मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

लॉकडाऊन: तिसरा दिवस.

गवि · · काथ्याकूट
झोपेतून उठताच "भारतात 24 तासातील सर्वाधिक नवीन रुग्णसंख्या" अशी उत्साहित होऊन ऑनलाईन पेप्रांनी दिलेली बातमी वाचली. त्यापाठोपाठ चवदा एप्रिलपर्यंत आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द झाल्याची अधिकच उत्साहवर्धक बातमी वाचली. सुटीतील सहलींच्या बेतांचे तेरावे आम्ही कालच जेवलो. मुंबईत न येता कोंकणातच निवांत स्थायिक राहिलो असतो तर बरे झाले असते असे म्हणावे तर तिथेही हे शिंचे करोना घुसले आहेच. आता माशीद्वारेही करोना प्रसार होऊ शकतो असं एक चिलट आलं आहे. पाण्याद्वारे, डासाद्वारे वगैरे व्हायला लागल्याचा शोध बाहेर पडला की आपण बाहेर पडायला मोकळे. आज तिसराच दिवस आहे लॉकडाऊनचा, हेही झटकन जाणवलं. कधीतरी तरुण असताना लॉकडाऊन सुरू झाला होता असं फिलींग आहे. आणि तीनच दिवस झाले ? दोनच खरं तर.. अं ? बाकी कार्यालयीन कामकाज घरून दुप्पट वेगाने आणि दुप्पट व्यापाने व्हावे अशी अपेक्षा दिसतेय. डोक्याला कल्हई होतेय रोज. त्यामुळे ते मोकळा वेळ मिळून छंद, बागकाम, तबला, चित्रकला (जळली ती लहानपणीच), फ्यामिलीसोबत गोड गप्पा वगैरे लोकांच्या अनुभवांना अधेमधे असूयेने वा वा म्हणणे चालू आहे. सांगा आता आणखी कशाकशाने पसरतोय करोना आणि किती लाख लोक बाधित होणारेत? अर्थमंत्र्यांनी जाहीर केलेल्या योजनांबद्दल आभार आणि अभिनंदन. ता.क. : कतरीना कैफने परवा भांडी घासली आणि काल केर काढले. गृहकृत्यदक्ष दिसते. आता आज भरतकाम.

वाचन 26265 प्रतिक्रिया 44