श्रीगणेश लेखमाला २०२० - रंगीत चित्रं

बिपीन सुरेश सांगळे's picture
बिपीन सुरेश सांगळे in लेखमाला
27 Aug 2020 - 6:50 am

1

रंगीत चित्रं? शीर्षक वाचून थोडंसं गोंधळल्यासारखं होईल खरं. पण ते तसंच आहे.

कुठलं तरी एखादं चित्रं म्हणजे ते रंगीत असणारच, असंच आपल्या डोक्यात असतं. अगदी पूर्णपणे नाही, पण बरंचसं. सध्याच्या काळात तर नक्कीच. सध्या तर त्याचा विस्फोट झाला आहे. हातात येणारी वर्तमानपत्रं, पुस्तकं, मासिकं, जाहिराती अन जाहिरातपत्रकं, सगळंच रंगीबेरंगी आणि त्याच्यानंतर टीव्ही आहे, मोबाइल आहे सतत रंग दाखवायला. बाहेर पडलं की मोठ्या जाहिराती, दुकानांच्या पाट्या आणि फ्लेक्स. सगळं जगच रंगीबेरंगी होऊन गेल्याचा भास होत राहतो.
कधी छान वाटतं.. अन अतिही वाटतं!

माणसाने खूप रंगछटा तयार केल्या आहेत. पण निसर्गाकडे माणसापेक्षा जास्त रंग आहेत. माणूस त्याच्या रंगांचं बेसुमार प्रदर्शन करत राहतो. मात्र निसर्गाच्या अनेक छटा तशा सहजी दृष्टीस पडत नाहीत.

माणसाचं चित्रवेड, रंगवेड आदिम! पार भीमबेटकापासून ते अजिंठ्यापर्यंत!
माझ्या लहानपणी?...
थोडं जुन्या काळात.
आताच्या नव्या पिढीला आश्चर्य वाटेल कदाचित, पण एकुणात चित्रं फार कमी पाहायला मिळत असत. अन जी असत ती रंगीत नसत.
लहानपणापासून चित्रांची आवड. चित्रं बघायला आवडतात. पण तेव्हा मुळात चित्रंच पाहायला मिळत नसत. जी काही थोडीफार चित्रं असत, ती काळ्या-पांढऱ्या रंगात किंवा पांढऱ्याऐवजी कुठलातरी एक रंग. हिरवा, निळा वगैरे. त्या हिरव्या-निळ्यामध्येही फार विविधता नसे. त्या रंगाच्या पार्श्वभूमीवर काळ्या इंकने चित्रं काढलेली असत.

मी बालवाडीत असताना पुस्तकं नव्हतीच. सगळाच तोंडी कारभार. मुलांना खेळ-खाऊ आणि घरातल्यांची थोडा वेळ सुटका, यासाठी आमची बालवाडी होती. घरात पेपर यायचा. तेव्हा त्यामध्ये छायाचित्रं अतिशय कमी असायची. जी असायची, ती कृष्णधवल आणि दर्जा तर विचारायला नको.
तरीसुद्धा चित्रं भेटतच राहिली, तेव्हाही.

असंच एक चित्र भेटायचं ते रेल्वे स्टेशनला जाणाऱ्या रस्त्यावर. आगरकर शाळेसमोर. रास्ता पेठेतील मुलींची प्रसिद्ध शाळा. शाळेच्या समोर एक जुना वाडा आहे. मुंबईतल्या चाळीची आठवण करून देणारा. तळमजला धरून चार मजल्यांचा. लाकडाचा जास्त वापर असलेला. मूळ रंग जाऊन काळा रंग धरलेला. किती जुना ते माहीत नाही. खाली वाड्याच्या दाराशी एक फूलवाला बसत असे. रंगीबेरंगी हार लटकवून, लाल,पिवळी, पांढरी, गुलाबी फुलं पसरून. छोटंसं दुकान. फूटपाथला लागूनसं. त्याच्या शेजारची भिंत त्याने रंगवून घेतलेली आणि त्यावर चार बाय पाच या आकाराचं गणपतीचं रंगीत चित्र.

बसमधून स्टेशनला जाताना ते चित्र दिसत असे. ते बघण्यासाठी मी खिडकीत बसण्याची धडपड करत असे. नेहमी. आणि ते चित्र दिसलं की मी खूश होत असे व मला कळत असे की आता स्टेशन जवळ आलं म्हणून. पाच मिनिटांच्या अंतरावर. आपण पोहोचलो. मन हुरूरून जायचं, तळेगावला जाण्यासाठी.

आजही तो वाडा तसाच आहे. जरा पडझड झालीये. पुढच्या पूर्ण बाजूला कोणी राहताना दिसत नाही. खाली फूलवाल्याचं दुकान अजूनही तसंच आहे. आणि ते गणपतीचं चित्रदेखील. मस्त फिकट गुलाबी रंगाच्या पार्श्वभूमीवर रंगवून घेतलेलं. नवीन.कलरफुल! छान, प्रसन्न, हसरं रूप आहे गणपतीबाप्पाचं.
गणेशोत्सव आहे, पहिलं नमन गणपती बाप्पाला करून घेतलं.

दुसरं चित्र म्हणजे, भवानी पेठेत एक नातेवाईक राहायचे. त्यांच्याकडे जाताना एक चित्र दिसायचं. एका मोठ्या भिंतीवर रंगवलेलं, पूर्ण रंगीत. म्हणजे माझ्यासाठी लय मोठी गोष्ट. एका बलदंड युवक वाघाशी लढतोय असं. जितक्या वेळा जायचो, तितक्या वेळा मी ते चित्रं पाहायचो. अनेक गोष्टींमुळे. एक म्हणजे चित्र, दुसरं म्हणजे रंग आणि तिसरं विषय.

पुढे कळलं की ते चित्रं एका तालमीच्या भिंतीवर रंगवलेलं होतं. त्या तालमीचं नाव 'जंगीशा हमाल तालीम'. थोडक्यात म्हणायचं तर ती हमाल तालीम म्हणून प्रसिद्ध. भवानी पेठेचा तो भाग म्हणजे धान्याची मुख्य अन मोठी बाजारपेठ. मार्केटयार्ड नंतर झालं. तिथे पुण्याच्या आसपासच्या गावातली तरुण मंडळी हमाली काम करायची. त्यांच्यासाठी ती तालीम जुन्या काळात केलेली असावी.

तसे ते हमाल मूळचेच चांगल्या बांध्याचे असायचे. पोती वाहून, ओझी उचलून त्यांचं शरीर पिळदार झालेलं असे. पाहत राहावं असं. आता वीस न पंचवीस किलोचे धान्याचे किरकोळ कट्टे येतात. आपल्याला तेही उचलत नाहीत, तो भाग वेगळा. त्या वेळी शंभर शंभर किलोची पोती असत, गोणपाटाची. दिवसभर ती पोती उचलायची, वाहायची आणि गोदामात टाकायची म्हणजे खायचं कामच नव्हतं. ती वाहून घामेजलेले ते हमाल पिळदार शरीराचे झाले नसते तरच नवल. चटणी-भाकरीवर वाढलेली मंडळी ती. स्टेरॉईड घेऊन मसल्स फुगवायची त्यांना गरज नव्हती. अ‍ॅब्स शब्द माहीत नव्हता त्यांना, पण ते अ‍ॅब्स त्यांच्या शरीरावर असत, जे मिरवायची त्यांना माहिती नव्हती ना परिस्थिती. पण त्यातूनही एखाद्या हमालाला आणखी तब्येत कमवायची असेल, कुस्तीगीर व्हायचं असेल, तर त्या हमालांसाठी ती तालीम बांधली गेली असावी.

