मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आण्णामहाराज!!!

उपयोजक · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
"घे गरमागरम चहा.थोड्यावेळाने पोहे करते गरमागरम." "काय झालं? यांनी तरी दिला का सकारात्मक प्रतिसाद?" "कळवतो म्हणाले." "हात्तिच्या.म्हणजे नेहमीसारखंच." "हो नेहमीसारखंच.तुम्हाला बरं वाटलं ना?" "विवेक किती चिडतोस? नीट बोल त्यांच्याशी" "कशाला? आण्णामहाराजांची टेप ऐकायला?" "अरे! तुझा काहीतरी प्रॉब्लेम आहे,सुटायला अवघड आहे म्हणून सांगतात ना ते?" "काय सांगतात? आण्णामहाराजांची पोथी वाच, त्यांच्या समाधीवर डोकं टेकून ये हे सांगतात? त्यानं काय होणारेय?" "अरे! तीन महिने झाले नोकरी शोधतोयस तू.मिळत नाहीये.वाचलास काही महिने अध्याय, टेकलंस डोकं समाधीवर आणि मिळाली हवी तशी नोकरी तर? जाशील ना उड्या मारत?" "आणि हे सगळं करुनही नाही मिळाली तर? मग काय करायचं?" "करायच्या आधीच तुझी नकारघंटा! देवाधर्मावर, उपचारांवर तुझा विश्वास नाही म्हणूनच ही वेळ आली तुझ्यावर.फक्त चिडचिड करत राहतोस.जरा देवाधर्माचं कर काहीतरी.म्हणजे डोकं शांत राहील.समस्या सुटेल तुझी.पण त्यासाठी मुळात देवापुढे झुकलं पाहिजे ना? मोडेन पण वाकणार नाही हा बाणा असेल तर देव तरी तुला का देईल काही? त्याला शरण गेलास तर तो काही देईल.माझं ऐक.आण्णामहाराजांवर श्रद्धा ठेव.अध्याय वाच.बघ तरी करुन.तुझ्या प्रयत्नांनी यश येत नाहीये.माझा उपाय करुन बघ." "तुमच्या उपायात लॉजिक काडीचं नाहीये.तुमच्या त्या आण्ण्याचा अध्याय वाचण्याचा आणि मला नोकरी मिळण्याचा तार्किक संबंध काय?" "ही अशी नावं ठेवतोस म्हणूनच ते तुला काही देत नाहीत." "तुम्हाला देतात ना? मग झालं तर! तुम्ही त्यांचे उपासना करता,आरत्या अोवाळत बसता.मी काही म्हणतो का? येतो का त्या आड? तुम्हाला करा ना हवं ते.रोज उठून आण्णा महाराजांचे महत्व,त्यांचे सामर्थ्य,त्यांचे चमत्कार हे मला का ऐकवता?" "तुझ्याच भल्यासाठी सांगत असतो ना? माझा वैयक्तिक काही फायदा आहे का? तुला चांगली नोकरी मिळावी म्हणून काही सुचवतो ना?" "काय सुचवता? आण्णांची सेवा? शेवटचं निक्षून सांगतो.तुमच्या आण्णामहाराजांच्या पोथ्या,अध्याय,स्त्रोत्र वाचण्याचा आणि मला नोकरी मिळण्याचा तार्किक संबंध असेल तरच सांगायचं.निव्वळ तुम्हाला बरं वाटावं म्हणून तुमच्या त्या आण्णामहाराजांच्या कच्छपी लागत बसणार नाही." "अहो! जाऊ द्या.दरवेळी काय तेच? तो काही ऐकत नाही.तुम्ही तुमचं पालुपद सोडत नाही." "चला.आई! मी जरा पडतो.अर्ध्या तासाने उठव मला." "बरं!" "खरंय मंगल तुझं.या बिंडोकाला काही सांगण्यात अर्थ नाही.साधं देवापुढे हातही न जोडणार्‍याला मी मुर्खासारखं सांगत बसतो.आता यापुढे याच्यावतीने मीच आण्णामहाराजांची साधना वाढवेन.पोरगं निरिश्वरवादी आहे हे आपलं प्राक्तन.दुसरं काय?" "करा काय करायचं ते.पण बाप लेकांचे वाद थांबवा आता!" तीन महिन्यांनी "आई गुड न्यूज! मिळाली नोकरी एकदाची." "अरे वा! पेढे घेऊनच ये येताना!" "हो.बाकीचं घरी आल्यावर बोलतो." "बरं बरं! सावकाश ये!" --------------------------------------------------- "हं सांग आता काय काय झालं? पगार वगैरे आहे का चांगला?" "हां.आहे ठिकठाक.करोनामुळे कामं थोडी कमी आहेत.पण वाढवतील पगार काम बघून! कंपनी मोठी आहे.चार राज्यात प्रॉडक्ट जातं त्यांचं." "मस्त!" "बघ.ही सगळी आण्णामहाराजांची कृपा.तू त्यांचं काही करायचा नाहीस म्हणून मी तुझ्यावतीनं करायचो.अध्याय वाचायचो,समाधीवर प्रार्थना करुन यायचो.हे त्याचं फलित." "डोंबल त्या आण्ण्याचं.मला नोकरी मिळाली ती का मिळत नाही या समस्येवर जरा बारकाईनं विचार केला आणि त्यावर उपाय केला म्हणून.एक चांगली कन्सल्टन्सी गाठली.पैसे जरा जास्त घेतले पण नोकरीसाठीच्या अर्जात काही बदल करायला सांगितले.ते केले.त्यांनी अजून काही नोकरीच्या साईटवर रिझ्युमे अपलोड करायला सांगितला होता.तो केला.बर्‍याच उचापत्या केल्या त्यांनी.हे त्यांचे प्रयत्न आणि त्याचे फलित आणि मी त्यांच्याकडे गेलो म्हणून हे झालं.यात तुमच्या आण्णामहाराजांचा संबंध आलाच कुठे?" "अरे इथेच तर संबंध आहे आण्णामहाराजांचा.मी तुझ्यासाठी त्यांची उपासना करायचो म्हणून दयाबुद्धीने त्यांनी तुला नोकरीची समस्या सुटण्यासाठी त्या कन्सल्टन्सीकडे अलगद नेले आणि तुझे काम करुन दिले.हा त्यांचाच कृपाप्रसाद आहे हे लक्षात घे!" "काहीही!" "काहीही कसं? मग याआधीच तुला ही नोकरी का मिळाली नाही ते सांग!" "अहो बाबा त्यांच्याकडे व्हेकन्सी फक्त मागच्या आठवड्यापासून उपलब्ध झाल्यायत.त्यांच्याकडून ऑफर उपलब्ध व्हायच्या आधीच मला कशी मिळेल नोकरी?" "तेच तर सांगतोय.ही व्हेकन्सी निर्माण केली कोणी? आण्णामहाराजांनीच.याआधी त्या कंपनीत या जागा का उपलब्ध नव्हत्या सांग.मी उपासना सुरु केल्यावरच का उपलब्ध झाल्या ते सांग!" "आण्णामहाराज!!!! मला वर बोलवा.तुम्ही परवडलात पण तुमचे भक्त नकोत!"

वाचन 4121 प्रतिक्रिया 9