मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आमचंबी कॉकटेल!!!

पिवळा डांबिस · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
गेल्या काही दिवसांपासून आपल्या सर्वांचे लाडके मिपाकर श्री. नाटक्या हे इथे विविध कॉकटेल्सची (अगदी मनमोहक फोटोंसकट!!) माहिती देत आहेत.... आणि थोड्याच दिवसांपूर्वी एक नाटक्या बेसनलाडूनी (गरज वाटल्यास स्वल्पविराम घालावेत!:)) उत्तर कॅलिफोर्नियात केलेल्या कॉकटेल पार्टीचा सविस्तर वृत्तांतही आपण वाचला..... तो वृत्तांत वाचून डांबिसकाका अस्वस्थ झाले आणि त्यांनी गर्जना केली, "अरे सदर्न कॅलिफोर्नियावाल्यांनो! बघा ती उत्तरेची भय्या (म्हणजे भाऊ हो!) मंडळी किती धमाल करून र्‍हायली!! काय वाटतं की नाय तुम्हाला?" डांबिसकाकांच्या पिकल्या केसांची जाण ठेवून त्यांच्या निष्ठावंत मिपाकर मित्रांनी त्यांच्या हाकेला भरघोस ओ दिली... आणि जमायचं ठरलं.... डांबिसकाकांनी लगेच उत्साहाने आपण यावेळेस समुद्रकिनारी बीचवर जमूया किंवा एखाद्या पार्कमध्ये जमूया असे पर्याय दिले. परंतू त्यांची मित्रमंडळी ही काकांपेक्षाही जास्त 'पोहोचलेली' असल्याने त्यांनी त्या दोन्ही पर्यायांकडे सोईस्करपणे दुर्लक्ष केलं आणि शेवटी डांबिसकाकांच्याच घरी जमायचं असं ठरवून टाकलं...... :) मार्टिनी आणि मोहितो करायची जबाबदारी डांबिसकाकांनी घेतली तर मार्गरिटा करायचं शिवधनुष्य नंदनरावांनी उचलायचं ठरवलं. मात्र यावेळेस उगाच पाश्चात्य वारूणीचा भारतीय भोजनाबरोवर आंतरराष्ट्रीय विवाह नको म्हणून बार्बेक्यू करायचं ठरवलं. घाटावरच्या भटांनी या कार्याला आपल्या उपस्थितीने शुभाशीर्वाद देण्याचं अगदी आनंदानं मान्य केलं. भाग्यश्री सुरवातीला आपल्या पतिराजांकडून असल्या 'दारूकामा'ला येण्याची परवानगी मिळेल की नाही याबद्दल साशंक होती पण डांबिसकाकांना आत्तापर्यंत तिच्या पतिदेवांच्या मनमोकळ्या स्वभावाची चांगली ओळख झालेली असल्याने त्यांनी हे दोघं येणार हे गृहित धरूनच तयारीला सुरुवात केली!!!! मग यथाकाळी शनिवार दिनांक १८ एप्रिल २००९ रोजी नंदनभावजी सान डियागोहून डांबिसकाकांच्या घरी येते झाले. येतांना बरोबर घाटावर थांबून भटांचं बोचकं आणि मुख्य म्हणजे मार्गारिटाचं सामान आणण्यास ते विसरले नाहीत. डांबिसकाकांनी प्रथम मार्गारिटाचं सगळं सामान व्यवस्थित आल्याची खात्री करून घेतली आणि मग या दोघांचंही बाहू पसरून स्वागत केलं! श्री व सौ. भाग्यश्रीही जेमतेम दहा मैलांचं अंतर प्रचंड वेगाने दीड तासात कापत घटनास्थळी येऊन उपस्थित झाले. खूप ट्राफिक असल्याचं कारण त्यांनी दिलं पण बहुदा ते रस्ता चुकले असल्याचा दाट संशय आहे.... ;) अशा रितीने सर्व मंडळी जमल्यावर कॉकटेल्स बनवायला सुरुवात झाली. प्रथम समारंभास उपस्थित राहू न शकलेल्या मिपाकरांच्या सोईसाठी (किंवा घाटावरल्या भटांच्या शब्दांत "मिपाकरांचं प्रज्वलन सुरू करण्यासाठी!!") सर्व स्टॉक एकत्र ठेवून त्याचे फोटो काढण्यात आले. Image removed. त्यानंतर डांबिसकाकानी मोहिटो/ मार्टिनी आणि नंदनने मार्गारिटा बनवण्यास सुरवात केली. भाग्यश्री आणि निनादने लिंबांचा रस काढण्याची