बतावणी
लेखनप्रकार
स्थळ - विष्णुलोक
नारद (क्षीरसागरात प्रवेश करत) : "नारायण! नारायण! देवा, आहात का?"
विष्णू (शेषशय्ये वरुन गडबडीने उठत) - "अरे वा! आज रविवारी सकाळी सकाळी इकडे कुठे चरणस्पर्श मुनिवर?"
नारद : "समस्याच मोठी बिकट आहे बघा देवा!"
विष्णू : "समस्या? बिकट? आणि ती ही तुम्हाला? अहो तुमचा तर त्रिखंडात हिंडण्याचा उद्योग (स्वतःशीच - कळ लावत)! "
नारद (चमकून) : "काय म्हणालात?"
विष्णू :" नाही, तुम्हाला कशी आली समस्या? म्हणालो मी"
नारद : " असं असं. आता पहा, तीन रात्रींपूर्वी मला स्वप्न पडले की माझे सर्व ज्ञान मी विसरुन गेलोय अगदी आत्मज्ञानासकट! आणि दुसर्या दिवशी उठतो तर काय खरेच मला काही स्मरणच होईना! चिंतेने तीन रात्री झोप नाही!"
विष्णू : "हम्म्म्म्..वाटतोय खरा चेहरा चिंताक्रांत आणि जागरणाने ओढल्यासारखा."
नारद : "तेव्हा असं ठरवतोय की यमलोकात जाऊन यमालाच भेटेन म्हणतो. तोच देऊ शकेल ना आत्म्याचे ज्ञान?"
विष्णू : "यमलोकात? ते कशाला? आणि हातात ते जाडजूड पुस्तक कोणते आहे?"
नारद : "हो अरे खरंच हे सांगायचेच विसरलो. हे कठोपनिषद, ह्यात ते नचिकेताचे आख्यान आहे ना? त्यात वाचूनच तर मला कल्पना सुचली की आपणही असेच यमाकडे जाऊन ज्ञान का मागू नये?"
विष्णू : (मोठ्याने हसतात) "हा..हा.हा.हा...."
नारद : "काय झालं? असे हसताय का? काही चुकीचे बोललो का मी?"
विष्णू: "अहो मुनिवर चुकीचे नाही तर काय? एकदम सपशेल चुकीचे आणि निरुपयोगी!"
नारद : " देवा, आपण काय बोलता आहात आपल्याला समजते आहे का? अहो हे नचिकेताचे आख्यान आहे ह्यातून गहन आत्मज्ञानाचा मार्ग किती सोपा करुन सांगितला आहे आपल्या ऋषीमुनिंनी".
विष्णू :" थूत्..तुमच्या ते..रां**नो!!"
नारद (दचकून, हातातली पडणारी वीणा सावरत) : "देवा....देवा..अहो काय हे शिव शिव शिव..काय ही शिवराळ भाषा.."
विष्णू : "माफी असावी मुनिवर पण माझ्याचाने राहवले नाही. अहो कसले बोडक्याचे आत्मज्ञान आणि कसले काय? कुणी पाहिलाय हो आत्मा? तुम्ही पाहिलाय? नाही ना? मग काय. ते आपले मुनिवर लिहीत सुटले काहीतरी आणि तुम्ही त्यांच्या बहकाव्यात आलात म्हणजे काय! अहो साधी गोष्ट आहे, एका हातात सुरेचा प्याला असावा, समोर सुंदरशा अप्सरांचे नृत्य चालू असावे, गंधर्वांचे वीणावादन चालू असावे, आमची भाग्यलक्ष्मी आमचे चरणकमल तिच्या नाजूक करकमलांनी हलके हलके चुरुन देत असावी, समोर कल्पवृक्षाच्या पानावर क्षीरसागरातल्या लुसलुशीत कालवांचे कालवण. बस्स. अहो तेच आत्मज्ञान! बाकी दुसरं तिसरं काही नसतं! "
नारद (अचंबित होत) : "असं म्हणताय? हे तर काही मला उमगेना..सगळंच गोलगोल फिरल्यासारखं होतंय!"
विष्णू (टाळी वाजवून) : " कोण आहे रे तिकडे? अरे मुनिवरांना जरा सोमरस पाजा, आणि हो सिंगलमाल्टवालाच द्या उगीच भलतासलता नको!"
नारद : (सोमरस घेऊन तोंड पुसत) : "आहा! आत्ता कसं आल्हाददायक वाटतंय! बरं देवा मी निघतो."
विष्णू : "कुठे जायचंय"?
नारद : "आता मर्त्यलोकात एक चक्कर टाकून यावी म्हणतो."
विष्णू : " अरे वा! अहो मग चाललाच आहात तर तिथे सुध्दा आत्मज्ञान मिळेल!"
नारद : "तिथे? ते कसे बुवा?"
विष्णू : "मुनिवर आपण काळाच्या फार मागे आहात! अहो देवलोकात मिळणारे आत्मज्ञान फक्त सत्ययुगात होते. आताचे कलियुग आहे. तेव्हा सरळ ठाण्याला जा. मालवणी हॉटेलात पोहोचा. तिथे काही संतपदाला पोचलेली मंडळी सिंगलमाल्ट सोमरस घेताना दिसतील त्यांच्यासमवेत बसा, ऐसपैस गप्पा करुन समोर आलेल्या सुरमईचा यथेच्च समाचार घेत आत्मज्ञान घ्या, कसें!!"
नारद : "अरे बाप रे! माझी ऑपरेटिंग सिस्टिम एकदमच कंडम झाली म्हणायची की. इकडे विस्टा चालू आहे आणि मी आपला एम्.एस्.डॉस मधेच! अरेच्चा, आणि तो गरुड काय धरुन बसलाय ते चोचीत?"
विष्णू : "कोण तो होय? अहो मी ही परवाच भेट देऊन आलो ना ठाण्याला, तेव्हा मालवणीमधून एक अख्खी सुरमईची टोपलीच उचलून आणलीन त्याने. रोज एकेक घेऊन चघळत बसलेला असतो! आत्मज्ञानी झाल्यासारखं वाटतंय म्हणत होता!"
नारद : "छे, छे, छे. आता मला काहीच सहन होत नाहीये. जातो कसा."
चतुरंग
(डिसक्लेमर - ह्यातील घटनांशी दुसर्या कोणत्या लोकांत साम्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा!) ह्.घ्या.
वाचन
7251
प्रतिक्रिया
17