चित्र असं असे - साधारण दहा बाय पंधरा आकाराचं. निळ्या रंगाचं आकाश, खाली हिरव्या गवताचा पट्टा. त्यावर डुलणारी रानफुलं. एकदोन झाडं. उडणारे पक्षी. एका कोपऱ्यात ससा, हरीण आणि मध्यात पहिलवान आणि वाघ. त्या मल्लाच्या एका हातात सुरा असे आणि दुसरा हात त्याने वाघाच्या जबड्यात घातलेला असे. लाल रंगाचा लंगोट कसलेला बलदंड पहिलवान, निर्भीडपणे वाघाशी लढत असायचा. वाघाचा जबडा अर्थातच फाकलेला, पण पहिलवान मात्र अगदी निर्विकारपणे लढत असायचा. चक्क वाघाशी लढतानाही तो भावहीन कसा राहू शकत असेल? ही एक गंमतच!
चित्र भारी चित्रकाराने काढल्यासारखं नसायचं.

आता काळाच्या ओघात तालीमबाज लुप्त झाले. पण ती तालीम, तिची जुनी वास्तू आजही आहे आणि त्यावरचं ते चित्रदेखील. इतक्या वर्षांनंतरही, तेच चित्र त्याच भिंतीवरआहे. पुन्हा ताजं रंगवलेलं.

वर सांगितलेली दोन्ही चित्रं मी लहानपणी पाहिलेली आणि आजही ती तशीच आहेत. काळाच्या ओघात हरवून गेली नाहीत. हे मला खूप विशेष वाटतं. मला काळ माहीत नाही, पण गेली पन्नास-साठ-सत्तर वर्षं ती तिथे असावीत. तशीच!

ज्या एका पिढीने डोंगरे बालामृत प्यायले असेल, त्यांना आठवत असेल की मंडईमध्ये एका जुन्या इमारतीच्या, लांबून दिसणाऱ्या भागावर, उंचावर, वरपासून खालपर्यंत डोंगरे बालामृतची जाहिरात रंगवलेली होती म्हणून. आज ते चित्र तिथे नाही.

आधी सांगितलेली दोन चित्रं म्हणजे काळाचा एक जुना तुकडा आज घडीलाही जिवंत करणारी गोष्ट आहे. कारण काही तुकडे असेच लोप पावलेले!

पूर्वी कृष्णधवल छायाचित्रं असत. त्यामधला छायाप्रकाशाचा परिणाम वादातीत. त्याच्या सौंदर्याची जातकुळी वेगळी. त्याची मोहिनी वेगळी. किती स्त्रियांचं अन पुरुषांचं सौंदर्य काबीज करून ठेवलंय त्या फोटोंनी. अन आपल्या आठवणींनाही. पण काही वेळा? -
त्या शाळकरी वयात एक मांजराचं पिल्लू पाळलं होतं. पांढऱ्या रंगाचं, अगदी लहानसं. त्याचा एक डोळा हिरवा होता अन एक निळा. फोटो काढण्यासाठी आईला खूप विनवण्या करून पटवलं. त्या वेळी घरात कॅमेरा वगैरे गोष्टी दुरापास्त.
स्टुडिओत गेलो. पिल्लाला घेऊन उभा राहिलो आणि फोटो काढला. अर्थातच रंगीत नाही. तो काळा-पांढरा फोटो आजही मी जपून ठेवलाय. पण त्यामध्ये त्या पिल्लूचे डोळे वेगवेगळे आहेत, हे कळतच नाही. पोरांना तो फोटो दाखवताना मन खंतावतं. तो रंगीत नसण्याचा केवढा हा तोटा.

आईच्या काकांमुळे चांदोबाची ओळख झाली. चांदोबामध्ये विविध प्रकारची चित्रं पाहायला मिळायची. भरपूर. त्याचं मुखपृष्ठ, आतली एक जादुई गोष्ट आणि पौराणिक गोष्टींची चित्रं रंगीत असायची. बाकी इतर गोष्टी सिंगल कलरमध्ये. बऱ्याचदा तो रंग आकाशी निळा.
चांदोबा त्या काळातल्या मद्रासचा (आता चेन्नई). त्यामुळे चित्रांमधील व्यक्तींचा तोंडावळा तिकडचा. बायका रेखीव, त्यांचे डोळे मासोळीसारखे, काजळ लावलेले, त्या दागिन्यांनी मढलेल्या, केसांना जाडजूड गजरे, तर पुरुष घनदाट केस आणि भरघोस मिशा असलेले असे. आजही राक्षस म्हटलं की मला चांदोबातले राक्षसच आठवतात. त्यातल्या एका क्रमश: गोष्टीतील नायक उदयन, विक्रम-वेताळ, राजू, गोपाळ आणि पौराणिक चित्रं, हनुमान, शंकर, राम, कृष्ण. मी आयुष्यात बॉडीबिल्डरचं जे पहिलं रूप पाहिलं ते चांदोबातच - मारुतीरायाच्या रूपाने. चांदोबाची चित्रं भारी असायची. रेखीव, प्रमाणबद्ध, भावना व्यक्त करणारी. छोट्याशा चौकटीतही प्रभावी वाटणारी. त्यामुळे चांदोबाशी मैत्री जडली. त्या काळात गोष्टींची पुस्तकं फार नसत. जी असत ती मिळत नसत. आणि चांदोबा तर लय भारी होता. नक्कीच! आणि भरपूर चित्रांचं एक आकर्षण बालजिवाला असेच.

चांदोबा वाचणारी, आवडणारी एक मोठीच पिढी होऊन गेली. त्यानंतर पहिलीपासून हातात शाळेची पुस्तकं पडली, बालभारतीची! त्यामध्येही चित्रं असायचीच. पण पुन्हा रंगीत चित्रं कमीच. एकरंगीच जास्त. बालभारतीचं ते ठरावीक मुखपृष्ठ. एक ताई अन एक छोटा भाऊ, त्रिकोणात बसवलेले. दोघे तन्मयतेने बालभारतीचं पुस्तक पाहत आहेत. म्हणजे माझ्या मताने ते वाचत नसावेत, तर ते आतील चित्रंच पाहत असावेत. चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकावर असलेलं शिवाजी महाराजांचं घोड्यावर स्वार असलेलं चित्र तर विसरूच शकत नाही. तिसरीचं ‘थोरांची ओळख‘ या पुस्तकातील चित्रं, या बालांनो या रे या ही कविता, पाचवीच्या इंग्लिशच्या पुस्तकातील सीता आणि गोपाल यांची चित्रं आणि काय काय. हा प्रत्येकाच्या आपापल्या आठवणींचा ऐवज आहे!...

