Skip to main content

एसटीचा संप : विलीनीकरण एकच मार्ग ?

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी रविवार, 21/11/2021 10:19 या दिवशी प्रकाशित केले.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात आपली सर्वांची लालपरी, एसटी याची सेवा देणा-या कर्मचाऱ्यांचे महाराष्ट्र शासनात विलीनीकरण करावे या एकमेव मुद्द्यावर आंदोलन सुरू असून गेली काही दिवसांपासून ऐन दिवाळीत आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सुरू झालेले काम बंद आंदोलन आजही सुरू आहे.

maha-st
बोधचिन्ह

आघाडी सरकार असो की मागील सरकार असो दोन्हीही सरकारांनी विलीनीकरण शक्य नाही अशा भूमिका घेतलेल्या होत्या. आणि मा.न्यायालयानेही याबाबतीत समिती नेमून निर्णय घ्यावा असे म्हटलेले आहे. एसटी तुलनेने स्वस्त आणि सुरक्षित आहे, म्हणून एसटी सर्वांसाठीच वेगळा विषय आहे, म्हणून हा काथ्याकूट.

एक नजर टाकूया एसटीच्या इतिहास भूगोलोकडे- देशातील सर्वसामान्य जनतेला दळणवळणासाठी किफायतशीर दरात' ना नफा ना तोटा' या तत्त्वावर राष्ट्रीयकरणाच्या माध्यमातून वाहतूक व्यवस्थेसाठी केंद्रसरकारने मार्ग परिवहन अधिनियम-१९५० तयार केला आणि त्या अन्वये राज्य मार्ग परिवहन महामंडळ स्थापन करण्यात आले. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजेच MSRTC ही संस्था एष्टीचा कारभार चालवते. ही एक स्वतंत्र संस्था असून त्यास सरकार काही प्रमाणात अनुदान देतं आणि बाकी पैसा एसटी उभी करते. सरकारचे परिवहन मंत्री एसटी महामंडळाचे अध्यक्ष असतात. एसटीची तिकिटं, गाड्या भाड्यावर देणे यातून एसटीला उत्पन्न मिळतं. एसटी कर्मचारी हा सरकारी कर्मचारी आहे, परंतु तो निमसरकारी आहे. एसटी कर्मचा-यांचे प्रश्न सोडविणे गरजेचे आहे, नसता एकदा की तिची चाके रुतून बसली की पुन्हा मग त्यातून बाहेर पडणे अशक्य आहे असे वाटते. एसटीचा प्रवास आणि सुविधा आपल्या सर्वांचाच हळवा विषय आहे, आपण सर्वच एसटीने प्रवास करून मोठे झालेलो आहोत आणि काही तर, एसटीची वाट पाहणारे कायम प्रवासी आहेत. आपल्या सर्वांचाच तो जिव्हाळ्याचा विषय आहे.

ST-bus
आपली एसटी

एसटीचे शासनात विलीनीकरण झाले तर कर्मचा-यांचे प्रश्न सुटणार आहेत का ? वेतन वाढणार आहेत का ? सध्याचे त्या कर्मचा-यांचे वेतन फारच तुटपुंजे आहे असे व्यक्तीगत मत आहे. दहा वर्षाच्या सेवेनंतर चालक वाहक यांचे वेतन सतरा हजाराच्या जवळपास जाते. मला वाटते प्रदीर्घ सेवेनंतरही मिळणारे वेतन आजच्या काळात कमी आहे.

एसटी गेली अनेक वर्ष कायम तोट्यात असल्याच्या बातम्या वाचनात येत असतात. लॉकडाऊन काळात तर एसटी जवळजवळ बंद अवस्थेत होती त्यामुळे तोट्यात असलेल्या एसटीच्या नुकसानीत अजूनच भर पडली. एसटीचे आर्थिक स्त्रोत वाढविण्यावरही भर दिला पाहिजे असे वाटते, एसटीच्या खूप जागा आहेत त्यात गाळे काढून ते भाड्याने देणे, निगा राखणे, व्यवसायीकरण वगैरे करून त्यावर भर दिला तर एसटीचा आर्थिक स्त्रोत वाढेल असे वाटते. प्रवाशांना वेगवेगळ्या दिल्या जाणा-या सवलती कमी केल्या पाहिजेत. तरच एसटीची अवस्था सुधारेल असे वाटते. आर्थिक चणचणीवरचा उपाय म्हणून नुकतेच तिकीट दरामधेही सतरा टक्क्यांनी वाढ करण्यात आली होती. अपुरे आणि वेळेवर न होणारे पगार.आगारांमधील वाईट परिस्थिती, एसटीच्या अनेक कर्मचा-यांनी आत्महत्या केल्याच्या बातम्या वाचनात येतात.

ऑक्टोबर अखेरीस कर्मचा-यांनी राज्यभर बेमुदत उपोषण सुरू केलेले आहे, राज्य सरकारने महागाई भत्ता बारा टक्क्यावरून अठ्ठावीस टक्के केला आहे, असे असले तरी एसटी कर्मचारी यावर नाखुष असून एसटी महामंडळाचं शासनात विलणीकरण करण्यात यावे हीच त्यांची मुख्य मागणी आहे. कोणत्याही संघटनेच्या नेतृत्वाशिवाय हे आंदोलन सुरू आहे.

एसटी शासनाच्या ताब्यात गेल्यावर सर्व प्रश्न सुटतील असे या एसटी कर्मचाऱ्यानं वाटते. एसटी विलीनीकरण कसे होऊ शकते ? एसटी महामंडळाची निर्मिती ही Road Transport corpaoration Act 1950 नुसार झालेली आहे. हा केंद्र सरकारचा कायदा आहे त्यामुळे या कायद्याखालचं महामंडळ बरखास्त करून ते राज्य शासनात विलीन करण्याची प्रक्रिया असेल. राज्य परिवहन महामंडळ कायदा १९५० अन्वये महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अस्तित्वात आलेले आहे, त्यावेळी राज्य सरकारचे आणि केंद्र सरकारचे भाग भांडवल यात गुंतविण्यात आलेले होते. कायद्यातील तरतुदीनुसार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ स्वायत्त राज्यसरकारची कंपनी किंवा राज्यसरकारचा विभाग म्हणून राहू शकतो. विलणीकरणासाठी केंद्रसरकारची परवानगी घेणे आणि त्यांचे भागभांडवल परत करणे आवश्यक असेल त्यानंतर महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळाच्या संचालक मंडळाने ठराव करुन आपला स्वायत्त दर्जा संपुष्टात आणून राज्याचा विभाग म्हणून राज्य सरकारने मान्यता द्यावी असा ठराव मंजूर करून राज्य सरकारला विनंती करणे गरजेचे आहे, अशावेळी महामंडळाची आताची रचना संपुष्टात येईल.

विलीनीकरणानंतर, एसटी कर्मचा-यांचे सर्व वेतन भत्ते सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे शासनावर आर्थिक भार पडेल. ( पडला तर पडू द्या) एसटीचे ९२ हजार कर्मचारी आहेत, त्यांची एकदा मागणी मंजूर झाली की इतर महामंडळाच्या कर्मचाऱ्याचीही मागणी पुढे येईल. देशात एकूण ५० पेक्षा अधिक परिवहन महामंडळे आहेत, केवळ आंध्रप्रदेश परिवहन महामंडळाचे राज्यशासनात विलणीकरण झालेले आहे, बाकी मंडळे अशी तशी आधारावर चालू आहेत.

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारली पाहिजे, एसटी कर्मचा-यांचे वेतन सुधारले पाहिजे. नव्या बसेस खरेदी केल्या पाहिजेत. भ्रष्टाचार कमी झाला पाहिजे. प्रवाशांच्या मार्गावर नियमित वेळेवर बसेस आल्या गेल्या पाहिजेत. कर्मचाऱ्यांची अरेरावी कमी होऊन नम्रपणा आला पाहिजे वगैरे मतं मांडण्यासाठी हा धागा.

काथ्याकूट विस्कळीत असला तरी, मुख्य विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्या विचारांचे स्वागत आहे. वीस बावीस वर्ष नियमित एसटीने प्रवास करीत राहीलो आहे. प्रवाशी संघटनेच्या माध्यमातून वेगवेगळ्या आंदोलनात प्रवाशांच्या बाजूने उभा राहीलो आहे. बाकी, काथ्याकूट माहिती संदर्भ आणि छायाचित्रे जालावरील चालूघडामोडी इतर संकलन यातून केलेले आहे, ते बरोबरच असू शकते असा दावा नाही. (चुभूदेघे)


वाचने 72665
प्रतिक्रिया 253

प्रतिक्रिया

असं कसं असं कसं ? कल्याणकारी रिक्षा सरकार आहे. अजून तीन वर्षे आहेत सोय लावलीच असती कि. आर्यन खान, वानखेडे, मलिक, वाझे, परमबीर सिंह, अनिल देशमुख यांचे धगधगते प्रश्न सुटले कि येणारच होते एस टी च्या प्रश्नाकडे. काय एवढी घाई आहे? एस टी चे कर्मचारीच महाराष्ट्रद्रोही आहेत.

