल्याने १५-२०% डिस्काऊंट मिळतं, पण सध्या माझं कार्ड हरवलं आहे आणि पावतीही गायब आहे.
असाच काहीसा अनुभव मला बरेचदा (पुण्यात आणि ठाण्यातही) चपलांच्या दुकानातही आला आहे. अतिशय साधी, सॉफ्ट आणि बिनाहील्सची चप्पल शोधायला पूर्वी मला फार कष्ट झाले आहेत. डिझायनर, उंच टाचांची आणि कसलंही कुशनिंग नसणारी चप्पलच कशी चांगली (म्हणजे पॉप्युलर) हे मला अनेक सेल्समननी पटवण्याचा प्रयत्न केला. शेवटी माझ्या पायाच्या आकाराचे फ्लोटर्स बाजारात दिसायला लागले आणि माझ्या पायांनी सुटकेचा निश्वास सोडला.
अदिती
ठाण्यात पुस्तक खरेदी करताना मॅजेस्टिक, श्रीराम बुक डेपो आणि अक्षरधारा,ग्रंथाली किवा तत्सम पुस्तक प्रदर्शने यातून खरेदी करते(जी बरेचदा मे महिन्याच्या सुटीत किवा दिवाळीच्या सुटीत असतात पण आपल्याला पुस्तके हवीत तेव्हा प्रदर्शन असेलच ह्याची खात्री नसते. ) , आपल्याला हवी ती पुस्तके ह्या दोन्ही दुकानात बरेचदा मिळतात आणि तेथे नसली तर मागवून देण्याची तयारीही असते.
डिस्काऊंटही १०% तर मिळतोच, क्वचित १५% सुध्दा मिळतो.
स्वाती
रसीकचा अनुभव मलाही चांगला आला आहे. कोथरुडमध्येही पौड रोडला एक दुकान सापडले आहे. घरापासून जवळच असल्यामुळे चालतही जातो. आता वैयक्तीक ओळखही झाली आहे. पण आधीचा अनुभव चांगलाच आहे. फोन सुवीधा न मागता मिळाली.
पुणेकरांना झोडपणे ही फॅशनच झाली आहे. लेखात उल्लेखिलेले अनुभव थोद्या फार फ्ररकाने सगळीकडेच येतात. पण पुणेकरांना झोडपणे सोपे किंवा सेलेबल असते. ठोका लेको !
एकंदरीत या लेखाने पुणेकरांच्या भावना दुखावलेल्या दिसतात. तसं का व्हावं हे कळलं नाही. लेखात अनेक ठिकाणी हा अनुभव या विशिष्ट दुकानाचा, त्यातील विशिष्ट व्यक्तीचा व त्या विशिष्ट वेळेचा आहे हे नमूद केलं आहे. आधी चांगला अनुभव आला हेही म्हटलं आहे. 'असे अनुभव, असे दुकानदार प्रतिमा बिघडवतात' असं म्हटलेलं आहे. हे माझं आजचं उत्तर असंही लिहिलं आहे.
@ पंगा : "बाकी आधी नको तिथे जायचे, आणि मग वाईट अनुभव आला की समस्त पुणेकरांच्या नावाने खडे फोडायचे"
कृपया लेख पुन्हा वाचावा. समस्त पुणेकरांविषयी मी काही बोललो नाही. प्रतिमा तशी का व्हावी याबद्दलचा माझा एक अनुभव आहे. इतरांनी इतर चांगले/वाईट अनुभव लिहिले आहेत.
@ रेवती : "सारख्या सारख्या तक्रारी नाही करू माणसाने!"
पटलं. पण शुद्ध तक्रार स्वरूपाचं लेखन मी "सारखं सारखं" करतो असं वाटत नाही.
@ एक : "पण असे कित्येक अनुभव कॅलिफोर्निया मधे बे-एरिया मधे सुद्धा येतात त्यावर कधी लेख नाही आले?"
लेखनाला सुरुवात केल्यापासून नाही आलेले...
@ सहज : "एक सांगतो अस्सल पुणेकराला कोणत्या दुकानात कोणाकडे, काय व किती प्रश्न विचारायचे हे बरोबर कळते.."
हे रिव्हर्स स्टेरिओटायपिंग नाही का?
