II स्वरभास्कर पं भीमसेन जोशी प्रसन्न II
राम राम मंडळी,
आज बर्याच दिवसांनी बसंतच्या लग्नाचा हा बारावा भाग लिहिण्याचा योग आला आहे. बसंतच्या लग्नाच्या पहिल्या अकरा भागांना मनोगताने प्रसिद्धी दिली होती त्याबद्दल मी मनोगत प्रशासनाचा अत्यंत ऋणी आहे. मनोगतावर ही मालिका लोकांना खूप आवडली होती असे आठवते! असो, आज हे सर्व भाग इच्छुकांना आमच्या ब्लॉगवर वाचायला मिळतील. त्या सर्व भागांचे दुवे खाली देत आहे!
बसंतचं लग्न..१ (ओळख)
बसंतचं लग्न..२ (यमन, यमनकल्याण)
बसंतचं लग्न..३ (भूप)
बसंतचं लग्न..४ (मिया मल्हार)
बसंतचं लग्न..५ (बिहाग)
बसंतचं लग्न..६ (मालकंस)
बसंतचं लग्न..७ (हमीर)
बसंतचं लग्न..८ (भीमपलास)
बसंतचं लग्न..९ (मुलतानी)
बसंतचं लग्न..१० (तोडी)
बसंतचं लग्न..११ (शुद्धसारंग, गौडसारंग)
बसंतच्या लग्नाचा बारावा भाग आज प्रथमच मिपावर लिहीत आहे. वाचकांनी कृपया गोड मानून घ्यावा, ही विनंती...
बसंतचं लग्न --भाग १२
राम राम मंडळी,
आधींच्या भागात म्हटल्याप्रमाणेच बसंतच्या लग्नाची धामधूम सुरू आहे. मांडवात आता बर्याच रागरागिण्यांची गर्दी जमली आहे. प्रत्येकाचं सौंदर्य वेगळं, प्रत्येकाचा गोडवा वेगळी, प्रत्येकाची नजा़कत वेगळी!
ती कोण बरं व्यक्ति नुकतीच आली आहे? बसंत त्या व्यक्तिला वाकून नमस्कार करत आहे! चेहेर्यावर एक वेगळंच तेज आहे तिच्या! सुरेख पांढर्याशूभ्र वेषातली, मस्तकी केशरमिश्रित गंध लावलेली ती व्यक्ति बसंतला कौतुकाने आशीर्वाद देत आहे! कोण आहे बरं ती व्यक्ति?!
मंडळी, ती व्यक्ति म्हणजे राग अहीरभैरव! आपल्या हिंदुस्थानी अभिजात संगीतातील सकाळच्या प्रहरी गायचा एक विलक्षण प्रभावी आणि भारदस्त असा राग, राग अहीरभैरव!! मंडळी, तुम्हाला सांगतो, भल्या सकाळी अहीरभैरव ऐकण्यासारखं सुख नाही! खूप शुभ आणि मंगलदायी वाटतं. अहीरभैरव अक्षरश: तुमचं संपूर्ण व्यक्तिमत्वच भारून टाकतो, तुमच्या मनाचा संपूर्ण ताबा घेतो, इतके प्रभावी सूर आहेत त्याचे! माझ्या आजपर्यंतच्या श्रवणभक्तिमध्ये अनेक दिग्गजांचा अहीरभैरव ऐकण्याचं भाग्य मला लाभलं आहे त्यात किशोरीताईंचं नांव अगदी आवर्जून घ्यावं लागेल. किशोरीताई अहीरभैरवची मांडणी भन्नाटच करतात! क्या बात है....!
अहीरभैरव या रागाबद्दल क्या केहेने! या रागाबद्दल किती लिहू अन् किती नको! आपल्याला या रागाची थोडक्यात ओळख व्हावी म्हणून आयटीसी-एसआरए च्या संस्थळावरील हे क्लिपिंग ऐका. यात रागाच्या आरोह-अवरोहाची, रागाची पकड (रागस्वरूप) याची थोडक्यात ओळख करून दिलेली आहे. आणि त्यानंतर 'अलबेला साजन आये..' ही या रागात नेहमी गायली जाणारी पारंपारिक बंदिशही आपल्याला ऐकता येईल...