केव्हातरी वडलांनी रशियन पुस्तकं आणली, मुलांची. वा! काय सुंदर! रशियन साहित्याशी तिथून तर ओळख झाली. ती पुस्तकं बहुदा रादुगा प्रकाशनाची असायची. अनुवाद अनिल हवालदारांचा. ती पुस्तकं छोटी. त्यातल्या गोष्टी मजेशीर. ससे, बदकं, बेडकापासून ते पक्ष्यांपर्यंत सगळे तिथं भेटत. चित्रकला सुंदर आणि पूर्ण रंगीत चित्रांचं पुस्तक असे. प्रत्येक पानावर चित्र म्हणजे कसलं भारी! केव्हातरी त्या चित्रांची नक्कल करण्याचा प्रयत्न मी करत असे. त्यामधल्या रंगांच्या छटा वेगळ्याच असत. करड्या, राखाडी वगैरे. रशियामधल्या खेडेगावात, मनाने तिथल्या निसर्गात घेऊन जाणाऱ्या.वास्तववादी आणि वेगवेगळ्या शैलींचीही चित्रं असत. वेगळी दिसणारी चित्रं नजरेला पडली ती त्या वेळेस. रशियन असल्याने अर्थातच चेहरे वेगळे असायचे. त्यातल्या ह्युमन फिगर्स जबरदस्त असत. काही कृष्णधवल चित्रांची पुस्तकंही असायची. थोडी मोठ्या मुलांची. वास्तववादी गोष्टी असलेली. पण त्यातील चित्रं अन त्यातला आसपास भारून टाकणारा असे.

पुढे इतर काही मुलं, त्या वेळी कॉमिक्स वाचत. ती इंग्लिश असत, त्यामुळे मी त्या वाटेला फारसा जात नसे. बहुतेकदा फँटम आणि मँड्रेक. पण ती रंगीत चित्रं पाहायला आवडत. कारण त्याची चित्रं वास्तववादी आणि अचूक असत. त्यामध्ये वापरलेले चित्रांचे अँगल्स फारच अफलातून असत. जणू काही कॅमेऱ्यातून टिपल्यासारखे. क्वचित मिळाल्या तर, मराठीमध्ये वेताळ झालेल्या फँटमच्या चित्रकथा वाचत असे.

मग अमर चित्रकथा येऊ लागल्या. वैविध्यपूर्ण! पूर्ण रंगीत. त्या आधीपासून असाव्यात, पण इंग्लिशमध्ये. नंतर ती पुस्तकं मराठीमध्येही येऊ लागली. ऐतिहासिक, पौराणिक, चंगळ नुसती, प्रतापराव मुळीकांच्या चित्रांनी तेव्हापासून भारलेलो आहे. काय अप्रतिम मुखपृष्ठं असत त्यांची, ग्रेट! नंतर केव्हातरी त्यांच्या चित्रांचं प्रत्यक्ष प्रदर्शनच पहायचा योग आला. हे भाग्यच! त्यांच्या फिगर्स लाजवाब असत.

त्या काळापर्यंत मग चित्रांची आणि त्यातल्या त्यात रंगीत चित्रांची वानवा भरून काढणारी बरीच पुस्तकं सगळ्यांच्या हातात पोहोचू लागली. जमाना बदलला, तंत्रज्ञान बदललं आणि पैसाही!

पुढे माझी मुलांच्या कथांची पुस्तकं आली. प्रत्येक पानावर चित्रं. तेही रंगीत. पूर्ण फोर कलर पुस्तकं. तीन पुस्तकांचा संच. त्यानंतर बालभारतीमध्ये माझ्या कथेचा समावेश झाला. त्या गोष्टीला पूरक, गोड रंगीत चित्रं. ती सगळी पुस्तकं हातात घेऊन पाहताना मला माझे जुने दिवस आठवतात. नवीन पिढी नशीबवान असल्याचा आनंद वाटतो आणि हेवादेखील!

तिसरीत असताना वर्गात एक मुलगा होता. तो खूप छान चित्रं काढायचा, वह्यांवर असलेली देवादिकांची वगैरे. त्याच्यामुळे चित्रं काढायचा नाद लागला. माझ्याकडे एक वही होती, त्याच्यावर कृष्णाचं चित्रं होतं. गोड चित्र होतं, कुरळ्या केसांच्या बालकृष्णाचं. ते दहावीस वेळा काढलं असेल. मग कुठे जमलं जरासं. मग ते रंगवलं. शाळेत चित्रकलेसाठी तेलकट खडू असत. तेच घरी. मग जलरंग कुठले? मिळवले कुठून तरी. ते अक्षरशः मातीचे रंग असत. वड्यांच्या स्वरूपात. त्या रंगात हवा तो परिणाम साधता येत नसे. माझा तर आनंदीआनंद. मला तर रंगवताही येत नव्हतं. आणि रंगही धड नाहीत. प्रत्येक वेळी मी कृष्णासाठी गडद जांभळी छटा वापरायचो. शेड बनवता येत नसल्याने. शेवटपर्यंत मी ते चित्र रंगवूच शकलो नाही. मी रंगवलेला तो कुरळ्या केसांचा, जांभळा कृष्ण पाहिला तर गोकुळ आफ्रिकेत होतं की काय, असं वाटण्यासारखी परिस्थिती.
तो मित्र तर सारखीच नवीन चित्रं आणून दाखवायला लागला. मी हैराण!

मग एका दुसऱ्याच मुलाने त्याच्या चित्रकलेचं रहस्य सांगितलं. तो जिथे राहायचा, तिथे एक स्टुडिओ होता. चित्रपटांची पोस्टर्स तयार करणारा. हा पठ्ठ्या तिथला शिष्य होता.
तो सुवर्णकाळ!...
त्या काळात फ्लेक्स प्रिंटिंग प्रकार नव्हताच. पूर्णपणे रंगवण्यावर भिस्त. त्या सुवर्णकाळात सिनेमांची हाताने रंगवलेली भलीमोठी पोस्टर्स बनवली जायची. आणि त्या रंगशाळेत ती बनायची. अर्थात पुण्यात ते काही एकमेव नसावेत. वाईट वाटतं की तो स्टुडिओ म्हणजे पॅसेजसारखा होता. ऐसपैस जागा नसलेला. पण जागा छोटी असली तरी चित्रांची श्रीमंती मोठी होती.

मला मोठाच शोध लागला. तो चित्रकार मुलगा स्वभावाने चांगला होता. तो त्या कलाकारांचं काम पाहून शिकला होता. तो माझ्या घराच्या जवळच राहायचा. मग मी त्याच्याकडे जायचो आणि तिथून त्या पेंटरकडे. मोठी मोठी चित्रं कशी रंगवतात ते मी मन लावून, भान हरपून पाहत असे. तिथे बरेच कलाकार काम करत असत. अनामिक!