असो. भावना दुखावणं हे फार धोक्याचं असल्यामुळे जर मी जाहीर क्षमा मागून फायदा होण्यासारखा असेल तर जरूर विचार करेन. मी अमेरिकेत जाईन पण मला माहिती पुरवणारे इथेच असतील ना... उगाच त्यांच्या घराची मोडतोड नको. (ह. घे. हे. दु. वे. सां. ला.)
'असे अनुभव, असे दुकानदार प्रतिमा बिघडवतात' असं म्हटलेलं आहे.चालायचेच... जोवर दुकानदार लेखणी हातात घेउन त्यांना आलेल्या तर्हेवाईक ग्राहकांचे अनुभव लिहित नाहीत तोवर एकच बाजु पुढे येत राहणार :) बाकी तुमच्या ह्या भेटी विषयी त्या दुकानदाराचे मत वाचायला मिळाले असते तर अजुन मजा आली असती ;) अवांतर :- वरच्या काही काही प्रतिक्रीया वाचुन मनमुराद हसलो. काही लोकांना सार्वजनीक वाचनालय आणि पुस्तकाचे दुकान ह्यातला फरक निट समजुन घेण्याची गरज आहे असे वाटते. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
जोवर दुकानदार लेखणी हातात घेउन त्यांना आलेल्या तर्हेवाईक ग्राहकांचे अनुभव लिहित नाहीतअहो, हे दुकानदार कॅटेलॉग देखील लिहित नाहीत!
बाकी तुमच्या ह्या भेटी विषयी त्या दुकानदाराचे मत वाचायला मिळाले असते तर अजुन मजा आली असतीजरूर. तुम्हाला इच्छा असेल तर व्यनिने दुकानाचं नाव कळवतो. त्यांची मुलाखत घेऊन या. मलाही वाचायला आवडेल.
वरच्या काही काही प्रतिक्रीया वाचुन मनमुराद हसलो. काही लोकांना सार्वजनीक वाचनालय आणि पुस्तकाचे दुकान ह्यातला फरक निट समजुन घेण्याची गरज आहे असे वाटते.फरक समजावून सांगा. आम्हीही हसू म्हणतो.
अहो, हे दुकानदार कॅटेलॉग देखील लिहित नाहीत!लिहायलाच पाहिजे असा नियम आहे का ? ;) आपण कॅटलॉग लिहिणार्या दुकानदाराकडे जावे ना.
जरूर. तुम्हाला इच्छा असेल तर व्यनिने दुकानाचं नाव कळवतो. त्यांची मुलाखत घेऊन या. मलाही वाचायला आवडेल.घरचे झाले थोडे... अहो त्यांना काम धंदे असतता, त्यातुन त्रागा करणारी गिर्हाईक सांभाळायची. कधी वेळ काढणार ते मुलाखतीसाठी? आणि तसेही पुण्याचे दुकानदार ग्राहकांविषयी तक्रार करताना मला तरी अजुन कधी दिसले नहित. एकतर ते सरळ ग्राहकाला घरगुती वागणुक देतात नहितर फाट्यावर मारुन मोकळे होतात. सगळे जागच्याजागी आणि समोरासमोर. मागाहुन तक्रार / लेख वगैरे भानगड नाही ;)
फरक समजावून सांगा. आम्हीही हसू म्हणतो.वेळ मिळाला कि लिहितो ह्यावर एक लेख :) ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
+१०००००
पराच्या प्रत्येक प्रतिक्रियेशी सहमत.
आणि माहितीये की दुकानात गेल्यावर अपमान होणारे तर तोंड वर करुन जावच कशाला?
तो दुकानदार तुमच्याकडे अक्षता घेऊन आलेला का माझ्या दुकानात या म्हणुन. त्याच दुकान.. .तो ठरवणार कोणाशी कस बोलायच ते.
आगाऊपणा निदान पुण्यात तरी खपत नाही.