काय मंडळी, अजूनही या रागाची पुरेशी ओळख पटत नाहीये? मन्नादासाहेबांचं 'पुछो ना कैसे' हे गाणं ऐका. हे गाणं याच रागात बांधलेलं आहे! उत्तम लचीला आवाज लाभलेल्या, अभिजात संगीताची भक्कम बैठक असलेल्या आणि आवाजात अतिशय गोडवा भरलेल्या मन्नादांनी या गाण्याचं अक्षरश: सोनं केलं आहे. या गाण्याच्या सौंदर्यात गायक, संगीतकार, कवी, यांचा वाटा तर आहेच आहे परंतु अहीरभैरवासारख्या भारदस्त रागाचे स्वर या गाण्याला लाभले आहेत ही देखील या गाण्याची खूप मोठी जमेची बाजू म्हणावी लागेल!
हा राग मला एखाद्या साधूपुरुषासारखा दिसतो. विरागी वृत्तीचा. पण कसा आहे हा साधूपुरुष? हा नुसतीच जपमाळ घेऊन वैराग्याची भाषा करत नाही तर उलट 'आयुष्यातले सगळे भोग अगदी यथेच्छ भोगा परंतु चित्ती मात्र सतत वैराग्याचीच जाणीव असू द्या' हे सांगणारा आहे! मंडळी, अगदी नेमक्या शब्दात वर्णन करायचं म्हटलं तर
'आहे मनोहर तरी गमते उदास!'
अश्याच वृत्तीचा हा राग आहे असं मला वाटतं!
मला हा साधूपुरुष थोडा प्रवासी, भटक्या वृत्तीचा, एका जागी फार वेळ न थांबणारा वाटतो. हा अवचित कधी दाराशी येईल आणि 'सांगेन गोष्टी युक्तिच्या चार..' या न्यायाने आपल्यालाच आयुष्य सावरणारे चार प्रेमळ सल्ले देईल आणि पुन्हा कुठेतरी दूर निघून जाईल!
वर उल्लेख केल्याप्रमाणे या रागात गायली जाणारी 'अलबेला साजन आये..ही पारंपारिक बंदिश इथे ऐका आणि पाहा. 'हम दिल दे चुके सनम' या चित्रपटात संगीतकाराने या बंदिशीचा खूप छान उपयोग करून घेतला आहे. गाण्याचं पिक्चराझेशनही खूप चांगलं आहे! विक्रम गोखले गुरुजी ऐश्वर्याला आणि सल्लूबाबाला या रागाची तालीम देत आहेत! :)
(अवांतर - हा शिणेमाही मला खूप आवडला होता! असो..)
मंडळी, माणसाचं मन हे अनेक गोष्टींनी भरलेलं असतं. त्यात आनंद असतो, दु:ख असतं, लोभ, मत्सर, माया, ममता, अगदी सारं काही असतं. परंतु या सगळ्या भावभावानांकडे शेवटी एका विरागी वृत्तीनेच पाहावं, किंबहुना मनातील प्रत्येक भावभावनेला विरागी वृत्तीची झालर असावी, असंच अहीरभैरव हा राग आपल्याला सांगतो किंवा शिकवतो. मग ती भावभावना कुठलिही असो, आनंद असो वा दु:ख असो, अंगी जर मूलभूत विरागी वृत्ती असेल तर या सगळ्या भावनांचा समतोल योग्य रितीने राखला जातो आणि ही विरागीवृत्ती आपल्याला अहीरभैरवकडून मिळते असं मला वाटतं. 'आयुष्यात सगळं काही कर परंतु शेवटी वृत्ती मात्र विरागीच ठेव' असंच हा राग सतत सांगत असतो आणि हीच या रागाची फार मोठी ताकद आहे असं मला वाटतं! मंडळी, मी काही कुणी मोठा धर्माचा गाढा अभ्यासक नाही की मोठमोठे ग्रंथ पठण केलेला, गीता-ज्ञानेश्वरीचा अभ्यास केलेला कुणी शास्त्री-पंडित नाही. आपलं हिदुस्थानी रागसंगीत हीच आमची गीता आणि त्यातले एकापेक्षा एक मौल्यवान असे राग हेच आमचे वेद! आणि हेच वेद व गीता आम्हाला बरंच काही शिकवून जातात असा माझा तरी अनुभव आहे!