हिरो आणि हिरोईन अनेकरंगी, तर इतर पात्रं कुठल्याही एकाच रंगात. लाल, निळ्या, जांभळ्या वगैरे. सिनेमांची पोस्टर्स हा खरं तर एक वेगळाच कलाप्रकार. नंतर तिथे मी त्या वेळच्या अनेक चित्रपटांची पोस्टर्स होताना प्रत्यक्ष पहिली. सिनेमा टॉकीजला लागायच्या आधी त्याचं चित्र पाहायला मिळणं म्हणजे लै भारी वाटायचं. त्यातल्या हिरो -हिरोईनची नावं पोरांना सांगताना फुकट छाती फुगायची. अर्थात, त्यातला एखादाच सिनेमा पाहायला नसीब व्हायचा. ते दुःख वेगळंच. ते दुःख आत्ताच्या ओटीटी जमान्यामध्ये कळणार नाही. आता - अती झालं अन हसू आलं, अशी परिस्थिती. त्या वेळेस बालमनाला काय माहीत की एक दिवस ही कला काळाच्या ओघात गडप होऊन जाणार आहे म्हणून.

मग जिथे जिथे टॉकीजेस असतील तिथे तिथे पोस्टर्स पाहण्याचा चाळाच लागला. अर्थात, सिनेमा हा सगळ्याच भारतीयांच्या जिव्हाळ्याचा विषय. पण मी त्या पोस्टरमध्ये सिनेमा, हिरो व हिरोईन या व्यतिरिक्त रंगांचे फर्राटेदार स्ट्रोक्स शोधत असे. रंगाचा मनमुराद वापर. नाईफ पेंटिंगचा प्रकार. तुम्ही ती पोस्टर्स आजही पाहिलीत तर माझे म्हणणे पटेल.

लक्ष्मी रोडवर अल्पना नावाचं एक थिएटर होतं. ते एवढ्यात पाडलं. त्या वेळेस तिथे भारी भारी - म्हणजे चालणारे सिनेमे लागत. तिथे ‘लव्ह अँड गॉड’ सिनेमा लागला होता. मुगल-ए-आझम बनवलेल्या के. असिफचा. मुगल-ए-आझम थोडा रंगीत आहे. सरळ आहे, त्या काळी पूर्ण रंगीत सिनेमा बनवणं परवडायचं नाही. पुन्हा माझा मुद्दा, चित्र रंगीत नसण्याचा. असिफने हा एकमेव सिनेमा पूर्ण रंगीत बनवला. सिनेमा दुर्दैवी होता. १९६३मध्ये शूटिंग सुरू झालं आणि तो प्रदर्शित झाला कधी? तर १९८६मध्ये. लैला-मजनूची कथा. लैला निम्मी आणि मजनू संजीवकुमार. निम्मी म्हणजे बरसातपासून बसंतबहारपर्यंत अनेक सिनेमात गाजलेली.

त्या टॉकीजशेजारी एक झरा वाहतो. त्याच नाव नागझरा. आता त्याच्यामध्ये गटाराचं पाणी सोडून त्याची नागझरी झालीये. त्याच्या काठावर टॉकीज. त्यामुळे अडथळा नसल्याने लांबूनच टॉकीजची भलीमोठी तीन मजली आयताकृती, उंच भिंत दिसायची.
पोस्टर लावण्यासाठी अगदी आदर्श जागा.
त्या भिंतीवर सिनेमाचं भलंमोठं पोस्टर लागलेलं. पेंटरने दिल खोलके चितारलेलं निम्मीचं कातिल सौन्दर्य! काय चित्र होतं. त्या पोस्टरची रंगसंगती, तिने घातलेला नकाब. त्या नकाबाची पारदर्शकता आणि त्यातून दिसणारा तिचा मोठ्या साईझमध्ये रंगवलेला नुसता चेहरा. खलास पेंटिंगच होतं ते! नुसता चेहराच पाच बाय पाचमध्ये असावा. सिनेमा चालला नाही, पण खूप महिने तो तिथे असावा.
माझा कॉलेजचा रोजचा रस्ता. रोज त्या चित्राचं रसपान करायचं, मग पुढे जायचं. त्या कलाकारांना कधी प्रसिद्धी नाही. काय पेटिंग होतं, पण ते नंतर कुठेतरी एखाद्या भिंतीला टेकून, फाटून गेलं असणार!... चितारणारा तो कलाकार तर पडद्यामागेच. सिनेमासारखीच परिस्थिती.
इंटरनेटवर ते चित्र तुम्हाला पाहायला मिळेल, पण त्या स्थानिक चित्रकाराने रंगवलेल्या चित्राची सर त्याला नाहीच.

पुढे छपाई तंत्रज्ञान सुधारलं. टॉकीजची पोस्टर्स कायम राहिली, पण जाहिरात करणारी कागदी पोस्टर्स आली.
त्या वेळी बाजीराव रस्ता दुहेरी होता. आता तिथे नूमवि शाळेसमोर थोडं तिरकं, एक बस स्टॉप आहे. रुंदीकरणात तो रस्ता आता सलग झाला. आधी तिथे हुजूरपागा शाळेची एक छोटी इमारत होती. रस्त्यावर मध्येच बाहेर आलेली. एखाद्या हटवादी जनावराने थोडं कळपाबाहेर अंग काढून उभं राहिल्यासारखी. अगदी बेलबाग चौकात, त्या भिंतीवर विजयपथमधलं 'रुक रुक रुक' या गाजलेल्या गाण्याचं पोस्टर लागलं होतं. लाल रंगाचा ड्रेस घातलेली तब्बू. लक्षवेधक. पण छापील, कागदी. जाता-येता ते बघायचो. नवीन प्रकार होता, आकर्षून घेणारा. पण हळूहळू पोस्टर्स रंगवण्याची कला त्याने खाऊनच टाकली.

मग मी वेड्यासारखा चित्रप्रदर्शनं पाहायला लागलो. मी काही कलामहाविद्यालयाचा विद्यार्थी नाही. पण चित्र बघणं आणि काढणं याने झपाटून गेलेलो. असंख्य प्रदर्शनं, उत्तमोत्तम. असंख्य कलाकारांची. प्रसिद्ध-अप्रसिद्ध. त्यात अगदी प्रत्यक्ष स्वतः एस.एम. पंडितांनी भरवलेल्या प्रदर्शनापासून ते दलाल आणि गोविंद बेंद्र्यांपर्यंत. मला त्या पद्धतीची अस्सल देखणी, कलायुक्त चित्रं आवडतात.
पुढे तर चित्रकारांशीच मैत्री झाली. आणि तीही ठरवून नाही तर ते भेटत गेले. वेगवेगळ्या कारणांमधून. चांगले, उत्तम चित्रकार. चित्रं आणि रंग पाहण्याची हौस देव पुरवतच गेला.

आणखीही चित्रकारांना भेटण्याची आस आहेच...

आता अगदी अलीकडे, पुण्यात एका तरुण चित्रकाराने मोठ्या, रिकाम्या भिंती रंगवण्याचा उपक्रम केला. त्याची बातमी आली होती. त्या कलाकाराचं मला नाव आठवत नाही. त्यातलं एक मोठं चित्र पाहायला मिळालं. कसबा पेठेत, पोवळे चौकात. एका जुन्या वाड्याच्या सपाट भिंतीवर, लक्ष वेधेलसं. अजूनही ते चित्र त्या भिंतीवर आहे. पण उन्हा-पावसात त्याचे रंग आता फिकटले.