आणि माहितीये की दुकानात गेल्यावर अपमान होणारे तर तोंड वर करुन जावच कशाला? तो दुकानदार तुमच्याकडे अक्षता घेऊन आलेला का माझ्या दुकानात या म्हणुन. त्याच दुकान.. .तो ठरवणार कोणाशी कस बोलायच ते. आगाऊपणा निदान पुण्यात तरी खपत नाही.आणि मग हेच विक्रेते पुस्तके खपत नाहीत म्हणून गळे काढताना आपण बघतो .. त्याबद्दल आपले काय म्हणणे आहे ?? आगाऊपणा निदान पुण्यात तरी खपत नाही या वाक्याला खोट्या अहंकाराखेरिज काहीही अर्थ नाही. दुकान आहे ते अन्नछत्र नाही माज करायला ! (जन्मापासून) पुणेकर
आणि मग हेच विक्रेते पुस्तके खपत नाहीत म्हणून गळे काढताना आपण बघतो .. त्याबद्दल आपले काय म्हणणे आहे ??
मी तरी कोणत्याच पुस्तकवाल्याला गळ काढताना बघितलेल नाही.
अप्पा बळ्वंत चौकात प्रत्येक पुस्तकवाल्याच्या दुकानात पाय ठेवायलाही जागा नसते.कायम गर्दीने भरलेली.
फक्त अप्पा बळवंत चौकच नाही तर इतर ठिकाणीसुद्धा कायम गर्दी असते. ग्रंथ प्रदर्शन तर नेहमीच चालु असतात. तिकडेही तीच परीस्थीती.
तुमच्या पहण्यात अगदी एक दोन आले असतील्..म्हणजे सगळेच गळ काढतात अस नव्हे.
आगाऊपणा निदान पुण्यात तरी खपत नाही या वाक्याला खोट्या अहंकाराखेरिज काहीही अर्थ नाही
अहंकार म्हणा वा माज म्हणा..मला काहीच फरक पडत नाही.
पण उगाच कोणीही सोम्यागोम्या यावा आणि पुणेरी लोकांवर टिप्प्णी करावी??
अप्पा बळ्वंत चौकात प्रत्येक पुस्तकवाल्याच्या दुकानात पाय ठेवायलाही जागा नसते.कायम गर्दीने भरलेली.अहो .. आधीच दुकान होते इतकेसे .. त्यात निम्मे आदल्या रस्ता रूंदीकरणात गेले मग आता दोन चार जण गेले तरी पुस्तकवाल्याच्या दुकानात पाय ठेवायलाही जागा उरत नाय .. त्यात काय कौतुक :D :D :) खरे सांगायचे तर आम्ही मुळे मुठेतले बेडूक .. आमचच तळे मोठे म्हणून गळे काढणारे :)
अहंकार म्हणा वा माज म्हणा..मला काहीच फरक पडत नाही. पण उगाच कोणीही सोम्यागोम्या यावा आणि पुणेरी लोकांवर टिप्प्णी करावी?वेल .. युक्तीयुक्तम् वचः ग्राह्यम् बालाद् अपि शुकाद् अपि | युक्तीहीनम् वचः त्याज्यम् वृद्धाद् अपि शुक्राद् अपि || थोडक्यात कोण बोलतय यापेक्षा काय बोलतेय याकडे लक्ष द्यावे नाही माणसाने? पुण्यातल्या (काही) दुकानदार हरामी असतात आपल्या बुवा आहे मान्य. उगा खोटॅ कशाला बोला ?
अहो .. आधीच दुकान होते इतकेसे .. त्यात निम्मे आदल्या रस्ता रूंदीकरणात गेले मग आता दोन चार जण गेले तरी पुस्तकवाल्याच्या दुकानात पाय ठेवायलाही जागा उरत नाय
आहो अश्या प्रतिकुल परीस्थीतीत सुद्धा आमचा पुणेरी दुकानदार मोठ्या थाटात धंदा करत असतो आणि नफा सुद्धा कमवतो.तरी सुद्धा काही लोक गळ काढतात की पुण्यात दुकानदार धंदा नीट नाही करत.
खरे सांगायचे तर आम्ही मुळे मुठेतले बेडूक .. आमचच तळे मोठे म्हणून गळे काढणारे
तुम्ही बेडुक असा वा बेडुकमासे मला काही कर्तव्य नाही.
थोडक्यात कोण बोलतय यापेक्षा काय बोलतेय याकडे लक्ष द्यावे नाही माणसाने?
अगदी बरोबर बोललात.