मंडळी, खरंच मला तरी अहीरभैरव असाच दिसला, असाच भावला!
मंडळी अहीरभैरव रागाच्या व्यक्तिमत्वाकडे पाहताना मला नेहमी भाईकाकांच्या 'तुझे आहे तुजपाशी' या नाटकातलं काकांजींचं व्यक्तिमत्व आठवतं! हे काकाजी म्हणजे वर वर पाहता अगदी जिंन्दादिल, बाईबाटलीपासून ते आयुष्यातल्या सर्व गोष्टींचा यथेच्छ आस्वाद घेणारं, आयुष्यावर, खाण्यापिण्यावर, गाण्यावर मनमुराद प्रेम करणारं असं व्यक्तिमत्व आहे. परंतु मी 'वर वर पाहता' हे शब्द अश्याकरता वापरतोय की मूलत: त्या नाटकातल्या 'श्याम' या तरूण पात्रासोबत गप्पा मारताना जवान होणारे काकाजी क्षणात हे सगळे भोग सोडून देऊन, "चला आचार्य, आपण दोघे आपले जंगलात जाऊन राहू. अहो या वयात पोरंसोरं देखील दाढ्या ओढतात!" असंही म्हणायला तयार असतात!
"मला लोकांनी आचार्य केला हो! लोक जणूकाही काठावर काठ्या घेऊन उभेच होते, मी जरा जवळ आलो की मला पुन्हा पाण्यात ढोसत होते. त्यांनाही नमस्कार करायला कुणीतरी बुवा हवाच होता!"
असा शेवटी भडभडून आक्रोश करणार्या आचार्यांना "शांत व्हा आचार्य!" असा धीर काकाजीच देतात! आचार्य त्यांना म्हणतात, "काय गंमत आहे पहा काकाजी, अहो आयुष्यभर मी शांतीचे पाठ बडबडत आलो परंतु शेवटी तुम्ही मला शांत व्हायचा सल्ला देताय! कारण तुम्ही शांत आहात!! तुम्ही आयुष्यभर सगळं काही केलं परंतु अंगाला काहीच लावून नाही घेतलं!"
शेवटी खरा वैरागी कोण? गीतेचे पाठ बडबडणारा आचार्य की आयुष्याचे सगळे भोग यथेच्छ भोगलेला काकाजी? हा प्रश्न प्रेक्षकांवर सोडून हे नाटक संपतं!
सांगायच मुद्दा पुन्हा तोच की, अहीरभैरव हा रागदेखील माणसाला नेमकी हीच वैरागीवृत्ती अंगी बाणवायला शिकवतो. आनंद, भोगापभोग, याला त्याची कधीच ना नाहीये!
'गुंतुनी गुंत्यात सार्या पाय माझा मोकळा!'
भटसाहेबांच्या या फार सुरेख ओळीत जो अर्थ सांगितला आहे, तोच अर्थ हा रागही सांगतो असं मला वाटतं!
खरंच मंडळी, आपलं रागसंगीत म्हणजे नुसते केवळ स्वर नव्हेत किंवा आरोहा-अवरोहाचं, चलनाचं व्याकरण नव्हे! तर या व्याकरणाच्या कितीतरी पुढे जाऊन हे रागसंगीत आपल्याशी संवाद साधतं! आपल्या मनातील भावभावनांचा ठाव घेतं आणि हेच माझ्या मते आपल्या रागसंगीताचं गमक आहे. अहीरभैरव हा राग मला जसा दिसला तसाच प्रत्येकाला दिसेल असंही नव्हे परंतु तो प्रत्येकाच्या थेट हृदयाशी काही ना काही संवाद साधेल, त्याला आपलंसं करेल एवढं मात्र निश्चित!
हिंदुस्थानी रागसंगीताचा हा अनमोल ठेवा आपण सर्वांनी मनसोक्त लुटला पाहिजे. ह्या ठेव्याची व्याप्ती एवढी अफाट आहे, एवढी अमर्याद आहे की कितीही जरी लुटला तरी तो जराही कमी होणार नाही, उलट आपण मात्र अधिकाधिक समृद्ध होऊ, संपन्न होऊ, श्रीमंत होऊ!