In reply to by सुबोध खरे

पुरग्रस्तांना आणि गरीब शेतकरी वर्गाला पण सामील करा .... आता खाजगी वाहतूकीचे दर पण वाढले असतील, असे वाटते ...

https://www.loksatta.com/maharashtra/st-workers-protest-at-azad-maidan-… कॉंग्रेसच्या काळांत झालेल्या गिरणी कामगारांच्या संपाच्या वेळी देखील, योग्य वेळी माघार घेण्यात शहाणपणा होता. गिरण्यांच्या जमिनी मौक्याच्या ठिकाणी होत्या आणि बस स्थानके पण मौक्याच्या ठिकाणी आहेत.... आणि दोन्ही आंदोलनाच्या वेळी, नेमकी कॉंग्रेस सत्तेवर आहे, हा दुर्मिळ योगायोग आहे... अगदी कपिलाशष्ठी योगा सारखाच...

एसटी आंदोलकांचे नेतृत्व करणारे सदाभाऊ खोत यांनी आझाद मैदानातील आंदोलन मागे घेतले असून बाकी एसटी कर्मचारी जी भूमिका घेतील ते मान्य असेल असे म्हणून सध्या तरी ते आन्दोलनातून बाहेर पडत असल्याचे चित्र दिसत आहे. दुसरीकडे कर्मचारी मात्र विलीनीकरणाच्या मुद्यावर ठाम दिसत आहेत. आज आणि उद्या किती कर्मचारी नवीन वेतनवाढीचा मुद्दा स्वीकारुन कामावर रुजू होतात आणि एसटी रस्त्यावर धावायला लागते का ते चित्र स्पष्ट व्हायला अजुन दोन दिवस तरी वाट पाहावी लागेल. एकीकड़े वेतनवाढ देवून संपक-यात गट निर्माण व्हावे आणि आंदोलनाची तीव्रता कमी व्हावी असा एक प्लॅन सरकारकडून दिसत आहे. -दिलीप बिरुटे

आणखी नुकसान होईल . खासगी कारभार म्हणजे आतापेक्षा मोठ्ठा लोण्याचा गोळा मिळणार पण प्रवासी रस्त्यावरच येणार . मग आगारांंच्या जागांचे लिलाव होतील मॉल, स्टुडिओ यासाठी.

In reply to by कंजूस

सध्याच्या घडीला, कर्मचारी वर्गाने, जे काही पदरांत पडले आहे, ते स्वीकारायचे... आंदोलन परत करता येईल, पण नौकरी परत मिळणार नाही...

जे काही होत आहे ते दुर्दैवी आहे, सगळे एकत्र येऊन एखादी संस्था डबघाईस आणून ती बंद पाडणार हे स्प्ष्ट दिसत आहे. आपली लाडकी लालपरी अशी बुडताना पाहून मनःस्वी दु:ख होतेय !

In reply to by अप्पा जोगळेकर

विलीनीकरणाचा निर्णय आणि विलीनीकरण प्रत्यक्षात येणे, ह्यात कालापव्यय खूप होतो उदा, आर्सेनिक मित्तल.... शिवाय, माननीय शरद पवार यांच्या मते, आता आंदोलन करण्यात अर्थ नाही... अशा वेळी, माननीय शरद पवार यांचे ऐकण्यातच शहाणपणा आहे... दस्तूरखूद्द, अण्णा हजारे देखील, योग्य वेळी माघार घेण्यात, शहाणपणा दाखवतात...

In reply to by मुक्त विहारि

माननीय शरद पवार यांचे ऐकण्यातच शहाणपणा आहे...
बरोबर नाहितर एसटी कर्मचार्‍यांना कात्रज चा घाट दाखविला जाण्याची शक्यता आहे.

In reply to by धर्मराजमुटके

मौक्याच्या जागांचे श्रीखंड, काही व्यक्तींना ... गिरणी कामगारांच्या सारखे, भावना प्रधान होण्यात अर्थ नाही ... नौकरी सांभाळा .... पगार सलामत तो, आंदोलने हजार

In reply to by अप्पा जोगळेकर

वेतनवाढ फसवी असल्याचे त्यांच्यातील कर्मचारी नेत्यांचे म्हणणे आहे. (या बातम्या आंजा वर दिसत नाहीत, काढून टाकायला लावल्या की काय ?) "विलीनीकरण झालेच पाहिजे" ही आधी पासूनच ची मागणी आहे. गेल्या काही वर्षांच्या वेतनाच्या समस्येवर विलीनीकरण हाच उपाय आहे असे त्यांचे मत आहे.

याबाबतीत दुर्दैवाने ST कर्मचाऱ्यांचे म्हणणे समर्थनीय नाही. एक ST महिन्याला किती रेव्हेन्यू कमवत असेल? अगदी सम्पूर्ण सीट्स भरल्या तरी त्यातून ड्रायव्हर, कंडकटर, सपोर्ट स्टाफ, डेपो स्टाफ, मेंटेनन्स स्टाफ याना लागणारा सरकारी नोकरी इतका पैसा तिच्यातून निघत असेल काय? अर्थातच नाही. जेव्हा सरकारी नोकऱ्या कमी करण्याचा विचार चालू आहे, तेव्हा असे ऑपरेशनल स्टाफ सरकार ने आपल्या पे रोल वर घेणे योग्य ठरणार नाही. सरकार चा स्टाफ मुख्यतः स्ट्रॅटेजीक रोल्स आणि मॅनेजमेंट रोल्स वर घेतला जातो. त्यातून ST मध्ये प्रचंड प्रमाणात ओव्हरहेड स्टाफ असल्याची पण बातमी आहे. अर्थात याचे मॅनेजमेंट पूर्णपणे चुकलेले असून ती सरकारचीच चूक आहे कारण परिवहन मंत्री हे याचे अध्यक्ष (की चेअरमन काहीतरी) असतात. नको त्या ऑपरेशनल गोष्टी मध्ये executive pillar ला सामील करून घेतलं की असं काही तरी होतं. सरकारने आता एस टी संपूर्ण पणे प्रोफेशनल सरकारी नोकराच्या ताब्यात देऊन त्याचा सर्वांगीण कायापालट करण्याची गरज आहे. जमल्यास ST ने स्वतः चे स्टॉक ऑप्शन आणून कर्मचाऱ्यांना वाटप करायला हरकत नाही. पुढे ती फायद्यात आल्यावर ST कर्मचार्यांनाच फायदा होईल.

In reply to by रावसाहेब चिंगभूतकर

रावसाहेब चिंगभूतकर साहेब, बाकीच्या काही राज्यात तिथली एस टी महामंडळे राज्य सरकारच्या अखत्यारीत येतात. ते उत्पन्न vs खर्च हे गणित कसे जुळवत असतील ?
ST ने स्वतः चे स्टॉक ऑप्शन आणून कर्मचाऱ्यांना वाटप करायला हरकत नाही. पुढे ती फायद्यात आल्यावर ST कर्मचार्यांनाच फायदा होईल.
फार दूरचा उपाय वाटतो. असा प्रकार इतर कुठल्या राज्याने केला असेल तर वाचायला आवडेल.

In reply to by रावसाहेब चिंगभूतकर

पण स्टॉक ऑप्शन साठी खाजगीकरण आणि लिस्टिंग करावे लागेल की.
एक ST महिन्याला किती रेव्हेन्यू कमवत असेल? अगदी सम्पूर्ण सीट्स भरल्या तरी त्यातून ड्रायव्हर, कंडकटर, सपोर्ट स्टाफ, डेपो स्टाफ, मेंटेनन्स स्टाफ याना लागणारा सरकारी नोकरी इतका पैसा तिच्यातून निघत असेल काय?
ST तोट्यात आहे का फायद्यात आहे- ओव्हराल तोट्यात आहे हे स्पष्ट आहे. पण ST OPERATIONS चा १. सरकारी सुविधेचा भाग- म्हणजेच दुर्गम भागातील आणि खेडोपाड्यांमधले दळणवळणाचे एकमेव साधन. ३. कमर्शियल लाईन्स- ज्या जोरात चालतात. असे दोन भाग करून दोघांचे वित्तीय परफॉर्मन्स वेगवेगळे पहायला मिळाले तर ST नक्की किती पाण्यात आहे याचे चांगले दर्शन घडेल. अशी माहिती सापडली तर द्यावी.

