क्रियाशील आदर्श - हुतात्मा तुकाराम ओंबळे आणि कुटूंबिय
कधी काळी वृत्तपत्रातील बातमीवरून बोलत असताना, एका सन्माननीय व्यक्तीने मला एकदा मिष्कील उपदेश केला होता, "जर काही सामाजीक काम करायचे असेल तर, शहाणा हो आणि वृत्तपत्रे वाचणे बंद कर!"अर्थात उपदेश खरा होता जरी त्यातील हे वाक्य मिष्कील असले तरी... तर "वृत्तपत्रे वाचणे बंद कर" या वाक्याचा अर्थ काय? बातम्या म्हणून वाचायला लागले की खून, मारामार्या, भ्रष्टाचार, लबाड जोडती इमले माड्या-गुणवंतांना मात्र झोपड्या, असेच पहायला मिळते. यातून एखाद्या वेळेस चीड येईल पण एकंदरीत नैराश्यानेच ग्रासले जाते ज्यातून इतरांसाठीचे काय, स्वतःचे पण धड काम होत नाही. थोडक्यात जर काही काम करायचे असेल तर सकारात्मक वृत्ती ठेवायचा प्रयत्न करावा आणि त्यासाठी ज्याने स्फुर्ती येईल असे वाचावे असा याचा अर्थ होता...
आज हे नमनाला घडाभर तेल वापरायचे कारण अशाच प्रसिद्धी माध्यमातून आलेली एक अपवादात्मक पण अशा पल्लवीत करणारी बातमी: 26/11 'hero' cop's daughter returns aid
ज्या एका पोलीसाने स्वतःच्या जीवाचा विचार न करता नराधम कसाबची बंदूक पकडून स्वतःचा प्राण गमावला पण ज्यामुळे कसाब हा एकमेव दहशतवादी जिवंत हातात आला(आणि तसे पकडणे हे खूप महत्वाचे होते), त्या हुतात्मा तुकाराम ओंबळ्यांच्या कन्येस वैशाली ओंबळेस, सर जमशेदजी जिजीभॉय पार्सी बेनोव्हेलंट इन्स्टीट्यूशन ने त्यांच्या वार्षिक दिनाला बोलावले आणि तेथील विद्यार्थ्यांनी गोळा केलेला रू. तीन लाखाचा धनादेश तीला देऊ केला. मात्र तो स्विकारायच्या ऐवजी तीने नम्रपणे सांगितले की आईने सांगून पाठवले आहे की वडीलांच्या आत्म्यास शांती लाभण्यासाठी असे पैसे घेयचे नाहीत. त्यांना लहान मुले आवडायची तेंव्हा याचा उपयोग येथील विद्यार्थ्यांच्या मदतीसच करावा. ट्रस्टचे सेक्रेटरी महरूख खरस यांनी सांगितले की हे ऐकत असताना अनेकांच्या डोळ्यात पाणी आले. मुलांना "देण्या"ची सवय लागण्यासाठी असे प्रकल्प आम्ही करतो, आज वैशालीने आपणहून तेच करून एक सक्रीय आदर्श त्यांच्या समोर ठेवला.
सोलापूरच्या रयत शिक्षण संस्थेने पण अशीच देणगी देऊ केली असता, त्यात स्वतःच्या पैशाने भर घालून ती देणगी ओंबळे कुटूंबियांनी त्याच शाळेस दिली...
तात्पर्य: हुतात्मा तुकाराम ओंबळे आणि त्यांची वैशाली, तसेच वैशालीची आई यांनी दाखवलेली वृत्ती आणि कृती हे एक प्रकाशात आलेले उदाहरण आहे, प्रकाशात येण्याचे कारणही तसाच प्रसंग पाठीशी असणे आहे. वरकरणी कुठलाही देश/समाज हा जरी त्यातील शासक, राजकारणी आणि उद्योगांवर "चालत" असला तरी त्याचे "टिकणे", हे आपत्काल असो अथवा नसो, स्वतःच्या परीघाबाहेर बघणार्या वृत्ती, कृती आणि त्यातून घडणार्या संस्कृतीवर अवलंबून असते असे वाटते. त्यात माझा-तुमचा पण हातभार लागत राहोत हीच सदीच्छा...
-------------
वाचन
13655
प्रतिक्रिया
30