माझ्या छंदांविषयी
माझ्या छंदांविषयी
वाचन
लहानपणी एकदा अक्षरओळख झाली की एकेक वाक्य वाचायला सुरुवात होते. मग हळूहळू वाचनाचा अवाका वाढायला लागतो. अपरिहार्य अशी शाळेच्या आणि महाविद्यालयाच्या पुस्तकांच्या वाचनाबरोबरच अवांतर वाचन सुरू होते. एकदा त्यातील गंमत समजली की इतिहासाच्या पानात सनावळ्यांमुळे कंटाळा आलेल्या व्यक्तिरेखा कादंबर्यांतून आप्तस्वकीयांसारख्या भेटतात. निरनिराळ्या समीकरणांमधून भयानक बोअर करणार्या शास्त्रज्ञांचे रोजच्या आयुष्यातील किस्से मनोरंजन करतात. गद्य, पद्य, व्याकरण अशा तांत्रिक गोष्टीनी काहीसा वैताग आणणार्या मायमराठीच्या पुस्तकापेक्षा खुद्द त्या लेखकांची पुस्तके आणि कवितासंग्रह वाचले जातात. अगदी प्रसंगी अभ्यासाच्या पुस्तकाआड या पुस्तकांना स्थान मिळते. ;-)
वय वाढेल तशी वाचनाची कक्षा, विषय आणि लेखक बदलत जातात. लहान वयातील छोटी पुस्तके, चरित्रे बाजूला ठेवून सुपरहिरो खुणावायला लागतात. माझ्या लहानपणी बाबूराव अर्नाळकर, सुहास शिरवळकर, गुरुनाथ नाईक यांच्या अनेक काल्पनिक कथानायकांनी मजा आणलेली आहे. मग झुंजार, गोलंदाज, घंटाकर्ण, मंदार, काळा पहाड या मंडळीनी सुट्ट्या सार्थकी लावल्या. याबरोबरच माहितीचा अक्षरशः खजिना असलेली अमृत, विचित्र विश्व, छावा, किशोर आणि अर्थातच चांदोबा यांनी खर्या अर्थाने आमचे बालपण समृद्ध केले.

टप्पा ओसरल्यानंतर गुलाबी महाविद्यालयीन दिवस सुरू होतात. (दुर्दैवाने महाविद्यालयीन दिवस संपले, तरी कोणतेही गुलाबी अनुभव घेता आले नाहीत, याची वाचकांनी नोंद घ्यावी. :-) नंतरचा काळ तर मेकॅनिकल इंजीनियरिंगरूपी वाळवंटात गेल्यामुळे ओअॅसिस म्हणावी अशी हिरवळही नव्हती. ज्या कोणी होत्या, त्या आजही वर्गभगिनीच आहेत. असो.) तर गुलाबी प्रकरण झाले नाही, तरी कादंबरीकारांनी आम्हाला कल्पनेच्या विश्वात तरी फिरवून आणले.
ट्रेकिंगचा किडा चावला आणि गो.नि. दांडेकराच्या पुस्तकांकडे वळणे अपरिहार्य झाले. अप्पांची भटकंतीची पुस्तके तर वाचलीच, तशीच माचीवरला बुधा, पवनाकाठचा धोंडी, जैत रे जैत, पडघवली, शितू, मृण्मयी ही पुस्तके संग्रहात जमा झाली. याशिवाय भटकंतीवर लिखाण करणारे मिलिंद गुणाजी, वसंत लिमये, भगवान चिले, आनंद पाळंदे, महेश तेंडुलकर, सतीश अक्कलकोट आणि माझा मित्र सचिन जोशी यांच्या पुस्तकांची भर पडली.
आता मात्र कालमानाप्रमाणे थोडे संधोधनात्मक लिखाण आवडू लागले आहे. थोडा अभ्यास वाढविण्याचा प्रयत्न चालू आहे. 'ग्रंथ हेच गुरू' हे नक्की पटले आहे.
अर्थात पुस्तकात रमलो असताना २०१२ला आंतरजालावरच्या मराठी संकेतस्थळांच्या संपर्कात आलो. पहिली वेबसाइट अर्थात आपले लाडके मि.पा., नंतर मायबोली, ऐसी अक्षरे, उपक्रम, मनोगत हे सापडले. पण पहिले प्रेम मि.पा. आणि तेच राहील. इथला वाचन करण्याजोग्या धाग्यांचा खजिना बघितला आणि वेड लागल्यासारखे धागे खणून काढले. पुढे तर लिखाणाला सुरुवातही केली.