In reply to by कॉमी

हा घोळ फार आधीपासूनच आहे मी, 1998 ते 2006 पर्यंत, लोटे परशुराम येथे नौकरी करत होतो तेंव्हा, चिपळूण ते खेड, ह्या बसेसची वारंवारता कमी होती आणि खाजगी गाड्यां शिवाय प्रवाशांना पर्याय न्हवता पण गेल्या 3-4 वर्षांत, ST ने ही वारंवारता वाढवली आता ह्या टप्प्यात उत्पन्न भरपूर आहे हीच गोष्ट, खेड आणि दापोली, ह्या टप्प्या बाबत अनुभवली.... 40-50 किमी अंतर आणि वारंवारता भरपूर असेल तर, उत्पन्न वाढते... एखादा वडाप वाला, महिन्याला 20-30 हजार, सहज कमावतो ... ही गोष्ट मला एका वडापवाल्यानेच दिली चिपळूण ते रत्नागिरी, ह्या मार्गावर खाजगी गाड्याच भरपूर चालतात जी गोष्ट, चिपळूण ते खेड आणि चिपळूण ते दापोली, ह्या मार्गावर घडली... तीच गोष्ट, चिपळूण रत्नागिरी ह्या मार्गावर का नाही? हा एक संशोधनाचा विषय आहे ...

एसटीबद्दल एक हळवा कोपरा आजही मनात आहे. आताशा एसटीचा फारसा प्रवास होत नाही पण लहानपणीच्या कितीतरी आठवणी एसटीभोवती गुंफल्या आहेत. एसटीचं रुपडं तरी किती सुंदर. अगदी लांबून उठून दिसणारा तिचा खास लाल रंग आणि त्यावरचा पिवळा पट्टा. खिडक्यांचा रंग. सीटांचा हिरवा रंग. अगदी नऊवारी नेसणार्‍या प्रेमळ आजीची आठवण यावी. ज्या कोणी ही रंगसंगती शोधली त्याला सलाम. लहानपणी एसटीचं सगळं जगच अदभूत वाटायचं. प्रचंड गर्दीत उभा राहून लोखंडी खांबावर टक टक आवाज करत तिकीटं विकणारा तो कंडक्टर. त्याची ती अल्युमिनियमची तिकीटपेटी. त्यावरचे वेगवेगळे तिकीटाचे पांढरे गठ्ठे. त्याचं ते तिकीट पंच करायचं ते यंत्र ! गळ्यात अडकवलेली पैसे ठेवायची कातडी बॅग. आपण गाव सांगितल्यावर पटापट दोन चार गठ्ठ्यातून तिकीटं फाडून ती योग्य ठिकाणी पंच करून ती आपल्या हातात जेव्हा तो द्यायचा तेव्हा जाम आदर वाटायचा त्याचा. सगळा हिशेब कसा करत असेल हा. बरं तिकीटावर नुसते पाढे लिहिल्यासारखे दोन रांगेत आकडे छापलेले असायचे. नेमकं कुठे पंच करायचं हे कसं कळत असेल याचं अजूनही कुतूहल आहे. कंडक्टरचा सगळ्यात जास्त हेवा वाटायचा जेव्हा तो घंटी वाजवायचा ! एसटी सुरु करायची आणि थांबवायची पावर त्याच्याकडे आहे हे पाहून त्याचा आदर अधिकच दुणावायचा. दोन घंट्या दिल्या की एसटी सुरु आणि एक घंटी दिली की एसटी थांबणार म्हणजे थांबणारच ! कधीतरी आपल्यापण ती दोरी ओढून घंटी वाजवायला मिळावी ही एसटीने प्रवास केलेल्या प्रत्येक मुलाचं स्वप्न असायचं. कंडक्टर तिकीटं काढून झाली की आपल्या जागेवर जाऊन हिशेब जुळवत बसणार. कधी कधी हिशेब जुळला नाही तर पुन्हा शिरगणती करायला लागायची. एवढं काम झालं तरी कधी कधी एसटी च्या टपावर सामान चढवायला पण त्याला मदत करावी लागायची. पूर्वी एसटीला एकच दरवाजा असायचा तो मागच्या बाजूला. त्या एसट्यांना ड्रायव्हरच्या मागे एक लांब पाच माणसं बसेल अशी मोठी सीट असायची. ड्रायव्हरकडे पाठ करुन बसावं लागे. लहानपणी बराच प्रवास त्या आडव्या बाकावर गुढग्यावर बसून वरच्या जाळीत बोटं अडकवून आणि तासनतास ड्रायव्हरकडे आणि समोरच्या रस्त्यावरची वाहतूक पहात केला आहे. आता विमानाच्या कॉकपीटचं जेवढं कुतूहल वाटतं तेवढच कुतूहल मला एसटी च्या कॉकपीटचं वाटायचं. ड्रायव्हरचं सीट, त्याच्यासमोरचं ते भलं मोठं व्हिल ! त्याच्या समोरचा तो अगम्य डॅशबोर्ड. उजव्या हाताला वरच्या बाजूला अजुन काही बटणं असायची. आणि साईड इंडीकेटर म्हणून चक्क एक बाण लटकवलेला असायचा. आतून एक दोरी ओढली की तो बाण काटकोनात वर जायचा ! ड्रायव्हरच्या डाव्या हाताला असणारा दोन फुटाचा आणि विचित्र कोनातला तो गिअर ! त्याच्याही डाव्या बाजुला असणारी लाकडाची पेटी ! त्या पेटीवर बसून प्रवास करायला मिळणे म्हणजे पर्वणी वाटायची. " गाडी चालू असताना वाहनचालकाशी बोलु नये" अशी ताकीद समोर लावलेली असायची. पण हा वाहनचालक कधीच कुणाशी गप्पा मारत बसलेला मी पाहिलेला नाही. अगदी कंडक्टर बरोबर सुध्दा. एसटी स्टँड ही एक वेगळीच परिसंस्था ! तिथली ती गर्दी. वेगवेगळे फलाट, तिथल्या त्या स्पिकर वर होणार्‍या घोषणा, स्टँडवर असलेली रसवंती गृहे आणि त्याचा तो घुंगरु लावलेला आवाज. एसटीच्या बाहेरुन विविध पदार्थ आणि वर्तमान पत्रे विकणारी मंडळी, बुकस्टॉल्स, तिथली उपहार गृहे सगळंच खास ! आयुष्यातलं पहिलं पॉपीन्स मी या एसटी स्टँडवर खाल्लं. किंबहुना एसटी आणि पॉपीन्सच्या गोळ्या हे समीकरण माझ्या घट्ट डोक्यात बसले आहे. पुर्वी गाड्या फलाटाला रिव्हर्स करुन लागत. स्टँडवर बसलेल्या माणसाला कुठली गाडी लागली हे पहायला पुढे जावे लागायचे. गावातल्या महत्वाच्या दुकानांच्या जाहिराती एसटी स्टँडवर पहायला मिळायच्या. एशियाड यायच्या आधी रातराणी नावाचा एक प्रकार होता. रात्रीचा प्रवास करणारी रातराणी ! त्याचे नावच फार भारी वाटायचे. उन्हातान्हात, पावसापाण्यात, काटाकुट्यात गावाकडच्या मातीच्या रस्त्यात धूळ उडवत माणसांसाठी धावणारी एसटी, नुसता एक प्रवासी असला किंवा एकही नसला तरी आपल्या नियोजित वेळेला निघणारी हक्काची एसटी, तालुक्याला शाळेत शिकणार्‍या मुलांना आपल्या आईने केलेली भाजी भाकरी मायेने वेळेवर पोचवणारी एसटी, अडनिड्या रस्त्यावर , रात्री अपरात्री वाटसरुंना आधार वाटणारी एसटी ही केवळ वाहतुकीचे साधन नाही तर आजही अनेकांच्या जगण्याचा मार्ग आहे आणि आधारही आहे. ती जगायला हवी इतकंच. ( फॉरवर्ड लेखन, कोणाचे ते माहिती नाही.अनामिक लेखकाकड़ून लेखन साभार - वाट्सएप)