आता महापालिकेने वेगवेगळ्या ठिकाणच्या भिंती चित्रांनी रंगवण्याचा उपक्रम हाती घेतलाय. उत्तम उपक्रम! त्यामुळे ओक्याबोक्या, घाणेरड्या भिंती सुशोभित होऊन गेल्या आहेत. छान वाटतं! बालनजरांना त्याचं किती अप्रूप असेल! निसर्गचित्रांचं, वारली चित्रांचं. झाडांचं, फळा-फुलांचं, पक्ष्यांचं-प्राण्यांचं अन फूलपाखरांचं. फूलपाखरं म्हणजे उडणारे रंग. उडणारी चित्रंच! जर कधी मला ते जाणवलं नाही, तर मनाचा कोवळा रसरशीतपणा हरवल्याची खंत वाटते. वाटतं - लहानपण देगा देवा!

असा हा रंगीत चित्रांचा धांडोळा आहे.

तशी अनेक उत्तम चित्रं आपल्याला खरं तर सिनेमाने दाखवली. अगदी कृष्णधवलच्या जमान्यापासून. पण छायाचित्रण हा या लेखाचा विषय नाही. तशी तर अनेक उत्तम कॅलेंडर्स निघाली आहेत, निघत आहेत, जी चित्रांशी संबंधित आहेत. पण ते सगळं इथे घेतलेलं नाही.

रसिकांच्या मनात अनेक चित्रं जागी असतील, ताजी असतील. आणि ती पुन्हा नव्याने मनात उमटावीत यासाठीच हा लेखनप्रपंच.
पण, यामध्ये काही जिवंत रंगीत चित्रांचा उल्लेख केल्याशिवाय हा रंगरंजनाचा सोस पूर्ण होणार नाही.

दोन-चार वर्षांपूर्वी भारती विद्यापीठ, कात्रज इथे एकाच्या घरी जायचं होतं. रस्ता चुकलो. तिथे अनेक छोट्या छोट्या गल्ल्या.एका गल्लीत गेलो. अन पुढे रस्ताच बंद. मार्च महिना. तळपतं ऊन. घामाघूम झालेलो. वैतागलेलो. पण तिथे समोर एक बहावा दिसला आणि मी उन्हाचा ताप हरवून बसलो.
समोर भला प्रचंड बहावा. एवढं मोठं झाड मी कधीच पाहिलं नाही. आणि पूर्ण पिवळ्याधमक फुलांनी बहरलेला. बापरे! काय सौंदर्यसंपन्न! एखादी सौंदर्याने घायाळ करणारी, भरलेली रूपगर्विता की एखादा बलदंड योद्धा की एखादा तेज:पुंज, जटा वाढवलेला, धिप्पाड वृद्ध संन्यासी.. सांगता येत नाही.

काही जिवंत लॅण्डस्केप्स, माझ्या लहानपणीची…

लहानपणी काही महिने तळेगावला राहिलो. म्हणायला तळेगाव. खरं तर घोरावाडीला. त्याचं वैशिष्ट्य म्हणजे आदरणीय गोनीदा तिथं राहायचे.
लहान होतो. पहिलीला. आषाढ लागलेला. रेल्वे स्टेशनजवळ एक देऊळ होतं, बहुधा मरीआईचं.
आई आणि तिच्या मैत्रिणी त्या देवळात आषाढाचा नैवेद्य द्यायला गेलेल्या. सोबत मी. मनातून आनंद झालेला, शाळा बुडाल्याचा.
थोडा पाऊस होता. तिथे पोहोचलो. एक छोटंसं, खोलीवजा देऊळ. आतमध्ये त्या तीन-चार बायका. मी बाहेर. बाकी आत, आजूबाजूला कोणीच नाही. बाकी परिसर पूर्ण-पूर्ण मोकळा. माळच तो, रिकामा. नजरेच्या टप्प्यात कोणी नाही. समोर पुणे-मुंबई रेल्वेमार्ग. मग धोधो पाऊस पडायला लागला. तसा मी दारात सरकलो. आडोशाला. भिजायला नको म्हणून, आई ओरडायला नको म्हणून. तशा पावसात एक मालगाडी आलेली. त्या पावसाच्या कोसळथेंबांना ती मालगाडी मस्तीत ढकलत हिरिरीने पुढे धावत होती.

मागे देऊळ. मी दारात. देऊळ सोडता एक माणूस नाही. समोर सगळं हिरवंगार. त्यावर बरसणारा तो बेभान पाऊस आणि तो चिरत जाणारी भिजल्याची पर्वा न करणारी ती मालगाडी. ते दृश्य डोळ्यांसमोर आजही तसंच.

हे विशेष वाटण्याचं कारण म्हणजे तो रिकामपणा, तो मोकळेपणा, आता अनुभवास येत नाही. आता त्या घोरावाडी स्टेशनला गेलात, तर ते देऊळ सापडणार नाही, इतकी घरांची दाटीवाटी त्या मोकळ्या माळावर झालीये. स्टेशनचा मोकळा रस्ता आता बोळकांड्यासारखा झालाय,

येरवड्याच्या पलीकडे होळकर ब्रिज आहे. तो पार करायला नको वाटेल इतकी मरणाची गर्दी असते गाड्यांची. हे आजकालचं चित्र.
मी शाळेच्या वयातला. सायकल घेऊन कुठे कुठे भटकायचो. त्या परिसरात गेलेलो एकटाच. मला तो परिसर माहीत नव्हता. त्या वेळी रस्त्यांची माहिती नव्हती.
कुठला रस्ता कुठे जातो, हे माहीत नव्हतं. सायकलची हवा गेली तर ती भरायला पाच पैसे नसायचे, हाफ पॅन्टच्या खिशात. पण वय वेडं असतं. ते दिवसही तसे होते. आता लहान मुलांना असे सोडायचे दिवस नाही राहिले. किती गोष्टींना मुकली ही पिढी. किती भारी गॅजेट्स आहेत हातात खेळायला. यापेक्षा मोकळं हुंदडणंच जास्त महत्त्वाचं.

मला तो होळकर पूल सापडला. थंडीचे दिवस. सकाळची दहाची वेळ. मी आलेल्या रस्त्यावर, पुलावर गर्दी सोडाच. एक माणूस नाही. ऊबदार ऊन अंगाला बरं वाटत होतं. खालून वाहणारी स्वछ पाण्याची नदी. वर तो दगडी पूल. निर्मनुष्य. सायकल लावली कठड्यापाशी. वरून वाकून पाहिलं. खाली नदीही शांत. नदीला बऱ्यापैकी पाणी. त्यात बुड्या मारणारा खंड्या. पलीकडे बगळे आणि पुलाच्या खाली दोन होड्या. एक पांढरी, एक फिकट निळी.रिकाम्या, बांधून ठेवलेल्या. पाण्यावर संथ डुचमळणाऱ्या. एकमेकींना खेटून निवांत उभ्या असलेल्या गायींसारख्या. शांत. शांतता अनुभवणाऱ्या, परिसर न्याहाळणाऱ्या. काय विलक्षण दृश्य!

