मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अजून एक क्रियाशील आदर्श

विकास · · जनातलं, मनातलं
हे पार्सी बाबा भारताच्या किनार्‍यावर गुजराथच्या बाजूने नक्की कधी आले ते माहीत नाही, पण त्यावेळची एक कथा आत्ता एकदम आठवली. ते त्या भागातील राजाकडे गेले आणि स्वतःच्या देशातील अत्याचारांमुळे विस्थापित झालो आहोत तेंव्हा आम्हाला येथे आश्रय मिळूंदेत म्हणून विनंती केली. राजा काहीच बोलला नाही, फक्त त्याने दुधाने काठोकाठ भरलेला पेला दाखवला. उद्देश हा की आम्ही येथे परिपूर्ण आहोत असे काहीसे दाखवणे. पण त्या समुहाचा म्होरक्या पार्सीबाबा पण हुषार - त्याने त्या दुधात तसेच न बोलता साखर घातली. अर्थात त्याने सांगितले, की आम्ही या काठोकाठ दुधाने भरलेल्या पेल्यात जशी साखर विरघळली तसेच एकरूप होऊन राहू. किंबहुना दूध गोडच करू ... अर्थात ह्या "मुक्या संवादावर" राजा एकदम खुष झाला आणि एकीकडे स्वतःपुरता मर्यादीत असलेला हा पारशी समाज दुसरीकडे संपूर्ण भारतवर्षासाठी सातत्याने देतच राहिला आणि भारताला मोठे करत राहिला. आता वरील कथा एकदा दंतकथा आहे असे कदाचीत एरव्ही म्हणावेसे वाटले असते, पण लोकसत्तेतील टाटांची अशीही एक औदार्यगाथा ही बातमी वाचली आणि खरेच दुधातील साखर समजली. त्या बातमीत ताजमधील कर्मचार्‍यांनी केलेल्या कर्मचार्‍यांची माहीती आहेच, पण आजपर्यंत कधीही गाजावाजा न केलेली माहीती रतन टाटांबद्दल आहे. तेव्हढाच भाग खाली चिकटवला आहे.
सर्वसामान्य माणसांनी-कर्मचाऱ्यांनी आपल्या संस्थेसाठी, किंबहुना आपल्या देशासाठी बजावलेली ती धाडसी सेवाच होती.. नेमका तोच भाव एका कार्यक्रमात बोलताना दस्तुरखुद्द रतन टाटांच्या शब्दांतून व्यक्त झाला आणि नंतर तर तो कंपनीनं टाकलेल्या एकेका पावलातनं अभिव्यक्तही झाला.. ते म्हणाले, ‘हा उद्योग एकटय़ा टाटांचा नाही, त्यादिवशी कामावर हजर असलेल्या सर्वाच्या मिळून मालकीचा तो आहे, म्हणूनच हे घडू शकलं’.. अवघी एक दिवसाची कंत्राटी नोकरी केलेल्या, पण त्या दिवशी कामावर हजर असलेल्या प्रत्येकाला हॉटेल पुन्हा सुरू होईपर्यंतच्या काळात तो नोकरीवर असल्यासारखंच वागवलं गेलं.. नोकरीत असणाऱ्या प्रत्येकाला मदत आणि सहाय्य मिळालंच, पण रेल्वे स्थानकावर मृत्युमुखी पडलेल्या, शेजारच्या पावभाजीवाल्याच्या वा पानवाल्याच्या टपरीवर असताना मृत्युमुखी पडलेल्यांनाही टाटांनी मदत केली.. हॉटेल बंद होतं त्या काळात तर प्रत्येकाला (अंदाजे १६०० जणांना) मनीऑर्डरनं घरपोच पगार मिळाला.. टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्सेसच्या सहकार्यानं ज्यांना-ज्यांना आवश्यक होती, त्या प्रत्येकाला मानसिक सल्ल्याची मदत दिली गेली.. जखमी झालेल्या वा मृत्युमुखी पडलेल्या ८० कर्मचाऱ्यांच्या प्रत्यक्ष घरी जाऊन रतन टाटांनी सर्वाची भेट घेतली, विचारपूस केली.. ज्या कर्मचाऱ्यांचे नातेवाईक मुंबईबाहेर रहात होते, अशा सर्वाना विमानानं मुंबईत आणलं गेलं, त्यांची सुमारे तीन आठवडे राहण्याची व्यवस्था हॉटेल प्रेसिडेंटमध्ये करण्यात आली.. टाटांनी प्रत्येकाची समक्ष भेट घेतली.. तीन दिवस तर स्वत: रतन टाटा स्मशानाच्याच फेऱ्या मारत होते.. अवघ्या २० दिवसात या मदतकार्यासाठीचं वेगळं प्रतिष्ठान स्थापन करण्यात आलं.. टाटांचं मोठेपण असं की ज्यांचा प्रत्यक्ष टाटा उद्योगसमूहाशी काडीचाही संबंध नव्हता, अशा रेल्वे कर्मचाऱ्यांना, पोलीस कर्मचाऱ्यांना एवढंच काय अगदी पादचाऱ्यांनाही टाटांनी मदत देऊ केली.. जवळपास सलग सहा महिने प्रत्येकाला दहा हजार रुपये टाटांकडून मिळत राहिले.. एका पदपथविक्रेत्याची चार वर्षे वयाची नात, चार गोळ्या लागल्यानं जखमी झाली.. टाटांनी तिलाही बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेतलं, लक्षावधी रुपये खर्च करून तिच्यावर शस्त्रक्रिया करवून घेतली.. ज्यांच्या हातगाडय़ा गेल्या त्यांना टाटांनी पर्यायी गाडय़ा घेऊन दिल्य़ा.. बळी पडलेल्यांच्या कुटुंबातील ४६ मुलांची संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी घेतली.. हल्ल्यात बळी पडलेल्या प्रत्येकाला टाटांनी दिलेली नुकसानभरपाईच ३६ ते ८५ लाखांच्या घरात गेली असावी.. पण त्या शिवायही त्यांच्या कुटुंबीयांची आणि त्यांचेवर अवलंबून असलेल्या सर्वाची जबाबदरी घेण्याचं, जगाच्या पाठीवर कुठेही त्यांच्या मुलांनी शिक्षण घ्यायचं ठरवलं तरी त्यासाठीचा सारा खर्च उचलण्याचं, आयुष्यभरासाठी कुटुंबीयांचा वैद्यकीय खर्च करण्याचं, मृतांनी घेतलेलं सारं कर्ज सव्याज परत करण्याचं दायित्वही टाटांनी घेतलं..
आधीच्या क्रियाशील आदर्शातून सामान्यातील असामान्य वृत्ती दिसली तर या उदाहरणातून केवळ "धंदेवाईक" म्हणून ज्यांच्याकडे बघितले जाते त्यांनी ठेवलेली सामाजीक बांधिलकी आणि जबाबदारी. आता (नुसती) आशा(च) करतो इजा-बिजा-तीजा म्हणत एखाद्या राजकारणी व्यक्तीमत्वाचे पण उदाहरण वाचायला मिळेल. :-)

वाचन 5304 प्रतिक्रिया 25