पूर्वी पुणे ते कोल्हापूर जाताना सातारा स्थानकावर गाड्या थाम्बायच्या आता आत गावात जावे लागत नाही सातारा स्थाहनक हे त्यावेळी तरी फारच भव्य वाटायचे कारण खूप फ्लॅट होते.. रेल्वे जंक्शन कसे खास असते तसे एसटी चे ते जंक्शन .. आणि सकाळी किंवा पहाटेचं वेळेस पौनीहून निघालेल्या गाड्या साधारण ९-१० चाय सुमारास नाश्त्याला साताऱ्यास थांबायच्या. महाराष्ट्रातील सर्वात व्यस्त एस टी कँटीन साताऱ्याचे असावे असे वाटायचे.. नेहमी झटपट काहीतरी उप्पीट , पोहे, वडे खाणे व्हायचे पण तयावेळेस त्या १०-१५ मिनटात आत फॅमिली रूम मध्ये बसलेली कुटुंब बस ना चुकविता संपूर्ण थाळी कशी काय बुवा पटकन खाऊन घेतात याचे आश्यर्य वाटायचे याशिवाय कवठे महांकाळ , जमखंडी अशी नावे असलेलया एसटीत बसलो पण त्या गावापर्यंत कधी पोचलो नाही याशिवाय , स्टुडंट कन्सेशान चे पंत्र बरोबर घेऊन पश्चिम महाराष्ट्रात ट्रेकिंग साठी लालपरी ने अडनिड्या मुक्कामाचं इष्टया पकडल्या आहेत एकदा तर एक रात्र टपावर झोपायला हि मिळालं होत ( साथीला थंडी, थोडी ओल्ड मंक आणि भडंग )

In reply to by चौकस२१२

मागे बातमी वाचली होती की सातारा स्टँडचे एसटी क्यान्टीन अमुक इतक्या दशकांपासून एकदाही बंद झालेले नव्हते. (24x 7 चालूच). तसे असूही शकेल. सातारा एसटी स्टँडमधे नेहमी चांगला आलेपाक उपलब्ध असे. कुठेही जाता येता नेहमी मध्यरात्री लागणारा हा एसटी स्टँड त्या कारणाने लक्षात आहे.

In reply to by गवि

मला इथे ST थांबली की भूक लागायची.आवडता कायम उपलब्ध असणारा पदार्थ म्हणजे कट वडा आणि मग त्यावर चहा. तेवढ्यात एसटी सुटायची वेळ होतच असे. बाकी तो ST स्टँड भला मोठा आहे असं माझंही मत होतं.

एस टी बद्दलच्या हळव्या आठवणी आणि रुक्ष वस्तुस्थिती यात फरक आहे. एम टी एन एल च्या फोन बद्दल असेच म्हणता येईल

In reply to by सुबोध खरे

+1 आणि ज्या क्षणी अन्य पर्याय उपलब्ध झाले (एखाद्या ग्रामीण मार्गावर पुढे खाजगी बसेस सुरु होणे, किंवा आपण ते परवडण्याच्या रेंजमधे पोचणे.. ) त्या क्षणी एसटी सोडून ते ते पर्याय घेतले गेले हेही मान्य. एसटी ही मजबुरीच्या काळातले वाहन असेच समीकरण अनेक जणांच्या बाबतीत राहिले आहे. (आर्थिक प्रगती केलेल्या किंवा गावाकडून मोठ्या शहरात आलेल्या) तेव्हा एसटीच्या बालपणीच्या आठवणींना निव्वळ नोस्ताल्जियाचे कढ याउपर अर्थ नाही हे मान्यच. आणि तरीही आजही अनेकांना तिचा आधार आहे हेही सत्य.

In reply to by गवि

तरीही आजही अनेकांना तिचा आधार आहे हेही सत्य. हा मुद्दा पण आहेच, एसटी बस वर एक अख्खी इकॉनॉमी अवलंबून आहे, कित्येक भविष्य सुद्धा, गावातून सकाळच्या बस पकडून शहरात ताजा शेतीमाल, दुग्धपदार्थ घेऊन येणारे मार्जिनल शेतकरी, लेबर अड्ड्यावर येणारे मजूर, इस्पितळे रुग्णालयात येणारे रुग्ण लोक, गावातून बसेस पकडून तालुक्याला शाळेत जाणारी चप्प तेल लावून भांग पाडलेली पोरं, तितक्याच तेलकट वेण्या लाल रिबिनीनं बांधून शाळेत जाणाऱ्या चटपटीत पोरी, सगळ्यांचे असंख्य ऋणानुबंध आहेत हे.

In reply to by गवि

अन्य ठिकाणी दिलेल्या प्रतिसादच इथे परत देतो आहे. एस टी हि फायद्याच्याच चालली पाहिजे हा आग्रह मुळात चूक आहे. जसे मागासवर्गीयांना फी मध्ये सवलत दिली जाते, आर्थिक दुर्बल घटकांना रेशन वर फुकट धान्य दिले जाते किंवा शेतकऱ्यांना/ गरिबांना काहि रक्कम थेट खात्यात जमा केली जाते तद्वत खेड्यापाड्यातील लोकांना वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून देणे हा ही सरकारच्या कल्याणकारी कार्यक्रमाचा एक भाग असला पाहिजे. त्यामुळे एस टी हि नफ्यातच राहीली पाहिजे हा आग्रह सोडला पाहिजे यासाठी येणारा तोटा काही प्रमाणात सरकारने सहन केला पाहिजे. याचबरोबर उत्तम प्रशासक नेमून त्यात प्रशासकीय/ राजकीय व्यत्यय आणि लागेबांधे न आणता एस टी चा कारभार परत रुळावर आणला पाहिजे. यासाठी वरिष्ठ नागरिक स्वातंत्र्य सैनिक पासून सोम्या गोम्याला दिल्या जाणाऱ्या सवलती सुद्धा कठोरपणे रद्द केल्या पाहिजेत. केवळ शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळा चालू असलेल्या काळातच सवलती देऊन बाकी सर्व सवंग लोकप्रियतेच्या गोष्टींना फाटा मारला पाहिजे. याच बरोबर एस ती महामंडळाला दिली जाणारी सबसिडी महिनोन्महिने ठाकणार नाही याची खात्री सुद्धा केली गेली पाहिजे. परंतु केवळ एस टीच्या लोकांना सरकारी नोकरीत सामावून घेतले पाहिजे हा आग्रह चूक आहे. कारण याला मान्यता दिली तर अनेक महानगर पालिका पासून इतर सर्व महामंडळे यांच्या कर्मचाऱ्यांना सुद्धा सरकारी नोकरीत सामावून घेतले पाहिजे यासाठी आंदोलने सुरु होतील. आणि मग उत्पन्न चार आणे आणि खर्च रुपया सारखी स्थिती होऊन राज्य दिवाळखोरीत जायला वेळ लागणार नाही. यासाठी भरघोस पगार वाढ दिल्यानंतर संप चालू ठेवला तर तो कठोरपणे मोडून काढला पाहिजे. असा प्रतिसाद पचणारा नसला तरी वास्तव आहे

In reply to by सुबोध खरे

एस टी हि फायद्याच्याच चालली पाहिजे हा आग्रह मुळात चूक आहे.
सहमत.
केवळ एस टीच्या लोकांना सरकारी नोकरीत सामावून घेतले पाहिजे हा आग्रह चूक आहे. कारण याला मान्यता दिली तर अनेक महानगर पालिका पासून इतर सर्व महामंडळे यांच्या कर्मचाऱ्यांना सुद्धा सरकारी नोकरीत सामावून घेतले पाहिजे यासाठी आंदोलने सुरु होतील.
सहमत.
भरघोस पगार वाढ दिल्यानंतर संप चालू ठेवला तर तो कठोरपणे मोडून काढला पाहिजे.
सहमत. -दिलीप बिरुटे

In reply to by सुबोध खरे

एस टी हि फायद्याच्याच चालली पाहिजे हा आग्रह मुळात चूक आहे. सहमत परंतु दुर्दवाने या तत्वाचा दुरुपयोग करून एसटी काय किंवा किणतेही सरकारी मालकीची सेवा/ उद्योग "तोट्यात गेली तर काय बिघडल" असे टोकाला जाण्याची प्रवृत्ती वाढली म्हणून लोक पण चिडून खाजगी करण करा.. म्हणतात .. सरसकट खाजगी करनं हि हि टोकाची भूमिका झाली जगात सर्वांतर सरकारी + खाजगी असे समीकरण राबवले जाते आहे त्याची नोंद घेताय का कोणी? उपनगरीय बस सेवा खाजगी कडे कंत्राटाने त्राटाने दिलेली आहे, कडक नियम आहेत, तोट्यातील जे मार्ग आहेत ते चालू ठेवण्याचे बंधन आहे ,, सेव तीच फक्त सरकार चा पैसे अडकून राहत नाही, बस थांबे सरकारी पण बसेस खाजगी कंत्रादाराची

