मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पार्टी रे पार्टी

सन्जोप राव · · पाककृती
माणूस अगदी विवाहित, कुटुंबवत्सल वगैरे असला म्हणून काय झाले, कधीतरी तो कनवाळू, दयाळू वगैरे जगन्नियंता त्यावर प्रसन्न होतो. कधीतरी अती होते आणि 'साल्यो, काही लाजाबिजा आहेत की नाही? किती दिवस झाले एकत्र बसून. तुमच्या साल्यांच्या रविवार -गुरुवारच्या सुट्ट्या, पोरांच्या परीक्षा आणि बायकांच्या कटकटीतून सवड अशी कधी मिळणार? असं ठरवून काही बसायला मिळणार नाही. बसायचं का आजचं? कुणाचं घर रिकामं आहे? तुझं? मग ठरलं तर! दोन तीन पेग हाणू, हा ठोंब्या चिकन करेल. व्हिस्कीचं माझ्याकडं लागलं. सोडापण आणतो मी. शिग्रेटी आपापल्या. साडेसातला बसायचं, अकरा वाजता आपापल्या घरी. पुढे ज्याच्या त्याच्या वकूबानुसार. हाये का तयारी?' असं म्हणून पुढाकार घेणारा कुणी मर्द निघतो. हो-नाही म्हणत शेवटी बरेच तयार होतात. 'स्टॅग पार्टी' ची आठवण व्हावी अशी एखादी पार्टी चक्क आठवड्याच्या मध्यावर घडते. तीनाचे चार होतात, भरपूर नॉनव्हेज विनोदांची देवाणघेवाण होते, 'ये कैसी अजब दासतां हो गयी है' , 'मुहब्बत तर्क की मैने' किंवा ' कुछ और जमाना कहता है' असल्या अनवट गाण्यांवर नव्या सिग्रेटी पेटवल्या जातात. काहीजण काही जुन्या आठवणींनी माफक गहिवरतातही. 'अरे, परवा दिल्ली एअरपोर्टवर ती तुझी ही दिसली होती. काय सुटलीय बाप रे!' 'हं आपण बोलू नये राजर्षी, आपण जिच्यासाठी बायोकेमिस्ट्रीचा पेपर बुडवायला निघाला होतात, तिचं काय माकड झालंय ते बघा एकदा...' असले भेदक संवादही घडतात. दुसर्‍या दिवशी मंडळी माफक हँगओव्हर एखादं पदक मिरवावं तसा मिरवत हापिसात जातात. किंचित दुखणारं डोकं दाबत 'मजा आली राव...' चे फोन होतात. अशा ऐनवेळेच्या स्त्रीवर्गविरहित पार्टीचा हा मेनू: साहित्य आणि कृती: (सगळेच पदार्थ अदमासे. 'झणझणीतपणा' हा एकमेव हेतू डोळ्यांसमोर ठेवून पदार्थांची रचना केलेली आहे. यात मनाला येईल तसे बदल करण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य वाचकांना आहे.) चिकन मॅरिनेट करुन घेणे अत्यावश्यक. चिकन शक्यतो रियल गुडचे असावे. दही अमूलचे. आले लसूण पेस्ट कुठलीही. थोडे मीठ, थोडी हळद. बास. चार तास तरी मॅरिनेट करावे. . एकीकडे अंडी उकडायला ठेवावीत . कांदा-टोमॅटो बारीक कापून घ्यावेत. ते कापणे गणपाइतके प्रोफेशनल झाले नाही तरी काही बिघडत नाही आणि टोमॅटोचा रस कांद्यात शिरला तर अजिबात न्यूनगंड वगैरे वाटू देऊ नये. . खडा मसाला म्हणजे काय हे आता आपल्याला माहिती आहेच. ऐनवेळी त्यातले काही विसरु नये म्हणून तो एकत्र करुन घ्यावा . दरम्यान मंडळी येतात. 'मी काय करु?' असे विचारणार्‍याना 'पेग भर' असे उत्तर द्यावे. ते सांगण्याची गरज नसतेच! ही पायरी अर्थातच ऐच्छिक आहे! . प्रेशर कुकरमध्ये चार मोठे चमचे तूप घ्यावे. अजिबात घाबरु नये. 'सी एच ओ एल ई एस टी ई आर ओ एल' अशा स्पेलिंगचा कोणताही शब्द जगात नाही. कांदा, बारीक चिरलेली हिरवी मिरची, थोडीशी आले लसूण पेस्ट, थोडा चिकन करी मसाला (हा बाजारात मिळतो. हापिसातून घरी येताना आणायला विसरु नये. स्वतः आणावा, इतरांना सांगू नये. मंडळी विसरतात, आणि त्यावरुन शिविगाळ होते!) आणि लाल तिखट हे सगळे चांगले परतून घ्यावे. खमंग वास सुटला पाहिजे. आता त्यात मॅरिनेट केलेले चिकन घालावे. चांगले हलवून घ्यावे. चिकन थोडेसे परतले की त्यात चिरलेला टोमॅटो घालावा. परत हलवून घ्यावे. आवश्यक तितके पाणी आणि मीठ घालावे. कुकरचे झाकण लावावे आणि मंद आचेवर वीस मिनिटे शिजवावे. . अंडी सोलून घ्यावीत, कोथिंबीर बारीक चिरुन घ्यावी आणि दहीकांदा करावा. पोळ्या ज्याला सांगितलेल्या असतात त्याने आणलेल्या असतातच. (त्या शक्यतो कुणी विसरत नाही!). हवा असेल तर भात टाकावा. थोडे अधिक कौतुक हवे असेल तर खिचडीही. . झालं. आता पुढच्या प्रकाराचं वर्णन करण्यात काही अर्थ नाही. पावणेबारा वाजत आले की ( या उशीराला 'अकरा म्हणजे अकराला निघायचं हां. आपल्याला उद्या ऑफिस आहे साल्यानो ..' असं सतरा वेळा म्हणणाराच प्रामुख्याने कारणीभूत असतो. त्याला एस.वाय. ला फिजिक्स लॅबच्या मागं झालेलं काहीतरी आठवत असतं आणि तो ते बर्‍याच विस्तारानं सांगत बसलेला असतो!) 'बंभोले..' म्हणून आपापले ग्लास संपवावेत आणि आपापली पानं वाढून घ्यावीत... .

वाचन 21071 प्रतिक्रिया 28