मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

एक वेगळे जग- सीमलेस ट्युब

अजय भागवत · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
बॉल-बेअरींग, बंदूकीच्या आणि तोफांच्या नळ्या, प्रत्येक दुचाकी/चारचाकीचे सांगाडे, बॉम्बशेल, अनेक आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भव्य इमारती आणि जमीनीतून कच्चे तेल काढण्यासाठी तयार केलेल्या विंधणविहीरींच्या केसिंगसाठी ज्या सीमलेस ट्यूब वापरल्या जातात त्या कशा तयार करतात ह्याची माहिती अगदी थोडक्यात येथे द्यावीशी वाटते. Image removed. ६० च्या दशकात जमशेदपुरला आपल्या देशातील पहिला प्रकल्प ईटलीच्या तंत्रज्ञानांच्या मदतीने उभा राहिला. नंतर ७० च्या दशकात नगरला जमशेद्पूरच्याच काही भारतीय तंत्रज्ञांनी एकत्र येऊन सुधारीत प्रकल्प टाकला व एक सरकारी प्रकल्प कोचीला उभा राहिला. नंतर जवळजवळ १५ वर्षे भारतात एवढेच प्रकल्प होते. नंतर सीमलेस ट्यूबचा वापर वाढला तो ओएनजीसी सारख्या कंपन्यांनी केलेली गंतवणूक वाढ, ऑटोमोबाईल क्षेत्रात झालेली प्रचंड वाढ देशात अशा अनेक कारणांनी. व हे पाहून नव्या उद्योग समुहांनी ह्यात गुंतवणूक करणे सुरु केले. सीमलेस ट्यूब तयार करण्यासाठी सगळ्या मशिनी जर्मनीतून ( व काही रशियातून) आयात कराव्या लागतात. एक-एक सीमलेस ट्यूब हा प्रकल्प प्रचंड आकारांच्या मशिनींनी बनतो व त्यांची एकत्रीत लांबी ३००-४०० मीटर पर्यंत असू शकते. एका प्रकल्पाला ३०० ते ८०० कोटी रुपये लागू शकतात; ह्यावरुन त्यातील तंत्रज्ञानाच्या गुंतागूंतीची कल्पना यावी. येथे काम करणाऱ्यांना मेटलर्जीची उत्तम जाण असणे आवश्यक असते- निकेल, टंगस्टन, मॉली, अशा अनेक धातूंच्या मिश्रणातून येथे लागणारे टूल्स करावे लागतात व ते अत्यंत महाग असतात व ते सतत बदलावेही लागतात. असा प्रकल्प बंद पडला की, साधारणतः २५०० ते ३५०० रुपये प्रति सेकंद अशा गतिने नुकसान करतो त्यामुळे काम करणाऱ्यांवर एक प्रचंड दडपण असते. एक साधा बोल्ट तुटला की अख्खा प्रकल्प अक्षरशः थंडावतो. ह्यामुळे बारामतीला असलेल्या अशाच एका प्रकल्पामधे अत्याधुनिक यंत्रणा वापरुन अनेक कामे, व कंट्रोल संगणकाच्या सहाय्याने चालू असतात. Image removed. खाली दाखवलेल्या पिअर्सिंग मिल मधे बिलेट (गोल आकारचा लोखंडी बार- ज्याचा डायमीटर १०० ते २५० मिमी असू शकतो व वजन १.५ टनांपर्यंत असू शकते) जाण्याअगोदर ते एका फिरत्या भट्टीमधे अतिशय काळजीपुर्वक, अनेक प्रकारची यंत्रणा राबवून व गणितेकरुन तापवले जाते. ते साधारण १२००-५० डिसें पर्यंत आले की, एक रोबॉट त्याला आतून बाहेर घेउन येतो व असे तप्त बिलेट पिअर्सिंग मिलकडे सरकू लागते. लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सचा नियम पाळून ह्या तप्त बिलेटवर पटापट पुढची ३ महत्वाची प्रक्रिया करुन ट्युब तयार करावी लागते त्यामुळे प्रत्येक सेकंदाला महत्व असते व तो वेळ कमीतकमी असण्यासाठी प्रत्येकाला डोके वापरावे लागते. Image removed. भरीव बिलेटला एखाद्या उसाच्या चरकाप्रमाणे पिअर्सिंग मिल आत ओढून घेते व दुसऱ्या बाजूने जेव्हा (दुसरी बाजू तुम्हाला चित्रात दिसत आहे) त्याची पोकळ आणि थोडीशी ओबड-धोबड ट्युब बाहेर येते. ही लगेचच दुसऱ्या प्रक्रियेसाठी जाते व त्या ट्युबला बऱ्यापैकी चांगला गुळगुळीत आकार मिळतो: Image removed. नंतर एका स्ट्रेच ऑपरेशन मधून ट्युबला अक्षरशः ताणतात व ही बनते हॉट-फिनिश्ड ट्युब. गार झाल्यावर ट्युबवर कोल्ड-फिनिशिंगसाठी रशियन बनावटीच्या मिल मधून अत्यंत अचूक असे व्यास व जाडी मिळवतात व अशा ट्युब बेअरींगसाठी वापरतात. Image removed. काही कामांसाठी हॉट-फिनिश्ड ट्युबही वापरतात जसे- खाली दाखवल्याप्रमाणे ऑईल रिगवर ह्याच ट्युब एका मागोमाग ड्रीलिंग करुन आत सोडतात. त्या जमीनीखाली २ किमी पेक्षाही खाली जातात व त्यातून नंतर ऑईल खेचून काढले जाते. ऑईल बाहेर काढतांना त्याबरोबर अत्यंत वेगाने खालील माती, दगडही वर ओढले जातात व त्यामुळे ह्या ट्युब बऱ्यापैकी घासल्या जातात व कालांतराने बदलाव्या लागतात. Image removed. Image removed. सीमलेस ट्युब ला "सीमलेस" नाव पडले आहे त्याच्या जोड-नसलेल्या घडणीमुळे. हलक्या दर्जाच्या व कमी स्ट्रेस असलेल्या वापरासाठी वेल्डेड ट्युब वापरतात- जसे पाणी वाहून नेण्यासाठी. सीमलेस ट्युबची किंमतही बरीच असते. हॉट-फिनिश्ड ट्युब साधारणतः ७०००० प्रति टन व त्यावर पुढील प्रक्रिया केल्यास २००,००० प्रतिटन असू शकते. व हे अजस्त्र प्रकल्प वर्षाकाठी २ ते ३ लाख टन ट्युब तयार करतात. त्यामुळे ह्या मालाची वाहतूकही एक मोठा उद्योग असतो.

वाचन 6559 प्रतिक्रिया 33