एसटी कर्मचा-यांच्या संप भाजपा नेत्यांनी माघार घेतली तरी कर्मचारी अजूनही आझाद मैदानावर बसून आहेत. संख्या रोडावलेली असली तरी त्यांची हिम्मत अजूनही कायम आहे, आणि विलीनीकरणाशिवाय माघार घ्यायचीच नाही असे सर्वच कर्मचारी यांची ठाम भूमिका आहे. दुसरीकडे संप मागे घेतला तरच पगारवाढ करु अशी भूमिका परिवहनमंत्री यांनी घेतली आहे.पगारवाढीच्या निर्णयानंतर काही कर्मचा-यांनी दोनेक दिवसांची रुजू होण्यासाठी दोनेक दिवसांची मूदत मागितली आहे, त्यानंतर मात्र कोणतीही सवलत मिळणार नाही आणि कर्मचा-याविरुद्ध त्यांची कार्यवाही सुरु राहील असे म्हटले आहे. आत्तापर्यंत बारा हजार कर्मचारी कामावर परतल्याचे अधिकृत एसटी विभागाकडून सांगितले गेले असून काही ठिकाणी एसटीचा प्रवास सुरु झालेला दिसतो. कर्मचा-यांच्या बाजूने कोणीही कर्मचारी एसटी कामावर रुजू झालेलं नाही. एसटी कर्मचा-यांचम आंदोलन मोडून काढण्यासाठी अशा अफवा पसरवल्या जात असल्याचे त्यांचे म्हणने आहे. परिवहन मंत्री यांनी एसटीच्या अधिकृत संघटनेशी कालही बोलणी केली. आता वेतनवाढ केलेली आहे, संप मागे घ्यावा आणि कामावर रुजू व्हावे, एसटीच्या संपामुळे प्रवाशांचे हाल होत आहे, आणि एसटीसाठी हे काही भले नाही अशी मत मांडले आहे. एकूणच आता प्रकरण न्यायालयात आहे, आणि तोपर्यंत तरी शासन विलीनीकरणाचा निर्णय घेणार नाही. समितीचा अहवालानंतर ही कार्यवाही होणार आहे, आज तरी कर्मचारी आपल्या हट्टावर कायम आहे, पुढे काय होणार हे काळच ठरवेल असे वाटते. -दिलीप बिरुटे

आपल्याला शासकीय सेवेत सामावून घेतलेच पाहिजे असा कोणताही कायदेशीर हक्क एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा नाही. ते त्यांच्या सेवाशर्तीचा अजिबात भाग नाही. केवळ संख्याबळावर दंडेली करत असतील आणि त्याला सरकार झुकले तर एक अनिष्ट पायंडा पडेल आणि सगळ्याच महामंडळाचे कर्मचारी उद्या संपावर जाऊ लागतील. शेतकऱ्यांच्या संपामुळे श्री मोदी सरकारने ते कायदे मागे घेतले म्हणून आम्ही पण आमच्या मागण्या मान्य होईस्तोवर संप मागे घेणार नाही हि दंडेली आहे. मोदी सरकारने ते कायदे मागे घेतले त्याची पार्श्वभूमी साफ वेगळी आहे. एकतर त्या कायद्याना सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली आहे त्यामुळे ते मुळात कार्यवाहीत आलेलेच नाहीत. त्यामुळे मंदीत भाकड गाय ब्राम्हणाला दान करून गोदान केल्याचे पुण्य मिळवण्या सारखे श्री मोदी यांनी उत्तर प्रदेशाच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कायदे मागे घेऊन पुण्य मिळवले आहे. बाकी विरोधकांना भूभू:कार करून जे करायचे आहे ते करू द्या त्यातून त्याला पंजाबच्या अशांततेची आणि देशद्रोही लोकांच्या कारवायांची पार्श्वभूमी आहे.ज्यात श्री मोदी याना धोका घ्यायचा नाहीये. तो एक वेगळा विषय आहे.

In reply to by सुबोध खरे

आपल्याला शासकीय सेवेत सामावून घेतलेच पाहिजे असा कोणताही कायदेशीर हक्क एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा नाही. ते त्यांच्या सेवाशर्तीचा अजिबात भाग नाही.
महामंडळ, त्यांच्या सेवाशर्ती याची काही लिंक आहे का हो डॉक्टरसाहेब. काही माहीती असेल तर इथे धाग्यात डकवावी. महामंडळे त्यांची धोरणे. वेतन. करार. इतर अशा सर्व गोष्टींची चर्चा या निमित्ताने करायला हरकत नाही त्यामुळे असे करता येते का आणि त्याच्यातल्या अडचणी कोणत्या किंवा करता येत असेल तर त्याची धोरणे पुढे कशी राहतील. एसटीचा दर्जा सुधारेल की अजून रसातळाला जाईल तेही या निमित्ताने पाहता येईल.
केवळ संख्याबळावर दंडेली करत असतील आणि त्याला सरकार झुकले तर एक अनिष्ट पायंडा पडेल आणि सगळ्याच महामंडळाचे कर्मचारी उद्या संपावर जाऊ लागतील.
या मताशी सहमती आहेच.
शेतकऱ्यांच्या संपामुळे श्री मोदी सरकारने ते कायदे मागे घेतले म्हणून आम्ही पण आमच्या मागण्या मान्य होईस्तोवर संप मागे घेणार नाही हि दंडेली आहे.
अवांतर वाढेल, गदारोळ वाढेल म्हणून या विषयावर मौन बाळगतो.
मोदी सरकारने ते कायदे मागे घेतले त्याची पार्श्वभूमी साफ वेगळी आहे.
मौन.
एकतर त्या कायद्याना सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली आहे त्यामुळे ते मुळात कार्यवाहीत आलेलेच नाहीत. त्यामुळे मंदीत भाकड गाय ब्राम्हणाला दान करून गोदान केल्याचे पुण्य मिळवण्या सारखे श्री मोदी यांनी उत्तर प्रदेशाच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कायदे मागे घेऊन पुण्य मिळवले आहे.
मौन.
बाकी विरोधकांना भूभू:कार करून जे करायचे आहे ते करू द्या
मौन.
त्यातून त्याला पंजाबच्या अशांततेची आणि देशद्रोही लोकांच्या कारवायांची पार्श्वभूमी आहे.ज्यात श्री मोदी याना धोका घ्यायचा नाहीये.
मौन.
तो एक वेगळा विषय आहे.
सहमत आहे. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

त्यातून त्याला पंजाबच्या अशांततेची आणि देशद्रोही लोकांच्या कारवायांची पार्श्वभूमी आहे.ज्यात श्री मोदी याना धोका घ्यायचा नाहीये. मौन. का हो बोला कि बिनधास्त ... या बाबतीत पक्ष प्रेम / विरोध बाजूल ठेऊन एक भारतीय म्हणून बोला.. आंदोलनाचे बीज अगदी शुद्ध होते असे समजले आणि त्यात " भाजपाला दणका " हा हेतू "नवहता " असे गृहीत धरले तरी या आंदोलनात भारतविरोधी खलिस्तानवादी घुसले नवहते असे जर म्हणणे असेल तर किती उद्धरणे देऊ? भारतातील आणि बाहेरील... जरा जिल्ह्याचं बाहेर बघा हे खलिस्तानवादी जगभरातील भारतीय हिंदूंच्या उत्सवाच्या इथे मोर्चे काढता आणि गोंडस नाव काय तर म्हणे फार्मर युनिटी ! आणि आपण मौन पाळणार ! बघुयात ना २६ जानेवारी ला काय वाढून ठेवलाय ते ... भारताचे "डेथ बाय थाऊसंड कट्स" हे ऐकलंय काय .. मौनाने त्या सुरीला धार लावल्यासारखे होईल

In reply to by सुबोध खरे

फाट्यावर मारणारा महानायक वगैरे याच संस्थळावर लिहिले गेले होते. लिहिणारे तुम्ही नव्हता पण म्हणून पापक्षालन करण्यातून तुमची सुटका नाही. एवढं मधाळ मोदी देखील स्वतःबद्दल लिहू शकले नसते.

विषयात शेतकरी कायदे कुठून आले मधेच ते कळेना झालं आहे. &#128562

१. एसटी च्या नावात महाराष्ट्र राज्य असे शब्द आहेत. वेबसाईटवरही msrtc.maharashtra.gov.in असे आहे. हे काय आहे? २. घरातल्या सदस्यांकडून आपण दररोजच्या जेवणाचे पैसे घेतो का? मग एसटी कडून टोल का घेतला जातो? ३. मग एसटी ने अपंग, शालेय विद्यार्थी, आमदार यांना सवलत का द्यावी? ४. एसटी ५० सिटांची असते. जेथे अगदी कमी प्रवासी असतात तेथे टेम्पो, लहान वाहन अशा सुविधी निर्माण करण्याची जबाबदारी अधीकार्यांची, मंत्र्यांची आहे का चालक वाहकाची? ५. शिवशाही खाजगी बसेस आहेत. आपल्याच घरात कुणी भाडेकरू ठेवतो का? ६. वर्षातून एखाद वेळी एसटीत बसणार्‍यांना एसटी कर्मचार्‍यांचे दुखणे काय आहे हे समजेल का?