आता ती नदी घाणेरड्या जलपर्णीने पूर्ण भरून गेलीये. जुनं सोनं हरवत चाललंय.
नंतर अशी लॅण्डस्केप्स पाहण्यात आली. पण ते दृश्य त्या वयात प्रत्यक्ष पाहण्यात जी मजा आली. क्या कहने!

अशी खूप दृश्ये असतील गाव-खेड्यातून. पण मी पूर्ण शहरी माणूस. मला ते त्यावेळी पहायला मिळालं. मी हरखून जायचो. माझ्यापेक्षा जी मंडळी ज्येष्ठ असतील, त्यांनीही यापेक्षा सुंदर पुणं अनुभवलं असेल...

त्याच वयात एक नवीन मित्र झाला. त्याच्याकडे असंख्य पुस्तकं होती. अफाट. अगदी इंग्लिशसुद्धा. विविध विषयांवर. त्यात चित्रकलेची पुस्तकंही. त्यात दोन चार लँड्स्केपची होती. मोठी. पेंटिंगची प्रक्रिया उलगडून सांगणारी. फॉस्टर नावाच्या चित्रकाराची. त्यातलं एक पुस्तक माझं खूप आवडतं. कितीदा ते पुस्तक त्याच्याकडून आणायचो आणि ती चित्रं नकलायचो. त्यामध्ये एक साधं पण प्रभावी चित्र होतं...

एकदा सायकल घेऊन हिंडायला गेलेलो. अर्थात एकटाच. कॅम्पच्या पलीकडे. घोरपडी गावातून पुढे गेलं की दोन रस्ते. एक रस्ता मुंढव्याला जातो तर दुसरा कोरेगाव पार्ककडे जातो. तो दुसरा रस्ता म्हणजे एखाद्या खेडेगावातून गेल्याचा फील देणारा. त्या वेळी छोटा. खड्ड्यांनी भरलेला. झाडांनी भरलेला. मोकळा. त्याची एक बाजू मिलिटरीची. त्या रस्त्याच्या पलीकडे एक ओढा आहे. झुळझुळ वाहणारा. मजेत खळखळणारा. लहान मुलासारखा अवखळ पळणारा. स्वच्छ पाण्याचा. गटाराचं पाणी न सोडलेला. थोडं पाणी. खोल तर तो नव्हताच.

आजूबाजूला सगळं मोकळं. ओढ्याच्या परिसरात ऐलपैल कोणीच नाही. एक मी सोडता. रस्ता शांत. रस्त्यावरून जाणारी एखादी सायकल, एखादी गाडी.
रस्त्यावरून खाली उतरलो. ओढ्याच्या काठाने त्याची संगत धरून छान मऊशार गवत धरलेलं.त्यावर बसलो. मागे निळं आकाश. पण निळाई कमीच कारण आकाशात हे मोठे मोठे हत्त्तीएवढे पांढरे ढग. पार्श्वभूमीवर तो पांढरा रंग आणि त्यावर आकाशी रंगाचं बाटिक नक्षीकाम. खाली हिरवंगार गवत. एखादी बुलबुलची जोडी. नाजूक शीळ घालत जाणारी. खळाळणारा ओढा अन मी एकटाच की, हे सारं पहायला …आणि माझ्या पलीकडे एक झाड. नाजूक, उंच, सडसडीत. एखाद्या शेलाट्या पोरीसारखं भाव खात.

मी ते पाहतच राहिलो. हे पूर्ण चित्र तर मी फॉस्टरच्या पुस्तकात कितीदा पाहिलेलं. फॉस्टर कुठला हे आता आठवत नाही. अमेरिकन असावा. किंवा परदेशातला नक्कीच. पण ते फॉस्टरबाबाचं चित्र माझ्यासमोर चक्क जिवंत होऊन उभं होतं. परदेशी चित्र चक्क माझ्या मातीत उमटलेलं. सही न सही! ओढ्यात पाय घालून बसलो. पाय आणि मन दोन्ही शीतल झाले. मन भारून गेलं अन मन भरून आलं. मन भरल्यावर निघालो.
आजही तो ओढा तिथेच आहे. पण... काळजात दुखतं.

अनेकांनी यापेक्षा सुंदर निसर्ग अनुभवला असेल, अनेक निसर्गदृश्यं पहिली असतील; पण मला हे नम्रपणे सांगावसं वाटतं की ही दृश्यं माझ्या बालवयाशी निगडित आहेत. मनात रुजून बसलेली. मुख्य म्हणजे सिमेंटचं गजबजाटी जंगल झालेल्या पुण्यात मी ती त्या काळी पाहू शकलो.
मला चित्रांबद्दल प्रेम वाटतं, ओढ वाटते. मला चित्रकार मंडळींबद्दल उत्सुकता वाटते, कुतूहल वाटतं, हेवा वाटतो आणि मत्सरही.. पण चांगल्या अर्थानं. कारण सरळ आहे हो. सगळ्यात मोठा चित्रकार तर तो आहे! वर बसलेला.

आपला गणपतीबाप्पाही कलासंपन्नच. त्याला वंदन करतो आणि हे शब्दचित्र त्याच्या चरणी अर्पण करतो.

--------------------------------------------------------------------------------------------------------------------

2

श्रीगणेश लेखमाला २०२०

प्रतिक्रिया

चित्रगुप्त's picture

27 Aug 2020 - 7:43 am | चित्रगुप्त

वा. चित्रांविषयीचा एवढे कसदार, उत्कृष्ट लिखाण फार क्वचितच वाचायला मिळते. पुन्हा पुन्हा वाचावा असा हा लेख आहे. लेखात उल्लेख केलेली जी भिंतीवरील मोठी चित्रे आहेत त्यांचे फोटो लवकरच घेऊन ते पण इथे द्यावेत ही विनंती. कोणत्याही दिवशी त्या भिंती जमीनदोस्त होऊ शकतात. अनेक आभार.

चौकटराजा's picture

27 Aug 2020 - 10:10 am | चौकटराजा

मला वाटते तुम्ही "त्या"१९५० साली जन्मलेल्या भाग्यवान पिढीतले दिसता. चान्दोबा,एस एम पन्डित, बेन्द्रे ,मुळीक ,डोंगरे बालामृत्,नाईफ स्ट्रोक पोस्टर्स ई . यात काही भर टाकतो , दलाल ,मुळ्गावकर , सुभाष अवचट ,मरिओ मिरान्डा ,वसन्त सबनीस ,डॉ वामन गोपाळ यान्चा सार्सापरिला ,कमल शेडगे ,जी कम्बळे ,आचरेकर ,आवाज मधील बिन्ग चित्रे वाले पत्की , ज्ञानेश सोनार ,बालगन्धर्व आर्ट गॅलरी , मोबोज आर्ट गॅलरी ई ई अनेक .

कुणी आठवणी साठी स्नान ह विषय निवडलाय तर कुणी चित्रे .. किती कल्पकता आहे मिपाकरात..

चौथा कोनाडा's picture

27 Aug 2020 - 1:32 pm | चौथा कोनाडा

व्वा सुंदर लिहिलंय !
चित्रांच्या जगात नेणारा लेख आवडला !