बसंतचं लग्न ही मालिका मी केवळ याच हेतूने लिहीत आहे. खरं सांगायचं तर ही मालिका म्हणजे माझ्या पदरचं काहीच नाही, मी फक्त एक माध्यम बनून हा रागसंगीताचा खजिना मला जसा भावला तसा मुक्तहस्ते आपल्यापुढे लुटायचं काम करतोय, हे माणिकमोती उधळायचं काम करतोय!
असो....
अहीरभैरवचा हा भाग मी रामुभैय्या दाते यांच्या जिन्दादिल स्मृतीस अर्पण करत आहे!
आपला,
तात्या अभ्यंकर,
प्रचारक व प्रसारक,
हिंदुस्थानी रागदारी संगीत.
प्रतिक्रिया
16 Mar 2008 - 11:38 pm | अमित.कुलकर्णी
लेखमालेचे सर्व भाग आवडले!
-अमित
------------------------------------------
Doing what you don't like is being employed and not liking what you do is common human nature!
16 Mar 2008 - 11:53 pm | प्राजु
अहिरभैरव....
मलाही अतिशय आवडतो... गंभिर पण तितकाच खेळकर वाटतो हा राग मला.
तुम्ही लिहिलेले..
हा राग मला एखाद्या साधूपुरुषासारखा दिसतो. विरागी वृत्तीचा. पण कसा आहे हा साधूपुरुष? हा नुसतीच जपमाळ घेऊन वैराग्याची भाषा करत नाही तर उलट 'आयुष्यातले सगळे भोग अगदी यथेच्छ भोगा परंतु चित्ती मात्र सतत वैराग्याचीच जाणीव असू द्या' हे सांगणारा आहे! मंडळी, अगदी नेमक्या शब्दात वर्णन करायचं म्हटलं तर
'आहे मनोहर तरी गमते उदास!'
अश्याच वृत्तीचा हा राग आहे असं मला वाटतं!
मला हा साधूपुरुष थोडा प्रवासी, भटक्या वृत्तीचा, एका जागी फार वेळ न थांबणारा वाटतो. हा अवचित कधी दाराशी येईल आणि 'सांगेन गोष्टी युक्तिच्या चार..' या न्यायाने आपल्यालाच आयुष्य सावरणारे चार प्रेमळ सल्ले देईल आणि पुन्हा कुठेतरी दूर निघून जाईल!
वर उल्लेख केल्याप्रमाणे या रागात गायली जाणारी 'अलबेला साजन आये..ही पारंपारिक बंदिश इथे ऐका आणि पाहा. 'हम दिल दे चुके सनम' या चित्रपटात संगीतकाराने या बंदिशीचा खूप छान उपयोग करून घेतला आहे. गाण्याचं पिक्चराझेशनही खूप चांगलं आहे! विक्रम गोखले गुरुजी ऐश्वर्याला आणि सल्लूबाबाला या रागाची तालीम देत आहेत! :)
(अवांतर - हा शिणेमाही मला खूप आवडला होता! असो..)
मंडळी, माणसाचं मन हे अनेक गोष्टींनी भरलेलं असतं. त्यात आनंद असतो, दु:ख असतं, लोभ, मत्सर, माया, ममता, अगदी सारं काही असतं. परंतु या सगळ्या भावभावानांकडे शेवटी एका विरागी वृत्तीनेच पाहावं, किंबहुना मनातील प्रत्येक भावभावनेला विरागी वृत्तीची झालर असावी, असंच अहीरभैरव हा राग आपल्याला सांगतो किंवा शिकवतो. मग ती भावभावना कुठलिही असो, आनंद असो वा दु:ख असो, अंगी जर मूलभूत विरागी वृत्ती असेल तर या सगळ्या भावनांचा समतोल योग्य रितीने राखला जातो आणि ही विरागीवृत्ती आपल्याला अहीरभैरवकडून मिळते असं मला वाटतं. 'आयुष्यात सगळं काही कर परंतु शेवटी वृत्ती मात्र विरागीच ठेव' असंच हा राग सतत सांगत असतो आणि हीच या रागाची फार मोठी ताकद आहे असं मला वाटतं! मंडळी, मी काही कुणी मोठा धर्माचा गाढा अभ्यासक नाही की मोठमोठे ग्रंथ पठण केलेला, गीता-ज्ञानेश्वरीचा अभ्यास केलेला कुणी शास्त्री-पंडित नाही. आपलं हिदुस्थानी रागसंगीत हीच आमची गीता आणि त्यातले एकापेक्षा एक मौल्यवान असे राग हेच आमचे वेद! आणि हेच वेद व गीता आम्हाला बरंच काही शिकवून जातात असा माझा तरी अनुभव आहे!