व्यवस्थापनात development and diversification आसे काहीतऱी आसते आणी त्या करता महामंडळ जबाबदार आसते. यश्टी सुरू झाल्या पासुन कुणाची डेव्हलपमेंट झाली? आता आसे म्हणावे लागेल आत्याबाईला मिशा आसत्या तर!

In reply to by कर्नलतपस्वी

महामंडळाचा अध्यक्ष हा डीफॅक्टो अन बाय डिफॉल्ट राज्य परिवहन मंत्री असतो, त्यामुळे महामंडळ म्हणजे ड्रायव्हर कंडक्टर डायव्हर्सिफाय अन डेव्हलपमेंट करतील हे शक्य नाही, कारण त्यांना मुळात तितकी डिसीजन मेकिंग पॉवरच दिली गेली नाहीए

In reply to by जेम्स वांड

निर्णय क्षमता आसणाराच डेव्हलपमेंट करू शकतो यात दुमत नाही. कधीकाळी आम्हीपण कण्डाक्टर बनण्याची स्वप्न बघत होतो पण तेव्हांसुद्धा दाम किवां नाम नसल्याने दिवसभर लाईनीत थांबून सध्याकाळी घरी परतलो.

@पाभे, परफेक्टली सेड. ड. विलिनी करण करण्याची मागणी लाऊन धरण्याची का वेळ आली ? ढ. बाकीच्या काही राज्यात तिथली एस्टी महामंडळे राज्य सरकार च्या अखत्यारीत का असतात ? इतर मंडळे पण "विलीनीकरण करा" अशी मागणी करतील ही भीती त्यांना नसते का ? का नसते ?

१९५० च्या मार्ग परिवहन मंडळ कायद्याने झाली आहे. तो केंद्र सरकारचा कायदा आहे. त्या कायद्यानेच केवळ महाराष्ट्रच नाही तर इतर राज्यातली मंडळे पण अस्त्वित्वात आली. तेलंगणा राज्य परिवहन मंडळाच्या साईट वरील त्या कायद्याचा दुवा आपल्या एस.टी. च्या साईट वर हा कायदा मिळाला नाही. असो. त्या कायद्यातच वेगळे परिवहन मंडळ स्थापन करण्यासाठी सांगितले आहे. हे मंडळ सुरु करताना केंद्राचे आर्थिक वा इतर काही स्टेक्स असतील तर माहित नाही, असतील त्यांना विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बोलवावे लागेल. ह्याशिवाय विलिनीकरणासाठी केंद्राची मंजुरी लागेल, ही पहिली पायरी, अजुन काय करावे लागेल ते माहित नाही. 39. Liquidation of a Corporation.—(1) No provision of any law relating to the winding up of companies or corporations shall apply to a Corporation, and no Corporation shall be placed in liquidation save by order of the State Government concerned and save in such manner as may be directed by that Government: Provided that no such order shall be made by any State Government except with the previous approval of the Central Government. (2) In the event of a Corporation being placed in liquidation, the assets of the Corporation, after meeting the liabilities, if any, shall be divided among the 2 [State Government] and such other parties, if any, as may have subscribed to the capital in proportion to the contribution made by each of them to the total capital of the Corporation.

In reply to by अनन्त अवधुत

उत्तम दुवे उत्तम माहिती आभार. विलीनीकरणाची प्रक्रिया फार सोपी नाही. मूळ प्रस्तावात त्याचा उल्लेख केलाच आहे, त्यास वेळ लागेल. मा. न्यायालयापुढे जेव्हा समितीचा अहवाल येईल तेव्हा विलीनीकरणाचा निर्णय मा. न्यायालय घेणार नाही असे वाटते. मा. न्यायालय सरकारला विलीनीकरणाचा आदेश देणार नाही. सरकार म्हणेल की त्यांच्या वेतनाचा प्रश्न सोडवला आहे विलनीकरणाची गरज नाही किंवा असे केल्यास इतर महामंडळे सुद्धा विलीनीकरणासाठी पुढे येतील आणि महाराष्ट्र सरकारची आर्थिक स्थिती यंव आहे आणि त्यंव आहे, त्यामुळे आम्ही विलीनीकरण करु शकत नाही असे ते म्हणतील. पर्यायाने एसटी कर्मचा-यांना माघार घ्यावी लागेल. आणि ते जर तसे करणार नसतील तर एसटीचे हस्तांतरण होऊन कोणी खासगी उद्योगपती ती चालवायला घेईल आणि एसटी कर्मचा-यांचे अडचणी अधिक वाढतील असे वाटते. आणि कर्मचारी तर विलीनीकरणासाठी हट्टाला पेटून उठलेले आहेत त्यामुळे एसटीचा प्रश्न आता सुटण्याचे कोणतेही लक्षण दिसत नाही. -दिलीप बिरुटे

कामगार व त्यांच्या नेतेमंडळींकडून पॉझीटीव्ह रिप्लाय जात नसल्याने त्यांच्या बाबत इतरांचे मत अयोग्य बनत आहे. त्यांनी गेल्या शतकातल्या कामगारांसारखा संप करू नये. अन्यथा त्यांचीच प्रतिमा मलीन ठरवून महामंडळाचे पदाधिकारी त्यांची पोळी भाजून घेतील हे नक्की. अर्थात माझे वैयक्तिक मत हे चालक, वाहक, कामगारांप्रती आहे. राज्य सरकारने/ महामंडळाने नवे नवे उत्पन्नाचे मार्ग शोधावेत. त्यात एसटी कामगारांना सहभागी करावेत. खंडीभर संघटना रद्द करून एकच एक संघटना करावी. अन ती देखील कोणत्याही राजकीय पक्षाची नको. जेथे पाच प्रवासी असतात तेथे पन्नास प्रवासी क्षमतेचे वाहन पाठवण्यात कुणाची गच्ची धरावी? अधीकारी, नेते की चालक वाहक? साधा कॉमनसेन्स आहे. मग हे अधीकारी गेले चाळीस पन्नास वर्षे काय करत होते? एकच पर्याय आहे, खाजगी प्रमाणे सरकारी एसटी चालवावी, पण एसटीचे खाजगीकरण कदापीही करू देवू नये. (एसटी कशी चालवावी याची पडताळणी केपीएमजी या खाजगी संस्थेकडून करवून घेत आहेत यावर हसावे की रडावे?) हे आंदोलन अतिशय बेजबादारपणे हाताळले गेले आहे. कामगारांचा हक्क आहेच आंदोलन करण्याचा. अन एसटी कामगारांचा तर अधीकच आहे. पण त्यांना योग्य वागणूक देण्याचे काम तेथील डायरेक्टर बोर्ड, पर्यायाने सरकारचे होते. ती जबाबदारी त्यांनी अयोग्य हाताळली आहे.

