खाद्यभ्रमंती - भाग १
खाणे या विषयावर मिसळ्पाव वर एवढे काही लिहिले गेले आहे की आपल्याकडे या विषयावर काही लिहिण्यासारखे आहे असे म्हणण्याचे धाडस माझ्यात उरले नव्हते. त्यात वर पालापाचोळा खाउन जगणारा (माझ्यासारखा) माणुस खाद्यभ्रमंती वर अजुन काय लिहिणार. एखादा कायस्थ मला केवळ मासोळीचे ५० प्रकार सांगुन गप्प करायचा. पण नाही. माझे खाण्यावरचे प्रेम मला गप्प बसु देइना. अगदीच काही नाहीतरी ६-७ गावांमधील बल्लवाचार्यांबद्दल नक्की लिहु शकतो मी.
खाण्यापिण्याच्या (अभक्ष्यभक्षण न करणारा माणुस तसा पिउन पिउन पिणार तरी काय म्हणा?) बाबतित मी लहानपणापासुन तसा सुदैवी आहे. सुदैवी कारण घरचे सगळेच तसे खाद्यप्रेमाचे पुरावे पोटावर बाळगुन आहेत. आणि त्याबद्दल फारशी चिंता न करणारे (चिंता चितेसमान असते असे ऐकल्यापासुन तर अजिबात नाही). त्यात आमच्या पिताश्रींची फिरतीची बदली त्यामुळे प्रत्येक २ वर्षानी कासवाचे बिर्हाड पाठीवर टाकुन नविन गावी स्थलायन (मोहम्मदाचे पलायन शब्द बदलुन महाराष्ट्र शासनाने "स्थलायन" केले तेव्हापासुन हा शब्द च्यायला डोक्यात फिट्ट बसला आहे) केले की आम्ही त्या गावची खाद्यसंस्क्रुती अंगिकारायचो.
पहिली आणी धुसर आठवण आहे नंदुरबारची. बाकी काही आठवत नाही तिथले "पात्रा" सोडुन. एकाच हलवायाकडे तो मिळायचा पण ५० चितळे ओवाळुन टाकावेत (चितळ्यांची जाहीर माफी) इतका सुंदर असायचा तो. बाकी या पदार्थाला "पात्रा" हे नाव देणार्या लोकांची कीव येते मला. फुलपात्र म्हणल्यासारखे वाटते. पण एव्हढा सुंदर पदार्थ जन्माला घालणारया लोकाना एक खुन माफ. बास नंदुरबार म्हणले की मला एवढेच आठवते.
पात्र्यासारख्या आंबट गोड पदार्थावरुन माझी ओळख थेट मिसळीशी झाली. तेही कोल्हापुरी मिसळीशी . मान्य कोल्हापुरी ही एक चव आहे. कोल्हापुरी म्हण्जे तिखट नाही वगैरे. पण हे सगळे सदाशिव पेठेत कोल्हापुरी होटेल टाकल्यावर म्हणायला ठीक आहे. एरवी गोड कोल्हापुरी मिसळ देखील तिखट पुणेरी मिसळीपेक्षा तिखट असते. नाही म्हणायला फडतरे तशी कमी तिखट मिसळ करतात. पण फडतरेच फक्त कोल्हापुरचे प्रतिनिधित्व करतात असे वाटत असेल तर सांभळुन हो राजाभाउ. गगनबावडा, मोहन, चोरगे, खासबाग, ओपल तुमने नही खाया तो तुम्हारा जीवन व्यर्थ. सगळेच एक से बढकर एक. केवळ कोल्हापुरी मिसळीमुळे दुर्लक्षिला गेलेली दुसरी कोल्हापुरी स्पेशलिटी म्हणजे "भेळ" पुर्वी रंकाळ्यावर खुप सुंदर भेळ मिळायची. आता मंदिरजवळ राजाभाउ. रंकाळ्यावर किंवा इतरत्र आहेत ते डुप्लिकेट. इतकी सुंदर भेळ मी दुसरिकडे कठेही खाल्लि नाही. अगदी पुण्याच्या कल्पना किंवा कल्याण कडे देखील नाही. नाही म्हणायला संगमनेरचा नढे मात्र तोडीस तोड. गंगामाइच्या घाटावर जाउन प्रवरेच्या पाण्यात पाय सोडुन बसायचे आणि नंतर निवांत नढेची भेळ ओरपायची. आहाहा. तुलनाच नाही. गेले ते दिवस. आता प्रवरेच्या प्रवाहातच पाणी नसते त्यामुळे असेल कदाचित नढेची भेळ पण पुर्वीचा आनंद देउन जात नाही. (तरी ती चांगलीच). संगमनेरचा दुसरा जीभेवर रेंगाळणारा स्वाद म्हणजे जोशीचा कालाजामुन. गरम गरम कढईतुन तोंडात टाकायचा म्हणजे केवळ निखळ आनंद. आणि तिसरी कलाक्रुती म्हणजे प्रशांत आणि सुदामाची पावभाजी. पावभाजीचे याच्याहुन चांगले वर्जन मला अजुन चाखायचे आहे. अगदी इन्दोरच्या सराफ्यात किंवा ५६ दुकानात देखील याहुन चांगली पावभाजी नाही खाल्ली मी.
पण तेवढी एक गोष्ट सोडल्यास इन्दोर म्हणजे अगदी सचिन तेंडुलकर किंवा ऐश्वर्या राय. परिपुर्ण. (काळानुसार प्रमाण बदलतात बघा. १० वर्षापुर्वी विचारले असते तर माधुरी म्हणालो असतो. अजुन २ वर्षानी कदाचीत कत्रिना म्हणेन. जाउदे विषय भरकटला)
बाकी इन्दोर विषयी उद्या (म्हणजे मी उद्या पण लिहिणार. तुम्ही उद्यापण आजकाल कोणीही उठसुट उपट्सुंभ्या अर्थहीन लिहायला सुरुवात करतो असे म्हणणार. आणी मी बेशरमपणे तरीसुद्धा इतकेच वाइट लिहीत राहणार. :) )
प्रतिक्रिया
मान्य
कोल्हापुर रंकाळा + भेळ म्हणजे
प्रसादकाका
बेष्ट!!!
खरच काही
तुमच्या
बबडीशी
"नाही
लै भारी!
अरेरे नढे
कोल्हापुर
छान लेख..