कामगिरी स्वीकारली. आणि घाटावरच्या भटांनी उगीचच सर्वांचे विविध पोझेसमधील फोटो घेण्यास सुरुवात केली. सेंन्सॉरभयास्तव सर्वच फोटो इथे देऊ शकत नाही पण कल्पना करण्यास चाणाक्ष मिपाकर समर्थ आहेतच!! Image removed. श्री मठाधिपती कॉकटेल-विद्या दान करीत आहेत Image removed. आणि शिष्यादिच्छेत पराजयम!!:) अशा तर्‍हेने सर्व कॉकटेल्स मूर्त स्वरूपात आल्या.... Image removed. इतका सुंदर देखावा बघून मग आपल्या मंडळींना एरियल फोटोग्राफी करण्याचा मोह आवरेना..... Image removed. आणि Image removed. सर्व कॉकटेल्स पुरेश्या बनवून झाल्यावर डांबिसकाकांनी दोन थेंब पूर्व दिशेला उडवले आणि आवाहन केलं, "हं! चला, आता करा सुरुवात!!" Image removed. आणि सर्वांनी त्या कॉकटेल्सचा आस्वाद घ्यायला सुरवात केली. Image removed. सोबतीला चखणा म्हणून चिप्सबरोबर स्वतः काकांनी बनवलेलं टोमॅटो साल्सा आणि ग्वाकामोले होतं. लालभडक स्ट्रॉबेरीजही होत्या. Image removed. भाग्यश्रीही तिचा आजवरचा *** पणा (अहो, सोवळेपणा म्हणायचंय हो मला! तुम्ही मिपाकर म्हणजे बघा अगदी!!!) सोडून मोकळ्या मनाने हा नवीन कॉकटेलानुभव घेण्यास सिद्ध झाली. कॅलिफोर्निया मठाधिपतींना सुद्धा आपली शिष्यसंख्या अजून एकाने वाढल्याचा अतीव आनंद झाला!!!! ;) मंडळी बसून कॉकटेल्सचा आस्वाद घेतायत तोवर डांबिसकाकांनी बार्बेक्यूची तयारी सुरू केली. बार्बेक्यूसाठी मक्याची कणसं, हिरव्या-पिवळ्या-लाल सिमला मिरच्या, झुकिनी (स्क्वॉश), लाल कांदे इत्यादि सामग्री होती. Image removed. अर्थात डांबिसकाकांच्या घरचा बार्बेक्यू सर्वथा शाकाहारी असण्याची सुतराम शक्यता नव्हतीच! तेंव्हा काकूने आधीच आलं-लसूण्-मिरचीचा मसाला लावून नंतर दह्यात रात्रभर मुरवून ठेवलेलं चिकनही तयार ठेवलं होतं!!! बाल्सामिक व्हिनेग्रेट् घातलेलं सॅलडही रेडी होतं... मंडळींच्या गप्पा चालूच होत्या. विमानांनी अंमळ टेक ऑफ घेतल्याने त्या खूपच रंगल्या होत्या. डांबिसकाकाही बार्बेक्यू भाजताभाजता त्या गप्पांत आपली भर टाकत होते.... Image removed. भाग्यश्रीने एव्हांना आपली कॉकटेल रिचवून आता निनादच्या ग्लासावरही आपला हक्क प्रस्थापित केला होता. [सदर फोटो आमच्याकडे आहे. पण तो इथे टाकणार नाही. जिज्ञासूंनी ११ डॉलर्सची (अक्षरी अकरा फक्त!!) रक्कम डांबिसकाकांकडे पाठवून आपापली प्रत मिळवावी!! लाऽऽट है, सेऽऽल है भाय; लाऽऽट है, सेऽऽल है!!!!]...... ;) सर्व पदार्थ खरपूस भाजून झाल्यावर आता शांतपणे दोन कॉकटेल्स माराव्यात म्हणून डांबिसकाका जरा टेकतायत न टेकयायत तोवर 'जेवायला चला!!!" ही काकूची हाक कानी पडली आणि सर्व फितूर मित्रमंडळी काकांची साथ सोडून जेवणापाशी जमली. मिपाचे जावईबापू श्री. निनाद यांना अर्थातच अग्रहक्क देण्यात आला. आता मात्र सगळ्या गप्पा बंद झाल्या होत्या. मंडळींची जेवणावर तुटून पडण्याची एकाग्रता वाखाणण्याजोगी होती!!!! काका आणि काकू तृप्त मनाने या तरूण मुलांकडे पहात होते.... Image removed. जेवण झाल्यावर गप्पा पुन्हा दुप्पट जोमाने सुरू झाल्या. घाटावरच्या भटांनी चारही वेद मुखोद्गत केल्याबद्दल (मास्टर्सची