१. एसटी च्या नावात महाराष्ट्र राज्य असे शब्द आहेत. वेबसाईटवरही msrtc.maharashtra.gov.in असे आहे. हे काय आहे?
महामंडळ ही शासनाच्या अखत्यारित असलेली एक संस्था आहे. A corporation is a legal business entity in which the owners are protected from liability for the actions and financial position of the company. Unlike owners or shareholders, a corporation can exercise most of the rights and obligations owned by an independent business owner, meaning that a corporation can enter into contracts, collect money, file fines and lawsuits, acquire property, and pay taxes. It can also hire contractual or permanent staff not on the payroll of the owners or the shareholders, but that of the corporation itself.
२. घरातल्या सदस्यांकडून आपण दररोजच्या जेवणाचे पैसे घेतो का? मग एसटी कडून टोल का घेतला जातो?
कारण ही एक वेगळी कंपनी आहे, जी फायद्यासाठी किंवा सेवेसाठी चालवायची असते. ही शासनाचा भाग नाही. शासनाच्या बॅलन्स शीट वर याचे खर्च, फायदे वगैरे दिसत नाहीत. जर टोल घेतला नाही तर तो खर्च शासन कोणत्या head खाली दाखवणार?
३. मग एसटी ने अपंग, शालेय विद्यार्थी, आमदार यांना सवलत का द्यावी?
कारण हे कॉर्पोरेशन सेवेसाठी तयार केलेले आहे, फायद्यासाठी नाही. त्यामुळे ते तयार करताना त्यात अंतर्भूत उद्दिष्टांमध्ये एक उद्दिष्ट हे समाजाच्या सर्व थराना परवडणारी आणि सर्व लोकांपर्यंत पोचणारी सेवा देणे हे आहे.
४. एसटी ५० सिटांची असते. जेथे अगदी कमी प्रवासी असतात तेथे टेम्पो, लहान वाहन अशा सुविधी निर्माण करण्याची जबाबदारी अधीकार्यांची, मंत्र्यांची आहे का चालक वाहकाची?
परिवहन मंत्र्यांची कारण ते याचे अध्यक्ष आहेत. पण हा त्यांचा रोल मंत्री या नात्याने नव्हे तर महामंडळाचे अध्यक्ष या नात्याने आहे. मंत्री या रोल मध्ये असणे हा त्यांना सोयीचे आहे कारण त्यामुळे याबद्दल चच्या निर्णयांची अमलबजावणी ते तातडीने करू शकतात. पण मंत्री हाच अध्यक्ष असणे हे लिगली mandatory नाही (नसावे).
५. शिवशाही खाजगी बसेस आहेत. आपल्याच घरात कुणी भाडेकरू ठेवतो का?
यात चुकीचे काय आहे? माझ्या कंपनीत कायम कर्मचारी आहेत, काँट्रॅक्टर्स आहेत तसेच माझी कंपनी दुसऱ्या कंपनी ला काम ऑफलोड करू शकते.
६. वर्षातून एखाद वेळी एसटीत एसटी कर्मचार्‍यांचे दुखणे काय आहे हे समजेल का?
कृपया आपल्यासारख्या व्यक्तीने असला युक्तिवाद करू नये. हा असला युक्तिवाद शरद पवार करतो. "ज्याने कधी हातात नांगर धरला नाही त्याला शेरकर्यांचे प्रश्न काय कळणार". मी एकदाही रॉकेट ने space मध्ये गेलो नाही याचा अर्थ मी रॉकेट्स design करू शकत नाही का? सगळ्यांना नक्की प्रश्न काय आहे ते माहिती आहे. त्या साठी ST मध्ये दीर्घ काळ काम करणारे मॅनेजर्स असणार. मूळ प्रश्न ज्या प्रकारे हे महामंडळ चालवले जाते त्या mismanagement मुळे तयार झाला आहे.

एसटी कशी चालवावी याची पडताळणी केपीएमजी या खाजगी संस्थेकडून करवून घेत आहेत यावर हसावे की रडावे? यात वाईट काय आहे? कुठले रुट्स फायद्याचे आहेत, रुट्स चे streamlining कसे करावे, कुठे कॉस्ट cutting करता येईल, revenue कसा वाढवावा, या कंपनी चे अधिक भाग करून फायदा होईल का? दुसऱ्या एखाद्या व्यावसायिक कंपनी बरोबर मर्जर करता येईल का? काही कंपन्यांचे acquisition करावे का ज्यामुळे आपल्याला फायदा होईल, इन्व्हेंटरी कंट्रोल कसा करावा, spare पार्टस च्या purchase मध्ये सुसूत्रता आणता येईल का, डिझेल चा वापर कशा प्रकारे कमी करता येईल, नवीन बसेस विकत घ्याव्यात की भाड्याने घ्याव्यात, तोट्यातल्या कुठल्या फेऱ्या बंद करता येतील, बजेट चे युटीलायझेशन आणि मॅक्सिमायझेशन कसे करता येईल, नवीन हायरींग करावे की काँट्रॅक्टर्स घ्यावेत, पुढील दोन, पाच, दहा वर्षांचा कार्गो आणि पॅसेंजर चा कॅरीइंग लोड चा आऊटलूक कुठल्या डिव्हिजन मध्ये, कुठल्या रूट वर कसा बदलेल, जास्तीच्या लोकांना रिटायर केलं तर किती खर्च येईल, त्याचे कॉस्ट-प्रॉफिट analysis अशा शेकडो गोष्टी तपासून त्याचे पृथक्करण करून सजेशन्स द्यायला अनुभवी consultant कंपनीच हवी नाही का? का केपीएमजी च्या consultants ना आधी पाच वर्षे ड्रायव्हर म्हणून नोकरीवर ठेवू या? (हलके घ्या)

In reply to by रावसाहेब चिंगभूतकर

जोंवर खाजगी कंपन्या सर्वांची लूटमार करण्यासाठीच असतात, व सरकारी व निमसरकारी कंपन्या जनसेवेसाठी, सरकारने प्रचंड तोटा सोसून-- मग तो तसा कशामुळे होतो आहे, ह्याची अजिबात छाननी न करता-- सुरू ठेवल्या पाहिजेत, अशी मानसिकता (तथाकथित) सुशिक्षीत समाजातही आहे, तोंवर केपीएमजीला कंत्राट देणे म्हणजे काहीतरी घोर अपराध आहे, असले युक्तिवाद येत रहाणार! जाता जाता, दोन मुद्दे, वेळेच्या अभावी अगदी संदिग्ध मांडतो-- १. इतर राज्यांच्या-- विशेषतः गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश ह्यांच्या एस टी. सेवा कशा सुरू आहेत- म्हणजे, तेथे नफा- तोटा कसा आहे, त्यांची सर्विस कशी आहे? २. (ह्याचा वर काही प्रतिसादकर्त्यांनी उल्लेख केला आहे). रेव्हेन्यू वाढवण्याचे इतरही मार्ग आहेत (असलेल्या जागांचा, इतरही कामांसाठी उपयोग), त्यांचा अवलंब केला पाहिजे ह्याचाही विचार करणे आवश्य्क आहे.

In reply to by प्रदीप

रेव्हेन्यू वाढवण्याचे इतरही मार्ग आहेत
अगदी बरोबर. आणि त्यासाठीच या consultant कंपन्या सरकारला योग्य सल्ले देतील अशी आशा करूया. माझे काही सल्ले: 1. जर ST पूर्ण भरून आली आणि रुट्स च्या सगळ्या स्टेशन्स वर वेळेत पोचली तर ड्रायव्हर ला एका आणि कंडक्टर ला एका तिकिटाचे पैसे बक्षीस द्यावेत. 2. डेपो मॅनेजर्स च्या पगारातला 20% भाग बोनस म्हणून द्यावा आणि तो त्या डेपो च्या रेव्हेन्यू शी लिंक करावा. 3. याच पद्धतीने गाडीच्या ब्रेक डाउन च्या प्रमाणाशी शी त्या रूट साठी काम करणाऱ्या मेंटेनन्स टीम चा पगार inversely link करावा. अजिबात ब्रेक डाउन नसेल तर 110% पगार द्यावा. आणि मग टप्प्या टप्प्याने. 4. जितके डिझेल वाचेल त्यातला 5% ड्रायव्हर ला द्यावा. 5. सफाईच्या जितक्या तक्रारी एखाद्या स्टँड बद्दल येतील त्याबद्दल तिथल्या मनीजर ला फायनान्शियल दंड करावा. यासाठी तक्रार पेटी उभारून तक्रारींची संख्या मोजायला हवी. सगळी टॉयलेट्स चकाचक ठेवणे ही तिथल्या मॅनेजर ची ड्युटी हवी. नाहीतर जा घरी. इत्यादी.

In reply to by रावसाहेब चिंगभूतकर

ह्या चकचकीत सल्ल्यात १. फंडामेंटल राईट्स २. डायरेक्टीव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी ३. कन्सेप्ट ऑफ वेल्फेअर स्टेट ४. सेंटर स्टेट रिलेशन्स ५. मनी बिल्स, फायनान्स बिल्स हे सरकारी बेंगरुळ वाटणारे नियम फिट करून दाखवा (ते तकलादू आहेत फोल आहेत वगैरे प्रतिवाद कृपया करू नका, आहे हे असे आहे अन सरकारने ते बदलले नाहीये मग ते हल्लीचे केंद्र असो वा राज्य सरकार, म्हणजेच ते नियम सरकारला हवेहवेसे आहेतच)

In reply to by रावसाहेब चिंगभूतकर

वरील संकल्पना प्रत्यक्षांत आणता येईल की नाही, हे, जेम् वांड ह्यांच्या प्रतिसादाकडे पहाता, मला माहिती नाही. पण माझ्या अंदाजाप्रमाणे, जगात कुठेही पब्लिक ट्रान्स्पोर्ट सर्विस स्वतःहून कधीच फायदेशीर होऊ शकल नाही. तेव्हा ऑपरेशन्स सुटसुटीत करणे, त्यांचा दर्जा वाढवणे व त्यांवरील खर्च आटोक्यात ठेवणे हे सर्व करण्याबरोबरच रेव्हेन्यू मिळवण्याचे इतर मार्गही नक्कीच तपासावेत. उपलब्ध असलेली जागा त्यावर दुकाने बांधून वापरता येणे, थोडे पुढे जाऊन, सर्विसेस खाजगी कामांसाठी उपलब्ध करणे इत्यादी बाबींचा विचार व्हावा.