पुढे आले व्हॉट्स अॅप. तिथेही उत्तम उत्तम पोस्ट वाचायला मिळाल्या. आभासी जगातील मिपाकर या व्हॉट्स अॅपच्या माध्यमातून प्रत्यक्ष संपर्कात आले. मात्र या माध्यमाच्या नादात वाचन हरवत चालले आहे असे वाटल्यावर पुन्हा एकदा पुस्तकांकडे वळलो आहे.
भटकंती अर्थात ट्रेकिंग
सतत घड्याळ्याच्या काट्याला बांधलेले आपण केव्हातरी या रूटीनला कंटाळतो आणि कोठेतरी बाहेर जाऊन येऊ या, यासाठी बेत सुरू होतो. बहुतेक नेमस्त लोकांप्रमाणे मीही घरच्यांबरोबर लोकप्रिय पर्यटनस्थळांवर जायचो. या फिरण्यात नाही म्हणायला पन्हाळा, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सिंहगड, जंजिरा, देवगिरी असे पर्यटकप्रिय किल्ले पाहून झाले होते. पण तोपर्यंत ट्रेकिंगचा किडा चावला नव्ह्ता.
हा किडा नक्की कधी चावला, हे मी तारखेनिशी सांगू शकतो. मी व माझा एक मित्र प्रशांत, दोघांनी मिळून राजगडला जाण्याचा बेत आखला. कहर म्हणजे आधी मी राजगड व रायगड एकच समजायचो. (मलाच कशाला दोष द्यायचा? चक्क महाराष्ट्राचे सरकारी अधिकारी हे दोन गड एकच समजायचे. वाचा - गो.नि. दांडेकरांचे दुर्गभ्रमणगाथा.) पण राजगड वेगळा, तो पुणे जिल्ह्यात नसरापूरजवळ आहे, ही माहिती समजली आणि तिथे जाण्याची ओढ लागली.
अर्थातच बहुतेकांना आलेला अनुभव आम्हालाही आला. जाण्याच्य दिवसापर्यंत तयार असणारे सदस्य आदल्या दिवशी गळायला लागले. त्यांना अपरिहार्य कामे आठवू लागली. दोनदा हेच झाल्यानंतर आम्ही फक्त दोघांनीच जाण्याचे नक्की केले. दिवस ठरला ७ जानेवारी २०००. भल्या पहाटे नसरापूर उर्फ चेलाडी फाट्यावर दाखल झालो. कडाक्याच्या थंडीत शेकोटीची ऊब घेतो आहे, तोपर्यंत वाळूचा ट्रक तिकडेच निघाला आहे अशी बातमी आली. चक्क मागे वाळूवर बसकण मारून निघालो. पुरेशी माहिती नसल्याने ट्रकवाल्याने आम्हाला सोडले त्या भोसलेवाडीतून राजमार्गाने जायचे सोडून आम्ही निघालो येसाजी कंकाच्या भुतोंडे गावाच्या कच्च्या गाडीरस्त्याने. बापूजी बुवाच्या खिंडीनंतर वाट वर चढायचे सोडून खाली उतरायला लागली, तेव्हा काहीतरी गडबड आहे हे लक्षात आले. बरे, कोणाला विचारावे तर आसमंतात चिटपाखरू नाही. अखेरीस डोंगरावर चढणारी एक वाट सापडली. धसकफसक करीत वर चढलो, शेवटी गडाच्या तटबंदीचे दर्शन झाले आणि छातीचे भाते फुफाटत असताना सपाटीवर आडवे पडलो.
अवघड वाटांची सवय अजून व्हायची असल्याने काहीशा खड्या वाटेने चढून अळू दरवाज्याने संजीवनी माचीत प्रवेश केला. एकेक टप्पा निरखत अखेरीस दुपारी दोन वाजता गडाच्या बालेकिल्ल्याच्या पायथ्याला पोहोचलो. खाली गावातून घेतलेली पावट्याची उसळ आणि जाड लालभडक नाचणीची भाकरी हातात घेऊन खाल्ली आणि बाटलीतील पाणी रिचवून जमेल तेवढा गड पाहायला निघालो.
