Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Profile picture for user अरुंधती
Submitted by अरुंधती on Sat, 05/01/2010 - 20:39
(खालील लेख मी बर्‍याच महिन्यांपूर्वी माझ्या ब्लॉगवर प्रकाशित केला होता. आज मिपाकरांसाठी इथे देत आहे. प्रस्तुत लेखात कोणाची खिल्ली, थट्टा उडवण्याचा मानस नसून आयुष्यातील एका अटळ सत्याकडे विनोदी चष्म्यातून बघण्याचा प्रयत्न केला आहे! :D ) आयुष्यात मला आजवर तोंडाचे बोळके असणाऱ्या माणसांविषयी कौतुक वाटत आले आहे. किती छान दिसतात ते! परंतु मला त्यांच्याकडे बघून गालातल्या गालात हसताना पाहून कोणालाही ही गोष्ट खरी वाटत नाही त्याला काय करावे? आता एखाद्या छोट्या बाळाचे बोळके निरागस हसू पाहून आपल्याही चेहऱ्यावर जसे नकळत स्मित उमटते त्याच सहजतेने कोणा म्हातारबाबांचे किंवा म्हातारबाईंचे बोळके हसू पाहिले की मलाही हसू फुटल्याशिवाय राहत नाही. कदाचित या हास्याचा संबंध बालस्मृतींशीही असण्याची दाट शक्यता आहे! आमच्या वाड्याच्या मालकीणबाई आमच्याच खालच्या जागेत राहायच्या. त्या व्यवसायाने डेंटिस्ट (दंतशल्यविशारद) होत्या. घरातच त्यांचा ऐसपैस दवाखाना होता. त्यांच्याकडे अनेक लोक कवळ्या बनवून व बसवून घ्यायला येत असत. त्यांच्याकडील पेशंट्स चेहऱ्यावरील करुण भावावरून सहज ओळखता येत असत. येताना व जातानाच्या त्यांच्या चेहऱ्यांत जमीन-अस्मानाचा फरक पडलेला असे. कदाचित म्हणूनच मी व आमच्या कुटुंबीयापैकी कोणीही त्यांच्याकडून आमचे दंतकाम करून घेण्यास कधीच धजावलो नाही. कवळ्या सोडल्या तर त्यांच्याकडे इतर पेशंट्सची फारशी गर्दी नसे. दवाखान्याच्या आतील बाजूस असलेल्या छोटेखानी जागेत त्यांचे हे कवळ्यांचे कारा(गीर)गृह थाटलेले होते. अतिशय जुनाट हत्यारांनी त्यांचे हे कवळीकाम चालत असे. इंजेक्शनच्या सिरींजला दोरा बांधून वगैरे काम करण्यात त्यांची हातोटी! कवळ्या बनवायचे त्यांचे साचे, त्याची हत्यारे त्या जीवापाड जपत. अनेकदा मी व मालकीणबाईंचा माझ्याच वयाचा नातू दवाखान्यावरील पोटमाळ्यात लपून भयचकित व उत्कंठित नजरांनी ह्या कवळ्या आकाराला येताना पाहत असू. नंतर मोठ्यांची नजर चुकवून त्या कवळ्या व त्यांचे साचे हळूच हाताळत असू. वरच्या व खालच्या जबड्याच्या कवळ्या एकमेकांवर आपटण्याचा आविर्भाव करत त्या कवळ्याच जणू आपापसात बोलत आहेत अशा थाटात घशातून वेगवेगळे आवाज काढण्यात आणि एकमेकांना घाबरवण्यात आम्हाला फार मजा वाटे. B) मालकीणबाईंच्या यजमानांनाही वयोपरत्वे कवळी बसवली होती. तोंड धुताना त्यांनी कवळी काढून बाजूला ठेवली की ती कवळी लंपास करून धावत सुटायचे हा आमचा लाडका उद्योग होता. मग नंतर दोन-चार धपाटे खाल्ले की ती कवळी परत केली जायची. मालकीणबाईंचे यजमान आपली कवळी काचेच्या पेल्यात घालून विसळायचे. प्रत्येक खाण्याजेवणानंतर त्यांना बेसिनवर उभे राहून भांडी घासल्यासारखी त्यांची कवळी घासताना पाहून आमच्या बालमनांमध्ये उगाचच करुणा दाटून यायची. :) दर रविवारी त्यांच्याकडे त्यांचा समवयस्क मित्रमैत्रिणींचा रमीचा नाहीतर ब्रिजचा अड्डा जमायचा. करड्या-पांढऱ्या केसांचे बॉब्ज केलेल्या, स्लीव्हलेस ब्लाऊज घातलेल्या, ओठांना लिपस्टिक फासलेल्या मालकीणबाईंच्या मैत्रिणींना खाण्या-पिण्याची राउंड झाल्यावर हळूच बेसिनवर आपली कवळी काढून साफ करताना, अडकलेली कोथिंबीर किंवा तत्सम अन्नकण तल्लीनतेने कुरतडताना पाहून आम्हा बालकांना हसू न आले तरच नवल! =)) त्यामुळे कवळी व बोळके यांचे दर्शन झाले की आजही माझ्या चेहऱ्यावर स्मितरेषा उमटते. मध्यंतरी माझे वडील व दोन्ही