In reply to by रावसाहेब चिंगभूतकर

1. जर ST पूर्ण भरून आली आणि रुट्स च्या सगळ्या स्टेशन्स वर वेळेत पोचली तर ड्रायव्हर ला एका आणि कंडक्टर ला एका तिकिटाचे पैसे बक्षीस द्यावेत. दहाएक वर्षापूर्वी असा प्रयोग झाला होता. बस पूर्ण भरल्यास ५ सिटच्या तिकिटाच्या पैशातील काही टक्के चालक आणि वाहकाला मिळत असे.

In reply to by प्रदीप

केपीएमजीला कंत्राट देणे म्हणजे काहीतरी घोर अपराध आहे, असले युक्तिवाद येत रहाणार!
कंत्राट देण्याबाबत हसावे की रडावे असे प्रतिसाद कर्त्याने म्हटले आहे. अपराध आहे असा युक्तिवाद केलेला नाही. कोणतीही गोष्ट अंगाशी आली की मग समिती नेमायची, अहवाल मागवायचे हा सर्व सरकारांचा आवडता खेळ आहे. मग ते अहवाल कोठेतरी वर्षानुवर्षे धूळ खात पडून राहतात आणि मग कधी कधी कुठेतरी आग लागून , पाण्यात भिजून किंवा उंदरांनी खाऊन नष्ट होतात. त्या अहवालांची सॉफ्ट कॉपी तरी सरकारी बाबूंना वापरता येते की नाही देवच जाणे ! तात्पर्य शंका केपीएमजीबद्दल नसावी, सरकारी कामाबद्दल असावी. असो!

In reply to by धर्मराजमुटके

केपीएमजीकडे पडताळणी सुपूर्द करण्याबाबतीतचा पाषाणभेद ह्यांचा रोख, एका खाजगी (कन्सल्टन्सी) कंपनीकडे, एक निमसरकारी कंपनी देत आहे, ह्याकडे आहे, असे मलातरी संदर्भावरून वाटले.
एकच पर्याय आहे, खाजगी प्रमाणे सरकारी एसटी चालवावी, पण एसटीचे खाजगीकरण कदापीही करू देवू नये. (एसटी कशी चालवावी याची पडताळणी केपीएमजी या खाजगी संस्थेकडून करवून घेत आहेत यावर हसावे की रडावे?)
असो. तुमच्या, सरकारी कामकाजाबद्दलच्या सर्व टिपण्णीशी मी १००% सहमत आहे.

मंडळी, एसटी संपाच्या कालच्या घडामोडी पाहता नवीन काही नाही पण दिलेल्या मुदतीत कर्मचारी रुजू व्हावेत आणि संपक-यांचा आत्मविश्वास तुटावा यासाठी एसटी प्रशासनाकडून प्लॅन केले जात असल्याचे दिसत आहे. आत्तापर्यंत अठरा हजार कर्मचारी रुजू झाल्याचे एसटी प्रशासनाकडून म्हटल्या जात आहे. काही ठिकाणी एसटी फे-या सुरु झाल्या असल्याच्या बातम्या आहेत. तर कर्मचा-यांकडून हा दावा फेटाळल्या जात आहे. जळगाव नाशीक बीड येथे निघालेल्या बसवर काही अज्ञातांनी दगडफेक केल्याचे वृत्त येत आहेत. बसच्या काचा फोडल्या गेल्या प्रवासी कोणी जखमी झाले नाहीत पोलिसांनी गुन्हा नोंदविले आहेत, एकूणच संपकरी आंदोलकांचे नेतृत्व करणारे नेते आत बाहेर असे करीत नसल्यामुळे केवळ कर्मचा-यांच्या भरवशावर चाललेले आंदोलन भरकटत चालले आहे, असे वाटायला लागले आहे. प्रशासनाच्या वतीने सोमवारपासून एसटी सेवा सुरळीत सुरु होईल असे म्हटले जात आहे. प्रत्येक आगारातून बसेस सुरु व्हाव्यात असा आगारप्रमुखांना दम भरल्याचे बोलले जात आहेत. कर्मचा-यांना निलंबीत करण्याचाही सपाटा सुरुच आहे, एकूणच आज तरी कर्मचारी दबावाखाली दिसत आहे, वेतन वाढवून दिले आहे तर आता थोडसं आंदोलकांनी मागे यायला हवे असे वाटते. आणि पुढेही आंदोलन करता येईल, मागण्या करता येतील. एसटी वाचवायला हवी प्रवाशांची गैरसोय टाळायला हवी. -दिलीप बिरुटे

पुर्ण क्षमतेने भरलेल्या एस्टीत लँड होस्टेस ट्रॉली ढकलत/किंवा हातातल्या ट्रे मधुन उसाचा रस, लिमलेटच्या गोळ्या, वेफर्स, खारे शेंगदाणे वाटतेय, मधेच बोला गाव.....करी करत पेपर पण देतेय तर कदाचित एस्टी नफ्यात चालु शकेल.

मा.न्यायालयात सुरु असलेल्या बहुचर्चीत दिनांक २० तारखेची सुनावणी काल झाली. त्रिसदस्यीय समितीने काल असे म्हटले की, एसटी शासनात विलनीकरण करणे त्यासाठीचा कायदा, वित्तीय प्रशासकीय बाबी अभ्यासल्याशिवाय समितीला मत बनविणे शक्य नाही, असे मत काल न्यायालयात नोंदविले. दुसरीकडे समितीने, नियमित वेतन व्हावे, वगैरे सुधारणा सुचविल्या. मात्र, अहवाल येईपर्यन्त कर्मचारी कामावर परत जातील का अशी विचारणा मा.न्यायालयाने कर्मचा-यांचे वकील गुणरत्ने सदावर्ते यांना केली. शाळा महाविद्यालये सुरु झालेली आहेत, बसेस बंद असल्यामुळे प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा भाड़े वसूली होत आहे, तुम्ही जर काही करणार नसाल तर, त्याची काळजी आम्हाला करावी लागेल असे न्यायालयाने म्हटले असून पूढील सुनावणी कोर्ट तारीख दिनांक २२/ १२/ २०२१ दिली आहे, पुढे काय होईल त्याची वाट पाहू या... -दिलीप बिरुटे

एस् टी कमगारांच्या महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि इतर काही मागण्या मान्य केल्यामुळे संप मागे !


सरसकट तीसटक्के पगारवाढ मागायला हवी होती. आता सगळेच गोत्यात आलेत.

संप संपला नाही किंवा मागे घेतला नाहीए युनियनने संप मागे घेतल्याचे घोषित केले आहे पण कर्मचारी अजूनही ठाम आहेत असं म्हणतायत, ह्या बातमीत.

दोन्ही बाजूंनी युक्तिवाद सुरु असल्याच्या बातम्या येत आहेत. आज काहीतरी निर्णय होऊन बसेस सुरु होतील असे वाटत आहे. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आज दोन्ही बाजूने युक्तिवाद सुरुच असून. पुढील सुनावणी ५जानेवारी २०२२ ला ठेवलेली आहे, म्हणजेच संपाचा तिढा आजही सुटलेला नाही. अशी लटकलेली परिस्थिती तान वाढवते. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लवकरात लवकर तिढा सुटावा असे सामन्य एसटीप्रेमी म्हणून वाटते. कामगारांचा विलीनीकरणाचा निर्णय ठाम दिसतो, इरेला पेटलेले दिसतात. हे कामगार कसे तगत असतील ही चिंता वाटते.

Dissolve करेल असे वाटते. बस भंगारात. जागा कुणाच्या घशात. खाजगीवाले कमावतील. कुणाला तरी टक्के मिळतील. सरकार आणखी महामार्ग बांधेल -फास्ट टुवीलर , कार्ससाठी. गरीब रस्त्याकडेला आ वासून बघत राहतील. लाल डबा म्हणा, परी म्हणा, कथा कादंबऱ्यांत वारसा स्थान मिळवेल. शहरांत एका तरी चौकात डब्याचं मढं ठेवतील. पुढच्या पिढिला पाहण्यासाठी, सेल्फी काढण्यासाठी." I Love Laal Daba". प्रियदर्शनी.

In reply to by कंजूस

जरा दमानं घ्या काका, नका त्रास करून घेऊ जीवाला, निघेल काहीतरी तोडगा करतील काहीतरी कुठेतरी कोणीतरी.

In reply to by जेम्स वांड

ही फेकू वाक्ये असतात. कर्नाटक, गोवा, केरळमध्ये पन्नास टक्के खाजगी वाहतूक सुरू आहे. राजस्थान,मप्रमध्ये एसटी झोपली आहे. महाराष्ट्र मागे कसा राहील?