मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

श्रीलंका सरकारचे अभिनंदन !!

डॉ.प्रसाद दाढे · · काथ्याकूट
लिट्टेचा सर्वेसर्वा प्रभाकरनला ठार करून श्रीलंकेच्या सैन्याने जो दैदिप्यमान विजय मिळविला आहे त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन! प्रभाकरनसारख्या क्रूरकर्म्याचा अंत करून महिन्द्र राजपक्षे व सनथ फोन्सेका यांनी संपूर्ण मानववंशावर थोर उपकार केले आहेत असेच मला वाटते. गेली तीस वर्षे हा देश लिट्टे आणि इतर फुटीर तमिळ अतिरेक्यांशी लढा देत आहे. इतका छोटा देश स्वतःच्या अस्तित्वासाठी, सिंहली अस्मितेसाठी झगडतो हे निश्चितच कौतूकास्पद आहे. ह्या युद्धात आत्तापर्यंत हजारो निरपराध नागरिक, सैनिक, पोलिस, राजकिय नेते आणि एक अध्यक्ष समर्पित झाले आहेत. भारतानेही अनेक सैनिक आणि राजीव गांधी गमाविले आहेत. भारतासारखा बलाढ्य देश अजून गडचिरोली जिल्ह्यातला नक्षलवाद संपवू शकत नाही अन भारतातल्या एका जिल्ह्याएव्हढा श्रीलंका देश लिट्टेसारख्या अतिबलाढ्य शत्र्रूवर निर्णायक मात करतो ही गोष्ट खरेच विचार करण्यासारखी आहे. ज्या लिट्टेने राजीव गांधींची निर्घृण हत्त्या केली त्या प्रभाकरनचा कळवळा असणार्‍या करूणानिधींचे समर्थन घेतांना सोनिया गांधींना शरम कशी वाटली नाही हा एक वेगळाच मुद्दा आहे. ह्या तमिळ नेत्यांची राजधानी दिल्लीतही एव्हढी दहशत जाणविते की श्रीलंका सरकारचे कुणी मनमोकळेपणाने अभिनंदनही करत नाही ! मी तर पुढे जाऊन म्हणेन की भारत सरकारने राजपक्षेंनाच निमंत्रण द्यावे आणि दहशतवादाचा कठोर नि:पात कसा करायचा हे त्यांच्या कडून शिकावे! इतका आंतरराष्ट्र्रीय दबाव असतांनाही त्यांनी ज्याप्रकारे श्रीलंकन सेनेत आणि नागरिकांमध्ये प्रखर राष्ट्रप्रेम चेतविले त्याला तोड नाही !!

वाचन 9333 प्रतिक्रिया 44