काका (सर्वांची वये साठच्या पुढे) एका कार्याच्या निमित्ताने एके गावी गेले होते. तेथील लोकांनी त्यांना हौसेने खाऊ म्हणून बॉम्बे हलवा दिला. आता ज्यांनी हा हलवा खाल्ला किंवा पाहिला आहे त्यांना कल्पना असेल की तो किती चिकट व चिवट असतो ते! परतीच्या प्रवासात अपरात्री भूक लागली म्हणून त्यांनी हा हलवा खायला घेतला अन... काकांची कवळीच हलव्यात रुतून बसली व ती निघता निघेना! इतर दोन्ही बंधू भावाला साहाय्य करण्याचे सोडून खदखदा हसत भावाची फजिती पाहत बसले. मग वडिलांनी हलवा खायला घेतला. त्यांची अपेक्षा की आपल्या तोंडात एकच दात शिल्लक असल्यामुळे हा हलवा आपल्याला त्रास देणार नाही. परंतु त्यांची ही आशा अतिशय फोल ठरली. त्या हलव्याने त्यांच्या एकुलत्या एक दाताला व हिरड्यांना असे काही घोर आलिंगन दिले की ते रात्रभर कळवळत होते. दुसऱ्या काकांनी सुज्ञतेने हलवा न खाता भुकेले राहणे पसंत केले. :D हा किस्सा मी मोठ्या चवीने हसत हसत चुलतभावाला ऐकवत होते तर तो म्हणाला, काळजी करू नकोस! त्याचे बाबा (माझे काका) काशी-प्रयागाला गेले होते तेव्हा त्यांनी गंगेत डुबकी लगावली आणि त्यांची कवळीच गंगेच्या प्रवाहात वाहून जायला लागली!! ('हर हर गंगे' म्हणताना त्यांचे तोंड त्यांनी जरा जास्तच उघडले असावे! ) आणि कवळीच्या मागे ते 'माझी कवळी, माझी कवळी' करत जाऊ लागले, आणि त्यांच्याबरोबरचे त्यांचे दोस्त आपला मित्र असा कोठे चालला म्हणून त्यांना सावरायला त्यांच्या मागे मागे!!! कोणालाच नक्की काय गोंधळ चाललाय ते लक्षात येईना! शेवटी कसेबसे गंगेच्या वेगवान प्रवाहाच्या दिशेने कवळीच्या मागे जाणाऱ्या माझ्या काकांना लोकांनी आवरले व त्यांना त्यांच्या कवळीसकट काठावर आणून सोडले. :$ एक दिवस माझी थोरली मावशी आमच्याकडे आली. आईने तिला काहीतरी खाण्याचा खूप आग्रह केला. पण ही आपली काहीच खायला तयार होईना. फार बोलत पण नव्हती. खूप खोदून विचारल्यावर तिने हळूच सांगितले, अगं, आज कवळी घरीच विसरले! ती घाईघाईत कवळी घालायचे विसरून आली होती. ;;) अशीच एकदा प्रवासाला गेले असताना सोबत एक वृद्ध बाई होत्या. सकाळी त्या तोंड वगैरे धुवून आल्या व त्यांच्या हँडबॅगेत काहीतरी धुंडाळू लागल्या. त्या शोधत असलेली वस्तू त्यांना काही केल्या सापडेना. अगदी हैराण झाल्या होत्या. न राहवून मी त्यांना मदत करू का, म्हणून विचारले. तशी त्यांनी त्यांची हॅंडबॅगच माझ्या पुढ्यात ठेवली व लाल रंगाची नक्षीकामाची डबी त्यातून धुंडाळायला सांगितले. आतील सामानाची बरीच उलथापालथ केल्यावर मला एकदा का ती डबी सापडली. वाटले, काहीतरी दागिना असेल म्हणून त्या एवढ्या कासावीसपणे शोधत असतील. पण छे! आत त्यांची आदल्या रात्री काढून ठेवलेली कवळी होती!! :P परवा सकाळी न्याहारी करताना अचानक आईचा समोरचा दात तिच्या हातात आला. गेल्या वर्षभरात अनेक दातांनी तिचा निरोप घेतला आहे. आता समोरचा, दर्शनी भागातील दात असा दगाबाजाप्रमाणे कोणतीही पूर्वकल्पना न देता गारद व्हावा म्हटल्यावर ती दुःखी झाली. तिच्या गेलेल्या दाताचा ती असा शोक करीत असताना मला मात्र तिच्या मुखाच्या दर्शनी भागातील खिंडार पाहून कमालीचे हसू येत होते. शेवटी ते दाबलेले हसू बाहेर पडलेच! एकदा का मी हसू लागले आणि ते आवरताच येईना! त्याच दिवशी दुपारी माझ्या दाढेचा एक तुकडा अलगद हातात आला. आईने माझ्याकडे फक्त विजयी मुद्रेने पाहिले. मलाही आता कल्पनेत माझी बोळकी मूर्ती दिसू लागली होती!! =(( -- अरुंधती http://iravatik.blogspot.com/
  • Log in or register to post comments
  • 3651 views

