मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

चहा!

श्रीगणेशा · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
चहा, जिव्हाळ्याचा विषय. चहा तयार करणं बऱ्याच अंशी एक कला आहे. थोडंसं गणित व शास्त्रही आहे म्हणा त्यात. चवीत सातत्य राखायचे असेल, तर त्यातील प्रत्येक घटकाची भूमिका, प्रमाण, आणि वेळ समजावून घेणं गरजेचं. एखादी सुंदर संगीत रचना जर करायची असेल, तर आधी तुम्हाला संगीत वाद्यांशी, प्रत्येक सुराशी समरस व्हावं लागतं, अगदी तसंच. चहापूड (पूड=पावडर) मधील अर्क शोषण्याचं काम पाण्याचं. चहापूड टाकण्याआधीच पाणी उकळतं असणं गरजेचं. आणि चहापूड उकळत्या पाण्यात टाकल्यावर, फक्त काही मिनिटेच थांबावं, नाहीतर कडवटपणा उतरण्याची शक्यता असते. चहाला पाण्याच्या चवीपासून दूर ठेवायचं असेल, तर साधारण एक कप चहासाठी एक चतुर्थांश, एवढंच पाणी पुरेसं. निदान आसाम चहात तरी इतर काहीही न मिसळता, फक्त पाण्यात उकळून, मोठ्या आवडीने पिणारे किंवा तसं भासवणारे लोक, चवीच्या बाबतीत निश्चितच निरस म्हटले पाहिजेत. दूध निरसं, ताजं, असावं. तेही फक्त एकदा उकळवल्यावर आणि फक्त काही मिनिटातच चहासाठी वापरलं गेलं, तरच चहातील वेगवेगळया घटकांचं प्रमाण संतुलित राहतं. गुळाचा चहा ऐकायला कितीही गोड वाटला, तरी चवीच्या बाबतीत, त्याला साखरेची सर येऊ शकत नाही. कदाचित गुळाची शुध्दता आणि त्यामुळे येणारी वेगळी चव, हेही एक कारण असावं त्यामागे. चहातील सर्व घटकांचं प्रमाण, संतुलन, प्रयोग-निरीक्षण-निष्कर्ष अशा शास्त्रीय पद्धतीने अगदी अचूक शोधता येतं, खरं तर ते प्रत्येकाने शोधायचं असतं. हल्ली चहा मसाल्याचं पीक आलं आहे. त्यात रंग सोडून नेमके कोणते घटक असतात ते कुणालाच ठाऊक नसतं किंवा कोणी त्याची चिकित्सा करण्याची तसदीही घेत नाही. चहामध्ये अगदी किंचित प्रमाणात, आलं किंवा फार तर विलायची, एवढंच सामावू शकतं. गवती चहा, नावात चहा असूनही, चहासाठी कधीच वापरू नये, असं माझं, प्रयोगाअंती ठाम झालेलं, प्रांजळ मत आहे. थोडक्यात काय, तर चहाच्या मूळ स्वादाला झाकोळून टाकणारे कोणतेही घटक किंवा त्यांचं अप्रमाण, निदान खऱ्या चहाप्रेमींना तरी स्वीकारार्ह होऊ शकत नाही. भारतात साधारण सात ते आठ प्रमुख जातींची चहा लागवड केली जाते. त्यात आसाम चहाचा सर्वात मोठा वाटा आहे. आसाम चहा लोकप्रिय असण्याचं एक कारण, त्याचा स्वाद (flavor), थोडासा माल्टी, म्हणजे बियरच्या स्वादासारखाच आहे, असं वाचनात आलं आहे. आता मद्यप्रेमी लोक चहाचा कितपत आदर करतील याची शंकाच आहे, त्यामुळे तूर्तास, कोणीतरी म्हणतं म्हणून, चहा आणि बियरच्या स्वादात थोडंसं का असेना पण साम्य आहे, यावर फक्त चहा घेणाऱ्यांनी, समाधान मानायला हरकत नसावी. लेखात चर्चिलेलं चहाप्रेम इतकं उतू जायला, काहीजण वेडेपणा (obsession) म्हणतीलही, पण अस्सल चहाप्रेमी याला, शुद्धतावादी (purist) हीच संज्ञा वापरतील! ----

वाचन 4467 प्रतिक्रिया 16