समोर एक बहावा दिसला आणि मी उन्हाचा ताप हरवून बसलो.
समोर भला प्रचंड बहावा. एवढं मोठं झाड मी कधीच पाहिलं नाही. आणि पूर्ण पिवळ्याधमक फुलांनी बहरलेला. बापरे! काय सौंदर्यसंपन्न! एखादी सौंदर्याने घायाळ करणारी, भरलेली रूपगर्विता की एखादा बलदंड योद्धा की एखादा तेज:पुंज, जटा वाढवलेला, धिप्पाड वृद्ध संन्यासी.. सांगता येत नाही.

व्वा, अश्या प्रकारच्या वर्णनांनी भान हरवायला झाले !

अनन्त्_यात्री's picture

27 Aug 2020 - 3:25 pm | अनन्त्_यात्री

आठवणी आवडल्या!

सिरुसेरि's picture

27 Aug 2020 - 3:56 pm | सिरुसेरि

छान रंगीत आठवणी . पोस्टर / पेस्टल कलर्समधे सॅप ग्रीन हा एक हिरव्या रंगाची वैशिष्ट्यपुर्ण शेड असलेला रंग असतो . हिरवाईने नटलेली निसर्गचित्रे , हिरवळ , झाडांची पाने , फुलांचे देठ अशी चित्रे रंगवायला हा सॅप ग्रीन रंग एकदम चप खल असतो असे जाणकार लोकांकडुन ऐकले आहे . आपल्या लेखात उल्लेख केलेली रशियन भाषेतील अनुवादीत पुस्तकांमधील सुंदर रंगीत चित्रे बघताना हा सॅप ग्रीन रंग आठवत असे .

नूतन's picture

27 Aug 2020 - 7:31 pm | नूतन

मांजरासोबतचा फोटो बघायला आवडला असता.(रंगीत नसला तरी)

नूतन's picture

27 Aug 2020 - 7:31 pm | नूतन

मांजरासोबतचा फोटो बघायला आवडला असता.(रंगीत नसला तरी)

निवांत वाचावा म्हणुन हा लेख मागे ठेवला आणि कितीदा वाचू असे झाले.
या लेखमालेतील सगळेच लेख छान आहेत सगळे एकदम हिरेच..
पण हा लेख म्हणजे कोहिनुर म्हणावा लागेल.
-----

तुम्ही दिलेली ठिकाणे शहरीकरण झाल्यावर पाहिलेली आहेत. त्यामुळे लेखन जास्तच जवळचे वाटते.
त्यात 1990 च्या आसपास, रास्तापेठ power house ला वडिलांबरोबर, त्यांचे बोट पकडून बऱ्याचदा उरुळी कांचन वरून आलेलो असल्याने तो गणपती आणि रस्ता लक्षात आला आणि खुप मस्त वाटले..

चित्रांचे म्हणाल तर मला चित्र काढायला खुप आवडायचे, पण त्या मातीच्या कलर च्या वड्यांमध्ये पाणी टाकून चित्रावरून ब्रश फिरवला कि चित्राची नजाकत पार मातीत मिळायची ते आठवले.
घोरवाडी चा परिसर जरी गजबजला असला तरी मावळ अजूनही हिरवा गालिचा अंथरून आहे.. मस्त एकदम.

तुमची चित्रदुनियेचा प्रवास खुप अप्रतिम वाटला..
पुन्हा पुन्हा वाचावा असा..

रातराणी's picture

27 Aug 2020 - 8:01 pm | रातराणी

अप्रतिम लेख!! सगळी चित्रं मनातल्या मनात चितारली इतकं परिणामकारक वर्णन केलं आहे! _/\_ लहानपणी असलेलं पुस्तकांमधली चित्रं पहाण्याचं आकर्षण अचूक टिपलं आहे.. शिवाजी महाराजांचं एक पुस्तक होतं, महत्वाच्या घटनांचं, त्यात अर्धा पानभर चित्र, आणि खाली त्या प्रसंगाचं वर्णन असा, ती चित्रंसुद्धा कृष्णधवल होती.. पण इतकी सुरेख! जिजाबाईंसोबत नांगर फिरवणारे छोटेसे महाराज, त्यातला तो नांगर कृष्णधवल चित्रातही सोन्याचाच वाटत असे, जिजाबाईंच्या चेहऱयावर कौतुक,अभिमान, आनंद याचं अनोखं मिश्रण ते त्या चित्रातूनही जाणवायचं. बालभारतीच्या पुस्तकांमधली चित्रं, चंपक, चांदोबा, चाचा चौधरी सगळ्याच सुखद आठवणी तुमच्या लेखाने जाग्या झाल्या. धन्यवाद. _/\_

चंपक चा उल्लेख वाचून आठवले की त्यात मी बरीच वर्षे ' डिंकू ' ही चित्रकथा करत असे. त्याकाळी माझी मुले लहान होती, ती ' डिंकू ' आवडीने वाचायची, त्यामुळे मला नवनवीन गोष्टी रचून चित्रित करायचा हुरुप असायचा. मुले मोठी झाल्यावर माझे डिंकू पण थंडावले.
आणखी कुणा मिपाकरांना ' डिंकू ' आठवतो का?

बिपीन सुरेश सांगळे's picture

27 Aug 2020 - 11:07 pm | बिपीन सुरेश सांगळे

मिपा
संपादक मंडळ
लेख स्वीकारल्याबद्दल खूपच आभारी आहे .
उत्तम लेखमाला . खूप शुभेच्छा !

बिपीन सुरेश सांगळे's picture

27 Aug 2020 - 11:09 pm | बिपीन सुरेश सांगळे

सगळ्या वाचकांचे अन प्रतिसादकांचे खूप आभार.
पूर्ण प्रतिक्रियेसाठी कृपया थोडा वेळ घेतो .

सुमो's picture

28 Aug 2020 - 3:37 am | सुमो

रेखलंय शब्दचित्र. खूप आवडल्या चित्रमय आठवणी
.
फँटम, मँड्रेक, चांदोबा थेट लहानपणीच्या जादुई काळात घेऊन जातात मला अजूनही !

एवढा काळ लोटला..पण अजूनही भिंतीवर जी चित्रे कायम आहेत ,ती आताही आनंद देतात ! मग अजिंठा असो वा उल्लेख केलेली पुण्यातील दोन चित्रे!
मस्त.. पुस्तकातले,छाया चित्रातले, निसर्गातले खरच ही रंगीत चित्रे सुखद आहेत.पण निसर्ग जी चित्रे रेखाटतो त्यामध्ये हीलींग ताकद असते.अशी अनेक पावसाळी,झाडांची, फुलांची चित्रे मनात घर करून आहेत.
चित्रांचा प्रत्येक पैलू ,कोन अप्रतिम मांडलाय.. तुमच्या डोळ्यांत साठलेल्या चित्रांच सुंदर रंगीत चित्र लेख झालाय.छान.

एका मस्त विषयाचे सुंदर शब्दांकन!
लेख वाचताना माझ्याही अनेक आठवणी ताज्या झाल्या.
फँटम, मँड्रेक, चांदोबा हे माझ्याही आवडीचे. त्यातल्या चित्रांची नक्कल करून ती रंगवण्याचे उद्योग मी सुद्धा करून झाले आहेत.