प्रतिक्रिया

Submitted by मी-सौरभ on Sun, 05/02/2010 - 01:04

Permalink

:)

छान आहे कवळीकथन...... ----- सौरभ :)
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती२ on Sun, 05/02/2010 - 01:55

Permalink

मजा आली

मजा आली वाचायला.
  • Log in or register to post comments

Submitted by शुचि on Sun, 05/02/2010 - 05:14

Permalink

हा हा मजा

हा हा मजा आली. गंगेचा किस्सा तर भारीच :) ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ विश्वच अवघे ओठा लावून, कुब्जा प्याली तो मुरलीरव डोळ्यांमधुनी थेंब सुखाचे, हे माझ्यास्तव..हे माझ्यास्तव
  • Log in or register to post comments

Submitted by तिमा on Sun, 05/02/2010 - 07:56

Permalink

वदनी

वदनी कवळी घेता नाम घ्या ........चे तोंडात कवळी बसवताना सुध्दा कोणी वास्तुशास्त्राचा आधार घेते का हो? हर शख्सको अपना बनाके देख लिया मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
  • Log in or register to post comments

Submitted by प्रमोद देव on Sun, 05/02/2010 - 08:34

Permalink

कवळीवरून एक विनोद आठवला.

एक वयोवृद्ध कवी एका कवीसंमेलनात कविता वाचनासाठी उभे राहिले. वाचनासाठी त्यांनी त्यांचे तोंड उघडले आणि तात्काळ त्यांची कवळी निसटली...म्हणून त्यांनी ती नीट केली आणि घसा खाकरून पुन्हा तोंड उघडले....पुन्हा तेच....असे तीनचार वेळा झाले...तेव्हा समोरचा एक श्रोता त्यांना म्हणाला...अहो कविराज,काय कविता म्हणायची ती एकदाची म्हणा ना...नुसत्याच कॅसेट्स काय बदलताय? :D
  • Log in or register to post comments

Submitted by II विकास II on Sun, 05/02/2010 - 08:45

Permalink

अगदी ह. ह.

अगदी ह. ह. पु. वा. झाले आहे. लिहीत रहा. ----- ज्या दिवशी शिवजयंती साजरी न होता, शिवचरित्र साजरे होईल तो दिवस म्हणजे महाराष्ट्राचा पुनर्जन्माचा दिवस असेन.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रकाश घाटपांडे on Sun, 05/02/2010 - 08:58

Permalink

आमचा बी

एकदा का मी हसू लागले आणि ते आवरताच येईना! त्याच दिवशी दुपारी माझ्या दाढेचा एक तुकडा अलगद हातात आला.
आमचा बी हॅहॅहॅ करतानी धपकन दाताचा टवका फरशीवर उडाला व्हता. आपल्या दाढे दाक्तर क जाउन शिमिट लावल मंग.ल्वॉक (मनात) म्हनाली लईच हॅहॅहॅ करतोय म्हनुन अस झाल. आसच पाहिजे. प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

Submitted by झकासराव on Sun, 05/02/2010 - 11:40

Permalink

(विषय दिलेला नाही)

=))
  • Log in or register to post comments
Profile picture for user अरुंधती

Submitted by अरुंधती on Sun, 05/02/2010 - 20:27

Permalink

सर्वांचे

सर्वांचे प्रतिसादाबद्दल धन्स! :-) अरुंधती http://iravatik.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by समंजस on Mon, 05/03/2010 - 14:02

Permalink

वा

वा......ह. ह. पु. वा. :D
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com