डिग्री नुकतीच मिळवल्याबद्दल) त्यांना डांबिसकाकांनी शाबासकी दिली. Image removed. त्याच्याबदल्यात मग त्यांच्याकडून सक्तीने गायनाची मैफिल घडवण्यात आली. मस्त गातो हो, हा पोरगा!!!! तेजोनिधी लोहगोल आणि स्वरगंगेच्या काठावरती अगदी मस्त म्हटलंन!! पण त्यानंतर मग नंदनला दुर्बुद्धी आठवली आणि त्याने रागदारीवर प्रश्न विचारायला सुरुवात केली. त्याच्या प्रश्नांची समर्थपणे उत्तरे देत भटोबांनी यमन, यमनकल्याण, शुद्धयमन, मसणायमन, दगडायमन इत्यादीमधील फरक स्पष्ट केले आणि गाऊनही दाखवले. डांबिसकाकाना शास्त्रीय संगीतामधलं काहीही ओ की ठो कळत नसल्याने ते केवळ हसरा चेहरा करून बसले होते. त्यांच्या डोक्यात या निरनिराळ्या यमनांचा साधा डोसा, मसाला डोसा, म्हैसूर मसाला, रवाडोसा इत्यादींशी तुलनात्मक अभ्यास चालला होता.... तितक्यात काकूने डेझर्टसाठी हाक मारली. काकूने सरप्राईझ म्हणून फॉन्ड्यू सजवला होता. Image removed. फॉन्ड्यू म्हणजे विस्तवावर ठेवलेलं भांडं. त्यात चॉकलेट वितळवलं होतं (कधीकधी चीजही वापरतात). सोबतीला स्ट्रॉबेरीज, मार्शमेलोज, पीचचा केक आणि आईस्क्रीम होतं. केक, मार्शमेलो किंवा स्ट्रॉबेरी त्या वितळलेल्या चॉकलेटमध्ये बुडवायची आणि सरळ तोंडात टाकायची. मंडळींना हा प्रकार खूप आवडला. फक्त हे सरप्राईझ म्हणून न देता जर आधी कल्पना दिली असती तर "जरा कमी जेवलो असतो!!!" अशी कुरकुर सर्वांनी केली.... भाग्यश्रीची तर आधी केक मग त्यावर आईस्क्रीम आणि त्यावर वितळलेल्या चॉकलेटची धार पाहून "अवघेची झाले, देहब्रम्ह" अशीच अवस्था झाली..... पोटात बिलकूल जागा नाही असं म्हणत म्हणत मंडळींनी यथेच्छ फॉन्ड्यू हादडला. नंतर मग पुन्हा गप्पांचा तिसरा अध्याय सुरु झाला. या परिसंवादाचा विषय होता, "तुम्हाला मिपावर कुणाचं लेखन आवडतं?" पण सर्व उपस्थित मिपाकर आपल्याला स्वतःचंच लेखन आवडतं असा आग्रह धरून बसल्याने शेवटी नॉन-मिपाकर असलेल्या निनाद आणि काकूला परीक्षक केलं गेलं. त्या दोघांचाही मिपाचा व्यासंग पाहुन मिपाकर सदस्य थक्कच झाले. काकू आणि निनाद हेच अनुक्रमे काका आणि भाग्यश्रीच्या खात्यातून लिहितात की काय असा संशय भटोबांनी बोलूनही दाखवला पण नंदन हा संपादक तिथे हजर असल्याचं पाहून डांबिसकाकांनी लगेच भटोबाच्या मुसक्या आवळल्या.... गप्पांत किती वेळ गेला कोण जाणे. शेवटी कुणाला तरी घड्याळ बघायची बुद्धी झाली तर मध्यरात्र उलटून एक वाजला होता. मग भाग्यश्री आणि निनाद त्यांच्या घरी परत निघाले. नक्की खात्री नाही, पण बहुदा स्वतःच्याच घरी पोचले असावेत..... मग नंदन, भटोबा आणि डांबिसकाका या 'ओन्ली मिपाकरांनी' पुन्हा गप्पा सुरू केल्या. हा सेशन होता "जनातलं, मनातलं!!!". ;) त्यामध्ये मिपावरच्या लेख, कविता, खरडवह्या, खफ इत्यादी स्फुट आणि अस्फुट लिखाणाचा संदर्भासाठी विपुल वापर करण्यात आला. मनसोक्त गप्पा मारून झाल्यावर, आणि चांदण्या विझू विझू आल्यावर, शेवटी पहाटे तीन वाजता ही आमची मैफिल समाप्त झाली.... (ता. क.: कळविण्यास अत्यंत आनंद होतो की दुसर्‍या दिवशी कुणालाही हँगओव्हर आला नाही!!!!!)

वाचन 14822 प्रतिक्रिया 49