मंडळी, खरंच मला तरी अहीरभैरव असाच दिसला, असाच भावला!
तात्या... निव्वळ अप्रतिम.. काय सांगू दुसरं?
- (सर्वव्यापी)प्राजु
17 Mar 2008 - 8:26 am | सहज
मला शास्त्रीय संगीतातील काही कळत नाही (कृपया कोणि लगेच "परवा मिपावरील एका प्रतिसादकू महाशयांनी विधान केले की त्यांना शास्त्रिय संगीत अजिबात कळत नाही." असे म्हणुन कुठली नवी लेखमाला सुरू करुन नये.) पण अधुन मधुन नक्कीच एकावेसे वाटते, काही अभंग, गाणी मोहुन टाकतात मग कधीतरी वाचनात येते की अमुक रागात बांधलेले गाणे आहे.
तात्या बसंतचं लग्न ह्या लेखमाले बद्दल धन्यवाद.
17 Mar 2008 - 8:41 am | प्रमोद देव
मलाही हा राग खूप आवडतो. तात्या तू इथे दिलेले अलबेला साजन आयो हे तर झकासच आहे. हीच चीज माझ्याकडे बसवराज राजगुरु ह्यांच्या मधुर आवाजातली आहे. कितीही वेळा ऐकले तरी समाधान होत नाही. खूप हुरहुर लावणारा राग असावा असे मला वाटते.
पुछो ना कैसे बद्दल तर काही बोलायलाच नको. तेही एक सदाबहार गाणे आहे आणि माझ्या खास पसंतीच्या गाण्यांपैकी एक आहे.
मंदारमाला नाटकातले संगीतभूषण रामभाऊ मराठे ह्यांनी गाजवलेले जय शंकरा हे नाट्यपदही ह्याच रागातले आहे आणि तेही माझ्या खास आवडीचे आहे हे जाता जाता सांगू इच्छितो.
अहिर भैरव रागाचे वर्णन करताना तू पुलंच्या तुझे आहे तुज पाशी मधल्या आचार्य आणि काकाजींमधल्या संवादांचा अगदी नेमका उपयोग केलेला आहेस हे जाणवते. जियो,तात्या जियो. तुझ्याकडून उत्तरोत्तर भारतीय अभिजात संगीताची अशीच सेवा घडो आणि त्या निमित्ताने आमच्या सारख्या रसिक पण अज्ञ लोकांच्यामध्ये त्याची जाण निर्माण होवो अशी सदिच्छा व्यक्त करतो.
17 Mar 2008 - 9:01 am | बेसनलाडू
मलाही हा राग खूप आवडतो. तात्या तू इथे दिलेले अलबेला साजन आयो हे तर झकासच आहे. कितीही वेळा ऐकले तरी समाधान होत नाही. खूप हुरहुर लावणारा राग असावा असे मला वाटते. पुछो ना कैसे बद्दल तर काही बोलायलाच नको. तेही एक सदाबहार गाणे आहे आणि माझ्या खास पसंतीच्या गाण्यांपैकी एक आहे. अहिर भैरव रागाचे वर्णन करताना तू पुलंच्या तुझे आहे तुज पाशी मधल्या आचार्य आणि काकाजींमधल्या संवादांचा अगदी नेमका उपयोग केलेला आहेस हे जाणवते. जियो,तात्या जियो. तुझ्याकडून उत्तरोत्तर भारतीय अभिजात संगीताची अशीच सेवा घडो आणि त्या निमित्ताने आमच्या सारख्या रसिक पण अज्ञ लोकांच्यामध्ये त्याची जाण निर्माण होवो अशी सदिच्छा व्यक्त करतो.
(सहमत)बेसनलाडू
17 Mar 2008 - 12:13 pm | आनंदयात्री
या लेखमालेतला हा अजुन एक चांगला लेख. आवडला ! रागदारीच्या बाबतीत सर्वसामान्य असणार्यांना समजेल असे "अलबेला .. " चे उदाहरण दिल्यामुळे आम्हाला चांगले समजुन घेता आले. धन्यवाद.