पुण्यातल्या (काही) दुकानदार हरामी असतात आपल्या बुवा आहे मान्य
आहो दुकानदारच काय..काही माणसं जन्मानेच हरामी असतात्..उगाच खोट कशाला बोला.
आहो अश्या प्रतिकुल परीस्थीतीत सुद्धा आमचा पुणेरी दुकानदार मोठ्या थाटात धंदा करत असतो आणि नफा सुद्धा कमवतो.तरी सुद्धा काही लोक गळ काढतात की पुण्यात दुकानदार धंदा नीट नाही करत.ते नफा कमवत नाहीत असे कोण म्हणतेय ? तुमचे वाक्य असेल ते .. गिर्हाईकांशी नीट वागत नाही हा आक्षेप आहे .. डोळे उघडा साहेब लेख पुन्हा वाचा हवे तर !!
तुम्ही बेडुक असा वा बेडुकमासे मला काही कर्तव्य नाहीहे हे हे .. टाळ्या मिळाल्या .. भले शाब्बास ! पण त्याने वास्तव बदलत नाही !
आहो दुकानदारच काय..काही माणसं जन्मानेच हरामी असतात्..उगाच खोट कशाला बोला.करेक्ट .. आणि त्यातली बरिचशी पुण्यात दुकानदार असतात .. अर्थात सर्व दुकानदार असे नव्हेत; काही सन्माननीय अपवाद याच पुनवडीत आहेत हे नक्की सांगावेसे वाटते.
श्री ए. बी. व श्री डि. बी. माझ्या पुणेकर बंधुंनो कृपया बास करा. दोघांचे मुद्दे मांडून झाले आहे आता आणखी शब्दछल नको.
चला १००व्या प्रतिसादाकडे कूच करुया
>>पण उगाच कोणीही सोम्यागोम्या यावा आणि पुणेरी लोकांवर टिप्प्णी करावी??
पुणेकरांनी खच्चून भरलेल्या संकेतस्थळावर येवून पुणेरी लोकांवर टिप्पणी करायला माझी मती भ्रष्ट झाली नाही अजून !
:)
आणि माहितीये की दुकानात गेल्यावर अपमान होणारे तर तोंड वर करुन जावच कशाला? तो दुकानदार तुमच्याकडे अक्षता घेऊन आलेला का माझ्या दुकानात या म्हणुन. त्याच दुकान.. .तो ठरवणार कोणाशी कस बोलायच ते. आगाऊपणा निदान पुण्यात तरी खपत नाहीअत्यंत सुंदर प्रतिसाद, मनापासून आवडला.
आणि माहितीये की दुकानात गेल्यावर अपमान होणारे तर तोंड वर करुन जावच कशाला? तो दुकानदार तुमच्याकडे अक्षता घेऊन आलेला का माझ्या दुकानात या म्हणुन. त्याच दुकान.. .तो ठरवणार कोणाशी कस बोलायच ते. आगाऊपणा निदान पुण्यात तरी खपत नाहीझ का स !!! आणि तसेही गळे काढणार्या लेखकांना आणि ग्राहकांना गळे काढणारेच पुस्तकवाले भेटणार म्हणा. मुळात आधी हि लोक 'कधीतरी आपली पायधुळ दुकानाला लागेल ह्या आशेन ह्या दुकानदाराने हे दुकान उघडले आहे' अशा थाटात दुकानात वागत-बोलत असतात. एकदा क्रॉसवर्ड किंवा ताजमध्ये वगैरे असे वागुन दाखवा बरे ! तिथल्या वेटरनी १५ मिनिटे लावली पाणी आणायल तरी हे 'हॅ हॅ हॅ' असे गुळमुळीत हसतील, क्रॉसवर्ड वाल्यानी ह्यांच्याकडे 'हे सुशिक्षीत आहेत ?' अशा नजरेने बघितले तरी ह्यांना धन्य वाटेल. पण हेच अप्पा बळवंत चौकात अथवा बादशाहीत घडले की हे शुरवीर लगेच 'काय राव ते पुणे आणि पुणेकर' म्हणुन बोटं मोडायला तयार. आणि पुन्हा पुढच्या खरेदीला ह्यांना पुणेच लागणार. अहो काय जबरदस्ती आहे का ? अगदी हजारोंचे हिशेब देताना, मग करा अजुन हजाराचे पेट्रोल वाया आणि जावा मुंबई-दिल्लीला खरेदीला. तुमच्यावाचुन काय पुण्याचा बाजारपेठा ओस पडणार आहेत का पुण्यावर आर्थीक संकट कोसळणार आहे ? ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
पुर्ण सहमत आहे.