माणसाने खूप रंगछटा तयार केल्या आहेत. पण निसर्गाकडे माणसापेक्षा जास्त रंग आहेत. माणूस त्याच्या रंगांचं बेसुमार प्रदर्शन करत राहतो. मात्र निसर्गाच्या अनेक छटा तशा सहजी दृष्टीस पडत नाहीत.

१००% सहमत! ह्याच महिन्याच्या १ तारखेला संध्याकाळी अशाच सहजी दृष्टीस नं पडणा-या आकाशातल्या निसर्गाच्या छटांचा टिपलेला हा फोटो शेअर करण्याचा मोह आवरता येत नाहीये...

sky

@ टर्मीनेटरः वा. काय सुंदर छटा आहेत.
असे चित्र रंगवायचे असेल, तर त्यासाठी फक्त तीन रंग पुरेसे आहेतः
१. Burnt Umber. 2. Ultramarine Blue . 3. Chrome yellow
तैलरंगात करण्यासाठी पांढरा पण लागेल. करून बघा.

विनिता००२'s picture

29 Aug 2020 - 11:30 am | विनिता००२

खूप मस्त लेख!
चांदोबातली चित्रे मी पण बरेचदा बघतच बसायचे. परत गोष्ट वाचायची, परत चित्रे बघायची. अगदी साधीच असत पण जिवंत वाटत.

आठवणी जाग्या झाल्या :)

अन्या बुद्धे's picture

29 Aug 2020 - 4:37 pm | अन्या बुद्धे

व्वा! अनवट विषयावरचं अप्रतिम शब्दचित्र! खूप छान आठवणी..

रशियन पुस्तक फारच सुंदर असायची!

अनिंद्य's picture

29 Aug 2020 - 6:30 pm | अनिंद्य

@ बिपीन,

रंग, चित्र, पुस्तकं, आठवणी सगळेच सुंदर लिहिले आहे.

.....निसर्गाकडे माणसापेक्षा जास्त रंग आहेत. माणूस त्याच्या रंगांचं बेसुमार प्रदर्शन करत राहतो..... तुमच्यासारखा कलारसिकच असल्या विसंगतीवर अचूक बोट ठेवू शकतो. बहरलेल्या बहाव्याला योद्धा, संन्यासी आणि रूपगर्विता एकाचवेळी म्हणता येईल, हे भान तुम्ही आम्हाला देऊ करता.अद्भुत !

सुंदर लेखनकाबद्दल अनेक आभार.

फोटो नसले तरीही सर्व चित्रे दिसताहेत. सुंदर लेखाबद्दल धन्यवाद.

नावातकायआहे's picture

2 Sep 2020 - 6:47 pm | नावातकायआहे

बाडिस!

बिपीन सुरेश सांगळे's picture

10 Nov 2021 - 9:30 pm | बिपीन सुरेश सांगळे

प्रतिसादकांचा अन सगळ्या वाचकांचा मी खूप आभारी आहे , नेहमीच .
यातले काही फोटो इथे लावण्यासाठी मला कोणी मदत करू शकेल का ?

चौथा कोनाडा's picture

6 Sep 2022 - 3:40 pm | चौथा कोनाडा

बिपीन सुरेश सांगळे,

आपण दिलेली ती दोन चित्रे सुंदर आहेत, इथे डकवत आहे.

१. पुणे स्टेशन ला जाणाऱ्या रस्त्यावरील भिंतीवरील गणपती.
d1234pfm007

२. भवानी पेठ - जांगीषा हमाल तालीम - पहिलवानाचे चित्र
12312dfeHNBDH2ert4

बिपीन सुरेश सांगळे's picture

7 Sep 2022 - 10:40 pm | बिपीन सुरेश सांगळे

या लेखात उल्लेख केलेले फोटो टाकू शकलो नव्हतो . त्याचवेळी .
वरील प्रतिक्रियांमध्ये म्हणल्याप्रमाणे ते आता देतोय . रसिकांनी आस्वाद घ्यावा . प्रतिक्रिया द्याव्यात .
धन्यवाद
अन चौको यांना खास धन्यवाद

चौथा कोनाडा's picture

10 Sep 2022 - 8:27 am | चौथा कोनाडा

_/\_

बिपिन सुरेश सांगळे,

मिपाकर नेहमीच एकमेकांना मदत करतात, त्यातलाच मी एक..
स्वागत!

कर्नलतपस्वी's picture

8 Sep 2022 - 1:22 pm | कर्नलतपस्वी

स्टेशनला जाणाऱ्या रस्त्यावर. आगरकर शाळेसमोर. रास्ता पेठेतील मुलींची प्रसिद्ध शाळा. शाळेच्या समोर एक जुना वाडा आहे. मुंबईतल्या चाळीची आठवण करून देणारा.

माझे लहानपणी रास्तेवाड्यात काही वर्ष वास्तव्य होते. त्याकाळी सगळीकडे पायीच फिरायचो. थोडे मोठे झाल्यावर सायकल मिळाली. त्या निसर्ग रम्य पुण्याला मी सुद्धा मिस करतो.

कुमार१'s picture

8 Sep 2022 - 4:49 pm | कुमार१

सुंदर लिहिलंय !

प्रभाशंकर कवडी: अतिशय बारकावे टिपणारी चित्रं
मंगेश तेंडुलकर: या गृहस्थांना प्रत्यक्ष पहिले आहे आणि त्यांच्या चित्रांमधून आणि लेखनातून वाटायचे तसे तिरकस स्वभावाचे ते अजिबात नव्हते. नळ स्टॉप चौकात झालेल्या अपघातानंतर स्वतः काढलेलं जागृती करणारे चित्रं ते सिग्नलला थांबलेल्या लोकांना वाटताना बघितले आहे. त्यांच्या चित्रात कमालीची अतिशयोक्ती असायची.
शि द फडणीस: कमालीची निरागस चित्रं
रघुवीर मुळगावकर: बिटको कि जाई काजळ किंवा दोन्ही उत्पादनांच्या दिनदर्शिकेसाठी ते अतिशय सुंदर, वात्सल्याने ओतप्रोत असणारी चित्रं काढीत. मुळगावकरांनी कल्पिलेल्या सुंदर ललना प्रत्यक्ष परमेश्वराने देखील अजून जन्माला घातल्या नसतील!
मारिओ मिरांडा: गजबजलेला परिसर किंवा गर्दीची चित्रं काढावी तर त्यांनीच
अजित निनान: अतिशय प्रमाणबद्ध, नीटनेटकी, आणि बारकावे टिपणारी कार्टून्स

कर्नलतपस्वी's picture

8 Sep 2022 - 7:32 pm | कर्नलतपस्वी

यांचे चित्र प्रदर्शन बालगंधर्व रंगमंदिरात लागले होते. मुलांना घेऊन गेलो त्यांनी त्यांच्या व्हिजिटिंग कार्डवर सही करून मुलांना दिले होते. बरेच दिवस साभांळून ठेवले होते. भारी वाटायचं.

प्रमोद देर्देकर's picture

9 Sep 2022 - 7:25 am | प्रमोद देर्देकर

अतिशय सूंदर लेख. चांदोबा माझेही किंबहुना सगळ्यांनाच आवडणारे पुस्तक होते आणि आहे.