(हिंदुस्थानी रागदारीत अज्ञ असणारा पण जाणुन घेण्याची इच्छा असणारा)
-आनंदयात्री
17 Mar 2008 - 2:30 pm | नंदन
म्हणतो. 'अलबेला...'चे उदाहरण आणि रागांना दिलेला व्यक्तीचा स्वभाव यातून काय म्हणायचं आहे, ते बरोबर समजतं. (ते का म्हटलंय, हे समजायला अर्थातच कान तयार हवेत.)
बाकी, इस्निप्सवर पं. हरिप्रसाद चौरसियांच्या बासरीवादनाचा (अहिरभैरवातले) हा दुवा मिळाला -
http://www.esnips.com/doc/9926a1b1-1843-41c1-a258-c99313f5aa71/Ahir-Bhai...
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
17 Mar 2008 - 12:34 pm | विसुनाना
तात्या, विसोबा खेचर ऊर्फ श्री. शेखर अभ्यंकर यांना नम्र विनंती की आपण या लेखमालेचे छापील पुस्तकात रुपांतर करावे.
पुस्तकात दिलेल्या दुवा-उदाहरणांची एक तबकडी बनवून पुस्तकाच्या मलपृष्ठाच्या आतील भागात पाकीट डकवून त्यातून वितरीत करावी. नव्या, होतकरू कलाकारांना एक आदर्श संदर्भ तयार होईल.शिवाय त्यातून आपली 'कडक' मतेही त्यांच्यापर्यंत पोचतील.('प्लीज, प्लीज, मला समस करा हो' म्हणून भिका मागताना ते विचार करतील.)
शिवाय आमच्यासारख्या 'कानसेन' मंडळींची उत्तरभा.शा.संगीताशी चांगली ओळख होईल.
पहा, काही प्रकाशकांशी बोलून तर पहा. दोन अडीचशे पानांचे अत्यंत रमणीय पुस्तक सहज तयार होईल आणि हातोहात खपेलही!
17 Mar 2008 - 3:12 pm | बापु देवकर
तात्या...
आज ही लेखमाला वाचुन ह्या सर्व रागाचि ओळख झाली . आता त्याना अगदि मनापासुन भेटावस वाटत आहे.
राज....
17 Mar 2008 - 3:34 pm | विजुभाऊ
अहीर भैरव रागातले अजुन एक गाणे
तेरी सासों को जो महका रही है
ये पहले प्यार की खूशबू तेरी सासोंसे शायद आ रही है..
आणि
जागो मोहन प्यारे........
मराठी गाणे
जीवलगा राहीले दूर घर माझे...........
हे गाणे अहीर भैरव चा जवळचा राग बैरागी भैरव आहे
दया घना..............चा राग नक्कि माहीत नाही पण भैरव कुटुंबा मधला आहे
"लेकीन "सिनेमात याच चालीची एक बंदीश आहे. रसुल अल्लाह्..........अशी काही तरी (तात्या थोडासा खुलासा)
आपला
किंचित कानसेन विजुभाऊ
17 Mar 2008 - 7:18 pm | विसोबा खेचर
अहीर भैरव रागातले अजुन एक गाणे
तेरी सासों को जो महका रही है
ये पहले प्यार की खूशबू तेरी सासोंसे शायद आ रही है..
मराठी गाणे
जीवलगा राहीले दूर घर माझे...........
हे गाणे अहीर भैरव चा जवळचा राग बैरागी भैरव आहे
असहमत आहे, सवडीने खुलासा करतो..
"लेकीन "सिनेमात याच चालीची एक बंदीश आहे. रसुल अल्लाह्..........अशी काही तरी (तात्या थोडासा खुलासा)
ही पूर्वी रागातली बंदिश आहे...
परंतु विजूभाऊ, आपण इंटरेस्ट घेताय ही मात्र कौतुकास्पद बाब आहे...
आपला,
(आनंदीत) तात्या.
17 Mar 2008 - 11:08 pm | सर्किट (not verified)
तात्या,
अहिर भैरव च्या निमित्ताने बसंतचे लग्न पुन्हा सुरू झाले, ह्याचा अत्यानंद झाला.