--अवलिया
लय भारी.
- पांथस्थ
माझी (शिळी) अनुदिनी: रानातला प्रकाश...
मी काढलेली छायाचित्रे - फ्लिकर
+ ५००
एक नंबर परा.
मुळात आधी हि लोक 'कधीतरी आपली पायधुळ दुकानाला लागेल ह्या आशेन ह्या दुकानदाराने हे दुकान उघडले आहे' अशा थाटात दुकानात वागत-बोलत असतात. एकदा क्रॉसवर्ड किंवा ताजमध्ये वगैरे असे वागुन दाखवा बरे ! तिथल्या वेटरनी १५ मिनिटे लावली पाणी आणायल तरी हे 'हॅ हॅ हॅ' असे गुळमुळीत हसतील, क्रॉसवर्ड वाल्यानी ह्यांच्याकडे 'हे सुशिक्षीत आहेत ?' अशा नजरेने बघितले तरी ह्यांना धन्य वाटेल. पण हेच अप्पा बळवंत चौकात अथवा बादशाहीत घडले की हे शुरवीर लगेच 'काय राव ते पुणे आणि पुणेकर' म्हणुन बोटं मोडायला तयार. आणि पुन्हा पुढच्या खरेदीला ह्यांना पुणेच लागणार. अहो काय जबरदस्ती आहे का ? अगदी हजारोंचे हिशेब देताना, मग करा अजुन हजाराचे पेट्रोल वाया आणि जावा मुंबई-दिल्लीला खरेदीला. तुमच्यावाचुन काय पुण्याचा बाजारपेठा ओस पडणार आहेत का पुण्यावर आर्थीक संकट कोसळणार आहेपराशेठ, पुण्यातले "ते" दुकानदार दिल्लीमुंबईतल्या धनिक लक्ष्मीपतींशी वाईट वागताना सर्वसामान्यांशी चांगले वागले असते तर समजून घेता आले असते. दुर्दैबाने अनुभव तशे नाहीत. ग्रामीण भागातून आलेल्या (ज्यांना ते क्रासवर्ड आणि कॉफी डे माहितही नसेल) अशा लोकांना अतिशय तुच्छतेने वागवताना मी पाहिले आहे. अस्मितेच्या खोट्या दर्पाने तेही समर्थनीय होते का ?
पुण्यातले "ते" दुकानदार दिल्लीमुंबईतल्या धनिक लक्ष्मीपतींशी वाईट वागताना सर्वसामान्यांशी चांगले वागले असते तर समजून घेता आले असते. दुर्दैबाने अनुभव तशे नाहीत. ग्रामीण भागातून आलेल्या (ज्यांना ते क्रासवर्ड आणि कॉफी डे माहितही नसेल) अशा लोकांना अतिशय तुच्छतेने वागवताना मी पाहिले आहे. अस्मितेच्या खोट्या दर्पाने तेही समर्थनीय होते का ?हा अनुभव फक्त आणि फक्त पुण्यातच येतो का मालक ? नक्कीच नाही. जरा साध्या कपड्यातला, दाढी वगैरे वाढलेला माणुस आला तर साधा पानवाला देखील तो जाईपर्यंत त्यावर डोळ्याच्या कडेतुन लक्ष ठेवुन असतोच की ;) हे असे अनुभव सार्वत्रीक आहेत ! राग आहे तो 'हे फक्त पुण्यातच घडते' ह्या रडगाण्यावर. आणि तसेही काजुचा भाव विचारुन काड्यापेटी विकत घेणारा कोण हे पुणेकर दुकानदार बरोब्बर ओळखतो ;) गंमत अशी आहे की हाच अनुभव 'सातारा -सांगली- खेड' अशा भागात आला तर कोणी पुन्हा तो आठवण्याचे कष्ट सुद्धा घेणार नाही. असो.. शेवटी ज्याची त्याची जाण...समज वगैरे वगैरे... ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
धम्या