मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अशीच एक धुंद, सोनेरी सायंकाळ - (आणि अंतिम वगैरे सत्य)

चित्रगुप्त · · जे न देखे रवी...
अशाच एका धुंद, सोनेरी संध्याकाळी सहज फिरायला निघालो होतो सहज मंजे मुद्दामच … – मला स्वतःशीच मोठ्याने बोलण्याची खोड आहे – घरात उगाच तमाशा नको म्हणून बाहेर पडलो. नकळत पाय तळ्याकाठच्या शांत रस्त्यावर वळले – मनात तात्त्विक वगैरे विचार घोळत होते. कोs हं ? … मी कोण आहे ? मै कौन हूँ ? व्हू आयाम ? सोs हं ! … मी तो आहे. तो मी आहे. या साडेचार फुटी कुडीत अडकलेला - अविनाशी,अमर, स्वयंप्रकाशी आत्मा आहे मी निर्विकार चेतना आहे मी ब्रम्ह, मी सत्य, मी कैवल्य आहे मी कर्ता, मी भोक्ता, मी ज्ञाता आहे मी साक्षी, मी सर्वसाक्षी, मी निर्लिप्त- निखळ जाणीव आहे. मी अनंत आकाश आहे मी देहबुद्धीच्या पार - नात्यागोत्यांच्या पार - भौतिकतेच्या पार – मी केवळ परम चैतन्य आहे. परम सत्याच्या शोधात निघालेला - मी एक अविचल साधक आहे. अंतिम ज्ञानाशी संग करायला निघालेला - मी एक नि:संग यात्रिक आहे. भरकटलेल्या मानवाला मार्ग दाखवणारा - मी एक पथ - प्रदीप, एक दीपस्तंभ - मी एक निर्भीक, निर्भीड ज्वालामुखी आहे… – तेवढ्यात कसल्यातरी आवाजाने तंद्री तुटली. भडक मेकप वगैरे केलेल्या दोन तीन तरुण पोरी – माझ्याचकडे बघत खिदळत होत्या. अहाहा … यालाच म्हणतात धुंद सोनेरी सायंकाळ. अशा धुंद सोनेरी सायंकाळीच – चिरंतन सत्य उमगतं. अशा धुंद सोनेरी सायंकाळीच – जीवात्मा आणि परमात्म्याचं मीलन होतं … अशा धुंद सोनेरी सायंकाळीच …. फाssड … फाssड … “कौन है बे तू ? कब से देख रिया हूँ , साले कुछ भी बकेला है.. क्या नाम है बे तेरा ? “मी … मी… सखाराम गटणे … “शाम के टेम अंधेरे मे किधर जा रहेला है बे ? “ बेवडा है क्या ? या पागल है ? ये आपुन का एरिया है – आपुन का धंदे का टेम हो गया है अब - दफा हो जा ह्यां से, नै तो इधरिच डाल देगा तेरे को. समझा क्या ?” – धावतच सुटलो. कसाबसा घरी पोचलो. – हॅट साला, कुणाला कसली कदरच नाही. – शांतपणे कसला विचार करू म्हटलं, तर ते नाही… असो. – तर अशी ही आजची धुंद सोनेरी सायंकाळ.

वाचन 4356 प्रतिक्रिया 8