किशोरीताईंचा अहिर भैरव हा अहिर भैरवाच्या आजवर दिसलेल्या दर्शनांत तर अग्रक्रमी येतोच, पण किशोरी ताईंच्या कलाकृतींतही तो (माझ्या दृष्टीने) अग्रक्रमी आहे.
- (रसिक) सर्किट
ता. क. विजूभाऊ, रसूलिल्लाह... ही पूर्वी मधली पारंपारिक बंदिश आहे. त्यावरूनच बाळासाहेबांनी "दयाघना.." बांधले आहे. बैरागी भैरवची तबियत अहिर भैरवपेक्षा क्खूपच वेगळी आहे.
18 Mar 2008 - 2:19 am | कोलबेर
...म्हणतो!
मंगेशकर त्यांच्या 'भावसरगम' कार्यक्रमात त्यांचा मूड असेल तर हे सप्रात्यक्षीक दाखवायचे/(दाखवतात?).
18 Mar 2008 - 2:23 am | चतुरंग
त्यातल्या बारकाव्यांसह ऐकायचा योग आला होता. .आणि 'दयाघना' च्या निर्मितीमागची प्रक्रिया जाणून घेताना फारच छान वाटले होते!
चतुरंग
17 Mar 2008 - 11:14 pm | चित्तरंजन भट
तात्यासाहेब, तुमच्या रसाळ शैलीचे आम्ही चाहते आहोत. तुम्ही नुसते 'मंडळी' म्हटले की अगदी माधुर्यरसकल्लोल सुरू होतो. बाकी शास्त्रीय संगीत आम्हाला फारसे कळत नाही. पण तुमचे लेख वाचल्यावर बरेच काही कळल्यासारखे वाटते.
वसंताची अशीच लग्ने लावत राहा. आम्ही हजर राहूच.
18 Mar 2008 - 12:04 am | चतुरंग
तात्या, बसंतच्या लग्नातल्या आजवरच्या मैफिलितली सर्वात आवडलेली मैफल असे मी ह्याचे वर्णन करेन!
अत्यंत नेटक्या शब्दात यथार्थ चित्रण करुन रागाचे शब्दरुप आमच्यासमोर उभे करण्याचे कसब निव्वळ लाजवाब.
रागसंगीतात असलेली रुची तुमच्या अशा लेखनाने वाढत जाणार हे नक्की.
मुकेशच्या शांत आणि कसकभर्या आवाजातलं 'दिल ने कहा' मधलं 'वक्त़ करता जो वफा' हे ही गाणं ह्याच रागातलं!
चतुरंग
18 Mar 2008 - 12:18 am | llपुण्याचे पेशवेll
शास्त्रीय संगीतातले तसे फारसे काही कळत नाही मला. पण तरीही मला ते ऐकायला आवडते. मी 'अहीर भैरव' वसंतराव देशपांडे यांचा ऐकला आहे. द्रुत लयीतली बंदीश 'कैसे मनाऊं' अशी आहे. या रागाचे आरोह-अवरोह, पकड, वादी-समवादी याची माहीती मिळाली तर अजून आनंद होईल.
पुण्याचे पेशवे
19 Mar 2008 - 12:18 pm | विसोबा खेचर
प्रतिसाद देणार्या सर्व रसिक वाचकवरांचा मी ऋणी आहे...
असाच लोभ असू द्यावा...
तात्या.
19 Mar 2008 - 8:13 pm | सुधीर कांदळकर
लुटायला काढलात. आपण रेखाटलेली रागचित्रे सुरेख. जो राग ऐकतांना ज्या भावाचे अव्यक्त (ऍबस्ट्रॅक्ट) चित्र मनांत उमटते त्याच भावाचे आपण मूर्त चित्रण केले आहे. त्यामुळे स्वतःच्या मनातीलच अव्यक्त भाव आपल्या प्रासादिक लेखणीतून उमटले आहेत. रागस्वरूप समजायलाच वर्षे खर्च करावी लागतात. ती समजून शब्दरूपात चित्रित करणे येरागबाळ्याचे काम नाही.
अभिनंदन आणि धन्यवाद.
आज दुवे गायब आहेत. गेले दोन दिवस हपिसातून उशिरा घरी येतोय. त्यामुळे वेळेवर प्रतिसाद देता आला नाही. सुरश्री केसरबाईंचा आवाज ऐकण्यासाठी आपल्या ब्लॉगवरील दुव्यावर टिचकी मारली. परंतु सर्व श्राव्य दुवे काल कार्यरत नव्हते.