अस्ताव्यस्त पसरलेला राजगड धावतपळत बघायचा, तरी किमान दोन दिवस हवेत. इथे तर दुपारचे तीन वाजलेले. अखेरीस बालेकिल्ला बघून पुन्हा यायचे नक्की केले. बालेकिल्ल्याच्या अवघड टप्प्याशी आलो. एकंदरीत तिथल्या पावठ्या आणि समोर आ वासलेली दरी पाहिली आणि मी शरणागती जाहीर केली. (अर्थात तोच मी अलंग, मदन, चंदेरी गडावर नंतर आरामात गेलो.) प्रशांत एकटाच वर गेला आणि तासाभरात परत आला. पौष महिन्याची थंडी गडावर पसरायला लागली. सूर्यही ड्युटी संपल्याने अस्ताच्या तयारीला लागला. मंगळवार असल्याने गडावर आम्ही दोघे आणि गडावरचा हवालदार सोडला, तर अक्षरशः चिटपाखरू नव्हते. चोरदिंडीची वाट अवघड, म्हणून आम्ही वाजेघरच्या बाजूच्या प्रशस्त पायर्यांनी उतरायचा निर्णय घेतला. थोडे अंतर उतरून गडाकडे वळून बघितले. मावळत्या प्रकाशात तटबंदी विलक्षण आकर्षक दिसत होती. मोह घातल्यासारखे हे दृश्य बघतच राहिलो. कदाचित मेंदूत काहीतरी क्लिक झाले असेल. हाच तो क्षण, हीच ती वेळ. अक्षरशः गडाच्या प्रेमात पडलो. तिथून फावल्या वेळात राजगड हाच डोक्यात विचार.
सुदैवाने पुढच्या आठवड्यात पुस्तक प्रदर्शन आले, त्यात प्र.के. घाणेकर यांचे 'साद सह्याद्रीची ! भटकंती किल्ल्यांची !!' हे पुस्तक पाहिले आणि विकत घेऊन टाकले. लगेच आम्ही मित्र एकत्र येऊन २५-२६ जानेवारीला तोरणा आणि सिंगापूर नाळेतून रायगड असा ट्रेक ठरवला. आणि तिथून या ट्रेकिंगचा प्रवास सुरू झाला. गेली १९ वर्षे सह्याद्री, कोकण, मराठवाडा, खानदेश फिरून झाले. आता विदर्भ खुणावतोय. शिवाय इतर राज्ये आहेतच. या छंंदाने अनेक नवे मित्र दिले, गावोगावी ओळखी निर्माण केल्या, अनेक लोक संपर्कात आले, जग पाहायला मिळाले, असंख्य अनुभव आले, किती थरारक प्रसंग आले त्याची गणती नाही. कित्येकदा कोणी सोबत आले नाही तरी एकटाच अनेक गडांचे माथे तुडवून आलो, कित्येक रात्री कोण्या मंदिरात किंवा कोण्या गावकर्याच्या ओसरीवर काढल्या. कधी वाटा चुकलो, तर कधी 'आता काय करायचे?' अशा परिस्थितीत सापडलो, पण दर वेळी अतर्क्यपणे कोठ्न तरी मदत आली. आजही फार कंटाळा आला की सॅक बाहेर येते, पुस्तक, गूगल, मित्रांच्या व्हॉट्स अॅपवर मेसेज जातो आणि एका नव्या मोहिमेची आखणी होते. 'काय बघायचे आहे त्या दगडधोंड्यांत?' अशी घरच्यांची टीका कानामागे टाकली जाते. ट्रेकिंगचा चावलेला हा किडा कधी उतरेल असे वाटत नाही आणि उतरावा अशी इच्छाही नाही. खरे तर इतर छंदांविषयी लिहिणे शक्य आहे. पण या दोनच छंदांवर लिहिताना धागा खूप मोठा झाला. त्यामुळे इथेच थांबतो. धागा कसा वाटला, ते प्रतिसादांंमध्ये जरूर लिहा.
प्रकाशचित्रे श्रेयनिर्देश: प्रचि १: प्रचेतस प्रचि २: किसन शिंदे प्रचि ३ व ४: स्पा प्रचि ५: हेमंत ववले (निसर्गशाळा)
विशेष
वाचन
52003
प्रतिक्रिया
36