काल घईघाईत १२हि भाग वाचले. आणि नशीब आज आप्ल्या ब्लॉगवरून अकराहि भाग गायब आहेत. सारंगाच्या भागातून वृंदावनी सारंग आणि मधुमाघ सारंग राहून गेले असावेत असे वाटते.
तरी किमान ब्लॉगवर एकेका रागाबद्दल विस्तृत माहिती असेल तर बरे होईल. उदा. शुद्ध सारंगाहून गौड सारंगाचे कोणते स्वर वेगळे आहेत. वादी संवादी कोणते आहेत, चलन कसे वेगळे आहे. तर माझ्यासारख्या इच्छुकांची सोय होईल. कारण मला हे ठाऊक नाही. मला अजून मारवा, पूरिया आणि सोहनी वेगळे करता येत नाही. शुद्ध कल्याण व भूप ओळखण्यात गल्लत होते. अशा अनेक गफलती होतात. एवढे पुराण मिपावर फार अगडबंब होईल. पण ब्लॉगवर हरकत नाही.
माझा सर्वात आवडता राग मारुबिहाग. याची वाट पाहात आहे. खरे म्हणजे जो राग आपण ऐकत आहोत तोच त्यावेळी सर्वोत्तम असे नेहमीच वाटते. तरी अभोगी, दरबारी, जोग, मधुकंस वगैरे मतब्बर सरदार आहेतच. तेदेखील आले तर माझ्यासारख्या अर्धवटांची सोय होईल.
असो. अपार आनंद मिळाला. आता अपेक्षा वाढलेल्या आहेत हे खरे.
संगीतातील अर्धवटराव
सुधीर कांदळकर.
ता. क. : सुरश्रीचा दुवा जरूर द्या. मी अद्याप त्यांचा आवाजदेखील ऐकलेला नाही.
19 Mar 2008 - 8:29 pm | llपुण्याचे पेशवेll
तसेच या अहीरभैरवा बरोबरच 'नट भैरव, शिवमत भैरव, एज़ाज़ भैरव, भवमत भैरव ' असे ५ राग वसंतराव "नुसते भैरवाचे प्रकार गातो हं!"
असे म्हणून गायचे. त्यामुळे या सर्व रागांची ओळख झाली तर फार बरे होईल हो. तात्या तुमच्या उत्तराच्या प्रतिक्षेत!
पुण्याचे पेशवे
20 Mar 2008 - 9:09 am | विसोबा खेचर
मिराशीबुवा,
वरील पैकी नटभैरवाबद्दल माझा थोडाफार विचार झालेला आहे, सवडीने केव्हातरी नक्की लिहीन नटभैरवावर.
वसंतराव "नुसते भैरवाचे प्रकार गातो हं!"
असे म्हणून गायचे.
तो एक सिद्धपुरुषच होता..!
असो, प्रतिसादाबद्दल मी आपला आभारी आहे..
आपला,
(भैरवप्रेमी) तात्या.
21 Mar 2008 - 8:16 am | सर्किट (not verified)
वसंतराव "नुसते भैरवाचे प्रकार गातो हं!"
असे म्हणून गायचे.
तो एक सिद्धपुरुषच होता..!
तात्या,
आपण वापरलेला सिद्धपुरुष हा शब्द भावला..
गदगदलो..
वसंतराव, एक अवलिया सिद्धपुरुष..
शीर्षक दिलंय,
आता लिहा , प्लीज..
- सर्किट
19 Mar 2008 - 9:32 pm | चतुरंग
आय.टी.सी. (इंडियन टोबॅको.कं) ने 'संगीत रिसर्च अकादमी' असा एक छान उपक्रम केलेला आहे.
हिंदुस्तानी अभिजात संगीताबद्दल, घराणी, गुरुकुल परंपरा, राग, रागांचे वेळेबरोबरचे नाते इ. बरीच रंजक माहिती तिथे आहे.
रसिकांनी जरुर पहावी.
चतुरंग
19 Mar 2008 - 10:56 pm | ऋषिकेश
अप्रतिम!!.. दुसरे शब्दच नाहित!!
-('मिसळ'लेला) ऋषिकेश